६३ नवाह्नपारायण, तिसरा विश्राम

मूल (चौपाई)

भूप बिलोकि लिए उर लाई।
बैठे हरषि रजायसु पाई॥
देखि रामु सब सभा जुड़ानी।
लोचन लाभ अवधि अनुमानी॥

अनुवाद (हिन्दी)

राजांनी त्यांना पहाताच हृदयीशी धरले. त्यानंतर ते आज्ञा होताच आनंदाने आसनांवर बसले. श्रीरामचंद्रांचे दर्शन करणे म्हणजे नेत्रांच्या लाभाची परिसीमा आहे, असे मानून सर्व सभा त्रिविध तापांपासून मुक्त झाली.॥ १॥

मूल (चौपाई)

पुनि बसिष्टु मुनि कौसिकु आए।
सुभग आसनन्हि मुनि बैठाए॥
सुतन्ह समेत पूजि पद लागे।
निरखि रामु दोउ गुर अनुरागे॥

अनुवाद (हिन्दी)

नंतर मुनी वसिष्ठ व विश्वामित्र आले. राजांनी त्यांना सुंदर आसनांवर विराजमान केले आणि पुत्रांसमवेत त्यांची पूजा करून त्यांच्या चरणी मस्तक ठेवले. दोन्ही गुरू श्रीरामांना पाहून प्रेम-मुग्ध झाले.॥ २॥

मूल (चौपाई)

कहहिं बसिष्टु धरम इतिहासा।
सुनहिं महीसु सहित रनिवासा॥
मुनि मन अगम गाधिसुत करनी।
मुदित बसिष्ट बिपुल बिधि बरनी॥

अनुवाद (हिन्दी)

वसिष्ठ मुनी धर्माचा इतिहास सांगत होते आणि राणीवशासह राजा तो ऐकत होते. मुनींच्या मनालाही जे अगम्य आहे, ते विश्वामित्रांचे कर्तृत्व वसिष्ठांनी आनंदित होऊन अनेक प्रकारे सांगितले.॥ ३॥

मूल (चौपाई)

बोले बामदेउ सब साँची।
कीरति कलित लोक तिहुँ माची॥
सुनि आनंदु भयउ सब काहू।
राम लखन उर अधिक उछाहू॥

अनुवाद (हिन्दी)

वामदेव म्हणाले, ‘हे सर्व सत्य आहे. विश्वामित्रांची उज्ज्वल कीर्ती त्रैलोक्यात पसरलेली आहे.’ हे ऐकून सर्वजणांना आनंद वाटला. श्रीराम व लक्ष्मण यांच्या मनाला तर विशेष आनंद झाला.॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

मंगल मोद उछाह नित जाहिं दिवस एहि भाँति।
उमगी अवध अनंद भरि अधिक अधिक अधिकाति॥ ३५९॥

अनुवाद (हिन्दी)

नित्यच मंगल व आनंद यांनी संपन्न उत्सव होत होते. अशा प्रकारे दिवस आनंदात जात होते. अयोध्या आनंदाने परिपूर्ण होऊन ओसंडत होती. आनंद दिवसें दिवस अधिकच वाढत होता.॥ ३५९॥

मूल (चौपाई)

सुदिन सोधि कल कंकन छोरे।
मंगल मोद बिनोद न थोरे॥
नित नव सुखु सुर देखि सिहाहीं।
अवध जन्म जाचहिं बिधि पाहीं॥

अनुवाद (हिन्दी)

शुभ मुहूर्तावर लग्नाची कंकणे सोडली. मांगल्य, आनंद व विनोद खूप चालला होता. अशा प्रकारे नित्य नवीन सुख पाहून देवांनाही हेवा वाटत होता आणि ते अयोध्येमध्ये जन्म मिळवा म्हणून ब्रह्मदेवांची विनवणी करीत होते.॥ १॥

मूल (चौपाई)

बिस्वामित्रु चलन नित चहहीं।
राम सप्रेम बिनय बस रहहीं॥
दिन दिन सयगुन भूपति भाऊ।
देखि सराह महामुनिराऊ॥

अनुवाद (हिन्दी)

विश्वामित्र मुनी रोजच आपल्या आश्रमाला परतू इच्छित होते, परंतु श्रीरामचंद्रांच्या प्रेमामुळे व विनयामुळे रहात होते. दिवसेंदिवस राजा दशरथांचा प्रेमभाव शतपट वाढत चाललेला पाहून महामुनिराज विश्वामित्र त्यांची वाखाणणी करीत असत.॥ २॥

मूल (चौपाई)

मागत बिदा राउ अनुरागे।
सुतन्ह समेत ठाढ़ भे आगे॥
नाथ सकल संपदा तुम्हारी।
मैं सेवकु समेत सुत नारी॥

अनुवाद (हिन्दी)

शेवटी विश्वामित्रांनी जेव्हा निरोप मागितला, तेव्हा राजा प्रेममग्न झाले आणि पुत्रांसमवेत त्यांच्यासमोर उभे राहून म्हणाले, ‘हे नाथ, ही सर्व संपदा तुमची आहे. मी तर स्त्री-पुत्रांसह तुमचा सेवक आहे.॥ ३॥

मूल (चौपाई)

करब सदा लरिकन्ह पर छोहू।
दरसनु देत रहब मुनि मोहू॥
अस कहि राउ सहित सुत रानी।
परेउ चरन मुख आव न बानी॥

अनुवाद (हिन्दी)

हे मुनी, मुलांवर नेहमी प्रेम ठेवा आणि मलाही दर्शनाचा लाभ देत रहा.’ असे म्हणून पुत्र व राण्या यांच्यासह राजा दशरथांनी विश्वामित्रांच्या चरणी लोटांगण घातले. भाव-विव्हळ झाल्यामुळे त्यांच्या तोंडून शब्द फुटे ना.॥ ४॥

मूल (चौपाई)

दीन्हि असीस बिप्र बहु भाँती।
चले न प्रीति रीति कहि जाती॥
रामु सप्रेम संग सब भाई।
आयसु पाइ फिरे पहुँचाई॥

अनुवाद (हिन्दी)

विश्वामित्र ऋषींनी अनेक आशीर्वाद दिले आणि ते निघाले. प्रीतीची रीत सांगता येत नाही. श्रीराम सर्व भावांना घेऊन प्रेमाने मुनींना पोहोचवून व त्यांची आज्ञा घेऊन परत आले.॥ ५॥