२५ चित्रकूटामध्ये निवास

दोहा

मूल (दोहा)

चित्रकूट महिमा अमित कही महामुनि गाइ।
आइ नहाए सरित बर सिय समेत दोउ भाइ॥ १३२॥

अनुवाद (हिन्दी)

महामुनी वाल्मीकींनी चित्रकूट पर्वताचा अपार महिमा वर्णन करून सांगितला. तेव्हा सीतेसह दोघा भावांनी येऊन श्रेष्ठ नदी मंदाकिनीमध्ये स्नान केले.॥ १३२॥

मूल (चौपाई)

रघुबर कहेउ लखन भल घाटू।
करहु कतहुँ अब ठाहर ठाटू॥
लखन दीखपय उतर करारा।
चहुँ दिसि फिरेउ धनुष जिमि नारा॥

अनुवाद (हिन्दी)

श्रीरामचंद्र म्हणाले, ‘लक्ष्मणा, फार चांगला घाट आहे. आता येथेच कुठेतरी राहाण्याची व्यवस्था कर.’ तेव्हा लक्ष्मणाने पयस्विनी नदीच्या उत्तरेकडील उंच किनारा पाहिला. आणि म्हटले, ‘याच्या चोहीकडे धनुष्यासारखा वळण घेतलेला ओढा आहे.॥ १॥

मूल (चौपाई)

नदी पनच सर सम दम दाना।
सकल कलुष कलि साउज नाना॥
चित्रकूट जनु अचल अहेरी।
चुकइ न घात मार मुठभेरी॥

अनुवाद (हिन्दी)

मंदाकिनी नदी त्या धनुष्याची प्रत्यंचा आहे आणि शम, दम, दान हे बाण आहेत. कलियुगातील सर्व पापे ही अनेक हिंस्र पशू आहेत. चित्रकूट हा जणू स्थिर शिकारी आहे. त्याचा नेम कधी चुकत नाही. तो समोरासमोर मारतो.’॥ २॥

मूल (चौपाई)

अस कहि लखन ठाउँ देखरावा।
थलु बिलोकि रघुबर सुखु पावा॥
रमेउ राम मनु देवन्ह जाना।
चले सहित सुर थपति प्रधाना॥

अनुवाद (हिन्दी)

असे म्हणून लक्ष्मणाने ते स्थान दाखविले. ते स्थान पाहून श्रीरामांना बरे वाटले. जेव्हा देवांना कळले की, येथे श्रीरामांचे मन रमले आहे, तेव्हा ते देवांचा मुख्य स्थापत्य विशारद विश्वकर्मा याला बरोबर घेऊन तेथे आले.॥ ३॥

मूल (चौपाई)

कोल किरात बेष सब आए।
रचे परन तृन सदन सुहाए॥
बरनि न जाहिंमंजु दुइ साला।
एक ललित लघु एक बिसाला॥

अनुवाद (हिन्दी)

सर्व देव कोल व भिल्लांच्या रूपाने आले आणि त्यांनी दिव्य पानांनी व गवतांनी सुंदर घरे बनविली. दोन सुंदर कुटी बनविल्या. त्यांचे वर्णन करणे शक्य नाही. त्यांमध्ये एक फार सुंदर अशी छोटीशी कुटी होती आणि दुसरी मोठी.॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

लखन जानकी सहित प्रभु राजत रुचिर निकेत।
सोह मदनु मुनि बेष जनु रति रितुराज समेत॥ १३३॥

अनुवाद (हिन्दी)

लक्ष्मण आणि जानकीसह प्रभू रामचंद्र सुंदर गवत-पानांच्या घरांमध्ये शोभून दिसत होते. जणू कामदेवच मुनीचा वेष धारण करून पत्नी रती व वसंत ऋतूसह शोभत होता.॥ १३३॥