२६ मासपारायण, सतरावा विश्राम

मूल (चौपाई)

अमर नाग किंनर दिसिपाला।
चित्रकूट आए तेहि काला॥
राम प्रनामु कीन्ह सब काहू।
मुदित देव लहि लोचन लाहू॥

अनुवाद (हिन्दी)

त्यावेळी देव, नाग, किन्नर आणि दिक्पाल हे चित्रकूटावर आले आणि श्रीरामांनी त्यांना प्रणाम केला. डोळ्यांचे पारणे फिटल्यामुळे देव आनंदित झाले.॥ १॥

मूल (चौपाई)

बरषि सुमन कहदेव समाजू।
नाथ सनाथ भए हम आजू॥
करि बिनती दुखदुसह सुनाए।
हरषित निज निज सदन सिधाए॥

अनुवाद (हिन्दी)

फुले उधळीत देवांनी म्हटले, ‘हे नाथ, आज तुमच्या दर्शनाने आम्ही सनाथ झालो.’ त्यानंतर त्यांनी आपली असह्य दुःखे सांगितली आणि दुःखाचा नाश करण्याचे आश्वासन श्रीरामांच्याकडून मिळवून आनंदाने ते आपापल्या स्थानी निघून गेले.॥ २॥

मूल (चौपाई)

चित्रकूट रघुनंदनु छाए।
समाचार सुनि सुनि मुनि आए॥
आवत देखि मुदित मुनिबृंदा।
कीन्ह दंडवत रघुकुलचंदा॥

अनुवाद (हिन्दी)

श्रीरघुनाथ हे चित्रकूटावर रहात आहेत, ही वार्ता ऐकून पुष्कळसे मुनी आले. रघुकुलाचे चंद्र असलेल्या श्रीरामांनी आनंदित झालेल्या मुनि-मंडळींना येत असल्याचे पाहून दंडवत प्रणाम केला.॥ ३॥

मूल (चौपाई)

मुनि रघुबरहि लाइ उर लेहीं।
सुफल होन हित आसिष देहीं॥
सिय सौमित्रि रामछबि देखहिं।
साधन सकल सफल करि लेखहिं॥

अनुवाद (हिन्दी)

मुनिगणांनी श्रीरामांना हृदयाशी धरले आणि यशस्वी होण्याचा आशीर्वाद दिला. सीता, लक्ष्मण आणि श्रीराम यांचे लावण्य त्यांनी पाहिले व आपल्या सर्व साधनांचे साफल्य झाले, असे त्यांना वाटले.॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

जथाजोग सनमानि प्रभु बिदा किए मुनिबृंद।
करहिं जोग जप जाग तप निज आश्रमन्हि सुछंद॥ १३४॥

अनुवाद (हिन्दी)

प्रभू श्रीरामांनी मुनी मंडळींचा यथायोग्य सन्मान करून त्यांना निरोप दिला. श्रीराम आल्यामुळे ते सर्व आपापल्या आश्रमांमध्ये आता निर्धास्तपणे योग, जप, यज्ञ व तप करू लागले.॥ १३४॥

मूल (चौपाई)

यह सुधि कोल किरातन्ह पाई।
हरषे जनु नव निधि घर आई॥
कंद मूल फल भरि भरि दोना।
चले रंक जनु लूटन सोना॥

अनुवाद (हिन्दी)

श्रीरामांच्या आगमनाची वार्ता जेव्हा कोल व भिल्ल या लोकांना मिळाली, तेव्हा ते असे आनंदित झाले की, जणू नव निधी त्यांच्या घरी आले. ते द्रोणांमध्ये कंद, मुळे व फळे भरभरून घेऊन निघाले. जणू दरिद्री लोक सोने लुटायला निघाले होते.॥ १॥

मूल (चौपाई)

तिन्ह महँजिन्हदेखे दोउ भ्राता।
अपर तिन्हहि पूँछहिं मगु जाता॥
कहत सुनत रघुबीर निकाई।
आइ सबन्हि देखे रघुराई॥

अनुवाद (हिन्दी)

त्यांपैकी ज्यांनी दोघा भावांना पूर्वी पाहिले होते, त्यांना इतर लोक वाटेत जाताना त्यांच्याबद्दल विचारत होते. अशा प्रकारे श्रीरामांचे सौंदर्य सांगत-ऐकत सर्वांनी येऊन श्रीरामांचे दर्शन घेतले.॥ २॥

मूल (चौपाई)

करहिं जोहारु भेंट धरि आगे।
प्रभुहि बिलोकहिं अति अनुरागे॥
चित्र लिखेजनु जहँ तहँ ठाढ़े।
पुलक सरीर नयन जल बाढ़े॥

अनुवाद (हिन्दी)

भेटी समोर ठेवून त्यांनी जोहार केला आणि अत्यंत प्रेमाने ते प्रभूंना पहात राहिले. ते मुग्ध होऊन चित्राप्रमाणे उभे होते. त्यांचे शरीर पुलकित झाले होते आणि नेत्रांतून प्रेमाश्रूंची धार लागली होती.॥ ३॥

मूल (चौपाई)

राम सनेह मगन सब जाने।
कहि प्रिय बचन सकल सनमाने॥
प्रभुहि जोहारि बहोरि बहोरी।
बचन बिनीत कहहिं कर जोरी॥

अनुवाद (हिन्दी)

श्रीरामांनी त्यांना प्रेम-मग्न होताना पाहून त्यांच्याशी गोड बोलत त्यांचा यथोचित सन्मान केला. ते वारंवार श्रीरामांना जोहार करीत हात जोडून म्हणाले,॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

अब हम नाथ सनाथ सब भए देखि प्रभु पाय।
भाग हमारें आगमनु राउर कोसलराय॥ १३५॥

अनुवाद (हिन्दी)

हे प्रभू, तुमच्या चरणांचे दर्शन लाभल्यामुळे आता आम्ही सनाथ झालो. हे कोसलराज, आमचे मोठे भाग्य म्हणून तुमचे शुभागमन येथे झाले.॥ १३५॥

मूल (चौपाई)

धन्य भूमि बन पंथ पहारा।
जहँ जहँ नाथ पाउ तुम्ह धारा॥
धन्य बिहग मृग काननचारी।
सफल जनम भए तुम्हहि निहारी॥

अनुवाद (हिन्दी)

हे नाथ, तुमचे चरण जेथे पडले, ते पृथ्वी, वन, मार्ग आणि पर्वत धन्य होत. तुम्हांला पाहून ज्यांचा जन्म सफल झाला, ते वनात फिरणारे पक्षी व पशू धन्य होत.॥ १॥

मूल (चौपाई)

हम सबधन्य सहित परिवारा।
दीख दरसु भरि नयन तुम्हारा॥
कीन्ह बासु भल ठाउँ बिचारी।
इहाँ सकल रितु रहब सुखारी॥

अनुवाद (हिन्दी)

डोळे भरून तुमचे दर्शन घेणारे आम्ही सर्व आपल्या परिवारासह धन्य झालो आहोत. तुम्ही विचारपूर्वक मोठॺा चांगल्या ठिकाणी निवास केला आहे. येथे सर्व ऋतूंमध्ये तुम्ही सुखाने रहाल.॥ २॥

मूल (चौपाई)

हमसब भाँति करब सेवकाई।
करि केहरि अहि बाघ बराई॥
बन बेहड़ गिरि कंदर खोहा।
सब हमार प्रभु पग पग जोहा॥

अनुवाद (हिन्दी)

आम्ही सर्वप्रकारे हत्ती, सिंह, सर्प व वाघ यांच्यापासून रक्षण करून सेवा करू. हे प्रभो, येथील घनदाट वने, पर्वत, गुहा आणि दऱ्या यांची आम्हांला खडान् खडा माहिती आहे.॥ ३॥

मूल (चौपाई)

तहँतहँतुम्हहि अहेर खेलाउब।
सर निरझर जलठाउँ देखाउब॥
हम सेवक परिवार समेता।
नाथ न सकुचब आयसु देता॥

अनुवाद (हिन्दी)

आम्ही त्या स्थानी तुम्हांला शिकार खेळवू आणि तलाव, झरे आणि जलाशय दाखवू. आम्ही आमच्या कुटुंबासह तुमचे सेवक आहोत. म्हणून हे नाथ, आम्हांला आज्ञा देण्यास संकोच करू नका.’॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

बेद बचन मुनि मन अगम ते प्रभु करुना ऐन।
बचन किरातन्ह के सुनत जिमि पितु बालक बैन॥ १३६॥

अनुवाद (हिन्दी)

जे वेदांच्या वचनांना व मुनींच्या मनाला अगम्य आहेत, ते करुणाधाम श्रीराम भिल्लांचे बोलणे ऐकत होते, ज्याप्रमाणे पिता आपल्या बालकांचे वचन कौतुकाने ऐकतो.॥ १३६॥

मूल (चौपाई)

रामहि केवल प्रेमु पिआरा।
जानि लेउ जो जाननिहारा॥
राम सकल बनचरतब तोषे।
कहि मृदु बचन प्रेम परिपोषे॥

अनुवाद (हिन्दी)

श्रीरामचंद्र फक्त प्रेमाचे भुकेले आहेत. ज्याला जाणायचे असेल त्याने जाणून घ्यावे. मग श्रीरामचंद्रांनी प्रेमपूर्ण मृदू वचन बोलून त्या वनात वावरणाऱ्या सर्व लोकांना संतुष्ट केले.॥ १॥

मूल (चौपाई)

बिदा किए सिरनाइ सिधाए।
प्रभु गुन कहत सुनत घर आए॥
एहि बिधि सिय समेत दोउ भाई।
बसहिं बिपिन सुर मुनि सुखदाई॥

अनुवाद (हिन्दी)

नंतर त्यांना निरोप दिला. ते सर्व मस्तक नमवून निघाले आणि प्रभूंचे गुण सांगत-ऐकत घरी आले. अशा प्रकारे देव व मुनी यांना सुख देणारे दोघे बंधू सीतेसह वनात निवास करू लागले.॥ २॥

मूल (चौपाई)

जब तें आइरहे रघुनायकु।
तब तें भयउ बनु मंगलदायकु॥
फूलहिं फलहिं बिटप बिधि नाना।
मंजु बलित बर बेलि बिताना॥

अनुवाद (हिन्दी)

श्रीरघुनाथ वनात येऊन राहिले, तेव्हापासून वन मंगलदायक झाले. अनेक प्रकारचे वृक्ष फुलत होते व फळत होते. त्यांना बिलगलेल्या वेलींचे मंडप तयार झाले होते.॥ ३॥

मूल (चौपाई)

सुरतरु सरिस सुभायँ सुहाए।
मनहुँ बिबुध बन परिहरि आए॥
गुंज मंजुतर मधुकर श्रेनी।
त्रिबिध बयारि बहइ सुख देनी॥

अनुवाद (हिन्दी)

ते कल्पवृक्षाप्रमाणे स्वाभाविकपणे सुंदर होते. जणू ते देवांचे नंदनवन सोडून तेथे आले होते. भ्रमरांच्या पंक्ती फारच सुरेख गुंजारव करीत होत्या आणि तेथे सुखदायक शीतल, मंद, सुगंधित हवा वहात होती.॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

नीलकंठ कलकंठ सुक चातक चक्क चकोर।
भाँति भाँति बोलहिं बिहग श्रवन सुखद चित चोर॥ १३७॥

अनुवाद (हिन्दी)

मोर, कोकिळा, पोपट, चातक, चक्रवाक, चकोर इत्यादी पक्षी कानांनी सुख देणारे व मन आकर्षित करणारे तऱ्हेतऱ्हेचे बोल बोलत होते.॥ १३७॥

मूल (चौपाई)

करि केहरि कपि कोल कुरंगा।
बिगतबैर बिचरहिं सब संगा॥
फिरत अहेर राम छबि देखी।
होहिं मुदित मृगबृंद बिसेषी॥

अनुवाद (हिन्दी)

हत्ती, सिंह, वानर, डुक्कर आणि हरीण हे सर्व परस्पर वैरभाव सोडून बरोबरीने वावरत होते. वनात फिरत असताना श्रीरामांचे सौंदर्य पाहून पशूंचे ते कळप विशेष आनंदित होत होते.॥ १॥

मूल (चौपाई)

बिबुध बिपिन जहँ लगि जग माहीं।
देखि रामबनु सकल सिहाहीं॥
सुरसरि सरसइदिनकर कन्या।
मेकलसुता गोदावरि धन्या॥

अनुवाद (हिन्दी)

जगात जितकी म्हणून देवांची वने आहेत, ती सर्व श्रीरामचंद्रांचे हे वन पाहून समाधान पावत. गंगा, सरस्वती, सूर्यकुमारी यमुना, नर्मदा, गोदावरी इत्यादी धन्य नद्या,॥ २॥

मूल (चौपाई)

सब सर सिंधु नदीं नद नाना।
मंदाकिनि कर करहिं बखाना॥
उदय अस्त गिरि अरु कैलासू।
मंदर मेरु सकल सुरबासू॥

अनुवाद (हिन्दी)

सर्व तलाव, समुद्र, नद्या आणि अनेक नद हे सर्व मंदाकिनीचे महात्म्य सांगत होते. उदयाचल, अस्ताचल, कैलास, मंदराचल आणि सुमेरू इत्यादी सर्व जे देवांचे निवासस्थान असलेले पर्वत आहेत,॥ ३॥

मूल (चौपाई)

सैल हिमाचल आदिक जेते।
चित्रकूट जसु गावहिं तेते॥
बिंधि मुदित मन सुखुन समाई।
श्रम बिनु बिपुल बड़ाई पाई॥

अनुवाद (हिन्दी)

आणि हिमाचल इत्यादी जितके पर्वत आहेत, ते सर्व चित्रकूटाची कीर्ती गाऊ लागले. विंध्याचल मोठा आनंदित होता, त्याच्या मनात आनंदमावत नव्हता, कारण विनासायास त्याला फार मोठे महात्म्य प्राप्त झाले होते.॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

चित्रकूट के बिहग मृग बेलि बिटप तृन जाति।
पुन्य पुंज सब धन्य अस कहहिं देव दिन राति॥ १३८॥

अनुवाद (हिन्दी)

चित्रकूटातील पक्षी, पशू, वेल, वृक्ष, तृणांकुर इत्यादी सर्व जातीचे प्राणी व वनस्पती पुण्याच्या राशी होत व धन्य होत, असे देव रात्रंदिवस म्हणत होते.॥ १३८॥

मूल (चौपाई)

नयनवंत रघुबरहि बिलोकी।
पाइ जनम फल होहिं बिसोकी॥
परसिचरनरज अचर सुखारी।
भए परम पद के अधिकारी॥

अनुवाद (हिन्दी)

डोळे असणारे जीव श्रीरामचंद्रांना पाहून जन्माचे साफल्य लाभल्यामुळे शोकरहित होत होते. पर्वत, वृक्ष, भूमी, नदी इत्यादी अचर हे भगवंतांच्या चरण-रजाच्या स्पर्शाने सुखी झाले. तसेच ते सर्वच मोक्षाचे अधिकारी बनले.॥ १॥

मूल (चौपाई)

सो बनु सैलु सुभायँ सुहावन।
मंगलमय अति पावन पावन॥
महिमा कहि अकवनिबिधि तासू।
सुखसागर जहँ कीन्ह निवासू॥

अनुवाद (हिन्दी)

ते वन आणि पर्वत हे स्वाभाविकपणे सुंदर, मंगलमय आणि अत्यंत पवित्र असणाऱ्यांनाही पवित्र बनविणारे होते. जेथे सुख-सागर असलेल्या श्रीरामांनी निवास केला आहे, त्या स्थानांचा महिमा कसा सांगता येईल?॥ २॥

मूल (चौपाई)

पय पयोधि तजि अवध बिहाई।
जहँ सिय लखनु रामु रहे आई॥
कहि न सकहिं सुषमाजसि कानन।
जौं सत सहस होहिं सहसानन॥

अनुवाद (हिन्दी)

क्षीरसागर व अयोध्या यांचा त्याग करून सीता, लक्ष्मण आणि रामचंद्र जेथे येऊन राहिले, त्या वनाची परम शोभा अशी आहे की, हजार मुखांचे लाखो शेष असले, तरी तेही सांगू शकणार नाहीत.॥ ३॥

मूल (चौपाई)

सोमैं बरनि कहौं बिधि केहीं।
डाबर कमठ कि मंदर लेहीं॥
सेवहिं लखनुकरम मन बानी।
जाइ न सीलु सनेहु बखानी॥

अनुवाद (हिन्दी)

मग मी कसा त्याचे वर्णन करू शकेन? तलावामधील कासव हे मंदराचलाला उचलू शकेल काय? लक्ष्मण हा मन, वचन आणि कर्माने श्रीरामांची सेवा करीत होता. त्याचा स्वभाव व स्नेह यांचे वर्णनच करता येत नाही.॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

छिनु छिनु लखि सिय राम पद जानि आपु पर नेहु।
करत न सपनेहुँ लखनु चितु बंधु मातु पितु गेहु॥ १३९॥

अनुवाद (हिन्दी)

क्षणोक्षणी श्रीसीतारामांच्या चरणांच्या दर्शनामुळे आणि स्वतःवर त्यांचा स्नेह असलेला बघून लक्ष्मणाला स्वप्नातही भाऊ, माता-पिता व घराची आठवण येत नव्हती.॥ १३९॥

मूल (चौपाई)

राम संग सिय रहति सुखारी।
पुर परिजन गृह सुरति बिसारी॥
छिनु छिनु पिय बधु बदनु निहारी।
प्रमुदित मनहुँ चकोर कुमारी॥

अनुवाद (हिन्दी)

श्रीरामांबरोबर सीताही अयोध्यापुरी, आप्तजन आणि घर यांची आठवण विसरून सुखी होती. क्षणोक्षणी पती श्रीरामांचे चंद्रासारखे मुख पाहून चकोरी जशी चंद्रम्याला पाहून प्रसन्न असते तशी ती अतिशय प्रसन्न होत होती.॥ १॥

मूल (चौपाई)

नाह नेहुनितबढ़त बिलोकी।
हरषित रहति दिवस जिमि कोकी॥
सिय मनु रामचरन अनुरागा।
अवध सहस सम बनु प्रिय लागा॥

अनुवाद (हिन्दी)

स्वामींचे आपल्यावरील नित्य वाढत जाणारे प्रेम पाहून सीता अशी हर्षित होती की, ज्याप्रमाणे दिवसा चकवी असते. सीतेचे मन श्रीरामांच्या चरणी अनुरक्त असल्यामुळे तिला वन हे हजारो अयोध्यांसमान प्रिय वाटत होते.॥ २॥

मूल (चौपाई)

परनकुटी प्रिय प्रियतम संगा।
प्रिय परिवारु कुरंग बिहंगा॥
सासु ससुर सम मुनितिय मुनिबर।
असनु अमिअ सम कंद मूल फर॥

अनुवाद (हिन्दी)

तिला प्रियतम श्रीरामांच्या सोबतीमुळे पर्णकुटी आवडत होती. पशु-पक्षी, हे प्रिय कुटुंबियांप्रमाणे वाटत होते. मुनींच्या पत्नी या सासूसारख्या, श्रेष्ठ मुनी हे सासऱ्यासारखे वाटत होते आणि कंद-मुळे व फळे यांचा आहार तिला अमृतासारखा आवडत होता.॥ ३॥

मूल (चौपाई)

नाथ साथ साँथरी सुहाई।
मयन सयन सय सम सुखदाई॥
लोकप होहिं बिलोकत जासू।
तेहि कि मोहि सक बिषय बिलासू॥

अनुवाद (हिन्दी)

तिला स्वामींसोबत सुंदर कुश-पानांची पथारी ही शेकडो कामदेवांच्या शय्येप्रमाणे सुखकारक वाटत होती. ज्यांच्या कृपाकटाक्षामुळे जीव हे लोकपाल बनतात, त्यांना भोग-विलास कधी मोहित करू शकतील काय?॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

सुमिरत रामहि तजहिं जन तृन सम बिषय बिलासु।
रामप्रिया जग जननि सिय कछु न आचरजु तासु॥ १४०॥

अनुवाद (हिन्दी)

ज्या श्रीरामचंद्रांचे फक्त स्मरण केल्यामुळे भक्तजन सर्व भोग-विलास कस्पटासमान फेकून देतात, त्या श्रीरामांची प्रिय पत्नी आणि जगाची माता सीता हिच्यासाठी हा भोग-विलासाचा त्याग ही काही आश्चर्यकारक गोष्ट नाही.॥ १४०॥

मूल (चौपाई)

सीय लखन जेहि बिधि सुखु लहहीं।
सोइ रघुनाथ करहिं सोइ कहहीं॥
कहहिं पुरातन कथा कहानी।
सुनहिं लखनु सिय अति सुखु मानी॥

अनुवाद (हिन्दी)

सीता व लक्ष्मण यांना सुख मिळावे, म्हणून श्रीरघुनाथ तशाच प्रकारच्या गोष्टी करीत होते. ते त्यांना प्राचीन कथा व गोष्टी सांगत आणि सीता व लक्ष्मण त्या आनंदाने ऐकत.॥ १॥

मूल (चौपाई)

जब जब रामु अवध सुधि करहीं।
तब तब बारि बिलोचन भरहीं॥
सुमिरि मातु पितु परिजन भाई।
भरत सनेहु सीलु सेवकाई॥

अनुवाद (हिन्दी)

जेव्हा जेव्हा श्रीरामांना अयोध्येची आठवण येई, तेव्हा तेव्हा त्यांच्या डोळ्यांमध्ये अश्रू दाटत. माता-पिता, कुटुंबीय, बंधू व भरताचे प्रेम, शील आणि सेवाभाव आठवून,॥ २॥

मूल (चौपाई)

कृपासिंधु प्रभु होहिं दुखारी।
धीरजु धरहिं कुसमउ बिचारी॥
लख सिय लखनु बिकल होइ जाहीं।
जिमि पुरुषहि अनुसर परिछाहीं॥

अनुवाद (हिन्दी)

कृपासागर प्रभू श्रीरामचंद्र दुःखी होत, परंतु सद्या वेळ वाईट आहे, असे समजून धीर धरत. श्रीरामांना दुःखी झालेले पाहून सीता व लक्ष्मण हे सुद्धा व्याकूळ होऊन जात. ज्याप्रमाणे मनुष्याचे प्रतिबिंब (सावली) मनुष्यासारखेच वागते, त्याप्रमाणे.॥ ३॥

मूल (चौपाई)

प्रिया बंधु गति लखि रघुनंदनु।
धीर कृपाल भगत उर चंदनु॥
लगे कहन कछु कथा पुनीता।
सुनि सुखु लहहिं लखनु अरु सीता॥

अनुवाद (हिन्दी)

मग धीर, कृपाळू आणि भक्तांचे हृदय शांत करण्यासाठी चंदनरूप बनून रघुकुलाला आनंदित करणारे श्रीराम हे प्रिय पत्नी, बंधू लक्ष्मण यांची दशा पाहून काही पवित्र कथा सांगू लागत. त्या ऐकल्याने लक्ष्मण व सीता सुखी होत.॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

रामु लखन सीता सहित सोहत परन निकेत।
जिमि बासव बस अमरपुर सची जयंत समेत॥ १४१॥

अनुवाद (हिन्दी)

अमरावतीत इंद्र हे शची व पुत्र जयंतासह रहातात, त्याप्रमाणे लक्ष्मण व सीता यांच्यासह श्रीराम पर्णकुटीत शोभून दिसत होते.॥ १४१॥

मूल (चौपाई)

जोगवहिं प्रभु सिय लखनहि कैसें।
पलक बिलोचन गोलक जैसें॥
सेवहिं लखनु सीय रघुबीरहि।
जिमि अबिबेकी पुरुष सरीरहि॥

अनुवाद (हिन्दी)

ज्याप्रमाणे पापण्या डोळ्यांचे रक्षण करतात, त्याप्रमाणे प्रभू श्रीराम हे सीता व लक्ष्मण यांची काळजी घेत. तर लक्ष्मण हा सीता व रामचंद्र यांची अशी सेवा करी की, ज्याप्रमाणे अज्ञानी मनुष्य शरीराची सेवा करीत असतो.॥ १॥

मूल (चौपाई)

एहि बिधि प्रभु बन बसहिं सुखारी।
खग मृग सुर तापस हितकारी॥
कहेउँ राम बन गवनु सुहावा।
सुनहु सुमंत्र अवध जिमि आवा॥

अनुवाद (हिन्दी)

पक्षी, पशू, देवता व तपस्वी यांचे हितकारी असलेले प्रभू अशा प्रकारे सुखाने वनात निवास करीत होते. (तुलसीदास म्हणतात,) मी श्रीरामांचे झालेले सुंदर वनगमन सांगितले. आता सुमंत्र अयोध्येमध्ये आला, ती कथा ऐका.॥ २॥

मूल (चौपाई)

फिरेउ निषादु प्रभुहि पहुँचाई।
सचिव सहित रथ देखेसि आई॥
मंत्री बिकल बिलोकि निषादू।
कहि न जाइ जस भयउ बिषादू॥

अनुवाद (हिन्दी)

प्रभू श्रीरामांना पोहोचवून जेव्हा निषादराज गुह परतला, तेव्हा आल्यावर त्याला सुमंत्र रथ घेऊन उभा असल्याचे दिसले. मंत्री व्याकूळ झाल्याचे पाहून निषादाला इतके दुःख झाले की, काही सांगता येत नाही.॥ ३॥

मूल (चौपाई)

राम राम सिय लखन पुकारी।
परेउ धरनितल ब्याकुल भारी॥
देखि दखिन दिसि हय हिहिनाहीं।
जनु बिनु पंख बिहग अकुलाहीं॥

अनुवाद (हिन्दी)

निषाद एकटाच परत आल्याचे पाहून सुमंत्र ‘हे रामा, हे रामा, हे सीते, हे लक्ष्मणा’ असे पुकारत फार व्याकूळ होऊन जमिनीवर पडला. रथाचे घोडे दक्षिण दिशेकडे पहात खिंकाळत होते. पंख नसलेले पक्षी व्याकूळ होतात, त्याप्रमाणे तेसुद्धा व्याकूळ होते.॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

नहिं तृन चरहिं न पिअहिं जलु मोचहिं लोचन बारि।
ब्याकुल भए निषाद सब रघुबर बाजि निहारि॥१४२॥

अनुवाद (हिन्दी)

ते गवत खात नव्हते, पाणी पीत नव्हते. त्यांच्या डोळ्यांतून फक्तपाणी वहात होते. श्रीरामांच्या घोडॺांची दशा पाहून सर्व निषाद व्याकूळ झाले.॥ १४२॥

मूल (चौपाई)

धरि धीरजु तब कहइ निषादू।
अब सुमंत्र परिहरहु बिषादू॥
तुम्ह पंडित परमारथ ग्याता।
धरहु धीर लखि बिमुख बिधाता॥

अनुवाद (हिन्दी)

तेव्हा धीर धरून निषादराज म्हणू लागला, ‘हे सुमंत्र, आता खेद सोडून द्या. तुम्ही विद्वान व परमार्थ जाणणारे आहात. दैव प्रतिकूल आहे, असे समजून स्वतःला सावरा.’॥ १॥

मूल (चौपाई)

बिबिधि कथा कहि कहि मृदु बानी।
रथ बैठारेउ बरबस आनी॥
सोक सिथिल रथु सकइ न हाँकी।
रघुबर बिरह पीर उर बाँकी॥

अनुवाद (हिन्दी)

गोड बोलून तऱ्हेतऱ्हेच्या कथा सांगून निषादाने सुमंत्राला बळेच रथात बसविले. परंतु शोकामुळे त्याच्यामध्ये रथ हाकण्याचे त्राणही उरले नव्हते. त्याच्या मनात श्रीरामांच्या विरहाची मोठी तीव्र वेदना होती.॥ २॥

मूल (चौपाई)

चरफराहिं मग चलहिंन घोरे।
बन मृग मनहुँ आनि रथ जोरे॥
अढ़ुकि परहिं फिरि हेरहिं पीछें।
राम बियोगि बिकल दुख तीछें॥

अनुवाद (हिन्दी)

घोडे तडफडत होते आणि वाटेवर धड चालत नव्हते. असे वाटत होते की, जंगलातले पशू आणून रथाला जोडले असावेत. श्रीरामांच्या विरहामुळे घोडे कधी ठोकर खाऊन पडत होते. कधी वळून मागे पहात होते. दुःखाने ते फार व्याकूळ झाले होते.॥ ३॥

मूल (चौपाई)

जो कह रामुलखनु बैदेही।
हिंकरि हिंकरि हित हेरहिं तेही॥
बाजि बिरह गति कहि किमि जाती।
बिनु मनि फनिक बिकल जेहि भाँती॥

अनुवाद (हिन्दी)

जर कुणी राम, लक्ष्मण किंवा सीता यांचे नाव घेतले तर त्याच्याकडे घोडे खिंकाळून प्रेमाने पहात होते. घोडॺांची दशा काय वर्णावी? ते मण्याविना व्याकूळ झालेल्या सापाप्रमाणे झाले होते.॥ ४॥