१८ मासपारायण, पंधरावा विश्राम

मूल (चौपाई)

सखा समुझिअस परिहरि मोहू।
सिय रघुबीर चरन रत होहू॥
कहत राम गुन भाभिनुसारा।
जागे जग मंगल सुखदारा॥

अनुवाद (हिन्दी)

हे मित्रा, असे समजून व मोहाचा त्याग करून श्रीरामांच्या चरणी प्रेम कर.’ अशा प्रकारे श्रीरामचंद्रांचे गुण गाता गाता सकाळ झाली. तेव्हा जगाचे मंगल करणारे आणि त्याला सुख देणारे श्रीराम जागे झाले.॥ १॥

मूल (चौपाई)

सकल सौच करिराम नहावा।
सुचि सुजान बट छीर मगावा॥
अनुज सहितसिर जटा बनाए।
देखि सुमंत्र नयन जल छाए॥

अनुवाद (हिन्दी)

मुखमार्जनादी करून पवित्र आणि ज्ञानी श्रीरामचंद्रांनी स्नान केले. नंतर वडाचा चीक मागवला आणि लक्ष्मणासह त्या चिकाने डोक्यावर जटा बांधल्या. हे पाहून सुमंत्राचे नेत्र आसवांनी डबडबले.॥ २॥

मूल (चौपाई)

हृदयँ दाहुअति बदन मलीना।
कह कर जोरि बचन अति दीना॥
नाथ कहेउअस कोसलनाथा।
लै रथु जाहु राम कें साथा॥

अनुवाद (हिन्दी)

त्याच्या हृदयाला यातना झाल्या व मुख उदास झाले. तो हात जोडून अत्यंत दीनपणे म्हणाला, ‘हे नाथ, मला कोसलनाथांनी आज्ञा दिली होती, तू रथ घेऊन श्रीरामांबरोबर जा.॥ ३॥

मूल (चौपाई)

बनु देखाइ सुरसरि अन्हवाई।
आनेहु फेरि बेगि दोउ भाई॥
लखनु रामु सिय आनेहु फेरी।
संसय सकल सँकोच निबेरी॥

अनुवाद (हिन्दी)

वन दाखवून आणि गंगा-स्नान करवून दोघा भावांना त्वरित परत आण. सर्व संशय आणि संकोच दूर करून लक्ष्मण, राम व सीता यांना वनात फिरवून आण.॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

नृप अस कहेउ गोसाइँ जस कहइ करौं बलि सोइ।
करि बिनती पायन्ह परेउ दीन्ह बाल जिमि रोइ॥ ९४॥

अनुवाद (हिन्दी)

महाराज असे म्हणाले होते. आता हे प्रभू! तुम्ही जसे म्हणाल, तसेच करीन. मी माझा जीव तुमच्यावरून ओवाळून टाकतो.’ असे म्हणून सुमंत्र श्रीरामांच्या चरणांवर पडून लहान मुलाप्रमाणे ढसाढसा रडला.॥ ९४॥

मूल (चौपाई)

तात कृपाकरिकीजिअ सोई।
जातें अवध अनाथ न होई॥
मंत्रिहि राम उठाइ प्रबोधा।
तात धरम मतु तुम्ह सबु सोधा॥

अनुवाद (हिन्दी)

नंतर म्हणाला, ‘हे कुमार, ज्यामुळे अयोध्या अनाथ होणार नाही, असे करा.’ श्रीरामांनी त्याला उठवून धीर देत समजावले. ते म्हणाले, ‘हे तात, तुम्ही धर्माचे सर्व सिद्धांत जाणता.॥ १॥

मूल (चौपाई)

सिबि दधीच हरिचंद नरेसा।
सहे धरम हित कोटि कलेसा॥
रंतिदेव बलि भूप सुजाना।
धरमु धरेउ सहि संकट नाना॥

अनुवाद (हिन्दी)

शिबी, दधीची, हरिश्चंद्र यांनी धर्मासाठी अनेक कष्ट सहन केले होते. बुद्धिमान राजा रंतिदेव आणि बली यांनी अनेक संकटे सहन केली, परंतु ते धर्माला चिकटून राहिले.॥ २॥

मूल (चौपाई)

धरमु न दूसर सत्य समाना।
आगम निगम पुरान बखाना॥
मैं सोइधरमु सुलभ करि पावा।
तजें तिहूँ पुर अपजसु छावा॥

अनुवाद (हिन्दी)

वेद, शास्त्र आणि पुराणे यामध्ये म्हटले आहे की, सत्यासारखा दुसरा धर्म नाही. मला तो धर्म सहजपणे मिळाला. या सत्यरूपी धर्माचा त्याग केला, तर त्रैलोक्यात अपकीर्ती पसरेल.॥ ३॥

मूल (चौपाई)

संभावित कहुँ अपजस लाहू।
मरन कोटि सम दारुन दाहू॥
तुम्ह सन तात बहुत का कहऊँ।
दिएँ उतरु फिरि पातकु लहऊँ॥

अनुवाद (हिन्दी)

प्रतिष्ठित पुरुषाला अपकीर्ती ही कोटॺवधी मृत्यूंसारखी भीषण यातना देणारी आहे. हे तात, मी तुम्हांला जास्त काय सांगू? उलट उत्तर देण्यामुळेसुद्धा मी पापाचा भागीदार ठरत आहे.॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

पितु पद गहि कहि कोटि नति बिनय करब कर जोरि।
चिंता कवनिहु बात कै तात करिअ जनि मोरि॥ ९५॥

अनुवाद (हिन्दी)

तुम्ही जाऊन वडिलांचे चरण धरून कोटी कोटी नमस्कार करीत हात जोडून विनंती करा की, बाबा! तुम्ही माझी कोणत्याही प्रकारची काळजी करू नका.॥ ९५॥

मूल (चौपाई)

तुम्ह पुनि पितु सम अतिहित मोरें।
बिनती करउँ तात कर जोरें॥
सब बिधि सोइकरतब्य तुम्हारें।
दुख न पाव पितु सोच हमारें॥

अनुवाद (हिन्दी)

तुम्ही स्वतःसुद्धा वडिलांप्रमाणे माझे मोठे हितचिंतक आहात. म्हणून हे तात, मी हात जोडून विनंती करतो की, तुमचेही सर्वप्रकारे हेच कर्तव्य आहे की, वडिलांना आमच्या काळजीमुळे दुःख होऊ नये.’॥ १॥

मूल (चौपाई)

सुनि रघुनाथसचिव संबादू।
भयउ सपरिजन बिकल निषादू॥
पुनि कछु लखन कही कटु बानी।
प्रभु बरजे बड़ अनुचित जानी॥

अनुवाद (हिन्दी)

श्रीरघुनाथ आणि सुमंत्र यांचा हा संवाद ऐकून निषादराज आपल्या कुटुंबासह व्याकूळ झाला. मग लक्ष्मण काहीशा कडवटपणे बोलला, प्रभू रामचंद्रांना ते फारच अयोग्य वाटले. म्हणून त्यांनी त्याला अडवले.॥ २॥

मूल (चौपाई)

सकुचि राम निज सपथ देवाई।
लखन सँदेसु कहिअ जनि जाई॥
कह सुमंत्रु पुनि भूप सँदेसू।
सहि न सकिहि सिय बिपिन कलेसू॥

अनुवाद (हिन्दी)

श्रीरामचंद्रांनी नम्रतापूर्वक स्वतःची शपथ घालून सुमंत्रांना सांगितले की, ‘तुम्ही लक्ष्मणाचे हे बोलणे सांगू नका.’ सुमंत्राने पुन्हा राजांचा निरोप सांगितला की, ‘सीता वनातील क्लेश सहन करू शकणार नाही.॥ ३॥

मूल (चौपाई)

जेहिबिधिअवधआवफिरि सीया।
सोइ रघुबरहि तुम्हहि करनीया॥
नतरु निपट अवलंब बिहीना।
मैं न जिअब जिमि जल बिनु मीना॥

अनुवाद (हिन्दी)

म्हणून ती अयोध्येला परत येईल, असे तुम्ही व श्रीराम यांनी प्रयत्न करावेत. नाही तर मी अत्यंत निराधार होऊन पाण्याविना मासा जसा जगू शकत नाही, तसा जगू शकणार नाही.॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

मइकें ससुरें सकल सुख जबहिं जहाँ मनु मान।
तहँ तब रहिहि सुखेन सिय जब लगि बिपति बिहान॥ ९६॥

अनुवाद (हिन्दी)

सीतेच्या माहेरी व सासरी सर्व सुखे आहेत. जोपर्यंत हे संकट टळत नाही, तोपर्यंत तिला हवे, तेथे ती सुखाने राहील.॥ ९६॥

मूल (चौपाई)

बिनती भूपकीन्ह जेहि भाँती।
आरति प्रीति न सो कहि जाती॥
पितु सँदेसु सुनि कृपानिधाना।
सियहि दीन्ह सिख कोटि बिधाना॥

अनुवाद (हिन्दी)

राजांनी ज्या दीनपणे व प्रेमाने विनंती केली आहे, तो दीनपणा व प्रेम सांगण्याच्या पलीकडे आहे.’ कृपानिधान श्रीरामांनी पित्याचा संदेश ऐकल्यावर सीतेला अनेक प्रकारे समजावले.॥१॥

मूल (चौपाई)

सासु ससुरगुर प्रिय परिवारू।
फिरहु त सब कर मिटै खभारू॥
सुनिपति बचन कहति बैदेही।
सुनहु प्रानपति परम सनेही॥

अनुवाद (हिन्दी)

ते म्हणाले, ‘तू घरी परत जाशील, तर सासू, सासरे, गुरू, प्रियजन अणि कुटुंबीय या सर्वांची काळजी दूर होईल.’ पतीचे बोलणे ऐकून जानकी म्हणाली, ‘हे पतिराज, हे परमस्नेही, ऐका.॥ २॥

मूल (चौपाई)

प्रभु करुनामय परम बिबेकी।
तनु तजि रहति छाँह किमि छेंकी॥
प्रभा जाइ कहँ भानु बिहाई।
कहँ चंद्रिका चंदु तजि जाई॥

अनुवाद (हिन्दी)

हे प्रभो, तुम्ही करुणामय व परमज्ञानी आहात. विचार करा की, शरीराला सोडून छाया वेगळी ठेवता येईल का? सूर्याची प्रभा सूर्याला सोडून कुठे जाणार? आणि चांदणे चंद्रास सोडून कुठे जाऊ शकेल?’॥ ३॥

मूल (चौपाई)

पतिहि प्रेममय बिनय सुनाई।
कहति सचिव सन गिरा सुहाई॥
तुम्ह पितु ससुर सरिस हितकारी।
उतरु देउँ फिरि अनुचित भारी॥

अनुवाद (हिन्दी)

अशा प्रकारे पतीला प्रेमाची विनंती करून सीता मंत्र्याला सुंदर वाणीने म्हणाली, ‘तुम्ही माझे वडील व श्वशुर यांच्याप्रमाणे हितचिंतक आहात. मी तुम्हांला उलट उत्तर देणे फार अयोग्य ठरेल.॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

आरति बस सनमुख भइउँ बिलगु न मानब तात।
आरजसुत पद कमल बिनु बादि जहाँ लगि नात॥ ९७॥

अनुवाद (हिन्दी)

परंतु हे तात, मी आर्ततेने तुमच्याकडे बघत आहे. तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. आर्यपुत्रांच्या चरण-कमलांविना जितकी नाती जगात आहेत, ती मला व्यर्थ आहेत.॥ ९७॥

मूल (चौपाई)

पितु बैभवबिलासमैं डीठा।
नृप मनि मुुकुट मिलित पद पीठा॥
सुखनिधान अस पितुगृह मोरें।
पिय बिहीन मन भाव न भोरें॥

अनुवाद (हिन्दी)

मी वडिलांचे ऐश्वर्य पाहिले आहे. त्यांच्या पाय ठेवण्याच्या चौरंगावर मोठमोठॺा राजांचे मुकुट टेकविले जातात. सर्व प्रकारच्या सुखाचे भांडार असलेले पित्याचे घरसुद्धा पतीविना माझ्या मनाला चुकूनही गोड वाटत नाही.॥ १॥

मूल (चौपाई)

ससुर चक्कवइ कोसलराऊ।
भुवन चारिदस प्रगट प्रभाऊ॥
आगें होइ जेहि सुरपति लेई।
अरध सिंघासन आसनु देई॥

अनुवाद (हिन्दी)

माझे सासरे कोसलराज हे चक्रवर्ती सम्राट आहेत. त्यांचा प्रभाव चौदा लोकी गाजतो. इंद्रसुद्धा सामोरे येऊन त्यांचे स्वागत करतो आणि आपल्या अर्ध्या सिंहासनावर बसण्यासाठी स्थान देतो.॥ २॥

मूल (चौपाई)

ससुर एतादृस अवध निवासू।
प्रिय परिवारु मातु सम सासू॥
बिनु रघुपतिपद पदुम परागा।
मोहि केउ सपनेहुँ सुखद न लागा॥

अनुवाद (हिन्दी)

असे ऐश्वर्यशाली व प्रभावशाली सासरे, अयोध्या या राजधानीतील निवास, कुटुंबातील प्रिय व्यक्ती, आईसारख्या सासू यांपैकी काहीही मला श्रीरघुनाथांच्या चरणकमलांच्या धुळीविना स्वप्नातही सुखदायक वाटत नाही.॥ ३॥

मूल (चौपाई)

अगम पंथ बनभूमि पहारा।
करि केहरि सर सरित अपारा॥
कोल किरात कुरंग बिहंगा।
मोहि सब सुखद प्रानपति संगा॥

अनुवाद (हिन्दी)

दुर्गम रस्ते, अरण्य, पहाडी प्रदेश, हत्ती, सिंह, अथांग तलाव व नद्या, कोल, भिल्ल, हरणे आणि पक्षी हे सर्व, प्राणप्रिय श्रीराम सोबत असल्यावर मला सुख देणारेच होतील.॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

सासु ससुर सन मोरि हुँति बिनय करबि परि पायँ।
मोर सोचु जनि करिअ कछु मैं बन सुखी सुभायँ॥ ९८॥

अनुवाद (हिन्दी)

म्हणून सासू-सासरे यांच्या पाया पडून, माझ्यामार्फत त्यांना विनंतीकरा की, माझी काहीही काळजी करू नका. वनात मी मनापासून सुखीआहे.॥ ९८॥

मूल (चौपाई)

प्राननाथ प्रिय देवर साथा।
बीर धुरीन धरें धनु भाथा॥
नहिंमगश्रमुभ्रमुदुखमन मोरें।
मोहि लगि सोचु करिअ जनि भोरें॥

अनुवाद (हिन्दी)

वीरांमध्ये अग्रगण्य, धनुष्य व भरलेले भाते धारण केलेले माझे प्राणनाथ आणि माझे प्रिय दीर हे सोबत आहेत. त्यामुळे मला वाटेमध्ये थकवा नाही, काळजी नाही आणि माझ्या मनात कोणतेही दुःख नाही. तुम्ही चुकूनही माझी काळजी करू नका.’॥ १॥

मूल (चौपाई)

सुनिसुमंत्रु सिय सीतलि बानी।
भयउ बिकल जनु फनि मनि हानी॥
नयन सूझ नहिं सुनइन काना।
कहि न सकइ कछु अति अकुलाना॥

अनुवाद (हिन्दी)

साप ज्याप्रमाणे आपला मणी हरवल्यावर व्याकूळ होतो, त्याप्रमाणे सीतेची शीतल वाणी ऐकून सुमंत्र व्याकूळ झाला. त्याच्या डोळ्यांना काही दिसत नव्हते, कानांना काही ऐकू येत नव्हते. त्याची इतकी व्याकूळ अवस्था झाली की, काही सांगता सोय नाही.॥ २॥

मूल (चौपाई)

रामप्रबोधु कीन्ह बहु भाँती।
तदपि होति नहिं सीतलि छाती॥
जतन अनेक साथ हित कीन्हे।
उचित उतर रघुनंदन दीन्हे॥

अनुवाद (हिन्दी)

श्रीरामचंद्रांनीही त्याचे पुष्कळ प्रकारे समाधान केले. तरीही त्याचे मन शांत झाले नाही. आपल्याबरोबर परत येण्यासाठी सुमंत्राने खूप प्रयत्न केले, परंतु रघुनाथांनी त्याच्या प्रत्येक युक्तीला व तर्काला योग्य असे उत्तर दिले.॥ ३॥

मूल (चौपाई)

मेटि जाइ नहिं राम रजाई।
कठिन करमगति कछु न बसाई॥
रामलखनसिय पद सिरु नाई।
फिरेउ बनिक जिमि मूर गवाँई॥

अनुवाद (हिन्दी)

श्रीरामांची आज्ञा डावलता येत नाही. कर्माची गती फार कठीण असते. तिच्यावर कोणताही इलाज नाही. श्रीराम, लक्ष्मण आणि सीता यांच्या चरणी मस्तक नम्र करून सुमंत्र असा परत निघाला की, एखादा व्यापारी आपले सर्व भांडवल गमावून निराशेने परत जातो.॥ ४॥