०८ श्रीराम-दशरथ-संवाद

दोहा

मूल (दोहा)

गइ मुरुछा रामहि सुमिरि नृप फिरि करवट लीन्ह।
सचिव राम आगमन कहि बिनय समय सम कीन्ह॥ ४३॥

अनुवाद (हिन्दी)

इतक्यात राजांची मूर्च्छा दूर झाली. ‘राम-राम’ म्हणून ते कुशीवर वळले. मंत्र्यांनी श्रीराम आल्याची वार्ता त्यांना सांगितली.॥ ४३॥

मूल (चौपाई)

अवनिप अकनि रामु पगु धारे।
धरि धीरजु तब नयन उघारे॥
सचिव सँभारि राउ बैठारे।
चरन परत नृप रामु निहारे॥

अनुवाद (हिन्दी)

श्रीराम आल्याचे ऐकताच राजांनी धीर धरून डोळे उघडले. मंत्र्यांनी राजांना धरून बसविले. श्रीराम आपल्या पाया पडत आहेत, हे राजांनी पाहिले.॥ १॥

मूल (चौपाई)

लिए सनेह बिकल उर लाई।
गै मनि मनहुँ फनिक फिरि पाई॥
रामहि चितइ रहेउ नरनाहू।
चला बिलोचन बारि प्रबाहू॥

अनुवाद (हिन्दी)

प्रेम-विव्हळ झालेल्या राजांनी श्रीरामांना हृदयाशी धरले. जणू आपले हरविलेले रत्न सापाला पुन्हा मिळाले. राजा दशरथ श्रीरामांना पहातच राहिले. त्यांच्या डोळ्यांतून अश्रूंचा प्रवाह वाहू लागला.॥ २॥

मूल (चौपाई)

सोक बिबस कछु कहै न पारा।
हृदयँ लगावत बारहिं बारा॥
बिधिहि मनाव राउ मन माहीं।
जेहिं रघुनाथ न कानन जाहीं॥

अनुवाद (हिन्दी)

अत्यंत शोकाकुल झाल्यामुळे राजे काही बोलू शकत नव्हते. ते वारंवार श्रीरामचंद्रांना हृदयाशी धरत होते आणि रघुनाथ वनात जाऊ नये, अशी मनात ब्रह्मदेवांची आळवणी करीत होते.॥ ३॥

मूल (चौपाई)

सुमिरि महेसहि कहइ निहोरी।
बिनती सुनहु सदासिव मोरी॥
आसुतोष तुम्ह अवढर दानी।
आरति हरहु दीन जनु जानी॥

अनुवाद (हिन्दी)

मग महादेवांचे स्मरण करून त्यांची प्रार्थना करीत ते म्हणाले, ‘हे सदाशिवा, माझी विनंती ऐका. तुम्ही पटकन प्रसन्न होणारे आशुतोष आहात आणि मागेल ते देणारे आहात. म्हणून मला आपला दीन सेवक मानून माझे दुःख दूर करा.॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

तुम्ह प्रेरक सब के हृदयँ सो मति रामहि देहु।
बचनु मोर तजि रहहिं घर परिहरि सीलु सनेहु॥ ४४॥

अनुवाद (हिन्दी)

तुम्ही प्रेरकरूपाने सर्वांच्या हृदयात वास करता. माझे वचन मोडून आणि शील सोडून घरातच राहाण्याची बुद्धी तुम्ही श्रीरामाला द्या.॥ ४४॥

मूल (चौपाई)

अजसु होउ जग सुजसु नसाऊ।
नरक परौं बरु सुरपुरु जाऊ॥
सब दुख दुसह सहावहु मोही।
लोचन ओट रामु जनि होंही॥

अनुवाद (हिन्दी)

जगात अपकीर्ती होवो किंवा सुकीर्ती नष्ट होवो. पापामुळे मी नरकात पडो किंवा स्वर्गात जावो. वाटल्यास सर्व प्रकारची दुःसह दुःखे मला सहन करायला लावा, परंतु श्रीराम माझ्या डोळ्यांआड जाऊ नये.’॥ १॥

मूल (चौपाई)

अस मन गुनइ राउ नहिं बोला।
पीपर पात सरिस मनु डोला॥
रघुपति पितहि प्रेमबस जानी।
पुनि कछु कहिहि मातु अनुमानी॥

अनुवाद (हिन्दी)

राजे अशाप्रकारे मनात विचार करीत होते, बोलत नव्हते. त्यांचे मन पिंपळाच्या पानासारखे सळसळत होते. श्रीरघुनाथांनी पाहिले की वडील प्रेम-विव्हळ झाले आहेत आणि अंदाज केला की, कैकेयी आणखी काही बोलली, तर वडिलांना दुःख होईल.॥ २॥

मूल (चौपाई)

देस काल अवसर अनुसारी।
बोले बचन बिनीत बिचारी॥
तात कहउँ कछु करउँ ढिठाई।
अनुचितु छमब जानि लरिकाई॥

अनुवाद (हिन्दी)

म्हणून देश, काल आणि प्रसंगानुरूप विचार करून श्रीराम नम्रपणे म्हणाले, ‘हे तात, मी बोलतोय, ते धारिष्ट्य आहे. या अनौचित्याला माझे लहानपण समजून क्षमा करा.॥३॥

मूल (चौपाई)

अति लघु बात लागि दुखु पावा।
काहुँ न मोहि कहि प्रथम जनावा॥
देखि गोसाइँहि पूँछिउँ माता।
सुनि प्रसंगु भए सीतल गाता॥

अनुवाद (हिन्दी)

या अगदी क्षुल्लक गोष्टीसाठी तुम्हांला इतके दुःख सहन करावे लागले. मला कोणी या गोष्टीचा पत्ताच लागू दिला नाही. महाराज, तुमची ही अवस्था पाहून मी मातेला विचारले. तिने सर्व प्रसंग सांगितलेला ऐकून माझे समाधान झाले.॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

मंगल समय सनेह बस सोच परिहरिअ तात।
आयसु देइअ हरषि हियँ कहि पुलके प्रभु गात॥ ४५॥

अनुवाद (हिन्दी)

बाबा! या मंगल प्रसंगी प्रेमाने व्याकूळ होऊन काळजी करणे सोडून द्या आणि आनंदाने मला आज्ञा द्या.’ हे सांगत असताना प्रभू रामांचे सर्वांग पुलकित झाले.॥ ४५॥

मूल (चौपाई)

धन्य जनमु जगतीतल तासू।
पितहि प्रमोदु चरित सुनि जासू॥
चारि पदारथ करतल ताकें।
प्रिय पितु मातु प्रान सम जाकें॥

अनुवाद (हिन्दी)

नंतर ते म्हणाले, ‘ज्याचे चरित्र ऐकून पित्याला मोठा आनंद होतो, त्याचा या पृथ्वीतलावरील जन्म धन्य होय. ज्याला माता-पिता प्राणांसारखे प्रिय आहेत, त्याच्या मुठीत चारी पुरुषार्थ असतात.॥ १॥

मूल (चौपाई)

आयसु पालि जनम फलु पाई।
ऐहउँ बेगिहिं होउ रजाई॥
बिदा मातु सन आवउँ मागी।
चलिहउँ बनहि बहुरि पग लागी॥

अनुवाद (हिन्दी)

तुमच्या आज्ञेचे पालन करून आणि जन्म सफळ करून मी लवकरच परत येईन. म्हणून मला आज्ञा द्या. कौसल्या मातेचा निरोप घेऊन येतो. मग तुमच्या पाया पडून वनास जाईन.’॥ २॥

मूल (चौपाई)

अस कहि राम गवनु तब कीन्हा।
भूप सोक बस उतरु न दीन्हा॥
नगर ब्यापि गइ बात सुतीछी।
छुअत चढ़ी जनु सब तन बीछी॥

अनुवाद (हिन्दी)

असे म्हणून श्रीराम तेथून निघाले. शोकामुळे राजांनी काही उत्तर दिले नाही. ही अत्यंत अप्रिय गोष्ट नगरात एवढॺा झपाटॺाने पसरली की, दंश होताच जसे विंचवाचे विष सर्व शरीरात चढते.॥ ३॥

मूल (चौपाई)

सुनिभए बिकल सकल नर नारी।
बेलि बिटप जिमि देखि दवारी॥
जो जहँ सुनइ धुनइ सिरु सोई।
बड़ बिषादु नहिं धीरजु होई॥

अनुवाद (हिन्दी)

ही वार्ता ऐकताच दावानल पाहताच वेली आणि वृक्ष जसे कोमेजून जातात त्याप्रमाणे सर्व स्त्रीपुरुष व्याकूळ झाले. ज्या कुणाला ऐकायला मिळे, तो तिथेच डोके बडवून घेत होता. सगळीकडे विषाद पसरला. कुणाला धीर धरवेना.॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

मुख सुखाहिं लोचन स्रवहिं सोकु न हृदयँ समाइ।
मनहुँ करुन रस कटकई उतरी अवध बजाइ॥ ४६॥

अनुवाद (हिन्दी)

सर्वांची तोंडे सुकून गेली, डोळॺांतून अश्रू वाहू लागले होते आणि हृदयात दुःख मावत नव्हते. जणू करुणरसाच्या सेनेने अयोध्येवर डंका वाजवत आक्रमण केले होते.॥ ४६॥

मूल (चौपाई)

मिलेहि माझ बिधि बात बेगारी।
जहँ तहँ देहिं कैकइहि गारी॥
एहि पापिनिहि बूझि का परेऊ।
छाइ भवन पर पावकु धरेऊ॥

अनुवाद (हिन्दी)

सर्व जुळून आले होते. इतक्यात विधात्याने सर्व बिघडून टाकले. जिकडे-तिकडे कैकेयीला लोकशिव्या देऊ लागले. ‘या पापिणीला काय अवदसा आठवली की, हिने शाकारलेल्या चांगल्या घराला आग लावली.॥ १॥

मूल (चौपाई)

निजकरनयन काढ़िचह दीखा।
डारि सुधा बिषु चाहत चीखा॥
कुटिल कठोर कुबुद्धि अभागी।
भइ रघुबंस बेनु बन आगी॥

अनुवाद (हिन्दी)

ही स्वतःच्या हाताने आपले डोळे फोडून डोळॺांविना पाहू इच्छिते आणि अमृत टाकून देऊन विषाचा आस्वाद घेऊ इच्छिते. ही कठोर, कुटिल, निर्बुद्ध आणि अभागी कैकेयी रघुवंशरूपी वेळूच्या वनासाठी आग बनली.॥ २॥

मूल (चौपाई)

पालव बैठि पेड़ एहिं काटा।
सुख महुँ सोक ठाटु धरि ठाटा॥
सदा रामु एहि प्रान समाना।
कारन कवन कुटिलपनु ठाना॥

अनुवाद (हिन्दी)

फांदीवर बसून हिने झाड तोडून टाकले. सुखाच्या वेळी भयंकर शोक निर्माण केला. श्रीरामचंद्र हिला नेहमी प्राणांसारखे प्रिय होते, मग हिने दुष्टपणा का केला, कळत नाही.॥ ३॥

मूल (चौपाई)

सत्य कहहिं कबि नारि सुभाऊ।
सब बिधि अगहु अगाध दुराऊ॥
निज प्रतिबिंबु बरुकु गहि जाई।
जानि न जाइ नारि गति भाई॥

अनुवाद (हिन्दी)

कवी सांगतात, ते खरेच आहे. स्त्रीचा स्वभाव हा कोणत्याहीप्रकारे कळणारा नाही. तो अथांग व रहस्यमय असतो. एक वेळ स्वतःचे प्रतिबिंब पकडता येईल, परंतु स्त्रियांची चाल काही समजत नाही.॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

काह न पावकु जारि सक का न समुद्र समाइ।
का न करै अबला प्रबल केहि जग कालु न खाइ॥ ४७॥

अनुवाद (हिन्दी)

आग काय जाळू शकत नाही? समुद्रात काय मावत नाही? अबला म्हणवणारी प्रबळ स्त्रीजात काय करू शकत नाही? आणि जगात काळ हा कुणाला खाऊन टाकीत नाही?॥ ४७॥

मूल (चौपाई)

का सुनाइ बिधि काह सुनावा।
का देखाइ चह काह देखावा॥
एक कहहिं भल भूप न कीन्हा।
बरु बिचारि नहिं कुमतिहि दीन्हा॥

अनुवाद (हिन्दी)

विधात्याने काय ऐकवले होते आणि आता काय ऐकवीत आहे? काय दाखविले होते आणि आता काय दाखवू पहात आहे?’ एक म्हणत होता की, राजांनी काही चांगले केले नाही. दुर्बुद्धीच्या कैकेयीला विचार करून वर दिला नाही.॥ १॥

मूल (चौपाई)

जो हठि भयउ सकल दुख भाजनु।
अबला बिबस ग्यानु गुनु गा जनु॥
एक धरम परमिति पहिचाने।
नृपहिं दोसु नहिं देहिं सयाने॥

अनुवाद (हिन्दी)

ते हट्टाने कैकेयीचे वचन पूर्ण करण्यासाठी तटून बसले आणि स्वतःच सर्व दुःखांना पात्र ठरले. स्त्रीच्या अधीन झाल्यामुळे जणू त्यांचे ज्ञान व गुण नष्ट झाले. जे धर्माची मर्यादा जाणतात आणि बुद्धिमान आहेत, ते राजांना दोष देत नव्हते.॥ २॥

मूल (चौपाई)

सिबि दधीचि हरिचंद कहानी।
एक एक सन कहहिं बखानी॥
एक भरत कर संमत कहहीं।
एक उदास भायँ सुनि रहहीं॥

अनुवाद (हिन्दी)

ते शिबी, दधीची आणि हरिश्चंद्र यांची कथा वर्णन करून सांगत होते. कोणी म्हणत होता की, या प्रकारात भरताचीही संमती आहे. कोणी ऐकल्यावर उदासीन भावनेने गप्प राहात होते.॥ ३॥

मूल (चौपाई)

कान मूदि कर रद गहि जीहा।
एक कहहिं यह बात अलीहा॥
सुकृत जाहिं अस कहत तुम्हारे।
रामु भरत कहुँ प्रानपिआरे॥

अनुवाद (हिन्दी)

कोणी आपल्या हातांनी कान बंद करून आणि जीभ चावून म्हणत होते की, ‘ही गोष्ट खोटी आहे. असे बोलल्यामुळे तुमचे पुण्य नष्ट होईल. भरताला श्रीराम हे प्राणांसमान प्रिय आहेत.॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

चंदु चवै बरु अनल कन सुधा होइ बिषतूल।
सपनेहुँ कबहुँ न करहिं किछु भरतु राम प्रतिकूल॥ ४८॥

अनुवाद (हिन्दी)

एखादे वेळी चंद्र आग ओकू लागला आणि अमृत विषासारखे झाले तरी भरत स्वप्नातही कधी श्रीरामचंद्रांच्या विरुद्ध काही करणार नाही.’॥ ४८॥

मूल (चौपाई)

एक बिधातहि दूषनु देहीं।
सुधा देखाइ दीन्ह बिषु जेहीं॥
खरभरु नगर सोचु सब काहू।
दुसह दाहु उर मिटा उछाहू॥

अनुवाद (हिन्दी)

काहीजण ब्रह्मदेवाला दोष देत होते, ज्याने अमृत दाखवून विष दिले. शहरभर खळबळ माजली. सर्वांना काळजी लागून राहिली. मनाला असह्य यातना होऊ लागल्या. आनंद, उत्साह कुठल्या कुठे नाहीसा झाला.॥ १॥

मूल (चौपाई)

बिप्रबधू कुलमान्य जठेरी।
जे प्रिय परम कैकई केरी॥
लगीं देन सिख सीलु सराही।
बचन बानसम लागहिं ताही॥

अनुवाद (हिन्दी)

ब्राह्मण-स्त्रिया, कुळातील मान्यवर वयोवृद्ध स्त्रिया आणि ज्या कैकेयीच्या फार आवडत्या होत्या, त्या सर्वजणी तिच्या शीलाची प्रशंसा करीत तिला समजावू लागल्या. परंतु त्यांचे बोलणे तिला बाणाप्रमाणे बोचत होते.॥ २॥

मूल (चौपाई)

भरतु न मोहि प्रिय राम समाना।
सदा कहहु यहु सबु जगु जाना॥
करहु राम पर सहज सनेहू।
केहिं अपराध आजु बनु देहू॥

अनुवाद (हिन्दी)

त्या म्हणत होत्या की, ‘तू तर नेहमी म्हणत होतीस की श्रीरामचंद्रांइतका मला भरतही प्रिय नाही. ही गोष्ट साऱ्या जगाला माहीत आहे. श्रीरामचंद्रांवर तुझे प्रामाणिक प्रेम आहे. मग आज कोणत्या अपराधासाठी त्यांना वनवास देत आहेस?॥ ३॥

मूल (चौपाई)

कबहुँ न कियहु सवति आरेसू।
प्रीति प्रतीति जान सबु देसू॥
कौसल्याँ अब काह बिगारा।
तुम्ह जेहि लागि बज्र पुर पारा॥

अनुवाद (हिन्दी)

तू सवतींचा कधी द्वेष केला नाहीस. सर्व देश तुझे प्रेम व विश्वास जाणतो. आता कौसल्येने तुझे काय वाकडे केले आहे, म्हणून तू सर्व नगरावर वज्र टाकलेस?॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

सीय कि पिय सँगु परिहरिहि लखनु कि रहिहहिं धाम।
राजु कि भूँजब भरत पुर नृपु कि जिइहि बिनु राम॥ ४९॥

अनुवाद (हिन्दी)

सीता पतीची साथ सोडेल काय? आणि लक्ष्मण श्रीरामचंद्रांविना घरी राहील? भरत काय श्रीरामांविना अयोध्येचे राज्य भोगू शकेल?आणि राजा दशरथ श्रीरामांविना जिवंत राहू शकेल? सर्व उध्वस्त होईल.॥ ४९॥

मूल (चौपाई)

अस बिचारि उर छाड़हु कोहू।
सोक कलंक कोठि जनि होहू॥
भरतहि अवसि देहु जुबराजू।
कानन काह राम कर काजू॥

अनुवाद (हिन्दी)

मनात असा विचार करून राग सोडून दे. शोक व कलंकाचे घर बनू नकोस. भरताला युवराजपदावर अवश्य बसू दे, परंतु श्रीरामांचे वनात काय काम आहे?॥ १॥

मूल (चौपाई)

नाहिन रामु राज के भूखे।
धरम धुरीन बिषय रस रूखे॥
गुर गृह बसहुँ रामु तजि गेहू।
नृप सन अस बरु दूसर लेहू॥

अनुवाद (हिन्दी)

श्रीराम हे राज्याचे भुकेले नाहीत. ते धर्माची धुरा धारण करणारे व विषय-विरक्त आहेत. मनात शंका आणू नकोस. तू दुसरा वर माग की, श्रीरामांनी घर सोडून गुरूंच्या घरी रहावे.॥ २॥

मूल (चौपाई)

जौं नहिं लगिहहु कहें हमारे।
नहिं लागिहि कछु हाथ तुम्हारे॥
जौं परिहास कीन्हि कछु होई।
तौ कहि प्रगट जनावहु सोई॥

अनुवाद (हिन्दी)

जर तू आमच्या सांगण्याप्रमाणे वागली नाहीस तर तुझ्या हाती काहीही लागणार नाही. जर तू थट्टा केली असशील, तर तसे जाहीरपणे सांग.॥ ३॥

मूल (चौपाई)

राम सरिस सुत कानन जोगू।
काह कहिहि सुनि तुम्ह कहुँ लोगू॥
उठहु बेगि सोइ करहु उपाई।
जेहि बिधि सोकु कलंकु नसाई॥

अनुवाद (हिन्दी)

रामासारखा पुत्र वनात जाण्याजोगा आहे काय? हे ऐकल्यावर लोक तुला काय म्हणतील? लवकर ऊठ आणि काही उपाय कर, म्हणजे हा शोक व कलंक दूर होईल.॥ ४॥

छंद

मूल (दोहा)

जेहि भाँति सोकु कलंकु जाइ उपाय करि कुल पालही।
हठि फेरु रामहि जात बन जनि बात दूसरि चालही॥
जिमि भानु बिनु दिनु प्रान बिनु तनु चंद बिनु जिमि जामिनी।
तिमि अवध तुलसीदास प्रभु बिनु समुझि धौं जियँ भामिनी॥

अनुवाद (हिन्दी)

ज्यामुळे नगरातील शोक आणि तुझ्यावरचा कलंक नाहीसा होईल, असा उपाय करून कुलाचे रक्षण कर. वनास निघालेल्या श्रीरामांना आग्रहाने थांबव. दुसरे काही बोलू नकोस. तुलसीदास म्हणतात की, ज्याप्रमाणे सूर्याविना दिवस, प्राणांविना शरीर आणि चंद्राविना रात्र निर्जीव व शोभाहीन होते, त्याप्रमाणे श्रीरामचंद्रांविना अयोध्या होईल. हे राणी, तू आपल्या मनात या गोष्टीचा विचार तर कर.’॥

सोरठा

मूल (दोहा)

सखिन्ह सिखावनु दीन्ह सुनत मधुर परिनाम हित।
तेइँ कछु कान न कीन्ह कुटिल प्रबोधी कूबरी॥ ५०॥

अनुवाद (हिन्दी)

अशा प्रकारे सख्यांनी शिकवण दिली. ती ऐकण्यास गोड व परिणामी हितकारक होती. परंतु कुटिल कुबडीने पढवून तयार केलेल्या कैकेयीने तिकडे जराही लक्ष दिले नाही.॥ ५०॥

मूल (चौपाई)

उतरु न देइ दुसह रिस रूखी।
मृगिन्ह चितव जनु बाघिनि भूखी॥
ब्याधि असाधि जानि तिन्ह त्यागी।
चलीं कहत मतिमंद अभागी॥

अनुवाद (हिन्दी)

कैकेयीने काही उत्तर दिले नाही. ती दुःसह क्रोधामुळे निर्लज्जपणे तशीच राहिली. भुकेली वाघीण हरिणींना पाहते, तशी ती त्यांना पहात होती. तेव्हा सख्यांनी हा रोग असाध्य समजून सोडून दिले. सर्वजणी तिला मंदबुद्धीची दुर्दैवी म्हणत निघून गेल्या.॥ १॥

मूल (चौपाई)

राजु करतयह दैअँ बिगोई।
कीन्हेसि अस जस करइ न कोई॥
एहि बिधि बिलपहिं पुर नर नारीं।
देहिं कुचालिहि कोटिक गारीं॥

अनुवाद (हिन्दी)

राज्यावर अधिकार गाजविणाऱ्या कैकेयीला दैवाने नष्ट करून टाकले. तिने जे काही केले, तसे कुणीही करणार नाही. नगरातील सर्व स्त्री-पुरुष अशा प्रकारे विलाप करीत होते आणि त्या दुष्ट चालीच्या कैकेयीला शिव्यांची लाखोली वाहात होते.॥ २॥

मूल (चौपाई)

जरहिं बिषम जर लेहिं उसासा।
कवनि राम बिनु जीवन आसा॥
बिपुल बियोग प्रजा अकुलानी।
जनु जलचर गन सूखत पानी॥

अनुवाद (हिन्दी)

लोक दुःखाच्या आगीमुळे होरपळत होते. उसासे सोडत म्हणत होते की, श्रीरामचंद्रांविना जगण्याची काही आशा नाही. महान वियोगाच्या काळजीने प्रजा अशी व्याकूळ झाली होती की, जणू पाणी सुकून गेल्यावर जलचर जीवांचा समुदाय तळमळू लागतो.॥ ३॥