३२ वसिष्ठ-भरत-संवाद

दोहा

मूल (दोहा)

तात हृदयँ धीरजु धरहु करहु जो अवसर आजु।
उठे भरत गुर बचन सुनि करन कहेउ सबु साजु॥ १६९॥

अनुवाद (हिन्दी)

वसिष्ठ म्हणाले, ‘हे कुमार! मनात धैर्य धर आणि आज जे करण्याची वेळ आहे, ते कर.’ गुरुजींचे म्हणणे ऐकून भरत उठला आणि त्याने सर्व तयारी करण्यास सांगितले.॥ १६९॥

मूल (चौपाई)

नृपतनु बेदबिदित अन्हवावा।
परम बिचित्र बिमानु बनावा॥
गहि पद भरत मातु सब राखी।
रहीं रानि दरसन अभिलाषी॥

अनुवाद (हिन्दी)

वेदांमध्ये सांगितलेल्या विधीप्रमाणे राजाला स्नान घातले आणि परम पवित्र असे विमान बनविले. भरताने सर्व मातेंचे चरण धरून त्यांना सती होण्यापासून परावृत्त केले. त्या राण्यासुद्धा श्रीरामांच्या दर्शनाची अभिलाषा बाळगून सती गेल्या नाहीत.॥ १॥

मूल (चौपाई)

चंदन अगर भार बहु आए।
अमित अनेक सुगंध सुहाए॥
सरजु तीर रचि चिता बनाई।
जनु सुरपुर सोपान सुहाई॥

अनुवाद (हिन्दी)

चंदन, अगुरू व इतर अनेक प्रकारच्या सुगंधी द्रव्यांचे पुष्कळ ढीग आले. शरयू नदीच्या तटावर सुंदर चिता रचली. जणू ती स्वर्गाची पायरी असावी, असे वाटत होते.॥ २॥

मूल (चौपाई)

एहि बिधि दाह क्रिया सब कीन्ही।
बिधिवत न्हाइ तिलांजुलि दीन्ही॥
सोधि सुमृति सबबेद पुराना।
कीन्ह भरत दसगात बिधाना॥

अनुवाद (हिन्दी)

अशा प्रकारे दहन-क्रिया केली गेली आणि सर्वांनी विधिपूर्वक स्नान करून तिलांजली दिली. मग वेद, स्मृती आणि पुराणे या सर्वांच्या मताप्रमाणे भरताने पित्याचे दहा दिवसांचे कर्म केले.॥३॥

मूल (चौपाई)

जहँजस मुनिबर आयसु दीन्हा।
तहँ तस सहस भाँति सबु कीन्हा॥
भए बिसुद्ध दिए सब दाना।
धेनु बाजि गज बाहन नाना॥

अनुवाद (हिन्दी)

मुनिश्रेष्ठ वसिष्ठांनी जिथे जशी आज्ञा दिली तिथे भरताने त्याप्रमाणे अनेक प्रकारची कृत्ये केली. सुतक संपल्यावर विधिपूर्वक सर्व दाने दिली. गाई, घोडे, हत्ती इत्यादी अनेक प्रकारची वाहने,॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

सिंघासन भूषन बसन अन्न धरनि धन धाम।
दिए भरत लहि भूमिसुर भे परिपूरन काम॥ १७०॥

अनुवाद (हिन्दी)

सिंहासने, दागिने, कपडे, अन्न, पृथ्वी, धन व घरे भरताने दान केली. ब्राह्मणांना दाने देऊन त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण केल्या.॥ १७०॥

मूल (चौपाई)

पितु हित भरत कीन्हि जसि करनी।
सो मुख लाख जाइ नहिं बरनी॥
सुदिनु सोधि मुनिबर तब आए।
सचिव महाजन सकल बोलाए॥

अनुवाद (हिन्दी)

पित्यासाठी भरताने जे काही केले, त्याचे वर्णन लाख मुखांनीही करता येणे शक्य नाही. मग शुभ मुहूर्त शोधून मुनिश्रेष्ठ वसिष्ठ आले आणि त्यांनी मंत्र्यांना व श्रेष्ठींना बोलाविले.॥ १॥

मूल (चौपाई)

बैठे राजसभाँ सब जाई।
पठए बोलि भरत दोउ भाई॥
भरतु बसिष्ठ निकट बैठारे।
नीति धरममय बचन उचारे॥

अनुवाद (हिन्दी)

सर्वजण राजसभेमध्ये स्थानापन्न झाले. तेव्हा वसिष्ठांनी भरत व शत्रुघ्न या दोघा भावांना बोलावणे पाठविले. वसिष्ठांनी भरताला आपल्याजवळ बसवून घेतले आणि नीतिपूर्ण व धर्मपूर्ण शब्दांत सांगितले.॥ २॥

मूल (चौपाई)

प्रथम कथा सब मुनिबर बरनी।
कैकइ कुटिल कीन्हि जसि करनी॥
भूप धरमब्रतु सत्य सराहा।
जेहिं तनु परिहरि प्रेमु निबाहा॥

अनुवाद (हिन्दी)

मुनिवर्यांनी कैकेयीने जे कुटिल कृत्य केले होते, त्याची कथा प्रारंभी सांगितली. नंतर दशरथांनी धर्म व सत्य राखण्यासाठी श्रीरामांचा त्याग केला व स्वतः देहत्याग करून रामावरील प्रेम व्यक्त केले, असे सांगितले.॥ ३॥

मूल (चौपाई)

कहत राम गुनसील सुभाऊ।
सजल नयन पुलकेउ मुनिराऊ॥
बहुरि लखन सिय प्रीति बखानी।
सोक सनेह मगन मुनि ग्यानी॥

अनुवाद (हिन्दी)

श्रीरामचंद्रांचे गुण, शील व स्वभाव यांचे वर्णन करता-करता मुनिराजांच्या नेत्रांत अश्रू आले आणि त्यांचे शरीर रोमांचित झाले. नंतर लक्ष्मण व सीता यांच्या प्रेमाची थोरवी सांगत ज्ञानी मुनी शोक व प्रेम यांमध्ये मग्न झाले.॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

सुनहु भरत भावी प्रबल बिलखि कहेउ मुनिनाथ।
हानि लाभु जीवनु मरनु जसु अपजसु बिधि हाथ॥ १७१॥

अनुवाद (हिन्दी)

मुनिनाथ शोकाकुल होऊन म्हणाले, ‘भरता, ऐक. भवितव्यता अटळ असते. हानि-लाभ, जीवन-मरण आणि कीर्ती-अपकीर्ती या गोष्टी विधात्याच्या हाती आहेत.॥ १७१॥

मूल (चौपाई)

अस बिचारि केहि देइअ दोसू।
ब्यरथ काहि पर कीजिअ रोसू॥
तात बिचारु करहुमन माहीं।
सोच जोगु दसरथु नृपु नाहीं॥

अनुवाद (हिन्दी)

असा विचार केल्यावर दोष कुणाला द्यायचा? आणि कुणावर व्यर्थ क्रोध करायचा? कुमार! मनात विचार कर. राजा दशरथांबद्दल दुःख करणे योग्य नाही.॥ १॥

मूल (चौपाई)

सोचिअ बिप्र जो बेद बिहीना।
तजि निज धरमु बिषय लयलीना॥
सोचिअ नृपतिजोनीतिन जाना।
जेहि न प्रजा प्रिय प्रान समाना॥

अनुवाद (हिन्दी)

जो ब्राह्मण वेद जाणत नाही आणि आपला धर्म सोडून विषय-भोगामध्येच बुडालेला असतो, त्याच्याविषयी शोक केला पाहिजे. जो राजा नीती जाणत नाही आणि ज्याला आपली प्रजा प्राणांसमान प्रिय नाही, त्याच्याबद्दल शोक करावा.॥ २॥

मूल (चौपाई)

सोचिअ बयसु कृपन धनवानू।
जो न अतिथि सिव भगति सुजानू॥
सोचिअ सूद्रु बिप्र अवमानी।
मुखर मानप्रिय ग्यान गुमानी॥

अनुवाद (हिन्दी)

जो वैश्य धनवान असूनही कंजूष आहे आणि जो अतिथि-सत्कार व श्रीशिवांची भक्ती करण्यात तत्पर नसतो, त्याच्या बद्दल चिंता करावी. जो शूद्र ब्राह्मणांचा अपमान करणारा आहे, फार बडॺा बाता मारणारा आहे आणि मान-मोठेपणा यांची इच्छा बाळगणारा व ज्ञानाची घमेंड बाळगणारा आहे, त्याची चिंता करावी.॥ ३॥

मूल (चौपाई)

सोचिअ पुनि पति बंचक नारी।
कुटिल कलहप्रिय इच्छाचारी॥
सोचिअ बटु निजब्रतु परिहरई।
जो नहिं गुर आयसु अनुसरई॥

अनुवाद (हिन्दी)

जी स्त्री पतीला फसविणारी, कुटिल, कलहप्रिय व स्वेच्छाचारिणी आहे, तिची चिंता करावी. जो ब्रह्मचारी ब्रह्मचर्य-व्रत सोडून देतो आणि गुरूच्या आज्ञेप्रमाणे वागत नाही, त्याची चिंता करावी.॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

सोचिअ गृही जो मोह बस करइ करम पथ त्याग।
सोचिअ जती प्रपंच रत बिगत बिबेक बिराग॥ १७२॥

अनुवाद (हिन्दी)

जो गृहस्थ मोहामुळे कर्ममार्गाचा त्याग करतो त्याची चिंता करावी. जो संन्यासी जगाच्या प्रपंचामध्ये सापडला आहे आणि ज्ञान-वैराग्यहीन आहे, त्याची चिंता करावी.॥ १७२॥

मूल (चौपाई)

बैखानस सोइ सोचै जोगू।
तपु बिहाइ जेहि भावइ भोगू॥
सोचि अपि सुन अकारन क्रोधी।
जननि जनक गुर बंधु बिरोधी॥

अनुवाद (हिन्दी)

ज्या वानप्रस्थ मनुष्याला तपस्या सोडून भोग आवडतात, त्याची चिंता करण्याजोगी आहे. जो लावालावी करणारा आहे, विनाकारण क्रोध करणारा आहे, माता-पिता, गुरू, भाऊबंद यांच्याशी वैरभाव ठेवणारा आहे, त्याची चिंता करावी.॥ १॥

मूल (चौपाई)

सब बिधि सोचिअ पर अपकारी।
निज तनु पोषक निरदय भारी॥
सोचनीय सबहीं बिधि सोई।
जो न छाड़ि छलु हरि जन होई॥

अनुवाद (हिन्दी)

जो दुसऱ्याचे अनिष्ट करतो, आपलेच शरीर पोसतो आणि फार मोठा निर्दय आहे, त्याची सर्व प्रकारे चिंता करावी. आणि जो कपट सोडून हरीचा भक्त नसतो, तोही सर्व प्रकारे चिंता करण्याजोगा होय.॥ २॥

मूल (चौपाई)

सोचनीय नहिं कोसलराऊ।
भुवन चारिदस प्रगट प्रभाऊ॥
भयउ न अहइनअब होनिहारा।
भूप भरत जस पिता तुम्हारा॥

अनुवाद (हिन्दी)

कोसलराज दशरथ हे चिंता करण्यासारखे नाहीत. त्यांचा प्रभाव चौदा लोकांमध्ये पसरलेला आहे. हे भरता, तुझ्या पित्यासारखा राजा झालेला नाही, आजही कोणी नाही आणि आता होणारही नाही.॥ ३॥

मूल (चौपाई)

बिधिहरिहरु सुरपति दिसिनाथा।
बरनहिं सब दसरथ गुन गाथा॥

अनुवाद (हिन्दी)

ब्रह्मदेव, विष्णू, शिव, इंद्र व दिक्पाल हे सर्व दशरथांचे गुणगान करतात.॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

कहहु तात केहि भाँति कोउ करिहि बड़ाई तासु।
राम लखन तुम्ह सत्रुहन सरिस सुअन सुचि जासु॥ १७३॥

अनुवाद (हिन्दी)

बाबा रे! ज्यांचे श्रीराम, लक्ष्मण, तू व शत्रुघ्न यांच्यासारखे पुत्र आहेत, त्यांचा महिमा कोण व कसा सांगू शकेल?॥ १७३॥

मूल (चौपाई)

सब प्रकार भूपति बड़भागी।
बादि बिषादु करिअ तेहि लागी॥
यहसुनि समुझि सोचु परिहरहू।
सिर धरि राज रजायसु करहू॥

अनुवाद (हिन्दी)

महाराज सर्व प्रकारे मोठॺा भाग्याचे होते. त्यांच्याबद्दल विषाद करणे व्यर्थ आहे. असे ऐकून व समजून घेऊन चिंता करणे सोडून दे आणि राजाची आज्ञा शिरसावंद्य मानून त्याप्रमाणे कर.॥ १॥

मूल (चौपाई)

रायँराजपदु तुम्हकहुँ दीन्हा।
पिता बचनु फुर चाहिअ कीन्हा॥
तजे रामु जेहिं बचनहि लागी।
तनु परिहरेउ राम बिरहागी॥

अनुवाद (हिन्दी)

राजांनी तुला राजपद दिले आहे. पित्याचे वचन तुला पाळले पाहिजे. राजांनी आपल्या वचनासाठी श्रीरामचंद्राचा त्याग केला आणि राम-विरहाच्या अग्नीमध्ये आपल्या देहाची आहुती दिली.॥ २॥

मूल (चौपाई)

नृपहिबचनप्रियनहिंप्रिय प्राना।
करहु तात पितु बचन प्रवाना॥
करहु सीस धरि भूप रजाई।
हइ तुम्ह कहँ सब भाँति भलाई॥

अनुवाद (हिन्दी)

राजांना वचन प्रिय होते, प्राण प्रिय नव्हते. म्हणून हे कुमार! पित्याचे वचन सत्य कर. राजाची आज्ञा शिरोधार्य मानून त्याप्रमाणे वर्तन कर. त्यातच तुझे सर्व प्रकारे भले आहे.॥ ३॥

मूल (चौपाई)

परसुराम पितु अग्या राखी।
मारी मातु लोक सब साखी॥
तनय जजातिहि जौबनु दयऊ।
पितु अग्याँ अघ अजसु न भयऊ॥

अनुवाद (हिन्दी)

परशुरामांनी पित्याची आज्ञा मानली व मातेला ठार मारले. सर्वजण याचे साक्षीदार आहेत. राजा ययातीच्या पुत्राने पित्याला आपले तारुण्य दिले. पित्याची आज्ञा पालन केल्याने त्यांना पाप व अपकीर्ती मिळाली नाही.॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

अनुचित उचित बिचारु तजि जे पालहिं पितु बैन।
ते भाजन सुख सुजस के बसहिं अमरपति ऐन॥ १७४॥

अनुवाद (हिन्दी)

जे अनुचित व उचित यांचा विचार सोडून पित्याच्या वचनांचे पालन करतात, ते इहलोकी सुख व सुकीर्तीस पात्र ठरतात आणि शेवटी स्वर्गात निवास करतात.॥ १७४॥

मूल (चौपाई)

अवसि नरेस बचन फुर करहू।
पालहु प्रजा सोकु परिहरहू॥
सुरपुर नृपु पाइहि परितोषू।
तुम्ह कहुँ सुकृतु सुजसु नहिं दोषू॥

अनुवाद (हिन्दी)

राजांच्या वचनाचे पालन निश्चितपणे कर. शोक सोडून दे व प्रजेचे पालन कर. असे केल्याने राजांना स्वर्गात संतोष होईल आणि तुला पुण्य व सुंदर कीर्ती लाभेल. दोष लागणार नाही.॥ १॥

मूल (चौपाई)

बेदबिदितसंमतसबही का।
जेहि पितु देइ सो पावइ टीका॥
करहु राजु परिहरहु गलानी।
मानहु मोर बचन हित जानी॥

अनुवाद (हिन्दी)

पिता ज्याला राजतिलक देतो, त्यालाच तो मिळतो, हे वेदांमध्ये प्रसिद्ध आहे आणि स्मृति-पुराणादी सर्व शास्त्रांनी संमत केलेले आहे. म्हणून तू राज्य कर आणि उदासपण सोडून दे. माझ्या बोलण्यात हित आहे, असे समजून ते मान्य कर.॥ २॥

मूल (चौपाई)

सुनि सुखु लहब राम बैदेहीं।
अनुचित कहब न पंडित केहीं॥
कौसल्यादि सकल महतारीं।
तेउ प्रजा सुख होहिं सुखारीं॥

अनुवाद (हिन्दी)

ही गोष्ट ऐकल्यावर श्रीरामचंद्र व सीता यांना समाधान मिळेल आणि कोणीही पंडित याला अयोग्य म्हणणार नाही. कौसल्या इत्यादी तुझ्या सर्व मातासुद्धा प्रजेच्या सुखामुळे सुखी होतील.॥३॥

मूल (चौपाई)

परम तुम्हार रामकर जानिहि।
सो सब बिधि तुम्ह सन भल मानिहि॥
सौंपेहु राजु राम के आएँ।
सेवा करेहु सनेह सुहाएँ॥

अनुवाद (हिन्दी)

तुझे श्रीरामांवर श्रेष्ठ प्रेम आहे, हे जो जाणतो, तो सर्व प्रकारे तुला चांगलाच मानेल. श्रीराम परत आल्यावर त्यांना राज्य सोपवून मग त्यांची प्रेमाने सेवा कर.’॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

कीजिअ गुर आयसु अवसि कहहिं सचिव कर जोरि।
रघुपति आएँ उचित जस तस तब करब बहोरि॥ १७५॥

अनुवाद (हिन्दी)

हात जोडून मंत्री म्हणाले, ‘गुरुजींच्या आज्ञेचे अवश्य पालन करा. श्रीरघुनाथ परत आल्यावर मग जे योग्य असेल, त्याप्रमाणे करा.॥ १७५॥

मूल (चौपाई)

कौसल्या धरिधीरजु कहई।
पूत पथ्य गुर आयसु अहई॥
सो आदरिअ करिअ हित मानी।
तजिअ बिषादु काल गति जानी॥

अनुवाद (हिन्दी)

कौसल्यासुद्धा धीर धरून म्हणाली, ‘हे पुत्रा, गुरुजींची आज्ञा ही हिताची आहे. तिचा आदर केला पाहिजे आणि हित मानून तिचे पालन केले पाहिजे. काळाची गती समजून घेऊन विषाद सोडला पाहिजे.॥ १॥

मूल (चौपाई)

बन रघुपति सुरपुर नरनाहू।
तुम्ह एहि भाँति तात कदराहू॥
परिजनप्रजा सचिव सब अंबा।
तुम्हही सुत सब कहँ अवलंबा॥

अनुवाद (हिन्दी)

श्रीरघुनाथ वनात आहे, महाराज स्वर्गात गेले आणि बाळा! तू तर असा बावरून गेला आहेस. हे पुत्रा, कुटुंब, प्रजा, मंत्री व सर्व माता या सर्वांना तूच एक आधार आहेस.॥ २॥

मूल (चौपाई)

लख बिध बामकालु कठिनाई।
धीरजु धरहु मातु बलि जाई॥
सिर धरि गुरआयसु अनुसरहू।
प्रजा पालि परिजन दुखु हरहू॥

अनुवाद (हिन्दी)

विधाता हा प्रतिकूल आहे आणि काळ हा कठोर आहे, असे पाहून धीर धर. मी तुझ्यावरून जीव ओवाळून टाकते. गुरूंची आज्ञा शिरोधार्य मानून त्यानुसार कार्य कर व प्रजेचे पालन करून कुटुंबीयांचे दुःख दूर कर.’॥ ३॥

मूल (चौपाई)

गुरके बचन सचिव अभिनंदनु।
सुने भरत हिय हित जनु चंदनु॥
सुनी बहोरि मातु मृदु बानी।
सील सनेह सरल रस सानी॥

अनुवाद (हिन्दी)

भरताने गुरूंचे वचन आणि मंत्र्यांचे अनुमोदन ऐकले. ते त्याच्या तप्त हृदयाला चंदनासारखे शीतल वाटले. नंतर त्याने शील, स्नेह व सरळपणाने कौसल्या मातेची वाणी ऐकली.॥ ४॥

छंद

मूल (दोहा)

सानी सरल रस मातु बानी सुनि भरतु ब्याकुल भए।
लोचन सरोरुह स्रवत सींचत बिरह उर अंकुर नए॥
सो दसा देखत समय तेहि बिसरी सबहि सुधि देह की।
तुलसी सराहत सकल सादर सीवँ सहज सनेह की॥

अनुवाद (हिन्दी)

सरळपणाच्या रसाने भरलेली कौसल्या मातेची वाणी ऐकून भरत व्याकूळ झाला. त्याचे नेत्र-कमल अश्रू ढाळत हृदयातील विरहरूपी नवीन अंकुरांचे सिंचन करू लागले. त्याची ती दशा पाहून त्यावेळी सर्वजण देहभान हरवून बसले. तुलसीदास म्हणतात, स्वाभाविक प्रेमाची परिसीमा असलेल्या भरताची प्रशंसा सर्व लोक आदराने करू लागले.

सोरठा

मूल (दोहा)

भरतु कमल कर जोरि धीर धुरंधर धीर धरि।
बचन अमिअँ जनु बोरि देत उचित उत्तर सबहि॥ १७६॥

अनुवाद (हिन्दी)

धैर्य-धुरीण भरत धीर धरून, कर-कमल जोडून आणि आपले वचन जणू अमृतात बुडवून सर्वांना योग्य उत्तर देऊ लागला.॥ १७६॥