३६ भरत-निषाद भेट व संवाद

दोहा

मूल (दोहा)

करत दंडवत देखि तेहि भरत लीन्ह उर लाइ।
मनहुँ लखन सन भेंट भइ प्रेमु न हृदयँ समाइ॥ १९३॥

अनुवाद (हिन्दी)

तो दंडवत करीत आहे, असे पाहून भरताने त्याला उठवून मिठी मारली. त्याच्या मनात प्रेम सामावत नव्हते. जणू काही प्रत्यक्ष लक्ष्मणाची भेट झाली, असे त्याला वाटले.॥ १९३॥

मूल (चौपाई)

भेंटत भरतु ताहिअति प्रीती।
लोग सिहाहिं प्रेम कै रीती॥
धन्य धन्य धुनि मंगल मूला।
सुर सराहि तेहि बरिसहिं फूला॥

अनुवाद (हिन्दी)

भरताने मोठॺा प्रेमाने आलिंगन दिले. प्रेमाची ही रीत पाहून सर्व लोक प्रशंसा करू लागले. मांगल्याचे मूळ असलेले ‘धन्य, धन्य’ असे म्हणत देव त्याची स्तुती करीत फुलांचा वर्षाव करू लागले.॥ १॥

मूल (चौपाई)

लोकबेदसब भाँतिहिं नीचा।
जासु छाँह छुइ लेइअ सींचा॥
तेहिभरि अंक राम लघु भ्राता।
मिलत पुलक परिपूरित गाता॥

अनुवाद (हिन्दी)

ते म्हणत होते की, ‘ज्याला लौकिक दृष्ट्या व वेद-मताप्रमाणे नीच मानले जाते, ज्याच्या सावलीचा स्पर्श झाल्यास स्नान करावे लागते, त्याच निषादाला मिठी मारून श्रीरामचंद्रांचा भाऊ भरत हा आनंदाने व प्रेमाने रोमांचित होऊन त्याला भेटत आहे.॥ २॥

मूल (चौपाई)

राम राम कहि जे जमुहाहीं।
तिन्हहि न पाप पुंज समुहाहीं॥
यह तौ राम लाइ उर लीन्हा।
कुल समेत जगु पावन कीन्हा॥

अनुवाद (हिन्दी)

जे लोक जांभई देताना राम-राम म्हणतात, म्हणजेच, आळसामध्ये का होईना, ज्यांच्या मुखातून राम-नाम येते, त्यांच्यासमोर पापांचे समूह फिरकत नाहीत. या गुहाला तर प्रत्यक्ष श्रीरामांनी आलिंगन दिले आणि त्याला सहकुटुंब जगाला पवित्र करणारा बनवून टाकले.॥ ३॥

मूल (चौपाई)

करमनास जलु सुरसरि परई।
तेहि को कहहु सीस नहिं धरई॥
उलटा नामु जपतजगु जाना।
बालमीकि भए ब्रह्म समाना॥

अनुवाद (हिन्दी)

कर्मनाशा नदीचे पाणी गंगेला मिळते, तेव्हा ते शिरावर कोण धारण करीत नाही, सांगा बरे! मरा, मरा असे उलटे नाम जपल्याने वाल्मीकी ब्रह्मस्वरूप झाले, हे जगाला माहीत आहे.॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

स्वपच सबर खस जमन जड़ पावँर कोल किरात।
रामु कहत पावन परम होत भुवन बिख्यात॥ १९४॥

अनुवाद (हिन्दी)

चांडाळ, शबर, खस, यवन, कोल, किरात इत्यादी मूर्ख व क्षुद्रसुद्धा रामनाम घेतल्यामुळे अत्यंत पवित्र आणि त्रिभुवनात विख्यात होतात,॥ १९४॥

मूल (चौपाई)

नहि अचि रिजु जुग जुग चलि आई।
केहि न दीन्हि रघुबीर बड़ाई॥
राम नाम महिमा सुर कहहीं।
सुनि सुनि अवध लोग सुखु लहहीं॥

अनुवाद (हिन्दी)

यात काहीही आश्चर्य नाही. युगा-युगांतरापासून हीच रीत चालत आलेली आहे. श्रीरघुनाथांनी कुणाला मोठेपण दिले नाही?’ देव अशा प्रकारे रामनामाचा महिमा सांगत होते व ते ऐकून अयोध्येचे लोक सुखावत होते.॥ १॥

मूल (चौपाई)

राम सखहि मिलि भरत सप्रेमा।
पूँछी कुसल सुमंगल खेमा॥
देखि भरत कर सीलु सनेहू।
भा निषाद तेहि समय बिदेहू॥

अनुवाद (हिन्दी)

रामांचा मित्र असलेल्या निषादराजाला प्रेमाने भेटल्यावर भरताने त्याचे क्षेमकुशल विचारले. भरताचे वर्तन व प्रेम पाहून निषाद त्याप्रसंगी देहभान विसरून विदेह झाला.॥ २॥

मूल (चौपाई)

सकुचसनेहुमोदुमन बाढ़ा।
भरतहि चितवत एकटक ठाढ़ा॥
धरि धीरजु पद बंदि बहोरी।
बिनय सप्रेम करत कर जोरी॥

अनुवाद (हिन्दी)

त्याच्या मनात संकोच, प्रेम व आनंद इतका वाढला की, तो मुग्ध होऊन भरताकडे एकटक बघत राहिला. नंतर धीर धरून त्याने पुन्हा भरताच्या चरणांना वंदन केले व प्रेमाने हात जोडून तो विनंती करू लागला.॥ ३॥

मूल (चौपाई)

कुसल मूल पदपंकज पेखी।
मैं तिहुँ काल कुसल निज लेखी॥
अब प्रभु परम अनुग्रह तोरें।
सहित कोटि कुल मंगल मोरें॥

अनुवाद (हिन्दी)

‘हे प्रभो! सुखरूपतेचे मूळ असलेल्या तुमच्या चरणकमलांच्या दर्शनाने मी तिन्ही काळात सुखरूप झालो आहे, हे मी ओळखले. आता तुमच्या परम अनुग्रहामुळे कोटी-कोटी पिढॺांसह माझे कल्याण झाले.॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

समुझि मोरि करतूति कुलु प्रभु महिमा जियँ जोइ।
जो न भजइ रघुबीर पद जग बिधि बंचित सोइ॥ १९५॥

अनुवाद (हिन्दी)

माझी करणी व कूळ जाणून, मी नीच जातीचा असूनही अनंतकोटी ब्रह्मांडांचे नायक असलेल्या भगवान रामचंद्रांनी माझ्यासारख्या शूद्राला आपल्या अहैतुकी कृपेने आपले मानले. या गोष्टीचा विचार करून जो मनुष्य श्रीरघुवीरांच्या चरणांचे भजन करीत नाही, तो या लोकी विधात्याकडून ठकविला गेला, असे समजावे.॥ १९५॥

मूल (चौपाई)

कपटी कायर कुमति कुजाती।
लोक बेद बाहेर सब भाँती॥
राम कीन्ह आपन जबही तें।
भयउँ भुवन भूषन तबही तें॥

अनुवाद (हिन्दी)

मी कपटी, भित्रा, कुबुद्धीचा आणि नीच जातीचा आहे. लोक व वेद या दोन्ही दृष्टॺा सर्व प्रकारे बहिष्कृत आहे; परंतु ज्या क्षणी श्रीरामचंद्रांनी मला आपलेसे केले, त्या क्षणापासून मी विश्वाचे भूषण ठरलो.’॥ १॥

मूल (चौपाई)

देखि प्रीति सुनि बिनय सुहाई।
मिलेउ बहोरि भरत लघु भाई॥
कहि निषाद निज नाम सुबानीं।
सादर सकल जोहारीं रानीं॥

अनुवाद (हिन्दी)

निषादराजाचे प्रेम पाहून व त्याचे गोड विनम्र बोलणे ऐकून भरताचा छोटा भाऊ शत्रुघ्न हा त्याला भेटला. नंतर निषादराजाने आपले नाव सांगून नम्र व मधुर वाणीने सर्व राण्यांना आदराने जोहार केला.॥ २॥

मूल (चौपाई)

जानि लखन सम देहिं असीसा।
जिअहु सुखी सय लाख बरीसा॥
निरखिनिषादुनगर नर नारी।
भए सुखी जनु लखनु निहारी॥

अनुवाद (हिन्दी)

राण्यांनी त्याला लक्ष्मणासारखा मानून आशीर्वाद दिला की, ‘तू लाखो वर्षे सुखाने राहा.’ नगरातून आलेले स्त्री-पुरुष निषादाला पाहून असे आनंदून गेले की, जणू ते लक्ष्मणालाच पहात होते.॥ ३॥

मूल (चौपाई)

कहहिं लहेउ एहिं जीवन लाहू।
भेंटेउ रामभद्र भरि बाहू॥
सुनि निषादु निज भाग बड़ाई।
प्रमुदित मन लइ चलेउ लेवाई॥

अनुवाद (हिन्दी)

सर्व म्हणत होते की, ‘जीवनाचा लाभ यालाच मिळाला. कल्याण स्वरूप श्रीरामचंद्रांनी याला आपल्या हातांनी मिठीत घेतले.’ निषाद आपल्या भाग्याचा महिमा ऐकून मनातून खूप आनंदित झाला आणि सर्वांना बरोबर घेऊन निघाला.॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

सनकारे सेवक सकल चले स्वामि रुख पाइ।
घर तरु तर सर बाग बन बास बनाएन्हि जाइ॥ १९६॥

अनुवाद (हिन्दी)

त्याने आपल्या सर्व सेवकांना इशारा केला. स्वामींच्या मनातले ओळखून ते निघाले आणि त्यांनी त्या लोकांना राहाण्यासाठी घरांमध्ये, वृक्षांखाली, तलावांकाठी, बागांमधून व जंगलांतून जागा तयार केल्या.॥ १९६॥

मूल (चौपाई)

सृंगबेरपुर भरत दीख जब।
भे सनेहँ सब अंग सिथिल तब॥
सोहत दिएँ निषादहि लागू।
जनु तनु धरें बिनय अनुरागू॥

अनुवाद (हिन्दी)

भरताने जेव्हा शृंगवेरपुर पाहिले, तेव्हा प्रेमामुळे तो देहभान हरपून बसला. तो निषादाच्या खांद्यावर हात ठेवून जाताना असा शोभून दिसत होता की, जणू विनय आणि प्रेम देह धारण करून आले आहेत.॥ १॥

मूल (चौपाई)

एहि बिधिभरत सेनु सबु संगा।
दीखि जाइ जग पावनि गंगा॥
रामघाट कहँ कीन्ह प्रनामू।
भा मनु मगनु मिले जनु रामू॥

अनुवाद (हिन्दी)

अशाप्रकारे संपूर्ण सेना बरोबर घेऊन भरताने जगाला पवित्र करणाऱ्या गंगा नदीचे दर्शन घेतले. जिथे श्रीरामांनी स्नान-संध्या केली होती, त्या रामघाटाला प्रणाम केला. त्याचे मन आनंदात इतके मग्न होते की, जणू त्याला प्रत्यक्ष श्रीरामांची भेट झाली.॥ २॥

मूल (चौपाई)

करहिं प्रनाम नगर नर नारी।
मुदित ब्रह्ममय बारि निहारी॥
करिमज्जनु मागहिं कर जोरी।
रामचंद्र पद प्रीति न थोरी॥

अनुवाद (हिन्दी)

नगरातील स्त्री-पुरुष प्रणाम करीत होते आणि गंगेचे ब्रह्मरूप जल पाहून आनंदित होत होते. गंगेत स्नान केल्यावर हात जोडून हाच वर मागत होते की, श्रीरामांच्या चरणीचे आमचे प्रेम कमी न होता वाढत राहो.॥ ३॥

मूल (चौपाई)

भरत कहेउ सुरसरि तव रेनू।
सकल सुखद सेवक सुरधेनू॥
जोरि पानि बर मागउँ एहू।
सीय राम पद सहज सनेहू॥

अनुवाद (हिन्दी)

भरत म्हणाला, ‘हे गंगे, तुझी धूळ सर्वांना सुख देणारी व सेवकांसाठी कामधेनूच आहे. मी हात जोडून हेच वरदान मागतो की, श्रीसीतारामांच्या चरणी माझे प्रामाणिक प्रेम राहो.’॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

एहि बिधि मज्जनु भरतु करि गुर अनुसासन पाइ।
मातु नहानीं जानि सब डेरा चले लवाइ॥ १९७॥

अनुवाद (हिन्दी)

अशा रीतीने भरताने स्नान केले. नंतर गुरूंची आज्ञा घेऊन सर्व मातांचे स्नान उरकले आहे, असे समजल्यावर तो सैन्याचा तळ उठवून सर्वांसह निघाला.॥ १९७॥

मूल (चौपाई)

जहँ तहँ लोगन्ह डेरा कीन्हा।
भरत सोधु सबही कर लीन्हा॥
सुर सेवाकरि आयसु पाई।
राम मातु पहिं गे दोउ भाई॥

अनुवाद (हिन्दी)

लोकांनी जिकडे-तिकडे मुक्काम ठोकला होता. भरताने सर्वांची व्यवस्था झाली की नाही ते पाहून घेतले. नंतर देवपूजन करून दोघे भाऊ माता कौसल्येकडे आले.॥ १॥

मूल (चौपाई)

चरन चाँपिकहि कहि मृदु बानी।
जननीं सकल भरत सनमानी॥
भाइहि सौंपि मातु सेवकाई।
आपु निषादहि लीन्ह बोलाई॥

अनुवाद (हिन्दी)

तिचे पाय चेपून व कोमल शब्द बोलून भरताने सर्व मातांविषयी आदर व्यक्त केला. त्यानंतर शत्रुघ्नाला मातांच्या सेवेचे काम देऊन त्याने निषादराजाला बोलावले.॥ २॥

मूल (चौपाई)

चले सखा कर सों कर जोरें।
सिथिल सरीरु सनेह न थोरें॥
पूँछत सखहि सो ठाउँ देखाऊ।
नेकु नयन मन जरनि जुड़ाऊ॥

अनुवाद (हिन्दी)

मित्र निषादराजाच्या हातात हात घालून भरत निघाला. भरताच्या मनात त्याच्याविषयी खूप प्रेम होते, त्यामुळे त्याला देहभान उरले नव्हते. भरताने त्याला म्हटले की, ‘ते ठिकाण मला दाखव की ज्यामुळे माझे नेत्र व मनातील तळमळ काहीशी शांत होईल,॥ ३॥

मूल (चौपाई)

जहँ सिय रामु लखनु निसि सोए।
कहत भरे जल लोचन कोए॥
भरत बचन सुनि भयउ बिषादू।
तुरत तहाँ लइ गयउ निषादू॥

अनुवाद (हिन्दी)

जिथे सीता, श्रीराम व लक्ष्मण हे रात्री झोपले होते.’ असे म्हणताना त्याच्या डोळ्यांच्या कडा प्रेमाश्रूंनी भरल्या. भरताचे बोलणे ऐकून निषादाला फार वाईट वाटले. तो लगेच त्याला तेथे घेऊन गेला,॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

जहँ सिंसुपा पुनीत तर रघुबर किय बिश्रामु।
अति सनेहँ सादर भरत कीन्हेउ दंड प्रनामु॥ १९८॥

अनुवाद (हिन्दी)

जिथे पवित्र अशोक वृक्षाखाली श्रीरामांनी विश्रांती घेतली होती, भरताने त्या ठिकाणी अत्यंत प्रेमाने दंडवत घातला.॥ १९८॥

मूल (चौपाई)

कुस साँथरी निहारि सुहाई।
कीन्ह प्रनामु प्रदच्छिन जाई॥
चरन रेख रज आँखिन्ह लाई।
बनइ न कहत प्रीति अधिकाई॥

अनुवाद (हिन्दी)

कुशांची तयार केलेली पथारी पाहून भरताने तिला प्रदक्षिणा घातली. श्रीरामचंद्रांच्या चरण-चिह्नांची धूळ आपल्या डोळ्यांना लावली. त्या वेळच्या त्याच्या प्रेमाचे उधाण काही वर्णन करता येत नाही.॥१॥

मूल (चौपाई)

कनक बिंदु दुइ चारिक देखे।
राखे सीस सीय सम लेखे॥
सजल बिलोचन हृदयँ गलानी।
कहत सखा सन बचन सुबानी॥

अनुवाद (हिन्दी)

तेथे सीतेच्या वस्त्रालंकारातून पडलेले दोनचार सोन्याचे कण पाहून भरताने ते सीतेसमान मानून तेथे डोके टेकले. त्याचे डोळे पाण्याने भरले होते आणि मनात खिन्नता होती. तो मित्र निषादाला मृदू वाणीने म्हणाला,॥ २॥

मूल (चौपाई)

श्रीहत सीयबिरहँ दुतिहीना।
जथा अवध नर नारि बिलीना॥
पिताजनक देउँ पटतर केही।
करतल भोगु जोगु जग जेही॥

अनुवाद (हिन्दी)

‘हे सुवर्णाचे कण किंवा तार हे सुद्धा सीतेच्या विरहामुळे असे शोभाहीन व कांतिहीन झाले आहेत की, जसे श्रीरामांच्या वियोगामुळे अयोध्येतील नर-नारी शोकाकुल झालेले होते. ज्या सीतेचे वडील या जगातील भोग व योग मुठीत असलेले राजा जनक आहेत, त्या जनकांना कुणाची उपमा देऊ?॥ ३॥

मूल (चौपाई)

ससुर भानुकुल भानु भुआलू।
जेहि सिहात अमरावतिपालू॥
प्राननाथु रघुनाथ गोसाईं।
जो बड़ होत सो राम बड़ाईं॥

अनुवाद (हिन्दी)

जिचे सासरे सूर्यकुलाचे सूर्य राजा दशरथ आहेत, ज्यांचा हेवा अमरावतीचा स्वामी इंद्र करीत होता, आणि प्रभू रघुनाथ जिचे प्राणनाथ आहेत, जे इतके महान आहेत की, त्यांनी दिलेल्या मोठेपणामुळेच कोणीही मोठा होतो,॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

पति देवता सुतीय मनि सीय साँथरी देखि।
बिहरत हृदउ न हहरि हर पबि तें कठिन बिसेषि॥ १९९॥

अनुवाद (हिन्दी)

श्रेष्ठ पतिव्रता स्त्रियांमध्ये शिरोमणी असलेल्या श्रेष्ठ सीतेची ही पथारी पाहून माझे हृदय हाय हाय करून विदीर्ण होत नाही. यावरून भगवान शंकरा, हे माझे हृदय वज्राहून कठोर आहे.॥ १९९॥

मूल (चौपाई)

लालनजोगु लखन लघु लोने।
भे न भाइ अस अहहिं न होने॥
पुरजन प्रियपितु मातु दुलारे।
सिय रघुबीरहि प्रानपिआरे॥

अनुवाद (हिन्दी)

माझा लहान भाऊ लक्ष्मण फार सुंदर व लाड करण्याजोगा आहे. असा भाऊ कुणाचाही झाला नाही, सध्या नाही आणि होणारही नाही. तो लक्ष्मण अयोध्येच्या लोकांचा लाडका, माता-पित्यांचा आवडता आणि सीतारामांचा प्राणप्रिय आहे.॥ १॥

मूल (चौपाई)

मृदु मूरति सुकुमार सुभाऊ।
तात बाउ तन लाग न काऊ॥
ते बन सहहिं बिपति सब भाँती।
निदरे कोटि कुलिस एहिं छाती॥

अनुवाद (हिन्दी)

जो कोमलमूर्ती व सुकुमार स्वभावाचा आहे. ज्याच्या शरीराला कधी गरम वारे सुद्धा लागलेले नाहीत, तो वनामध्ये सर्व प्रकारची संकटे सोशीत आहे. माझी ही छाती कोटॺवधी वज्रांपेक्षा कठोर आहे. नाहीतर ती केव्हाच फाटून गेली असती.॥ २॥

मूल (चौपाई)

राम जनमि जगुकीन्ह उजागर।
रूप सील सुख सब गुन सागर॥
पुरजनपरिजन गुरपितु माता।
राम सुभाउ सबहि सुखदाता॥

अनुवाद (हिन्दी)

श्रीरामांनी अवतार घेऊन जगाला उजळून टाकले. ते रूप, शील, सुख व सर्व गुण यांचे सागर आहेत. पुरवासी, कुटुंबीय, गुरू, माता-पिता या सर्वांना सुख देणारा श्रीरामांचा स्वभाव आहे.॥ ३॥

मूल (चौपाई)

बैरिउ राम बड़ाई करहीं।
बोलनि मिलनि बिनय मन हरहीं॥
सारद कोटि कोटि सत सेषा।
करि न सकहिं प्रभु गुन गन लेखा॥

अनुवाद (हिन्दी)

शत्रूसुद्धा श्रीरामांची वाखाणणी करतात. ते आपल्या वागण्या-बोलण्याने, भेटण्याच्या शैलीने आणि विनयाने सर्वांचे मन मोहून टाकतात. कोटॺ वधी सरस्वती व अब्जावधी शेषही प्रभू श्रीरामचंद्रांच्या गुणांच्या समूहांची गणना करू शकत नाहीत.॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

सुखस्वरूप रघुबंसमनि मंगल मोद निधान।
ते सोवत कुस डासि महि बिधि गति अति बलवान॥ २००॥

अनुवाद (हिन्दी)

जे सुखस्वरूप, रघुवंश शिरोमणी, मांगल्य व आनंदाचे भांडार आहेत, ते जमिनीवर कुश पसरून झोपतात. दैवाची गती मोठी बलवान आहे, हेच खरे.॥ २००॥

मूल (चौपाई)

राम सुना दुखु कानन काऊ।
जीवनतरु जिमि जोगवइ राऊ॥
पलक नयन फनिमनिजेहि भाँती।
जोगवहिं जननि सकल दिन राती॥

अनुवाद (हिन्दी)

श्रीरामचंद्रांनी आपल्या कानांनी सुद्धा कधी दुःखाचे नावही ऐकले नाही. महाराज दशरथ स्वतः जीवन-वृक्षाप्रमाणे त्यांचा सांभाळ करीत असत. ज्याप्रमाणे पापण्या डोळ्यांचा व साप आपल्या मण्याचा सांभाळ करतो, त्याप्रमाणे सर्व मातासुद्धा रात्रंदिवस त्यांचा सांभाळ करीत असत.॥ १॥

मूल (चौपाई)

ते अब फिरत बिपिन पदचारी।
कंद मूल फल फूल अहारी॥
धिग कैकई अमंगल मूला।
भइसि प्रान प्रियतम प्रतिकूला॥

अनुवाद (हिन्दी)

तेच श्रीराम आता जंगलात पायी फिरत आहेत. कंदमुळे व फळाफुलांचा आहार घेत आहेत. अमंगलाचे मूळ असलेल्या कैकेयीचा धिक्कार असो. ती स्वतःच्या प्राणप्रियतम पतीच्याही विरुद्ध गेली.॥ २॥

मूल (चौपाई)

मैं धिग धिग अघ उदधि अभागी।
सबु उतपातु भयउ जेहि लागी॥
कुल कलंकु करि सृजेउ बिधाताँ।
साइँ दोह मोहि कीन्ह कुमाताँ॥

अनुवाद (हिन्दी)

पापांचा समुद्र व दुर्भागी असलेल्या माझा धिक्कार असो, धिक्कार असो. माझ्यामुळे हे सर्व उत्पात घडले. विधात्याने मला कुलाचा कलंक म्हणून उत्पन्न केले आणि कुमातेने मला स्वामिद्रोही बनवून टाकले.’॥ ३॥

मूल (चौपाई)

सुनि सप्रेम समुझाव निषादू।
नाथ करिअ कत बादि बिषादू॥
राम तुम्हहि प्रिय तुम्ह प्रिय रामहि।
यह निरजोसु दोसु बिधि बामहि॥

अनुवाद (हिन्दी)

हे ऐकून निषादराज प्रेमाने समजावत म्हणाला की, ‘हे नाथ, तुम्ही विनाकारण विषाद का करीत आहात? श्रीराम तुम्हांला प्रिय आहेत आणि तुम्ही श्रीरामांना प्रिय आहात, हेच सत्य आहे. दोष आहे तो प्रतिकूल विधात्याचा आहे.॥ ४॥

छंद

मूल (दोहा)

बिधि बाम की करनी कठिन जेहिं मातु कीन्ही बावरी।
तेहि राति पुनि पुनि करहिं प्रभु सादर सरहना रावरी॥
तुलसी न तुम्ह सो राम प्रीतमु कहतु हौं सौंहें किएँ।
परिनाम मंगल जानि अपने आनिए धीरजु हिएँ॥

अनुवाद (हिन्दी)

प्रतिकूल विधात्याची करणी फार कठोर आहे. त्याने माता कैकेयीला वेडी करून टाकले. त्या रात्री प्रभू श्रीरामचंद्र वारंवार मोठॺा आदराने तुमची फार वाखाणणी करीत होते. श्रीरामांना तुमच्यासारखा अत्यंत प्रिय कोणी नाही, हे मी शपथ घेऊन सांगतो. परिणामी मंगलच होईल, असे समजून तुम्ही मनात धीर धरा.

सोरठा

मूल (दोहा)

अंतरजामी रामु सकुच सप्रेम कृपायतन।
चलिअ करिअ बिश्रामु यह बिचारि दृढ़ आनि मन॥ २०१॥

अनुवाद (हिन्दी)

श्रीरामचंद्र अंतर्यामी व संकोच, प्रेम व कृपेचे धाम आहेत, असा विचार करून व मन घट्ट करून चला आणि विश्रांती घ्या.’॥ २०१॥

मूल (चौपाई)

सखा बचन सुनि उर धरि धीरा।
बास चले सुमिरत रघुबीरा॥
यह सुधि पाइ नगर नर नारी।
चले बिलोकन आरत भारी॥

अनुवाद (हिन्दी)

मित्राचे म्हणणे ऐकून व मनात धीर धरून श्रीरामांचे स्मरण करीत भरत मुक्कामाकडे निघाला. नगरातील सर्व स्त्री-पुरुष श्रीरामांच्या वास्तव्याच्या ठिकाणाची वार्ता ऐकून आतुर होऊन ते स्थान पहाण्यास निघाले.॥ १॥

मूल (चौपाई)

परदखिना करिकरहिं प्रनामा।
देहिं कैकइहि खोरि निकामा॥
भरिभरि बारि बिलोचन लेहीं।
बाम बिधातहि दूषन देहीं॥

अनुवाद (हिन्दी)

त्यांनी त्या स्थानाला प्रदक्षिणा घालून प्रणाम केला आणि कैकेयीला खूप दोष दिला. डोळ्यांत पाणी आणून त्यांनी प्रतिकूल विधात्याला दूषण दिले.॥ २॥

मूल (चौपाई)

एक सराहहिं भरत सनेहू।
कोउ कह नृपति निबाहेउ नेहू॥
निंदहिं आपु सराहि निषादहि।
को कहि सकइ बिमोह बिषादहि॥

अनुवाद (हिन्दी)

कोणी भरताच्या प्रेमाची प्रशंसा करीत होता, तर कोणी म्हणे की, राजांनी आपले प्रेम चांगल्या प्रकारे सिद्ध केले. सर्वजण स्वतःची निंदा करीत होते व निषादराजाची प्रशंसा करीत होते. त्या वेळचे त्या लोकांचे प्रेम व दुःख यांचे वर्णन कोण करू शकेल?॥ ३॥

मूल (चौपाई)

एहि बिधि राति लोगु सबु जागा।
भा भिनुसार गुदारा लागा॥
गुरहि सुनावँ चढ़ाइ सुहाईं।
नईं नाव सब मातु चढ़ाईं॥

अनुवाद (हिन्दी)

अशा प्रकारे सर्वजण रात्रभर जागे राहिले. सकाळ होताच नावा सुरू झाल्या. सुंदर नावेवर गुरुजींना बसवून नंतर नवीन नावांवर सर्व मातांना चढविले.॥ ४॥

मूल (चौपाई)

दंडचारि महँ भा सबु पारा।
उतरि भरत तब सबहि सँभारा॥

अनुवाद (हिन्दी)

चार घटकांमध्ये सर्वजण गंगेपलीकडे उतरले. तेव्हा भरताने स्वतः उतरून सर्वांची काळजी घेतली.॥ ५॥

दोहा

मूल (दोहा)

प्रातक्रिया करि मातु पद बंदि गुरहि सिरु नाइ।
आगें किए निषाद गन दीन्हेउ कटकु चलाइ॥ २०२॥

अनुवाद (हिन्दी)

प्रातःकालीन कर्मे उरकून भरताने मातेंच्या चरणी वंदन केले आणि गुरूपुढे मस्तक नमवून निषाद लोकांना मार्ग दाखविण्यासाठी पुढे केले आणि सेनेला जाण्याची आज्ञा केली.॥ २०२॥

मूल (चौपाई)

कियउ निषादनाथु अगुआईं।
मातु पालकीं सकल चलाईं॥
साथबोलाइ भाइ लघु दीन्हा।
बिप्रन्ह सहित गवनु गुर कीन्हा॥

अनुवाद (हिन्दी)

निषादराजाला पुढे करून त्याच्यामागे सर्व मातेंच्या पालख्या सोडल्या. शत्रुघ्नाला बोलावून त्याला त्यांच्याबरोबर पाठविले. नंतर ब्राह्मणांसह गुरूंनी गमन केले.॥ १॥

मूल (चौपाई)

आपुसुरसरिहि कीन्ह प्रनामू।
सुमिरे लखन सहित सिय रामू॥
गवने भरत पयादेहिं पाए।
कोतल संग जाहिं डोरिआए॥

अनुवाद (हिन्दी)

त्यानंतर भरताने गंगेला प्रणाम करून लक्ष्मणासह श्रीसीतारामांचे स्मरण केले. भरत पायीच जाऊ लागला. त्याच्यासोबत लगाम धरलेले रिकामे घोडे जात होते.॥ २॥

मूल (चौपाई)

कहहिंसुसेवकबारहिं बारा।
होइअ नाथ अस्व असवारा॥
रामु पयादेहि पायँ सिधाए।
हम कहँ रथ गज बाजि बनाए॥

अनुवाद (हिन्दी)

चांगले सेवक भरताला सांगत होते की, ‘हे नाथ, घोडॺावर स्वार व्हा.’ परंतु तो उत्तर देई की ‘श्रीराम तर पायीच गेले आणि आमच्यासाठी रथ, हत्ती व घोडे बनविले आहेत काय?॥ ३॥

मूल (चौपाई)

सिरभरजाउँ उचित अस मोरा।
सब तें सेवक धरमु कठोरा॥
देखिभरत गति सुनि मृदु बानी।
सब सेवक गन गरहिं गलानी॥

अनुवाद (हिन्दी)

डोक्यावर चालत जावे, हेच मला योग्य वाटते.’ सेवकाचा धर्म मोठा कठीण असतो. भरताची अवस्था पाहून व मृदू भाषा ऐकून सर्व सेवक लाजेने चूर होत होते.॥ ४॥