३९ मासपारायण, एकोणिसावा विश्राम

मूल (चौपाई)

कीन्ह निमज्जनु तीरथराजा।
नाइ मुनिहि सिरु सहित समाजा॥
रिषि आयसु असीस सिर राखी।
करि दंडवत बिनय बहु भाषी॥

अनुवाद (हिन्दी)

प्रातःकाळी भरताने तीर्थराजामध्ये स्नान केले आणि सर्व परिवारासह मुनींपुढे नतमस्तक होऊन त्यांची आज्ञा आणि आशीर्वाद मिळविला. नंतर त्यांना दंडवत करून नम्रतापूर्वक त्यांचा निरोप घेतला.॥ १॥

मूल (चौपाई)

पथगति कुसल साथ सब लीन्हें।
चले चित्रकूटहिं चितु दीन्हें॥
रामसखा कर दीन्हें लागू।
चलत देह धरि जनु अनुरागू॥

अनुवाद (हिन्दी)

त्यानंतर मार्ग माहीत असलेल्या लोकांबरोबर सर्व लोकांना घेऊन भरत चित्तामध्ये चित्रकूटाचे ध्यान करीत निघाला. तो रामसखा गुहाच्या हातात हात घालून असा चालला होता की, जणू प्रत्यक्ष श्रीरामप्रेमच साकार झाले होते.॥ २॥

मूल (चौपाई)

नहिंपद त्रान सीस नहिं छाया।
पेमु नेमु ब्रतु धरमु अमाया॥
लखन रामसियपंथ कहानी।
पूँछत सखहि कहत मृदु बानी॥

अनुवाद (हिन्दी)

त्याच्या पायांत जोडे नव्हते आणि डोक्यावर छत्र नव्हते. त्याचे प्रेम, नियम, व्रत व धर्म हे निष्कपट होते. तो निषादराजाला लक्ष्मण, श्रीरामचंद्र आणि सीता यांच्या प्रवासाविषयी कोमल वाणीने विचारत होता.॥ ३॥

मूल (चौपाई)

रामबासथल बिटप बिलोकें।
उर अनुराग रहत नहिं रोकें॥
देखिदसा सुर बरिसहिं फूला।
भइ मृदु महि मगु मंगल मूला॥

अनुवाद (हिन्दी)

श्रीरामांच्या उतरण्याच्या जागा आणि तेथील वृक्ष पाहून त्याच्या हृदयातील प्रेम आवरत नव्हते. भरताची ती दशा पाहून देव फुले उधळू लागले. पृथ्वी कोमल बनली आणि मार्ग मांगल्याचे मूळ बनला.॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

किएँ जाहिं छाया जलद सुखद बहइ बर बात।
तस मगु भयउ न राम कहँ जस भा भरतहि जात॥ २१६॥

अनुवाद (हिन्दी)

मेघ सावली धरीत होते, सुखद वारा वाहात होता. भरत जात होता त्यावेळी मार्ग असा सुखदायक झाला की, तसा श्रीरामचंद्रांसाठीही झाला नव्हता.॥ २१६॥

मूल (चौपाई)

जड़ चेतन मगजीव घनेरे।
जे चितए प्रभु जिन्ह प्रभु हेरे॥
ते सब भए परम पद जोगू।
भरत दरस मेटा भव रोगू॥

अनुवाद (हिन्दी)

वाटेत असंख्य जड-चेतन जीव होते. त्यांपैकी ज्यांना श्रीरामांनी कृपा-दृष्टीने पाहिले किंवा ज्यांनी प्रभू श्रीरामांना पाहिले, ते सर्व तत्क्षणी परमपदाचे अधिकारी झाले. परंतु आता भरताच्या दर्शनामुळे त्यांचा जन्म-मरणरूपी भव-रोगच नाहीसा झाला.॥ १॥

मूल (चौपाई)

यह बड़ि बात भरत कइ नाहीं।
सुमिरत जिनहि रामु मन माहीं॥
बारक राम कहत जग जेऊ।
होत तरन तारन नर तेऊ॥

अनुवाद (हिन्दी)

भरता करता ही काही फार मोठी गोष्ट नव्हती. कारण प्रत्यक्ष श्रीराम त्याचे आपल्या मनात सदा स्मरण करीत होते. जगामध्ये जे मनुष्य एकदा ‘राम’ म्हणतात, तेसुद्धा तरून जाणारे व तारून नेणारे होत असतात.॥ २॥

मूल (चौपाई)

भरतु राम प्रिय पुनि लघु भ्राता।
कस न होइ मगु मंगलदाता॥
सिद्ध साधु मुनिबरअस कहहीं।
भरतहि निरखि हरषु हियँ लहहीं॥

अनुवाद (हिन्दी)

शिवाय, भरत हा तर श्रीरामचंद्रांचा प्रिय असा धाकटा भाऊ होता. मग त्याच्यासाठी मार्ग सुखदायक का बरे होणार नाही? असे सिद्ध, साधू आणि श्रेष्ठ मुनी म्हणत होते आणि भरताला पाहून मनातून आनंदित होत होते.॥ ३॥