२० श्रीराम-भरद्वाज-संवाद

दोहा

मूल (दोहा)

तब गनपति सिव सुमिरि प्रभु नाइ सुरसरिहि माथ।
सखा अनुज सिय सहित बन गवनु कीन्ह रघुनाथ॥ १०४॥

अनुवाद (हिन्दी)

मग श्रीरघुनाथांनी गजानन आणि शिव यांचे स्मरण करून तसेच गंगेला नमस्कार करून मित्र निषादराज, बंधू लक्ष्मण व सीता यांच्यासह ते वनात निघाले.॥ १०४॥

मूल (चौपाई)

तेहि दिन भयउ बिटप तर बासू।
लखन सखाँ सब कीन्ह सुपासू॥
प्रात प्रातकृत करि रघुराई।
तीरथराजु दीख प्रभु जाई॥

अनुवाद (हिन्दी)

त्यादिवशी त्यांनी झाडाखाली निवास केला. लक्ष्मण व गुह यांनी विश्रांतीची चांगली व्यवस्था केली. प्रभू श्रीरामचंद्रांनी प्रातःकाली सर्व कर्मे आटोपून तीर्थराज प्रयागाचे दर्शन घेतले.॥ १॥

मूल (चौपाई)

सचिव सत्य श्रद्धा प्रिय नारी।
माधव सरिस मीतु हितकारी॥
चारि पदारथ भरा भँडारू।
पुन्य प्रदेस देस अति चारू॥

अनुवाद (हिन्दी)

त्या तीर्थराजाचा सत्य हा मंत्री आहे. श्रद्धा ही त्याची प्रिय पत्नी आहे आणि श्रीवेणीमाधव यांच्यासारखे हितकारक मित्र आहेत. त्याचे भांडार धर्मादी चार पदार्थांनी भरले आहे आणि पुण्यमय प्रांत हाच त्या राजाचा सुंदर देश आहे.॥ २॥

मूल (चौपाई)

छेत्रु अगम गढ़ु गाढ़ सुहावा।
सपनेहुँ नहिं प्रतिपच्छिन्ह पावा॥
सेन सकल तीरथबर बीरा।
कलुष अनीक दलन रनधीरा॥

अनुवाद (हिन्दी)

प्रयाग क्षेत्र हे दुर्गम, मजबूत आणि सुंदर किल्ला आहे. स्वप्नातही पापरूपी शत्रू त्याला जिंकू शकत नाहीत. संपूर्ण तीर्थे हे त्याचे वीर व श्रेष्ठ सैन्य आहे. ते पापाची सेना चिरडून टाकणारे व रणधीर आहे.॥ ३॥

मूल (चौपाई)

संगमु सिंहासनु सुठि सोहा।
छत्रु अखयबटु मुनि मनु मोहा॥
चवँर जमुन अरु गंग तरंगा।
देखि होहिं दुख दारिद भंगा॥

अनुवाद (हिन्दी)

गंगा, यमुना व सरस्वती यांचा संगम हाच त्याचे अत्यंत सुशोभित सिंहासन आहे. अक्षयवट हा छत्र आहे. तो मुनींच्या मनास मोहित करून टाकतो. यमुना व गंगा यांच्या लाटा या श्याम व शुभ्र चामरे आहेत. त्यांचे दर्शन होताच दुःख आणि दारिद्रॺ नष्ट होते.॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

सेवहिं सुकृती साधु सुचि पावहिं सब मनकाम।
बंदी बेद पुरान गन कहहिं बिमल गुन ग्राम॥ १०५॥

अनुवाद (हिन्दी)

पुण्यात्मे व पवित्र साधू त्याची सेवा करतात आणि त्यांचे सर्व मनोरथ पूर्ण होतात. वेद आणि पुराणांचे समूह हे भाट होत. ते त्याच्या निर्मल गुणांचे गायन करतात.॥ १०५॥

मूल (चौपाई)

को कहि सकइ प्रयाग प्रभाऊ।
कलुष पुंज कुंजर मृगराऊ॥
अस तीरथ पति देखि सुहावा।
सुख सागर रघुबर सुखु पावा॥

अनुवाद (हिन्दी)

पापांच्या समूहरूपी हत्तीला मारण्यासाठी सिंंहरूप असलेल्या प्रयागराजाचे माहात्म्य कोण सांगू शकणार? अशा सुंदर तीर्थराजाचे दर्शन घेऊन सुख-सागर रघुकुलश्रेष्ठ श्रीरामांनासुद्धा सुख झाले.॥ १॥

मूल (चौपाई)

कहि सिय लखनहि सखहि सुनाई।
श्रीमुख तीरथराज बड़ाई॥
करि प्रनामु देखत बन बागा।
कहत महातम अति अनुरागा॥

अनुवाद (हिन्दी)

त्यांनी आपल्या श्रीमुखाने सीता, लक्ष्मण व गुह यांना तीर्थराज प्रयागाचा महिमा सांगितला. त्यानंतर प्रणाम करून वने व बगीचे पहात आणि मोठॺा प्रेमाने त्यांचे माहात्म्य सांगत-॥ २॥

मूल (चौपाई)

एहि बिधि आइ बिलोकी बेनी।
सुमिरत सकल सुमंगल देनी॥
मुदित नहाइ कीन्हि सिव सेवा।
पूजि जथाबिधि तीरथ देवा॥

अनुवाद (हिन्दी)

श्रीरामांनी येऊन त्रिवेणीचे दर्शन घेतले. त्रिवेणीचे स्मरण केल्यानेच सर्व सुंदर मंगल ती देते. नंतर त्यांनी त्रिवेणीमध्ये स्नान करून भगवान शिवांची पूजा केली आणि विधिपूर्वक तीर्थदेवतेंचे पूजन केले.॥ ३॥

मूल (चौपाई)

तबप्रभु भरद्वाज पहिं आए।
करत दंडवत मुनि उर लाए॥
मुनि मन मोद न कछु कहि जाई।
ब्रह्मानंद रासि जनु पाई॥

अनुवाद (हिन्दी)

स्नान-पूजा इत्यादी झाल्यावर प्रभू श्रीराम भरद्वाज ऋषींकडे आले. त्यांना दंडवत घालत असतानाच मुनींनी त्यांना हृदयाशी धरले. मुनींच्या मनाला झालेला आनंद अवर्णनीय होता. जणू त्यांना ब्रह्मानंदाचे भांडार मिळाले होते.॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

दीन्हि असीस मुनीस उर अति अनंदु अस जानि।
लोचन गोचर सुकृत फल मनहुँ किए बिधि आनि॥ १०६॥

अनुवाद (हिन्दी)

मुनीश्वर भरद्वाजांनी आशीर्वाद दिला. आज विधात्याने सीता व लक्ष्मणासह प्रभू श्रीरामचंद्रांचे दर्शन घडविले, याचा त्यांच्या मनास आनंद झाला. जणू आपल्या संपूर्ण पुण्यांचे फल त्यांच्या डोळॺांसमोर आणून उभे केले.॥ १०६॥

मूल (चौपाई)

कुसल प्रस्नकरि आसन दीन्हे।
पूजि प्रेम परिपूरन कीन्हे॥
कंद मूल फल अंकुर नीके।
दिए आनि मुनि मनहुँ अमी के॥

अनुवाद (हिन्दी)

खुशाली विचारल्यावर मुनींनी त्यांना आसन दिले, आणि प्रेमाने पूजन करून त्यांना संतुष्ट केले. नंतर जणू अमृतापासून बनविलेले चांगले कंद, मुळे, फळे व अंकुर आणून दिले.॥ १॥

मूल (चौपाई)

सीय लखन जनसहित सुहाए।
अति रुचि राम मूल फल खाए॥
भए बिगतश्रम रामु सुखारे।
भरद्वाज मृदु बचन उचारे॥

अनुवाद (हिन्दी)

सीता, लक्ष्मण व सेवक गुह यांच्यासह श्रीरामांनी ती कंदमुळे व फळे मोठॺा आवडीने खाल्ली. थकवा दूर झाल्यावर श्रीरामांना समाधान वाटले. तेव्हा भरद्वाज मुनी त्यांना मृदू वाणीने म्हणाले,॥ २॥

मूल (चौपाई)

आजुसुफलतपु तीरथ त्यागू।
आजु सुफल जप जोग बिरागू॥
सफलसकलसुभसाधन साजू।
राम तुम्हहि अवलोकत आजू॥

अनुवाद (हिन्दी)

‘हे राम, तुमचे दर्शन होताच आज माझे तप, तीर्थसेवन, त्याग, जप, योग आणि वैराग्य सफल झाले. तसेच आज माझ्या संपूर्ण शुभ साधनांचा समूहसुद्धा सफळ झाला.॥ ३॥

मूल (चौपाई)

लाभअवधिसुखअवधिन दूजी।
तुम्हरें दरस आस सब पूजी॥
अब करि कृपा देहुबर एहू।
निज पद सरसिज सहज सनेहू॥

अनुवाद (हिन्दी)

प्रभुदर्शन सोडल्यास लाभाची व सुखाची दुसरी काहीही परिसीमा नाही. तुमच्या दर्शनामुळे माझ्या सर्व आशा पूर्ण झाल्या. आता तुमच्या चरण-कमलांवर माझे मनापासून प्रेम जडावे, असे वरदान मला द्या.॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

करम बचन मन छाड़ि छलु जब लगि जनु न तुम्हार।
तब लगि सुखु सपनेहुँ नहीं किएँ कोटि उपचार॥ १०७॥

अनुवाद (हिन्दी)

जोपर्यंत काया-वाचा-मनाने कपट सोडून मनुष्य तुमचा दास होत नाही, तोपर्यंत कोटॺवधी उपाय केले, तरी त्याला स्वप्नातही सुख मिळत नाही.’॥ १०७॥

मूल (चौपाई)

सुनि मुनि बचन रामु सकुचाने।
भाव भगति आनंद अघाने॥
तब रघुबर मुनिसुजसु सुहावा।
कोटि भाँति कहि सबहि सुनावा॥

अनुवाद (हिन्दी)

मुनिवर भरद्वाजांचे बोलणे ऐकून त्यांच्या भक्तिभावामुळे आनंदाने तृप्त होऊन भगवान रामचंद्र मानवी लीला म्हणून संकोच पावले. तेव्हा आपले ऐश्वर्य गुप्त ठेवून श्रीरामांनी भरद्वाज मुनींची सुंदर कीर्ती अनेक प्रकारे सर्वांना सांगितली.॥ १॥

मूल (चौपाई)

सो बड़ सो सब गुन गन गेहू।
जेहि मुनीस तुम्ह आदर देहू॥
मुनि रघुबीर परसपर नवहीं।
बचन अगोचर सुखु अनुभवहीं॥

अनुवाद (हिन्दी)

ते म्हणाले की, ‘हे मुनीश्वर, ज्याला तुम्ही आदर द्याल, तोच मोठा आणि तोच सर्वगुणांचे घर होय.’ अशा प्रकारे श्रीराम आणि मुनी भरद्वाज हे दोघे परस्पर विनम्र होत होते आणि अनिर्वचनीय सुखाचा अनुभव घेत होते.॥ २॥

मूल (चौपाई)

यह सुधि पाइप्रयाग निवासी।
बटु तापस मुनि सिद्ध उदासी॥
भरद्वाज आश्रम सब आए।
देखन दसरथ सुअन सुहाए॥

अनुवाद (हिन्दी)

श्रीराम, लक्ष्मण, सीता यांच्या आगमनाची वार्ता मिळताच प्रयागवासी ब्रह्मचारी, तपस्वी, सिद्ध आणि संन्यासी हे सर्व दशरथांच्या सुंदर पुत्रांना पाहण्यासाठी भरद्वाजांच्या आश्रमात पोहोचले.॥ ३॥

मूल (चौपाई)

रामप्रनामकीन्ह सब काहू।
मुदित भए लहि लोयन लाहू॥
देहिं असीस परम सुखु पाई।
फिरे सराहत सुंदरताई॥

अनुवाद (हिन्दी)

श्रीरामचंद्रांनी सर्वांना प्रणाम केला. नेत्रांचे पारणे फिटल्यामुळे सर्वजण आनंदित झाले आणि त्यांनी आशीर्वाद दिले. श्रीरामांच्या लावण्याची प्रशंसा करीत ते परत गेले.॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

राम कीन्ह बिश्राम निसि प्रात प्रयाग नहाइ।
चले सहित सिय लखन जन मुदित मुनिहि सिरु नाइ॥ १०८॥

अनुवाद (हिन्दी)

श्रीरामांनी रात्री तेथे विश्रांती घेतली आणि प्रातःकाळी प्रयागराजाचे स्नान करून आणि प्रसन्न होऊन मुनींना मस्तक नमवून सीता, लक्ष्मण व गुह यांच्यासह ते पुढे निघाले.॥ १०८॥

मूल (चौपाई)

राम सप्रेम कहेउ मुनि पाहीं।
नाथ कहिअ हम केहि मग जाहीं॥
मुनि मन बिहसिरामसन कहहीं।
सुगम सकल मग तुम्ह कहुँ अहहीं॥

अनुवाद (हिन्दी)

निघताना मोठॺा प्रेमाने श्रीराम मुनींना म्हणाले, ‘मुनिवर्य! आम्ही कोणत्या वाटेने जावे, ते सांगा.’ मुनी मनात हसून म्हणाले की, ‘तुम्हांला सर्व मार्ग सुगम आहेत.’॥ १॥

मूल (चौपाई)

साथ लागि मुनिसिष्य बोलाए।
सुनि मन मुदित पचासक आए॥
सबन्हि रामपरप्रेम अपारा।
सकल कहहिं मगु दीख हमारा॥

अनुवाद (हिन्दी)

मग त्यांच्या सोबतीसाठी मुनींनी शिष्यांना बोलावले. आपल्याला श्रीरामांच्या सोबत जायचे आहे, हे ऐकून मनात आनंदित होऊन जवळ जवळ पन्नास शिष्य आले. सर्वांचे श्रीरामांच्यावर फार प्रेम होते. सर्वजण म्हणत होते की, हा मार्ग आम्हांला माहीत आहे, आम्हांला माहीत आहे.॥ २॥

मूल (चौपाई)

मुनि बटु चारि संग तब दीन्हे।
जिन्ह बहु जनम सुकृत सब कीन्हे॥
करि प्रनामु रिषि आयसु पाई।
प्रमुदित हृदयँ चले रघुराई॥

अनुवाद (हिन्दी)

तेव्हा मुनींनी निवडक चार ब्रह्मचाऱ्यांना त्यांच्यासोबत दिले, त्यांनी अनेक जन्मांत सुकृत केले होते. श्रीरघुनाथ प्रणाम करून आणि ऋषींची आज्ञा घेऊन मनात अतिशय आनंदित होऊन चालू लागले.॥ ३॥

मूल (चौपाई)

ग्रामनिकटजबनिकसहिं जाई।
देखहिं दरसु नारि नर धाई॥
होहिं सनाथ जनम फलु पाई।
फिरहिं दुखित मनु संग पठाई॥

अनुवाद (हिन्दी)

जेव्हा ते एखाद्या गावाजवळून जायचे, तेव्हा तेथील स्त्री-पुरुष त्यांचे लावण्य पहात रहात. ते जन्माचे फळ मिळाल्याने अनाथ असलेले सर्व सनाथ होत आणि मनाने श्रीरामांच्या बरोबर जाऊन शरीराने जाता येत नाही, म्हणून दुःखी होऊन परत फिरत होते.॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

बिदा किए बटु बिनय करि फिरे पाइ मन काम।
उतरि नहाए जमुन जल जो सरीर सम स्याम॥ १०९॥

अनुवाद (हिन्दी)

त्यानंतर श्रीरामांनी विनंती करून चारी ब्रह्मचाऱ्यांना निरोप दिला. ते मनोवांछित अनन्य भक्ती मिळवून परत गेले. नंतर यमुनेमध्ये उतरून सर्वांनी स्नान केले. ते जल श्रीरामांच्या शरीरासारखेच सावळे होते.॥

मूल (चौपाई)

सुनत तीरबासी नर नारी।
धाए निज निज काज बिसारी॥
लखन राम सिय सुंदरताई।
देखि करहिं निज भाग्य बड़ाई॥

अनुवाद (हिन्दी)

यमुनेच्या किनाऱ्यावर राहणारे स्त्री-पुरुष हे निषाद राजाबरोबर दोन परम सुंदर सुकुमार नवयुवक आणि एक परम सुंदर स्त्री आली आहे, हे ऐकून आपले सर्व काम विसरून धावले आणि लक्ष्मण, राम व सीता यांचे सौंदर्य पाहून आपल्या भाग्याची प्रशंसा करू लागले.॥ १॥

मूल (चौपाई)

अतिलालसा बसहिंमन माहीं।
नाउँ गाउँ बूझत सकुचाहीं॥
जे तिन्ह महुँबयबिरिध सयाने।
तिन्ह करि जुगुति रामु पहिचाने॥

अनुवाद (हिन्दी)

त्यांच्या मनात ओळख करून घेण्याची मोठी लालसा होती. परंतु नाव-गाव विचारण्यास ते संकोचत होते. त्या लोकांमध्ये जे वयोवृद्ध व चतुर होते, त्यांनी युक्तीने श्रीरामांना ओळखले.॥ २॥

मूल (चौपाई)

सकलकथातिन्हसबहि सुनाई।
बनहि चले पितु आयसु पाई॥
सुनि सबिषादसकल पछिताहीं।
रानी रायँ कीन्ह भल नाहीं॥

अनुवाद (हिन्दी)

पित्याच्या आज्ञेने हे वनात निघाले आहेत, ही गोष्ट त्यांनी सर्व लोकांना सांगितली. ते ऐकून सर्व लोकांना दुःख वाटले. राणी व राजांनी हे चांगले केले नाही, म्हणून त्यांना वाईट वाटले.॥ ३॥