१६ श्रीरामांचे शृंगवेरपुराला पोहोचणे

दोहा

मूल (दोहा)

सुद्ध सच्चिदानंदमय कंद भानुकुल केतु।
चरित करत नर अनुहरत संसृति सागर सेतु॥ ८७॥

अनुवाद (हिन्दी)

त्रिगुणातीत व मायातीत दिव्य मंगलविग्रह व सच्चिदानंदस्वरूप असलेले सूर्यकुलाचे ध्वज भगवान श्रीराम हे मनुष्याप्रमाणे लीला अशी करतात की, ती संसाररूपी समुद्र तरून जाण्यासाठी सेतूसारखी आहे.॥

मूल (चौपाई)

यह सुधि गुहँ निषादजब पाई।
मुदित लिए प्रिय बंधु बोलाई॥
लिएफल मूल भेंट भरि भारा।
मिलन चलेउ हियँ हरषु अपारा॥

अनुवाद (हिन्दी)

जेव्हा निषादराज गुहाला श्रीरामांच्या आगमनाची वार्ता कळली, तेव्हा त्याने आनंदित होऊन आपल्या आप्तांना व बंधु-बांधवांना बोलावले आणि भेट म्हणून देण्यासाठी फळे, कंदमुळे घेऊन तो दर्शनासाठी निघाला. त्याच्या मनाला अपार आनंद झाला होता.॥ १॥

मूल (चौपाई)

करिदंडवत भेंट धरि आगें।
प्रभुहि बिलोकत अति अनुरागें॥
सहज सनेह बिबस रघुराई।
पूँछी कुसल निकट बैठाई॥

अनुवाद (हिन्दी)

त्याने येऊन दंडवत केला आणि श्रीरामांच्यासमोर भेटवस्तु ठेवून मोठॺा प्रेमाने तो प्रभूंना पाहू लागला. श्रीरामांनी स्वाभाविक प्रेमाने निषादराजाला आपल्याजवळ बसवून घेऊन खुशाली विचारली.॥ २॥

मूल (चौपाई)

नाथ कुसल पद पंकज देखें।
भयउँ भागभाजन जन लेखें॥
देव धरनि धनुधामु तुम्हारा।
मैं जनु नीचु सहित परिवारा॥

अनुवाद (हिन्दी)

गुह म्हणाला, ‘हे नाथ, तुमच्या चरणांच्या दर्शनानेच सर्व कुशल आहे. आज माझी गणना भाग्यवान पुरुषांमध्ये होत आहे. हे देवा, माझी जमीन, धन आणि घर हे सर्व तुमचेच आहे. मी सहकुटुंब तुमचा तुच्छ सेवक आहे.॥ ३॥

मूल (चौपाई)

कृपाकरिअ पुर धारिअ पाऊ।
थापिय जनु सबु लोगु सिहाऊ॥
कहेहु सत्य सबु सखा सुजाना।
मोहि दीन्ह पितु आयसु आना॥

अनुवाद (हिन्दी)

आता कृपा करून माझ्या शृंगवेरपुरात येऊन या दासाची प्रतिष्ठा वाढवा. त्यामुळे सर्वजण माझ्या भाग्याची प्रशंसा करू लागतील.’ श्रीराम म्हणाले, ‘हे सज्जन मित्रा! तू म्हणतोस ते सर्व खरे आहे, परंतु वडिलांनी मला वेगळीच आज्ञा दिलेली आहे.॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

बरष चारिदस बासु बन मुनि ब्रत बेषु अहारु।
ग्राम बासु नहिं उचित सुनि गुहहि भयउ दुखु भारु॥ ८८॥

अनुवाद (हिन्दी)

त्यानुसार मला चौदा वर्षे मुनिव्रत व मुनिवेष धारण करून मुनींच्यासारखा आहार करून वनात राहायचे आहे. गावामध्ये राहाणे योग्य नव्हे.’ हे ऐकून गुहाला मोठे दुःख झाले.॥ ८८॥

मूल (चौपाई)

राम लखन सिय रूप निहारी।
कहहिं सप्रेम ग्राम नर नारी॥
ते पितु मातु कहहु सखि कैसे।
जिन्ह पठए बन बालक ऐसे॥

अनुवाद (हिन्दी)

श्रीराम, लक्ष्मण व सीता यांची रूपे पाहून गावातील लोक प्रेमाने चर्चा करू लागले. कोणी म्हणत होता की, ‘हे सखी, ज्यांनी या सुकुमार बालकांना वनात धाडले, ते माता-पिता आहेत तरी कसले?’॥ १॥

मूल (चौपाई)

एक कहहिं भल भूपति कीन्हा।
लोयन लाहु हमहि बिधि दीन्हा॥
तब निषाद पति उर अनुमाना।
तरु सिंसुपा मनोहर जाना॥

अनुवाद (हिन्दी)

कोणी म्हणत होता, ‘राजांनी चांगले केले. या निमित्ताने ब्रह्मदेवाने आमच्या डोळ्यांचे पारणे फेडले.’ निषादराजाने मनात विचार केला की, अशोक वृक्षाखाली यांना राहाण्यास योग्य जागा आहे.॥ २॥

मूल (चौपाई)

लै रघुनाथहि ठाउँ देखावा।
कहेउ राम सब भाँति सुहावा॥
पुरजन करि जोहारु घर आए।
रघुबर संध्या करन सिधाए॥

अनुवाद (हिन्दी)

त्याने श्रीरघुनाथांना नेऊन ती जागा दाखविली. श्रीरामांनी ती पाहून म्हटले की, ही जागा सर्व प्रकारे छान आहे. पुरवासी लोक त्यांना वंदन करून घरी परतले आणि श्रीराम संध्या-वंदन करण्यास गेले.॥ ३॥

मूल (चौपाई)

गुहँ सँवारि साँथरी डसाई।
कुस किसलयमय मृदुल सुहाई॥
सुचि फल मूल मधुर मृदु जानी।
दोना भरि भरि राखेसि पानी॥

अनुवाद (हिन्दी)

गुहाने यावेळी कुश व कोमल पानांची कोमल आणि सुंदर पथारी पसरली. आणि पवित्र, मधुर व कोमल अशी फळे, कंदमुळे व पाणी आणून ठेवले.॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

सिय सुमंत्र भ्राता सहित कंद मूल फल खाइ।
सयन कीन्ह रघुबंसमनि पाय पलोटत भाइ॥ ८९॥

अनुवाद (हिन्दी)

सीता, सुमंत्र, लक्ष्मण यांच्यासह श्रीरामांनी कंद-मुळांचा आहार घेऊन रघुकुलमणी श्रीरामचंद्र पहुडले. लक्ष्मण त्यांचे पाय चेपू लागला.॥ ८९॥

मूल (चौपाई)

उठे लखनु प्रभुसोवत जानी।
कहि सचिवहि सोवन मृदु बानी॥
कछुक दूरि सजि बान सरासन।
जागन लगे बैठि बीरासन॥

अनुवाद (हिन्दी)

नंतर प्रभू श्रीराम झोपले आहेत, असे पाहून लक्ष्मण उठला आणि कोमल वाणीने सुमंत्रास झोपण्यास सांगून तेथून काही अंतरावर धनुष्य-बाण सज्ज करून वीरासनात बसून पहारा देऊ लागला.॥ १॥

मूल (चौपाई)

गुहँ बोलाइ पाहरू प्रतीती।
ठावँ ठावँ राखे अति प्रीती॥
आपु लखन पहिं बैठेउ जाई।
कटि भाथी सर चाप चढ़ाई॥

अनुवाद (हिन्दी)

गुहाने आपल्या विश्वासू पहारेकऱ्यांना बोलावून ठिकठिकाणी तैनात केले आणि आपण स्वतः भाता बांधून आणि धनुष्याला बाण लावून लक्ष्मणा जवळ जाऊन बसला.॥ २॥

मूल (चौपाई)

सोवत प्रभुहि निहारि निषादू।
भयउ प्रेम बस हृदयँ बिषादू॥
तनु पुलकित जलु लोचन बहई।
बचन सप्रेम लखन सन कहई॥

अनुवाद (हिन्दी)

प्रभू जमिनीवर झोपले आहेत, हे पाहून प्रेमामुळे निषादराजाला वाईट वाटले. त्याचे शरीर पुलकित झाले आणि त्याच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. तो प्रेमाने लक्ष्मणाशी बोलू लागला,॥ ३॥

मूल (चौपाई)

भूपति भवन सुभायँ सुहावा।
सुरपति सदनु न पटतर पावा॥
मनिमय रचित चारु चौबारे।
जनु रतिपति निज हाथ सँवारे॥

अनुवाद (हिन्दी)

‘महाराज दशरथांचा महाल खरोखर सुंदर आहे. इंद्राचे भवनही त्याच्याबरोबरीचे नाही. तेथील सुंदर रत्नांनी बनविलेले वरचे मजले जणू कामदेवाने स्वतः आपल्या हातांनी सजविले आहेत.॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

सुचि सुबिचित्र सुभोगमय सुमन सुगंध सुबास।
पलँग मंजु मनि दीप जहँ सब बिधि सकल सुपास॥ ९०॥

अनुवाद (हिन्दी)

ते पवित्र, मोठे विलक्षण, सुंदर भोग-पदार्थांनी भरलेले आणि फुलांनी सुगंधित आहेत. तेथे सुंदर पलंग आणि रत्न-दीप आहेत आणि सर्व प्रकारे ते आरामशीर आहेत.॥ ९०॥

मूल (चौपाई)

बिबिध बसन उपधान तुराईं।
छीर फेन मृदु बिसद सुहाईं॥
तहँ सियरामु सयन निसि करहीं।
निज छबि रति मनोज मदु हरहीं॥

अनुवाद (हिन्दी)

तेथे अंथरण्या-पांघरण्याची वस्त्रे, गाद्या-गिरद्या आहेत. त्या दुधाच्या फेसाप्रमाणे कोमल, निर्मल व सुंदर आहेत. तेथे वरच्या माडीवर श्रीराम व सीता रात्री झोपत असत आणि आपल्या शोभेने रती व कामदेव यांचा गर्व हरण करीत असत.॥ १॥

मूल (चौपाई)

ते सिय रामु साथरीं सोए।
श्रमित बसन बिनु जाहिं न जोए॥
मातु पिता परिजन पुरबासी।
सखा सुसील दास अरु दासी॥

अनुवाद (हिन्दी)

तेच सीता आणि श्रीराम हे आज थकून गवत-काडॺांच्या पथारीवर अंथरूण-पांघरूण नसताना झोपले आहेत. अशा अवस्थेत त्यांच्याकडे पहावत नाही. माता-पिता, कुटुंबीय, प्रजा, मित्र, चांगल्या स्वभावाचे दास व दासी,॥ २॥

मूल (चौपाई)

जोगवहिं जिन्हहिप्रान की नाईं।
महि सोवत तेइ राम गोसाईं॥
पिताजनकजगबिदित प्रभाऊ।
ससुर सुरेस सखा रघुराऊ॥

अनुवाद (हिन्दी)

हे सर्वजण ज्यांना प्राणाप्रमाणे जपतात, तेच प्रभू श्रीरामचंद्र आज जमिनीवर झोपले आहेत. जिचे पिता जगप्रसिद्ध जनक राजे आहेत आणि श्वशुर हे इंद्राचे मित्र रघुराज दशरथ आहेत,॥३॥

मूल (चौपाई)

रामचंदु पति सो बैदेही।
सोवत महि बिधि बाम न केही॥
सिय रघुबीर कि कानन जोगू।
करम प्रधान सत्य कह लोगू॥

अनुवाद (हिन्दी)

आणि पती श्रीरामचंद्र आहेत, तीच जानकी आज जमिनीवर झोपलेली आहे. दैव कुणाला प्रतिकूल होत नाही? सीता व श्रीरामचंद्र हे काय वनात राहण्यास योग्य आहेत? कर्म हेच मुख्य असते, असे लोक म्हणतात, तेच खरे.॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

कैकयनंदिनि मंदमति कठिन कुटिलपनु कीन्ह।
जेहिं रघुनंदन जानकिहि सुख अवसर दुखु दीन्ह॥ ९१॥

अनुवाद (हिन्दी)

केकयराजाची कन्या, नीच बुद्धीची कैकेयी हिने दुष्ट कारस्थान केले. त्यामुळे रघुनंदन श्रीराम आणि जानकी यांना सुखाच्या काळात दुःख दिले.॥ ९१॥

मूल (चौपाई)

भइ दिनकर कुलबिटप कुठारी।
कुमति कीन्ह सब बिस्व दुखारी॥
भयउ बिषादु निषादहि भारी।
राम सीय महि सयन निहारी॥

अनुवाद (हिन्दी)

ती कैकेयी सूर्यकुलरूपी वृक्षासाठी कुऱ्हाड बनली. त्या दुष्ट स्त्रीने संपूर्ण जगाला दुःखी केले.’ श्रीराम व जानकी यांना जमिनीवर झोपलेले पाहून निषादराजास फार दुःख वाटले.॥ १॥