०३ मंथरेचा बुद्धिभ्रंश

दोहा

मूल (दोहा)

नामु मंथरा मंदमति चेरी कैकइ केरि।
अजस पेटारी ताहि करि गई गिरा मति फेरि॥ १२॥

अनुवाद (हिन्दी)

मंथरा नावाची कैकेयीची एक मंदबुद्धीची दासी होती. तिला अपकीर्तीचा पेटारा बनवून सरस्वती तिची बुद्धी पालटून निघून गेली.॥ १२॥

मूल (चौपाई)

दीख मंथरा नगरु बनावा।
मंजुल मंगल बाज बधावा॥
पूछेसि लोगन्ह काह उछाहू।
राम तिलकु सुनि भा उर दाहू॥

अनुवाद (हिन्दी)

मंथरेला दिसले की नगर सजविले आहे. सुंदर आनंदोत्सव चालले आहेत. तिने लोकांना विचारले की, ‘हा कसला उत्सव आहे?’ श्रीरामचंद्रांच्या राजतिलकाची वार्ता ऐकताच तिचे मन जळफळू लागले.॥ १॥

मूल (चौपाई)

करइ बिचारु कुबुद्धि कुजाती।
होइ अकाजु कवनि बिधि राती॥
देखि लागि मधु कुटिल किराती।
जिमि गवँ तकइ लेउँ केहि भाँती॥

अनुवाद (हिन्दी)

ती दुर्बुद्धी व नीच जातीची दासी विचार करू लागली की, कशा प्रकारे हे कार्य रात्रीतल्या रात्री बिघडून टाकता येईल. ज्याप्रमाणे एखादी भिल्लीण मधाचे पोळे पाहून दबा धरून बसते की, हे कसे उपटून टाकावे?॥ २॥

मूल (चौपाई)

भरत मातु पहिं गइ बिलखानी।
का अनमनि हसि कह हँसि रानी॥
ऊतरु देइ न लेइ उसासू।
नारि चरित करि ढारइ आँसू॥

अनुवाद (हिन्दी)

ती उदास होऊन भरताची माता कैकेयी हिच्याकडे गेली. राणी कैकेयीने विचारले की, ‘तू अशी उदास का?’ मंथरेने काहीही उत्तर दिले नाही. फक्त मोठॺाने उसासे टाकू लागली आणि स्त्रीस्वभावानुसार अश्रू ढाळू लागली.॥ ३॥

मूल (चौपाई)

हँसि कह रानि गालु बड़ तोरें।
दीन्ह लखन सिख अस मन मोरें॥
तबहुँ न बोल चेरि बड़ि पापिनि।
छाड़इ स्वास कारि जनु साँपिनि॥

अनुवाद (हिन्दी)

राणी हसून म्हणाली की ‘तुझे गाल रागाने फुगलेले आहेत. मला वाटते की, लक्ष्मणाने तुला शिक्षा केली असावी.’ तरीही ती महापापी दासी काहीही बोलली नाही. ती असे दीर्घ श्वास सोडत राहिली की, जणू काळी नागीण फूत्कार टाकीत असावी.॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

सभय रानि कह कहसि किन कुसल रामु महिपालु।
लखनु भरतु रिपुदमनु सुनि भा कुबरी उर सालु॥ १३॥

अनुवाद (हिन्दी)

तेव्हा राणी कैकयीने घाबरून विचारले, ‘अग, सांगत का नाहीस? राजा, श्रीरामचंद्र, लक्ष्मण, भरत व शत्रुघ्न हे सुखरूप तर आहेत ना?’ हे ऐकून कुबडॺा मंथरेच्या हृदयात फार वेदना झाली.॥ १३॥

मूल (चौपाई)

कत सिख देइ हमहि कोउ माई।
गालु करब केहि कर बलु पाई॥
रामहि छाड़ि कुसल केहि आजू।
जेहि जनेसु देइ जुबराजू॥

अनुवाद (हिन्दी)

ती म्हणू लागली, ‘हे माई, मला कोण शिक्षा देणार? मी कुणाच्या जोरावर बडबड करणार? रामचंद्राला सोडून आज कोण सुखरूप आहे? कारण महाराज त्याला युवराजपद देत आहेत.॥ १॥

मूल (चौपाई)

भयउ कौसिलहि बिधि अति दाहिन।
देखत गरब रहत उर नाहिन॥
देखहु कस न जाइ सब सोभा।
जो अवलोकि मोर मनु छोभा॥

अनुवाद (हिन्दी)

कौसल्येला आज विधाता फारच अनुकूल आहे, हे पाहून तिच्या मनात गर्व मावेनासा झाला आहे. तुम्ही स्वतः जाऊन सर्व शोभा का पाहून येत नाही? त्यामुळे माझ्या मनात क्षोभ उत्पन्न झाला आहे.॥ २॥

मूल (चौपाई)

पूतु बिदेस न सोचु तुम्हारें।
जानति हहु बस नाहु हमारें॥
नीद बहुत प्रिय सेज तुराई।
लखहु न भूप कपट चतुराई॥

अनुवाद (हिन्दी)

तुमचा पुत्र परदेशी आहे आणि तुम्हांला त्याची काही काळजी नाही. राजा आपल्या मुठीत आहे, असे तुम्हांला वाटते. तुम्हांला तर गाद्या-गिरद्या व पलंगावर लोळत झोप घ्यायला फार आवडते. राजांचे कपटी चातुर्य तुम्हांला दिसत नाही.’॥ ३॥

मूल (चौपाई)

सुनि प्रिय बचन मलिन मनु जानी।
झुकी रानि अब रहु अरगानी॥
पुनि अस कबहुँ कहसि घरफोरी।
तब धरि जीभ कढ़ावउँ तोरी॥

अनुवाद (हिन्दी)

मंथरेचे बोलणे ऐकून व ती खोटॺा मनाची आहे, असे समजून राणी रागावून म्हणाली, ‘बस्स्. आता गप्प बैस. घरात दुफळी माजविणारी कुठली! पुन्हा कधी असे बोललीस तर तुझी जीभ हासडून टाकीन.’॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

काने खोरे कूबरे कुटिल कुचाली जानि।
तिय बिसेषि पुनि चेरि कहि भरतमातु मुसुकानि॥ १४॥

अनुवाद (हिन्दी)

चकण्या, लंगडॺा व कुबडॺांना दुष्ट आणि वाईट चालीचे मानले पाहिजे. त्यांतही स्त्री आणि विशेषतः दासी.’ असे म्हणत भरताची माता कैकेयी हिने हास्य केले.॥ १४॥

मूल (चौपाई)

प्रियबादिनि सिख दीन्हिउँ तोही।
सपनेहुँ तो पर कोपु न मोही॥
सुदिनु सुमंगल दायकु सोई।
तोर कहा फुर जेहि दिन होई॥

अनुवाद (हिन्दी)

मग म्हणाली, ‘हे प्रिय वचन बोलणाऱ्या मंथरे, मी तुला शिक्षा म्हणून रागावले. तुझा मला स्वप्नातही राग येणार नाही. ज्यादिवशी तुझे म्हणणे खरे होईल, अर्थात रामाला राजतिलक होईल, तोच मंगलदायी शुभ दिवस ठरेल.॥ १॥

मूल (चौपाई)

जेठ स्वामि सेवक लघु भाई।
यह दिनकर कुल रीति सुहाई॥
राम तिलकु जौं साँचेहुँ काली।
देउँ मागु मन भावत आली॥

अनुवाद (हिन्दी)

मोठा भाऊ हा स्वामी आणि लहान भाऊ सेवक असतो. ही सूर्यवंशातील सुयोग्य रीत आहे. जर खरोखर उद्याच श्रीरामाचा राज्याभिषेक असेल, तर हे सखी, मनाला आवडेल ते माग. मी देईन.॥ २॥

मूल (चौपाई)

कौसल्या सम सब महतारी।
रामहि सहज सुभायँ पिआरी॥
मो पर करहिं सनेहु बिसेषी।
मैं करि प्रीति परीछा देखी॥

अनुवाद (हिन्दी)

रामांना सरळ स्वभावामुळे सर्व माता कौसल्येसारख्याच प्रिय आहेत. माझ्यावर तर ते विशेष प्रेम करतात. मी त्यांच्या प्रेमाची परीक्षा घेऊन पाहिली आहे.॥ ३॥

मूल (चौपाई)

जौं बिधि जनमु देइ करि छोहू।
होहुँ राम सिय पूत पुतोहू॥
प्रान तें अधिक रामु प्रिय मोरें।
तिन्ह कें तिलक छोभु कस तोरें॥

अनुवाद (हिन्दी)

जर विधात्याने मला कृपा करून पुढचा जन्म दिला, तर मला श्रीरामचंद्र पुत्र व सीता ही सून म्हणून मिळो. श्रीराम हा मला प्राणांहून अधिक प्रिय आहे. त्याच्या राजतिलकामुळे तुला क्षोभ का झाला?॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

भरत सपथ तोहि सत्य कहु परिहरि कपट दुराउ।
हरष समय बिसमउ करसि कारन मोहि सुनाउ॥ १५॥

अनुवाद (हिन्दी)

तुला भरताची शपथ आहे. कपट सोडून खरे खरे सांग. तू आनंदाच्या प्रसंगी दुःख का करीत आहेस, याचे कारण मला सांग.’॥ १५॥

मूल (चौपाई)

एकहिं बार आस सब पूजी।
अब कछु कहब जीभ करि दूजी॥
फोरै जोगु कपारु अभागा।
भलेउ कहत दुख रउरेहि लागा॥

अनुवाद (हिन्दी)

मंथरा म्हणाली, ‘सर्व आशा एकाच वेळी बोलण्यामुळे पूर्ण झाल्या. आता दुसरी जीभ लावून सांगते. माझे दुर्दैवी कपाळ फोडून टाकण्याजोगे आहे. चांगली गोष्ट सांगितल्यावर सुद्धा तुम्हांला दुःख वाटते.॥ १॥

मूल (चौपाई)

कहहिं झूठि फुरि बात बनाई।
ते प्रिय तुम्हहि करुइ मैं माई॥
हमहुँ कहबि अब ठकुरसोहाती।
नाहिं त मौन रहब दिनु राती॥

अनुवाद (हिन्दी)

जे खऱ्या-खोटॺा गोष्टी रचून सांगतात, हे माई, तेच तुम्हांला आवडतात आणि मी कडवट वाटते. आता मीसुद्धा तोंड पाहून बोलत गाईन. नाहीतर दिवस-रात्र गप्प राहीन.॥ २॥

मूल (चौपाई)

करि कुरूप बिधि परबस कीन्हा।
बवा सो लुनिअ लहिअ जो दीन्हा॥
कोउ नृप होउ हमहि का हानी।
चेरि छाड़ि अब होब कि रानी॥

अनुवाद (हिन्दी)

विधात्याने कुरूप बनवून मला पराधीन केले आहे. यात दुसऱ्याचा काय दोष? जे पेरले ते घेते, दिले ते मिळविते. कुणी का राजा होईना, आमचे काय जाते? दासी होण्याशिवाय तुम्ही आता राणी थोडॺाच राहाणार?॥ ३॥

मूल (चौपाई)

जारै जोगु सुभाउ हमारा।
अनभल देखि न जाइ तुम्हारा॥
तातें कछुक बात अनुसारी।
छमिअ देबि बड़ि चूक हमारी॥

अनुवाद (हिन्दी)

आमचा स्वभाव तर जाळण्याजोगाच आहे. कारण मला तुमचे अहित पहावत नाही, म्हणून मी सूतोवाच केले होते. परंतु हे देवी, आमची मोठी चूक झाली, क्षमा करा.’॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

गूढ़ कपट प्रिय बचन सुनि तीय अधरबुधि रानि।
सुरमाया बस बैरिनिहि सुहृद जानि पतिआनि॥ १६॥

अनुवाद (हिन्दी)

स्त्री अस्थिर बुद्धीची असल्यामुळे आणि देवांच्या मायेला बळी पडल्यामुळे कैकेयी राणी ही मंथरेची कपटपूर्ण रहस्यमय वाणी ऐकून वैरीण मंथरेला आपली हितचिंतक समजून तिच्यावर विश्वास करू लागली.॥ १६॥

मूल (चौपाई)

सादर पुनि पुनि पूँछति ओही।
सबरी गान मृगी जनु मोही॥
तसि मति फिरी अहइजसि भाबी।
रहसी चेरि घात जनु फाबी॥

अनुवाद (हिन्दी)

वारंवार राणी आदरपूर्वक विचारत होती. भिल्लिणीच्या गाण्याने हरिणी मोहित व्हावी, तशी राणी मोहित झाली. जसे घडायचे होते, त्याप्रमाणे कैकेयीची बुद्धी फिरली. आपला डाव साधलेला पाहून मंथरा खूष झाली.॥ १॥

मूल (चौपाई)

तुम्ह पूँछहु मैं कहत डेराऊँ।
धरेहु मोर घरफोरी नाऊँ॥
सजि प्रतीति बहुबिधि गढ़ि छोली।
अवध साढ़साती तब बोली॥

अनुवाद (हिन्दी)

‘तुम्ही विचारता, परंतु सांगताना भीती वाटते. कारण तुम्ही पूर्वीच माझे नाव घरात फूट पाडणारी असे ठेवले आहे.’ अशाप्रकारे घोळून घोळून आणि राणीला पूर्ण विश्वास वाटू लागल्यावर ती अयोध्येची साडेसाती असलेली मंथरा म्हणाली,॥ २॥

मूल (चौपाई)

प्रिय सिय रामु कहा तुम्ह रानी।
रामहि तुम्ह प्रिय सो फुरि बानी॥
रहा प्रथम अब ते दिन बीते।
समउ फिरें रिपु होहिं पिरीते॥

अनुवाद (हिन्दी)

‘हे राणी, तुम्ही जे म्हणालात की, मला सीता-राम प्रिय आहेत व रामांना तुम्ही, ही गोष्ट खरी आहे. परंतु ही गोष्ट पूर्वी होती. आता ते दिवस सरले. दिवस फिरले की, मित्रसुद्धा शत्रू बनतात.॥ ३॥

मूल (चौपाई)

भानु कमल कुल पोषनिहारा।
बिनु जल जारि करइ सोइ छारा॥
जरि तुम्हारि चह सवति उखारी।
रूँधहु करि उपाउ बर बारी॥

अनुवाद (हिन्दी)

सूर्य हा कमळाच्या ताटव्याचे पालन करणारा आहे, परंतु पाण्याविना तोच सूर्य कमळांना करपून टाकतो. सवत कौसल्या ही तुम्हांला समूळ उपटून टाकू इच्छिते. म्हणून उपाय करून चांगले कुंपण घालून तिला आवर घाला.॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

तुम्हहि न सोचु सोहाग बल निज बस जानहु राउ।
मन मलीन मुह मीठ नृपु राउर सरल सुभाउ॥ १७॥

अनुवाद (हिन्दी)

तुम्हांला आपल्या सौभाग्याच्या खोटॺा बळामुळे काहीच विचार उरला नाही. तुम्हांला वाटते की, राजा आपल्या मुठीत आहे. परंतु राजा हे मनाने कपटी आणि तोंडाने गोड आहेत आणि तुमचा स्वभाव सरळ आहे.॥ १७॥

मूल (चौपाई)

चतुर गँभीर राम महतारी।
बीचु पाइ निज बात सँवारी॥
पठए भरतु भूप ननिअउरें।
राम मातु मत जानब रउरें॥

अनुवाद (हिन्दी)

रामाची आई कौसल्या ही मोठी चतुर व पत्ता लागू न देणारी आहे. तिने वेळ येताच आपले काम साधले. राजांनी भरताला आजोळी पाठविले, ते रामाच्या आईच्या सल्‍ल्यानेच, असे समजा.॥ १॥

मूल (चौपाई)

सेवहिं सकल सवति मोहि नीकें।
गरबित भरत मातु बल पी कें॥
सालु तुम्हार कौसिलहि माई।
कपट चतुर नहिं होइ जनाई॥

अनुवाद (हिन्दी)

कौसल्येला असे वाटते की, सर्व सवती माझी व्यवस्थित सेवा करतात. एकटी भरताची आई पतीच्या जोरावर गर्विष्ठ असते. म्हणून हे माई, कौसल्येला तुम्ही फार खटकत आहात. परंतु ती कपट करण्यामध्ये चतुर आहे, म्हणून तिच्या मनातला भाव जाणता येत नाही.॥ २॥

मूल (चौपाई)

राजहि तुम्ह पर प्रेमु बिसेषी।
सवति सुभाउ सकइ नहिं देखी॥
रचि प्रपंचु भूपहि अपनाई।
राम तिलक हित लगन धराई॥

अनुवाद (हिन्दी)

राजांचे तुमच्यावर खास प्रेम आहे. स्वामींचा स्वभाव माहीत असल्यामुळे कौसल्येला हे पहावत नाही. म्हणून तिने जाळे पसरून राजाला वश करून घेतले व भरताच्या अनुपस्थितीत रामाच्या राजतिलकाचा मुहूर्त ठरवून टाकला.॥ ३॥

मूल (चौपाई)

यह कुल उचित राम कहुँ टीका।
सबहि सोहाइ मोहि सुठि नीका॥
आगिलि बात समुझि डरु मोही।
देउ दैउ फिरि सो फलु ओही॥

अनुवाद (हिन्दी)

रामाला राजतिलक व्हावा, ही रघुकुलातील रीत योग्यच आहे आणि ती सर्वांनाच बरी वाटते. मलाही ती फार चांगली वाटते. परंतु पुढचा विचार केल्यावर मला भीती वाटते. दैव फिरून त्याचे फळ त्या कौसल्येलाच मिळो.’॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

रचि पचि कोटिक कुटिलपन कीन्हेसि कपट प्रबोधु।
कहिसि कथा सत सवति कै जेहि बिधि बाढ़ बिरोधु॥ १८॥

अनुवाद (हिन्दी)

अशा प्रकारे कोटॺवधी कुटिलपणाच्या गोष्टी घोळून घोळून मंथरेने कैकेयीला उलट-सुलट सांगितले व कित्येक सवतींच्या गोष्टी विरोध वाढावा, या हेतूने रचून सांगितल्या.॥ १८॥

मूल (चौपाई)

भावी बस प्रतीतिउर आई।
पूँछ रानि पुनि सपथ देवाई॥
का पूँछहु तुम्ह अबहुँ न जाना।
निज हित अनहित पसु पहिचाना॥

अनुवाद (हिन्दी)

भवितव्याच्या अधीन झाल्यामुळे कैकेयीच्या मनात विश्वास वाटू लागला. राणी पुन्हा शपथ घालून विचारू लागली, तेव्हा मंथरा म्हणाली, ‘विचारता काय? अहो, तुम्हांला अजुनी समजले नाही? आपले बरे-वाईट पशूंनासुद्धा समजते.॥ १॥

मूल (चौपाई)

भयउ पाखु दिन सजत समाजू।
तुम्ह पाई सुधि मोहि सन आजू॥
खाइअ पहिरिअ राज तुम्हारें।
सत्य कहें नहिं दोषु हमारें॥

अनुवाद (हिन्दी)

समारंभाचे सामान गोळा करण्यात पंधरवडा गेला आणि तुम्हांला आज माझ्याकडून समजत आहे? मी तुमचे मीठ खाते, म्हणून खरे बोलण्यात मला कसलाही दोष नाही.॥ २॥

मूल (चौपाई)

जौं असत्य कछु कहब बनाई।
तौ बिधि देइहि हमहि सजाई॥
रामहि तिलक कालि जौं भयऊ।
तुम्ह कहुँ बिपति बीजु बिधि बयऊ॥

अनुवाद (हिन्दी)

जर मी पदरचे खोटे सांगत असेन, तर ईश्वर मला दंड देईल. जर उद्या रामाला राजतिलक झाला, तर तुमच्यासाठी विधात्याने संकटाचे बीज पेरले, असे समजा.॥ ३॥

मूल (चौपाई)

रेख खँचाइ कहउँ बलु भाषी।
भामिनि भइहु दूध कइ माखी॥
जौं सुत सहित करहु सेवकाई।
तौ घर रहहु न आन उपाई॥

अनुवाद (हिन्दी)

मी अगदी निश्चितपणे सांगते की, राणीसाहेब! तुम्ही आता दुधात पडलेल्या माशीप्रमाणे त्याज्य झाला आहात. जर मुलासह कौसल्येची चाकरी कराल, तर घरात रहाता येईल. दुसरा कोणताही मार्ग नाही.॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

कद्रूँ बिनतहि दीन्ह दुखु तुम्हहि कौसिलाँ देब।
भरतु बंदिगृह सेइहहिं लखनु राम के नेब॥ १९॥

अनुवाद (हिन्दी)

कद्रूने ज्याप्रमाणे विनतेला दुःख दिले, तसे तुम्हांला कौसल्या देईल. भरत कारावास भोगेल आणि लक्ष्मण रामाचा सहकारी असेल.’॥ १९॥

मूल (चौपाई)

कैकयसुता सुनत कटु बानी।
कहि न सकइ कछु सहमि सुखानी॥
तन पसेउ कदली जिमि काँपी।
कुबरीं दसन जीभ तब चाँपी॥

अनुवाद (हिन्दी)

कैकेयी मंथरेची कटू वाणी ऐकताच घाबरून जाऊन काही बोलू शकली नाही. तिला घाम फुटला आणि ती केळीप्रमाणे थरथरू लागली. मग कुबडॺा मंथरेने आपली जीभ चावली. (कदाचित हे भयंकर चित्र ऐकून कैकेयीचे हृदय बंद पडेल, अशी भीती तिला वाटली.)॥ १॥

मूल (चौपाई)

कहि कहि कोटिककपट कहानी।
धीरजु धरहु प्रबोधिसि रानी॥
फिराकरमु प्रिय लागि कुचाली।
बकिहि सराहइ मानि मराली॥

अनुवाद (हिन्दी)

मग तिने कपटाच्या पुष्कळ गोष्टी सांगून राणीला बरेच समजाविले की, ‘धीर धरा.’ कैकेयीचे दैव फिरले. तिला दुष्टपणा आवडू लागला. ती बगळी मंथरेला हंसी समजून तिची तारीफ करू लागली.॥ २॥

मूल (चौपाई)

सुनु मंथरा बात फुरि तोरी।
दहिनि आँखि नित फरकइ मोरी॥
दिन प्रति देखउँ राति कुसपने।
कहउँ न तोहि मोह बस अपने॥

अनुवाद (हिन्दी)

कैकेयी म्हणाली, ‘मंथरे, ऐक. तुझे म्हणणे खरे आहे. माझा उजवा डोळा सारखा फडफडत आहे. मला रोज रात्री वाईट स्वप्ने दिसतात, परंतु आपल्या अजाणतेपणाने तुला सांगत नाही, इतकेच.॥ ३॥

मूल (चौपाई)

काह करौं सखि सूध सुभाऊ।
दाहिन बाम न जानउँ काऊ॥

अनुवाद (हिन्दी)

सखे, काय करू? माझा स्वभाव पडला साधा-भोळा. मला डावे-उजवे काही समजत नाही.॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

अपनें चलत न आजु लगि अनभल काहुक कीन्ह।
केहिं अघ एकहि बार मोहि दैअँ दुसह दुखु दीन्ह॥ २०॥

अनुवाद (हिन्दी)

मी आजपर्यंत कधीच कुणाचे वाईट केले नाही. मग दैवाने मला एकदमच हे असह्य दुःख का दिले, कुणास ठाऊक?॥ २०॥

मूल (चौपाई)

नैहर जनमु भरब बरु जाई।
जिअत न करबि सवति सेवकाई॥
अरि बस दैउ जिआवत जाही।
मरनु नीक तेहि जीवन चाही॥

अनुवाद (हिन्दी)

हवे तर मी माहेरी जाऊन तिथेच आयुष्य घालवीन, परंतु जिवंतपणी सवतीची चाकरी करणार नाही. दैव ज्याला जिवंतपणी शत्रूच्या ताब्यात ठेवते, त्याने जगण्यापेक्षा मरणेच चांगले.’॥ १॥

मूल (चौपाई)

दीन बचन कह बहुबिधि रानी।
सुनि कुबरीं तियमाया ठानी॥
अस कस कहहु मानि मन ऊना।
सुखु सोहागु तुम्ह कहुँ दिन दूना॥

अनुवाद (हिन्दी)

राणी दीनवाणी होऊन बरेच काही बोलली. ते ऐकल्यावर कुबडीने स्त्रीचरित्र दाखविले. ती म्हणाली, ‘तुम्ही मनात निराश होऊन असे का म्हणता? तुमचे सुख-सौभाग्य दिवसेंदिवस वाढत राहील.॥ २॥

मूल (चौपाई)

जेहिं राउर अति अनभल ताका।
सोइ पाइहि यहु फलु परिपाका॥
जब तें कुमत सुना मैं स्वामिनि।
भूख न बासर नीद न जामिनि॥

अनुवाद (हिन्दी)

जिला तुमचे वाईट व्हावे, अशी इच्छा आहे, तिलाच हा परिणामभोगावा लागेल. हे स्वामिनी, जेव्हापासून मी ही वाईट मसलत ऐकली आहे, तेव्हापासून मला दिवसा भूक लागत नाही आणि रात्री झोपही येत नाही.॥ ३॥

मूल (चौपाई)

पूँछेउँ गुनिन्ह रेख तिन्ह खाँची।
भरत भुआल होहिं यह साँची॥
भामिनि करहु त कहौं उपाऊ।
है तुम्हरीं सेवा बस राऊ॥

अनुवाद (हिन्दी)

मी ज्योतिष्यांना विचारले, तेव्हा त्यांनी गणित मांडून सांगितले की, भरतच राजा होईल, हे सत्य आहे. हे महाराणी! तुम्ही करणार असाल, तर मी उपाय सांगते. राजा तुमच्या सेवेच्या अधीन आहेतच.’॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

परउँ कूप तुअ बचन पर सकउँ पूत पति त्यागि।
कहसि मोर दुखु देखि बड़ कस न करब हित लागि॥ २१॥

अनुवाद (हिन्दी)

कैकेयी म्हणाली, ‘तू सांगितल्यावर मी विहिरीत उडी घेईन, पुत्र व पतींना सोडू शकेन. तू जर माझे मोठे दुःख पाहून काही सांगत आहेस, तर मग मी आपल्या हितासाठी ते का करणार नाही?’॥ २१॥

मूल (चौपाई)

कुबरीं करि कबुली कैकेई।
कपट छुरी उर पाहन टेई॥
लखइ न रानि निकट दुखु कैसें।
चरइ हरित तिन बलिपसु जैसें॥

अनुवाद (हिन्दी)

कुबडीने कैकेयीकडून सर्व प्रकारे कबूल करून घेतले आणि कपटरूपी सुरीला आपल्या पाषाणहृदयावर धार लावली. बळीचा पशू ज्याप्रमाणे हिरवे गवत अजाणपणे खात असताना मृत्यू जाणत नाही, त्याप्रमाणे कैकेयीचे झाले. तिला आपल्यावर कोसळणारे दुःख कळले नाही.॥ १॥

मूल (चौपाई)

सुनत बात मृदु अंत कठोरी।
देति मनहुँ मधु माहुर घोरी॥
कहइ चेरि सुधि अहइ कि नाहीं।
स्वामिनि कहिहु कथा मोहि पाहीं॥

अनुवाद (हिन्दी)

मंथरेच्या गोष्टी ऐकायला गोड होत्या, परंतु परिणामी भयानक होत्या. ती जणू मधात कालवून विष पाजवीत होती. दासी म्हणाली, ‘हे स्वामिनी, तुम्ही मला एक गोष्ट सांगितली होती, ती आठवते ना?’॥ २॥

मूल (चौपाई)

दुइ बरदान भूप सन थाती।
मागहु आजु जुड़ावहु छाती॥
सुतहि राजु रामहि बनबासू।
देहु लेहु सब सवति हुलासू॥

अनुवाद (हिन्दी)

तुमचे दोन वर राजांच्याजवळ अमानत ठेवलेले आहेत. आज ते राजांकडून मागून घेऊन मनाचे समाधान करून घ्या. पुत्राला राज्य आणि रामाला वनवास द्या आणि सवतीचा सर्व आनंद तुम्ही मिळवा.॥ ३॥

मूल (चौपाई)

भूपति राम सपथ जब करई।
तब मागेहु जेहिं बचनु न टरई॥
होइ अकाजु आजु निसि बीतें।
बचनु मोर प्रिय मानेहु जी तें॥

अनुवाद (हिन्दी)

राजा जेव्हा रामाची शपथ घेईल, तेव्हाच वर मागा. त्यामुळे दिलेले वचन टळू शकणार नाही. आजची रात्र तशीच गेली, तर काम बिघडून जाईल. माझे बोलणे मनापासून चांगले समजा.’॥ ४॥