५० कौसल्या-सुनयना-संवाद

दोहा

मूल (दोहा)

एहि सुख जोग न लोग सब कहहिं कहाँ अस भागु।
सहज सुभायँ समाज दुहु राम चरन अनुरागु॥ २८०॥

अनुवाद (हिन्दी)

सर्व लोक म्हणत होते की, आम्ही या सुखांच्या योग्यतेचे नाही. आमचे एवढे भाग्य कुठचे? दोन्ही समाजांना श्रीरामांविषयी मनापासून प्रेम होते.॥ २८०॥

मूल (चौपाई)

एहि बिधि सकल मनोरथ करहीं।
बचन सप्रेम सुनत मन हरहीं॥
सीय मातु तेहि समय पठाईं।
दासीं देखि सुअवसरु आईं॥

अनुवाद (हिन्दी)

सर्वजण अशा प्रकारे मनोरथ करीत होते. त्यांचे प्रेमळ बोलणे ऐकणाऱ्यांची मने आकर्षित करून घेत होते. त्याचवेळी सीतेची माता सुनयना हिने पाठविलेल्या दासी कौसल्या इत्यादी राण्यांना भेटण्याची योग्य वेळ पाहून आल्या.॥ १॥

मूल (चौपाई)

सावकाससुनि सब सिय सासू।
आयउ जनक राज रनिवासू॥
कौसल्याँ सादर सनमानी।
आसन दिए समय सम आनी॥

अनुवाद (हिन्दी)

सीतेच्या सर्व सासवा या वेळी मोकळ्या आहेत. हे ऐकून जनक राजांचा राणीवसा त्यांना भेटायला आला. कौसल्येने आदराने त्यांना सन्मान दिला आणि प्रसंगानुरूप आसने आणून दिली.॥ २॥

मूल (चौपाई)

सीलु सनेहु सकल दुहु ओरा।
द्रवहिं देखि सुनि कुलिस कठोरा॥
पुलकसिथिलतनबारि बिलोचन।
महि नख लिखन लगीं सब सोचन॥

अनुवाद (हिन्दी)

दोन्ही बाजूच्या सर्वांचे वागणे आणि प्रेम पाहून आणि ऐकून कठोर वज्रसुद्धा वितळून जात होते. त्यांचे देह पुलकित व प्रेमविह्वल झाले होते. नेत्रांतून दुःखाचे व प्रेमाचे अश्रू भरले होते. सर्वजणी आपल्या पायांच्या नखांनी जमीन उकरत विचार करीत होत्या.॥ ३॥

मूल (चौपाई)

सब सियराम प्रीति किसि मूरति।
जनु करुना बहु बेष बिसूरति॥
सीय मातु कह बिधि बुधि बाँकी।
जो पय फेनु फोर पबि टाँकी॥

अनुवाद (हिन्दी)

त्या सर्व श्रीसीतारामांच्या प्रेमाच्या मूर्ती होत्या. जणू प्रत्यक्ष करुणाच अनेक रूपे धारण करून स्फुंदत होत्या. सीतेची माता सुनयना म्हणाली, ‘विधात्याची बुद्धी मोठी विचित्र आहे. ती दुधाच्या फेसासारख्या कोमल वस्तूला वज्रासारख्या छिन्नीने फोडत आहे. कोमल व निर्दोष लोकांवर संकटे घालत आहे.॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

सुनिअ सुधा देखिअहिं गरल सब करतूति कराल।
जहँ तहँ काक उलूक बक मानस सकृत मराल॥ २८१॥

अनुवाद (हिन्दी)

अमृत हे फक्त ऐकायला मिळते आणि विष सर्वत्र प्रत्यक्ष पहायला मिळते. विधात्याची सर्व कृत्ये भयंकर आहेत. जिकडे तिकडे कावळे, घुबडे आणि बगळेच दिसतात. हंस फक्त मानससरोवरातच असतात.’॥ २८१॥

मूल (चौपाई)

सुनिससोच कहदेबि सुमित्रा।
बिधि गति बड़ि बिपरीत बिचित्रा॥
जो सृजि पालइ हरइ बहोरी।
बालकेलि सम बिधि मति भोरी॥

अनुवाद (हिन्दी)

हे ऐकून सुमित्रा दुःखाने म्हणाली की, ‘विधात्याची चाल मोठी विपरीत आणि विचित्र आहे. तो सृष्टी उत्पन्न करून तिचे पालन करतो आणि मग ती नष्ट करतो. विधात्याची बुद्धी बालकांच्या खेळासारखी अविचारी आहे.’॥ १॥

मूल (चौपाई)

कौसल्या कह दोसु न काहू।
करम बिबस दुख सुख छति लाहू॥
कठिन करम गतिजान बिधाता।
जो सुभ असुभ सकल फल दाता॥

अनुवाद (हिन्दी)

कौसल्या म्हणाली, ‘दोष कुणाचाही नाही. दुःख-सुख, हानी-लाभ या गोष्टी कर्माच्या अधीन असतात. कर्माची गती कठीण असते आणि फक्त विधाताच ती जाणतो. तोच शुभ-अशुभ अशा सर्वांची फळे देणारा आहे.॥ २॥

मूल (चौपाई)

ईस रजाइ सीस सबही कें।
उतपति थिति लय बिषहु अमी कें॥
देबि मोह बस सोचिअ बादी।
बिधि प्रपंचु अस अचल अनादी॥

अनुवाद (हिन्दी)

ईश्वराची आज्ञा सर्वांच्याच डोक्यावर आहे. उत्पत्ती, स्थिती आणि लय व अमृत आणि विष हे सर्व त्याच्या अधीन आहेत. हे देवी, मोहाने दुःख करणे हे व्यर्थ आहे. विधात्याचा प्रपंच असाच अटळ व अनादी आहे.॥ ३॥

मूल (चौपाई)

भूपति जिअब मरब उर आनी।
सोचिअ सखि लखि निज हित हानी॥
सीय मातु कह सत्य सुबानी।
सुकृती अवधि अवधपति रानी॥

अनुवाद (हिन्दी)

महाराजांच्या मरण्या-जगण्याची गोष्ट मनात आणून आपण जी चिंता करतो, ती हे सखी, आपण आपल्या हिताची होणारी हानी पाहून स्वार्थामुळे करतो.’ सीतेची माता म्हणाली, ‘तुमचे म्हणणे योग्य व सत्य आहे. तुम्ही पुण्यात्म्याची परिसीमा असणाऱ्या अयोध्यापती महाराज दशरथांच्याच महाराणी आहात, मग असे का म्हणणार नाही?’॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

लखनु रामु सिय जाहुँ बन भल परिनाम न पोचु।
गहबरि हियँ कह कौसिला मोहि भरत कर सोचु॥ २८२॥

अनुवाद (हिन्दी)

कौसल्या दुःखी मनाने म्हणाली की, ‘श्रीराम, लक्ष्मण, सीता वनात गेल्याने त्याचा परिणाम चांगलाच होईंल, वाईट नाही. मला काळजी वाटते भरताची.॥ २८२॥

मूल (चौपाई)

ईस प्रसाद असीस तुम्हारी।
सुत सुतबधू देवसरि बारी॥
राम सपथ मैं कीन्हि न काऊ।
सो करि कहउँ सखी सति भाऊ॥

अनुवाद (हिन्दी)

ईश्वराची कृपा व तुमच्या आशीर्वादामुळे माझे चारी पुत्र व चारी सुना गंगाजलाप्रमाणे पवित्र आहेत. हे सखी, मी कधी श्रीरामाची शपथ घेतली नाही. परंतु आज मी रामाची शपथ घेऊन सत्य-भावनेने सांगते की,॥ १॥

मूल (चौपाई)

भरत सील गुनबिनय बड़ाई।
भायप भगति भरोस भलाई॥
कहत सारदहु कर मति हीचे।
सागर सीप कि जाहिं उलीचे॥

अनुवाद (हिन्दी)

भरताचे शील, गुण, नम्रता, मोठेपणा, बंधुत्व, भक्ती, विश्वास आणि चांगुलपणा यांचे वर्णन करण्यास सरस्वती सुद्धा धजवत नाही. शिंपल्याने कधी समुद्र उपसता येईल काय?॥ २॥

मूल (चौपाई)

जानउँ सदा भरत कुलदीपा।
बार बार मोहि कहेउ महीपा॥
कसें कनकु मनि पारिखि पाएँ।
पुरुष परिखिअहिं समयँ सुभाएँ॥

अनुवाद (हिन्दी)

मी भरताला नेहमी कुलदीपक म्हणून मानते. महाराजांनी मला वेळोवेळी असेच सांगितले होते. सोने हे कस लावल्यावर व रत्न हे पारखी मिळाल्यावरच ओळखता येते. त्याप्रमाणे पुरुषाची परीक्षा वेळ आल्यावर त्याच्या स्वभावावरून होते.॥ ३॥

मूल (चौपाई)

अनुचितआजु कहब अस मोरा।
सोक सनेहँ सयानप थोरा॥
सुनि सुरसरिसमपावनि बानी।
भईं सनेह बिकल सब रानी॥

अनुवाद (हिन्दी)

परंतु आज मी असे म्हणणे योग्य नव्हे. शोक आणि स्नेहामध्ये शहाणपणा कमी होतो. लोक म्हणतील की, मी प्रेमामुळे भरताची वाखाणणी करीत आहे?’ कौसल्येची गंगेसारखी पवित्र वाणी ऐकून सर्व राण्या प्रेमामुळे व्याकूळ झाल्या.॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

कौसल्या कह धीर धरि सुनहु देबि मिथिलेसि।
को बिबेकनिधि बल्लभहि तुम्हहि सकइ उपदेसि॥ २८३॥

अनुवाद (हिन्दी)

कौसल्या धीर धरून पुन्हा म्हणाली, ‘हे देवी मिथिलेश्वरी! ज्ञानाचे भांडार असलेल्या श्रीजनकांची पत्नी असलेल्या तुम्हांला कोण उपदेश करू शकेल.॥ २८३॥

मूल (चौपाई)

रानिराय सन अवसरु पाई।
अपनी भाँति कहब समुझाई॥
रखि अहिं लखनु भरतु गवनहिं बन।
जौं यह मत मानै महीप मन॥

अनुवाद (हिन्दी)

हे राणी, सवड सापडताच तुम्ही राजांना आपल्याकडून जेवढे समजावून सांगता येईल तेवढे सांगा की, लक्ष्मणाला घरी ठेवून घ्यावे व भरताने वनात जावे. जर ही गोष्ट राजांना पटली तर,॥ १॥

मूल (चौपाई)

तौभल जतनु करब सुबिचारी।
मोरें सोचु भरत कर भारी॥
गूढ़ सनेह भरत मन माहीं।
रहें नीक मोहि लागत नाहीं॥

अनुवाद (हिन्दी)

चांगल्या प्रकारे विचार करून असा प्रयत्न करा. मला भरताची मोठी काळजी वाटते. भरताच्या मनात गूढ प्रेम आहे. त्याने घरी राहण्यामध्ये मला भले वाटत नाही. त्याच्या जिवाची भीती वाटते.’॥ २॥

मूल (चौपाई)

लखि सुभाउ सुनि सरल सुबानी।
सब भइ मगन करुन रस रानी॥
नभ प्रसून झरि धन्यधन्य धुनि।
सिथिल सनेहँ सिद्ध जोगी मुनि॥

अनुवाद (हिन्दी)

कौसल्येचा स्वभाव बघून आणि तिचा सरळपणा व उत्तम वाणी ऐकून सर्व राण्या करुणरसात बुडून गेल्या. आकाशातून पुष्पवृष्टी होऊ लागली आणि ‘धन्य धन्य’ ध्वनी होऊ लागला. सिद्ध, योगी अणि मुनी प्रेमामुळे गलितगात्र झाले.॥ ३॥

मूल (चौपाई)

सबुरनिवासुबिथकिलखि रहेऊ।
तब धरि धीर सुमित्राँ कहेऊ॥
देबि दंड जुग जामिनि बीती।
राम मातु सुनि उठी सप्रीती॥

अनुवाद (हिन्दी)

हे पाहून सारा राणीवसा निस्तब्ध झाला. तेव्हा सुमित्रेने धीर धरून म्हटले की, ‘देवी, दोन घटका रात्र सरली आहे.’ हे ऐकून श्रीरामांची माता उठली.॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

बेगि पाउ धारिअ थलहि कह सनेहँ सतिभाय।
हमरें तौ अब ईस गति कै मिथिलेस सहाय॥ २८४॥

अनुवाद (हिन्दी)

आणि सद्भावपूर्वक प्रेमाने म्हणाली, ‘आता तुम्ही लवकर मुक्कामाला जा. आम्हांला आता ईश्वरच गती आहे अथवा मिथिलेश्वर जनक साहाय्य करणारे आहेत.’॥ २८४॥

मूल (चौपाई)

लखि सनेह सुनिबचन बिनीता।
जनकप्रिया गह पाय पुनीता॥
देबि उचित असि बिनय तुम्हारी।
दसरथ घरिनि राम महतारी॥

अनुवाद (हिन्दी)

कौसल्येचे प्रेम पाहून आणि तिचे विनम्र शब्द ऐकून जनकांच्या प्रिय पत्नीने तिचे पाय धरले आणि म्हटले, ‘हे देवी, तुम्ही राजा दशरथांची राणी आणि श्रीरामांच्या माता आहात. तुमची ही नम्रता तुम्हांलाच शोभून दिसते.॥ १॥

मूल (चौपाई)

प्रभु अपने नीचहु आदरहीं।
अगिनि धूम गिरि सिर तिनु धरहीं॥
सेवकु राउ करम मन बानी।
सदा सहाय महेसु भवानी॥

अनुवाद (हिन्दी)

प्रभू श्रीराम आपल्या सामान्य माणसांचाही आदर ठेवतात. अग्नी हा धुराला व पर्वत हा गवताला आपल्या मस्तकी धारण करतो. आमचे राजे तर कर्म, मन, वचन यांनी तुमचे सेवक आहेत आणि श्रीमहादेव-पार्वती हे नित्य सहाय्यक आहेत.॥ २॥

मूल (चौपाई)

रउरे अंग जोगु जग को है।
दीप सहाय कि दिनकर सोहै॥
रामु जाइ बनु करि सुर काजू।
अचल अवधपुर करिहहिं राजू॥

अनुवाद (हिन्दी)

तुमचा सहायक होण्याजोगा जगात कोण आहे? दिवा सूर्याला मदत करण्यास गेला, तर शोभेल काय? श्रीरामचंद्र वनात जाऊन देवांचे कार्य पार पाडतील व अयोध्येस येऊन दीर्घकाळ राज्य करतील.॥ ३॥

मूल (चौपाई)

अमर नाग नर राम बाहुबल।
सुख बसिहहिं अपनें अपनें थल॥
यह सब जागबलिक कहि राखा।
देबि न होइ मुधा मुनि भाषा॥

अनुवाद (हिन्दी)

देव, नाग व मनुष्य हे सर्व श्रीरामांच्या बाहुबलावर आपापल्या लोकी सुखाने नांदतील. हे सर्व याज्ञवल्क्य मुनींनी पूर्वीच सांगून ठेवले आहे. हे देवी! मुनींचे वचन खोटे होत नाही.’॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

अस कहि पग परि पेम अति सिय हित बिनय सुनाइ।
सिय समेत सियमातु तब चली सुआयसु पाइ॥ २८५॥

अनुवाद (हिन्दी)

असे म्हणून व प्रेमाने पाया पडून सीतेच्या मातेने सीतेला आपल्याबरोबर घेऊन जाण्याची विनंती केली व मनापासून आज्ञा मिळाल्यावर ती सीतेला घेऊन आपल्या मुक्कामी निघाली.॥ २८५॥

मूल (चौपाई)

प्रिय परिजनहि मिली बैदेही।
जो जेहि जोगु भाँति तेहि तेही॥
तापस बेष जानकी देखी।
भा सबु बिकल बिषाद बिसेषी॥

अनुवाद (हिन्दी)

जानकी आपल्या प्रिय कुटुंबियांना योग्य प्रकारे भेटली. जानकीला तपस्विनीच्या वेषात पाहून सर्वजण शोकाकुल झाले.॥ १॥

मूल (चौपाई)

जनक राम गुर आयसु पाई।
चले थलहि सिय देखी आई॥
लीन्हि लाइ उरजनक जानकी।
पाहुनि पावन पेम प्रान की॥

अनुवाद (हिन्दी)

राजा जनक श्रीरामांचे गुरू वसिष्ठ यांची आज्ञा घेऊन आपल्या निवासात गेले. त्यांनी सीतेला पाहिले. जनकांनी आपल्या पवित्र प्रेमाची आणि प्राणांची पाहुणी असलेल्या जानकीला हृदयाशी कवटाळले.॥ २॥

मूल (चौपाई)

उर उमगेउ अंबुधि अनुरागू।
भयउ भूप मनु मनहुँ पयागू॥
सिय सनेह बटु बाढ़त जोहा।
ता पर राम पेम सिसु सोहा॥

अनुवाद (हिन्दी)

त्यांच्या मनात प्रेमाचा सागर उसळत होता. राजांचे मन हे जणू प्रयाग होते आणि त्यांनी प्रेमसागरात आदिशक्ती सीतेचा अलौकिक प्रेमरूपी अक्षयवट पल्लवित होताना पाहिला. त्या सीतेच्या प्रेमरूपी वटवृक्षावर श्रीरामांचे प्रेमरूप बालक शोभून दिसत होते. (प्रलयसागरात वटपत्रावर बाल भगवान शोभावे तसे.)॥ ३॥

मूल (चौपाई)

चिरजीवी मुनि ग्यान बिकल जनु।
बूड़त लहेउ बाल अवलंबनु॥
मोह मगन मति नहिं बिदेह की।
महिमा सिय रघुबर सनेह की॥

अनुवाद (हिन्दी)

जनकांचे ज्ञानरूपी चिरंजीव मार्कंडेय मुनी व्याकूळ होऊन बुडता बुडता जणू श्रीरामरूपी बालकाचा आधार मिळाल्याने वाचले. वस्तुतः ज्ञान्यांचे शिरोमणी विदेहराजाची बुद्धी मोहात पडली नव्हती. श्रीसीतारामांच्या प्रेमाचा हा महिमा होता. त्यामुळे त्यांच्यासारख्या ज्ञान्यांचे ज्ञानसुद्धा विरून गेले.॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

सिय पितु मातु सनेह बस बिकल न सकी सँभारि।
धरनिसुताँ धीरजु धरेउ समउ सुधरमु बिचारि॥२८६॥

अनुवाद (हिन्दी)

माता-पित्याच्या प्रेमामुळे सीता व्याकूळ झाली. ती स्वतःला सावरू शकली नाही. परंतु धैर्यवती पृथ्वीची कन्या सीता हिने वेळ व धर्म यांचा विचार करून धैर्य धारण केले.॥ २८६॥

मूल (चौपाई)

तापस बेष जनक सिय देखी।
भयउ पेमु परितोषु बिसेषी॥
पुत्रि पबित्र किए कुल दोऊ।
सुजस धवल जगु कह सबु कोऊ॥

अनुवाद (हिन्दी)

सीतेला तपस्विनीच्या वेषात पाहून जनकांना फार प्रेम व समाधान वाटले. ते म्हणाले, ‘मुली, तू दोन्ही कुळांना पवित्र केलेस. तुझ्या निर्मळ कीर्तीने संपूर्ण जग उजळले आहे, असेच सर्वजण म्हणत आहेत.॥ १॥

मूल (चौपाई)

जिति सुरसरि कीर तिसरि तोरी।
गवनु कीन्ह बिधि अंड करोरी॥
गंग अवनिथल तीनि बड़ेरे।
एहिं किए साधु समाज घनेरे॥

अनुवाद (हिन्दी)

तुझी कीर्तिरूपी नदी गंगेलाही जिंकून एका नव्हे तर कोटॺवधी ब्रह्मांडांमधून वाहात चालली आहे. गंगेने पृथ्वीवर हरिद्वार, प्रयागराज आणि गंगासागर यांना महान तीर्थे बनविले, परंतु तुझ्या या कीर्ति-नदीने अनेक संतसमाजरूपी तीर्थस्थाने निर्माण केली.’॥ २॥

मूल (चौपाई)

पितु कह सत्यसनेहँ सुबानी।
सीय सकुच महुँ मनहुँ समानी॥
पुनि पितु मातु लीन्हि उर लाई।
सिख आसिष हित दीन्हि सुहाई॥

अनुवाद (हिन्दी)

जनकांनी प्रेमाने खरीखुरी वाणी उच्चारली, परंतु आपले मोठेपण ऐकून सीता जणू संकोचात बुडून गेली. माता-पित्यांनी तिला उराशी धरले आणि हितकारक उपदेश व आशीर्वाद दिले.॥ ३॥

मूल (चौपाई)

कहति न सीय सकुचिमन माहीं।
इहाँ बसब रजनीं भल नाहीं॥
लखि रुख रानि जनायउ राऊ।
हृदयँ सराहत सीलु सुभाऊ॥

अनुवाद (हिन्दी)

सीता काही बोलू शकली नाही, परंतु मनात संकोच वाटत होता की, रात्री सासूंची सेवा सोडून येथे राहणे योग्य नाही. राणी सुनयना हिने सीतेचा रोख पाहून राजा जनकांना सांगितले. तेव्हा दोघेजण आपल्या मनात सीतेच्या शील व स्वभावाची प्रशंसा करू लागली.॥ ४॥