३८ भरद्वाजांकडून भरताचा सत्कार

दोहा

मूल (दोहा)

करि प्रबोधु मुनिबर कहेउ अतिथि पेमप्रिय होहु।
कंद मूल फल फूल हम देहिं लेहु करि छोहु॥ २१२॥

अनुवाद (हिन्दी)

अशाप्रकारे मुनिश्रेष्ठ भरद्वाजांनी भरताचे समाधान करून म्हटले, ‘आता, तुम्ही सर्वजण आमचे प्रिय पाहुणे आहात आणि कृपा करून कंद-मुळे, फळे-फुले जे आम्ही देतो, त्याचा स्वीकार करा.’॥ २१२॥

मूल (चौपाई)

सुनि मुनि बचन भरत हियँ सोचू।
भयउ कुअवसर कठिन सँकोचू॥
जानि गरुइ गुर गिरा बहोरी।
चरन बंदि बोले कर जोरी॥

अनुवाद (हिन्दी)

मुनींचे बोलणे ऐकून भरताला काळजी वाटू लागली की, अयोग्य वेळी हा विचित्र संकोचाचा प्रसंग आला. मग तो गुरुजनांच्या म्हणण्याचा मान राखत व त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन म्हणाला,॥ १॥

मूल (चौपाई)

सिरधरि आयसु करिअ तुम्हारा।
परम धरम यहु नाथ हमारा॥
भरत बचन मुनिबरमन भाए।
सुचि सेवक सिष निकट बोलाए॥

अनुवाद (हिन्दी)

‘हे नाथ, तुमची आज्ञा शिरोधार्य मानून तिचे पालन करणे, हे आमचे परम कर्तव्य आहे.’ भरताचे बोलणे ऐकून मुनिश्रेष्ठांना बरे वाटले. त्यांनी आपल्या विश्वासू सेवकांना व शिष्यांना बोलावले.॥ २॥

मूल (चौपाई)

चाहिअ कीन्हि भरत पहुनाई।
कंद मूल फल आनहु जाई॥
भलेहिं नाथ कहि तिन्हसिर नाए।
प्रमुदित निज निज काज सिधाए॥

अनुवाद (हिन्दी)

आणि सांगितले की, ‘भरताचा पाहुणचार करायला हवा. जाऊन कंदमुळे व फळे आणा.’ ‘ठीक आहे’ असे म्हणून ते नतमस्तक झाले आणि मोठॺा आनंदाने आपल्या कामगिरीसाठी गेले.॥ ३॥

मूल (चौपाई)

मुनिहि सोच पाहुन बड़ नेवता।
तसि पूजा चाहिअ जस देवता॥
सुनि रिधि सिधि अनिमादिक आईं।
आयसु होइ सो करहिं गोसाईं॥

अनुवाद (हिन्दी)

आपण फार मोठॺा पाहुण्याला निमंत्रण दिले, म्हणून मुनींनी विचार केला. जसा देव, तशी त्याची पूजा झाली पाहिजे. हे ऐकताच ऋद्धी व अणिमादी सिद्धी आल्या व म्हणाल्या, ‘हे स्वामी, तुमची जी आज्ञा असेल, त्याप्रमाणे आम्ही करू.’॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

राम बिरह ब्याकुल भरतु सानुज सहित समाज।
पहुनाई करि हरहु श्रम कहा मुदित मुनिराज॥ २१३॥

अनुवाद (हिन्दी)

मुनिराज प्रसन्न होऊन म्हणाले, ‘श्रीरामचंद्रांच्या विरहामुळे भरत हा शत्रुघ्न व आपल्या परिवारासह व्याकूळ आहे. तेव्हा पाहुणचार करून त्यांचा श्रम-परिहार करा.’॥ २१३॥

मूल (चौपाई)

रिधिसिधि सिर धरिमुनिबर बानी।
बड़भागिनि आपुहि अनुमानी॥
कहहिं परसपरसिधि समुदाई।
अतुलित अतिथि राम लघु भाई॥

अनुवाद (हिन्दी)

ऋद्धि-सिद्धींना मुनिराजांची आज्ञा शिरोधार्य मानण्यात धन्यता वाटली. सर्व सिद्धी आपसात म्हणू लागल्या की, ‘श्रीरामचंद्रांचे लहान बंधू भरत हे असे अतिथी आहेत की, त्यांची तुलना कोणाशीही करता येणार नाही.॥ १॥

मूल (चौपाई)

मुनिपदबंदि करिअसोइ आजू।
होइ सुखी सब राज समाजू॥
अस कहिरचेउरुचिरगृह नाना।
जेहि बिलोकि बिलखाहिं बिमाना॥

अनुवाद (हिन्दी)

म्हणून मुनींच्या चरणांना वंदन करून आज असे केले पाहिजे की, या सर्व राजपरिवाराला सुख लाभेल.’ असे म्हणून त्यांनी पुष्कळ सुंदर घरे तयार केली, ज्यांच्यापुढे राजमहालही तुच्छ वाटावेत.॥ २॥

मूल (चौपाई)

भोग बिभूतिभूरि भरि राखे।
देखत जिन्हहि अमर अभिलाषे॥
दासीं दास साजु सब लीन्हें।
जोगवत रहहिं मनहि मनु दीन्हें॥

अनुवाद (हिन्दी)

त्या घरांमधून पुष्कळसे भोग-पदार्थ व थाटमाट करून ठेवले. ते पाहून देवांनाही हेवा वाटला. दास-दासी सर्व सामग्री घेऊन मनःपूर्वक पाहुण्यांच्या आवडीप्रमाणे करू लागल्या.॥ ३॥

मूल (चौपाई)

सब समाजु सजि सिधि पल माहीं।
जे सुख सुरपुर सपनेहुँ नाहीं॥
प्रथमहिं बास दिए सब केही।
सुंदर सुखद जथा रुचि जेही॥

अनुवाद (हिन्दी)

जे सुखाचे सामान स्वर्गामध्ये स्वप्नातही असणार नाही, ते सर्व सिद्धींनी क्षणात भरून ठेवले. प्रथमतः त्यांनी सर्वांना त्यांच्या आवडीप्रमाणे आरामशीर निवासस्थाने दिली.॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

बहुरि सपरिजन भरत कहुँ रिषि अस आयसु दीन्ह।
बिधि बिसमय दायकु बिभव मुनिबर तपबल कीन्ह॥ २१४॥

अनुवाद (हिन्दी)

आणि नंतर भरताला कुटुंबासह राहाण्यासाठी जागा दिल्या, कारण ऋषींनी तशी आज्ञा केली होती. (आपल्या सर्व सोबत्यांना आराम मिळावा, असे भरताला वाटत होते, हे जाणून मुनींनी प्रथम त्यांची व्यवस्था करण्यास सांगितले होते.) मुनिश्रेष्ठ भरद्वाजांनी आपल्या तपोबलाने ब्रह्मदेवांनाही थक्क करून सोडणारे वैभव भरून टाकले होते.॥ २१४॥

मूल (चौपाई)

मुनि प्रभाउ जब भरत बिलोका।
सब लघु लगे लोकपति लोका॥
सुख समाजु नहिं जाइ बखानी।
देखत बिरति बिसारहिं ग्यानी॥

अनुवाद (हिन्दी)

मुनींचा प्रभाव जेव्हा भरताने पाहिला, तेव्हा त्याला इंद्र, वरुण, यम, कुबेर इत्यादी लोकपालांचे लोकही तुच्छ वाटले. ज्ञानी लोकसुद्धा जी सुखे पाहून वैराग्य विसरून जातात, त्या सुखसामग्रीचे वर्णन काय करावे?॥ १॥

मूल (चौपाई)

आसन सयन सुबसन बिताना।
बन बाटिका बिहग मृग नाना॥
सुरभि फूल फल अमिअ समाना।
बिमल जलासय बिबिध बिधाना॥

अनुवाद (हिन्दी)

आसने, शय्या, सुंदर वस्त्रे, चांदवे, वन, बागा, तऱ्हेतऱ्हेचे पक्षी व पशू, सुगंधित फुले आणि अमृतासारखी स्वादिष्ट फळे, अनेक प्रकारचे तलाव, विहिरी इत्यादी निर्मल जलाशय,॥ २॥

मूल (चौपाई)

असनपानसुचिअमिअ अमी से।
देखि लोग सकुचात जमी से॥
सुर सुरभी सुर तरु सबही कें।
लखि अभिलाषु सुरेस सची कें॥

अनुवाद (हिन्दी)

आणि अमृतासारखे खाण्या-पिण्याचे पवित्र पदार्थ होते. ते पाहून सर्व लोक विरक्त मुनींसारखे संकोचत होते. सर्वांच्या राहण्याच्या जागी कामधेनू व कल्पवृक्ष होते. ते पाहून इंद्र व इंद्राणी यांनासुद्धा लोभ सुटला.॥ ३॥

मूल (चौपाई)

रितुबसंतबहत्रिबिध बयारी।
सब कहँ सुलभ पदारथ चारी॥
स्रक चंदनबनितादिक भोगा।
देखि हरष बिसमय बस लोगा॥

अनुवाद (हिन्दी)

वसंतऋतू होता. शीतल, मंद व सुगंधित अशा तिन्ही प्रकारचे वारे वाहात होते. सर्वजणांना धर्मादी चारही पदार्थ सुलभ होते. माला, चंदन, स्त्रिया इत्यादी भोग पाहून सर्व लोकांना हर्ष व विस्मय वाटत होता.॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

संपति चकई भरतु चक मुनि आयस खेलवार।
तेहि निसि आश्रम पिंजराँ राखे भा भिनुसार॥ २१५॥

अनुवाद (हिन्दी)

ती भोग-विलासाची सामग्री चकवी होती आणि भरत हा चक्रवाक. मुनींची आज्ञा हा खेळ होता, त्या खेळात त्या रात्री आश्रमरूपी पिंजऱ्यात दोघांना बंदिस्त केले होते. (चक्रवाक पक्षी व पक्षिणी यांचा रात्रीच्या वेळी संयोग होत नाही, त्याप्रमाणे मुनींच्या आज्ञेने रात्रभर भोग-पदार्थ उपलब्ध होते, परंतु भरत मनानेसुद्धा त्याला शिवला नाही.)॥ २१५॥