४६ कैकेयीचा पश्चात्ताप

दोहा

मूल (दोहा)

सरनि सरोरुह जल बिहग कूजत गुंजत भृंग।
बैर बिगत बिहरत बिपिन मृग बिहंग बहुरंग॥ २४९॥

अनुवाद (हिन्दी)

तलावांमधून कमळे उमललेली होती, पाण्यात राहणारे पक्षी कूजन करीत होते, भ्रमर गुंजारव करीत होते आणि अनेक रंगांचे पक्षी आणि पशू परस्पर वैरभाव सोडून वनात विहार करीत होते.॥ २४९॥

मूल (चौपाई)

कोल किरात भिल्ल बनबासी।
मधु सुचि सुंदर स्वादु सुधा सी॥
भरि भरि परनपुटीं रचि रूरी।
कंद मूल फल अंकुर जूरी॥

अनुवाद (हिन्दी)

कोल, किरात, भिल्ल इत्यादी वनवासी लोक सुंदर द्रोण बनवून त्यांतून अमृतासारखा स्वादिष्ट मध भरभरून आणत होते आणि कंदमुळे, फळे आणि अंकुर यांचे ढीग आणत होते.॥ १॥

मूल (चौपाई)

सबहि देहिं करिबिनय प्रनामा।
कहि कहि स्वाद भेद गुन नामा॥
देहिं लोग बहु मोल न लेहीं।
फेरत राम दोहाई देहीं॥

अनुवाद (हिन्दी)

मग सर्वांना विनवणी व प्रणाम करून त्या वस्तूंचे निरनिराळे स्वाद, प्रकार, गुण व नावे सांग-सांगून देत. लोक त्याचे पुष्कळ मूल्य देत, परंतु ते घेत नसत. परत करीत व श्रीरामांची शपथ घालीत.॥ २॥

मूल (चौपाई)

कहहिं सनेह मगन मृदु बानी।
मानत साधु पेम पहिचानी॥
तुम्ह सुकृती हम नीच निषादा।
पावा दरसनु राम प्रसादा॥

अनुवाद (हिन्दी)

प्रेम-मग्न होऊन ते कोमल वाणीने म्हणत, ‘साधू लोक प्रेम ओळखून त्याचा मान राखतात. तुम्ही तर पुण्यात्मे आहात, आम्ही हलके निषाद आहोत. श्रीरामांच्या कृपेमुळे आम्हांला तुमचे दर्शन घडले.॥ ३॥

मूल (चौपाई)

हमहि अगम अति दरसु तुम्हारा।
जस मरु धरनि देवधुनि धारा॥
राम कृपाल निषाद नेवाजा।
परिजन प्रजउ चहिअ जस राजा॥

अनुवाद (हिन्दी)

ज्याप्रमाणे मरुभूमीमध्ये गंगेचे दर्शन होणे दुर्लभ आहे, त्याप्रमाणे आम्हा लोकांना तुमचे दर्शन दुर्लभ आहे. पाहा, श्रीरामांनी निषादांवर कशी कृपा केली आहे. जसा राजा असतो, त्यांचा परिवार व प्रजा यांनीही तसेच असले पाहिजे,॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

यह जियँ जानि सँकोचु तजि करिअ छोहु लखि नेहु।
हमहि कृतारथ करन लगि फल तृन अंकुर लेहु॥ २५०॥

अनुवाद (हिन्दी)

असे मनात समजून, संकोच सोडून आणि आमचे प्रेम पाहून कृपा करा आणि आम्हांला कृतार्थ करण्यासाठी ही फळे, तृण व अंकुर घ्या.॥ २५०॥

मूल (चौपाई)

तुम्ह प्रिय पाहुने बन पगु धारे।
सेवा जोगु न भाग हमारे॥
देब काह हम तुम्हहि गोसाँई।
ईंधनु पात किरात मिताई॥

अनुवाद (हिन्दी)

तुम्ही प्रिय पाहुणे म्हणून वनात आला आहात. तुमची सेवा करण्याजोगे आमचे भाग्य नाही. हे स्वामी, आम्ही तुम्हांला काय देणार? भिल्लांची मैत्री फक्त सर्पण व पानांशीच असते.॥ १॥

मूल (चौपाई)

यह हमारि अति बड़ि सेवकाई।
लेहिं न बासन बसन चोराई॥
हम जड़ जीव जीव गन घाती।
कुटिल कुचाली कुमति कुजाती॥

अनुवाद (हिन्दी)

आम्ही तुमचे कपडे, भांडी चोरत नाही, हीच आमची मोठी सेवा होय. आम्ही अज्ञानी जीव आहोत. प्राण्यांची हिंसा करणारे आहोत, कुटिल, दुष्ट चालीचे, दुर्बुद्धीचे आणि हलक्या जातीचे आहोत.॥ २॥

मूल (चौपाई)

पाप करत निसि बासर जाहीं।
नहिं पट कटि नहिं पेट अघाहीं॥
सपनेहुँ धरमबुद्धि कस काऊ।
यह रघुनंदन दरस प्रभाऊ॥

अनुवाद (हिन्दी)

आमचे दिवस व रात्री हे पाप करण्यातच जातात. तरीही आमच्या कमरेला वस्त्र नाही आणि आम्ही आपले पोटही भरू शकत नाही. मग स्वप्नातही कधी धर्मबुद्धी आम्हांला कशी येणार? हा सर्व श्रीरघुनाथांच्या दर्शनाचा प्रभाव आहे.॥ ३॥

मूल (चौपाई)

जब तें प्रभु पद पदुम निहारे।
मिटे दुसह दुख दोष हमारे॥
बचन सुनत पुरजन अनुरागे।
तिन्ह के भाग सराहन लागे॥

अनुवाद (हिन्दी)

प्रभूंचे चरण-कमल जेव्हापासून पहातो, तेव्हापासून आमची असह्य दुःखे व पापे नाहीशी झाली आहेत.’ वनवासींचे ते बोलणे ऐकून अयोध्येच्या लोकांचे मन प्रेमाने भरून आले आणि ते त्या वनवासींच्या भाग्याची प्रशंसा करू लागले.॥ ४॥

छंद

मूल (दोहा)

लागे सराहन भाग सब अनुराग बचन सुनावहीं।
बोलनि मिलनि सिय राम चरन सनेहु लखि सुखु पावहीं॥
नर नारि निदरहिं नेहु निज सुनि कोल भिल्लनि की गिरा।
तुलसी कृपा रघुबंसमनि की लोह लै लौका तिरा॥

अनुवाद (हिन्दी)

सर्वजण त्यांच्या भाग्याची प्रशंसा करू लागले व प्रेमाने बोलू लागले. वनवासींच्या बोलण्याची व भेटण्याची पद्धत व श्रीरामांच्या चरणी त्यांचे प्रेम पाहून सर्वांना सुख झाले. त्या कोल, भिल्ल लोकांचे बोलणे ऐकून सर्व स्त्री-पुरुषांना आपल्या प्रेमाचा क्षुद्रपणा वाटू लागला. तुलसीदास म्हणतात की, जणू लोखंडाने भोपळ्यांना तारून नेले. ही श्रीरामचंद्रांचीच कृपा होय. (यावरून या वनवासींची श्रीरामांवरील भक्ती अयोध्यावासींहून अधिक होती, हे दिसून येते.)

सोरठा

मूल (दोहा)

बिहरहिं बन चहु ओर प्रतिदिन प्रमुदित लोग सब।
जल ज्यों दादुर मोर भए पीन पावस प्रथम॥ २५१॥

अनुवाद (हिन्दी)

सर्वजण दिवसेंदिवस परम आनंदित होऊन वनात चोहीकडे फिरत होते. ज्याप्रमाणे पहिला पाऊस पडल्यावर बेडूक व मोर प्रसन्न होऊन नाचू-बागडू लागतात॥ २५१॥

मूल (चौपाई)

पुरजननारि मगन अति प्रीती।
बासर जाहिं पलक सम बीती॥
सीय सासु प्रति बेष बनाई।
सादर करइ सरिस सेवकाई॥

अनुवाद (हिन्दी)

त्याप्रमाणे अयोध्यापुरीतील सर्व स्त्री-पुरुष अत्यंत प्रेमात मग्न होते. त्यांचे दिवस क्षणाप्रमाणे सरत होते. जितक्या सासवा होत्या, तितकी रूपे धारण करून सीता सर्व सासूंची आदराने एकसारखीच सेवा करीत होती.॥ १॥

मूल (चौपाई)

लखा न मरमु रामबिनु काहूँ।
माया सब सिय माया माहूँ॥
सीयँ सासु सेवाबस कीन्हीं।
तिन्ह लहि सुख सिख आसिष दीन्हीं॥

अनुवाद (हिन्दी)

श्रीरामचंद्रांशिवाय हे गुपित दुसऱ्या कुणाला समजले नाही. सर्व पराशक्ती महामाया या सीतेच्या मायेमध्येच वसल्या होत्या. तिने आपल्या सेवेने सासूंना वश केले. त्यांना सुख वाटले व त्यांनी उपदेश आणि आशीर्वाद दिले.॥ २॥

मूल (चौपाई)

लखिसिय सहित सरल दोउ भाई।
कुटिल रानि पछितानि अघाई॥
अवनि जमहि जाचति कैकेई।
महि न बीचु बिधि मीचु न देई॥

अनुवाद (हिन्दी)

सीता व राम-लक्ष्मण यांचा सरळ स्वभाव पाहून कुटिल राणी कैकेयीला खूप पश्चात्ताप झाला. ती पृथ्वी व यमराज यांना याचना करीत होती. पण धरणी विदीर्ण होऊन तिला सामावून घेत नव्हती व विधाता मरण देत नव्हता.॥ ३॥

मूल (चौपाई)

लोकहुँ बेद बिदितकबि कहहीं।
राम बिमुख थलु नरक न लहहीं॥
यहु संसउ सब के मन माहीं।
राम गवनु बिधि अवध कि नाहीं॥

अनुवाद (हिन्दी)

लोक व वेद यांमध्ये ही गोष्ट प्रसिद्ध आहे आणि ज्ञानीसुद्धा म्हणतात की, जे श्रीरामांशी विन्मुख असतात त्यांना नरकातही जागा मिळत नाही. सर्वांच्या मनाला अशी शंका वाटून ते म्हणत होते की, हे विधात्या! श्रीरामचंद्रांचे अयोध्येला परतणे होणार की नाही?॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

निसि न नीद नहिं भूख दिन भरतु बिकल सुचि सोच।
नीच कीच बिच मगन जस मीनहि सलिल सँकोच॥ २५२॥

अनुवाद (हिन्दी)

भरताला रात्री झोप येत नव्हती की दिवसा भूक लागत नव्हती. चिखलात बुडालेली मासोळी पाण्याविना जशी व्याकूळ होते, तसा भरत चिंतेत बुडून व्याकूळ झाला होता.॥ २५२॥

मूल (चौपाई)

कीन्हि मातु मिस काल कुचाली।
ईति भीति जस पाकत साली॥
केहि बिधि होइ राम अभिषेकू।
मोहि अवकलत उपाउ न एकू॥

अनुवाद (हिन्दी)

भरत विचार करीत होता की, मातेच्या निमित्ताने काळाने दुष्ट खेळी केली. ज्याप्रमाणे शेतात धान्य पिकू लागते, त्यावेळीच ईतीचे भय येते, तसे येथे झाले. आता श्रीरामचंद्रांचा राज्याभिषेक कसा व्हायचा? मला एकही उपाय सुचत नाही.॥ १॥

मूल (चौपाई)

अवसि फिरहिं गुर आयसु मानी।
मुनि पुनि कहब राम रुचि जानी॥
मातु कहेहुँ बहुरहिं रघुराऊ।
राम जननि हठ करबि कि काऊ॥

अनुवाद (हिन्दी)

गुरुजींची आज्ञा मानून श्रीराम नक्कीच अयोध्येला परत येतील, परंतु मुनी वसिष्ठ श्रीरामचंद्रांची आवड पाहूनच काही बोलतील. कौसल्या मातेच्या सांगण्यावर श्रीरघुनाथ परतू शकतील, परंतु श्रीरामांना जन्म देणारी कौसल्या माता कधी हट्ट धरील काय?॥ २॥

मूल (चौपाई)

मोहि अनुचर कर केतिक बाता।
तेहि महँ कुसमउ बाम बिधाता॥
जौंहठ करउँ त निपट कुकरमू।
हरगिरि तें गुरु सेवक धरमू॥

अनुवाद (हिन्दी)

मज सेवकाचे बोलणे ते किती? त्यात काळ असा वाईट आलेला आहे आणि विधाता प्रतिकूल आहे. मी जर हट्ट धरला, तर तो घोर अधर्म होईल, कारण सेवकाचा धर्म भगवान शिवांच्या कैलास पर्वतापेक्षा मोठा व पालन करण्यास कठीण असतो.॥ ३॥

मूल (चौपाई)

एकउ जुगुति न मन ठहरानी।
सोचत भरतहि रैनि बिहानी॥
प्रात नहाइ प्रभुहि सिर नाई।
बैठत पठए रिषयँ बोलाई॥

अनुवाद (हिन्दी)

भरताच्या मनात एकही युक्ती येईना. विचार करण्यात रात्र संपून गेली. प्रातःकाळी भरताने स्नान केले व तो प्रभू श्रीरामांच्या समोर नतमस्तक होऊन बसला होता. एवढॺात ऋषी वसिष्ठांनी त्याला बोलावणे पाठविले.॥ ४॥