२२ वनवासींचे प्रेम

दोहा

मूल (दोहा)

तब रघुबीर अनेक बिधि सखहि सिखावनु दीन्ह।
राम रजायसु सीस धरि भवन गवनु तेइँ कीन्ह॥ १११॥

अनुवाद (हिन्दी)

मग श्रीरामचंद्रांनी मित्र गुहाला अनेक तऱ्हेने परत जाण्यासाठी समजून सांगितले. श्रीरामांची आज्ञा शिरोधार्य मानून तो घरी परतला.॥ १११॥

मूल (चौपाई)

पुनि सियँ राम लखन कर जोरी।
जमुनहि कीन्ह प्रनामु बहोरी॥
चले ससीय मुदित दोउ भाई।
रबितनुजा कइ करत बड़ाई॥

अनुवाद (हिन्दी)

सीता, राम व लक्ष्मण यांनी हात जोडून यमुनेला पुन्हा प्रणाम केला आणि सूर्यकन्या यमुनेची स्तुती करीत ते दोघे भाऊ सीतेसह प्रसन्न होऊन पुढे निघाले.॥ १॥

मूल (चौपाई)

पथिक अनेक मिलहिं मग जाता।
कहहिं सप्रेम देखि दोउ भ्राता॥
राज लखन सब अंग तुम्हारें।
देखि सोचु अति हृदय हमारें॥

अनुवाद (हिन्दी)

वाटेमध्ये जाताना त्यांना पुष्कळ यात्रेकरू भेटले. त्या दोघा भावांना पाहून ते प्रेमाने म्हणत की, ‘तुमच्या अंगावरील सर्व राजचिन्हे पाहून आमच्या मनात मोठी शंका येते.॥ २॥

मूल (चौपाई)

मारग चलहु पयादेहि पाएँ।
ज्योतिषु झूठ हमारें भाएँ॥
अगमु पंथु गिरिकानन भारी।
तेहि महँ साथ नारि सुकुमारी॥

अनुवाद (हिन्दी)

अशी राजचिन्हे असताना तुम्ही पायी चालत आहात. यावरून असे वाटते की, ज्योतिषशास्त्र खोटे असले पाहिजे. दाट जंगले व मोठमोठॺा पर्वतांमधील दुर्गम रस्ते आहेत. त्याशिवाय तुमच्यासोबत नाजुक स्त्री आहे.॥ ३॥

मूल (चौपाई)

करि केहरि बन जाइ न जोई।
हम सँग चलहिं जो आयसु होई॥
जाब जहाँ लगितहँ पहुँचाई।
फिरब बहोरि तुम्हहि सिरु नाई॥

अनुवाद (हिन्दी)

हत्ती आणि सिंह यांनी भरलेले हे भयानक वन पहावतसुद्धा नाही. जर आज्ञा असेल, तर आम्ही सोबतीने येऊ. जिथे जायचे आहे, तेथे तुम्हांला पोहोचवून आणि प्रणाम करून आम्ही परत जाऊ.’॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

एहि बिधि पूँछहिं प्रेम बस पुलक गात जलु नैन।
कृपासिंधु फेरहिं तिन्हहि कहि बिनीत मृदु बैन॥ ११२॥

अनुवाद (हिन्दी)

अशा प्रकारे ते यात्रेकरू प्रेमाने पुलकित होऊन व डोळ्यांत प्रेमाश्रू आणून विचारत, परंतु कृपासिंधू श्रीरामचंद्र विनयाने मृदू बोलून त्यांना परत पाठवून देत.॥ ११२॥

मूल (चौपाई)

जे पुरगाँव बसहिं मग माहीं।
तिन्हहि नाग सुर नगर सिहाहीं॥
केहि सुकृतीं केहि घरीं बसाए।
धन्य पुन्यमय परम सुहाए॥

अनुवाद (हिन्दी)

नाग व देव हे वाटेतील गाव, वाडॺा यांची प्रशंसा व हेवा करीत होते आणि लालसेने म्हणत होते की, कोणत्या पुण्यवानाने, कोणत्या शुभ क्षणी यांना बनविले असावे? कारण, हे श्रीराम आज ज्यांमधून जात आहेत, ते निवास किती धन्य व परम सुंदर झाले आहेत!॥ १॥

मूल (चौपाई)

जहँजहँ राम चरन चलि जाहीं।
तिन्ह समान अमरावति नाहीं॥
पुन्यपुंज मग निकट निवासी।
तिन्हहि सराहहिं सुरपुरबासी॥

अनुवाद (हिन्दी)

जिथे जिथे श्रीरामांची पावले पडत होती, त्या स्थानाइतकी इंद्राची अमरावतीही पवित्र नाही. वाटेजवळ राहणारे सुद्धा पुण्यात्मे होत. स्वर्गातील देवसुद्धा त्यांची स्तुती करीत होते.॥ २॥

मूल (चौपाई)

जे भरिनयन बिलोकहिं रामहि।
सीता लखन सहित घनस्यामहि॥
जे सर सरित राम अवगाहहिं।
तिन्हहि देव सर सरित सराहहिं॥

अनुवाद (हिन्दी)

जे, डोळे भरून सीता आणि लक्ष्मणासह श्रीरामांचे दर्शन घेत होते, ज्या तलावांत व नद्यांमध्ये श्रीराम स्नान करीत, त्यांची थोरवी देव सरोवरे व देवनद्याही करीत होत्या.॥ ३॥

मूल (चौपाई)

जेहि तरु तर प्रभुबैठहिं जाई।
करहिं कलपतरु तासु बड़ाई॥
परसि राम पद पदुम परागा।
मानति भूमि भूरि निज भागा॥

अनुवाद (हिन्दी)

ज्या वृक्षाखाली प्रभू राम जाऊन बसत, त्यांची प्रशंसा कल्पवृक्षसुद्धा करी. श्रीरामचंद्रांच्या चरण-कमलांच्या धुळीचा स्पर्श होणे, हे पृथ्वी आपले सौभाग्य समजत होती.॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

छाँह करहिं घन बिबुधगन बरषहिं सुमन सिहाहिं।
देखत गिरि बन बिहग मृग रामु चले मग जाहिं॥ ११३॥

अनुवाद (हिन्दी)

वाटेत ढग दाटून सावली तयार करीत. देव पुष्पे उधळून तृप्त होत. श्रीराम पर्वत, वने, पशू, पक्षी यांना पहात पहात वाटेने जात होते.॥ ११३॥

मूल (चौपाई)

सीता लखन सहित रघुराई।
गाँव निकट जब निकसहिं जाई॥
सुनि सब बाल बृद्धनर नारी।
चलहिं तुरत गृह काजु बिसारी॥

अनुवाद (हिन्दी)

सीता व लक्ष्मण यांचेसह श्रीराम ज्या गावाजवळून जात, तेथे त्यांचे आगमन झाल्याचे ऐकताच सर्व आबाल-वृद्ध स्त्री-पुरुष आपले घर व कामधाम विसरून लगेच त्यांना पाहण्यासाठी निघत.॥ १॥

मूल (चौपाई)

राम लखन सियरूप निहारी।
पाइ नयन फलु होहिं सुखारी॥
सजल बिलोचनपुलक सरीरा।
सब भए मगन देखि दोउ बीरा॥

अनुवाद (हिन्दी)

श्रीराम, लक्ष्मण, सीता यांचे रूप पाहून त्यांच्या डोळ्यांचे पारणे फिटे व त्यांना सुख वाटे. दोघा भावांना पाहून सर्वजण प्रेमात बुडून जात. त्यांना पाहून त्या लोकांच्या डोळ्यांत पाणी येई आणि ते पुलकित होत.॥ २॥

मूल (चौपाई)

बरनि नजाइ दसा तिन्ह केरी।
लहि जनु रंकन्ह सुरमनि ढेरी॥
एकन्हएकबोलिसिख देहीं।
लोचन लाहु लेहु छन एहीं॥

अनुवाद (हिन्दी)

त्यांच्या मनःस्थितीचे वर्णन करणे कठीण. जणू दरिद्री माणसांना चिंतामणींचा ढीग सापडला असावा. ते एक दुसऱ्याला हाका मार-मारून सांगत की, या क्षणी डोळ्यांचे पारणे फेडून घ्या.॥३॥

मूल (चौपाई)

रामहि देखि एक अनुरागे।
चितवत चले जाहिं सँग लागे॥
एक नयन मग छबि उर आनी।
होहिं सिथिल तन मन बर बानी॥

अनुवाद (हिन्दी)

कुणी कुणी श्रीरामचंद्रांना पाहून इतके प्रेमात पडत की, त्यांना पहात त्यांच्याबरोबर चालू लागत. कोणी डोळ्यांनी त्यांचे रूप पाहून घेत व मनात ठेवून कायावाचामनाने मुग्ध होऊन जात.॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

एक देखि बट छाँह भलि डासि मृदुल तृन पात।
कहहिं गवाँइअ छिनुकु श्रमु गवनब अबहिं कि प्रात॥ ११४॥

अनुवाद (हिन्दी)

कोणी वडाची सावली पाहून तेथे गवत व पाने पसरून म्हणत की, थोडा वेळ येथे बसून शीण दूर करा. मग पुढे जा किंवा सकाळी जा.॥ ११४॥

मूल (चौपाई)

एक कलस भरिआनहिं पानी।
अँचइअ नाथ कहहिं मृदु बानी॥
सुनि प्रिय बचन प्रीति अति देखी।
राम कृपाल सुसील बिसेषी॥

अनुवाद (हिन्दी)

कोणी घडा भरून पाणी आणी आणि गोड शब्दांत म्हणे, ‘हे नाथ, घोटभर पाणी घ्या.’ त्यांचे प्रेमाचे बोलणे ऐकून आणि त्यांचे अत्यंत प्रेम पाहून दयाळू व परम सुशील श्रीरामचंद्रांनी,॥ १॥

मूल (चौपाई)

जानी श्रमित सीय मन माहीं।
घरिक बिलंबु कीन्ह बट छाहीं॥
मुदित नारि नर देखहिं सोभा।
रूप अनूप नयन मनु लोभा॥

अनुवाद (हिन्दी)

मनात विचार केला की, सीता थकली आहे, म्हणून त्यांनी वडाखाली थोडी विश्रांती घ्यावी. त्यावेळी स्त्री-पुरुष आनंदाने त्यांची शोभा पहात. त्यांच्या अनुपम रूपाने लोकांचे नेत्र व मन मोहित होई.॥ २॥

मूल (चौपाई)

एकटक सब सोहहिं चहुँ ओरा।
रामचंद्र मुख चंद चकोरा॥
तरुन तमाल बरन तनु सोहा।
देखत कोटि मदन मनु मोहा॥

अनुवाद (हिन्दी)

सर्वजण एकटक श्रीरामांचे चंद्रमुख चकोराप्रमाणे तन्मय होऊन पहात. तेव्हा चोहीकडे सर्व शोभून दिसत होते. श्रीरामांचे नवीन तमाल वृक्षाच्या रंगाचे श्यामल शरीर अत्यंत शोभत होते. ते पाहून कोटॺवधी कामदेवांचे मन मोहित होऊन जाई.॥ ३॥

मूल (चौपाई)

दामिनि बरनलखन सुठि नीके।
नख सिख सुभग भावते जी के॥
मुनिपट कटिन्ह कसें तूनीरा।
सोहहिं कर कमलनि धनु तीरा॥

अनुवाद (हिन्दी)

विजेसारख्या रंगाचे तेजस्वी लक्ष्मण फार चांगले वाटत होते. ते नखशिखांत सुंदर होते व मनाला फार आह्लाद देत. दोघांनी वल्कले इत्यादी वस्त्रे घातली होती आणि कमरेला भाते बांधले होते. कमलां-सारख्या त्यांच्या हातात धनुष्य-बाण शोभून दिसत होते.॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

जटा मुकुट सीसनि सुभग उर भुज नयन बिसाल।
सरद परब बिधु बदन बर लसत स्वेद कन जाल॥ ११५॥

अनुवाद (हिन्दी)

त्यांच्या शिरांवर सुंदर जटा-जूट होते. वक्षःस्थल, भुजा आणि नेत्र विशाल होते आणि शरद पौर्णिमेच्या चंद्रासमान सुंदर मुखांवर स्वेदबिंदूंची झळकणारी शोभा होती.॥ ११५॥

मूल (चौपाई)

बरनि न जाइ मनोहर जोरी।
सोभा बहुत थोरि मति मोरी॥
राम लखन सिय सुंदरताई।
सब चितवहिं चित मन मति लाई॥

अनुवाद (हिन्दी)

त्या मनोहर जोडीचे वर्णन मला करता येणार नाही, कारण त्यांचीशोभा अपार आहे आणि माझी बुद्धी अल्प आहे. श्रीराम, लक्ष्मण व सीता यांचे सौंदर्य सर्वजण मन, चित्त व बुद्धीने तन्मय होऊन पहात होते.॥ १॥

मूल (चौपाई)

थके नारि नर प्रेम पिआसे।
मनहुँ मृगी मृग देखि दिआ से॥
सीय समीप ग्रामतिय जाहीं।
पूँछत अति सनेहँ सकुचाहीं॥

अनुवाद (हिन्दी)

गावातील ते प्रेमाचे भुकेले स्त्री-पुरुष तिघांच्या सौंदर्य-माधुर्याची छटा पाहून असे थक्क होत होते की, दिवा पाहून जसे हरीण-हरिणी स्तब्ध होऊन जातात. गावातील स्त्रिया सीतेजवळ जात, परंतु अत्यंत प्रेमामुळे काही विचारताना संकोच पावत.॥ २॥

मूल (चौपाई)

बार बार सब लागहिं पाएँ।
कहहिं बचन मृदु सरल सुभाएँ॥
राजकुमारि बिनय हम करहीं।
तिय सुभायँ कछु पूँछत डरहीं॥

अनुवाद (हिन्दी)

वारंवार तिच्या पाया पडत आणि सहजपणे साध्याभोळ्या भाषेत म्हणत, ‘हे राजकुमारी, आम्हांला काही विचारायचे आहे, परंतु स्त्री-स्वभावामुळे काही विचारायचे म्हटले, तर लाज वाटते.॥ ३॥

मूल (चौपाई)

स्वामिनि अबिनयछमबि हमारी।
बिलगु न मानब जानि गवाँरी॥
राजकुअँर दोउ सहज सलोने।
इन्ह तें लही दुति मरकत सोने॥

अनुवाद (हिन्दी)

हे स्वामिनी, आमच्या धारिष्टॺाबद्दल आम्हांला क्षमा करा. आम्ही गावंढळ आहोत, असे समजून वाईट वाटून घेऊ नका. हे दोन्ही राजकुमार स्वभावतः लावण्यमय आहेत. पाचूने व सुवर्णाने यांच्यापासूनच कांती मिळविली आहे.॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

स्यामल गौर किसोर बर सुंदर सुषमा ऐन।
सरद सर्बरीनाथ मुखु सरद सरोरुह नैन॥ ११६॥

अनुवाद (हिन्दी)

हे श्याम व गौर वर्णाचे दोघे सुंदर किशोर अवस्थेत आहेत. दोघेही परम सुंदर व शोभेचे माहेरघर आहेत. शरदपौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे यांचे मुख व शरद ऋतूतील कमळासारखे यांचे नेत्र आहेत.’॥ ११६॥