४१ भरत चित्रकूटाच्या मार्गावर

मूल (चौपाई)

एहि बिधिभरत चलेमग जाहीं।
दसा देखि मुनि सिद्ध सिहाहीं॥
जबहिं रामु कहि लेहिं उसासा।
उमगत पेमु मनहुँ चहु पासा॥

अनुवाद (हिन्दी)

अशा प्रकारे भरत वाटेने चालला होता. त्याची प्रेममय दशा पाहून मुनी व सिद्ध पुरुष यांनासुद्धा हेवा वाटे. भरत जेव्हा ‘राम’ म्हणत उसासा टाकी, तेव्हा जणू चोहीकडे प्रेम उसळे.॥ ३॥

मूल (चौपाई)

द्रवहिं बचन सुनि कुलिस पषाना।
पुरजन पेमु न जाइ बखाना॥
बीच बास करि जमुनहिं आए।
निरखि नीरु लोचन जल छाए॥

अनुवाद (हिन्दी)

भरताचे प्रेमाचे व दैन्याचे बोलणे ऐकून वज्र व पाषाणही वितळून जात. अयोध्यावासीयांच्या प्रेमाबद्दल काय सांगावे? मध्ये एकदा मुक्काम करून भरत यमुनातीरावर पोहोचला. यमुनेचे पाणी पाहून त्याच्या डोळ्यांत पाणी आले.॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

रघुबर बरन बिलोकि बर बारि समेत समाज।
होत मगन बारिधि बिरह चढ़े बिबेक जहाज॥ २२०॥

अनुवाद (हिन्दी)

श्रीरामांच्या सावळ्या रंगाप्रमाणे असलेले यमुनेचे श्यामल जळ पाहून भरत व सर्व परिवार प्रेमविव्हळ होऊन विरहरूपी समुद्रात बुडून जात असताना ते विवेकरूपी जहाजावर चढले. (विरह-व्यथेमध्ये बुडत असताना आपण लवकर जाऊन प्रत्यक्ष दर्शन घेऊ, या विचाराने ते सर्व उत्साहित झाले.)॥ २२०॥

मूल (चौपाई)

जमुनतीर तेहि दिन करि बासू।
भयउ समय सम सबहि सुपासू॥
रातिहिं घाट घाट की तरनी।
आईं अगनित जाहिं न बरनी॥

अनुवाद (हिन्दी)

त्या दिवशी यमुनेच्या किनाऱ्यावर त्यांनी मुक्काम केला. प्रसंगानुरूप खाण्या-पिण्याची चांगली व्यवस्था झाली. निषादराजाच्या इशाऱ्यावर रातोरात सर्व घाटांवरील असंख्य नौका तेथे आल्या होत्या. त्यांचे वर्णनही करणे कठीण.॥ १॥

मूल (चौपाई)

प्रात पार भए एकहि खेवाँ।
तोषे रामसखा की सेवाँ॥
चले नहाइ नदिहि सिर नाई।
साथ निषादनाथ दोउ भाई॥

अनुवाद (हिन्दी)

सकाळी एका फेरीतच सर्व लोक पलीकडे गेले. ते सर्व श्रीरामांचा मित्र निषादराजाच्या या सेवेमुळे प्रसन्न झाले. नंतर स्नान करून व यमुना नदीपुढे नतमस्तक होऊन दोघे भाऊ निषादराजासह निघाले.॥ २॥

मूल (चौपाई)

आगें मुनिबर बाहन आछें।
राजसमाज जाइ सबु पाछें॥
तेहि पाछें दोउ बंधु पयादें।
भूषन बसन बेष सुठि सादें॥

अनुवाद (हिन्दी)

पुढील चांगल्या वाहनांवर श्रेष्ठ मुनी होते. त्यांच्यामागे सर्व राज-परिवार जात होता आणि मागे दोघे बंधू सामान्य वस्त्राभूषणामध्ये पायी चालत होते.॥ ३॥

मूल (चौपाई)

सेवक सुहृद सचिवसुत साथा।
सुमिरत लखनु सीय रघुनाथा॥
जहँ जहँ रामबास बिश्रामा।
तहँ तहँ करहिं सप्रेम प्रनामा॥

अनुवाद (हिन्दी)

त्यांच्यासोबत सेवक, मित्र व मंत्र्यांचे पुत्र होते. लक्ष्मण, सीता व रघुनाथ यांचे स्मरण करीत ते चालले होते. जिथे जिथे श्रीरामांनी निवास केला, विश्रांती घेतली, तेथे तेथे ते प्रेमाने प्रणाम करीत होते.॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

मगबासी नर नारि सुनि धाम काम तजि धाइ।
देखि सरूप सनेह सब मुदित जनम फलु पाइ॥ २२१॥

अनुवाद (हिन्दी)

वाटेत राहाणारे स्त्री-पुुरुष ही वार्ता ऐकताच घरदार व कामकाज सोडून धावत येत आणि त्यांचे रूप-सौंदर्य आणि प्रेम पाहून सर्वजण जन्माचे सार्थक झाल्याचे मानून आनंदित होत होते.॥ २२१॥

मूल (चौपाई)

कहहिं सपेम एक एक पाहीं।
रामु लखनु सखि होहिं कि नाहीं॥
बय बपु बरन रूपु सोइ आली।
सीलु सनेहु सरिस सम चाली॥

अनुवाद (हिन्दी)

गावातील स्त्रिया एक दुसरीला प्रेमाने म्हणत की, ‘सखी, हे राम-लक्ष्मण आहेत का? हे सखी, यांची अवस्था, शरीर व रंग-रूप अगदी तसेच आहे. वागणे व स्नेह त्यांच्यासारखेच आणि चालणेसुद्धा त्यांच्यासारखेच आहे.॥ १॥

मूल (चौपाई)

बेषु न सो सखि सीय न संगा।
आगें अनी चली चतुरंगा॥
नहिं प्रसन्न मुखमानस खेदा।
सखि संदेहु होइ एहिं भेदा॥

अनुवाद (हिन्दी)

परंतु हे सखी, यांचा तसा मुनिवेष नाही आणि बरोबर सीताही नाही. यांच्यापुढे चतुरंग सेना चालली आहे. शिवाय यांचे मुख प्रसन्न नाही. मनातून खंत आहे. हे सखी, या फरकामुळे वेगळेपणा वाटतो.’॥ २॥

मूल (चौपाई)

तासु तरक तियगन मन मानी।
कहहिं सकल तेहि सम न सयानी॥
तेहि सराहि बानी फुरि पूजी।
बोली मधुर बचन तिय दूजी॥

अनुवाद (हिन्दी)

तिचा तर्क इतर स्त्रियांना पटला. सर्वजणी म्हणत होत्या की, हिच्या-सारखी शहाणी कोणी नाही. तिची वाखाणणी करीत व ‘तुझे म्हणणे खरे आहे’ असे म्हणत दुसरी एकजण गोड शब्दांत म्हणाली.॥ ३॥

मूल (चौपाई)

कहि सपेम सब कथाप्रसंगू।
जेहि बिधि राम राज रस भंगू॥
भरतहि बहुरि सराहन लागी।
सील सनेह सुभाय सुभागी॥

अनुवाद (हिन्दी)

श्रीरामांच्या राजतिलकाचा आनंद कसा भंग पावला, तो सर्व प्रसंग सांगून ती भाग्यवान स्त्री भरताचे वर्तन, स्नेह व स्वभाव यांची प्रशंसा करू लागली.॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

चलत पयादें खात फल पिता दीन्ह तजि राजु।
जात मनावन रघुबरहि भरत सरिस को आजु॥ २२२॥

अनुवाद (हिन्दी)

‘बघा, पित्याने दिलेले राज्य सोडून हा भरत पायी चालत आहे आणि फलाहार करीत श्रीरामांना अयोध्येला परतण्याची विनवणी करण्यास जात आहे. यांच्यासारखा दुसरा कोण (रामभक्त) आहे?॥ २२२॥

मूल (चौपाई)

भायप भगति भरत आचरनू।
कहत सुनत दुख दूषन हरनू॥
जो किछुकहब थोरसखि सोई।
राम बंधु अस काहे न होई॥

अनुवाद (हिन्दी)

भरताचा बंधु-भाव, भक्ती आणि त्याचे वर्तन, याविषयी सांगणे व ऐकणे हे दोष हरण करणारे आहे. हे सखी, त्याच्याविषयी जितके सांगावे, तितके थोडेच आहे. श्रीरामांचा भाऊ असा का असणार नाही बरे?॥ १॥

मूल (चौपाई)

हम सब सानुज भरतहि देखें।
भइन्ह धन्य जुबती जन लेखें॥
सुनिगुन देखि दसा पछिताहीं।
कैकइ जननि जोगु सुतु नाहीं॥

अनुवाद (हिन्दी)

शत्रुघ्नासह भरताला पाहून आज आम्ही सर्वजणी मोठॺा भाग्यवान स्त्रियांच्या पंक्तीत आलो.’ अशा प्रकारे भरताचे गुण ऐकून आणि त्याची दशा पाहून स्त्रियांना वाईट वाटत होते आणि त्या म्हणत होत्या की, ‘हा पुत्र कैकेयी सारख्या मातेला शोभत नाही.’॥ २॥

मूल (चौपाई)

कोउ कह दूषनु रानिहि नाहिन।
बिधि सबु कीन्ह हमहि जो दाहिन॥
कहँहम लोक बेदबिधि हीनी।
लघु तिय कुल करतूति मलीनी॥

अनुवाद (हिन्दी)

कुणी म्हणत होती की, ‘यात राणीचाही दोष नाही. हे सर्व विधात्याने घडविले आहे. तो आम्हांला अनुकूल आहे, म्हणून आम्हांला यांचे दर्शन घडले. नाहीतरी कुठे आम्ही लौकिकदृष्ट्या व वैदिक दृष्ट्या मर्यादाहीन, कुल व करणी या दोन्हींमध्ये मलिन, तुच्छ स्त्रिया,॥ ३॥

मूल (चौपाई)

बसहिं कुदेस कुगाँव कुबामा।
कहँ यह दरसु पुन्य परिनामा॥
अस अनंदु अचिरिजु प्रति ग्रामा।
जनु मरुभूमि कलपतरु जामा॥

अनुवाद (हिन्दी)

आम्ही वाईट प्रदेशात आणि कुग्रामांत रहातो आणि स्त्रियांमध्येसुद्धा नीच स्त्रिया आहोत, आणि कुठे हे महान पुण्यामुळे होणारे यांचे दर्शन.’ असाच आनंद आणि आश्चर्य गावा-गावात लोकांना वाटत होते. जणू मरुभूमीमध्ये कल्पवृक्ष उगवला असावा.॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

भरत दरसु देखत खुलेउ मग लोगन्ह कर भागु।
जनु सिंघलबासिन्ह भयउ बिधि बस सुलभ प्रयागु॥ २२३॥

अनुवाद (हिन्दी)

भरताचे स्वरूप पाहून वाटेत राहाणाऱ्या लोकांचे भाग्य उजळले. जणू दैवयोगाने सिंहल द्वीपातील रहिवाश्यांना तीर्थराज प्रयाग सुलभ झाले.॥ २२३॥

मूल (चौपाई)

निजगुन सहितराम गुन गाथा।
सुनत जाहिं सुमिरत रघुनाथा॥
तीरथ मुनि आश्रम सुरधामा।
निरखि निमज्जहिं करहिं प्रनामा॥

अनुवाद (हिन्दी)

अशा प्रकारे आपल्या गुणांबरोबरच श्रीरामांच्या गुणांचे गायन ऐकत आणि श्रीरघुनाथांचे स्मरण करीत भरत चालला होता. वाटेत तो तीर्थ पाहून स्नान करीत होता. मुनींचे आश्रम आणि देवांची मंदिरे पाहून प्रणाम करीत होता.॥ १॥

मूल (चौपाई)

मनहीं मन मागहिं बरु एहू।
सीय राम पद पदुम सनेहू॥
मिलहिं किरातकोल बनबासी।
बैखानस बटु जती उदासी॥

अनुवाद (हिन्दी)

आणि मनातल्या मनात हा वर मागत होता की, श्रीसीतारामांच्या चरण-कमलांच्या ठायी प्रेम वसो. वाटेत भिल्ल, कोल इत्यादी वनवासी आणि वानप्रस्थ, ब्रह्मचारी, संन्यासी आणि विरक्त भेटत होते.॥ २॥

मूल (चौपाई)

करिप्रनामुपूँछहिंजेहि तेही।
केहि बन लखनु रामु बैदेही॥
ते प्रभु समाचार सब कहहीं।
भरतहि देखि जनम फलु लहहीं॥

अनुवाद (हिन्दी)

त्यांपैकी सर्वांना प्रणाम करून तो विचारत होता की, लक्ष्मण, श्रीराम व जानकी हे कोणत्या वनात आहेत? ते लोक प्रभू श्रीरामांची सर्व वार्ता सांगत व भरताला पाहून त्यांच्या जन्माचे सार्थक होत होते.॥ ३॥

मूल (चौपाई)

जे जन कहहिं कुसल हम देखे।
ते प्रिय राम लखन सम लेखे॥
एहि बिधि बूझत सबहि सुबानी।
सुनत राम बनबास कहानी॥

अनुवाद (हिन्दी)

ते म्हणत की, ‘आम्ही त्यांना सुखरूप पाहिले आहे, ते भरताला श्रीराम-लक्ष्मणांसमान प्रिय वाटत.’ अशा प्रकारे भरत सुंदर वाणीने विचारत होता व श्रीरामांच्या वनवासाची कथा ऐकत जात होता.॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

तेहि बासर बसि प्रातहीं चले सुमिरि रघुनाथ।
राम दरस की लालसा भरत सरिस सब साथ॥ २२४॥

अनुवाद (हिन्दी)

त्या दिवशी तेथेच थांबून दुसऱ्या दिवशी सकाळीच श्रीरघुनाथांचे स्मरण करून भरत निघाला. सोबत असलेल्या सर्व लोकांनाही भरतासारखीच श्रीरामांच्या दर्शनाची लालसा होती.॥ २२४॥

मूल (चौपाई)

मंगल सगुन होहिंसब काहू।
फरकहिं सुखद बिलोचन बाहू॥
भरतहि सहित समाज उछाहू।
मिलिहहिं रामु मिटिहि दुख दाहू॥

अनुवाद (हिन्दी)

सर्वांना मंगलसूचक शकुन होऊ लागले. पुरुषांचे उजवे, तर स्त्रियांचे डावे नेत्र आणि भुजा स्फुरत होत्या. सर्व परिवाराबरोबरच भरताला असा उत्साह वाटत होता की, श्रीराम भेटतील आणि दुःखाची आग शांत होईल.॥ १॥

मूल (चौपाई)

करतमनोरथ जसजियँ जाके।
जाहिं सनेह सुराँ सब छाके॥
सिथिलअंगपगमगडगि डोलहिं।
बिहबल बचन पेम बस बोलहिं॥

अनुवाद (हिन्दी)

ज्याच्या मनात जसे असते, त्याप्रमाणे तो स्वतः मनोरथ करीत असतो. सर्वजण स्नेहरूपी मदिरेमुळे धुंद होऊन चालले होते. त्यांची शरीरे थकली होती, वाटेवर पाय डगमगत होते आणि प्रेमाधिक्यामुळे विव्हळ होऊन ते बोलत होते.॥ २॥

मूल (चौपाई)

रामसखाँ तेहि समय देखावा।
सैल सिरोमनि सहज सुहावा॥
जासु समीप सरित पय तीरा।
सीय समेत बसहिं दोउ बीरा॥

अनुवाद (हिन्दी)

रामांचा मित्र निषादराज याने त्याचवेळी स्वाभाविकपणे सुंदर असलेला पर्वतश्रेष्ठ कामदगिरी दाखविला. त्याच्याजवळच पयस्विनी नदीकाठी सीतेसह दोघे बंधू निवास करीत होते.॥ ३॥

मूल (चौपाई)

देखि करहिं सब दंड प्रनामा।
कहि जय जानकि जीवन रामा॥
प्रेम मगन अस राजसमाजू।
जनु फिरि अवध चले रघुराजू॥

अनुवाद (हिन्दी)

सर्व लोकांनी तो पर्वत पाहून ‘जानकीजीवन श्रीरामचंद्र की जय’, असे म्हणत त्याला दंडवत प्रणाम केला. राजपरिवारही प्रेमामध्ये असा मग्न झाला की, जणू श्रीरघुनाथ अयोध्येला परत निघाले आहेत.॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

भरत प्रेमु तेहि समय जस तस कहि सकइ न सेषु।
कबिहि अगम जिमि ब्रह्मसुखु अह मम मलिन जनेषु॥ २२५॥

अनुवाद (हिन्दी)

भरताच्या मनात त्यावेळी जे प्रेम उफाळून आले होते, त्याचे वर्णन शेषसुद्धा करू शकणार नाही. ज्याप्रमाणे अहंता आणि ममता यांमुळे मलिन झालेल्या मनुष्यांना ब्रह्मानंद अगम्य असतो, त्याप्रमाणे कवीला ते प्रेम अगम्य आहे.॥ २२५॥

मूल (चौपाई)

सकल सनेह सिथिल रघुबर कें।
गए कोस दुइ दिनकर ढरकें॥
जलु थलु देखि बसे निसि बीतें।
कीन्ह गवन रघुनाथ पिरीतें॥

अनुवाद (हिन्दी)

सर्व लोक प्रेमाने विह्वल झाल्यामुळे सूर्यास्त होईपर्यंत दोन कोसच चालू शकले आणि पाणी व निवाऱ्याची सोय पाहून रात्री तेथेच काही न खाता-पिता थांबले. रात्र सरल्यावर श्रीरघुनाथांवर प्रेम असलेला भरत पुढे निघाला.॥ १॥