०६ मासपारायण, तेरावा विश्राम

मूल (चौपाई)

सुनहु प्रानप्रिय भावत जी का।
देहु एक बर भरतहि टीका॥
मागउँ दूसर बर कर जोरी।
पुरवहु नाथ मनोरथ मोरी॥

अनुवाद (हिन्दी)

ती म्हणाली, ‘हे प्राणप्रिय, ऐका तर. माझ्या मनाला आवडणारा एक वर असा द्या की,भरताला राजतिलक करा. आणि हे नाथ, दुसरा वरसुद्धा मी हात जोडून मागते. माझे मनोरथ पूर्ण करा.॥ १॥

मूल (चौपाई)

तापस बेष बिसेषि उदासी।
चौदह बरिस रामु बनबासी॥
सुनि मृदु बचन भूप हियँ सोकू।
ससि कर छुअत बिकल जिमि कोकू॥

अनुवाद (हिन्दी)

तपस्व्यांच्या वेषात अत्यंत उदासीन भावनेने विरक्त मुनींप्रमाणे रामाने चौदा वर्षे वनात रहावे.’ कैकेयीचे हे (कपटपूर्ण) विनययुक्त बोलणे ऐकून चंद्र-किरणांच्या स्पर्शाने चक्रवाक पक्षी जसा व्याकूळ होऊन जातो, त्याप्रमाणे राजांच्या हृदयात शोक पसरला.॥ २॥

मूल (चौपाई)

गयउ सहमिनहिं कछुकहि आवा।
जनु सचान बन झपटेउ लावा॥
बिबरन भयउ निपट नरपालू।
दामिनि हनेउ मनहुँ तरु तालू॥

अनुवाद (हिन्दी)

महाराजांना एकदम धक्का बसला. त्यांना काही बोलता येईना. जणू ससाण्याने लावा पक्ष्यावर हल्ला केला होता, ताडवृक्षाला विजेने होरपळून टाकले होते, तीच अवस्था राजांची झाली.॥ ३॥

मूल (चौपाई)

माथें हाथ मूदि दोउ लोचन।
तनु धरि सोचु लाग जनु सोचन॥
मोर मनोरथु सुरतरु फूला।
फरत करिनि जिमि हतेउ समूला॥

अनुवाद (हिन्दी)

डोक्याला हात लावून व डोळे बंद करून राजे पश्चात्ताप करू लागले की, जणू प्रत्यक्ष पश्चात्तापच साकार बनून पश्चात्ताप करू लागला होता. ते विचार करू लागले की, ‘हाय, माझे मनोरथरूपी कल्पवृक्ष फुलला होता, परंतु त्याला फळे लागताना कैकेयीरूपी हत्तिणीने मुळासकट उपटून तो नष्ट केला.॥ ४॥

मूल (चौपाई)

अवध उजारि कीन्हि कैकेईं।
दीन्हिसि अचल बिपति कै नेईं॥

अनुवाद (हिन्दी)

कैकेयीने अयोध्येला उध्वस्त करून टाकले आणि विपत्तीचा पाया घातला.॥ ५॥

दोहा

मूल (दोहा)

कवनें अवसर का भयउ गयउँ नारि बिस्वास।
जोग सिद्धि फल समय जिमि जतिहि अबिद्या नास॥ २९॥

अनुवाद (हिन्दी)

कोणत्या क्षणी काय झाले! ज्याप्रमाणे योगाच्या सिद्धीचे फळ मिळताना अविद्या योग्याला नष्ट करते, त्याप्रमाणे स्त्रीवर विश्वास ठेवून मी ठार झालो.’॥ २९॥

मूल (चौपाई)

एहि बिधिराउ मनहिं मन झाँखा।
देखि कुभाँति कुमति मन माखा॥
भरतु कि राउर पूत न होंही।
आनेहु मोल बेसाहि कि मोही॥

अनुवाद (हिन्दी)

अशा प्रकारे राजा मनातल्या मनात कुढत होते. राजांची ती दुर्दशा पाहून दुष्ट कैकेयी मनातून फार क्रुद्ध झाली व म्हणाली, ‘भरत तुमचा पुत्र नाही काय? तुम्ही मला पैसे देऊन विकत घेतले होते काय? मी तुमची लग्नाची बायको नाही काय?॥ १॥

मूल (चौपाई)

जो सुनि सरु अस लाग तुम्हारें।
काहे न बोलहु बचनु सँभारें॥
देहु उतरु अनु करहु कि नाहीं।
सत्यसंध तुम्ह रघुकुल माहीं॥

अनुवाद (हिन्दी)

माझे बोलणे ऐकताच जणू तुम्हांला बाण लागल्यागत झाले, तर तुम्ही विचार करून का बोलला नाहीत? बोला. होय म्हणा, नाहीतर नाही म्हणा. तुम्ही रघुवंशामध्ये सत्य प्रतिज्ञा करणारे म्हणून प्रसिद्ध आहात.॥ २॥

मूल (चौपाई)

देन कहेहु अब जनि बरु देहू।
तजहु सत्य जग अपजसु लेहू॥
सत्य सराहि कहेहु बरु देना।
जानेहु लेइहि मागि चबेना॥

अनुवाद (हिन्दी)

तुम्ही वर देतो, असे म्हणाला होता. आता हवे तर नाही म्हणा. सत्याला सोडचिठ्ठी द्या आणि जगात अपकीर्ती मिळवा. सत्याची मोठी वाखाणणी करीत वर देतो, असे म्हणाला होता. मी चणे-फुटाणे मागीन, असे तुम्हांला वाटले होते काय?॥ ३॥

मूल (चौपाई)

सिबि दधीचि बलि जो कछु भाषा।
तनु धनु तजेउ बचन पनु राखा॥
अति कटु बचन कहति कैकेई।
मानहुँ लोन जरे पर देई॥

अनुवाद (हिन्दी)

शिबी, दधीची आणि बली यांनी जे म्हटले ते त्यांनी शरीर व संपदा यांचा त्याग करून पूर्ण केले.’ अशाप्रकारे जखमेवर मीठ चोळल्याप्रमाणे कैकेयी अत्यंत कटू शब्द बोलत होती.॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

धरम धुरंधर धीर धरि नयन उघारे रायँ।
सिरु धुनि लीन्हि उसास असि मारेसि मोहि कुठायँ॥ ३०॥

अनुवाद (हिन्दी)

धर्मधुरंधर राजा दशरथांनी मोठॺा धैर्याने डोळे उघडले. डोके बडवून विलाप करीत आणि जोराने सुस्कारे टाकीत ते म्हणाले की, ‘हिने माझ्या वर्मावर घाव घातला. यातून वाचणे कठीण आहे.’॥ ३०॥

मूल (चौपाई)

आगें दीखि जरत रिस भारी।
मनहुँ रोष तरवारि उघारी॥
मूठि कुबुद्धि धार निठुराई।
धरी कूबरीं सान बनाई॥

अनुवाद (हिन्दी)

जणू क्रोधरूपी नंगी तलवार उभी असावी, तशी प्रचंड क्रोधाने पेटलेली ती समोर दिसली. कुबुद्धी ही त्या तलवारीची मूठ होती, निष्ठुरता धार होती आणि त्या कुबडॺा मंथरारूपी निशाण्यावर घासून ती तीक्ष्ण बनली होती.॥ १॥

मूल (चौपाई)

लखी महीप कराल कठोरा।
सत्य कि जीवनु लेइहि मोरा॥
बोले राउ कठिन करि छाती।
बानी सबिनय तासु सोहाती॥

अनुवाद (हिन्दी)

राजांनी पाहिले की, ही तलवार फारच भयानक आणि कठोर आहे. ते विचार करू लागले की, खरेच ही माझा जीव घेईल काय? त्यांनी आपले मन घट्ट करून, अत्यंत नम्रपणे कैकेयीला गोड वाटेल अशा वाणीने म्हटले,॥ २॥

मूल (चौपाई)

प्रिया बचनकस कहसि कुभाँती।
भीर प्रतीति प्रीति करि हाँती॥
मोरें भरतु रामु दुइ आँखी।
सत्य कहउँ करि संकरु साखी॥

अनुवाद (हिन्दी)

‘हे प्रिये, हे भीरू, विश्वास व प्रेम नष्ट करून तू अशी दुष्ट वचने का बोलतेस? भरत व राम हे दोघे माझे दोन डोळे आहेत, हे शंकरांच्या साक्षीने मी सत्य सांगतो.॥ ३॥

मूल (चौपाई)

अवसि दूतु मैं पठइब प्राता।
ऐहहिं बेगि सुनत दोउ भ्राता॥
सुदिन सोधि सबु साजु सजाई।
देउँ भरत कहुँ राजु बजाई॥

अनुवाद (हिन्दी)

मी उद्या सकाळीच नक्की दूत पाठवितो. भरत व शत्रुघ्न हे दोघे भाऊ निरोप मिळताच लगेच येतील. चांगला दिवस शोधून मी सर्व तयारी करून, नगारे वाजवून भरताला राज्य देईन.॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

लोभु न रामहि राजु कर बहुत भरत पर प्रीति।
मैं बड़ छोट बिचारि जियँ करत रहेउँ नृपनीति॥ ३१॥

अनुवाद (हिन्दी)

रामाला राज्याचा लोभ नाही आणि भरतावर त्याचे फार प्रेम आहे. मीच माझ्या मनाने लहान-मोठॺाचा विचार करून राजनीतीला अनुसरून थोरल्याला राजतिलक करायला निघालो होतो.॥ ३१॥

मूल (चौपाई)

राम सपथ सत कहउँ सुभाऊ।
राममातु कछु कहेउ न काऊ॥
मैं सबु कीन्ह तोहि बिनु पूँछें।
तेहि तें परेउ मनोरथु छूछें॥

अनुवाद (हिन्दी)

मी श्रीरामाची शंभर वेळा शपथ घेऊन प्रामाणिकपणे सांगतो की, या बाबतीत कौसल्येने मला काहीही सांगितले नव्हते. मी तुला न विचारता सर्व केले, हे खरे. त्यामुळेच माझे मनोरथ व्यर्थ ठरले.॥ १॥

मूल (चौपाई)

रिस परिहरु अब मंगल साजू।
कछु दिन गएँ भरत जुबराजू॥
एकहि बात मोहि दुखु लागा।
बर दूसर असमंजस मागा॥

अनुवाद (हिन्दी)

आता राग सोडून दे आणि मंगल शृंगार कर. लवकरच भरत युवराज होईल. तू दुसरा जो वर मागितलास तो अडचणीचा आहे. त्याचे मला दुःख वाटत आहे.॥ २॥

मूल (चौपाई)

अजहूँ हृदउ जरत तेहि आँचा।
रिस परिहास कि साँचेहुँ साँचा॥
कहु तजि रोषु राम अपराधू।
सबु कोउ कहइ रामु सुठि साधू॥

अनुवाद (हिन्दी)

त्याच्या धगीमुळे माझे हृदय जळत आहे. हे तू थट्टेने, रागाने की खरोखरच म्हणत आहेस? हा राग सोडून रामाचा काय अपराध आहे, ते तरी सांग. सर्वजण म्हणतात की, राम हा फार साधु-वृत्तीचा आहे.॥ ३॥

मूल (चौपाई)

तुहूँ सराहसि करसि सनेहू।
अब सुनि मोहि भयउ संदेहू॥
जासु सुभाउ अरिहि अनुकूला।
सो किमि करिहि मातु प्रतिकूला॥

अनुवाद (हिन्दी)

तू स्वतःसुद्धा रामाची प्रशंसा करीत होतीस आणि त्याच्यावर प्रेम करीत होतीस. आता मात्र हे ऐकून मला संशय वाटू लागला आहे. ज्याचा स्वभाव शत्रूलासुद्धा अनुकूल वाटतो, तो मातेला प्रतिकूल असे आचरण का करील?॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

प्रिया हास रिस परिहरहि मागु बिचारि बिबेकु।
जेहिं देखौं अब नयन भरि भरत राज अभिषेकु॥ ३२॥

अनुवाद (हिन्दी)

हे प्रिये, हा जीवघेणा विनोद व क्रोध सोडून दे आणि विवेकयुक्त विचार करून वर माग. आता मला डोळे भरून भरताचा राज्याभिषेक पाहू दे.॥ ३२॥

मूल (चौपाई)

जिऐ मीन बरु बारि बिहीना।
मनि बिनु फनिकु जिऐ दुख दीना॥
कहउँ सुभाउ न छलु मन माहीं।
जीवनु मोर राम बिनु नाहीं॥

अनुवाद (हिन्दी)

कदाचित मासोळी पाण्याविना जिवंत राहील आणि साप मण्याविना दीनवाणा बनून जिवंत राहील, परंतु मी प्रामाणिकपणे सांगतो, मनात कोणतेही कपट न ठेवता सांगतो की, माझे जीवन रामाविना नाही.॥ १॥

मूल (चौपाई)

समुझि देखु जियँ प्रिया प्रबीना।
जीवनु राम दरस आधीना॥
सुनि मृदु बचन कुमति अति जरई।
मनहुँ अनल आहुति घृत परई॥

अनुवाद (हिन्दी)

हे चतुर प्रिये, मनापासून समजून घे. माझे जीवन श्रीरामाच्या दर्शनावर अवलंबून आहे.’ राजांचे हे कोमल वचन ऐकून दुर्बुद्धी कैकेयी अत्यंत जळफळत होती. जणू अग्नीमध्ये तुपाच्या आहुती पडत होत्या.॥ २॥

मूल (चौपाई)

कहइ करहु किन कोटि उपाया।
इहाँ न लागिहि राउरि माया॥
देहु कि लेहु अजसु करि नाहीं।
मोहि न बहुत प्रपंच सोहाहीं॥

अनुवाद (हिन्दी)

कैकेयी म्हणाली की, ‘तुम्ही कोटी उपाय कराना का, येथे तुमचा कावेबाजपणा चालणार नाही. एक तर मी मागितले आहे ते द्या किंवा नाही म्हणून अपकीर्ती घ्या. मला उगीच भांडण-तंटा आवडत नाही.॥ ३॥

मूल (चौपाई)

रामु साधु तुम्ह साधु सयाने।
राममातु भलि सब पहिचाने॥
जस कौसिलाँ मोर भल ताका।
तस फलु उन्हहि देउँ करि साका॥

अनुवाद (हिन्दी)

राम हा साधू आहे, तुम्ही ज्ञानी साधू आहात आणि रामाची आईसुद्धा कमी साधू नाही. मी सर्वांना चांगली ओळखून आहे. कौसल्येने माझे भले होण्याची इच्छा धरली होती. आता मी सुद्धा तिला आठवण राहील, असे फळ देईन.॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

होत प्रातु मुनिबेष धरि जौं न रामु बन जाहिं।
मोर मरनु राउर अजस नृप समुझिअ मन माहिं॥ ३३॥

अनुवाद (हिन्दी)

सकाळ होताच मुनीचा वेष धारण करून जर राम वनास गेला नाही, तर हे राजा, पक्के लक्षात ठेवा की, माझा मृत्यू होईल व तुमची अपकीर्ती.’॥ ३३॥

मूल (चौपाई)

अस कहिकुटिल भई उठि ठाढ़ी।
मानहुँ रोष तरंगिनि बाढ़ी॥
पाप पहार प्रगट भइ सोई।
भरी क्रोध जल जाइ न जोई॥

अनुवाद (हिन्दी)

असे म्हणून कुटिल कैकेयी उठून उभी राहिली. जणू क्रोधाची नदी उफाळून आली असावी. ती पापाच्या पहाडातून निघाली होती आणि क्रोधरूपी भयंकर पाण्याने भरलेली होती. त्यामुळे तिच्याकडे पाहावत नव्हते.॥ १॥

मूल (चौपाई)

दोउ बर कूल कठिन हठ धारा।
भवँर कूबरी बचन प्रचारा॥
ढाहत भूपरूप तरु मूला।
चली बिपति बारिधि अनुकूला॥

अनुवाद (हिन्दी)

दोन वर हे त्या नदीचे दोन तट होते, कैकेयीचा हट्ट तिचा प्रचंड प्रवाह होता आणि कुबडीचे सांगणे त्यामधील भोवरे होते. ती क्रोधाची नदी राजा दशरथरूपी वृक्षाला मुळासह उपटून विपत्तिरूपी समुद्राकडे धावत होती.॥ २॥

मूल (चौपाई)

लखी नरेस बात फुरि साँची।
तिय मिस मीचु सीस पर नाची॥
गहि पद बिनय कीन्ह बैठारी।
जनि दिनकर कुल होसि कुठारी॥

अनुवाद (हिन्दी)

राजांनी जाणले की, हे सर्व सत्य आहे. स्त्रीच्या निमित्ताने माझा मृत्यूच माझ्या शिरावर नाचत आहे. राजांनी कैकेयीचे पाय धरून तिला बसविले आणि विनंती केली की, ‘तू सूर्यकुलरूपी वृक्षासाठी कुऱ्हाड बनू नकोस.॥ ३॥

मूल (चौपाई)

मागु माथ अबहीं देउँ तोही।
राम बिरहँ जनि मारसि मोही॥
राखु राम कहुँ जेहि तेहि भाँती।
नाहिं त जरिहि जनम भरि छाती॥

अनुवाद (हिन्दी)

तू माझे मस्तक माग, मी ते आत्ता उतरून देतो, परंतु रामाच्या विरहाने मला मारू नकोस. कसेही करून तू रामाला ठेवून घे. नाहीतर जन्मभर तुझे हृदय जळत राहील.’॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

देखी ब्याधि असाध नृपु परेउ धरनि धुनि माथ।
कहत परम आरत बचन राम राम रघुनाथ॥ ३४॥

अनुवाद (हिन्दी)

राजांनी पाहिले की, रोग असाध्य आहे, तेव्हा ते अत्यंत आर्तवाणीने ‘हाय राम, हाय राम, हाय रघुनाथ’ असे म्हणत व डोके आपटून घेत जमिनीवर कोसळले.॥ ३४॥

मूल (चौपाई)

ब्याकुल राउ सिथिल सब गाता।
करिनि कलपतरु मनहुँ निपाता॥
कंठु सूख मुख आव न बानी।
जनु पाठीनु दीन बिनु पानी॥

अनुवाद (हिन्दी)

राजा व्याकूळ झाले होते. त्यांच्या संपूर्ण शरीरातील त्राणच गेले होते. हत्तिणीने जणू कल्पवृक्ष उपटून टाकला होता. कंठ सुकून गेला होता, तोंडातून शब्द निघत नव्हता, जणू पाण्याविना पहिना नावाची मासोळी तडफडत होती.॥ १॥

मूल (चौपाई)

पुनि कह कटु कठोर कैकेई।
मनहुँ घाय महुँ माहुर देई॥
जौं अंतहुँ अस करतबु रहेऊ।
मागु मागु तुम्ह केहिं बल कहेऊ॥

अनुवाद (हिन्दी)

कैकेयी पुन्हा कटू व कठोर बोलली. जणू जखमेवर विष चोळत होती. ती म्हणाली, ‘शेवटी जर असे करायचे होते, तर तुम्ही कोणत्या जोरावर ‘माग, माग,’ असे म्हणत होता?॥ २॥

मूल (चौपाई)

दुइ कि होइ एक समय भुआला।
हँसब ठठाइ फुलाउब गाला॥
दानि कहाउब अरु कृपनाई।
होइ कि खेम कुसल रौताई॥

अनुवाद (हिन्दी)

हे राजा, खदखदून हसणे आणि गाल फुगविणे या दोन्ही गोष्टी एकाच वेळी होतात काय? दानीही म्हणवायचे आणि कंजूषपणाही करायचा. राजपूतपणात खुशाली कधी असते काय? लढाईत बहादुरी दाखवावी आणि कुठे प्रहारही लागायचा नाही, असे कसे घडेल?॥ ३॥

मूल (चौपाई)

छाड़हु बचनु कि धीरजु धरहू।
जनि अबला जिमि करुना करहू॥
तनु तिय तनय धामु धनु धरनी।
सत्यसंध कहुँ तृन सम बरनी॥

अनुवाद (हिन्दी)

एक तर प्रतिज्ञा सोडून द्या किंवा धीर धरा. असे अबलेप्रमाणे रडत व डोके आपटत बसू नका. सत्यव्रती पुरुषाला शरीर, स्त्री, पुत्र, घर, धन आणि पृथ्वी हे सर्व गवताच्या काडीप्रमाणे तुच्छ आहे, असे म्हटले जाते.’॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

मरम बचन सुनि राउ कह कहु कछु दोषु न तोर।
लागेउ तोहि पिसाच जिमि कालु कहावत मोर॥ ३५॥

अनुवाद (हिन्दी)

कैकेयीचे मर्मभेदी शब्द ऐकून राजे म्हणाले, ‘तू तुला हवे ते म्हण, तुझा काही दोष नाही. माझा मृत्यू पिशाच होऊन तुझ्यात शिरला आहे. तोच तुझा बोलविता धनी आहे.॥ ३५॥

मूल (चौपाई)

चहत न भरत भूपतहि भोरें।
बिधि बस कुमति बसी जिय तोरें॥
सो सबु मोर पाप परिनामू।
भयउ कुठाहर जेहिं बिधि बामू॥

अनुवाद (हिन्दी)

भरताला चुकूनही राजपदाची इच्छा नाही. दुर्दैवाने तुझ्याच मनात दुर्बुद्धी आली आहे. हे सर्व माझ्या पापांचे फळ होय. त्यामुळे विधाता अवेळी प्रतिकूल झाला आहे.॥ १॥

मूल (चौपाई)

सुबस बसिहि फिरि अवध सुहाई।
सब गुन धाम राम प्रभुताई॥
करिहहिं भाइ सकल सेवकाई।
होइहि तिहुँ पुर राम बड़ाई॥

अनुवाद (हिन्दी)

तू उध्वस्त केलेली ही सुंदर अयोध्या पुन्हा व्यवस्थितपणे वसेल आणि समस्त गुणांची खाण असलेल्या श्रीरामाची सत्तासुद्धा प्रस्थापित होईल. सर्व भाऊ त्याची सेवा करतील आणि त्रैलोक्यात त्याची महत्ता वाढेल.॥ २॥

मूल (चौपाई)

तोर कलंकु मोर पछिताऊ।
मुएहुँ न मिटिहि न जाइहि काऊ॥
अब तोहि नीक लाग करु सोई।
लोचन ओट बैठु मुहु गोई॥

अनुवाद (हिन्दी)

फक्त तुझ्यावरील कलंक व माझा पश्चात्ताप मेल्यानेही नाहीसा होणार नाही. तो कशाही प्रकारे जाणार नाही. आता तुला बरे वाटेल ते कर. तोंड लपवून माझ्या डोळ्याआड बैस. मला तोंड दाखवू नकोस.॥ ३॥

मूल (चौपाई)

जब लगिजिऔं कहउँ कर जोरी।
तब लगि जनि कछु कहसि बहोरी॥
फिरि पछितैहसि अंत अभागी।
मारसि गाइ नहारू लागी॥

अनुवाद (हिन्दी)

मी हात जोडून सांगतो की, जोपर्यंत मी जिवंत आहे, तोपर्यंत आता आणखी काही बोलू नकोस. अग अभागिनी! शेवटी तुला पश्चात्ताप करावा लागणार. कारण चमडॺाची वादी बनविण्यासाठी तू गोहत्या करीत आहेस.’॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

परेउ राउ कहि कोटि बिधि काहे करसि निदानु।
कपट सयानि न कहति कछु जागति मनहुँ मसानु॥ ३६॥

अनुवाद (हिन्दी)

राजे अनेक प्रकारे समजावून म्हणाले, ‘तू हा सर्वनाश का करीत आहेस?’ आणि ते जमिनीवर कोसळले. परंतु कपट करण्यात चतुर कैकेयी काही बोलली नाही. जणू ती स्मशानात मौन बसून प्रेत-मंत्र सिद्ध करीत होती.॥ ३६॥

मूल (चौपाई)

राम राम रट बिकल भुआलू।
जनु बिनु पंख बिहंग बेहालू॥
हृदयँ मनाव भोरु जनि होई।
रामहि जाइ कहै जनि कोई॥

अनुवाद (हिन्दी)

राजा ‘राम-राम’ असे घोकत होते व पंख कापलेल्या पक्ष्याप्रमाणे व्याकूळ झाले होते. त्यांना वाटत होते की, सकाळ होऊ नये आणि कुणी जाऊन श्रीरामांना ही गोष्ट सांगू नये.॥ १॥

मूल (चौपाई)

उदउ करहु जनि रबि रघुकुल गुर।
अवध बिलोकि सूल होइहि उर॥
भूप प्रीति कैकइ कठिनाई।
उभय अवधि बिधि रची बनाई॥

अनुवाद (हिन्दी)

‘हे रघुकुलाचे मूळपुरुष सूर्य नारायणा, तुम्ही उद्या उगवू नका. अयोध्या व्याकूळ झालेली पाहून तुम्हांला फार दुःख होईल.’ राजांचे प्रेम आणि कैकेयीची निष्ठुरता ही दोन्ही विधात्याने दोन टोकाची निर्मिली होती.॥ २॥

मूल (चौपाई)

बिलपत नृपहि भयउ भिनुसारा।
बीना बेनु संख धुनि द्वारा॥
पढ़हिं भाट गुन गावहिं गायक।
सुनत नृपहि जनु लागहिं सायक॥

अनुवाद (हिन्दी)

विलाप करता करता सकाळ झाली. राजद्वारात वीणा, बासरी आणि शंख यांचे आवाज येऊ लागले. भाट बिरुदावली म्हणू लागले आणि गवई गुण-गान करू लागले. ते ऐकून राजांच्या हृदयात बाण रुतल्यासारखे वाटत होते.॥ ३॥

मूल (चौपाई)

मंगल सकल सोहाहिं न कैसें।
सहगामिनिहि बिभूषन जैसें॥
तेहि निसि नीद परी नहिं काहू।
राम दरस लालसा उछाहू॥

अनुवाद (हिन्दी)

ज्याप्रमाणे पतीबरोबर सती व्हायला निघालेल्या स्त्रीला आभूषणे आवडत नाहीत, त्याप्रमाणे राजाला ही मंगलवाद्ये आवडत नव्हती. श्रीरामचंद्रांच्या दर्शनाची लालसा आणि उत्साह यांमुळे त्या रात्री कुणालाच झोप आली नाही.॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

द्वार भीर सेवक सचिव कहहिं उदित रबि देखि।
जागेउ अजहुँ न अवधपति कारनु कवनु बिसेषि॥ ३७॥

अनुवाद (हिन्दी)

राजद्वारावर मंत्री व सेवकांची गर्दी झाली. सूर्य उगवलेला पाहून ते म्हणाले की, ‘असे काय कारण घडले की, अयोध्यापती दशरथ अद्याप जागे झाले नाहीत?॥ ३७॥

मूल (चौपाई)

पछिले पहर भूपु नित जागा।
आजु हमहि बड़ अचरजु लागा॥
जाहु सुमंत्र जगावहु जाई।
कीजिअ काजु रजायसु पाई॥

अनुवाद (हिन्दी)

महाराज नेहमी रात्रींच्या शेवटच्या प्रहरी जागे होत असतात. परंतु आज आम्हांला आश्चर्य वाटते. हे सुमंत्रा, तुम्ही जाऊन राजांना जागे करा. त्यांची आज्ञा मिळताच आम्ही सर्व कामाला लागू.’॥ १॥

मूल (चौपाई)

गए सुमंत्रु तब राउर माहीं।
देखि भयावन जात डेराहीं॥
धाइ खाइ जनु जाइ न हेरा।
मानहुँ बिपति बिषाद बसेरा॥

अनुवाद (हिन्दी)

तेव्हा सुमंत्र राजमहालात गेले, परंतु महाल भयानक दिसू लागला, तेव्हा आत शिरताना त्यांना भय वाटू लागले. वाटत होते की, जणू कोणी भूत समोर असून ते धावत येऊन कापून खाईल. परंतु ते दिसत नव्हते. जणू विपत्ती व विषाद यांनी तेथे मुक्काम ठोकला होता.॥ २॥

मूल (चौपाई)

पूछें कोउ न ऊतरु देई।
गए जेहिं भवन भूप कैकेई॥
कहि जयजीव बैठ सिरु नाई।
देखि भूप गति गयउ सुखाई॥

अनुवाद (हिन्दी)

विचारल्यावर कोणी बोलत नव्हते. सुमंत्र जेथे राजा व कैकेयी ही दोघे होती, त्या महालात शिरले. ‘जय जीव’ म्हणून त्यांनी मस्तकलववून अभिवादन केले व बसले. राजांची अवस्था पाहून ते गर्भगळित झाले.॥ ३॥

मूल (चौपाई)

सोच बिकल बिबरन महि परेऊ।
मानहुँ कमल मूलु परिहरेऊ॥
सचिउ सभीत सकइ नहिं पूँछी।
बोली असुभ भरी सुभ छूँछी॥

अनुवाद (हिन्दी)

त्यांना दिसले की, महाराज काळजीने व्याकूळ झाले आहेत.त्यांचा चेहरा पडला आहे. एखादे कमळ मुळापासून उपटून कोमजलेल्या अवस्थेत पडलेले असावे, तसे राजे जमिनीवर पडले होते. तेव्हा अशुभपूर्ण आणि शुभाचा लवलेश नसलेल्या वाणीने कैकेयी म्हणाली,॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

परी न राजहि नीद निसि हेतु जान जगदीसु।
रामु रामु रटि भोरु किय कहइ न मरमु महीसु॥ ३८॥

अनुवाद (हिन्दी)

‘राजांना रात्रभर झोप आली नाही. कारण काय ते परमेश्वराला माहीत. यांनी ‘राम राम’ असे म्हणत सकाळ झाल्याचे सूचित केले, परंतु याचे रहस्य महाराज काहीही सांगत नाहीत.॥ ३८॥

मूल (चौपाई)

आनहु रामहि बेगि बोलाई।
समाचार तब पूँछेहु आई॥
चलेउ सुमंत्रु राय रुख जानी।
लखी कुचालि कीन्हि कछु रानी॥

अनुवाद (हिन्दी)

तुम्ही त्वरित रामाला बोलावून आणा आणि मग खुशाली विचारा.’ राजांचा कल पाहून सुमंत्र निघाले. राणीने काही दुष्ट चाल खेळली आहे, हे त्यांनी ओळखले.॥ १॥

मूल (चौपाई)

सोच बिकल मग परइ न पाऊ।
रामहि बोलि कहिहि का राऊ॥
उर धरि धीरजु गयउ दुआरें।
पूँछहिं सकल देखि मनु मारें॥

अनुवाद (हिन्दी)

सुमंत्र काळजीने व्याकूळ झाले. वाटेत पाय धडपणे पडत नव्हते. ते विचार करू लागले की ‘श्रीरामांना बोलावून राजे काय सांगतील?’ मन घट्ट करून ते राजद्वारी आले. त्यांना उदास झालेले पाहून लोक विचारू लागले.॥ २॥

मूल (चौपाई)

समाधानु करि सो सबही का।
गयउ जहाँ दिनकर कुल टीका॥
राम सुमंत्रहि आवत देखा।
आदरु कीन्ह पिता सम लेखा॥

अनुवाद (हिन्दी)

सर्व लोकांना समजावून सांगत सुमंत्र सूर्यकुलाचे तिलक श्रीरामचंद्र यांच्याकडे गेले. श्रीरामांनी सुमंत्रांना येताना पाहून पित्यासमान मानून त्यांना सन्मान दिला.॥ ३॥

मूल (चौपाई)

निरखि बदनु कहि भूप रजाई।
रघुकुलदीपहि चलेउ लेवाई॥
रामु कुभाँति सचिव सँग जाहीं।
देखि लोग जहँ तहँ बिलखाहीं॥

अनुवाद (हिन्दी)

श्रीरामांच्या मुखाकडे पहात राजांची आज्ञा सांगून सुमंत्र रघुकुलदीपक श्रीरामचंद्रांना आपल्याबरोबर घेऊन निघाले. ते सुमंत्राबरोबर लवाजम्याशिवाय जात असल्याचे पाहून जिकडे तिकडे लोक खिन्न होऊ लागले.॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

जाइ दीख रघुबंसमनि नरपति निपट कुसाजु।
सहमि परेउ लखि सिंघिनिहि मनहुँ बृद्ध गजराजु॥ ३९॥

अनुवाद (हिन्दी)

रघुवंशमणी श्रीरामचंद्रांनी जाऊन पाहिले तर ज्याप्रमाणे सिंहिणीला पाहून एखादा म्हातारा हत्ती घाबरून पडला असावा, तसे महाराज वाईट अवस्थेत पडले होते.॥ ३९॥

मूल (चौपाई)

सूखहिं अधर जरइ सबु अंगू।
मनहुँ दीन मनिहीन भुअंगू॥
सरुष समीप दीखि कैकेई।
मानहुँ मीचु घरीं गनि लेई॥

अनुवाद (हिन्दी)

राजांचे ओठ सुकून गेले होते आणि संपूर्ण शरीर पोळून निघत होते. मण्याविना साप दुःखी व असहाय्य होतो, तसे राजे दिसत होते. जवळच रागाने जळफळत असलेल्या कैकेयीला त्यांनी पाहिले. जणू प्रत्यक्ष मृत्यूच जवळ बसून राजांच्या अंतिम काळाचे क्षण मोजत होता.॥ १॥