१० मासपारायण, चौदावा विश्राम

श्रीसीता-राम-संवाद

मूल (चौपाई)

मातु समीप कहत सकुचाहीं।
बोले समउ समुझि मन माहीं॥
राजकुमारि सिखावनु सुनहू।
आन भाँति जियँ जनि कछु गुनहू॥

अनुवाद (हिन्दी)

मातेसमोर सीतेला काही बोलण्यास श्रीराम संकोचत होते. परंतु मनात त्यांनी विचार केला की, हीच वेळ योग्य आहे. म्हणून ते म्हणाले, ‘हे राजकुमारी, माझे म्हणणे ऐक. मनात उगाच दुसरे काही आणू नकोस.॥ १॥

मूल (चौपाई)

आपनमोर नीक जौं चहहू।
बचनु हमार मानि गृह रहहू॥
आयसु मोर सासु सेवकाई।
सब बिधि भामिनि भवन भलाई॥

अनुवाद (हिन्दी)

जर तुला माझे व स्वतःचे भले व्हावे अशी इच्छा असेल, तर माझे म्हणणे मानून तू घरी राहा. हे भामिनी, त्यामुळे माझ्या आज्ञेचे पालन होईल; सासूची सेवा घडेल. घरी राहण्यात सर्व प्रकारे कल्याण आहे.॥ २॥

मूल (चौपाई)

एहि ते अधिक धरमु नहिं दूजा।
सादर सासु ससुर पद पूजा॥
जब जब मातु करिहि सुधि मोरी।
होइहि प्रेम बिकल मति भोरी॥

अनुवाद (हिन्दी)

आदराने सासू-सासऱ्यांच्या चरणांची सेवा करण्याहून दुसरा कोणताही श्रेष्ठ धर्म नाही. जेव्हा जेव्हा मातेला माझी आठवण येईल आणि प्रेमाने व्याकूळ झाल्यामुळे तिला स्वतःचा विसर पडेल,॥ ३॥

मूल (चौपाई)

तब तबतुम्ह कहिकथा पुरानी।
सुंदरि समुझाएहु मृदु बानी॥
कहउँसुभायँ सपथ सत मोही।
सुमुखि मातु हित राखउँ तोही॥

अनुवाद (हिन्दी)

तेव्हा तेव्हा हे सुंदरी, तू कोमल वाणीने पूर्वीच्या कथा सांगून तिला समजव. हे सुमुखी, तुला माझी शंभर वेळा शपथ आहे. मी प्रामाणिकपणे सांगतो की, मी तुला फक्त मातेच्या सेवेसाठीच घरी ठेवतो.॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

गुर श्रुति संमत धरम फलु पाइअ बिनहिं कलेस।
हठ बस सब संकट सहे गालव नहुष नरेस॥ ६१॥

अनुवाद (हिन्दी)

माझी आज्ञा मानून घरी राहिल्यामुळे गुरू व वेद यांनी मान्य केलेल्या धर्माच्या आचरणाचे फळ तुला क्लेशाविना मिळेल. परंतु हट्टाने वनात आलीस, तर तुला क्लेश भोगावे लागतील. हट्टामुळे गालव मुनी, राजा नहुष इत्यादी सर्वांना फार संकटे भोगावी लागली आहेत.॥ ६१॥

मूल (चौपाई)

मैंपुनि करि प्रवान पितु बानी।
बेगि फिरब सुनु सुमुखि सयानी॥
दिवस जात नहिंलागिहि बारा।
सुंदरि सिखवनु सुनहु हमारा॥

अनुवाद (हिन्दी)

हे सुमुखी, हे बुद्धिमती, ऐक. मीसुद्धा वडिलांचे वचन पूर्ण करून लवकरच परत येईन. दिवस सरायला वेळ लागणार नाही. हे सुंदरी, माझे हे म्हणणे ऐक.॥ १॥

मूल (चौपाई)

जौं हठकरहु प्रेम बस बामा।
तौ तुम्ह दुखु पाउब परिनामा॥
काननु कठिन भयंकरु भारी।
घोर घामु हिम बारि बयारी॥

अनुवाद (हिन्दी)

हे प्रिये, जर प्रेमामुळे तू हट्ट करशील, तर परिणामी तुला दुःख भोगावे लागेल. वन फार क्लेशदायक व भयंकर आहे. तेथील ऊन, थंडी, पाऊस आणि वारे हे सर्व भयानक आहे.॥ २॥

मूल (चौपाई)

कुसकंटक मग काँकर नाना।
चलब पयादेहिं बिनु पदत्राना॥
चरन कमल मृदुमंजु तुम्हारे।
मारग अगम भूमिधर भारे॥

अनुवाद (हिन्दी)

रस्त्यात सराटे, काटे-कुटे, खडे फार असतात. त्यावरून अनवाणी पायी चालावे लागेल. तुझे चरण कमलासारखे कोमल व सुंदर आहेत आणि वाटेत मोठ-मोठे दुर्गम पर्वत आहेत.॥ ३॥

मूल (चौपाई)

कंदर खोह नदीं नद नारे।
अगम अगाध न जाहिं निहारे॥
भालु बाघ बृक केहरि नागा।
करहिं नाद सुनि धीरजु भागा॥

अनुवाद (हिन्दी)

पर्वतांमधील गुहा, दऱ्या, नद्या, आणि ओढे हे अगम्य व खोल आहेत. त्यांच्याकडे पाहावतसुद्धा नाही. अस्वले, वाघ, लांडगे, सिंह आणि हत्ती असे भयानक ओरडत असतात की, ते ऐकूनच धैर्य गळून जाते.॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

भूमि सयन बलकल बसन असनु कंद फल मूल।
ते कि सदा सब दिन मिलहिं सबुइ समय अनुकूल॥ ६२॥

अनुवाद (हिन्दी)

जमिनीवर झोपायचे, झाडांच्या सालींची वस्त्रे घालायची आणि कंद, मुळे, फळे खायची आणि सर्व काळ ते नेहमी मिळणार काय? सर्व काही आपापल्या कालानुरूप असेच मिळेल.॥ ६२॥

मूल (चौपाई)

नर अहार रजनीचर चरहीं।
कपट बेष बिधि कोटिक करहीं॥
लागइ अति पहार कर पानी।
बिपिन बिपति नहिं जाइ बखानी॥

अनुवाद (हिन्दी)

तेथे माणसांना खाणारे निशाचर राक्षस फिरत असतात. ते पुष्कळ प्रकारचे कपट-वेश घेतात. पर्वतातले पाणी फार बाधते. वनातील संकटे सांगता येत नाहीत.॥ १॥

मूल (चौपाई)

ब्याल कराल बिहग बन घोरा।
निसिचर निकर नारि नर चोरा॥
डरपहिं धीर गहनसुधि आएँ।
मृगलोचनि तुम्ह भीरु सुभाएँ॥

अनुवाद (हिन्दी)

वनात भीषण सर्प, भयानक पक्षी आणि स्त्री-पुरुषांचे अपहरण करणाऱ्या राक्षसांच्या झुंडीच्या झुंडी असतात. वनातील भयानकतेची आठवण येताच धैर्यवान पुरुषही घाबरून जातात. मग हे मृगलोचने, तू तर स्वभावतः घाबरून जाणारी आहेस.॥ २॥

मूल (चौपाई)

हंसगवनि तुम्हनहिंबन जोगू।
सुनि अपजसु मोहि देइहि लोगू॥
मानस सलिल सुधाँ प्रतिपाली।
जिअइ कि लवन पयोधि मराली॥

अनुवाद (हिन्दी)

हे हंसगामिनी, तू वनात जाण्याच्या योग्यतेची नाहीस. तू वनात जाणार असे समजल्यावर लोक मला नावे ठेवतील. मानससरोवराच्या अमृतासमान पाण्यावर पोसलेली हंसी कधी खाऱ्या समुद्रात जगू शकेल काय?॥ ३॥

मूल (चौपाई)

नव रसाल बन बिहरनसीला।
सोह कि कोकिल बिपिन करीला॥
रहहुभवन अस हृदयँ बिचारी।
चंदबदनि दुखु कानन भारी॥

अनुवाद (हिन्दी)

नव्याने बहरलेल्या आमराईत विहार करणारी कोकिळा काटेरी झाडांच्या जंगलात शोभून दिसेल काय? हे चंद्रमुखी, मनात असा विचार करून तू घरीच राहा. वनात फार कष्ट असतात.॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

सहज सुहृद गुर स्वामि सिख जो न करइ सिर मानि।
सो पछिताइ अघाइ उर अवसि होइ हित हानि॥ ६३॥

अनुवाद (हिन्दी)

मनापासून हित चिंतिणारे गुरू व स्वामी यांचे बोलणे जो शिरोधार्य मानीत नाही, तो पश्चात्ताप पावतो आणि त्याच्या कल्याणाची हानीचहोते.’॥ ६३॥

मूल (चौपाई)

सुनि मृदु बचन मनोहर पिय के।
लोचन ललित भरे जल सिय के॥
सीतल सिख दाहक भइ कैसें।
चकइहि सरद चंद निसि जैसें॥

अनुवाद (हिन्दी)

प्रियतम श्रीरामांचे कोमल व मनोहर बोलणे ऐकून सीतेचे सुंदर नेत्र पाण्याने डबडबले. चक्रवाक पक्षिणीला शरदऋतूची चांदणी जशी होरपळून काढते, त्याप्रमाणे श्रीरामांचे हे शांत बोलणे सीतेला जाळू लागले.॥ १॥

मूल (चौपाई)

उतरुन आव बिकल बैदेही।
तजन चहत सुचि स्वामि सनेही॥
बरबस रोकि बिलोचन बारी।
धरि धीरजु उर अवनिकुमारी॥

अनुवाद (हिन्दी)

जानकीला काही उत्तर देता येईना. माझ्या पवित्र व प्रेमळ स्वामींना मला सोडून जाण्याची इच्छा आहे, असे तिला वाटून ती व्याकूळ झाली. डोळ्यांतील पाणी मोठॺा कष्टाने आवरून ती पृथ्वी-कन्या सीता मन घट्ट करून,॥ २॥

मूल (चौपाई)

लागिसासु पग कह कर जोरी।
छमबि देबि बड़ि अबिनय मोरी॥
दीन्हिप्रानपति मोहि सिख सोई।
जेहि बिधि मोर परम हित होई॥

अनुवाद (हिन्दी)

सासूच्या पाया पडून व हात जोडून म्हणू लागली की, ‘सासूबाई! माझ्या या धारिष्ट्याबद्दल क्षमा करा. माझे परम हित ज्यात आहे, असेच माझ्या प्राणप्रिय पतीने सांगितले आहे.॥ ३॥

मूल (चौपाई)

मैं पुनि समुझि दीखि मन माहीं।
पिय बियोग सम दुखु जग नाहीं॥

अनुवाद (हिन्दी)

परंतु मी मनात विचार करून पाहिला की, पतीच्या विरहासारखे जगात कोणतेही दुःख नाही.॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

प्राननाथ करुनायतन सुंदर सुखद सुजान।
तुम्ह बिनु रघुकुल कुमुद बिधु सुरपुर नरक समान॥ ६४॥

अनुवाद (हिन्दी)

हे प्राणनाथ, हे दयाधाम, हे सुंदर, हे सुखदायक, हे सज्जनशिरोमणी, हे रघुुकुलरूपी कुमुदांना प्रफुल्लित करणारे चंद्रमा, तुमच्याविना मला स्वर्गसुद्धा नरकासमान आहे.॥ ६४॥

मूल (चौपाई)

मातु पिता भगिनीप्रिय भाई।
प्रिय परिवारु सुहृद समुदाई॥
सासु ससुरगुरसजन सहाई।
सुत सुंदर सुसील सुखदाई॥

अनुवाद (हिन्दी)

माता-पिता, बहीण, प्रिय भाऊ, आवडता परिवार, मित्र-मंडळी, सासू-सासरे, गुरू, स्वजन, सहाय्यक आणि सुंदर, सुशील व सुखद पुत्र,॥ १॥

मूल (चौपाई)

जहँ लगिनाथनेह अरु नाते।
पिय बिनु तियहि तरनिहु ते ताते॥
तनु धनुधामुधरनिपुर राजू।
पति बिहीन सबु सोक समाजू॥

अनुवाद (हिन्दी)

हे नाथ, जितकी म्हणून नाती आहेत, ती सर्व पतीविना स्त्रीला सूर्याहून तापदायक आहेत. शरीर, धन, घर, पृथ्वी, नगर आणि राज्य हे सर्व स्त्रीला पतीविना शोकाचा समुदाय आहे.॥ २॥

मूल (चौपाई)

भोग रोगसम भूषन भारू।
जम जातना सरिस संसारू॥
प्राननाथ तुम्ह बिनु जग माहीं।
मो कहुँ सुखद कतहुँ कछु नाहीं॥

अनुवाद (हिन्दी)

भोग हे रोगासारखे आहेत, दागिने भाररूप आहेत, संसार हा यम-यातनेसारखा आहे. हे प्राणनाथ, तुमच्याविना मला या जगात काहीही सुखाचे नाही.॥ ३॥

मूल (चौपाई)

जिय बिनु देह नदी बिनु बारी।
तैसिअ नाथ पुरुष बिनु नारी॥
नाथ सकल सुख साथ तुम्हारें।
सरद बिमल बिधु बदनु निहारें॥

अनुवाद (हिन्दी)

ज्याप्रमाणे जिवाविना देह आणि पाण्याविना नदी असते, त्याप्रमाणे हे नाथ, पुरुषाविना स्त्री असते. हे नाथ, तुमच्यासोबत राहून तुमचे शरद पौर्णिमेच्या निर्मल चंद्रासारखे मुख पाहण्यामुळे मला सर्व सुखे आपोआप मिळतील.॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

खग मृग परिजन नगरु बनु बलकल बिमल दुकूल।
नाथ साथ सुरसदन सम परनसाल सुख मूल॥ ६५॥

अनुवाद (हिन्दी)

हे नाथ, तुमच्यासोबत असताना मला पक्षी व पशू हे माझे कुटुंबीय असतील, वन हेच नगर व वृक्षांच्या साली याच निर्मळ वस्त्रे असतील आणि पर्णकुटी ही स्वर्गासारखी सुखाचे माहेर असेल.॥ ६५॥

मूल (चौपाई)

बनदेबीं बनदेव उदारा।
करिहहिं सासु ससुर सम सारा॥
कुस किसलय साथरी सुहाई।
प्रभु सँग मंजु मनोज तुराई॥

अनुवाद (हिन्दी)

वनात उदार मनाच्या वनदेवी व वनदेव हे सासू-सासऱ्यांप्रमाणे माझा सांभाळ करतील, आणि कुश व पानांचा सुंदर बिछाना प्रभूंच्या संगतीमुळे कामदेवाच्या मनोहर गादीप्रमाणे वाटेल.॥ १॥

मूल (चौपाई)

कंदमूल फलअमिअ अहारू।
अवध सौध सत सरिस पहारू॥
छिनुछिनुप्रभुपदकमल बिलोकी।
रहिहउँ मुदित दिवस जिमि कोकी॥

अनुवाद (हिन्दी)

कंद-मुळे व फळे ही अमृतासमान आहार असेल आणि पर्वत हेच अयोध्येमधील शेकडो राजमहालांसारखे असतील. क्षणोक्षणी प्रभूंच्या चरणकमलांना पाहून दिवसा जशी चकवी आनंदित असते, तशी मी आनंदात राहीन.॥ २॥

मूल (चौपाई)

बन दुख नाथ कहे बहुतेरे।
भय बिषाद परिताप घनेरे॥
प्रभु बियोग लवलेस समाना।
सब मिलि होहिं न कृपानिधाना॥

अनुवाद (हिन्दी)

हे नाथ, तुम्ही वनातील पुष्कळशी दुःखे, बरेच भय, विषाद व दुःखे सांगितली, परंतु हे कृपानिधान, हे सर्व जरी एकत्र केले तरी प्रभू, तुमच्या वियोगाच्या दुःखापुढे लवलेशही नाहीत.॥ ३॥

मूल (चौपाई)

असजियँ जानि सुजान सिरोमनि।
लेइअ संग मोहि छाड़िअ जनि॥
बिनती बहुत करौंका स्वामी।
करुनामय उर अंतरजामी॥

अनुवाद (हिन्दी)

असा मनात विचार करून हे नाथ! मला तुमच्यासोबत घेऊन चला. येथे सोडून जाऊ नका. हे स्वामी, मी आणखी काय विनवणी करू? तुम्ही करुणामय आहात आणि सर्वांच्या मनातील जाणणारे आहात.॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

राखिअ अवध जो अवधि लगि रहत न जनिअहिं प्रान।
दीनबंधु सुंदर सुखद सील सनेह निधान॥ ६६॥

अनुवाद (हिन्दी)

हे दीनबंधू, हे सुंदर, हे सुखदायक, हे शील व प्रेमाचे भांडार, जर चौदा वर्षांचा अवधी पूर्ण होईपर्यंत मला अयोध्येमध्ये ठेवाल, तर मी जिवंत राहाणार नाही, असे समजा.॥ ६६॥

मूल (चौपाई)

मोहि मगचलत न होइहि हारी।
छिनु छिनु चरन सरोज निहारी॥
सबहि भाँति पिय सेवा करिहौं।
मारग जनित सकल श्रम हरिहौं॥

अनुवाद (हिन्दी)

क्षणोक्षणी तुमचे चरणकमल पहात राहिल्यामुळे मला वाटेत चालताना थकवा वाटणार नाही. हे प्रियतम, मी सर्व प्रकारे तुमची सेवा करीन आणि वाट चालताना येणारा थकवा दूर करीन.॥ १॥

मूल (चौपाई)

पाय पखारिबैठितरु छाहीं।
करिहउँ बाउ मुदित मन माहीं॥
श्रमकनसहितस्याम तनु देखें।
कहँ दुख समउ प्रानपति पेखें॥

अनुवाद (हिन्दी)

मी तुमचे पाय धुऊन, झाडांच्या सावलीत बसून मनात प्रसन्न होऊन तुम्हांला वारा घालीन. तुमचे स्वेद-बिंदू झळकणारे श्याम शरीर पहात प्राणप्रिय पतीचे दर्शन घेताना मला दुःखासाठी जागाच कुठे राहील?॥ २॥

मूल (चौपाई)

सम महि तृन तरुपल्लव डासी।
पाय पलोटिहि सब निसि दासी॥
बार बार मृदु मूरति जोही।
लागिहि तात बयारि न मोही॥

अनुवाद (हिन्दी)

सपाट जमिनीवर गवत व झाडांची पाने अंथरून ही दासी रात्रभर तुमचे पाय चेपीत राहील. वारंवार तुमची कोमल मूर्ती पाहून मला कधी उकाडा जाणवणार नाही.॥ ३॥

मूल (चौपाई)

को प्रभुसँग मोहि चितवनिहारा।
सिंघबधुहि जिमि ससक सिआरा॥
मैं सुकुमारि नाथ बन जोगू।
तुम्हहि उचित तप मो कहुँ भोगू॥

अनुवाद (हिन्दी)

आपण सोबत असताना माझ्याकडे डोळे वर करून तरी कोण पहाणार आहे? ससे व कोल्हे सिंहिणीकडे कधी बघू शकत नाहीत. मी सुकुमारी आहे आणि तुम्ही वनात जाण्याजोगे आहात काय? मग तुमच्यासाठी तेवढी तपस्या योग्य व मला विषय-भोग योग्य आहेत, असे तुम्हांला वाटते काय?॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

ऐसेउ बचन कठोर सुनि जौं न हृदउ बिलगान।
तौ प्रभु बिषम बियोग दुख सहिहहिं पावँर प्रान॥ ६७॥

अनुवाद (हिन्दी)

तुमचे असे कठोर बोलणे ऐकूनही माझे हृदय विदीर्ण झाले नाही, त्यावरून हे प्रभू, माझे हे क्षुद्र प्राण तुमच्या वियोगाचे दुःख सहन करू शकतील असे वाटते.’ (अर्थात तुमच्या विरहात माझे प्राण राहाणार नाहीत.)॥ ६७॥

मूल (चौपाई)

असकहि सीय बिकल भइ भारी।
बचन बियोगु न सकी सँभारी॥
देखि दसा रघुपति जियँ जाना।
हठि राखें नहिं राखिहि प्राना॥

अनुवाद (हिन्दी)

असे म्हणून सीता फार शोकाकुल झाली. ती बोलण्यातील वियोगसुद्धा सहन करू शकली नाही. तिची अवस्था पाहून श्रीरघुनाथांनी मनात जाणले की, हिला आग्रहाने इथे ठेवल्यास हिचे प्राण वाचणार नाहीत.॥ १॥

मूल (चौपाई)

कहेउ कृपाल भानुकुल नाथा।
परिहरि सोचु चलहु बन साथा॥
नहिं बिषादकर अवसरु आजू।
बेगि करहु बन गवन समाजू॥

अनुवाद (हिन्दी)

तेव्हा कृपाळू सूर्यकुलाचे स्वामी श्रीरामचंद्र म्हणाले, ‘काळजी करणे सोडून देऊन माझ्याबरोबर वनात चल. ही विषाद मानण्याची वेळ नाही. लगेच वनगमनाची तयारी कर.’॥ २॥