४० इन्द्र-बृहस्पति-संवाद

मूल (चौपाई)

देखि प्रभाउ सुरेसहि सोचू।
जगु भल भलेहि पोच कहुँ पोचू॥
गुर सन कहेउ करिअ प्रभु सोई।
रामहि भरतहि भेट न होई॥

अनुवाद (हिन्दी)

भरताचे हे प्रेम पाहून इंद्र काळजीत पडला. (आता याच्या प्रेमाला वश होऊन श्रीराम परत न जावोत व आमच्या कार्यात विघ्न न येवो, म्हणजे झाले.) जग चांगल्यासाठी चांगले व वाईटासाठी वाईट असते. इंद्राने गुरू बृहस्पतींना म्हटले की, ‘हे प्रभो, श्रीरामचंद्र व भरत यांची भेट होऊ नये, असा उपाय करा.॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

रामु सँकोची प्रेम बस भरत सपेम पयोधि।
बनी बात बेगरन चहति करिअ जतनु छलु सोधि॥ २१७॥

अनुवाद (हिन्दी)

श्रीरामचंद्र हे भिडस्त आणि प्रेमाला भुलणारे आहेत आणि भरत तर प्रेमाचा समुद्र आहे. सगळे जुळून आलेले विस्कटू पहात आहे. म्हणून काहीतरी कपटी युक्ती शोधून यावर उपाय करा.’॥ २१७॥

मूल (चौपाई)

बचन सुनत सुरगुरु मुसुकाने।
सहसनयन बिनु लोचन जाने॥
मायापति सेवक सन माया।
करइ त उलटि परइ सुरराया॥

अनुवाद (हिन्दी)

इंद्राचे बोलणे ऐकताच देवगुरू बृहस्पतींना हसू आले. त्यांना तो हजार डोळ्यांचा (पण ज्ञान-नेत्र नसल्यामुळे) नेत्ररहित (मूर्ख) वाटला. ते म्हणाले, ‘हे देवराज, मायेचे स्वामी असलेल्या श्रीराम-चंद्रांच्या सेवकावर जर कुणी माया केली, तर ती उलटून त्याच्यावरच पडते.॥ १॥

मूल (चौपाई)

तब किछु कीन्ह रामरुख जानी।
अब कुचालि करि होइहि हानी॥
सुनु सुरेस रघुनाथ सुभाऊ।
निज अपराध रिसाहिं न काऊ॥

अनुवाद (हिन्दी)

मागील वेळी श्रीरामांचा रोख पाहूनच वनवासाला जाण्याचे कारस्थान रचले होते. परंतु यावेळी दुष्ट चाल खेळल्यास हानीच होईल. हे देवराज, श्रीरामांचा स्वभाव ऐका. ते स्वतःवर केलेल्या अपराधामुळे कधी रागावत नाहीत.॥ २॥

मूल (चौपाई)

जो अपराधु भगत कर करई।
राम रोष पावक सो जरई॥
लोकहुँ बेद बिदित इतिहासा।
यह महिमा जानहिं दुरबासा॥

अनुवाद (हिन्दी)

परंतु कुणी त्यांच्या भक्ताचा अपराध केला, तर मात्र श्रीराम क्रोधाग्नीने भडकतात. लोक व वेद यांमध्ये ही गोष्ट प्रसिद्ध आहे. हा महिमा दुर्वासांना माहीत आहे.॥ ३॥

मूल (चौपाई)

भरत सरिस को राम सनेही।
जगु जप राम रामु जप जेही॥

अनुवाद (हिन्दी)

सारे जग श्रीरामांचा जप करोत, परंतु श्रीराम स्वतः ज्याचा जप करतात, त्या भरतासारखा श्रीरामांचा भक्त कोण असणार?॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

मनहुँ न आनिअ अमरपति रघुबर भगत अकाजु।
अजसु लोक परलोक दुख दिन दिन सोक समाजु॥ २१८॥

अनुवाद (हिन्दी)

म्हणून हे देवराज, रघुकुलश्रेष्ठ श्रीरामांच्या भक्ताच्या कार्यात विघ्न आणायचे मनातसुद्धा आणू नका. असे केल्याने या लोकी अपकीर्ती आणि परलोकी दुःख मिळेल आणि शोकाची कारणे दिवसेंदिवस वाढतच जातील.॥ २१८॥

मूल (चौपाई)

सुनु सुरेस उपदेसु हमारा।
रामहि सेवकु परम पिआरा॥
मानत सुखु सेवक सेवकाईं।
सेवक बैर बैरु अधिकाईं॥

अनुवाद (हिन्दी)

हे देवराज, आमचा उपदेश ऐका. श्रीरामांना आपला सेवक अत्यंत प्रिय असतो. त्यांना आपल्या सेवकाच्या सेवेमध्ये सुख वाटते आणि सेवकाबरोबर वैर केल्यास ते फार मोठे शत्रुत्व मानतात.॥ १॥

मूल (चौपाई)

जद्यपि सम नहिं रागन रोषू।
गहहिं न पाप पूनु गुन दोषू॥
करमप्रधान बिस्व करि राखा।
जो जस करइ सो तस फलु चाखा॥

अनुवाद (हिन्दी)

जरी ते सम आहेत, त्यांच्यामध्ये आसक्ती नाही व रोषही नाही आणि ते कुणाचे पाप-पुण्य आणि गुण-दोषही ग्रहण करीत नाहीत, त्यांनी विश्वामध्ये कर्मालाच प्राधान्य दिले आहे, जो जसे कर्म करतो, त्याला तसेच फळ भोगावे लागते,॥ २॥

मूल (चौपाई)

तदपि करहिं सम बिषम बिहारा।
भगत अभगत हृदय अनुसारा॥
अगुन अलेप अमान एकरस।
रामु सगुन भए भगत पेम बस॥

अनुवाद (हिन्दी)

तथापि ते भक्त व अभक्ताच्या भावनेप्रमाणे सम व विषम व्यवहार करतात. (भक्ताला आलिंगन देतील, तर अभक्ताला ठार मारून त्याला तारून नेतील.) गुणरहित, निर्लेप, मानरहित आणि सदा एकरस असलेले भगवान श्रीराम भक्ताच्या प्रेमामुळेच सगुण झालेले आहेत.॥ ३॥

मूल (चौपाई)

राम सदा सेवकरुचि राखी।
बेद पुरान साधु सुर साखी॥
असजियँजानि तजहु कुटिलाई।
करहु भरत पद प्रीति सुहाई॥

अनुवाद (हिन्दी)

श्रीरामांना नेहमी आपले भक्त आवडतात. वेद, पुराणे, साधू आणि देव हे यासाठी साक्षीला आहेत. असे जाणून कपट सोडून भरताच्या चरणी मनापासून प्रेम बाळगा.॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

राम भगत परहित निरत पर दुख दुखी दयाल।
भगत सिरोमनि भरत तें जनि डरपहु सुरपाल॥ २१९॥

अनुवाद (हिन्दी)

हे देवराज इंद्रा, श्रीरामचंद्रांचे भक्त नेहमी दुसऱ्याचे हित करण्यात मग्न असतात. ते दुसऱ्यांच्या दुःखाने दुःखी व दयाळू असतात. त्यात भरत हा तर भक्तशिरोमणी आहे. त्याला मुळीच घाबरू नका.॥ २१९॥

मूल (चौपाई)

सत्यसंध प्रभु सुर हितकारी।
भरत राम आयस अनुसारी॥
स्वारथबिबस बिकल तुम्ह होहू।
भरत दोसु नहिं राउर मोहू॥

अनुवाद (हिन्दी)

प्रभू श्रीरामचंद्र हे सत्यप्रतिज्ञ व देवांचे हित करणारे आहेत आणि भरत हा श्रीरामांच्या आज्ञेप्रमाणे वागणारा आहे. तुम्ही विनाकारण स्वार्थाचा विचार करून घाबरला आहात. यात भरताचा काही दोष नाही, तुमचा मोहच आहे.’॥ १॥

मूल (चौपाई)

सुनि सुरबर सुरगुरबर बानी।
भा प्रमोदु मन मिटी गलानी॥
बरषि प्रसून हरषि सुरराऊ।
लगे सराहन भरत सुभाऊ॥

अनुवाद (हिन्दी)

देवगुरू बृहस्पतींची हितकर वाणी ऐकून इंद्राला मनापासून आनंद झाला आणि त्याची चिंता नाहीशी झाली. तेव्हा आनंदाने त्याने पुष्पवर्षाव करून भरताची प्रशंसा केली.॥ २॥