६२ अयोध्येत आनंदोत्सव

मूल (चौपाई)

चली बरात निसान बजाई।
मुदित छोट बड़ सब समुदाई॥
रामहि निरखि ग्राम नर नारी।
पाइ नयन फलु होहिं सुखारी॥

अनुवाद (हिन्दी)

डंका वाजवीत वऱ्हाड निघाले. लहान-मोठे समुदाय प्रसन्न होते. वाटेच्या गावांतील स्त्री-पुरुष श्रीरामचंद्रांना पाहून डोळ्यांचे पारणे फिटल्यामुळे आनंदित होत होते.॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

बीच बीच बर बास करि मग लोगन्ह सुख देत।
अवध समीप पुनीत दिन पहुँची आइ जनेत॥ ३४३॥

अनुवाद (हिन्दी)

मधून-मधून मुक्काम करीत आणि वाटेतील लोकांना सुखावत वऱ्हाड पवित्र दिवशी अयोध्यापुरीजवळ आले.॥३४३॥

मूल (चौपाई)

हने निसान पनव बर बाजे।
भेरि संख धुनि हय गय गाजे॥
झाँझि बिरव डिंडिमीं सुहाई।
सरस राग बाजहिं सहनाई॥

अनुवाद (हिन्दी)

नगारे वाजत होते. सुंदर ढोल गर्जत होते. भेरी आणि शंख जोराने वाजत होते, हत्ती-घोडे गर्जना करीत होते. झांजा तालावर वाजत होत्या. डफ सुंदर ताल धरत होते. गोड रागामध्ये सनया वाजत होत्या.॥ १॥

मूल (चौपाई)

पुर जन आवत अकनि बराता।
मुदित सकल पुलकावलि गाता॥
निज निज सुंदर सदन सँवारे।
हाट बाट चौहट पुर द्वारे॥

अनुवाद (हिन्दी)

वऱ्हाड येत आहे, असे पाहून अयोध्येचे नगरवासी आनंदून गेले. सर्वांची शरीरे पुलकित झाली. सर्वांनी आपापल्या घरांना, बाजारांना, गल्‍ल्या-बोळांना, चौकांना आणि नगरद्वारांना सुंदर रितीने सजविले.॥ २॥

मूल (चौपाई)

गलीं सकल अरगजाँ सिंचाईं।
जहँ तहँ चौकें चारु पुराईं॥
बना बजारु न जाइ बखाना।
तोरन केतु पताक बिताना॥

अनुवाद (हिन्दी)

सर्व गल्‍ल्यांत चंदनाचे सडे घातले गेले. सर्वत्र रांगोळ्या घातल्या गेल्या. तोरणे, ध्वज, पताका आणि मांडव यांनी बाजार असा सजून गेला की, त्याचे वर्णन येत नाही.॥ ३॥

मूल (चौपाई)

सफल पूगफल कदलि रसाला।
रोपे बकुल कदंब तमाला॥
लगे सुभग तरु परसत धरनी।
मनिमय आलबाल कल करनी॥

अनुवाद (हिन्दी)

सुपाऱ्या, लागलेली सुपारीची झाडे, केळी, आम्रवृक्ष, बकूळ, कदंब आणि तमाल वृक्ष उभारले गेले. फळांच्या भाराने वाकलेले वृक्ष जमिनीला टेकत होते. त्यांची आळी रत्नांच्या कलाकुसरीने बनविली होती.॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

बिबिध भाँति मंगल कलस गृह गृह रचे सँवारि।
सुर ब्रह्मादि सिहाहिं सब रघुबर पुरी निहारि॥ ३४४॥

अनुवाद (हिन्दी)

अनेक प्रकारचे मंगल कलश घरोघरी सजवून ठेवले होते. श्रीरघुनाथांची अयोध्यानगरी पाहून ब्रह्मदेव इत्यादी सर्व देव मुग्ध होत होते.॥ ३४४॥

मूल (चौपाई)

भूप भवनु तेहि अवसर सोहा।
रचना देखि मदन मनु मोहा॥
मंगल सगुन मनोहरताई।
रिधि सिधि सुख संपदा सुहाई॥

अनुवाद (हिन्दी)

त्यावेळी राजमहाल खूप शोभून दिसत होता. त्याची रचना पाहून कामदेवाचे मनसुद्धा मोहित होत होते. मंगल शकुन, मनोहारिता, ऋद्धि-सिद्धी, सुख, सुंदर संपत्ती.॥ १॥

मूल (चौपाई)

जनु उछाह सब सहज सुहाए।
तनु धरि धरि दसरथ गृहँ छाए॥
देखन हेतु राम बैदेही।
कहहु लालसा होहि न केही॥

अनुवाद (हिन्दी)

आणि सर्व प्रकारचे आनंद जणू सहजपणे सुंदर शरीर धारण करून दशरथांच्या घरी अवतरले होते. श्रीरामचंद्र आणि सीता यांच्या दर्शनाची लालसा कुणाला बरे असणार नाही?॥ २॥

मूल (चौपाई)

जूथ जूथ मिलि चलीं सुआसिनि।
निज छबि निदरहिं मदन बिलासिनि॥
सकल सुमंगल सजें आरती।
गावहिं जनु बहु बेष भारती॥

अनुवाद (हिन्दी)

सुहासिनी स्त्रिया जमावाने निघाल्या. त्या आपल्या लावण्याने कामदेवाची पत्नी रती हिलाही तुच्छ ठरवत होत्या. सर्व सुंदर मंगल द्रव्ये आणि आरती सजवून त्या गात होत्या. जणू सरस्वतीच अनेक रूपे धारण करून गात चालली होती.॥ ३॥

मूल (चौपाई)

भूपति भवन कोलाहलु होई।
जाइ न बरनि समउ सुखु सोई॥
कौसल्यादि राम महतारीं।
प्रेमबिबस तन दसा बिसारीं॥

अनुवाद (हिन्दी)

राजमहालामध्ये आनंदामुळे कलकलाट चालला होता. त्या प्रसंगाचे व सुखाचे वर्णन करता येणे अशक्य. कौसल्या इत्यादी श्रीरामांच्या सर्व माता प्रेमसागरात बुडून देहभान विसरल्या होत्या.॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

दिए दान बिप्रन्ह बिपुल पूजि गनेस पुरारि।
प्रमुदित परम दरिद्र जनु पाइ पदारथ चारि॥ ३४५॥

अनुवाद (हिन्दी)

मातांनी गणेश व त्रिपुरारी शिवांचे पूजन करून ब्राह्मणांना खूप दाने दिली. त्या इतक्या प्रसन्न झाल्या होत्या की, जणू अत्यंत दरिद्री माणसाला चारी प्रकारचे अन्नपदार्थ मिळावे.॥ ३४५॥

मूल (चौपाई)

मोद प्रमोद बिबस सब माता।
चलहिं न चरन सिथिल भए गाता॥
राम दरस हित अति अनुरागीं।
परिछनि साजु सजन सब लागीं॥

अनुवाद (हिन्दी)

मोठे सुख व आनंद यांमुळे सर्व मातांची गात्रे शिथिल झाली होती. त्यांचे पाय उचलत नव्हते. श्रीरामचंद्रांच्या दर्शनासाठी त्या अत्यंत प्रेमाने औक्षणाचे सामान तयार करू लागल्या.॥ १॥

मूल (चौपाई)

बिबिध बिधान बाजने बाजे।
मंगल मुदित सुमित्राँ साजे॥
हरद दूब दधि पल्लव फूला।
पान पूगफल मंगल मूला॥

अनुवाद (हिन्दी)

अनेक प्रकारची वाद्ये वाजू लागली. सुमित्रेने आनंदाने सामग्री सजविली. हळद, दुर्वा, दही, पाने, फुले, पान-सुपारी इत्यादी मंगलिक वस्तू,॥ २॥

मूल (चौपाई)

अच्छत अंकुर लोचन लाजा।
मंजुल मंजरि तुलसि बिराजा॥
छुहे पुरट घट सहज सुहाए।
मदन सकुन जनु नीड़ बनाए॥

अनुवाद (हिन्दी)

अक्षता, नवांकुर, गोरोचन, लाह्या आणि तुलसी-मंजिरी शोभून दिसत होत्या. नाना रंगांनी चित्रित केलेले सहज सुंदर सुवर्ण कलश, असे वाटत होते की, जणू कामदेवाच्या पक्ष्यांनी आपली घरटी बनविली असावीत.॥ ३॥

मूल (चौपाई)

सगुन सुगंध न जाहिं बखानी।
मंगल सकल सजहिं सब रानी॥
रचीं आरतीं बहुत बिधाना।
मुदित करहिं कल मंगल गाना॥

अनुवाद (हिन्दी)

शकुनाच्या सुगंधित वस्तूंचे वर्णन करणे कठीण होते. सर्व राण्या संपूर्ण मंगल साजांनी सजल्या होत्या. अनेक प्रकारच्या आरत्या बनवून आनंदाने त्या सुंदर मंगलगीते गात होत्या.॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

कनक थार भरि मंगलन्हि कमल करन्हि लिएँ मात।
चलीं मुदित परिछनि करन पुलक पल्लवित गात॥ ३४६॥

अनुवाद (हिन्दी)

सोन्याच्या तबकांमध्ये मांगलिक वस्तू भरून व आपल्या कमलासारख्या कोमल हातांमध्ये धरून माता आनंदाने औक्षण करण्यास निघाल्या. त्यांच्या गात्रांवर रोमांच आले होते.॥ ३४६॥

मूल (चौपाई)

धूप धूम नभु मेचक भयऊ।
सावन घन घमंडु जनु ठयऊ॥
सुरतरु सुमन माल सुर बरषहिं।
मनहुँ बलाक अवलि मनु करषहिं॥

अनुवाद (हिन्दी)

धूपाच्या धुराने आकाश असे काळे झाले होते की, जणू श्रावणातील मेघ दाटून आले होते. देवगण कल्पवृक्षाच्या फुलांच्या माळांचा वर्षाव करीत होते. जणू बगळॺांचे थवे मनाला आकर्षित करून घेत आहेत, असे वाटत होते.॥ १॥

मूल (चौपाई)

मंजुल मनिमय बंदनिवारे।
मनहुँ पाकरिपु चाप सँवारे॥
प्रगटहिं दुरहिं अटन्ह पर भामिनि।
चारु चपल जनु दमकहिं दामिनि॥

अनुवाद (हिन्दी)

सुंदर रत्नांनी बनविलेली तोरणे अशी वाटत होती की जणू इंद्रधनुष्ये सजविली असावीत. गच्च्यांवर सुंदर आणि चपळ स्त्रिया येत-जात होत्या. जणू त्या विजा चमकल्याप्रमाणे वाटत होत्या.॥ २॥

मूल (चौपाई)

दुंदुभि धुनि घन गरजनि घोरा।
जाचक चातक दादुर मोरा॥
सुर सुगंध सुचि बरषहिं बारी।
सुखी सकल ससि पुर नर नारी॥

अनुवाद (हिन्दी)

नगाऱ्यांचा आवाज जणू मेघांची घनघोर गर्जना वाटत होता. याचकगण, चातक, मंडूक व मोराप्रमाणे वाटत होते. देव पवित्र सुगंधरूपी जलाचा वर्षाव करीत होते. त्यामुळे शेतीप्रमाणे नगरातील स्त्री-पुरुष सुखावून गेले होते.॥ ३॥

मूल (चौपाई)

समउ जानि गुर आयसु दीन्हा।
पुर प्रबेसु रघुकुलमनि कीन्हा॥
सुमिरिसंभु गिरिजा गनराजा।
मुदित महीपति सहित समाजा॥

अनुवाद (हिन्दी)

नगर प्रवेशाची वेळ जाणून गुरू वसिष्ठांनी आज्ञा केली, तेव्हा रघुकुलशिरोमणी महाराज दशरथांनी शिव, पार्वती व गणेश यांचे स्मरण करून सर्व मंडळींसह आनंदाने नगरात प्रवेश केला.॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

होहिं सगुन बरषहिं सुमन सुर दुंदुभीं बजाइ।
बिबुध बधू नाचहिं मुदित मंजुल मंगल गाइ॥ ३४७॥

अनुवाद (हिन्दी)

शुभ शकुन होत होते, देव दुंदुभी वाजवीत फुले उधळत होत होते. देवांगना आनंदाने सुंदर मंगलगीते गात गात नाचत होत्या.॥ ३४७॥

मूल (चौपाई)

मागध सूत बंदि नट नागर।
गावहिं जसु तिहु लोक उजागर॥
जय धुनि बिमल बेद बर बानी।
दस दिसि सुनिअ सुमंगल सानी॥

अनुवाद (हिन्दी)

मागध, सूत, भाट व चतुर नट त्रैलोक्यास प्रकाशित करणाऱ्या श्रीरामचंद्रांचे यशोगान करीत होते. जयध्वनी आणि वेदांची पवित्र, श्रेष्ठ व सुंदर मांगल्याने ओसंडलेली वाणी दाही दिशांना ऐकू येत होती.॥ १॥

मूल (चौपाई)

बिपुल बाजने बाजन लागे।
नभ सुर नगर लोग अनुरागे॥
बने बराती बरनि न जाहीं।
महा मुदित मन सुख न समाहीं॥

अनुवाद (हिन्दी)

पुष्कळशी वाद्ये वाजू लागली. आकाशातील देव आणि नगरातील लोक सर्वजण प्रेममग्न झाले होते. वऱ्हाडी मंडळी अशी नटलेली होती की, काही सांगायची सोय नाही. ते परम आनंदात होते. सुख त्यांच्या मनात मावत नव्हते.॥ २॥

मूल (चौपाई)

पुरबासिन्ह तब राय जोहारे।
देखत रामहि भए सुखारे॥
करहिं निछावरि मनिगन चीरा।
बारि बिलोचन पुलक सरीरा॥

अनुवाद (हिन्दी)

अयोध्यावासीजनांनी राजांना वंदन केले. श्रीरामांना पहाताच ते सुखावून गेले. सर्वजण रत्ने व वस्त्रे त्यांच्यावरून ओवाळून टाकीत होते. त्यांच्या नेत्रांत प्रेमाश्रूंचा पूर दाटला होता आणि ते पुलकित झाले होते.॥ ३॥

मूल (चौपाई)

आरति करहिं मुदित पुर नारी।
हरषहिं निरखि कुअँर बर चारी॥
सिबिका सुभग ओहार उघारी।
देखि दुलहिनिन्ह होहिं सुखारी॥

अनुवाद (हिन्दी)

नगरामधील स्त्रिया आनंदित होऊन आरती करीत होत्या आणि सुंदर चारी कुमारांना पाहून हर्षित होत होत्या. पालखीचे पडदे बाजूला सारून वधूंना पाहून त्या सुखावून जात होत्या.॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

एहि बिधि सबही देत सुखु आए राजदुआर।
मुदित मातु परिछनि करहिं बधुन्ह समेत कुमार॥ ३४८॥

अनुवाद (हिन्दी)

अशाप्रकारे सर्वांना सुखी करून ते राजद्वारी आले. माता आनंदाने वधूंच्यासह कुमारांना औक्षण करू लागल्या.॥ ३४८॥

मूल (चौपाई)

करहिं आरती बारहिं बारा।
प्रेमु प्रमोदु कहै को पारा॥
भूषन मनि पट नाना जाती।
करहिं निछावरि अगनित भाँती॥

अनुवाद (हिन्दी)

त्या वारंवार आरती करीत होत्या. त्या प्रेम व आनंदाचे वर्णन कोण करू शकेल? अनेक प्रकारची आभूषणे, रत्ने आणि वस्त्रे व अगणित प्रकारच्या वस्तू उतरून टाकल्या जात होत्या.॥ १॥

मूल (चौपाई)

बधुन्ह समेत देखि सुत चारी।
परमानंद मगन महतारी॥
पुनि पुनि सीय राम छबि देखी।
मुदित सफल जग जीवन लेखी॥

अनुवाद (हिन्दी)

वधूंच्यासह चारी पुत्रांना पाहून माता आनंदमग्न झाल्या. सीता व श्रीराम यांचे रूप-लावण्य वारंवार पाहून आपला जन्म सफल झाल्याचे त्यांना वाटत होते. त्या आनंदून गेल्या होत्या.॥ २॥

मूल (चौपाई)

सखीं सीय मुख पुनि पुनि चाही।
गान करहिं निज सुकृत सराही॥
बरषहिं सुमन छनहिं छन देवा।
नाचहिं गावहिं लावहिं सेवा॥

अनुवाद (हिन्दी)

सख्या जानकीचे मुख वारंवार पाहून आपल्या पुण्याची वाखाणणी करीत गीते गात होत्या. देव क्षणाक्षणाला फुले उधळत, नाचत, गात आपापली सेवा-समर्पण करीत होते.॥ ३॥

मूल (चौपाई)

देखि मनोहर चारिउ जोरीं।
सारद उपमा सकल ढँढोरीें॥
देत न बनहिं निपट लघु लागीं।
एकटक रहीं रूप अनुरागीं॥

अनुवाद (हिन्दी)

ती चारीही मनोहर जोडपी पाहून सरस्वतीने सर्व उपमा शोधल्या, पण कोणतीही उपमा देता येत नव्हती, कारण त्या सर्वच उपमा तुच्छ वाटत होत्या. तेव्हा निराश होऊन सरस्वतीसुद्धा श्रीरामांच्या रूपावर अनुरक्त होऊन एकटक त्यांना पहात राहिली.॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

निगम नीति कुल रीति करि अरघ पाँवड़े देत।
बधुन्ह सहित सुत परिछि सब चलीं लवाइ निकेत॥ ३४९॥

अनुवाद (हिन्दी)

वेद-विधी आणि कुलाचार पूर्ण झाल्यावर अर्घ्य व पायघडॺा घालत माता वधूंच्यासह सर्व पुत्रांना औक्षण करून त्यांना महालात घेऊन आल्या.॥ ३४९॥

मूल (चौपाई)

चारि सिंघासन सहज सुहाए।
जनु मनोज निज हाथ बनाए॥
तिन्ह पर कुअँरि कुअँर बैठारे।
सादर पाय पुनीत पखारे॥

अनुवाद (हिन्दी)

जणू कामदेवाने स्वतःच्या हाताने बनविलेली सुंदर चार सिंहासने होती. मातांनी त्यांवर राजकुमारींना व राजकुमारांना बसविले आणि मोठॺा आदराने त्यांचे पवित्र चरण धुतले.॥ १॥

मूल (चौपाई)

धूप दीप नैबेद बेद बिधि।
पूजे बर दुलहिनि मंगलनिधि॥
बारहिं बार आरती करहीं।
ब्यजन चारु चामर सिर ढरहीं॥

अनुवाद (हिन्दी)

मग वेद-विधीप्रमाणे मांगल्याचे माहेर असलेले नवरदेव व वधू यांची धूप, दीप आणि नैवेद्य इत्यादींनी पूजा केली. माता वारंवार ओवाळीत होत्या आणि वधू-वरांच्या मस्तकावर मोर पंख व चवऱ्या यांनी वारा घालीत होत्या.॥ २॥

मूल (चौपाई)

बस्तु अनेक निछावरि होहीं।
भरीं प्रमोद मातु सब सोहीं॥
पावा परम तत्वजनु जोगीं।
अमृतु लहेउ जनु संतत रोगीं॥

अनुवाद (हिन्दी)

अनेक वस्तू उतरून टाकल्या जात होत्या. सर्व माता आनंदाने परितृप्त झाल्यामुळे अशा शोभत होत्या की, जणू योग्याने परमतत्त्व प्राप्त केले आहे. नित्य रोगी असलेल्या मनुष्याला जणू अमृत मिळाले.॥ ३॥

मूल (चौपाई)

जनम रंक जनु पारस पावा।
अंधहि लोचन लाभु सुहावा॥
मूक बदन जनु सारद छाई।
मानहुँ समर सूर जय पाई॥

अनुवाद (हिन्दी)

जन्माचा दरिद्री असलेल्या माणसाला जणू परीस लाभला. आंधळॺाला दृष्टी मिळाली. मुक्याच्या मुखामध्ये जणू सरस्वती विराजमान झाली आणि वीराने जणू युद्धात विजय मिळविला.॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

एहि सुख ते सत कोटि गुन पावहिं मातु अनंदु।
भाइन्ह सहित बिआहि घर आए रघुकुलचंदु॥ ३५०(क)॥

अनुवाद (हिन्दी)

या सर्व सुखांहून शेकडो कोटी पट आनंद मातांना मिळाला होता.कारण रघुकुलाचे चंद्रमा श्रीरघुनाथ विवाह करून भावांसह घरी परतले होते.॥ ३५०(क)॥

मूल (दोहा)

लोक रीति जननीं करहिं बर दुलहिनि सकुचाहिं।
मोदु बिनोदु बिलोकि बड़ रामु मनहिं मुसुकाहिं॥ ३५०(ख)॥

अनुवाद (हिन्दी)

माता लौकिक रीती करीत होत्या आणि वर-वधू लाजत होते. हा महान आनंद व विनोद पाहून श्रीरामचंद्र मनातल्या मनात हसत होते.॥ ३५०(ख)॥

मूल (चौपाई)

देव पितर पूजे बिधि नीकी।
पूजीं सकल बासना जी की॥
सबहि बंदि मागहिं बरदाना।
भाइन्ह सहित राम कल्याना॥

अनुवाद (हिन्दी)

मातांच्या मनातील सर्व कामना पूर्ण झाल्यामुळे देव व पितर यांचे व्यवस्थित पूजन त्यांनी केले. सर्वांना वंदन करून माता हेच वरदान मागत होत्या की, भावांसह श्रीरामांचे कल्याण होवो.॥ १॥

मूल (चौपाई)

अंतरहित सुर आसिष देहीं।
मुदित मातु अंचल भरि लेहीं॥
भूपति बोलि बराती लीन्हे।
जान बसन मनि भूषन दीन्हे॥

अनुवाद (हिन्दी)

देव गुप्तपणे आकाशातून आशीर्वाद देत होते व माता आनंदाने ते पदर भरभरून घेत होत्या. नंतर राजांनी वऱ्हाडी लोकांना बोलाविले व त्यांना वाहने, वस्त्रे, रत्ने व आभूषणे दिली.॥ २॥

मूल (चौपाई)

आयसु पाइ राखि उर रामहि।
मुदित गए सब निज निज धामहि॥
पुर नर नारि सकल पहिराए।
घर घर बाजन लगे बधाए॥

अनुवाद (हिन्दी)

आज्ञा मिळाल्यावर श्रीरामांना हृदयी धारण करून ते सर्व आपापल्या घरी परतले. नगरातील सर्व स्त्री-पुरुषांना राजांनी वस्त्रे-भूषणे दिली. घरोघरी अभिनंदनासाठी वाद्ये वाजू लागली.॥ ३॥

मूल (चौपाई)

जाचक जन जाचहिं जोइ जोई।
प्रमुदित राउ देहिं सोइ सोई॥
सेवक सकल बजनिआ नाना।
पूरन किए दान सनमाना॥

अनुवाद (हिन्दी)

याचक जे जे मागत होते, ते ते राजा प्रसन्न मनाने देत होते. सर्व सेवकांना व वादकांना राजांनी नाना प्रकारची दाने दिली आणि त्यांचा सन्मान करून त्यांना संतुष्ट केले.॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

देहिं असीस जोहारि सब गावहिं गुन गन गाथ।
तब गुर भूसुर सहित गृहँ गवनु कीन्ह नरनाथ॥ ३५१॥

अनुवाद (हिन्दी)

सर्वांनी वंदन करून आशीर्वाद दिले आणि ते गुणगान करू लागले. तेव्हा गुरू व ब्राह्मण यांच्यासमवेत राजा दशरथांनी महालामध्ये प्रवेश केला.॥ ३५१॥

मूल (चौपाई)

जो बसिष्ट अनुसासन दीन्ही।
लोक बेद बिधि सादर कीन्ही॥
भूसुर भीर देखि सब रानी।
सादर उठीं भाग्य बड़ जानी॥

अनुवाद (हिन्दी)

वसिष्ठांनी ज्या ज्या प्रकारे आज्ञा दिली, त्याप्रमाणे लौकिक व वैदिक विधीनुसार राजाने आदराने सर्व केले. ब्राह्मणांची झालेली गर्दी पाहून सर्व राण्या आपले भाग्य समजत आदराने उठून उभ्या राहिल्या.॥ १॥

मूल (चौपाई)

पाय पखारि सकल अन्हवाए।
पूजि भली बिधि भूप जेवाँए॥
आदर दान प्रेम परिपोषे।
देत असीस चले मन तोषे॥

अनुवाद (हिन्दी)

ब्राह्मणांचे चरण धुऊन व त्यांना स्नान घालून राजांनी व्यवस्थितपणे त्यांचे पूजन करून त्यांना भोजन दिले. आदर, दान आणि प्रेमामुळे तृप्त झालेले ते ब्राह्मण मनापासून आशीर्वाद देत गेले.॥ २॥

मूल (चौपाई)

बहु बिधि कीन्हि गाधिसुत पूजा।
नाथ मोहि सम धन्य न दूजा॥
कीन्हि प्रसंसा भूपति भूरी।
रानिन्ह सहित लीन्हि पग धूरी॥

अनुवाद (हिन्दी)

राजा दशरथांनी विश्वामित्रांची अनेक प्रकारे पूजा केली आणि म्हटले, ‘हे नाथ, माझ्यासारखा भाग्यवान कोणी दुसरा नाही.’ राजांनी त्यांची खूप स्तुती केली आणि राण्यांच्यासह त्यांची चरण-धूली घेतली.॥ ३॥

मूल (चौपाई)

भीतर भवन दीन्ह बर बासू।
मन जोगवत रह नृपु रनिवासू॥
पूजे गुर पद कमल बहोरी।
कीन्हि बिनय उर प्रीति न थोरी॥

अनुवाद (हिन्दी)

त्यांना महालामध्ये राहण्यासाठी उत्तम स्थान दिले. तेथून राजा व सर्व अंतःपुर त्यांच्या मनाप्रमाणे सर्व होते की नाही हे पाहू शकत होते. नंतर राजांनी गुरू वसिष्ठांच्या चरण कमलांची पूजा करून त्यांची स्तुती केली. तेव्हा त्यांच्या मनात खूप प्रेम होते.॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

बधुन्ह समेत कुमार सब रानिन्ह सहित महीसु।
पुनि पुनि बंदत गुर चरन देत असीस मुनीसु॥ ३५२॥

अनुवाद (हिन्दी)

वधूंच्यासह सर्व राजकुमार व राण्या यांच्यासह राजा दशरथ गुरूंच्या चरणांन वारंवार वंदन करीत होते आणि मुनीश्वर त्यांना आशीर्वाद देत होते.॥ ३५२॥

मूल (चौपाई)

बिनय कीन्हि उर अति अनुरागें।
सुत संपदा राखि सब आगें॥
नेगु मागि मुनिनायक लीन्हा।
आसिरबादु बहुत बिधि दीन्हा॥

अनुवाद (हिन्दी)

दशरथ राजांनी अत्यंत प्रेमपूर्ण मनाने आपले पुत्र व सर्व संपत्ती मुनी वसिष्ठांच्या समोर ठेवून त्यांचा स्वीकार करण्याची त्यांना विनंती केली, परंतु मुनिराजांनी कुलगुरू म्हणून आपली दक्षिणा तेवढी मागितली आणि अनेक आशीर्वाद दिले.॥ १॥

मूल (चौपाई)

उर धरि रामहि सीय समेता।
हरषि कीन्ह गुर गवनु निकेता॥
बिप्रबधू सब भूप बोलाईं।
चैल चारु भूषन पहिराईं॥

अनुवाद (हिन्दी)

नंतर वसिष्ठ, सीता व राम यांना आपल्या हृदयात ठेवून आनंदाने आपल्या आश्रमात गेले. राजांनी सर्व ब्राह्मण-स्त्रियांना बोलाविले आणि त्यांना सुंदर वस्त्राभूषणे दिली.॥ २॥

मूल (चौपाई)

बहुरि बोलाइ सुआसिनि लीन्हीं।
रुचि बिचारि पहिरावनि दीन्हीं॥
नेगी नेग जोग सब लेहीं।
रुचि अनुरूप भूपमनि देहीं॥

अनुवाद (हिन्दी)

मग नगरातील सर्व सुवासिनींना बोलावले आणि त्यांच्या आवडीप्रमाणे त्यांना वस्त्रे दिली. अहेर घेणारे आपला अहेर घेत होते आणि राजांचे शिरोमणी असलेले दशरथ त्यांच्या इच्छेप्रमाणे त्यांना देत होते.॥ ३॥

मूल (चौपाई)

प्रिय पाहुने पूज्य जे जाने।
भूपति भली भाँति सनमाने॥
देव देखि रघुबीर बिबाहू।
बरषि प्रसून प्रसंसि उछाहू॥

अनुवाद (हिन्दी)

जे प्रिय व पूज्य आप्तजन होते, त्यांना राजांनी चांगल्या प्रकारे सन्मानित केले. देवगण श्रीरामांचा विवाह पाहून उत्सवाची प्रशंसा करीत फुले उधळत,॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

चले निसान बजाइ सुर निज निज पुर सुख पाइ।
कहत परसपर राम जसु प्रेम न हृदयँ समाइ॥ ३५३॥

अनुवाद (हिन्दी)

नगारे वाजवत मोठे सुखावून आपापल्या लोकी गेले. ते परस्परांना श्रीरामांची कीर्ती सांगत होते. त्यांच्या हृदयात प्रेम मावत नव्हते.॥ ३५३॥

मूल (चौपाई)

सब बिधि सबहि समदि नरनाहू।
रहा हृदयँ भरि पूरि उछाहू॥
जहँ रनिवासु तहाँ पगु धारे।
सहित बहूटिन्ह कुअँर निहारे॥

अनुवाद (हिन्दी)

सर्वांचा सर्व प्रकारे प्रेमाने यथोचित आदर-सत्कार केल्यामुळे राजा दशरथांच्या मनात आंनद भरून गेला. ते अंतःपुरात गेले आणि त्यांनी मुलां-सुनांना पाहिले.॥ १॥

मूल (चौपाई)

लिए गोद करि मोद समेता।
को कहि सकइ भयउ सुखु जेता॥
बधू सप्रेम गोद बैठारीं।
बार बार हियँ हरषि दुलारीं॥

अनुवाद (हिन्दी)

राजांनी आनंदाने मुलांना मांडीवर घेतले. त्यावेळी त्यांना जे सुख वाटले, त्याचे वर्णन कोण करू शकेल? नंतर त्यांनी सुनांना प्रेमाने मांडीवर घेतले आणि वारंवार आनंदित होऊन त्यांचे कोड-कौतुक केले.॥ २॥

मूल (चौपाई)

देखि समाजु मुदित रनिवासू।
सब कें उर अनंद कियो बासू॥
कहेउ भूप जिमि भयउ बिबाहू।
सुनि सुनि हरषु होत सब काहू॥

अनुवाद (हिन्दी)

हा सोहळा पाहून अंतःपुर प्रसन्न झाले. सर्वांच्या मनात आनंद दाटला. तेव्हा राजाने विवाह कसा झाला, त्याचे वर्णन केले. ते ऐकताना सर्वांनाच आनंद झाला.॥ ३॥

मूल (चौपाई)

जनक राज गुन सीलु बड़ाई।
प्रीति रीति संपदा सुहाई॥
बहुबिधि भूप भाट जिमि बरनी।
रानी सब प्रमुदित सुनि करनी॥

अनुवाद (हिन्दी)

दशरथांनी जनकांचे गुण, शील, महत्त्व, प्रेमाची रीत आणि ऐश्वर्य यांचे वर्णन एखाद्या भाटाप्रमाणे अनेक प्रकारे केले. जनकांचे कर्तृत्व ऐकून सर्व राण्या फार प्रसन्न झाल्या.॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

सुतन्ह समेत नहाइ नृप बोलि बिप्र गुर ग्याति।
भोजन कीन्ह अनेक बिधि घरी पंच गइ राति॥ ३५४॥

अनुवाद (हिन्दी)

नंतर राजांनी व मुलांनी स्नान केले. राजांनी ब्राह्मण, गुरू व कुटुंबीयांना बोलावून त्यांच्यासह अनेक प्रकारचे भोजन केले. इतके होई तो पर्यंत पाच घटिका रात्र झाली.॥ ३५४॥

मूल (चौपाई)

मंगलगान करहिं बर भामिनि।
भै सुखमूल मनोहर जामिनि॥
अँचइ पान सब काहूँ पाए।
स्रग सुगंध भूषित छबि छाए॥

अनुवाद (हिन्दी)

सुंदर स्त्रिया मंगलगान करीत होत्या. ती रात्र सुखाची आणि मनोहारक ठरली. सर्वांनी आचमन करून पान-विडा घेतला. फुलांच्या माळा, सुगंधी द्रव्ये इत्यादींनी विभूषित झालेले सर्वजण शोभून दिसत होते.॥ १॥

मूल (चौपाई)

रामहि देखि रजायसु पाई।
निज निज भवन चले सिर नाई॥
प्रेम प्रमोदु बिनोदु बड़ाई।
समउ समाजु मनोहरताई॥

अनुवाद (हिन्दी)

श्रीरामचंद्रांना पाहून व त्यांची आज्ञा घेऊन व त्यांना नमस्कार करून सर्वजण आपापल्या घरी गेले. तेथील प्रेम, आनंद, विनोद, महत्त्व, वेळ, समुदाय आणि मनोहरता,॥ २॥

मूल (चौपाई)

कहि न सकहिं सत सारद सेसू।
बेद बिरंचि महेस गनेसू॥
सो मैं कहौं कवन बिधि बरनी।
भूमिनागु सिर धरइ कि धरनी॥

अनुवाद (हिन्दी)

हे सर्व सरस्वती, शेष, वेद, ब्रह्मदेव, महादेव आणि गजानन हे सुद्धा सांगू शकणार नाहीत. मग मी ते कसे वर्णन करून सांगणार बरे? गांडूळ कधी पृथ्वीला डोक्यावरती घेईल काय?॥ ३॥

मूल (चौपाई)

नृप सब भाँति सबहि सनमानी।
कहि मृदु बचन बोलाईं रानी॥
बधू लरिकनीं पर घर आईं।
राखेहु नयन पलक की नाईं॥

अनुवाद (हिन्दी)

राजांनी सर्वांचा सर्व प्रकारे सन्मान करून, गोड बोलून राण्यांना बोलावले आणि सांगितले की, ‘सुना अजुनी लहान आहेत, परक्या घरी आल्या आहेत. डोळ्यांची काळजी पापण्या घेतात,त्याप्रमाणे त्यांची काळजी घ्या.॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

लरिका श्रमित उनीद बस सयन करावहु जाइ।
अस कहि गे बिश्रामगृहँ राम चरन चितु लाइ॥ ३५५॥

अनुवाद (हिन्दी)

मुले थकून गेली आहेत. त्यांना झोपेने घेरले आहे. त्यांना नेऊन झोपवा.’ असे म्हणून राजा श्रीरामांच्या चरणी मन लावून आपल्या विश्रामस्थानी गेले.॥ ३५५॥

मूल (चौपाई)

भूप बचन सुनि सहज सुहाए।
जरित कनक मनि पलँग डसाए॥
सुभग सुरभि पय फेन समाना।
कोमल कलित सुपेतीं नाना॥

अनुवाद (हिन्दी)

राजांचे स्वभावतः सुंदर वचन ऐकून राण्यांनी रत्नजडित सुवर्णाचे पलंग घातले. गाद्यांवर गाईच्या दुधाच्या फेसाप्रमाणे सुंदर, कोमल व शुभ्र पलंगपोस घातले.॥ १॥

मूल (चौपाई)

उपबरहन बर बरनि न जाहीं।
स्रग सुगंध मनिमंदिर माहीं॥
रतनदीप सुठि चारु चँदोवा।
कहत न बनइ जान जेहिं जोवा॥

अनुवाद (हिन्दी)

सुंदर उश्यांचे तर वर्णन करता येणार नाही. रत्नजडित मंदिरांना फुलांच्या माळा व सुगंधित द्रव्यांनी सजविले होते. सुंदर रत्न-दीप व चांदवे यांची शोभा सांगवत नव्हती. ज्याने पाहिले असेल, त्यालाच ती कळेल.॥ २॥

मूल (चौपाई)

सेज रुचिर रचि रामु उठाए।
प्रेम समेत पलँग पौढ़ाए॥
अग्या पुनि पुनि भाइन्ह दीन्ही।
निज निज सेज सयन तिन्ह कीन्ही॥

अनुवाद (हिन्दी)

अशा प्रकारे सुंदर शय्या सजविल्यावर मातांनी श्रीरामांना उचलून मोठॺा प्रेमाने पलंगावर झोपविले. श्रीरामांनी भावांना वारंवार आज्ञा केली, तेव्हा तेही आपापल्या शय्येवर झोपले.॥ ३॥

मूल (चौपाई)

देखि स्याम मृदु मंजुल गाता।
कहहिं सप्रेम बचन सब माता॥
मारग जात भयावनि भारी।
केहि बिधि तात ताड़का मारी॥

अनुवाद (हिन्दी)

श्रीरामांचे सावळे-सुंदर व कोमल अवयव पाहून सर्व माता प्रेमाने म्हणू लागल्या, ‘हे लाडक्या, जाताना वाटेत तुम्ही भयंकर ताडका राक्षसीला कसे मारले?॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

घोर निसाचर बिकट भट समर गनहिं नहिं काहु।
मारे सहित सहाय किमि खल मारीच सुबाहु॥ ३५६॥

अनुवाद (हिन्दी)

जे युद्धात कोणालाही जुमानत नसत, त्या महान योद्धे असलेल्या मारीच व सुबाहू या भयंकर दुष्ट राक्षसांना व त्यांच्या अनुयायांना तुम्ही कसे बरे मारले?॥ ३५६॥

मूल (चौपाई)

मुनि प्रसाद बलि तात तुम्हारी।
ईस अनेक करवरें टारी॥
मख रखवारी करि दुहुँ भाईं।
गुरु प्रसाद सब बिद्या पाईं॥

अनुवाद (हिन्दी)

हे बाळांनो! इडा-पीडा टळो. मुनींच्या कृपेमुळेच ईश्वराने तुमच्यावरील कित्येक संकटे दूर केली. दोघा भावांनी यज्ञाचे रक्षण करून गुरूंच्या कृपेने सर्व विद्या मिळविल्या.॥ १॥

मूल (चौपाई)

मुनितिय तरी लगत पग धूरी।
कीरति रही भुवन भरि पूरी॥
कमठ पीठि पबि कूट कठोरा।
नृप समाज महुँ सिव धनु तोरा॥

अनुवाद (हिन्दी)

चरणांच्या धुळीचा स्पर्श होताच मुनि-पत्नी अहिल्या तरून गेली. जगभरात ही कीर्ती सर्वत्र पसरलेली आहे. कासवाची पाठ, वज्र व पर्वत यांच्याहून कठोर शिव-धनुष्य तुम्ही सर्व राजांच्या समोर मोडून टाकले.॥ २॥

मूल (चौपाई)

बिस्व बिजय जसु जानकि पाई।
आए भवन ब्याहि सब भाई॥
सकल अमानुष करम तुम्हारे।
केवल कौसिक कृपाँ सुधारे॥

अनुवाद (हिन्दी)

विश्व-विजयी कीर्ती आणि जानकी मिळविली आणि सर्व भावांचा विवाह करून त्यांना घेऊन घरी आलात. तुमची सर्व कृत्ये अलौकिक आहेत. ती केवळ विश्वामित्रांच्या कृपेने पूर्ण झाली.॥ ३॥

मूल (चौपाई)

आजु सुफल जग जनमु हमारा।
देखि तात बिधुबदन तुम्हारा॥
जे दिन गए तुम्हहि बिनु देखें।
ते बिरंचि जनि पारहिं लेखें॥

अनुवाद (हिन्दी)

हे लाडक्यांनो! तुमचे चंद्रमुख पाहून आज आम्ही जगात जन्म घेतल्याचे सार्थक झाले. तुम्हांला न पाहता जे दिवस गेले, ते ब्रह्मदेवांनी आमच्या आयुष्यात धरू नयेत.’॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

राम प्रतोषीं मातु सब कहि बिनीत बर बैन।
सुमिरि संभु गुर बिप्र पद किए नीदबस नैन॥ ३५७॥

अनुवाद (हिन्दी)

श्रीरामचंद्रांनी विनयाने गोड बोलून सर्व मातांना आनंदित केले. नंतर शिव, गुरू आणि ब्राह्मण यांचे स्मरण करून ते झोपले.॥ ३५७॥

मूल (चौपाई)

नीदउँ बदन सोह सुठि लोना।
मनहुँ साँझ सरसीरुह सोना॥
घर घर करहिं जागरन नारीं।
देहिं परसपर मंगल गारीं॥

अनुवाद (हिन्दी)

झोपेमध्येही त्यांचा अत्यंत सुंदर चेहरा असा शोभून दिसत होता की, जसे संध्याकाळच्या वेळेस लाल कमल शोभून दिसते. घरोघरी स्त्रिया जागून परस्पर मंगलमय थट्टामस्करी करीत होत्या.॥ १॥

मूल (चौपाई)

पुरी बिराजति राजति रजनी।
रानीं कहहिं बिलोकहु सजनी॥
सुंदर बधुन्ह सासु लै सोईं।
फनिकन्ह जनु सिरमनि उर गोईं॥

अनुवाद (हिन्दी)

राण्या म्हणत होत्या की, ‘हे साजणी, बघ, आज रात्रीची शोभा कशी आहे. तिच्यामुळे अयोध्यापुरी विशेष शोभून दिसत आहे.’ असे म्हणत सासवा सुंदर सुनांना बरोबर घेऊन झोपल्या. जणू सर्पांनी आपल्या फणांवरील मणी हृदयात लपविले होते.॥ २॥

मूल (चौपाई)

प्रात पुनीत काल प्रभु जागे।
अरुनचूड़ बर बोलन लागे॥
बंदि मागधन्हि गुनगन गाए।
पुरजन द्वार जोहारन आए॥

अनुवाद (हिन्दी)

प्रातःकालच्या पवित्र ब्राह्ममुहूर्तावर प्रभू राम जागे झाले. कोंबडे आरवू लागले. भाट व मागध गुण-गान गाऊ लागले आणि नगरातील लोक मुजरा करण्यासाठी राजद्वारावर आले.॥ ३॥

मूल (चौपाई)

बंदि बिप्र सुर गुर पितु माता।
पाइ असीस मुदित सब भ्राता॥
जननिन्ह सादर बदन निहारे।
भूपति संग द्वार पगु धारे॥

अनुवाद (हिन्दी)

ब्राह्मण, देव, गुरू, पिता आणि माता यांना वंदन करून आणि आशीर्वाद घेऊन सर्व भाऊ प्रसन्न झाले. मातांनी मोठॺा आदराने त्यांची मुखे न्याहाळली. नंतर ते राजा दशरथांच्याबरोबर द्वारावर आले.॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

कीन्हि सौच सब सहज सुचि सरित पुनीत नहाइ।
प्रातक्रिया करि तात पहिं आए चारिउ भाइ॥ ३५८॥

अनुवाद (हिन्दी)

स्वभावतःच पवित्र असलेल्या चारी भावांनी प्रातर्विधीनंतर पवित्र शरयू नदीत स्नान केले आणि संध्या-वंदनादी कर्मे करून ते वडिलांजवळ आले.॥ ३५८॥