६१ मासपारायण, अकरावा विश्राम

मूल (चौपाई)

स्याम सरीरु सुभायँ सुहावन।
सोभा कोटि मनोज लजावन॥
जावक जुत पद कमल सुहाए।
मुनि मन मधुप रहत जिन्ह छाए॥

अनुवाद (हिन्दी)

श्रीरामांचे सावळे रूप स्वभावतःच सुंदर होते. त्याची शोभा कोटॺवधी कामदेवांना लाजवीत होती. मेंहदी लावलेले त्यांचे चरणकमल फार शोभून दिसत होते. मुनींचे मन-भ्रमर त्यांच्यावर गुंजी घालत असतात.॥ १॥

मूल (चौपाई)

पीत पुनीत मनोहर धोती।
हरति बाल रबि दामिनि जोती॥
कल किंकिनि कटि सूत्र मनोहर।
बाहु बिसाल बिभूषन सुंदर॥

अनुवाद (हिन्दी)

पवित्र व मनोहर असे पीतांबर प्रातःकालीन सूर्याची आणि वीजेची चमक हरण करीत होते. कटीवर सुंदर घुंगरू लावलेले कटिसूत्र होते. विशाल भुजांमध्ये सुंदर आभूषणे शोभत होती.॥ २॥

मूल (चौपाई)

पीत जनेउ महाछबि देई।
कर मुद्रिका चोरि चितु लेई॥
सोहत ब्याह साज सब साजे।
उर आयत उरभूषन राजे॥

अनुवाद (हिन्दी)

पिवळे यज्ञोपवीत शोभून दिसत होते. हातामधील आंगठॺा चित्त चोरून घेत होत्या. विवाहाची सर्व वेषभूषा शोभून दिसत होती. विशाल वक्षःस्थलावर सुंदर आभूषणे शोभत होती.॥ ३॥

मूल (चौपाई)

पिअर उपरना काखासोती।
दुहुँ आँचरन्हि लगे मनि मोती॥
नयन कमल कल कुंडल काना।
बदनु सकल सौंदर्ज निधाना॥

अनुवाद (हिन्दी)

पिवळे उपरणे शोभून दिसत होती. त्याच्या दोन्ही टोकांना मणी व मोती लावलेले होते. कमळासारखे सुंदर नेत्र, कानांमध्ये सुंदर कुंडले आणि मुख हे तर लावण्याची खाण होते.॥ ४॥

मूल (चौपाई)

सुंदर भृकुटि मनोहर नासा।
भाल तिलकु रुचिरता निवासा॥
सोहत मौरु मनोहर माथे।
मंगलमय मुकुता मनि गाथे॥

अनुवाद (हिन्दी)

सुंदर भुवया आणि मनोहर नाक आहे. ललाटावरील तिलक तर सौंदर्याचे माहेरघर होता. मंगलमय मोती आणि रत्ने गुंफलेला व मुंडावळ्या लावलेला मुकुट डोक्यावरती शोभत होता.॥ ५॥

छंद

मूल (दोहा)

गाथे महामनि मौर मंजुल अंग सब चित चोरहीं।
पुर नारि सुर सुंदरीं बरहि बिलोकि सब तिन तोरहीं॥
मनि बसन भूषन वारि आरति करहिं मंगल गावहीं।
सुर सुमन बरिसहिं सूत मागध बंदि सुजसु सुनावहीं॥ १॥

अनुवाद (हिन्दी)

त्या सुंदर मुकुटामध्ये बहुमूल्य रत्ने गुंफली होती. त्यांचे सर्व अवयव मन हरण करीत होते. नगरातील सर्व स्त्रिया व देवसुंदरी गवताची काडी मोडून दृष्ट काढत होत्या आणि रत्ने, वस्त्रे व दागिने त्यांच्यावरून ओवाळून टाकून आरत्या करीत होत्या आणि मंगलगान गात होत्या. देव फुले उधळत होते आणि सूत, मागध, भाट कीर्ती गात होते.॥ १॥

मूल (दोहा)

कोहबरहिं आने कुअँर कुअँरि सुआसिनिन्ह सुख पाइ कै।
अति प्रीति लौकिक रीति लागीं करन मंगल गाइ कै॥
लहकौरि गौरि सिखाव रामहि सीय सन सारद कहैं।
रनिवासु हास बिलास रस बस जन्म को फलु सब लहैं॥ २॥

अनुवाद (हिन्दी)

सुवासिनी स्त्रिया मोठॺा आनंदाने वधू-वरांना कुलदेवतेपाशी घेऊन आल्या आणि अत्यंत प्रेमाने मंगलगीते गात-गात लौकिक रीतीप्रमाणे कुळाचार करू लागल्या. पार्वती श्रीरामांना व सरस्वती सीतेला परस्परांना घास खाऊ घालण्यास शिकवू लागल्या. सर्वांना जन्माचे सारे फळ मिळत होते.॥ २॥

मूल (दोहा)

निज पानि मनि महुँ देखिअति मूरति सुरूपनिधान की।
चालति न भुजबल्ली बिलोकनि बिरह भय बस जानकी॥
कौतुक बिनोद प्रमोदु प्रेमु न जाइ कहि जानहिं अलीं।
बर कुअँरि सुंदर सकल सखीं लवाइ जनवासेहि चलीं॥ ३॥

अनुवाद (हिन्दी)

आपल्या हातातील रत्नांमध्ये सुंदर रूपाचे भांडार असलेल्या श्रीरामांचे प्रतिबिंब दिसत होते. ते पाहून सीता दर्शनात विघ्न येऊ नये म्हणून आपली बाहुरूपी लता आणि दृष्टी हलू देत नव्हती. त्या प्रसंगीचे हास्य-विनोद, आणि प्रेम यांचे वर्णन करता येणे शक्य नाही. ते फक्त सख्याच जाणतात. त्यानंतर सर्व सख्या वर-वधूंना घेऊन जानवश्याकडे निघाल्या.॥ ३॥

मूल (दोहा)

तेहि समय सुनिअ असीस जहँ तहँ नगर नभ आनँदु महा।
चिरु जिअहुँ जोरीं चारु चारॺो मुदित मन सबहीं कहा॥
जोगींद्र सिद्ध मुनीस देव बिलोकि प्रभु दुंदुभि हनी।
चले हरषि बरषि प्रसून निज निज लोक जय जय जय भनी॥ ४॥

अनुवाद (हिन्दी)

त्यावेळी नगरात आणि आकाशात जिकडे पहावे तिकडे आशीर्वादाचे शब्द ऐकू येत होते आणि मोठा आनंदी आनंद झालेला होता. सर्वजण प्रसन्न मनाने म्हणत होते की, ‘ही सुंदर चारी जोडपी चिरंजीव होवोत.’ योगिराज, सिद्ध, मुनीश्वर आणि देव यांनी प्रभू रामचंद्रांना पाहून दुंदुभी वाजविली आणि आनंदाने फुलांचा वर्षाव करीत ‘जय हो, जय हो, जय हो’ असे म्हणत ते आपापल्या लोकी निघून गेले.॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

सहित बधूटिन्ह कुअँर सब तब आए पितु पास।
सोभा मंगल मोद भरि उमगेउ जनु जनवास॥ ३२७॥

अनुवाद (हिन्दी)

मग चारी कुमार आपापल्या वधूंसह वडिलांकडे आले. शोभा, मांगल्य आणि आनंद यांनी जानवासा ओसंडत आहे, असे वाटत होते.॥ ३२७॥

मूल (चौपाई)

पुनि जेवनार भई बहु भाँती।
पठए जनक बोलाइ बराती॥
परत पाँवड़े बसन अनूपा।
सुतन्ह समेत गवन कियो भूपा॥

अनुवाद (हिन्दी)

त्यानंतर अनेक प्रकारचे पाक सिद्ध झाले. जनकांनी वऱ्हाडी मंडळींना बोलाविले. राजा दशरथ हे पुत्रांसह गेले. बहुमोल वस्त्रांच्या पायघडॺा घातल्या जात होत्या.॥ १॥

मूल (चौपाई)

सादर सब के पाय पखारे।
जथाजोगु पीढ़न्ह बैठारे॥
धोए जनक अवधपति चरना।
सीलु सनेहु जाइ नहिं बरना॥

अनुवाद (हिन्दी)

आदरपूर्वक सर्वांचे पाय धुऊन योग्य स्थानी त्यांना पाटांवर बसविले. मग जनकांनी दशरथांचे पाय धुतले. त्यांचे शील आणि स्नेह यांचे वर्णन करणे कठीण आहे.॥ २॥

मूल (चौपाई)

बहुरि राम पद पंकज धोए।
जे हर हृदय कमल महुँ गोए॥
तीनिउ भाइ राम सम जानी।
धोए चरन जनक निज पानी॥

अनुवाद (हिन्दी)

नंतर श्रीशिवांच्या हृदय-कमलांमध्ये गुप्तपणे जी वास करतात ती श्रीरामचंद्रांची चरण-कमले धुतली. अन्य तीन भावांनाही श्रीरामचंद्रांसमान मानून जनकांनी त्यांचे चरणही आपल्या हातांनी धुतले.॥ ३॥

मूल (चौपाई)

आसन उचित सबहि नृप दीन्हे।
बोलि सूपकारी सब लीन्हे॥
सादर लगे परन पनवारे।
कनक कील मनि पान सँवारे॥

अनुवाद (हिन्दी)

राजा जनकांनी सर्वांना योग्य आसने दिली आणि वाढप्यांना बोलाविले. मोठॺा आदराने पत्रावळी घातल्या गेल्या. त्या रत्नांच्या पानांना सोन्याच्या काडांनी टाचून बनविलेल्या होत्या.॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

सूपोदन सुरभी सरपि सुंदर स्वादु पुनीत।
छन महुँ सब कें परुसि गे चतुर सुआर बिनीत॥ ३२८॥

अनुवाद (हिन्दी)

चतुर व विनम्र स्वयंपाक्यांनी सुंदर, स्वादिष्ट आणि पवित्र वरणभात आणि त्यावर गाईचे तूप क्षणभरात सर्वांसमोर वाढले.॥ ३२८॥

मूल (चौपाई)

पंच कवल करि जेवन लागे।
गारि गान सुनि अति अनुरागे॥
भाँति अनेक परे पकवाने।
सुधा सरिस नहिं जाहिं बखाने॥

अनुवाद (हिन्दी)

सर्व लोक ‘प्राणाय स्वाहा, अपानाय स्वाहा, व्यानाय स्वाहा, उदानाय स्वाहा आणि समानाय स्वाहा’ या मंत्रांचा उच्चार करीत पाच घास घेऊन भोजन करू लागले. जेवताना उणी-दुणी काढण्याचे गाणे ऐकून सर्व प्रेममग्न झाले. अनेक प्रकारची अमृतासारखी स्वादिष्ट पक्वान्ने वाढली गेली. त्यांचे वर्णन करणे कठीण.॥ १॥

मूल (चौपाई)

परुसन लगे सुआर सुजाना।
बिंजन बिबिध नाम को जाना॥
चारि भाँति भोजन बिधि गाई।
एक एक बिधि बरनि न जाई॥

अनुवाद (हिन्दी)

चतुर वाढपी नाना प्रकारची तोंडी लावणी वाढू लागले, त्यांची नावे कोणास ठाऊक? चावून खायचे, चोखून खायचे, चाटून खायचे व प्यायचे असे चार प्रकारचे भोजन-पदार्थ सांगितले आहेत. त्यांतील प्रत्येकाचे इतके पदार्थ बनविले होते की, सांगता सोय नाही.॥ २॥

मूल (चौपाई)

छरस रुचिर बिंजन बहु जाती।
एक एक रस अगनित भाँती॥
जेवँत देहिं मधुर धुनि गारी।
लै लै नाम पुरुष अरु नारी॥

अनुवाद (हिन्दी)

सहा रसांची अनेक प्रकारची स्वादिष्ट तोंडी लावणी होती. एक-एक रसाचे असंख्य प्रकार बनविले होते. भोजन करताना पुरुष व स्त्रिया यांची नावे घेत घेत मधुर स्वरांनी स्त्रिया टोमणे मारीत होत्या.॥ ३॥

मूल (चौपाई)

समय सुहावनि गारि बिराजा।
हँसत राउ सुनि सहित समाजा॥
एहि बिधि सबहीं भोजनु कीन्हा।
आदर सहित आचमनु दीन्हा॥

अनुवाद (हिन्दी)

प्रसंगानुसार चाललेले विनोद शोभून दिसत होते. ते ऐकून राजा दशरथांच्यासह सर्व मंडळी हसत होती. अशा प्रकारे सर्वांचे भोजन झाले, मग सर्वांना आदराने हात धुण्यासाठी पाणी दिले गेले.॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

देइ पान पूजे जनक दसरथु सहित समाज।
जनवासेहि गवने मुदित सकल भूप सिरताज॥ ३२९॥

अनुवाद (हिन्दी)

मग पान देऊन जनकांनी परिवारासह दशरथांचे पूजन केले. सर्वराजांचे चक्रवर्ती असलेले राजा दशरथ प्रसन्न मनाने जानवश्यात गेले.॥ ३२९॥

मूल (चौपाई)

नित नूतन मंगल पुर माहीं।
निमिष सरिस दिन जामिनि जाहीं॥
बड़े भोर भूपतिमनि जागे।
जाचक गुन गन गावन लागे॥

अनुवाद (हिन्दी)

जनकपुरामध्ये नित्य नवे मंगल प्रसंग घडत होते. दिवस व रात्र पळभरात निघून जात. भल्या सकाळी राजांचे मुकुटमणी दशरथांना जाग आली. याचक त्यांचे गुण-गान करू लागले.॥ १॥

मूल (चौपाई)

देखि कुअँर बर बधुन्ह समेता।
किमि कहि जात मोदु मन जेता॥
प्रातक्रिया करि गे गुरु पाहीं।
महा प्रमोदु प्रेमु मन माहीं॥

अनुवाद (हिन्दी)

चारी कुमारांना सुंदर वधूंच्यासह पाहून दशरथांच्या मनात इतका आनंद झाला की, तो कशाही प्रकारे सांगता येत नाही. ते प्रातर्विधी आटोपून गुरू वसिष्ठांकडे गेले. त्यांच्या मनात महान प्रेम व आनंद भरून राहिला होता.॥ २॥

मूल (चौपाई)

करि प्रनामु पूजा कर जोरी।
बोले गिरा अमिअँ जनु बोरी॥
तुम्हरी कृपाँ सुनहु मुनिराजा।
भयउँ आजु मैं पूरन काजा॥

अनुवाद (हिन्दी)

राजांनी प्रणाम व पूजन करून मग हात जोडून अमृतमय वाणीने म्हटले की, ‘हे मुनिराज, ऐका. आपल्या कृपेमुळे आज मी पूर्णकाम झालो.॥ ३॥

मूल (चौपाई)

अब सब बिप्र बोलाइ गोसाईं।
देहु धेनु सब भाँति बनाईं॥
सुनि गुर करि महिपाल बड़ाई।
पुनि पठए मुनिबृंद बोलाई॥

अनुवाद (हिन्दी)

हे स्वामी, आता सर्व ब्राह्मणांना बोलावून त्यांना सर्व तऱ्हेने अलंकृत गाई द्या.’ हे ऐकून गुरूंनी राजाची थोरवी वर्णन केली आणि मुनिगणांना बोलावणे पाठविले.॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

बामदेउ अरु देवरिषि बालमीकि जाबालि।
आए मुनिबर निकर तब कौसिकादि तपसालि॥ ३३०॥

अनुवाद (हिन्दी)

मग वामदेव, देवर्षीनारद, वाल्मीकी, जाबाली, विश्वामित्र आदी तपस्वी श्रेष्ठ मुनींचे समूहच्या समूह आले.॥ ३३०॥

मूल (चौपाई)

दंड प्रनाम सबहि नृप कीन्हे।
पूजि सप्रेम बरासन दीन्हे॥
चारि लच्छ बर धेनु मगाईं।
काम सुरभि सम सील सुहाईं॥

अनुवाद (हिन्दी)

राजांनी सर्वांना दंडवत प्रणाम केला आणि त्यांना उत्तम आसने देऊन प्रेमाने त्यांचे पूजन केले. चार लाख उत्तम गाई मागविल्या, त्या सर्व कामधेनूसारख्या चांगल्या स्वभावाच्या होत्या आणि शोभिवंत होत्या.॥ १॥

मूल (चौपाई)

सब बिधि सकल अलंकृत कीन्हीं।
मुदित महिप महिदेवन्ह दीन्हीं॥
करत बिनय बहु बिधि नरनाहू।
लहेउँ आजु जगजीवन लाहू॥

अनुवाद (हिन्दी)

त्या सर्व गाईंना सर्व प्रकारे अलंकार व वस्त्रांनी सजवून राजाने प्रसन्न मनाने ब्राह्मणांना दिल्या. यावेळी राजा मानत होता की, या जगामध्ये मी आजच जगण्याचा आनंद मिळविला.॥ २॥

मूल (चौपाई)

पाइ असीस महीसु अनंदा।
लिए बोलि पुनि जाचक बृंदा॥
कनकबसन मनि हय गय स्यंदन।
दिए बूझि रुचि रबिकुलनंदन॥

अनुवाद (हिन्दी)

ब्राह्मणांकडून आशीर्वाद मिळाल्यावर महाराज आनंदित झाले. नंतर याचकांच्या टोळ्या बोलावल्या. त्या सर्वांना त्यांच्या आवडीप्रमाणे सोने, वस्त्रे, रत्ने, घोडे, हत्ती आणि रथ इत्यादी, जे ज्यांनी मागितले, ते त्यांना सूर्यकुलाला आनंदित करणाऱ्या राजा दशरथांनी दिले.॥ ३॥

मूल (चौपाई)

चले पढ़त गावत गुन गाथा।
जय जय जय दिनकर कुल नाथा॥
एहि बिधि राम बिआह उछाहू।
सकइ न बरनि सहस मुख जाहू॥

अनुवाद (हिन्दी)

ते सर्वजण गुणानुवाद गात आणि ‘सूर्यकुलाधिपतींचा जयजयकार असो,’ असे म्हणत परत गेले. अशा प्रकारे श्रीरामचंद्रांच्या विवाहाचा उत्सव झाला. त्याचे वर्णन सहस्रमुखी शेषसुद्धा करू शकत नाही.॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

बार बार कौसिक चरन सीसु नाइ कह राउ।
यह सबु सुखु मुनिराज तव कृपा कटाच्छ पसाउ॥ ३३१॥

अनुवाद (हिन्दी)

विश्वामित्रांच्या चरणी मस्तक ठेवीत महाराज जनक म्हणाले, ‘हे मुनिराज, हे सर्व सुख तुमच्याच कृपाकटाक्षाचा प्रसाद आहे.’॥ ३३१॥

मूल (चौपाई)

जनक सनेहु सीलु करतूती।
नृपु सब भाँति सराह बिभूती॥
दिन उठि बिदा अवधपति मागा।
राखहिं जनकु सहित अनुरागा॥

अनुवाद (हिन्दी)

राजा दशरथांनी राजा जनकांच्या स्नेह, शील, कर्तृत्व आणि ऐश्वर्य यांची सर्व प्रकारे प्रशंसा केली. रोज सकाळी उठून राजा दशरथ निरोप घेण्यासाठी जात, परंतु राजा जनक त्यांना प्रेमाने ठेवून घेत.॥ १॥

मूल (चौपाई)

नित नूतन आदरु अधिकाई।
दिन प्रति सहस भाँति पहुनाई॥
नित नव नगर अनंद उछाहू।
दसरथ गवनु सोहाइ न काहू॥

अनुवाद (हिन्दी)

परस्परांविषयी नित्य नवा आदर वाढत होता. प्रत्येक दिवशी हजारो प्रकारचा पाहुणचार चालला होता. नगरामध्ये नित्य नवीन आनंद आणि उत्साह असे. दशरथांनी परत जावे, हे कुणाला आवडत नव्हते.॥ २॥

मूल (चौपाई)

बहुत दिवस बीते एहि भाँती।
जनु सनेह रजु बँधे बराती॥
कौसिक सतानंद तब जाई।
कहा बिदेह नृपहि समुझाई॥

अनुवाद (हिन्दी)

अशा रितीने पुष्कळ दिवस निघून गेले. जणू वऱ्हाडी प्रेमाच्या बंधनाने बांधलेले होते. तेव्हा विश्वामित्र व शतानंद यांनी जाऊन राजा जनकांना समजावून सांगितले की,॥ ३॥

मूल (चौपाई)

अब दसरथ कहँ आयसु देहू।
जद्यपि छाड़ि न सकहु सनेहू॥
भलेहिं नाथ कहि सचिव बोलाए।
कहि जय जीव सीस तिन्ह नाए॥

अनुवाद (हिन्दी)

‘जरी तुम्ही स्नेहापोटी सोडत नाही, तरीही आता दशरथांना जाण्याची अनुमती द्या.’ ‘हे मुनिवर्य! ठीक आहे’, असे म्हणून जनकांनी मंत्र्यांना बोलावून घेतले. ते आले. ‘जय जीव’ म्हणत त्यांनी मस्तक नमविले.॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

अवधनाथु चाहत चलन भीतर करहु जनाउ।
भए प्रेमबस सचिव सुनि बिप्र सभासद राउ॥ ३३२॥

अनुवाद (हिन्दी)

जनक म्हणाले, ‘अयोध्यानाथ जाऊ इच्छितात, अंतःपुरात वार्ता द्या.’ हे ऐकून मंत्री, ब्राह्मण, सभासद आणि राजा जनक हे सर्व प्रेमवश झाले होते.॥ ३३२॥

मूल (चौपाई)

पुरबासी सुनि चलिहि बराता।
बूझत बिकल परस्पर बाता॥
सत्य गवनु सुनि सब बिलखाने।
मनहुँ साँझ सरसिज सकुचाने॥

अनुवाद (हिन्दी)

जनकपुरवासींना जेव्हा कळले की, वऱ्हाड जाणार आहे, तेव्हा ते व्याकूळ होऊन एक दुसऱ्याला विचारू लागले. जाणार हे खरे आहे, असे ऐकल्यावर ते सर्व उदास झाले, ज्याप्रमाणे संध्याकाळ होताच कमळे कोमेजून जातात.॥ १॥

मूल (चौपाई)

जहँ जहँ आवत बसे बराती।
तहँ तहँ सिद्ध चला बहु भाँती॥
बिबिध भाँति मेवा पकवाना।
भोजन साजु न जाइ बखाना॥

अनुवाद (हिन्दी)

येते वेळी जेथे जेथे वऱ्हाडी मंडळी थांबली होती, तेथे तेथे सर्व प्रकारची शिधा-सामुग्री पाठविली गेली. अनेक प्रकारचे मेवे, पक्वान्ने आणि भोजनाची सामुग्री इतकी पाठविली की, सांगता येत नाही.॥ २॥

मूल (चौपाई)

भरि भरि बसहँ अपार कहारा।
पठईं जनक अनेक सुसारा॥
तुरग लाख रथ सहस पचीसा।
सकल सँवारे नख अरु सीसा॥

अनुवाद (हिन्दी)

अगणित बैलांवर व भारवाहकांवर लादून ती सामुग्री पाठविली. त्याचबरोबर जनकांनी अनेक सुंदर पलंग पाठविले. एक लक्ष घोडे, पंचवीस हजार रथ नखशिखांत सजविलेले होते.॥ ३॥

मूल (चौपाई)

मत्त सहस दस सिंधुर साजे।
जिन्हहि देखि दिसिकुंजर लाजे॥
कनक बसन मनि भरि भरि जाना।
महिषीं धेनु बस्तु बिधि नाना॥

अनुवाद (हिन्दी)

दहा हजार सजविलेले मस्त हत्ती होते. त्यांना पाहिल्यावर दिग्गजसुद्धा ओशाळत होते. गाडॺांमध्ये भरून सोने, वस्त्रे आणि रत्ने तसेच म्हशी, गाई आणि नाना प्रकारच्या वस्तू दिल्या होत्या.॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

दाइज अमित न सकिअ कहि दीन्ह बिदेहँ बहोरि।
जो अवलोकत लोकपति लोक संपदा थोरि॥ ३३३॥

अनुवाद (हिन्दी)

अशा प्रकारे जनकांनी पुन्हा आंदण दिले. ते सांगता येत नाही. ते पाहून लोकपालांची संपत्ती तोकडी वाटत होती.॥ ३३३॥

मूल (चौपाई)

सबु समाजु एहि भाँति बनाई।
जनक अवधपुर दीन्ह पठाई॥
चलिहि बरात सुनत सब रानीं।
बिकल मीनगन जनु लघु पानीं॥

अनुवाद (हिन्दी)

अशा प्रकारे सर्व सामान सज्ज करून ते राजा जनकांनी अयोध्यापुरीस पाठवून दिले. वऱ्हाड जाणार हे ऐकताच सर्व राण्या थोडॺाशा पाण्यात मासे तडफडतात त्याप्रमाणे व्याकूळ झाल्या.॥ १॥

मूल (चौपाई)

पुनि पुनि सीय गोद करि लेहीं।
देइ असीस सिखावनु देहीं॥
होएहु संतत पियहि पिआरी।
चिरु अहिबात असीस हमारी॥

अनुवाद (हिन्दी)

त्या वारंवार सीतेला मांडीवर घेत आणि आशीर्वाद देऊन शिकवण देत की, ‘तू सदैव आपल्या पतीची आवडती हो, तुझे सौभाग्य अखंड राहो, हाच आमचा आशीर्वाद आहे.॥ २॥

मूल (चौपाई)

सासु ससुर गुर सेवा करेहू।
पति रुख लखि आयसु अनुसरेहू॥
अति सनेह बस सखीं सयानी।
नारि धरम सिखवहिं मृदु बानी॥

अनुवाद (हिन्दी)

सासू, सासरे आणि गुरूंची सेवा कर. पतीचा कल पाहून आज्ञा-पालन कर.’ शहाण्या सख्यांनी प्रेमामुळे सीतेला कोमल वाणीने स्त्रियांचा धर्म काय, ते सांगितले.॥ ३॥

मूल (चौपाई)

सादर सकल कुअँरि समुझाईं।
रानिन्ह बार बार उर लाईं॥
बहुरि बहुरि भेटहिं महतारीं।
कहहिं बिरंचि रचीं कत नारीं॥

अनुवाद (हिन्दी)

राण्यांनी मोठॺा आदराने सर्व कन्यांना स्त्रियांचा धर्म वारंवार समजावून दिला आणि त्यांना वारंवार हृदयाशी कवटाळून धरले. माता वारंवार भेटून ब्रह्मदेवांनी स्त्री-जातीला का उत्पन्न केले, ते सांगत.॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

तेहि अवसर भाइन्ह सहित रामु भानु कुल केतु।
चले जनक मंदिर मुदित बिदा करावन हेतु॥ ३३४॥

अनुवाद (हिन्दी)

त्याचवेळी सूर्यवंशाच्या ध्वजासारखे असलेले श्रीरामचंद्र भावांसह मोठॺा आनंदाने निरोप घेण्यासाठी जनकांच्या महालाकडे निघाले.॥ ३३४॥

मूल (चौपाई)

चारिउ भाइ सुभायँ सुहाए।
नगर नारि नर देखन धाए॥
कोउ कह चलनचहतहहिं आजू।
कीन्ह बिदेह बिदा कर साजू॥

अनुवाद (हिन्दी)

स्वभावतः सुंदर असलेल्या त्या चारी भावांना पाहाण्यासाठी नगरातील स्त्री-पुरुष धावले. कोणी म्हणे, ‘आज हे जाणार आहेत. जनक राजांनी निरोपाचे सामान सज्ज ठेवले आहे.॥ १॥

मूल (चौपाई)

लेहु नयन भरि रूप निहारी।
प्रिय पाहुने भूप सुत चारी॥
को जानै केहिं सुकृत सयानी।
नयन अतिथि कीन्हे बिधि आनी॥

अनुवाद (हिन्दी)

राजांचे चारी पुत्र असलेल्या या पाहुण्यांचे रूप डोळे भरून पाहून घ्या. हे शहाणे सखी, कोणास ठाऊक, कोणत्या पुण्यामुळे विधात्याने यांना येथे आणून आमच्या नेत्रांचे पाहुणे बनवून टाकले आहे.॥ २॥

मूल (चौपाई)

मरनसीलु जिमि पाव पिऊषा।
सुरतरु लहै जनम कर भूखा॥
पाव नारकी हरिपदु जैसें।
इन्ह कर दरसनु हम कहँ तैसें॥

अनुवाद (हिन्दी)

ज्याप्रमाणे मरणाऱ्याला अमृत मिळावे, जन्माचा भुकेला असलेल्याला कल्पवृक्ष लाभावा आणि नरकात जाण्याजोग्या जिवाला भगवंताचे परमपद मिळावे, त्याप्रमाणे आमच्याकरिता यांचे दर्शन आहे.॥ ३॥

मूल (चौपाई)

निरखि राम सोभा उर धरहू।
निज मन फनि मूरति मनि करहू॥
एहि बिधि सबहि नयन फलु देता।
गए कुअँर सब राज निकेता॥

अनुवाद (हिन्दी)

श्रीरामचंद्रांचे लावण्य निरखून हृदयात धारण करून घे. आपल्या मनाला साप व यांच्या स्वरूपाला मणी बनवून ठेव.’ अशा प्रकारे सर्वांना नेत्रांचे साफल्य देत सर्व राजकुमार राजमहालात गेले.॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

रूप सिंधु सब बंधु लखि हरषि उठा रनिवासु।
करहिं निछावरि आरती महा मुदित मन सासु॥ ३३५॥

अनुवाद (हिन्दी)

रूपाचे सागर असलेल्या सर्व भावांना पाहून संपूर्ण राणीवसा आनंदून गेला. सासवा फार प्रसन्न होऊन ओवाळणी टाकू लागल्या आणि आरती करू लागल्या.॥ ३३५॥

मूल (चौपाई)

देखि राम छबि अति अनुरागीं।
प्रेमबिबस पुनि पुनि पद लागीं॥
रही न लाज प्रीति उर छाई।
सहज सनेहु बरनि किमि जाई॥

अनुवाद (हिन्दी)

श्रीरामांचे लावण्य पाहून त्या प्रेम-मग्न झाल्या. प्रेमवश झाल्यामुळे त्या त्यांच्या वारंवार पाया पडत होत्या. हृदयात प्रेम दाटले होते, म्हणून लज्जा राहिली नाही. त्यांच्या स्वाभाविक स्नेहाचे वर्णन कसे करता येईल?॥ १॥

मूल (चौपाई)

भाइन्ह सहित उबटि अन्हवाए।
छरस असन अति हेतु जेवाँए॥
बोले रामु सुअवसरु जानी।
सील सनेह सकुचमय बानी॥

अनुवाद (हिन्दी)

त्यांनी श्रीरामांना भावांसह उटणे लावून स्नान घातले आणि मोठॺा प्रेमाने षड्रस भोजन वाढले. योग्य वेळ पाहून श्रीरामचंद्र शील, स्नेह आणि संकोचाने म्हणाले,॥ २॥

मूल (चौपाई)

राउ अवधपुर चहत सिधाए।
बिदा होन हम इहाँ पठाए॥
मातु मुदित मन आयसु देहू।
बालक जानि करब नित नेहू॥

अनुवाद (हिन्दी)

‘महाराज अयोध्यापुरीस जाऊ इच्छितात. त्यांनी आम्हांला निरोप घेण्यासाठी पाठविले आहे. हे मातांनो, प्रसन्न मनाने आज्ञा द्या आणि आम्हांला आपली मुले मानून नेहमी स्नेह ठेवा.’॥ ३॥

मूल (चौपाई)

सुनत बचन बिलखेउ रनिवासू।
बोलि न सकहिं प्रेमबस सासू॥
हृदयँ लगाइ कुअँरि सब लीन्ही।
पतिन्ह सौंपि बिनती अति कीन्ही॥

अनुवाद (हिन्दी)

हे ऐकून अंतःपुर उदास झाले. सासवा प्रेमाधिक्यामुळे काही बोलू शकल्या नाहीत. त्यांनी सर्व कुमारींना हृदयाशी धरले व त्यांना पतींच्या हाती सोपवून पुष्कळ विनंती केली.॥ ४॥

छंद

मूल (दोहा)

करि बिनय सिय रामहि समरपी जोरि कर पुनि पुनि कहै।
बलि जाउँ तात सुजान तुम्ह कहुँ बिदित गति सब की अहै॥
परिवार पुरजन मोहि राजहि प्रानप्रिय सिय जानिबी।
तुलसीस सीलु सनेहु लखि निज किंकरी करि मानिबी॥

अनुवाद (हिन्दी)

त्यांनी विनंती करून सीतेला श्रीरामचंद्रांना अर्पण केले आणि हातजोडून वारंवार सांगितले की, ‘हे प्रिय, हे ज्ञानी, मी तुमच्यावरून आपल्याशरीराची कुरवंडी करते. तुम्हांला सर्वांची स्थिती माहीत आहे. परिवाराला, पुरवासीयांना, मला व राजांना सीता ही प्राणप्रिय आहे, असे समजा. हे तुलसीदासांच्या स्वामी, हिचे शील व स्नेह पाहून हिला आपली दासी माना.

सोरठा

मूल (दोहा)

तुम्ह परिपूरन काम जान सिरोमनि भावप्रिय।
जन गुन गाहक राम दोष दलन करुनायतन॥ ३३६॥

अनुवाद (हिन्दी)

तुम्ही पूर्णकाम आहात, ज्ञानशिरोमणी आहात आणि भावप्रिय आहात. हे राम, तुम्ही भक्तांचे गुण ग्रहण करणारे, दोषांचा नाश करणारे आणि दयेचे धाम आहात.’॥ ३३६॥

मूल (चौपाई)

अस कहि रही चरन गहि रानी।
प्रेम पंक जनु गिरा समानी॥
सुनि सनेहसानी बर बानी।
बहुबिधि राम सासु सनमानी॥

अनुवाद (हिन्दी)

असे म्हणून राण्या श्रीरामांचे चरण धरून गप्प झाल्या. जणू त्यांच्या वाणी प्रेमाच्या दलदलीमध्ये रुतून गेल्या. स्नेहाने ओथंबलेली ती श्रेष्ठ वाणी ऐकून श्रीरामांनी सासवांचा अनेक प्रकारे सन्मान केला.॥ १॥

मूल (चौपाई)

राम बिदा मागतकर जोरी।
कीन्ह प्रनामु बहोरि बहोरी॥
पाइ असीस बहुरि सिरु नाई।
भाइन्ह सहित चले रघुराई॥

अनुवाद (हिन्दी)

मग श्रीरामांनी हात जोडून निरोप मागत वारंवार प्रणाम केला. आशीर्वाद मिळाल्यावर पुन्हा मस्तक नमवून श्रीरघुनाथ निघाले.॥ २॥

मूल (चौपाई)

मंजु मधुर मूरति उर आनी।
भईं सनेह सिथिल सब रानी॥
पुनि धीरजु धरि कुअँरि हँकारीं।
बार बार भेटहिं महतारीं॥

अनुवाद (हिन्दी)

श्रीरामांची सुंदर मूर्ती हृदयात धारण केल्याने राण्या प्रेमामुळे शिथिल झाल्या. नंतर धैर्य धरून कन्येंना बोलावून माता वारंवार त्यांना छातीशी कवटाळू लागल्या.॥ ३॥

मूल (चौपाई)

पहुँचावहिं फिरि मिलहिं बहोरी।
बढ़ी परस्पर प्रीति न थोरी॥
पुनिपुनि मिलत सखिन्ह बिलगाई।
बाल बच्छ जिमि धेनु लवाई॥

अनुवाद (हिन्दी)

मुलींना निरोप द्यायच्या आणि त्यांना पुन्हा मिठीत घ्यायच्या. परस्परां-मध्ये प्रेम खूप वाढले होते ना! सख्यांनी वारंवार भेटणाऱ्या मातांना बाजूला केले. नुकत्याच व्यालेल्या गाईला तिच्या बछडॺापासून बाजूला केले जाते, त्याप्रमाणे.॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

प्रेमबिबस नर नारि सब सखिन्ह सहित रनिवासु।
मानहुँ कीन्ह बिदेहपुर करुनाँ बिरहँ निवासु॥ ३३७॥

अनुवाद (हिन्दी)

सर्व स्त्री-पुरुष आणि सख्यांसह संपूर्ण अंतःपुर सागरात डुंबत होते. जणू जनकपुरात कारुण्य आणि विरह यांनी निवास केला होता.॥ ३३७॥

मूल (चौपाई)

सुक सारिका जानकी ज्याए।
कनक पिंजरन्हि राखि पढ़ाए॥
ब्याकुल कहहिं कहाँ बैदेही।
सुनि धीरजु परिहरइ न केही॥

अनुवाद (हिन्दी)

जानकीने ज्या पोपट-मैनांना पाळून-पोसून मोठे केले होते आणि सोन्याच्या पिंजऱ्यात ठेवून त्यांना शिकविले होते, ते व्याकूळ होऊन विचारत होते, ‘वैदेही कुठे आहे?’ त्यांच्या बोलण्यामुळे सर्वांचाच धीर खचला.॥ १॥

मूल (चौपाई)

भए बिकल खग मृग एहि भाँती।
मनुज दसा कैसें कहि जाती॥
बंधु समेत जनकु तब आए।
प्रेम उमगि लोचन जल छाए॥

अनुवाद (हिन्दी)

जेथे पक्षी व पशू असे व्याकूळ झाले, तेथे मनुष्यांची दशा काय सांगावी? मग जनक आपल्या भावाबरोबर तेथे आले. प्रेम उचंबळून आल्याने त्यांच्या नेत्रांमध्ये अश्रू तरळले.॥ २॥

मूल (चौपाई)

सीय बिलोकि धीरता भागी।
रहे कहावत परम बिरागी॥
लीन्हि रायँ उर लाइ जानकी।
मिटी महामरजाद ग्यान की॥

अनुवाद (हिन्दी)

महाराज जनक परम वैराग्यवान मानले जात होते, परंतु सीतेला पहाताच त्यांचा धीरही खचला. राजांनी जानकीला उराशी धरले. प्रेमामुळे ज्ञानाचा बांध फुटला.॥ ३॥

मूल (चौपाई)

समुझावत सब सचिव सयाने।
कीन्ह बिचारु न अवसर जाने॥
बारहिं बार सुता उर लाईं।
सजि सुंदर पालकीं मगाईं॥

अनुवाद (हिन्दी)

सर्व मंत्री त्यांना समजावू लागले, तेव्हा राजांनी विषाद करण्याची ही वेळ नाही, असा विचार केला. वारंवार मुलींना पोटाशी धरून सुंदर सजविलेल्या पालख्या बोलावल्या.॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

प्रेमबिबस परिवारु सबु जानि सुलगन नरेस।
कुअँरि चढ़ाईं पालकिन्ह सुमिरे सिद्धि गनेस॥ ३३८॥

अनुवाद (हिन्दी)

संपूर्ण परिवार प्रेमाने व्याकूळ झाला होता. राजांनी सुंदर मुहूर्त पाहून सिद्धींसह श्रीगणेशाचे स्मरण करून कन्येंना पालख्यांमध्ये बसविले.॥ ३३८॥

मूल (चौपाई)

बहुबिधि भूप सुता समुझाईं।
नारिधरमु कुलरीति सिखाईं॥
दासीं दास दिए बहुतेरे।
सुचि सेवक जे प्रिय सिय केरे॥

अनुवाद (हिन्दी)

राजांनी मुलींची अनेक प्रकारे समजूत घालून त्यांना स्त्रीधर्म व कुळाचार शिकविले. तसेच सीतेच्या विश्वासातील तिला प्रिय असणारे अनेक दासी-दास दिले.॥ १॥

मूल (चौपाई)

सीय चलत ब्याकुल पुरबासी।
होहिं सगुन सुभ मंगल रासी॥
भूसुर सचिव समेत समाजा।
संग चले पहुँचावन राजा॥

अनुवाद (हिन्दी)

सीता निघाली, तेव्हा मिथिलावासी व्याकूळ झाले. मंगल-शकुन होऊ लागले. ब्राह्मण व मंत्री यांच्या समूहासह राजा जनक त्यांना पोहोचविण्यासाठी निघाले.॥ २॥

मूल (चौपाई)

समय बिलोकि बाजने बाजे।
रथ गज बाजि बरातिन्ह साजे॥
दसरथ बिप्र बोलि सब लीन्हे।
दान मान परिपूरन कीन्हे॥

अनुवाद (हिन्दी)

वेळ पाहून वाद्ये वाजू लागली. वऱ्हाडी मंडळींनी रथ, हत्ती आणि घोडे सज्ज केले. राजा दशरथांनी सर्व ब्राह्मणांना बोलावून घेतले आणि त्यांना दान देऊन सन्मानित केले.॥ ३॥

मूल (चौपाई)

चरन सरोज धूरि धरि सीसा।
मुदित महीपति पाइ असीसा॥
सुमिरि गजाननुकीन्ह पयाना।
मंगलमूल सगुन भए नाना॥

अनुवाद (हिन्दी)

त्यांच्या चरण-कमलांची धूळ माथी धरून आणि आशीर्वाद प्राप्त करून राजांना आनंद वाटला आणि श्रीगणेशाचे स्मरण करून त्यांनी प्रस्थान केले. त्यावेळी अनेक मंगल शकुन झाले.॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

सुर प्रसून बरषहिं हरषि करहिं अपछरा गान।
चले अवधपति अवधपुर मुदित बजाइ निसान॥ ३३९॥

अनुवाद (हिन्दी)

देव आनंदित होऊन फुले उधळू लागले आणि अप्सरा गाऊ लागल्या. अयोध्यापती दशरथ नगारे वाजवून आनंदाने अयोध्येला निघाले.॥ ३३९॥

मूल (चौपाई)

नृप करि बिनय महाजन फेरे।
सादर सकल मागने टेरे॥
भूषन बसनबाजि गज दीन्हे।
प्रेम पोषि ठाढ़े सब कीन्हे॥

अनुवाद (हिन्दी)

राजा दशरथांनी सर्व प्रतिष्ठित मंडळींना विनंती करून परत पाठविले आणि सर्व याचकांना आदराने बोलाविले. त्यांना दागिने-कपडे, हत्ती-घोडे दिले आणि प्रेमाने वागून सर्वांना संपन्न व बलशाली केले.॥ १॥

मूल (चौपाई)

बार बार बिरिदावलि भाषी।
फिरे सकल रामहि उर राखी॥
बहुरि बहुरि कोसलपति कहहीं।
जनकु प्रेमबस फिरै न चहहीं॥

अनुवाद (हिन्दी)

ते सर्व वारंवार राजांच्या कुलकीर्तीची वाखाणणी करीत श्रीरामचंद्रांना हृदयी धरून परतले. कोशलाधीश राजा दशरथ परत जाण्यासाठी वारंवार सांगत होते, परंतु राजा जनक प्रेमवश झाल्यामुळे परतू इच्छित नव्हते.॥ २॥

मूल (चौपाई)

पुनि कह भूपति बचन सुहाए।
फिरिअ महीस दूरि बड़ि आए॥
राउ बहोरि उतरिभए ठाढ़े।
प्रेम प्रबाह बिलोचन बाढ़े॥

अनुवाद (हिन्दी)

मग दशरथ म्हणाले, ‘हे राजन, फार दूरवर आलात, आता परत जा.’ राजा दशरथ रथातून उतरून उभे राहिले. त्यांच्या नेत्रांतून प्रेमाश्रू वाहू लागले.॥ ३॥

मूल (चौपाई)

तब बिदेह बोले कर जोरी।
बचन सनेह सुधाँ जनु बोरी॥
करौं कवन बिधि बिनय बनाई।
महाराज मोहि दीन्हि बड़ाई॥

अनुवाद (हिन्दी)

तेव्हा राजा जनक हात जोडून प्रेमरूपी अमृतात ओथंबलेले शब्द बोलले, ‘मी आपल्याला कसे सांगू? हे महाराज, तुम्ही मला मोठी थोरवी दिली आहे.’॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

कोसलपति समधी सजन सनमाने सब भाँति।
मिलनि परसपर बिनय अति प्रीति न हृदयँ समाति॥ ३४०॥

अनुवाद (हिन्दी)

अयोध्यानाथ दशरथांनी आपल्या व्याह्यांना सर्व प्रकारे सन्मानित केले. त्यांच्या परस्पर भेटीमध्ये अत्यंत नम्रता होती आणि हृदयात न मावणारे प्रेम होते.॥ ३४०॥

मूल (चौपाई)

मुनि मंडलिहि जनकसिरु नावा।
आसिरबादु सबहि सन पावा॥
सादर पुनि भेंटे जामाता।
रूप सील गुन निधि सब भ्राता॥

अनुवाद (हिन्दी)

जनकांनी मुनींच्या पुढे मस्तक नमविले आणि सर्वांचे आशीर्वाद प्राप्त केले. नंतर आदराने ते रूप, शील व गुण संपन्न आपल्या जावयांना भेटले.॥ १॥

मूल (चौपाई)

जोरि पंकरुह पानि सुहाए।
बोले बचन प्रेम जनु जाए॥
राम करौं केहि भाँति प्रसंसा।
मुनि महेस मन मानस हंसा॥

अनुवाद (हिन्दी)

आणि सुंदर कर-कमल जोडून प्रेमोत्पन्न शब्द बोलले, ‘हे राम, मी कशा प्रकारे तुमची स्तुती करू? तुम्ही मुनींच्या आणि महादेवांच्या मनरूपी मानस सरोवरातील हंस आहात.॥ २॥

मूल (चौपाई)

करहिं जोग जोगी जेहि लागी।
कोहु मोहु ममता मदु त्यागी॥
ब्यापकु ब्रह्मु अलखु अबिनासी।
चिदानंदु निरगुन गुनरासी॥

अनुवाद (हिन्दी)

योगिजन क्रोध, मोह, ममता आणि मद यांचा त्याग करून ज्यांच्यासाठी योगसाधन करतात, जे सर्वव्यापक, ब्रह्म, अव्यक्त, अविनाशी, चिदानंद, निर्गुण आणि गुणांचे निधान आहेत.॥ ३॥

मूल (चौपाई)

मन समेत जेहि जान न बानी।
तरकि न सकहिं सकल अनुमानी॥
महिमा निगमु नेति कहि कहई।
जो तिहुँ काल एकरस रहई॥

अनुवाद (हिन्दी)

मनासह वाणी ज्यांना जाणत नाही आणि सर्वजण ज्यांच्या विषयीफक्त अनुमानच करतात, कोणताही तर्क करू शकत नाहीत, ज्यांचा महिमा वेद ‘नेति नेति’ म्हणत वर्णन करतात आणि जे सच्चिदानंद तिन्ही कालांमध्ये एकरस, सर्वदा आणि सर्वथा निर्विकार असतात;॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

नयन बिषय मो कहुँ भयउ सो समस्त सुख मूल।
सबइ लाभु जग जीव कहँ भएँ ईसु अनुकूल॥ ३४१॥

अनुवाद (हिन्दी)

तेच सर्व सुखांचे मूळ असलेले तुम्ही माझ्या नेत्रांना दिसू शकला. ईश्वर अनुकूल असल्यावर जगात जिवाला लाभच लाभ मिळतो.॥ ३४१॥

मूल (चौपाई)

सबहि भाँति मोहि दीन्हि बड़ाई।
निज जन जानि लीन्ह अपनाई॥
होहिंसहस दस सारद सेषा।
करहिं कलप कोटिक भरि लेखा॥

अनुवाद (हिन्दी)

तुम्ही मला सर्व प्रकारे मोठेपण दिले आणि आपला समजून आपला बनविले. जरी दहा हजार सरस्वती व शेष असले आणि ते कोटॺवधी कल्पांपर्यंत गणना करीत राहिले,॥ १॥

मूल (चौपाई)

मोर भाग्य राउर गुन गाथा।
कहि न सिराहिं सुनहु रघुनाथा॥
मैं कछु कहउँ एक बल मोरें।
तुम्ह रीझहु सनेह सुठि थोरें॥

अनुवाद (हिन्दी)

तरीही हे रघुनाथ, माझे सद्भाग्य आणि तुमच्या गुणांची कथा पूर्ण होऊ शकत नाही. मी जे काही सांगत आहे, ते फक्त एवढॺाच एका बळावर की, तुम्ही अत्यंत थोडॺाशा प्रेमाने प्रसन्न होता.॥ २॥

मूल (चौपाई)

बार बार मागउँ कर जोरें।
मनु परिहरै चरन जनि भोरे॥
सुनि बर बचन प्रेम जनु पोषे।
पूरनकाम रामु परितोषे॥

अनुवाद (हिन्दी)

मी वारंवार हात जोडून हे मागतो की, माझ्या मनाने चुकूनही तुमचे चरण सोडू नयेत.’ जनकांची ही श्रेष्ठ प्रेमपूर्ण वचने ऐकून पूर्णकाम श्रीराम संतुष्ट झाले.॥ ३॥

मूल (चौपाई)

करि बर बिनय ससुर सनमाने।
पितु कौसिक बसिष्ठ सम जाने॥
बिनती बहुरि भरत सन कीन्ही।
मिलि सप्रेम पुनि आसिष दीन्ही॥

अनुवाद (हिन्दी)

त्यांनी सुंदर शब्दात विनंती करून पिता दशरथ, गुरू विश्वामित्र व कुलगुरू वसिष्ठांसमान मानून श्वशुर जनक यांचा सन्मान केला. नंतर जनकांनी भरताला तसेच सांगितले आणि प्रेमाने भेटून त्याला आशीर्वाद दिला.॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

मिले लखन रिपुसूदनहि दीन्हि असीस महीस।
भए परसपर प्रेमबस फिरि फिरि नावहिं सीस॥ ३४२॥

अनुवाद (हिन्दी)

नंतर राजांनी लक्ष्मण आणि शत्रुघ्न यांना भेटून आशीर्वाद दिला. ते परस्पर प्रेमात बुडून वारंवार एकमेकांना मस्तक नमवू लागले.॥ ३४२॥

मूल (चौपाई)

बार बार करि बिनय बड़ाई।
रघुपति चले संग सब भाई॥
जनक गहे कौसिक पद जाई।
चरन रेनु सिर नयनन्ह लाई॥

अनुवाद (हिन्दी)

राजा जनकांशी वारंवार गुजगोष्टी करीत व त्यांना मोठेपणा देत श्रीरघुनाथ सर्व भावांबरोबर निघाले. जनकांनी जाऊन विश्वामित्रांचे पाय धरले आणि त्यांचे चरण-रज आपल्या मस्तकावर घेऊन नेत्रांनाही लावले.॥ १॥

मूल (चौपाई)

सुनु मुनीस बर दरसन तोरें।
अगमु न कछु प्रतीति मन मोरें॥
जो सुखु सुजसु लोकपति चहहीं।
करत मनोरथ सकुचत अहहीं॥

अनुवाद (हिन्दी)

ते म्हणाले, ‘हे मुनीश्वर, आपले सुंदर दर्शन झाले असता, काहीही दुर्लभ नाही, अशी माझी खात्री आहे. जे सुख आणि सुकीर्ती लोकपालांना हवी असते, परंतु ती मिळणे अशक्य समजून तिचे मनोरथ करताना त्यांना संकोच वाटतो,॥ २॥

मूल (चौपाई)

सो सुखु सुजसु सुलभ मोहि स्वामी।
सब सिधि तव दरसन अनुगामी॥
कीन्हि बिनय पुनि पुनिसिरु नाई।
फिरे महीसु आसिषा पाई॥

अनुवाद (हिन्दी)

हे स्वामी, तेच सुख आणि सुकीर्ती मला सुलभपणे मिळाली. सर्वसिद्धी तुमच्या दर्शनामागोमाग चालत येतात.’ अशा प्रकारे वारंवार स्तुती केली आणि मस्तक टेकवून व त्यांचा आशीर्वाद घेऊन जनक परत गेले.॥ ३॥