२७ सुमंत्राचे अयोध्येला परतणे

दोहा

मूल (दोहा)

भयउ निषादु बिषादबस देखत सचिव तुरंग।
बोलि सुसेवक चारि तब दिए सारथी संग॥ १४३॥

अनुवाद (हिन्दी)

मंत्री व घोडॺांची झालेली दशा पाहून निषादराजाला विषाद वाटला. तेव्हा त्याने चार उत्तम सेवक बोलावून सारथ्यासोबत दिले.॥ १४३॥

मूल (चौपाई)

गुह सारथिहि फिरेउ पहुँचाई।
बिरहु बिषादु बरनि नहिं जाई॥
चले अवध लेइ रथहि निषादा।
होहिं छनहिं छन मगन बिषादा॥

अनुवाद (हिन्दी)

निषादराज गुह सारथी सुमंत्र याला निरोप देऊन परतला. त्याचा विरह व दुःख यांचे वर्णन करणे अशक्य. ते चौघे निषाद-रथ घेऊन अयोध्येकडे निघाले. सुमंत्र व घोडे यांना पाहून तेसुद्धा क्षणोक्षणी विषादामध्ये बुडून जात होते.॥ १॥

मूल (चौपाई)

सोच सुमंत्र बिकल दुख दीना।
धिग जीवन रघुबीर बिहीना॥
रहिहि न अंतहुँ अधम सरीरू।
जसु न लहेउ बिछुरत रघुबीरू॥

अनुवाद (हिन्दी)

व्याकूळ व दुःखाने दीन झालेला सुमंत्र विचार करीत होता की, श्रीरघुवीरांच्या विना जगण्याचा धिक्कार असो. शेवटी हे अधम शरीर राहाणार तर नाही. आत्ताच श्रीरामांचा वियोग होताच या देहाने नष्ट होऊन कीर्ती संपादन का केली नाही?॥ २॥

मूल (चौपाई)

भए अजस अघ भाजन प्राना।
कवन हेतु नहिं करत पयाना॥
अहह मंद मनु अवसर चूका।
अजहुँ न हृदय होत दुइ टूका॥

अनुवाद (हिन्दी)

हे प्राण अपकीर्ती आणि पापाचे भांडे आहेत. आता हे निघून का जात नाहीत? अरेरे, नीच मनाने चांगली संधी घालविली. अजूनही हृदय दोन तुकडे होऊन फुटून जात नाही.॥ ३॥

मूल (चौपाई)

मीजि हाथ सिरु धुनि पछिताई।
मनहुँ कृपन धन रासि गवाँई॥
बिरिद बाँधि बर बीरु कहाई।
चलेउ समर जनु सुभट पराई॥

अनुवाद (हिन्दी)

सुमंत्र हात चोळत व डोके बडवून घेत पश्चात्ताप करीत होता. जणू एखादा कंजूष माणूस धनाचा खजिना गमावून बसला होता. जणू एखादा वीराचा वेष घातलेला मोठा योद्धा आणि उत्तम शूर म्हणून मानला जात असलेला मनुष्य युद्धातून पळून निघाला होता.॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

बिप्र बिबेकी बेदबिद संमत साधु सुजाति।
जिमि धोखें मदपान कर सचिव सोच तेहि भाँति॥ १४४॥

अनुवाद (हिन्दी)

ज्याप्रमाणे कुणा विवेकशील, वेदसंपन्न, साधु-संमत वागणाऱ्या कुलीन ब्राह्मणाने चुकून मद्य प्यावे आणि मग पश्चात्ताप करावा, त्याप्रमाणे मंत्री पश्चात्ताप करीत होता.॥ १४४॥

मूल (चौपाई)

जिमि कुलीनतियसाधु सयानी।
पतिदेवता करम मन बानी॥
रहै करम बस परिहरि नाहू।
सचिव हृदयँ तिमि दारुन दाहू॥

अनुवाद (हिन्दी)

ज्याप्रमाणे एखादी कुलीन, सज्जन स्वभावाची, समजूतदार आणि मन, वचन व कर्माने पतीला देव समजणारी पतिव्रता असणाऱ्या स्त्रीला दुर्दैवाने पतीला सोडून रहावे लागावे, त्यावेळी तिच्या मनात ज्याप्रमाणे भयानक यातना होतात, त्याप्रमाणे मंत्र्याच्या मनाची अवस्था झाली होती.॥ १॥

मूल (चौपाई)

लोचन सजल डीठि भइ थोरी।
सुनइ न श्रवन बिकल मति भोरी॥
सूखहिं अधर लागि मुहँ लाटी।
जिउ न जाइ उर अवधि कपाटी॥

अनुवाद (हिन्दी)

डोळ्यांत पाणी भरले होते, दृष्टी मंद झाली होती, कानांना काही ऐकू येत नव्हते, व्याकूळ झालेली बुद्धी भरकटत होती. ओठ सुकले होते, तोंड चिकटले होते. परंतु ही मृत्यूची लक्षणे असूनही प्राण जात नव्हते, कारण अंतःकरणाला चौदा वर्षांचा अवधी संपल्यावर भगवंत पुन्हा भेटतील, या आशेचे दार लागले होते.॥ २॥

मूल (चौपाई)

बिबरन भयउ न जाइ निहारी।
मारेसि मनहुँ पिता महतारी॥
हानि गलानि बिपुल मन ब्यापी।
जमपुर पंथ सोच जिमि पापी॥

अनुवाद (हिन्दी)

सुमंत्राचा चेहरा पडला होता, तो पहावत नव्हता. असे वाटत होते की, त्याच्या हातून जणू आई-वडिलांची हत्या घडली असावी. त्याच्या मनात रामवियोगरूपी हानी झाल्याची मोठी वेदना होती. ज्याप्रमाणे एखादा पापी मनुष्य नरकात जाताना मार्गामध्ये काळजी करीत असतो, त्याप्रमाणे त्याची स्थिती झाली होती.॥ ३॥

मूल (चौपाई)

बचनु न आव हृदयँ पछिताई।
अवध काह मैं देखब जाई॥
राम रहित रथ देखिहि जोई।
सकुचिहि मोहि बिलोकत सोई॥

अनुवाद (हिन्दी)

तोंडातून शब्द फुटत नव्हता. मनात काळजी होती की, अयोध्येस गेल्यावर काय दिसेल? श्रीराम नसलेला रथ जो कोणी पाहील, तो माझे तोंडही पहाणार नाही.॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

धाइ पूँछिहहिं मोहि जब बिकल नगर नर नारि।
उतरु देब मैं सबहि तब हृदयँ बज्रु बैठारि॥ १४५॥

अनुवाद (हिन्दी)

नगरातील सर्व व्याकूळ स्त्री-पुरुष धावत येऊन मला विचारतील, तेव्हा छातीवर दगड ठेवून सर्वांना उत्तर द्यावे लागेल.॥ १४५॥

मूल (चौपाई)

पुछिहहिं दीन दुखित सब माता।
कहब काह मैं तिन्हहि बिधाता॥
पूछिहि जबहिं लखन महतारी।
कहिहउँ कवन सँदेस सुखारी॥

अनुवाद (हिन्दी)

जेव्हा दीन-दुःखी सर्व माता विचारू लागतील, तेव्हा हे विधात्या, मी त्यांना काय उत्तर देऊ? जेव्हा लक्ष्मणाची माता मला विचारील, तेव्हा मी तिला कोणता सुखदायक निरोप देऊ?॥ १॥

मूल (चौपाई)

राम जननि जब आइहि धाई।
सुमिरि बच्छु जिमि धेनु लवाई॥
पूँछत उतरु देब मैं तेही।
गे बनु राम लखनु बैदेही॥

अनुवाद (हिन्दी)

श्रीरामांची माता नुकतीच व्यालेली गाय वासराची आठवण येताच धावत येते त्याप्रमाणे धावत येईल. तिने येऊन विचारल्यावर मला हेच उत्तर द्यावे लागणार की, श्रीराम, लक्ष्मण व सीता वनात निघून गेले.॥ २॥

मूल (चौपाई)

जोइ पूँछिहि तेहि ऊतरु देबा।
जाइ अवध अब यहु सुखु लेबा॥
पूँछिहि जबहिं राउ दुख दीना।
जिवनु जासु रघुनाथ अधीना॥

अनुवाद (हिन्दी)

जो कोणी विचारील, त्याला हेच उत्तर द्यावे लागणार. अरेरे, अयोध्येस गेल्यावर आता हेच सुख मिळण्याचे माझ्या नशिबी आहे. ज्यांचे जीवन श्रीरघुनाथांच्या दर्शनावर अवलंबून आहे, ते दुःखामुळे दीन झालेले महाराज मला विचारतील,॥ ३॥

मूल (चौपाई)

देहउँ उतरु कौनु मुहु लाई।
आयउँ कुसल कुअँर पहुँचाई॥
सुनत लखन सियराम सँदेसू।
तृन जिमि तनु परिहरिहि नरेसू॥

अनुवाद (हिन्दी)

तेव्हा कोणत्या तोंडाने मी उत्तर देऊ की, मी राजकुमारांना सुखरूप पोहोचवून आलो. लक्ष्मण, सीता व श्रीरामांची वार्ता ऐकताच महाराज कस्पटाप्रमाणे आपले शरीर टाकून देतील.॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

हृदय न बिदरेउ पंक जिमि बिछुरत प्रीतमु नीरु।
जानत हौं मोहि दीन्ह बिधि यहु जातना सरीरु॥ १४६॥

अनुवाद (हिन्दी)

प्रियतम श्रीरामरूपी जलापासून दूर होताच माझे हृदय चिखला-प्रमाणे विदीर्ण झाले नाही, म्हणून वाटते की, विधात्याने मला हे ‘यातना शरीर’ च नरक-यातना भोगण्यासाठी दिले आहे.’॥ १४६॥

मूल (चौपाई)

एहि बिधि करत पंथ पछितावा।
तमसा तीर तुरत रथु आवा॥
बिदा किए करि बिनय निषादा।
फिरे पायँ परि बिकल बिषादा॥

अनुवाद (हिन्दी)

सुमंत्र अशा प्रकारे वाटेमध्ये पश्चात्ताप करीत होता, इतक्यात रथ तमसा नदीच्या तीरावर येऊन पोहोचला. मंत्र्याने विनंती करून सोबत आलेल्या चारी निषादांना परत पाठविले. तेही दुःखाने व्याकूळ होत सुमंत्राच्या पाया पडले.॥ १॥

मूल (चौपाई)

पैठत नगर सचिव सकुचाई।
जनु मारेसि गुर बाँभन गाई॥
बैठि बिटप तर दिवसु गवाँवा।
साँझ समय तब अवसरु पावा॥

अनुवाद (हिन्दी)

जणू काही गुरू, ब्राह्मण किंवा गाय यांची हत्या करून आल्याप्रमाणे नगरात प्रवेश करताना मंत्र्याला संकोच वाटत होता. त्याने दिवसभर एका झाडाखाली बसून घालविला. जेव्हा संध्याकाळ झाली तेव्हा संधी मिळाली.॥ २॥

मूल (चौपाई)

अवधप्रबेसु कीन्ह अँधिआरें।
पैठ भवन रथु राखि दुआरें॥
जिन्हजिन्ह समाचार सुनि पाए।
भूप द्वार रथु देखन आए॥

अनुवाद (हिन्दी)

अंधार झाल्यावर त्याने अयोध्येमध्ये प्रवेश केला आणि दरवाज्यासमोर रथ उभा करून तो हळूच महालात गेला. ज्या लोकांना याची वार्ता लागली, ते सर्वजण रथ पहाण्यास राजद्वारी आले.॥ ३॥

मूल (चौपाई)

रथु पहिचानि बिकल लखि घोरे।
गरहिं गात जिमि आतप ओरे॥
नगर नारि नरब्याकुल कैसें।
निघटत नीर मीनगन जैसें॥

अनुवाद (हिन्दी)

रथ ओळखून आणि घोडे व्याकूळ झाल्याचे पाहून ज्याप्रमाणे उन्हामध्ये गारा वितळू लागतात, त्याप्रमाणे पाहणाऱ्यांचे देह गळून जात होते. जळ आटल्यावर मासे व्याकूळ होतात, तसे नगरातील स्त्री-पुरुष व्याकूळ झाले होते.॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

सचिव आगमनु सुनत सबु बिकल भयउ रनिवासु।
भवनु भयंकरु लाग तेहि मानहुँ प्रेत निवासु॥ १४७॥

अनुवाद (हिन्दी)

मंत्री एकटाच परत आल्याचे ऐकताच संपूर्ण अंतःपुर व्याकूळ झाले. त्यांना राजमहाल स्मशानाप्रमाणे भयंकर वाटू लागला.॥ १४७॥

मूल (चौपाई)

अति आरति सब पूँछहिं रानी।
उतरु न आव बिकल भइ बानी॥
सुनइनश्रवन नयन नहिं सूझा।
कहहु कहाँ नृपु तेहि तेहि बूझा॥

अनुवाद (हिन्दी)

अत्यंत आर्त होऊन सर्व राण्या विचारू लागल्या, परंतु सुमंत्राला काही उत्तर देता येईना. त्याची वाणी अडखळली. त्याला कानांनी काही ऐकू येत नव्हते, की डोळ्यांनी दिसत नव्हते. जो कोणी समोर येई त्याला तो विचारी की, ‘महाराज कुठे आहेत ते सांगा.’॥ १॥

मूल (चौपाई)

दासिन्ह दीख सचिव बिकलाई।
कौसल्या गृहँ गईं लवाई॥
जाइ सुमंत्र दीखकस राजा।
अमिअ रहित जनु चंदु बिराजा॥

अनुवाद (हिन्दी)

तो व्याकूळ झाल्याचे पाहून दासी त्याला कौसल्येच्या महालात घेऊन गेल्या. तेथे महाराज असे बसले होते की, जणू अमृताविना चंद्र तेजोहीन होऊन बसलेला असावा.॥ २॥

मूल (चौपाई)

आसन सयन बिभूषन हीना।
परेउ भूमितल निपट मलीना॥
लेइ उसासु सोच एहि भाँती।
सुरपुर तें जनु खँसेउ जजाती॥

अनुवाद (हिन्दी)

राजे आसन, शय्या व आभूषणे सोडून, खूप उदास होऊन जमिनीवर पडले होते. ते उसासे टाकत विचार करीत होते की, जणू ययाती स्वर्गातून पतन झाल्यामुळे काळजी करीत बसला असावा.॥ ३॥

मूल (चौपाई)

लेत सोच भरि छिनुछिनु छाती।
जनु जरि पंख परेउ संपाती॥
राम राम कहराम सनेही।
पुनि कह राम लखन बैदेही॥

अनुवाद (हिन्दी)

राजे क्षणोक्षणी मनातून काळजी करीत होते. गृध्रराज जटायूचा भाऊ संपाती पंख जळून गेल्यावर जसा पडला होता, तशी राजाची विकल दशा झाली होती. राजे वारंवार ‘राम, राम’, ‘हे प्रिय राम’ म्हणत होते. नंतर ‘हे राम, हे लक्ष्मण व हे जानकी’ असे म्हणू लागत.॥ ४॥