३० भरताचे आगमन व शोक

मूल (चौपाई)

हाट बाट नहिं जाइ निहारी।
जनु पुर दहँ दिसि लागि दवारी॥
आवत सुत सुनि कैकय नंदिनि।
हरषी रबिकुल जलरुह चंदिनि॥

अनुवाद (हिन्दी)

बाजार व रस्ते पहावत नव्हते, जणू दाही दिशांना वणवा लागला असावा. पुत्र येत असल्याचे ऐकून सूर्यकुलरूपी कमलाला कोमेजून टाकणारे चांदणे बनलेली कैकेयी फार आनंदित झाली.॥ १॥

मूल (चौपाई)

सजि आरती मुदित उठि धाई।
द्वारेहिं भेंटि भवन लेइ आई॥
भरत दुखित परिवारु निहारा।
मानहुँ तुहिन बनज बनु मारा॥

अनुवाद (हिन्दी)

ती आरती सजवून आनंदाने धावली आणि दरवाजा जवळ भेटताच भरताला महालात घेऊन गेली. भरताला सर्व परिवार दुःखात असलेला दिसला, जणू कमल-वनाला दवाने करपून टाकावे.॥ २॥

मूल (चौपाई)

कैकेई हरषित एहि भाँती।
मनहुँ मुदित दव लाइ किराती॥
सुतहिससोच देखि मनु मारें।
पूँछति नैहर कुसल हमारें॥

अनुवाद (हिन्दी)

एक कैकेयीच अशी आनंदित दिसत होती की, जणू जंगलाला आग लावून भिल्लिणीला आनंद वाटावा. भरताला काळजीत पडलेला व उदासवाणा पाहून ती विचारू लागली की, ‘आमच्या माहेरी सर्व खुशाल आहे ना?’॥ ३॥

मूल (चौपाई)

सकल कुसल कहि भरत सुनाई।
पूँछी निज कुल कुसल भलाई॥
कहु कहँ तात कहाँ सब माता।
कहँ सिय राम लखन प्रिय भ्राता॥

अनुवाद (हिन्दी)

भरताने सर्व खुशाली सांगितली. मग आपल्या कुळाचे क्षेम विचारले. भरत म्हणाला की, ‘बाबा कुठे आहेत? माझ्या सर्व माता कुठे आहेत? सीता व माझे प्रिय भाऊ राम-लक्ष्मण कुठे आहेत?’॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

सुनि सुत बचन सनेहमय कपट नीर भरि नैन।
भरत श्रवन मन सूल सम पापिनि बोली बैन॥ १५९॥

अनुवाद (हिन्दी)

पुत्राचे प्रेमळ उद्गार ऐकून नेत्रांमध्ये खोटे पाणी आणत पापिणी कैकेयी भरताच्या कानात मनाला शूळाप्रमाणे बोचणारे शब्द बोलली,॥ १५९॥

मूल (चौपाई)

तातबात मैं सकल सँवारी।
भै मंथरा सहाय बिचारी॥
कछुककाजबिधिबीच बिगारेउ।
भूपति सुरपति पुर पगु धारेउ॥

अनुवाद (हिन्दी)

‘बाळा! मी सर्व गोष्टी बरोबर जमवल्या होत्या. बिचाऱ्या मंथरेने मदतही केली, परंतु विधात्याने मध्येच थोडा खोडा घातला. त्यामुळे राजा देवलोकी निघून गेले.’॥ १॥

मूल (चौपाई)

सुनत भरतु भए बिबस बिषादा।
जनु सहमेउ करि केहरि नादा॥
तात तात हा तात पुकारी।
परे भूमितल ब्याकुल भारी॥

अनुवाद (हिन्दी)

हे ऐकताच दुःखामुळे भरताची दशा दयनीय झाली, जणू सिंहाची गर्जना ऐकून हत्ती घाबरून गेला. तो ‘बाबा, बाबा, अहो बाबा!’ असे म्हणत अत्यंत व्याकूळ होऊन जमिनीवर पडला.॥ २॥

मूल (चौपाई)

चलत न देखन पायउँ तोही।
तात न रामहि सौंपेहु मोही॥
बहुरि धीर धरि उठे सँभारी।
कहु पितु मरन हेतु महतारी॥

अनुवाद (हिन्दी)

आणि विलाप करीत म्हणू लागला की, ‘अहो बाबा! मी तुम्हांला अंतकाळी पाहूही शकलो नाही. तुम्ही मला श्रीरामांच्या हाती सोपवूनही गेला नाहीत.’ मग धीर धरून तो स्वतःला सावरत उठला आणि म्हणाला, ‘आई! बाबांच्या मृत्यूचे कारण तर सांग.’॥ ३॥

मूल (चौपाई)

सुनि सुत बचन कहति कैकेई।
मरमु पाँछि जनु माहुर देई॥
आदिहु तें सब आपनि करनी।
कुटिल कठोर मुदित मन बरनी॥

अनुवाद (हिन्दी)

पुत्राचे बोलणे ऐकून कैकेयी सांगू लागली, जणू मर्मस्थानी चिरून ती त्यात विष भरत होती. कुटिल व कठोर कैकेयीने आपले सर्व कृत्य प्रारंभापासून शेवटपर्यंत प्रसन्नपणे सांगितले.॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

भरतहि बिसरेउ पितु मरन सुनत राम बन गौनु।
हेतु अपनपउ जानि जियँ थकित रहे धरि मौनु॥ १६०॥

अनुवाद (हिन्दी)

श्रीरामचंद्रांचे वनात जाणे ऐकून भरत पित्याचे मरण विसरून गेला आणि मनात या सर्व अनर्थाचे कारण आपण आहोत, असे समजून अवाक् व सुन्न झाला.॥ १६०॥

मूल (चौपाई)

बिकल बिलोकि सुतहि समुझावति।
मनहुँ जरे पर लोनु लगावति॥
तात राउ नहिं सोचै जोगू।
बिढ़इ सुकृत जसु कीन्हेउ भोगू॥

अनुवाद (हिन्दी)

मुलगा व्याकूळ झालेला पाहून कैकेयी त्याला समजावू लागली, जणू भाजल्या जागी मीठ चोळू लागली. ती म्हणाली, ‘बाळा! राजांसाठी काळजी करण्याचे कारण नाही. त्यांनी पुण्य आणि कीर्ती मिळवून त्याचा पुरेपूर भोग घेतला आहे.॥ १॥

मूल (चौपाई)

जीवत सकल जनम फल पाए।
अंत अमरपति सदन सिधाए॥
अस अनुमानि सोच परिहरहू।
सहित समाज राज पुर करहू॥

अनुवाद (हिन्दी)

जीवनामध्ये त्यांनी जन्म घेतल्याचे संपूर्ण फळ मिळविले आहे आणि शेवटी ते इंद्रलोकी गेले. असा विचार करून चिंता सोडून दे व परिवारासह अयोध्येचे राज्य कर.’॥ २॥

मूल (चौपाई)

सुनि सुठि सहमेउ राजकुमारू।
पाकें छत जनु लाग अँगारू॥
धीरज धरि भरिलेहिं उसासा।
पापिनि सबहि भाँति कुल नासा॥

अनुवाद (हिन्दी)

हे ऐकून राजकुमार भरताला मोठा धक्का बसला. जणू पिकलेल्या जखमेला विस्तवाचा चटका बसला. त्याने मन घट्ट करून मोठा उसासा टाकत म्हटले की, ‘पापिणी, तू सर्व तऱ्हेने कुळाचा नाश केलास.॥ ३॥

मूल (चौपाई)

जौं पै कुरुचि रही अति तोही।
जनमत काहे न मारे मोही॥
पेड़ काटि तैं पालउ सींचा।
मीन जिअन निति बारि उलीचा॥

अनुवाद (हिन्दी)

जर तुझी अशी दुष्ट इच्छा होती, तर जन्म घेताच मला मारून का टाकले नाहीस? तू वृक्ष तोडून पानांना पाणी घातलेस, माशाने जिवंत राहावे, म्हणून पाणी फेकून दिलेस. माझे हित करण्याऐवजी उलट अहित केलेस.॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

हंसबंसु दसरथु जनकु राम लखन से भाइ।
जननी तूँ जननी भई बिधि सन कछु न बसाइ॥ १६१॥

अनुवाद (हिन्दी)

मला सूर्यवंशासारखा वंश, दशरथांच्यासारखा पिता व राम-लक्ष्मणासारखे भाऊ मिळाले. परंतु हे माते, मला जन्म देणारी आई तू झालीस! काय करणार? विधात्याच्यापुढे कुणाचे काही चालत नाही.॥ १६१॥

मूल (चौपाई)

जब तैं कुमति कुमत जियँ ठयऊ।
खंड खंड होइ हृदउ न गयऊ॥
बर मागत मन भइ नहिं पीरा।
गरि न जीह मुहँ परेउ न कीरा॥

अनुवाद (हिन्दी)

अग दुष्टे! जेव्हा तू हा दुष्ट विचार मनात पक्का केलास, त्यावेळीच तुझ्या हृदयाचे तुकडे तुकडे का नाही झाले? वरदान मागताना तुझ्या मनात थोडेसुद्धा दुःख झाले नाही? तुझी जीभ गळून नाही पडली? तुझ्या तोंडात किडे का नाही पडले?॥ १॥

मूल (चौपाई)

भूपँ प्रतीति तोरि किमि कीन्ही।
मरन काल बिधि मति हरि लीन्ही॥
बिधिहुँ न नारि हृदयगति जानी।
सकल कपट अघ अवगुन खानी॥

अनुवाद (हिन्दी)

राजांनी तुझ्यावर विश्वास कसा ठेवला? विधात्याने त्यांची बुद्धी मरतेवेळी हरण केली होती, असे वाटते. स्त्रियांच्या मनातील चाल विधात्यालाही कळली नाही. तुझे हृदय पूर्णपणे कपट, पाप व अवगुण यांची खाण आहे.॥ २॥

मूल (चौपाई)

सरल सुसील धरम रत राऊ।
सो किमि जानै तीय सुभाऊ॥
अस को जीव जंतु जग माहीं।
जेहि रघुनाथ प्रानप्रिय नाहीं॥

अनुवाद (हिन्दी)

आणि राजा हे तर सरळ, सुशील व धर्मपरायण होते. त्यांना स्त्री-स्वभाव कसा कळणार? अग! जगात असा कोणता प्राणी आहे की, त्याला श्रीरामचंद्र प्राणांसारखे प्रिय नाहीत?॥ ३॥

मूल (चौपाई)

भे अति अहित रामु तेउ तोही।
को तू अहसि सत्य कहु मोही॥
जो हसिसोहसिमुहँ मसि लाई।
आँखि ओट उठि बैठहि जाई॥

अनुवाद (हिन्दी)

ते श्रीरामही तुला वैऱ्यासारखे वाटले? तू कोण आहेस? मला खरे खरे सांग. तू जी कोण असशील, ती आता आपले तोंड काळे करून माझ्या डोळ्यांआड निघून जा कशी!॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

राम बिरोधी हृदय तें प्रगट कीन्ह बिधि मोहि।
मो समान को पातकी बादि कहउँ कछु तोहि॥ १६२॥

अनुवाद (हिन्दी)

विधात्याने मला श्रीरामांना विरोध करणाऱ्या तुझ्यापासून उत्पन्न केले व मला श्रीरामविरोधी ठरविले. माझ्यासारखा पापी दुसरा कोण आहे? मीच पापी आहे. मग विनाकारण मी तुला व्ययर्थच बोलत आहे’॥ १६२॥

मूल (चौपाई)

सुनि सत्रुघुन मातु कुटिलाई।
जरहिं गात रिस कछु न बसाई॥
तेहि अवसर कुबरी तहँ आई।
बसन बिभूषन बिबिध बनाई॥

अनुवाद (हिन्दी)

मातेचा दुष्टपणा ऐकून शत्रुघ्नाचे शरीर क्रोधाने पेटले होते, परंतु त्याचे काही चालत नव्हते. त्याचवेळी तऱ्हेतऱ्हेची वस्त्रे व अलंकार यांनी नटून कुबडी मंथरा तेथे आली.॥ १॥

मूल (चौपाई)

लखिरिसभरेउलखनलघु भाई।
बरत अनल घृत आहुति पाई॥
हुमगिलात तकिकूबर मारा।
परि मुह भर महि करत पुकारा॥

अनुवाद (हिन्दी)

तिला नटलेली पाहून लक्ष्मणाचा छोटा भाऊ शत्रुघ्न भडकला. जणू जळत्या आगीत तुपाची आहुती पडली. त्याने तिच्या कुबडावर जोराने लाथ मारली. ती ओरडत जमिनीवर तोंडघशी पडली.॥ २॥

मूल (चौपाई)

कूबर टूटेउ फूट कपारू।
दलित दसन मुख रुधिर प्रचारू॥
आह दइअ मैं काह नसावा।
करत नीक फलु अनइस पावा॥

अनुवाद (हिन्दी)

तिचे कुबड मोडले, कपाळ फुटले, दात तुटले आणि तोंडातून रक्त वाहू लागले. ती विव्हळत म्हणाली, ‘अरे दैवा, चांगले करता मला वाईट फळ मिळाले. मी काय वाईट केले?’॥ ३॥

मूल (चौपाई)

सुनिरिपुहनलख नखसिख खोटी।
लगे घसीटन धरि धरि झोंटी॥
भरत दयानिधि दीन्हि छड़ाई।
कौसल्या पहिं गे दोउ भाई॥

अनुवाद (हिन्दी)

तिचे बोलणे ऐकून आणि ती नखशिखांत दुष्ट आहे, असे पाहून शत्रुघ्न तिच्या झिंज्या धरून तिला फरफटत नेऊ लागला. तेव्हा दयाळू भरताने तिला सोडविले आणि दोघे भाऊ कौसल्या मातेकडे गेले.॥ ४॥