४८ श्रीराम-भरतादींचा संवाद

दोहा

मूल (दोहा)

भरत बिनय सादर सुनिअ करिअ बिचारु बहोरि।
करब साधुमत लोकमत नृपनय निगम निचोरि॥ २५८॥

अनुवाद (हिन्दी)

प्रथम भरताची विनंती आदराने ऐकून घ्या, आणि त्यावर विचार करा. नंतर साधुमत, लोकमत, राजनीती आणि वेदांचे सार काढून त्याप्रमाणे करा.’॥ २५७॥

मूल (चौपाई)

गुर अनुरागु भरत पर देखी।
राम हृदयँ आनंदु बिसेषी॥
भरतहि धरम धुरंधर जानी।
निज सेवक तन मानस बानी॥

अनुवाद (हिन्दी)

गुरूंचे भरतावरील प्रेम पाहून श्रीरामांच्या मनास विशेष आनंद झाला. भरत हा धर्मधुरंधर व तन-मन-वचनाने आपला सेवक आहे, असे समजून,॥ १॥

मूल (चौपाई)

बोले गुर आयस अनुकूला।
बचन मंजु मृदु मंगलमूला॥
नाथ सपथ पितु चरन दोहाई।
भयउ न भुअन भरत सम भाई॥

अनुवाद (हिन्दी)

श्रीरामचंद्र गुरूंच्या आज्ञेला अनुकूल, मनोहर, कोमल व कल्याणाचे मूळ असलेले वचन बोलले-‘हे गुरुवर्य! मी तुमची शपथ घेऊन व वडिलांच्या चरणांची आण घेऊन सत्य सांगतो की, विश्वामध्ये भरतासारखा भाऊ कोणी झालाच नाही.॥ २॥

मूल (चौपाई)

जे गुर पद अंबुज अनुरागी।
ते लोकहुँ बेदहुँ बड़भागी॥
राउर जा पर अस अनुरागू।
को कहि सकइ भरत कर भागू॥

अनुवाद (हिन्दी)

जे लोक गुरूंच्या चरण-कमलांच्या ठायी अनुराग बाळगतात, ते लौकिक दृष्टॺा आणि वैदिक-पारमार्थिक दृष्ट्या मोठॺा भाग्याचे होत. मग ज्याच्यावर तुमच्यासारख्या गुरूंचे असे प्रेम आहे, त्या भरताच्या भाग्याची वाखाणणी कोण करू शकेल?॥ ३॥

मूल (चौपाई)

लखि लघु बंधु बुद्धि सकुचाई।
करत बदन पर भरत बड़ाई॥
भरतु कहहिं सोइकिएँ भलाई।
अस कहि राम रहे अरगाई॥

अनुवाद (हिन्दी)

लहान भाऊ समजून भरताच्या तोंडावर त्याची प्रशंसा करण्या-मध्ये माझ्या बुद्धीला संकोच वाटतो. तरीही मी सांगतो की, भरत जे काही सांगेल, त्याप्रमाणे करणे चांगले होय.’ एवढे बोलून श्रीरामचंद्र गप्प बसले.॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

तब मुनि बोले भरत सन सब सँकोचु तजि तात।
कृपासिंधु प्रिय बंधु सन कहहु हृदय कै बात॥ २५९॥

अनुवाद (हिन्दी)

तेव्हा मुनी भरताला म्हणाले, ‘हे पुत्रा! सगळा संकोच सोडून कृपेचा सागर असलेल्या आपल्या प्रिय भावाला आपल्या मनातील विचार सांग.’॥ २५९॥

मूल (चौपाई)

सुनि मुनि बचन रामरुख पाई।
गुरु साहिब अनुकूल अघाई॥
लखि अपनें सिर सबुछरु भारू।
कहि न सकहिं कछु करहिं बिचारू॥

अनुवाद (हिन्दी)

मुनींचे वचन ऐकून आणि श्रीरामांचा कल पाहून, आणि ते दोघे आपल्याला अनुकूल असल्याचे पाहून, सर्व ओझे आपल्याच शिरावर आहे, असे भरताला वाटले व तो काही बोलू शकला नाही. विचार करू लागला.॥ १॥

मूल (चौपाई)

पुलकि सरीर सभाँ भए ठाढ़े।
नीरज नयन नेह जल बाढ़े॥
कहब मोर मुनिनाथ निबाहा।
एहि तें अधिक कहौं मैं काहा॥

अनुवाद (हिन्दी)

पुलकित शरीराने तो सभेत उभा राहिला. कमल-नेत्रांतून प्रेमाश्रूंचा पूर आला. तो म्हणाला, ‘माझे म्हणणे मुनिनाथांनी सांगून टाकले. यापेक्षा जास्त मी काय बोलू?॥ २॥

मूल (चौपाई)

मैं जानउँ निज नाथ सुभाऊ।
अपराधिहु पर कोह न काऊ॥
मो पर कृपा सनेहु बिसेषी।
खेलत खुनिस न कबहूँ देखी॥

अनुवाद (हिन्दी)

मी आपल्या स्वामींचा स्वभाव जाणतो. ते अपराध्यावरही कधी रागवत नाहीत. माझ्यावर तर त्यांची खास कृपा आणि प्रीती आहे.मी खेळामध्येही कधी त्यांना नाराज झालेले पाहिले नाही.॥ ३॥

मूल (चौपाई)

सिसुपन तें परिहरेउँ न संगू।
कबहुँ न कीन्ह मोर मन भंगू॥
मैं प्रभु कृपा रीति जियँ जोही।
हारेहुँ खेल जितावहिं मोही॥

अनुवाद (हिन्दी)

मी लहानपणापासून त्यांची सोबत सोडली नाही व त्यांनीही माझे मन कधी दुखवले नाही. मी प्रभूंच्या कृपेची रीत चांगल्या प्रकारे पाहिली आहे. खेळात मी हरलो, तरीही प्रभू मला जिंकू देत.॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

महूँ सनेह सकोच बस सनमुख कही न बैन।
दरसन तृपित न आजु लगि पेम पिआसे नैन॥ २६०॥

अनुवाद (हिन्दी)

मी प्रेमामुळे व संकोचामुळे कधी त्यांच्यासमोर तोंड उघडले नाही. प्रेमाचे भुकेले माझे नेत्र प्रभूंचे दर्शन घेऊन आजवर कधी तृप्त झाले नाहीत॥ २६०॥

मूल (चौपाई)

बिधि न सकेउ सहिमोर दुलारा।
नीच बीचु जननी मिस पारा॥
यहउ कहत मोहि आजु न सोभा।
अपनीं समुझि साधु सुचि को भा॥

अनुवाद (हिन्दी)

परंतु विधात्याला श्रीरामांचे माझ्यावरील प्रेम सहन झाले नाही. त्याने माझ्या दुष्ट मातेच्या निमित्ताने आम्हा दोघांमध्ये अंतर निर्माण केले हे सांगणेही मला आज शोभत नाही; कारण स्वतःच्या समजुतीने कोणी साधू पवित्र झाला आहे काय?॥ १॥

मूल (चौपाई)

मातु मंदि मैं साधु सुचाली।
उर अस आनत कोटि कुचाली॥
फरइ कि कोदव बालि सुसाली।
मुकता प्रसव कि संबुक काली॥

अनुवाद (हिन्दी)

माता दुष्ट आहे आणि मी सदाचारी व साधू आहे, असे मनात आणणे हेच कोटॺवधी दुराचारांसारखे आहे. कदन्नाचे कणीस कधी उत्तम भात उत्पन्न करील काय? काळा शिंपला कधी मोती उत्पन्न करील काय?॥ २॥

मूल (चौपाई)

सपनेहुँ दोसक लेसु न काहू।
मोर अभाग उदधि अवगाहू॥
बिनु समुझें निज अघ परिपाकू।
जारिउँ जायँ जननि कहि काकू॥

अनुवाद (हिन्दी)

स्वप्नातही कुणामध्येच दोषाचा लेशमात्रही नाही. माझे दुर्दैव हाच अथांग समुद्र आहे. मी आपल्या पापांचा परिणाम लक्षात न घेता मातेला कटू वचन बोलून विनाकारण दुखावले.॥ ३॥

मूल (चौपाई)

हृदयँ हेरि हारेउँ सब ओरा।
एकहि भाँति भलेहिं भल मोरा॥
गुर गोसाइँ साहिब सिय रामू।
लागत मोहि नीक परिनामू॥

अनुवाद (हिन्दी)

मी आपल्या मनाला सर्व बाजूंनी धुंडाळून पाहिले व मी हरलो. माझ्या कल्याणाचा एकही उपाय सुचत नाही. एकाच प्रकारे निश्चिपणे माझे भले होईल. ते म्हणजे गुरुमहाराज सर्वसमर्थ आहेत आणि श्रीसीताराम माझे स्वामी आहेत. यामुळे परिणाम चांगला होईल, असे मला वाटते.॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

साधु सभाँ गुर प्रभु निकट कहउँ सुथल सतिभाउ।
प्रेम प्रपंचु कि झूठ फुर जानहिं मुनि रघुराउ॥ २६१॥

अनुवाद (हिन्दी)

या साधूंच्या सभेमध्ये आणि गुरुजी व स्वामींच्या जवळ या पवित्र तीर्थ-स्थानात मी सत्य भावनेने सांगतो. हे प्रेम आहे की कपट? खोटे आहे की खरे? हे सर्वज्ञ मुनी वसिष्ठ आणि अन्तर्यामी श्रीरघुनाथ जाणतात.॥ २६१॥

मूल (चौपाई)

भूपति मरन पेम पनु राखी।
जननी कुमति जगतु सबु साखी॥
देखि न जाहिं बिकल महतारीं।
जरहिं दुसह जर पुर नर नारीं॥

अनुवाद (हिन्दी)

प्रेमाचा पण पाळून पिताजींचे मरण ओढवणे आणि मातेची दुर्बुद्धी, यांच्या साक्षीला हे जग आहे. माता व्याकूळ आहेत, त्यांना पहावत नाही. अयोध्यापुरीचे स्त्री-पुरुष दुःसह दुःखाने जळत आहेत.॥ १॥

मूल (चौपाई)

महीं सकल अनरथ कर मूला।
सो सुनि समुझि सहिउँ सब सूला॥
सुनि बन गवनु कीन्ह रघुनाथा।
करि मुनि बेष लखन सिय साथा॥
बिनु पानहिन्ह पयादेहि पाएँ।
संकरु साखि रहेउँ एहि घाएँ॥
बहुरि निहारि निषाद सनेहू।
कुलिस कठिन उर भयउ न बेहू॥

अनुवाद (हिन्दी)

या सर्व अनर्थांचे मूळ मीच आहे. हे ऐकून आणि जाणून घेतल्यापासून मी सर्व दुःख भोगले आहे. श्रीरघुनाथ, लक्ष्मण आणि सीतेसोबत मुनींचा वेष धारण करून अनवाणी पायी वनात गेले, हे ऐकून भगवान शंकर साक्षीला आहेत की, हा प्रहार झेलूनही मी जिवंत राहिलो. नंतर निषादराजाचे प्रेम पाहूनही माझे हे वज्राहून कठोर हृदय विदीर्ण झाले नाही.॥ २-३॥

मूल (चौपाई)

अब सबु आँखिन्ह देखेउँ आई।
जिअत जीव जड़ सबइ सहाई॥
जिन्हहि निरखि मग साँपिनि बीछी।
तजहिं बिषम बिषु तामस तीछी॥

अनुवाद (हिन्दी)

आता येथे आल्यावर डोळ्यांनी सर्व पाहिले. माझा हा जड जीव जिवंत राहून मला पिडणार. ज्यांना पाहिल्यावर वाटेतील सर्पीण आणि विंचू हे सुद्धा आपले विष व आपला तीव्र क्रोध सोडून देतात,॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

तेइ रघुनंदनु लखनु सिय अनहित लागे जाहि।
तासु तनय तजि दुसह दुख दैउ सहावइ काहि॥ २६२॥

अनुवाद (हिन्दी)

तेच रघुनंदन, लक्ष्मण व सीता हे जिला शत्रू वाटले, त्या कैकेयीचा पुत्र असलेल्या मला सोडून दुःसह दुःख दुसऱ्या कोणाला सतावणार?’॥ २६२॥

मूल (चौपाई)

सुनि अति बिकल भरत बर बानी।
आरति प्रीति बिनय नय सानी॥
सोक मगन सब सभाँ खभारू।
मनहुँ कमल बन परेउ तुसारू॥

अनुवाद (हिन्दी)

अत्यंत व्याकूळ व दुःख, प्रेम, विनय आणि नीती यांनी भरलेली भरताची वाणी ऐकून सर्व लोक शोक-मग्न झाले. साऱ्या सभेत विषाद पसरला. जणू कमलवनावर हिमपात झाला.॥ १॥

मूल (चौपाई)

कहि अनेक बिधि कथा पुरानी।
भरत प्रबोधु कीन्ह मुनि ग्यानी॥
बोले उचित बचन रघुनंदू।
दिनकर कुल कैरव बन चंदू॥

अनुवाद (हिन्दी)

तेव्हा ज्ञानी मुनी वसिष्ठांनी अनेक प्रकारच्या प्राचीन कथा सांगून भरताचे समाधान केले. नंतर सूर्यकुलरूपी कुमुदवनाला प्रफुल्ल करणारे चंद्रमा श्रीरघुनाथ योग्य प्रकारे सांगू लागले.॥ २॥

मूल (चौपाई)

तात जायँ जियँ करहु गलानी।
ईस अधीन जीव गति जानी॥
तीनि काल तिभुअन मत मोरें।
पुन्यसिलोक तात तर तोरें॥

अनुवाद (हिन्दी)

‘हे भरता! आपल्या मनात तू विनाकारण अपराधीपणा बाळगत आहेस. जीवाची गती ही ईश्वराच्या अधीन आहे, हे जाणून घे. माझ्या मते त्रिकालातील व त्रैलोक्यातील सर्व पुण्यात्मे पुरुष हे तुझ्याहून खालचे आहेत.॥ ३॥

मूल (चौपाई)

उर आनत तुम्ह पर कुटिलाई।
जाइ लोकु परलोकु नसाई॥
दोसु देहिं जननिहि जड़ तेई।
जिन्ह गुर साधु सभा नहिं सेई॥

अनुवाद (हिन्दी)

मनातही तुझ्यावर आरोप केल्यास इहलोक व परलोक हे दोन्हीही नष्ट होतील. ते मूर्ख लोकच कैकेयी मातेला दोष देतात की, ज्यांनी गुरू व साधूंचा सत्संग कधी केलेला नाही.॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

मिटिहहिं पाप प्रपंच सब अखिल अमंगल भार।
लोक सुजसु परलोक सुखु सुमिरत नामु तुम्हार॥ २६३॥

अनुवाद (हिन्दी)

हे भरता, तुझे नाम-स्मरण करताच सर्व पापे, अज्ञान आणि अमंगळ यांच्या राशी नष्ट होतील आणि या लोकी सुंदर कीर्ती व परलोकी सुख मिळेल.॥ २६३॥

मूल (चौपाई)

कहउँ सुभाउ सत्य सिव साखी।
भरत भूमि रह राउरि राखी॥
तात कुतरक करहु जनि जाएँ।
बैर पेम नहिं दुरइ दुराएँ॥

अनुवाद (हिन्दी)

हे भरता, मी भगवान शिवांना साक्षीला ठेवून खरे सांगतो की, ही पृथ्वी तुझ्यावरच आधारित आहे. बाबा रे! तू विनाकारण खिन्न होऊ नकोस. वैर आणि प्रेम हे लपविल्याने लपत नसते.॥ १॥

मूल (चौपाई)

मुनिगन निकट बिहगमृग जाहीं।
बाधक बधिक बिलोकि पराहीं॥
हित अनहित पसु पच्छिउ जाना।
मानुष तनु गुन ग्यान निधाना॥

अनुवाद (हिन्दी)

पशु-पक्षी हे मुनींच्याजवळ बिनधास्त जातात, परंतु शिकाऱ्याला पाहून पळून जातात. पशु-पक्षीसुद्धा मित्र कोण व शत्रू कोण हे ओळखतात, मग मनुष्यशरीर तर गुण व ज्ञानाचे भांडार आहे.॥ २॥

मूल (चौपाई)

तात तुम्हहि मैं जानउँ नीकें।
करौं काह असमंजस जीकें॥
राखेउ रायँ सत्य मोहि त्यागी।
तनु परिहरेउ पेम पन लागी॥

अनुवाद (हिन्दी)

वत्सा! मी तुला चांगला ओळखतो. काय करू? मनाची मोठी द्विधा अवस्था झाली आहे. राजांनी माझा त्याग करून सत्याचे रक्षण केले आणि माझ्या प्रेमापोटी शरीराचा त्याग केला.॥ ३॥

मूल (चौपाई)

तासु बचन मेटत मन सोचू।
तेहि तें अधिक तुम्हार सँकोचू॥
ता पर गुर मोहि आयसु दीन्हा।
अवसि जो कहहु चहउँ सोइ कीन्हा॥

अनुवाद (हिन्दी)

त्यांचे वचन खोटे पडू नये, असे मला वाटते. त्याहीपेक्षा तुझी भीड मला जास्त वाटते. शिवाय गुरुजींनी तुझ्या सांगण्याप्रमाणे वागण्याची आज्ञा केली आहे. म्हणून आता तू जे काही सांगशील, त्याप्रमाणे करण्याची माझी इच्छा आहे.॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

मनु प्रसन्न करि सकुच तजि कहहु करौं सोइ आजु।
सत्यसंध रघुबर बचन सुनि भा सुखी समाजु॥ २६४॥

अनुवाद (हिन्दी)

तू मन प्रसन्न ठेवून आणि संकोच सोडून जे काही सांगशील, तेच मी आज करीन.’ सत्यप्रतिज्ञ रघुकुलश्रेष्ठ श्रीरामांचे वचन ऐकून सर्व समाज सुखावून गेला.॥ २६४॥

मूल (चौपाई)

सुर गन सहित सभय सुरराजू।
सोचहिं चाहत होन अकाजू॥
बनत उपाउ करत कछु नाहीं।
राम सरन सब गे मन माहीं॥

अनुवाद (हिन्दी)

देवगणांसह देवराज इंद्र घाबरून विचार करू लागला की, योजलेले कार्य बिघडू पाहात आहे. काही उपाय करता येत नाही. तेव्हा तो मनातल्या मनात श्रीरामांना शरण गेला.॥ १॥

मूल (चौपाई)

बहुरि बिचारि परस्पर कहहीं।
रघुपति भगत भगति बस अहहीं॥
सुधि करि अंबरीष दुरबासा।
भे सुर सुरपति निपट निरासा॥

अनुवाद (हिन्दी)

मग ते आपसात विचार करून म्हणू लागले की, श्रीरघुनाथ हे भक्ताच्या भक्तीला वश असतात. अंबरीष व दुर्वास यांची आठवण झाल्यावर तर देव व इंद्र फारच निराश झाले.॥ २॥

मूल (चौपाई)

सहे सुरन्ह बहु काल बिषादा।
नरहरि किए प्रगट प्रहलादा॥
लगि लगि कान कहहिं धुनि माथा।
अब सुर काज भरत के हाथा॥

अनुवाद (हिन्दी)

पूर्वी देवांनी फार काळ दुःख भोगले. भक्त प्रह्लादानेच तेव्हा भगवान नृसिंह यांना प्रकट केले. सर्व देव परस्परांच्या कानांत कुजबुजून आणि डोकी हालवून म्हणाले की, ‘यावेळी देवांचे कार्य भरताच्या हाती आहे.॥ ३॥

मूल (चौपाई)

आन उपाउन देखिअ देवा।
मानत रामु सुसेवक सेवा॥
हियँ सपेम सुमिरहु सब भरतहि।
निज गुन सील राम बस करतहि॥

अनुवाद (हिन्दी)

हे देवांनो, आणखी कोणताही उपाय दिसत नाही. श्रीराम हे आपल्या श्रेष्ठ सेवकाची सेवा मान्य करून त्याच्यावर फार प्रसन्न होतात. म्हणून आपले गुण आणि शील यांनी श्रीरामांना वश करून घेणाऱ्या भरताचे सर्वजण आपापल्या मनात प्रेमाने स्मरण करा.’॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

सुनि सुरमत सुरगुर कहेउ भल तुम्हार बड़ भागु।
सकल सुमंगल मूल जग भरत चरन अनुरागु॥ २६५॥

अनुवाद (हिन्दी)

देवांचे मत ऐकून देवगुरू बृहस्पती म्हणाले, ‘चांगला विचार केलात. तुमचे भाग्य मोठे आहे. भरताच्या चरणांचे प्रेम हे जगात सर्व मांगल्याचे मूळ आहे.॥ २६५॥

मूल (चौपाई)

सीतापति सेवक सेवकाई।
कामधेनु सय सरिस सुहाई॥
भरत भगति तुम्हरें मन आई।
तजहु सोचु बिधि बात बनाई॥

अनुवाद (हिन्दी)

सीतानाथ श्रीरामांच्या सेवकाची सेवा ही शेकडो कामधेनूंप्रमाणे सुंदर आहे. तुमच्या मनात भरताची भक्ती आली, आता काळजी सोडा. विधात्याने सर्व जुळवून आणले.॥ १॥

मूल (चौपाई)

देखु देवपति भरत प्रभाऊ।
सहज सुभायँ बिबस रघुराऊ॥
मन थिर करहु देव डरु नाहीं।
भरतहि जानि राम परिछाहीं॥

अनुवाद (हिन्दी)

हे देवराज, भरताचा प्रभाव तर बघा. श्रीरघुनाथ हे मनापासून त्याला पूर्णपणे वश झाले आहेत. हे देवांनो, भरताला श्रीरामांच्या सावलीप्रमाणे अनुकरण करणारा मानून मन शांत ठेवा. घाबरण्याचे काही कारण नाही.’॥ २॥

मूल (चौपाई)

सुनि सुरगुर सुर संमत सोचू।
अंतरजामी प्रभुहि सकोचू॥
निज सिर भारु भरत जियँ जाना।
करत कोटि बिधि उर अनुमाना॥

अनुवाद (हिन्दी)

बृहस्पती आणि देवांची संमती, तसेच त्यांची काळजी ऐकून अंतर्यामी श्रीरामांना संकोच वाटू लागला. तर भरताला सर्व भार आपल्याच शिरी आला, असे मनात वाटले. तो मनामध्ये असंख्य प्रकारचे अंदाज बांधू लागला.॥ ३॥

मूल (चौपाई)

करि बिचारुमन दीन्ही ठीका।
राम रजायस आपन नीका॥
निज पन तजि राखेउ पनु मोरा।
छोहु सनेहु कीन्ह नहिं थोरा॥

अनुवाद (हिन्दी)

सर्व प्रकारे विचार केल्यावर शेवटी त्याने मनातल्या मनात हेच ठरविले की, श्रीरामांच्या आज्ञेमध्येच आपले कल्याण आहे. त्यांनी स्वतःची प्रतिज्ञा सोडून माझी प्रतिज्ञा राखली. हे करून त्यांनी काही कमी कृपा आणि प्रेम केलेले नाही.॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

कीन्ह अनुग्रह अमित अति सब बिधि सीतानाथ।
करि प्रनामु बोले भरतु जोरि जलज जुग हाथ॥ २६६॥

अनुवाद (हिन्दी)

श्रीजानकीनाथांनी सर्व प्रकारे माझ्यावर अपार कृपा केलेली आहे. त्यानंतर भरताने दोन्ही कर-कमल जोडून प्रणाम केला व म्हटले,॥ २६६॥

मूल (चौपाई)

कहौं कहावौं का अब स्वामी।
कृपा अंबुनिधि अंतरजामी॥
गुर प्रसन्न साहिब अनुकूला।
मिटी मलिन मन कलपित सूला॥

अनुवाद (हिन्दी)

‘हे स्वामी, हे कृपासागर, हे अंतर्यामी, आता मी अधिक काय सांगू? आणि काय म्हणवून घेऊ? गुरुमहाराज प्रसन्न आणि स्वामी हे मला अनुकूल आहेत, हे पाहून माझ्या मलिन मनातील कल्पित दुःख नष्ट झाले.॥ १॥

मूल (चौपाई)

अपडर डरेउँ न सोच समूलें।
रबिहि न दोसु देव दिसि भूलें॥
मोर अभागु मातु कुटिलाई।
बिधि गति बिषम काल कठिनाई॥

अनुवाद (हिन्दी)

मी उगीचच भ्यालो होतो. माझी चिंता निर्मूळ होती. दिशा विसरल्या तर त्यात हे देवा, सूर्याचा दोष नाही. माझे दुर्भाग्य, मातेची कुटिलता, विधात्याची वाकडी चाल आणि काळाचा कठोरपणा,॥ २॥

मूल (चौपाई)

पाउरोपि सब मिलि मोहि घाला।
प्रनतपाल पन आपन पाला॥
यह नइ रीति न राउरि होई।
लोकहुँ बेद बिदित नहिं गोई॥

अनुवाद (हिन्दी)

या सर्वांनी मिळून पाय रोवून मला नष्ट केले. परंतु शरणागताचे रक्षक असलेल्या तुम्ही आपले शरणागताच्या रक्षणाचे ब्रीद पाळून मला वाचवले. ही काही तुमची नवी रीत नाही. ही लोक व वेद यांत प्रत्यक्ष प्रकट आहे. लपून राहिलेली नाही.॥ ३॥

मूल (चौपाई)

जगु अनभल भल एकु गोसाईं।
कहिअ होइ भल कासु भलाईं॥
देउ देवतरु सरिस सुभाऊ।
सनमुख बिमुख न काहुहि काऊ॥

अनुवाद (हिन्दी)

सारे जग वाईट करणारे असो, परंतु हे स्वामी, केवळ तुम्हीच एक भले करणारे आहात. मग सांगा की, कुणाच्या भलाईमुळे भले होईल? हे देवा, तुमचा स्वभाव कल्पवृक्षासारखा आहे. तो कधी कुणाला अनुकूल नसतो व प्रतिकूलही नसतो.॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

जाइ निकट पहिचानि तरु छाहँ समनि सब सोच।
मागत अभिमत पाव जग राउ रंकु भल पोच॥ २६७॥

अनुवाद (हिन्दी)

त्या कल्पवृक्षाला ओळखून कोणी त्याच्याजवळ गेला, तर त्याची केवळ सावलीच सर्व चिंता नाहीशी करणारी आहे. राजा-रंक, चांगले-वाईट, असे जगातील लोक त्या वृक्षाजवळ मागूनच मन मानेल ती वस्तू प्राप्त करतात.॥ २६७॥

मूल (चौपाई)

लखि सब बिधि गुर स्वामि सनेहू।
मिटेउ छोभु नहिं मन संदेहू॥
अब करुनाकर कीजिअ सोई।
जन हित प्रभु चित छोभु न होई॥

अनुवाद (हिन्दी)

गुरू आणि स्वामी यांचा सर्व प्रकारे स्नेह असलेला पाहून माझा क्षोभ नाहीसा झाला. मनात कोणताही संशय उरला नाही. हे दयानिधान, आता असे करा की, त्यामुळे या दासासाठी प्रभूंच्या मनाला क्षोभ होऊ नये.॥ १॥

मूल (चौपाई)

जो सेवकु साहिबहि सँकोची।
निज हित चहइ तासु मति पोची॥
सेवक हित साहिब सेवकाई।
करै सकल सुख लोभ बिहाई॥

अनुवाद (हिन्दी)

जो सेवक स्वामीला भीड घालून आपले भले व्हावे, असे इच्छितो, त्याची बुद्धी नीच होय. सर्व सुखे व लोभ सोडून स्वामीची सेवा करावी, यातच सेवकाचे हित आहे.॥ २॥

मूल (चौपाई)

स्वारथु नाथ फिरें सबही का।
किएँ रजाइ कोटि बिधि नीका॥
यह स्वारथ परमारथ सारू।
सकल सुकृत फल सुगति सिंगारू॥

अनुवाद (हिन्दी)

हे नाथ, तुम्ही परत येण्यामध्ये सर्वांचाच स्वार्थ आहे आणि तुमची आज्ञा पाळण्यामध्ये कोटॺवधी प्रकारचे कल्याण आहे. हेच स्वार्थ व परमार्थ यांतील सार आहे, हेच सर्व पुण्यांचे फळ व संपूर्ण शुभ गतींचा शृंगार आहे.’॥ ३॥

मूल (चौपाई)

देव एक बिनती सुनि मोरी।
उचित होइ तस करब बहोरी॥
तिलक समाजु साजि सबु आना।
करिअ सुफल प्रभु जौं मनु माना॥

अनुवाद (हिन्दी)

हे देव! तुम्ही माझी एक विनंती ऐकून मग जे योग्य असेल ते करा. राजतिलकासाठी सर्व सामग्री तयार करून आणली आहे. प्रभूंच्या मनात असेल, तर कृपा करून तिचा उपयोग करा.॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

सानुज पठइअ मोहि बन कीजिअ सबहि सनाथ।
नतरु फेरिअहिं बंधु दोउ नाथ चलौं मैं साथ॥ २६८॥

अनुवाद (हिन्दी)

लहान भाऊ शत्रुघ्नाबरोबर मला वनात पाठवा आणि तुम्ही अयोध्येला परतून सर्वांना सनाथ करा. नाहीतर हे नाथ, लक्ष्मण व शत्रुघ्न या दोघांना पाठवून द्या आणि मला तुमच्याबरोबर येऊ द्या.॥ २६८॥

मूल (चौपाई)

नतरु जाहिं बन तीनिउ भाई।
बहुरिअ सीय सहित रघुराई॥
जेहि बिधि प्रभु प्रसन्न मन होई।
करुना सागर कीजिअ सोई॥

अनुवाद (हिन्दी)

किंवा आम्ही तिन्ही भाऊ वनात जाऊ आणि हे रघुनाथ! सीतादेवीसह आपण अयोध्येला परत जाऊ. हे दयानिधी! ज्या रीतीने आपले मन प्रसन्न होईल, ते आपण करा.॥ १॥

मूल (चौपाई)

देवँ दीन्ह सबु मोहि अभारू।
मोरें नीति न धरम बिचारू॥
कहउँ बचन सब स्वारथ हेतू।
रहत न आरत कें चित चेतू॥

अनुवाद (हिन्दी)

हे देवा, सर्व जबाबदारी तुम्ही माझ्यावर टाकली. परंतु माझ्यामध्ये नीतीचा विचार नाही की धर्माचा नाही. मी आपल्या स्वार्थासाठी सर्व गोष्टी सांगत आहे. दुःखी मनुष्याच्या मनात विवेक रहात नाही.॥ २॥

मूल (चौपाई)

उतरु देइ सुनि स्वामि रजाई।
सो सेवकु लखि लाज लजाई॥
अस मैं अवगुन उदधि अगाधू।
स्वामि सनेहँ सराहत साधू॥

अनुवाद (हिन्दी)

स्वामींची आज्ञा ऐकल्यावर जो उलट उत्तर देतो, अशा सेवकाला पाहून लाजेलाही लाज वाटते. मी अवगुणांचा अथांग समुद्र आहे, परंतु स्वामी, तुम्ही मला स्नेहामुळे ‘साधू’ म्हणून माझी वाखाणणी करता.॥ ३॥

मूल (चौपाई)

अब कृपाल मोहि सो मत भावा।
सकुच स्वामि मन जाइँ न पावा॥
प्रभु पद सपथ कहउँ सति भाऊ।
जग मंगल हित एक उपाऊ॥

अनुवाद (हिन्दी)

हे कृपाळू, ज्यामुळे स्वामींच्या मनाला भीड न पडेल, तोच विचार मला आवडेल. प्रभूंच्या चरणांची शपथ, मी सत्य भावनेने सांगतो की, जगताच्या कल्याणाचा हाच एक उपाय आहे.॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

प्रभु प्रसन्न मन सकुच तजि जो जेहि आयसु देब।
सो सिर धरि धरि करिहि सबु मिटिहि अनट अवरेब॥ २६९॥

अनुवाद (हिन्दी)

संकोच सोडून प्रसन्न मनाने जी आज्ञा प्रभू देतील, ती सर्व लोक शिरोधार्य मानतील आणि सर्व उपद्रव व चिंता मिटतील.’॥ २६९॥

मूल (चौपाई)

भरत बचन सुचि सुनि सुर हरषे।
साधु सराहि सुमन सुर बरषे॥
असमंजस बस अवध नेवासी।
प्रमुदित मन तापस बनबासी॥

अनुवाद (हिन्दी)

भरताचे पवित्र बोलणे ऐकून देव आनंदित झाले आणि ‘छान, छान’ अशी प्रशंसा करीत त्यांनी फुले उधळली. अयोध्यानिवासी बुचकळ्यात पडले की आता श्रीराम काय सांगतात ते पाहू या. तपस्वी आणि वनवासी लोक श्रीराम वनातच राहतील, या आशेने मनातून आनंदले.॥ १॥

मूल (चौपाई)

चुपहिं रहे रघुनाथ सँकोची।
प्रभु गति देखि सभा सब सोची॥
जनक दूत तेहि अवसर आए।
मुनि बसिष्ठँ सुनि बेगि बोलाए॥

अनुवाद (हिन्दी)

परंतु भिडेमुळे श्रीराम गप्प राहिले. प्रभूंची ही मौन स्थिती पाहून सर्व सभा काळजीत पडली. त्या वेळी जनक राजांचे दूत आले, हे ऐकून वसिष्ठांनी त्यांना त्वरित बोलावून घेतले.॥ २॥

मूल (चौपाई)

करि प्रनाम तिन्ह रामु निहारे।
बेषु देखि भए निपट दुखारे॥
दूतन्ह मुनिबर बूझी बाता।
कहहु बिदेह भूप कुसलाता॥

अनुवाद (हिन्दी)

त्या दूतांनी येऊन, प्रणाम करून श्रीरामचंद्रांना पाहिले. त्यांचा मुनींसारखा वेष पाहून त्यांना फार दुःख झाले. मुनिश्रेष्ठ वसिष्ठांनी दूतांना म्हटले की, ‘राजा जनकांच्या खुशाली विषयी सांगा.॥ ३॥

मूल (चौपाई)

सुनि सकुचाइ नाइ महि माथा।
बोले चरबर जोरें हाथा॥
बूझब राउर सादर साईं।
कुसल हेतु सो भयउ गोसाईं॥

अनुवाद (हिन्दी)

मुनींचे हे बोलणे ऐकून संकोचाने पृथ्वीवर मस्तक टेकवून ते श्रेष्ठ दूत हात जोडून म्हणाले, ‘हे स्वामी, हे गोस्वामी, तुम्ही आदराने विचारले, याचमुळे खुशाली सिद्ध झाली.॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

नाहिं त कोसलनाथ कें साथ कुसल गइ नाथ।
मिथिला अवध बिसेष तें जगु सब भयउ अनाथ॥ २७०॥

अनुवाद (हिन्दी)

अन्यथा हे नाथ! क्षेम-कुशल हे सर्व कोसलनाथ दशरथांच्याबरोबर निघून गेले. तसे पाहिले तर सर्व जग हेच अनाथ झाले आहे. परंतु मिथिला आणि अयोध्या या विशेष करून अनाथ झालेल्या आहेत.॥ २७०॥

मूल (चौपाई)

कोसलपतिगति सुनि जनकौरा।
भे सब लोक सोकबस बौरा॥
जेहिं देखे तेहि समय बिदेहू।
नामु सत्य अस लाग न केहू॥

अनुवाद (हिन्दी)

अयोध्यानाथांचा मृत्यू झाल्याचे ऐकल्यावर जनकपुरीवासी सर्व लोक शोकाकुल झाल्याने बावरून गेले. त्यावेळी विदेहींनाही शोकमग्न झालेले ज्यांनी पाहिले, त्यांच्यापैकी कुणालाही असे वाटले नाही की, त्यांचे विदेह हे नाव खरे आहे.॥ १॥

मूल (चौपाई)

रानि कुचालि सुनत नरपालहि।
सूझ न कछु जस मनि बिनु ब्यालहि॥
भरत राज रघुबर बनबासू।
भा मिथिलेसहि हृदयँ हराँसू॥

अनुवाद (हिन्दी)

राणीचे दुष्टाचरण ऐकून जनक राजांना काही सुचेना, ज्याप्रमाणे मण्याविना सापाला काही सुचत नाही त्याप्रमाणे. नंतर भरताला राज्य व रामचंद्रांना वनवास दिल्याचे ऐकून मिथिलेश्वर जनकांच्या मनाला फार दुःख झाले.॥ २॥

मूल (चौपाई)

नृप बूझे बुध सचिव समाजू।
कहहु बिचारि उचित का आजू॥
समुझि अवध असमंजस दोऊ।
चलिअ कि रहिअ न कह कछु कोऊ॥

अनुवाद (हिन्दी)

राजांनी विद्वानांना आणि मंत्रिमंडळाला विचारले की, आज या प्रसंगी काय करणे योग्य आहे? अयोध्येची दशा समजल्यावर आणि दोन्ही प्रकारे मनात गोंधळ झाल्याचे पाहून ‘जायचे की रहायचे?’ याविषयी कुणी काही सांगितले नाही.॥ ३॥

मूल (चौपाई)

नृपहिं धीर धरि हृदयँ बिचारी।
पठए अवध चतुर चर चारी॥
बूझि भरत सति भाउ कुभाऊ।
आएहु बेगि न होइ लखाऊ॥

अनुवाद (हिन्दी)

जेव्हा कुणीच स्वतःचे मत सांगितले नाही, तेव्हा धैर्याने विचार करून राजाने चार चतुर गुप्तचरांना अयोध्येस पाठविले. त्यांना सांगितले की, ‘तुम्ही श्रीरामांविषयी भरताला सद्भाव आहे की दुर्भाव आहे, याची माहिती घेऊन त्वरित परत या. पण सावध राहून कुणालाही तुमचा पत्ता लागू देऊ नका.’॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

गए अवध चर भरत गति बूझि देखि करतूति।
चले चित्रकूटहि भरतु चार चले तेरहूति॥ २७१॥

अनुवाद (हिन्दी)

गुप्तचर अयोध्येला गेले आणि त्यांनी भरताची वागणूक व करणी पाहिली. भरत चित्रकूटाला जायला निघताच, ते मिथिला नगरीस निघाले.॥ २७१॥

मूल (चौपाई)

दूतन्ह आइ भरत कइ करनी।
जनक समाज जथामति बरनी॥
सुनि गुर परिजन सचिव महीपति।
भे सब सोच सनेहँ बिकल अति॥

अनुवाद (हिन्दी)

गुप्तचरांनी परत येऊन राजा जनकांच्या सभेत भरताच्या करणीचे आपल्या बुद्धीप्रमाणे वर्णन करून सांगितले. ते ऐकून गुरू, कुटुंबीय, मंत्री आणि राजा हे सर्व जण काळजीमुळे व प्रेमामुळे अत्यंत व्याकूळ झाले.॥ १॥

मूल (चौपाई)

धरि धीरजु करि भरत बड़ाई।
लिए सुभट साहनी बोलाई॥
घर पुर देस राखि रखवारे।
हय गय रथ बहु जान सँवारे॥

अनुवाद (हिन्दी)

नंतर जनकांनी धैर्याने भरताची वाखाणणी करून चांगल्या योद्धॺांना व पागेवरील अधिकाऱ्यांना बोलावले. घर, नगर व देशात रक्षकांना ठेवून घोडे, हत्ती, रथ इत्यादी बरीच वाहने सज्ज केली.॥ २॥

मूल (चौपाई)

दुघरी साधि चले ततकाला।
किए बिश्रामु न मग महिपाला॥
भोरहिं आजु नहाइ प्रयागा।
चले जमुन उतरन सबु लागा॥

अनुवाद (हिन्दी)

दोन घडींचा मुहूर्त साधून ते तत्काळ निघाले. जनकांनी वाटेत कुठेही विश्रांती घेतली नाही. आजच सकाळी प्रयागराजामध्ये स्नान करून ते निघाले आहेत. जेव्हा सर्व लोक यमुनापार करू लागले,॥ ३॥

मूल (चौपाई)

खबरि लेन हम पठए नाथा।
तिन्ह कहि अस महि नायउ माथा॥
साथ किरात छ सातक दीन्हे।
मुनिबर तुरत बिदा चर कीन्हे॥

अनुवाद (हिन्दी)

हे नाथ, तेव्हा आम्हांला बातमी आणण्यासाठी पाठविले आहे.’ दूतांनी असे सांगून भूमीवर मस्तक टेकविले. मुनिश्रेष्ठ वसिष्ठांनी सहा-सात भिल्लांना सोबत देऊन दूतांना त्वरित पाठविले.॥४॥

दोहा

मूल (दोहा)

सुनत जनक आगवनु सबु हरषेउ अवध समाजु।
रघुनंदनहि सकोचु बड़ सोच बिबस सुरराजु॥ २७२॥

अनुवाद (हिन्दी)

जनकांचे आगमन झाल्याचे ऐकून अयोध्येतून आलेल्या लोकांना आनंद झाला. श्रीरामांना मोठा संकोच वाटू लागला आणि देवराज इंद्र तर मोठॺा काळजीत पडला.॥ २७२॥

मूल (चौपाई)

गरइ गलानि कुटिल कैकेई।
काहि कहै केहि दूषनु देई॥
अस मन आनि मुदित नर नारी।
भयउ बहोरि रहब दिन चारी॥

अनुवाद (हिन्दी)

कुटिल कैकेयी मनातून पश्चात्तापामुळे पार थिजून गेली. कुणाला सांगायचे व कुणाला दोष द्यायचा? दुसरीकडे सर्व नर-नारी या कल्पनेने प्रसन्न झाले की, बरे झाले. जनक आल्यामुळे आणखी चार दिवस येथे रहाणे होईल.॥ १॥

मूल (चौपाई)

एहि प्रकार गत बासर सोऊ।
प्रात नहान लाग सबु कोऊ॥
करि मज्जनु पूजहिं नर नारी।
गनप गौरि तिपुरारि तमारी॥

अनुवाद (हिन्दी)

अशा प्रकारे तो दिवस निघून गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी सर्वजण स्नान करू लागले. स्नान करून गणेश, गौरी, महादेव व भगवान सूर्य यांची सर्वांनी पूजा केली.॥ २॥

मूल (चौपाई)

रमा रमन पद बंदि बहोरी।
बिनवहिं अंजुलि अंचल जोरी॥
राजा रामु जानकी रानी।
आनँद अवधि अवध रजधानी॥

अनुवाद (हिन्दी)

नंतर लक्ष्मीपती भगवान विष्णूंच्या चरणांना वंदन करून, हात जोडून, व पदर पसरून विनंती केली की, श्रीराम हे राजा व जानकी राणी होवोत. राजधानी अयोध्या ही आनंदाची परिसीमा होऊन॥ ३॥

मूल (चौपाई)

सुबस बसउ फिरिसहित समाजा।
भरतहि रामु करहुँ जुबराजा॥
एहि सुखसुधाँ सींचिसब काहू।
देव देहु जग जीवन लाहू॥

अनुवाद (हिन्दी)

सर्व समाज सुखाने नांदो आणि श्रीराम भरताला युवराजपद देवोत. हे देवा, या सुखरूपी अमृताचे सिंचन करून सर्वांना या जगात जगण्याचा लाभ द्या.॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

गुर समाज भाइन्ह सहित राम राजु पुर होउ।
अछत राम राजा अवध मरिअ माग सबु कोउ॥ २७३॥

अनुवाद (हिन्दी)

गुरू, समाज आणि भावांसह श्रीरामांचे राज्य अयोध्येत असो आणि श्रीराम राजा असतानाच आम्हांला अयोध्येत मृत्यू येवो.’ सर्वजण अशीच याचना करीत होते.॥ २७३॥

मूल (चौपाई)

सुनि सनेहमय पुरजन बानी।
निंदहिं जोग बिरति मुनि ग्यानी॥
एहिबिधि नित्य करम करि पुरजन।
रामहि करहिं प्रनाम पुलकि तन॥

अनुवाद (हिन्दी)

अयोध्यावासीयांची ती प्रेमळ वाणी ऐकून ज्ञानी मुनीसुद्धा आपल्या योग-साधनेची व वैराग्याची निंदा करू लागले. अयोध्यावासी अशाप्रकारे नित्यकर्म आटोपून पुलकित होऊन श्रीरामांना प्रणाम करू लागले.॥ १॥

मूल (चौपाई)

ऊँच नीच मध्यम नर नारी।
लहहिं दरसु निज निज अनुहारी॥
सावधान सबही सनमानहिं।
सकल सराहत कृपानिधानहिं॥

अनुवाद (हिन्दी)

उच्च, नीच आणि मध्यम या सर्व थरांतील स्त्री-पुरुष आपापल्या भावनेप्रमाणे श्रीरामांचे दर्शन घेऊ लागले. श्रीरामांनी तत्परतेने सर्वांना सन्मान दिला आणि ते सर्व कृपानिधान श्रीरामांची प्रशंसा करू लागले.॥ २॥

मूल (चौपाई)

लरि काइहि तें रघुबर बानी।
पालत नीति प्रीति पहिचानी॥
सील सकोच सिंधु रघुराऊ।
सुमुख सुलोचन सरल सुभाऊ॥

अनुवाद (हिन्दी)

प्रेम ओळखून नीतीचे पालन करणे हा श्रीरामांचा लहानपणापासूनचा स्वभाव होता. श्रीरघुनाथ हे शील व संकोचाचा समुद्र होते. ते सर्वांना अनुकूल असणारे, सर्वांना कृपेने व प्रेमाने पहाणारे व सरळ स्वभावाचे होते.॥ ३॥

मूल (चौपाई)

कहत राम गुन गन अनुरागे।
सब निज भाग सराहन लागे॥
हम सम पुन्य पुंज जग थोरे।
जिन्हहि रामु जानत करि मोरे॥

अनुवाद (हिन्दी)

श्रीरामांचे गुण सांगताना सर्व लोक प्रेममग्न झाले, आणि जगात आमच्यासारखे पुण्याची मोठी कमाई असणारे फारच थोडे आहेत ज्यांना श्रीराम आपले मानतात, असे म्हणून ते आपल्या भाग्याची प्रशंसा करू लागले.॥ ४॥