१२ श्रीराम-लक्ष्मण-संवाद

मूल (चौपाई)

समाचार जब लछिमन पाए।
ब्याकुल बिलख बदन उठि धाए॥
कंपपुलकतन नयन सनीरा।
गहे चरन अति प्रेम अधीरा॥

अनुवाद (हिन्दी)

जेव्हा लक्ष्मणाला ही बातमी समजली, तेव्हा तो व्याकूळ व उदास होऊन धावला. शरीर थरथरत होते, रोमांच आले होते आणि नेत्र अश्रूंनी भरले होते. प्रेमाने अत्यंत अधीर होऊन त्याने श्रीरामांचे चरण धरले.॥ १॥

मूल (चौपाई)

कहि न सकत कछु चितवत ठाढे़।
मीनु दीन जनु जल तें काढ़े॥
सोचु हृदयँ बिधि का होनिहारा।
सबु सुखु सुकृतु सिरान हमारा॥

अनुवाद (हिन्दी)

तो काही बोलत नव्हता, उभ्या उभ्या पहात होता. जळातून बाहेर काढल्यावर मासा जसा मलूल (व्याकुळ) होतो, तसा तो दीनवाणा झाला होता. मनात विचार करीत होता की, हे विधात्या, काय होणार आहे? आमचे सर्व सुख व पुण्य संपून गेले काय?॥ २॥

मूल (चौपाई)

मो कहुँकाहकहब रघुनाथा।
रखिहहिं भवन कि लेहहिं साथा॥
रामबिलोकिबंधु कर जोरें।
देह गेह सब सन तृनु तोरें॥

अनुवाद (हिन्दी)

मला श्रीराम आता काय सांगतील? घरी ठेवतील की सोबत नेतील?’ श्रीरामांनी लक्ष्मणाला हात जोडून उभा असलेला व घरचीच नव्हे, तर शरीराचीही सर्व नाती तोडून आलेला आहे, असे पाहिले.॥ ३॥

मूल (चौपाई)

बोले बचनु रामनय नागर।
सील सनेह सरल सुख सागर॥
तात प्रेमबस जनि कदराहू।
समुझि हृदयँ परिनाम उछाहू॥

अनुवाद (हिन्दी)

तेव्हा नीति-निपुण आणि शील, स्नेह, सरळपणा आणि सुखाचे सागर असलेले श्रीराम म्हणाले, ‘बंधो! तू येथे राहाण्यामुळे परिणामी होणाऱ्या लाभाचा विचार मनात ठेवून तू प्रेमाने अधीर बनू नकोस.॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

मातु पिता गुरु स्वामि सिख सिर धरि करहिं सुभायँ।
लहेउ लाभु तिन्ह जनम कर नतरु जनमु जग जायँ॥ ७०॥

अनुवाद (हिन्दी)

जे लोक माता, पिता, गुरू आणि स्वामी यांचा उपदेश मनःपूर्वक शिरोधार्य मानून त्याचे पालन करतात, त्यांनीच जन्माचे सार्थक केले. नाहीतर जगात जन्म घेणे व्यर्थच आहे.॥ ७०॥

मूल (चौपाई)

असजियँ जानि सुनहु सिख भाई।
करहु मातु पितु पद सेवकाई॥
भवन भरतु रिपुसूदनु नाहीं।
राउ बृद्ध मम दुखु मन माहीं॥

अनुवाद (हिन्दी)

हे बंधू, हे लक्षात आणून माझे म्हणणे ऐक व माता-पित्यांच्या चरणांची सेवा कर. भरत आणि शत्रुघ्न हे घरी नाहीत. महाराज वृद्ध आहेत आणि त्यांच्या मनात माझ्या वनगमनाचे फार दुःख आहे.॥ १॥

मूल (चौपाई)

मैं बन जाउँ तुम्हहि लेइ साथा।
होइ सबहि बिधि अवध अनाथा॥
गुरु पितु मातु प्रजा परिवारू।
सब कहुँ परइ दुसह दुख भारू॥

अनुवाद (हिन्दी)

अशा अवस्थेमध्ये मी तुला बरोबर घेऊन वनात गेलो, तर अयोध्या सर्व प्रकारे अनाथ होईल. गुरू, माता, पिता, प्रजा व परिवार या सर्वांवर दुःखाचे असह्य ओझे पडेल.॥ २॥

मूल (चौपाई)

रहहु करहु सबकर परितोषू।
नतरु तात होइहि बड़ दोषू॥
जासु राज प्रियप्रजा दुखारी।
सो नृपु अवसि नरक अधिकारी॥

अनुवाद (हिन्दी)

तेव्हा तू येथेच राहा आणि सर्वांचे समाधान कर. नाहीतर बंधो! फार मोठा दोष पदरी येईल. ज्याच्या राज्यात प्रजा दुःखी असते, तो राजा नक्कीच नरकास पात्र ठरतो.॥ ३॥

मूल (चौपाई)

रहहु तात असिनीति बिचारी।
सुनत लखनु भए ब्याकुल भारी॥
सिअरें बचन सूखि गए कैसें।
परसत तुहिन तामरसु जैसें॥

अनुवाद (हिन्दी)

बंधो! या नीतीचा विचार करून तू घरीच रहा.’ हे ऐकताच लक्ष्मण फार व्याकूळ झाला. दवामुळे कमळ जसे करपून जाते, त्याप्रमाणे श्रीरामांच्या शीतल वचनामुळे तो करपून गेला.॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

उतरु न आवत प्रेम बस गहे चरन अकुलाइ।
नाथ दासु मैं स्वामि तुम्ह तजहु त काह बसाइ॥ ७१॥

अनुवाद (हिन्दी)

प्रेमामुळे लक्ष्मण काही उत्तर देऊ शकला नाही. त्याने व्याकूळ होऊन श्रीरामांचे पाय धरले आणि म्हटले, ‘हे नाथ, मी दास आहे आणि तुम्ही स्वामी. म्हणून तुम्ही मला सोडून दिले, तर मी काय करणार?॥ ७१॥

मूल (चौपाई)

दीन्हिमोहि सिखनीकि गोसाईं।
लागि अगम अपनी कदराईं॥
नरबर धीर धरमधुर धारी।
निगम नीति कहुँ ते अधिकारी॥

अनुवाद (हिन्दी)

हे स्वामी, तुम्ही मला उपदेश तर फार चांगला केला, पण माझ्या असमर्थपणामुळे तो माझ्या पचनी नाही पडला. जे धीर असतात व धर्माची धुरा धारण करतात, तेच शास्त्र व नीतीचे श्रेष्ठ अधिकारी असतात.॥ १॥

मूल (चौपाई)

मैं सिसु प्रभु सनेहँ प्रतिपाला।
मंदरु मेरु कि लेहिं मराला॥
गुर पितुमातुन जानउँ काहू।
कहउँ सुभाउ नाथ पतिआहू॥

अनुवाद (हिन्दी)

मी तर प्रभूंच्या प्रेमामध्ये पोसले गेलेले लहान मूल आहे. हंस मंदराचल किंवा सुमेरू पर्वत कधी उचलू शकतो काय? हे नाथ, मी मनापासून सांगतो, तुम्ही विश्वास बाळगा. तुम्हांला सोडून गुरू, माता, पिता या कुणालाही मी जाणत नाही.॥ २॥

मूल (चौपाई)

जहँ लगि जगत सनेह सगाई।
प्रीति प्रतीति निगम निजु गाई॥
मोरें सबइ एक तुम्ह स्वामी।
दीनबंधु उर अंतरजामी॥

अनुवाद (हिन्दी)

हे प्रभू, दीनबंधू, हे अंतर्यामी, प्रत्यक्ष वेदाने सांगितले आहे की, जगात जितके म्हणून स्नेहाचे संबंध आहेत, प्रेम आणि विश्वास आहे. ते सर्व काही माझ्यासाठी तुम्हीच आहात.॥ ३॥

मूल (चौपाई)

धरम नीति उपदेसिअ ताही।
कीरति भूति सुगति प्रिय जाही॥
मनक्रम बचन चरनरत होई।
कृपासिंधु परिहरिअ कि सोई॥

अनुवाद (हिन्दी)

हे कृपासिंधू, ज्याला कीर्ती, ऐश्वर्य किंवा सद्गती प्रिय आहे, त्यालाच धर्म व नीतीचा उपदेश करायला हवा. परंतु जो मन, वचन व कर्माने तुमच्या चरणी प्रेम बाळगतो, त्याला सोडून देणे योग्य आहे काय?’॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

करुनासिंधु सुबंधु के सुनि मृदु बचन बिनीत।
समुझाए उर लाइ प्रभु जानि सनेहँ सभीत॥ ७२॥

अनुवाद (हिन्दी)

दयेचा सागर असलेल्या श्रीरामचंद्रांनी भावाचे मृदू व नम्र वचनऐकून आणि स्नेहामुळे त्याला घाबरलेला पाहून हृदयाशी धरले व समजावले.॥ ७२॥

मूल (चौपाई)

मागहु बिदा मातु सन जाई।
आवहु बेगि चलहु बन भाई॥
मुदित भएसुनि रघुबर बानी।
भयउ लाभ बड़ गइ बड़ि हानी॥

अनुवाद (हिन्दी)

ते लक्ष्मणाला म्हणाले, ‘बंधो! जाऊन आईचा निरोप घेऊन ये आणि लवकर वनात चल.’ रघुकुलातील श्रेष्ठ श्रीरामांची वाणी ऐकून लक्ष्मणआनंदला. मनात म्हणाला, मोठे नुकसान टळले आणि मोठा फायदा झाला.॥ १॥