५९ मासपारायण, दहावा विश्राम

मिथिलेला वऱ्हाड येणे

मूल (चौपाई)

कनक कलस भरि कोपर थारा।
भाजन ललित अनेक प्रकारा॥
भरे सुधासम सब पकवाने।
नाना भाँति न जाहिं बखाने॥

अनुवाद (हिन्दी)

दूध, सरबत, थंडाई, पाणी इत्यादींनी भरलेले सोन्याचे कलश, अमृतासारखी तऱ्हेतऱ्हेची अवर्णनीय पक्वान्ने, भरलेल्या पराती, थाळ्या इत्यादी अनेक प्रकारची सुंदर भांडी,॥ १॥

मूल (चौपाई)

फल अनेक बर बस्तु सुहाईं।
हरषि भेंट हित भूप पठाईं॥
भूषन बसन महामनि नाना।
खग मृग हय गय बहु बिधि जाना॥

अनुवाद (हिन्दी)

उत्तम फळे आणि इतरही अनेक सुंदर वस्तू जनकराजांनी मोठॺा आनंदाने भेट म्हणून पाठविल्या. दागिने, कपडे, नाना प्रकारची मूल्यवान रत्ने, पक्षी, पशू, घोडे, हत्ती आणि अनेक प्रकारची वाहने॥ २॥

मूल (चौपाई)

मंगल सगुन सुगंध सुहाए।
बहुत भाँति महिपाल पठाए॥
दधि चिउरा उपहार अपारा।
भरि भरि काँवरि चले कहारा॥

अनुवाद (हिन्दी)

तसेच अनेक प्रकारची सुगंधित व शोभिवंत मंगलिक द्रव्ये आणि शुभशकुनी पदार्थ जनकांनी पाठविले. दही, पोहे आणि अगणित भेट वस्तू इत्यादी कावडॺांतून भरभरून घेऊन भोई निघाले.॥ ३॥

मूल (चौपाई)

अगवानन्ह जब दीखि बराता।
उर आनंदु पुलक भर गाता॥
देखि बनाव सहित अगवाना।
मुदित बरातिन्ह हने निसाना॥

अनुवाद (हिन्दी)

स्वागत करणाऱ्यांना जेव्हा वऱ्हाड दिसले, तेव्हा त्यांना आनंद झाला आणि ते रोमांचित झाले. सामोरे येणारे नटून-थटून आलेले पाहून वऱ्हाडी मंडळींनी आनंदाने नगारे वाजविले.॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

हरषि परसपर मिलन हित कछुक चले बगमेल।
जनु आनंद समुद्र दुइ मिलत बिहाइ सुबेल॥ ३०५॥

अनुवाद (हिन्दी)

वऱ्हाडी आणि स्वागत करणारे काही लोक परस्परांना भेटण्यासाठी आनंदाने वेगाने धावले. जणू दोन समुद्र आपली मर्यादा सोडून भेटावे तसे ते एकमेकांना भेटले.॥ ३०५॥

मूल (चौपाई)

बरषि सुमन सुर सुंदरि गावहिं।
मुदित देव दुंदुभीं बजावहिं॥
बस्तु सकल राखीं नृप आगें।
बिनय कीन्हि तिन्ह अति अनुरागें॥

अनुवाद (हिन्दी)

देवसुंदरी फुलांचा वर्षाव करीत गीत गात होत्या आणि देव आनंदाने नगारे वाजवीत होते. स्वागत करण्यास आलेल्या लोकांनी सर्व वस्तू दशरथांच्या समोर ठेवल्या आणि स्वीकारण्याविषयी प्रेमाने विनंती केली.॥ १॥

मूल (चौपाई)

प्रेम समेत रायँ सबु लीन्हा।
भै बकसीस जाचकन्हि दीन्हा॥
करि पूजा मान्यता बड़ाई।
जनवासे कहुँ चले लवाई॥

अनुवाद (हिन्दी)

राजा दशरथांनी सर्व वस्तू प्रेमाने स्वीकारल्या. नंतर त्या बक्षीस म्हणून याचकांना दिल्या गेल्या. त्यानंतर पूजा, आदर-सत्कार आणि सन्मान करून स्वागत करणाऱ्यांनी सर्वांना जानवश्याकडे आणले.॥ २॥

मूल (चौपाई)

बसन बिचित्र पाँवड़े परहीं।
देखि धनदु धन मदु परिहरहीं॥
अति सुंदर दीन्हेउ जनवासा।
जहँ सब कहुँ सब भाँति सुपासा॥

अनुवाद (हिन्दी)

तेथपर्यंत सुंदर वस्त्रांच्या पायघडॺा घातल्या होत्या. त्या पाहून कुबेराचा-सुद्धा आपल्या संपत्तीचा अभिमान ओसरला. फार सुंदर जानवस घर दिले गेले होते. तेथे सर्वांसाठी सर्व तऱ्हेच्या सोयी-सुविधा होत्या.॥ ३॥

मूल (चौपाई)

जानी सियँ बरात पुर आई।
कछु निज महिमा प्रगटि जनाई॥
हृदयँ सुमिरि सब सिद्धि बोलाईं।
भूप पहुनई करन पठाईं॥

अनुवाद (हिन्दी)

वऱ्हाड जनकपुरीत आल्याचे समजल्यावर सीतेने आपला थोडा महिमा प्रकट केला. तिने मनात स्मरण करून सर्व सिद्धींना बोलावून घेतले आणि त्यांना राजा दशरथांचे अतिथ्य करण्यास पाठविले.॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

सिधि सब सिय आयसु अकनि गईं जहाँ जनवास।
लिएँ संपदा सकल सुख सुरपुर भोग बिलास॥ ३०६॥

अनुवाद (हिन्दी)

सीतेची आज्ञा होताच सर्व सिद्धी जानवास घरात सर्व संपदा, सुख व इंद्रपुरीचे भोग-विलास घेऊन गेल्या.॥ ३०६॥

मूल (चौपाई)

निज निजबास बिलोकि बराती।
सुरसुख सकल सुलभ सब भाँती॥
बिभव भेद कछु कोउ न जाना।
सकल जनक कर करहिं बखाना॥

अनुवाद (हिन्दी)

वऱ्हाडी मंडळींनी आपापल्या राहाण्याची ठिकाणे पाहिली, तेव्हा त्यांना देवांना मिळणारी सुखे तिथे आपल्याला सुलभ असलेली दिसली. इतक्या ऐश्वर्याचे रहस्य कुणालाही समजले नाही. सर्वजण राजा जनकांचा मोठेपणा सांगत होते.॥ १॥

मूल (चौपाई)

सिय महिमा रघुनायक जानी।
हरषे हृदयँ हेतु पहिचानी॥
पितु आगमनु सुनत दोउ भाई।
हृदयँ न अति आनंदु अमाई॥

अनुवाद (हिन्दी)

हा सर्व जानकीचा महिमा आणि तिचे प्रेम ओळखून श्रीरामचंद्रांना फार आनंद झाला. आपले वडील राजा दशरथांचे आगमन झाल्याचे ऐकून दोन्ही भावांच्या मनातील आनंद गगनात मावत नव्हता.॥ २॥

मूल (चौपाई)

सकुचन्ह कहि नसकत गुरु पाहीं
पितु दरसन लालचु मन माहीं॥
बिस्वामित्र बिनय बड़ि देखी।
उपजा उर संतोषु बिसेषी॥

अनुवाद (हिन्दी)

संकोचामुळे ते गुरू विश्वामित्रांना सांगू शकत नव्हते. परंतु मनात पित्याच्या दर्शनाची लालसा होती. विश्वामित्रांनी त्यांची मोठी नम्रता पाहिली, तेव्हा त्यांच्या हृदयाला समाधान वाटले.॥३॥

मूल (चौपाई)

हरषि बंधु दोउ हृदयँ लगाए।
पुलक अंग अंबक जल छाए॥
चले जहाँ दसरथु जनवासे।
मनहुँ सरोबर तकेउ पिआसे॥

अनुवाद (हिन्दी)

प्रसन्न होऊन त्यांनी दोघा भावांना हृदयाशी धरले. त्यांचे शरीर पुलकित झाले आणि नेत्रांतून प्रेमाश्रू वाहू लागले. ते त्यांना घेऊन दशरथांच्याकडे गेले. जणू सरोवरच तहानलेल्याकडे निघाले होते.॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

भूप बिलोके जबहिं मुनि आवत सुतन्ह समेत।
उठे हरषि सुखसिंधु महुँ चले थाह सी लेत॥ ३०७॥

अनुवाद (हिन्दी)

जेव्हा राजा दशरथांनी पुत्रांसह मुनी येत असल्याचे पाहिले, तेव्हा ते मोठॺा आनंदाने उठले व सुख-सागराचा थांग घेत निघाले.॥ ३०७॥

मूल (चौपाई)

मुनिहि दंडवत कीन्ह महीसा।
बार बार पद रज धरि सीसा॥
कौसिक राउ लिए उर लाई।
कहि असीस पूछी कुसलाई॥

अनुवाद (हिन्दी)

पृथ्वीपती दशरथांनी मुनींची चरण-रज वारंवार आपल्या मस्तकाला लावली आणि त्यांना दंडवत प्रणाम केला. विश्वामित्रांनी राजाला उठवून हृदयाशी धरले आणि आशीर्वाद देऊन खुशाली विचारली.॥ १॥

मूल (चौपाई)

पुनि दंडवत करत दोउ भाई।
देखि नृपति उर सुखु न समाई॥
सुत हियँ लाइ दुसह दुख मेटे।
मृतक सरीर प्रान जनु भेंटे॥

अनुवाद (हिन्दी)

नंतर दोघा भावांनी राजाला साष्टांग नमस्कार घातला, तेव्हा राजांना झालेला आनंद काही विचारू नका. त्यांनी दोन्ही मुलांना छातीशी कवटाळून आपले वियोगाचे दुःख दूर केले. जणू मेलेल्या शरीरात नवचैतन्य आले.॥ २॥

मूल (चौपाई)

पुनि बसिष्ठ पद सिर तिन्ह नाए।
प्रेम मुदित मुनिबर उर लाए॥
बिप्र बृंद बंदे दुहुँ भाईं।
मनभावती असीसें पाईं॥

अनुवाद (हिन्दी)

नंतर त्यांनी वसिष्ठांच्या चरणी मस्तक ठेवले. मुनिश्रेष्ठ वसिष्ठांनी सप्रेम आनंदाने त्यांना आलिंगन दिले. दोघा बंधूंनी सर्व ब्राह्मणांना वंदन करून मनपसंत आशीर्वाद मिळविले.॥ ३॥

मूल (चौपाई)

भरत सहानुज कीन्ह प्रनामा।
लिए उठाइ लाइ उर रामा॥
हरषे लखन देखि दोउ भ्राता।
मिले प्रेम परिपूरित गाता॥

अनुवाद (हिन्दी)

भरताने लहान भाऊ शत्रुघ्न याचेसह श्रीरामांना प्रणाम केला. श्रीरामांनी त्याला उचलून धरून हृदयाशी कवटाळले. लक्ष्मण दोघा भावांना पाहून आनंदित झाला आणि प्रेमाने त्यांना मिठी घातली.॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

पुरजन परिजन जातिजन जाचक मंत्री मीत।
मिले जथाबिधि सबहि प्रभु परम कृपाल बिनीत॥ ३०८॥

अनुवाद (हिन्दी)

त्यानंतर परम कृपाळू आणि विनयी श्रीरामचंद्र अयोध्यावासीयांना, कुटुंबीयांना, ज्ञातिबांधवांना (भावकी), याचकांना, मंत्र्यांना, मित्रांना अशा साऱ्यांना यथायोग्य पद्धतीने भेटले.॥ ३०८॥

मूल (चौपाई)

रामहि देखि बरात जुड़ानी।
प्रीति कि रीति न जाति बखानी॥
नृप समीप सोहहिं सुत चारी।
जनु धन धरमादिक तनुधारी॥

अनुवाद (हिन्दी)

श्रीरामचंद्रांना पाहून वऱ्हाडी मंडळींना समाधान झाले. प्रेमाच्या रूपाचे वर्णन करता येत नाही. राजाचे चार पुत्र जणू धर्म, अर्थ, काम, मोक्ष हेच साकार झाल्यासारखे शोभत होते.॥ १॥

मूल (चौपाई)

सुतन्ह समेत दसरथहि देखी।
मुदित नगर नर नारि बिसेषी॥
सुमन बरिसि सुर हनहिं निसाना।
नाकनटीं नाचहिं करि गाना॥

अनुवाद (हिन्दी)

पुत्रांसह राजा दशरथांना पाहून नगरातील स्त्री-पुरुष फारच आनंदित झाले होते. आकाशातून देव फुलांची उधळण करीत नगारे वाजवीत होते आणि अप्सरा गात-गात नाचत होत्या.॥ २॥

मूल (चौपाई)

सतानंद अरु बिप्र सचिव गन।
मागध सूत बिदुष बंदीजन॥
सहित बरात राउ सनमाना।
आयसु मागि फिरे अगवाना॥

अनुवाद (हिन्दी)

स्वागताला आलेले शतानंद, इतर ब्राह्मण, मंत्रीगण, स्तुतिपाठक, सूत, विद्वान व भाट यांनी वऱ्हाडासह दशरथ राजांचा आदर-सत्कार केला आणि त्यांचा निरोप घेऊन परत गेले.॥ ३॥

मूल (चौपाई)

प्रथम बरात लगन तें आई।
तातें पुर प्रमोदु अधिकाई॥
ब्रह्मानंदु लोग सब लहहीं।
बढ़हुँ दिवस निसि बिधि सन कहहीं॥

अनुवाद (हिन्दी)

वऱ्हाड लग्नापूर्वीच आले, वऱ्हाड आल्यामुळे जनकपुरीमध्ये आनंद पसरला होता. सर्व लोकांना जणू ब्रह्मानंद वाटत होता. ते विधात्याला विनंती करीत होते की दिवस व रात्र मोठे होवोत.॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

रामु सीय सोभा अवधि सुकृत अवधि दोउ राज।
जहँ तहँ पुरजन कहहिं अस मिलि नर नारि समाज॥ ३०९॥

अनुवाद (हिन्दी)

श्रीराम व सीता हे लावण्याची परिसीमा आहेत, आणि दोन्ही राजे पुण्याची. जिथे तिथे जनकपुरवासी स्त्री-पुरुष जमून असेच म्हणत होते.॥ ३०९॥

मूल (चौपाई)

जनक सुकृत मूरति बैदेही।
दसरथ सुकृत रामु धरें देही॥
इन्ह सम काहुँ न सिव अवराधे।
काहुँ न इन्ह समान फल लाधे॥

अनुवाद (हिन्दी)

‘जानकी ही जनक राजांच्या सुकृताची मूर्ती होय आणि दशरथांचे सुकृत, देह धारण केलेले श्रीराम होत. या दोन्ही राजांसारखी शिवांची आराधना कुणीही केलेली नाही, आणि यांच्यासारखे फल कुणालाही लाभले नाही.॥ १॥

मूल (चौपाई)

इन्ह सम कोउ न भयउ जग माहीं।
है नहिं कतहूँ होनेउ नाहीं॥
हम सब सकल सुकृत कै रासी।
भए जग जनमि जनकपुर बासी॥

अनुवाद (हिन्दी)

त्यांच्यासारखा या जगात कोणी झाला नाही, सध्या कुठेही नाही आणि होणारही नाही. आम्ही सर्वजण संपूर्ण पुण्यांची खाण आहोत, म्हणूनच जगात जन्म घेऊन जनकपुरीचे निवासी झालो.॥ २॥

मूल (चौपाई)

जिन्ह जानकी राम छबि देखी।
को सुकृती हम सरिस बिसेषी॥
पुनि देखब रघुबीर बिआहू।
लेब भली बिधि लोचन लाहू॥

अनुवाद (हिन्दी)

आणि आपण जानकी आणि श्रीराम यांचे लावण्य पाहिले. आमच्यासारखा विशेष पुण्यात्मा कोण असणार? आणि आता आपण श्रीरघुनाथांचा विवाह-सोहळा पहाणार आणि नेत्रांचा पुरेपूर लाभ घेणार.’॥ ३॥

मूल (चौपाई)

कहहिं परसपर कोकिलबयनीं।
एहि बिआहँ बड़ लाभु सुनयनीं॥
बड़ें भाग बिधि बात बनाई।
नयन अतिथि होइहहिं दोउ भाई॥

अनुवाद (हिन्दी)

कोकिळेप्रमाणे मधुर बोलणाऱ्या स्त्रिया आपापसात बोलत होत्या की, ‘हे सुंदरनयने, या विवाहामुळे आमचा मोठा लाभ होणार आहे. आमचे भाग्य मोठे म्हणून विधात्याने सर्व जुळवून आणले. हे दोघे भाऊ आता आपल्या नेत्रांचे पाहुणे होणार.॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

बारहिं बार सनेह बस जनक बोलाउब सीय।
लेन आइहहिं बंधु दोउ कोटि काम कमनीय॥ ३१०॥

अनुवाद (हिन्दी)

राजा जनक हे प्रेमाने सीतेला वारंवार बोलावणार आणि कोटॺवधी कामदेवांसारखे दोघे भाऊ सीतेला घेऊन जाण्यासाठी येत राहणार.॥ ३१०॥

मूल (चौपाई)

बिबिध भाँति होइहि पहुनाई।
प्रिय न काहि अस सासुर माई॥
तब तब राम लखनहि निहारी।
होइहहिं सब पुर लोग सुखारी॥

अनुवाद (हिन्दी)

मग त्यांचा अनेक प्रकारे पाहुणचार होणार. हे सखी, असली सासुरवाडी कुणाला आवडणार नाही? त्यावेळी आम्ही सर्व नगरवासी श्रीराम-लक्ष्मणांना पाहून पाहून सुखावून जाऊ.॥ १॥

मूल (चौपाई)

सखि जस राम लखनकर जोटा।
तैसेइ भूप संग दुइ ढोटा॥
स्याम गौर सब अंग सुहाए।
ते सब कहहिं देखि जे आए॥

अनुवाद (हिन्दी)

हे सखी, श्रीराम-लक्ष्मण यांची जशी जोडी आहे, तसेच राजांच्याबरोबर आणखी दोन कुमार आहेत. एक श्यामल आणि दुसरा गौर वर्णाचा आहे. त्यांचे सर्व अवयव फार सुंदर आहेत. जे लोक पाहून आलेत, ते सर्व असेच म्हणतात.’॥ २॥

मूल (चौपाई)

कहा एक मैं आजु निहारे।
जनु बिरंचि निज हाथ सँवारे॥
भरतु रामही की अनुहारी।
सहसा लखि न सकहिं नर नारी॥

अनुवाद (हिन्दी)

एकजण म्हणाला, ‘मी आजच त्यांना पाहिले. ते इतके सुंदर आहेत की जणू ब्रह्मदेवांनी त्यांना आपल्या हातांनी घडविले आहे. भरत हा श्रीरामांचेच रूप घेऊन आला आहे. स्त्री-पुरुष त्यांना सहजपणे ओळखू शकणार नाहीत.॥ ३॥

मूल (चौपाई)

लखनु सत्रुसूदनु एकरूपा।
नख सिख ते सब अंग अनूपा॥
मन भावहिं मुख बरनि न जाहीं।
उपमा कहुँ त्रिभुवन कोउ नाहीं॥

अनुवाद (हिन्दी)

लक्ष्मण व शत्रुघ्न हे दोघे एकरूप आहेत. दोघांची नखशिखांत सर्व अंगे अनुपम आहेत. मनाला फार छान वाटतात. परंतु मुखाने त्यांचे वर्णन करता येत नाही.॥ ४॥

छंद

मूल (दोहा)

उपमा न कोउ कह दास तुलसी कतहुँ कबि कोबिद कहैं।
बल बिनय बिद्या सील सोभा सिंधु इन्ह से एइ अहैं॥
पुर नारि सकल पसारि अंचल बिधिहि बचन सुनावहीं।
ब्याहिअहुँ चारिउ भाइ एहिं पुर हम सुमंगल गावहीं॥

अनुवाद (हिन्दी)

तुलसीदास म्हणतात की, कवी व विद्वान असे म्हणतात की, यांच्यासाठी कुठेही कुठलीही उपमा नाही. बल, विनय, विद्या आणि शोभेचे सागर असलेले हे, यांच्यासारखे हेच आहेत. जनकपूरच्या सर्व स्त्रिया पदर पसरून विधात्याला म्हणतात की, ‘चारीही भावांचा विवाह याच नगरात होवो आणि आम्ही सर्वजणी मंगल गीते गाऊ.’॥

सोरठा

मूल (दोहा)

कहहिं परस्पर नारि बारि बिलोचन पुलक तन।
सखि सबु करब पुरारि पुन्य पयोनिधि भूप दोउ॥ ३११॥

अनुवाद (हिन्दी)

डोळ्यांत प्रेमाश्रू आणून पुलकित शरीराने स्त्रिया आपसात म्हणत होत्या की, ‘हे सखी, दोन्ही राजे पुण्याचे सागर आहेत, त्रिपुरारी शिव सर्व मनोरथ पूर्ण करतील.’॥ ३११॥

मूल (चौपाई)

एहि बिधि सकल मनोरथ करहीं।
आनँद उमगि उमगि उर भरहीं॥
जे नृप सीय स्वयंबर आए।
देखि बंधु सब तिन्ह सुख पाए॥

अनुवाद (हिन्दी)

अशाप्रकारे सर्वजणी मनोरथ करीत होत्या आणि त्यांच्या हृदयाला आनंदाची भरती येत होती. सीतेच्या स्वयंवरासाठी जे राजे आले होते, त्यांनाही चारी भाऊ पाहून आनंद वाटला.॥ १॥

मूल (चौपाई)

कहत राम जसु बिसद बिसाला।
निज निज भवन गए महिपाला॥
गए बीति कछु दिन एहि भाँती।
प्रमुदित पुरजन सकल बराती॥

अनुवाद (हिन्दी)

श्रीरामांची निर्मल व महान कीर्ती सांगत, ते राजे लोक आपल्या घरी परत गेले. अशा प्रकारे काही दिवस निघून गेले. जनकपुरवासी आणि वऱ्हाडी मंडळी सर्व मोठॺा आनंदात होते.॥ २॥

मूल (चौपाई)

मंगल मूल लगन दिनु आवा।
हिम रितु अगहनु मासु सुहावा॥
ग्रह तिथि नखतु जोगु बर बारू।
लगन सोधि बिधि कीन्ह बिचारू॥

अनुवाद (हिन्दी)

मांगल्याचे मूळ असलेला लग्नाचा दिवस आला. हेमंत ऋतू आणि शोभिवंत मार्गशीर्ष महिना होता. ग्रह, तिथी, नक्षत्र, योग व वार उत्तम होते. मुहूर्त शोधून ब्रह्मदेवांनी त्यावर विचार केला.॥ ३॥

मूल (चौपाई)

पठै दीन्हि नारद सन सोई।
गनी जनक के गनकन्ह जोई॥
सुनी सकल लोगन्ह यह बाता।
कहहिं जोतिषी आहिं बिधाता॥

अनुवाद (हिन्दी)

आणि ती मुहूर्ताची पत्रिका नारदांच्या हातून जनकांच्याकडे पाठविली. जनकांच्या ज्योतिषांनीसुद्धा तीच गणना केली होती. जेव्हा सर्व लोकांना हे कळले, तेव्हा ते म्हणू लागले की, ‘येथील ज्योतिषीसुद्धा ब्रह्मदेवच आहेत.’॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

धेनुधूरि बेला बिमल सकल सुमंगल मूल।
बिप्रन्ह कहेउ बिदेह सन जानि सगुन अनुकूल॥ ३१२॥

अनुवाद (हिन्दी)

निर्मल व सर्व सुंदर मांगल्याचे मूळ असलेली गोरजाची पवित्र वेळ आली आणि अनुकूल शकुन होऊ लागले. हे पाहून ब्राह्मणांनी राजा जनकांना म्हटले.॥ ३१२॥

मूल (चौपाई)

उपरोहितहि कहेउ नरनाहा।
अब बिलंब कर कारनु काहा॥
सतानंद तब सचिव बोलाए।
मंगल सकल साजि सब ल्याए॥

अनुवाद (हिन्दी)

तेव्हा राजा जनकांनी पुरोहित शतानंदांना विचारले की, ‘आता उशीर करण्याचे कारण काय?’ तेव्हा शतानंदांनी मंत्र्यांना बोलावले. ते सर्वजण मंगलकार्याचे सर्व सामान सजवून घेऊन आले.॥ १॥

मूल (चौपाई)

संख निसान पनव बहु बाजे।
मंगल कलस सगुन सुभ साजे॥
सुभग सुआसिनि गावहिं गीता।
करहिं बेद धुनि बिप्र पुनीता॥

अनुवाद (हिन्दी)

शंख, नगारे, ढोल आणि अनेक वाद्ये वाजू लागली. मंगल कलश व शुभ शकुनाच्या दही, दुर्वा इत्यादी वस्तू सजवून ठेवल्या. सुंदर सुवासिनी स्त्रिया गीत गात होत्या आणि पवित्र ब्राह्मण वेदमंत्रांचा घोष करू लागले.॥ २॥

मूल (चौपाई)

लेन चले सादरएहि भाँती।
गए जहाँ जनवास बराती॥
कोसलपति कर देखि समाजू।
अति लघु लाग तिन्हहि सुरराजू॥

अनुवाद (हिन्दी)

सर्वजण मोठॺा आदराने वऱ्हाड आणण्यासाठी निघाले. ते जानवस घरी गेले. अयोध्यापती दशरथांचे वैभव पाहून त्यांना देवराज इंद्रसुद्धा फार तुच्छ वाटू लागला.॥३॥

मूल (चौपाई)

भयउ समउ अब धारिअ पाऊ।
यह सुनि परा निसानहिं घाऊ॥
गुरहि पूछि करि कुल बिधिराजा।
चले संग मुनि साधु समाजा॥

अनुवाद (हिन्दी)

त्यांनी जाऊन विनंती केली की, ‘वेळ झालेली आहे, आता चलावे.’ हे ऐकताच नगाऱ्यांवर टिपरी पडली. गुरू वसिष्ठांना विचारून आणि कुलाचाराप्रमाणे सर्व विधी करून राजा दशरथ मुनी आणि साधूंचा समुदाय बरोबर घेऊन निघाले.॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

भाग्य बिभव अवधेस कर देखि देव ब्रह्मादि।
लगे सराहन सहस मुख जानि जनम निज बादि॥ ३१३॥

अनुवाद (हिन्दी)

ब्रह्मदेव इत्यादी देव अयोध्यापती दशरथांचे भाग्य व वैभव पाहून आपला जन्म व्यर्थ समजू लागले आणि हजारो मुखांनी त्यांची प्रशंसा करू लागले.॥ ३१३॥

मूल (चौपाई)

सुरन्ह सुमंगल अवसरु जाना।
बरषहिं सुमन बजाइ निसाना॥
सिव ब्रह्मादिक बिबुध बरूथा।
चढ़े बिमानन्हि नाना जूथा॥

अनुवाद (हिन्दी)

सुमंगल वेळ पाहून देवगण नगारे वाजवीत फुलांचा वर्षाव करू लागले. शिव, ब्रह्मदेव इत्यादी देववृंद जमावाने विमानांत चढू लागले.॥ १॥

मूल (चौपाई)

प्रेम पुलक तन हृदयँ उछाहू।
चले बिलोकन राम बिआहू॥
देखि जनकपुरु सुर अनुरागे।
निज निज लोक सबहिं लघु लागे॥

अनुवाद (हिन्दी)

ते प्रेमाने पुलकित होऊन आणि हृदय उत्साहाने भरून जाऊन श्रीरामांचा विवाह पाहण्यास निघाले. जनकपूर पाहून देव त्याच्या प्रेमात पडले व त्या सर्वांना आपापले लोक तुच्छ वाटू लागले.॥ २॥

मूल (चौपाई)

चितवहिं चकित बिचित्र बिताना।
रचना सकल अलौकिक नाना॥
नगर नारि नर रूप निधाना।
सुघर सुधरम सुसील सुजाना॥

अनुवाद (हिन्दी)

चित्र-विचित्र मंडप व नाना प्रकारची ती सर्व अलौकिक मांडणी पाहून ते चकित झाले. नगरातील स्त्री-पुरुष रूपाचे भांडार होते, सुंदर ठेवणीचे होते, श्रेष्ठ धर्मात्मे, सुशील व सुजाण होते.॥ ३॥

मूल (चौपाई)

तिन्हहि देखि सब सुर सुरनारीं।
भए नखत जनु बिधु उजिआरीं॥
बिधिहि भयउ आचरजु बिसेषी।
निज करनी कछु कतहुँ न देखी॥

अनुवाद (हिन्दी)

त्या लोकांना पाहून सर्व देव व देवांगना चंद्राच्या प्रकाशाने जसे तारागण निस्तेज होतात. तसे प्रभाहीन झाले. ब्रह्मदेवांना विशेष आश्चर्य वाटले, कारण त्यांना तेथे स्वतःची निर्मिती कुठे दिसली नाही.॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

सिवँ समुझाए देव सब जनि आचरज भुलाहु।
हृदयँ बिचारहु धीर धरि सिय रघुबीर बिआहु॥ ३१४॥

अनुवाद (हिन्दी)

शिवांनी सर्व देवांना समजावून सांगितले की, ‘तुम्ही आश्चर्यात पडू नका. मनात धीर धरून विचार करा की, हा भगवंतांची महामहिमामयी निजशक्ती सीता आणि अखिल ब्रह्मांडांचे परम ईश्वर प्रत्यक्ष भगवान श्रीरामचंद्र यांचा विवाह आहे.॥ ३१४॥

मूल (चौपाई)

जिन्ह कर नामुलेत जग माहीं।
सकल अमंगल मूल नसाहीं॥
करतल होहिं पदारथ चारी।
तेइ सिय रामु कहेउ कामारी॥

अनुवाद (हिन्दी)

ज्यांचे नाव घेताच जगातील सर्व अमंगळ मुळासह नष्ट होते आणि अर्थ, धर्म, काम, मोक्ष हे पदार्थ मुठीत येतात, ते हेच जगताचे माता-पिता श्रीसीताराम आहेत,’ असे शिवांनी सांगितले.॥ १॥

मूल (चौपाई)

एहि बिधि संभु सुरन्ह समुझावा।
पुनि आगें बर बसह चलावा॥
देवन्ह देखे दसरथु जाता।
महामोद मन पुलकित गाता॥

अनुवाद (हिन्दी)

अशाप्रकारे शिवांनी सांगितले आणि मग आपल्या नंदीश्वराला पुढे घेतले. राजा दशरथ मनातून फार प्रसन्न आणि शरीराने पुलकित होऊन पुढे चालले होते, असे देवांना दिसले.॥ २॥

मूल (चौपाई)

साधु समाज संग महिदेवा।
जनु तनु धरें करहिं सुख सेवा॥
सोहत साथ सुभग सुत चारी।
जनु अपबरग सकल तनुधारी॥

अनुवाद (हिन्दी)

त्यांच्यासोबत आनंदित साधू व ब्राह्मण मंडळी अशी दिसत होती की, जणू सर्व सुखे शरीर धारण करून त्यांची सेवा करीत आहेत. चारी सुंदर पुत्र सोबत असे शोभून दिसत होते की जणू चारही मोक्ष देह धारण करून आले आहेत.॥ ३॥

मूल (चौपाई)

मरकत कनक बरन बर जोरी।
देखि सुरन्ह भै प्रीति न थोरी॥
पुनि रामहि बिलोकि हियँ हरषे।
नृपहि सराहि सुमन तिन्ह बरषे॥

अनुवाद (हिन्दी)

पाचूच्या वर्णाचा एक व सुवर्ण वर्णाचा दुसरा, अशी दशरथ-पुत्रांची सुंदर जोडी पाहून देवांनाही फार प्रेम वाटले. मग श्रीरामचंद्रांना पाहून ते मनापासून आनंदित झाले आणि राजांची वाखाणणी करीत त्यांनी फुले उधळली.॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

राम रूपु नख सिख सुभग बारहिं बार निहारि।
पुलक गात लोचन सजल उमा समेत पुरारि॥ ३१५॥

अनुवाद (हिन्दी)

श्रीरामचंद्राचे नखशिखांत सुंदर रूप पाहून पार्वतीसह श्रीशिवांचे शरीर पुलकित झाले आणि त्यांचे नेत्र प्रेमाश्रूंमुळे डबडबले.॥ ३१५॥

मूल (चौपाई)

केकि कंठ दुति स्यामल अंगा।
तड़ित बिनिंदक बसन सुरंगा॥
ब्याह बिभूषन बिबिध बनाए।
मंगल सब सब भाँति सुहाए॥

अनुवाद (हिन्दी)

श्रीरामांचे शरीर मोराच्या कंठासारख्या कांतीसारखे श्यामल होते.त्यांची प्रकाशमय पीत वस्त्रे विजेलाही लाजवीत होती. सर्व मंगलरूप आणि सर्व प्रकारे सुंदर तऱ्हेतऱ्हेची विवाहाची आभूषणे शरीरावर शोभत होती.॥ १॥

मूल (चौपाई)

सरद बिमल बिधु बदनु सुहावन।
नयन नवल राजीव लजावन॥
सकल अलौकिक सुंदरताई।
कहि न जाइ मनहीं मन भाई॥

अनुवाद (हिन्दी)

त्यांचे सुंदर मुख शरद पौर्णिमेच्या निर्मल चंद्रासारखे आणि मनोहर नेत्र नवकमळाला लाजविणारे होते. सर्व सौंदर्य अलौकिक होते. मायिक नव्हे तर दिव्य सच्चिदानंदमय होते. ते सांगता येत नाही. मनातल्या मनातच त्याची गोडी वाटते.॥ २॥

मूल (चौपाई)

बंधु मनोहर सोहहिं संगा।
जात नचावत चपल तुरंगा॥
राजकुअँर बर बाजि देखावहिं।
बंस प्रसंसक बिरिद सुनावहिं॥

अनुवाद (हिन्दी)

सोबत मनोहर भाऊ शोभून दिसत होते. ते चपळ घोडॺांना नाचवत चालले होते. राजकुमार घोडॺांची सुंदर चाल दाखवीत होते आणि वंशाची प्रतिष्ठा सांगणारे मागध-भाट बिरुदावली ऐकवीत होते.॥ ३॥

मूल (चौपाई)

जेहि तुरंग पर रामु बिराजे।
गति बिलोकि खगनायकु लाजे॥
कहि न जाइ सब भाँति सुहावा।
बाजि बेषु जनु काम बनावा॥

अनुवाद (हिन्दी)

ज्या घोडॺावर श्रीराम आरूढ होते. त्याची वेगवान चाल पाहून गरुडसुद्धा लज्जित होत असे. त्याचे वर्णन करता येणे शक्य नाही, तो सर्व प्रकारे सुंदर होता. जणू कामदेवानेच घोडॺाचा वेश धारण केला आहे.॥ ४॥

छंद

मूल (दोहा)

जनु बाजि बेषु बनाइ मनसिजु राम हित अति सोहई।
आपनें बय बल रूप गुन गति सकल भुवन बिमोहई॥
जगमगत जीनु जराव जोति सुमोति मनि मानिक लगे।
किंकिनि ललाम लगामु ललित बिलोकि सुर नर मुनि ठगे॥

अनुवाद (हिन्दी)

जणू श्रीरामचंद्रांच्यासाठी कामदेव घोडॺाचा वेश धारण करून शोभत होता. तो आपली अवस्था, बल, रूप, गुण आणि चाल यांमुळे सर्व लोकांना मोहून टाकीत होता. सुंदर मोती, मणि-माणिक्य जडविलेले जीन प्रकाशाने झगमगत होते. त्यांचे घुंघरू लावलेले सुंदर लगाम पाहून देव, मनुष्य आणि मुनी हे सुद्धा थक्क होत होते.

दोहा

मूल (दोहा)

प्रभु मनसहिं लयलीन मनु चलत बाजि छबि पाव।
भूषित उड़गन तड़ित घनु जनु बर बरहि नचाव॥ ३१६॥

अनुवाद (हिन्दी)

प्रभू रामांच्या इच्छेमध्ये आपले मन विलीन करून चाललेला तो घोडा फार शोभून दिसत होता. जणू तारागण व वीज यांनी अलंकृत झालेला मेघ सुंदर मोराला नाचवीत होता.॥ ३१६॥

मूल (चौपाई)

जेहिं बर बाजि रामु असवारा।
तेहि सारदउ न बरनै पारा॥
संकरु राम रूप अनुरागे।
नयन पंचदस अति प्रिय लागे॥

अनुवाद (हिन्दी)

ज्या उत्तम घोडॺावर श्रीरामचंद्र बसले होते, त्याचे वर्णन सरस्वतीही करू शकणार नाही. श्रीशंकर श्रीरामांच्या रूपावर इतके भाळून गेले होते की, त्यांना या प्रसंगी आपले पंधरा नेत्र फार आवडू लागले होते.॥ १॥

मूल (चौपाई)

हरि हित सहित रामु जब जोहे।
रमा समेत रमापति मोहे॥
निरखि राम छबि बिधि हरषाने।
आठइ नयन जानि पछिताने॥

अनुवाद (हिन्दी)

भगवान विष्णूंनी जेव्हा प्रेमाने श्रीरामांना पाहिले, तेव्हा ते स्वतः श्रीलक्ष्मीपती लक्ष्मीसह मोहित झाले. श्रीरामांची शोभा पाहून ब्रह्मदेव मोठे प्रसन्न झाले. पण आपल्याला फक्त आठ डोळे आहेत, म्हणून त्यांना खेद वाटला.॥ २॥

मूल (चौपाई)

सुर सेनप उर बहुत उछाहू।
बिधि ते डेवढ़ लोचन लाहू॥
रामहि चितव सुरेस सुजाना।
गौतम श्रापु परम हित माना॥

अनुवाद (हिन्दी)

देवांचे सेनापती कार्तिकस्वामी यांच्या हृदयात मोठा उत्साह दाटला होता, कारण ते ब्रह्मदेवांच्यापेक्षा दीडपट (बारा) डोळॺांनी राम-दर्शनाचा आनंद लुटत होते. सुजाण इंद्र आपल्या हजार डोळ्यांनी श्रीरामांना पहात होता आणि गौतम मुनींनी दिलेला शाप आपल्यासाठी परम हितकारक मानत होता.॥ ३॥

मूल (चौपाई)

देव सकल सुरपतिहि सिहाहीं।
आजु पुरंदर सम कोउ नाहीं॥
मुदित देवगन रामहि देखी।
नृपसमाज दुहुँ हरषु बिसेषी॥

अनुवाद (हिन्दी)

सर्व देव देवराज इंद्राशी ईर्ष्या करू लागले होते आणि म्हणत होते की, ‘आज इंद्रासारखा भाग्यवान दुसरा कोणीही नाही.’ श्रीरामचंद्रांना पाहून देवगण प्रसन्न होते आणि दोन्ही राजांच्या परिवारामध्ये आनंद पसरलेला होता.॥ ४॥

छंद

मूल (दोहा)

अति हरषु राजसमाज दुहु दिसि दुंदुभीं बाजहिं घनी।
बरषहिं सुमन सुर हरषि कहि जय जयति जय रघुकुलमनी॥
एहि भाँति जानि बरात आवत बाजने बहु बाजहीं।
रानी सुआसिनि बोलि परिछनि हेतु मंगल साजहीं॥

अनुवाद (हिन्दी)

दोन्हीकडच्या राज परिवारांमध्ये अत्यंत हर्ष होता आणि फार जोराने नगारे वाजत होते. देव प्रसन्न होऊन ‘रघुकुलशिरोमणी श्रीरामांचा जयजयकार असो,’ असे म्हणत फुले उधळत होते. अशा प्रकारे वऱ्हाड आल्याचे समजल्यावर अनेक प्रकारची वाद्ये वाजू लागली आणि राण्या सुवासिनी स्त्रियांना बोलावून वराला ओवाळण्यासाठी मंगल द्रव्ये तयार करू लागल्या.।

दोहा

मूल (दोहा)

सजि आरती अनेक बिधि मंगल सकल सँवारि।
चलीं मुदित परिछनि करन गजगामिनि बर नारि॥ ३१७॥

अनुवाद (हिन्दी)

अनेक प्रकारच्या आरत्या तयार करून व सर्व मंगलद्रव्ये बरोबर घेऊन गजगामिनी सुंदरी आनंदाने औक्षण करण्यासाठी निघाल्या.॥ ३१७॥

मूल (चौपाई)

बिधुबदनीं सब सब मृगलोचनि।
सब निज तन छबि रति मदु मोचनि॥
पहिरें बरन बरन बर चीरा।
सकल बिभूषन सजें सरीरा॥

अनुवाद (हिन्दी)

सर्व स्त्रिया चंद्रमुखी आणि मृगनयनी होत्या आणि सर्वजणी आपापल्याशरीराच्या लावण्याने रतीचा गर्व हरण करीत होत्या. त्यांनी रंगी बेरंगी सुंदर साडॺा परिधान केल्या होत्या आणि शरीरावर सर्व प्रकारचे दागिने घातले होते.॥ १॥

मूल (चौपाई)

सकल सुमंगल अंग बनाएँ।
करहिं गान कलकंठि लजाएँ॥
कंकन किंकिनि नूपुर बाजहिं।
चालि बिलोकि काम गज लाजहिं॥

अनुवाद (हिन्दी)

सर्व अवयवांना सुंदर मंगल उटणी लावलेल्या त्या ललना कोकिळेला लाजवीत मधुर स्वरांनी गायन करीत होत्या. त्यांची कंकणे, कमरपट्टे व नूपुरे वाजत होती. स्त्रियांची चाल पाहून कामदेवाचा हत्तीही लाजत होता.॥ २॥

मूल (चौपाई)

बाजहिं बाजने बिबिध प्रकारा।
नभ अरु नगर सुमंगलचारा॥
सची सारदा रमा भवानी।
जे सुरतिय सुचि सहज सयानी॥

अनुवाद (हिन्दी)

अनेक प्रकारची वाद्ये वाजत होती. आकाश व नगर या दोन्ही स्थानी सुंदर मंगल गीते निनादित होती. इंद्राणी, सरस्वती, लक्ष्मी, पार्वती आणि स्वभावानेच पवित्र आणि ज्ञानी असलेल्या देवांगना होत्या,॥ ३॥

मूल (चौपाई)

कपट नारि बर बेष बनाई।
मिलीं सकल रनिवासहिं जाई॥
करहिं गान कल मंगल बानीं।
हरष बिबस सब काहुँ न जानीं॥

अनुवाद (हिन्दी)

त्या सर्वजणी सुंदर स्त्रियांचा बहाणा करून अंतःपुरात मिसळून गेल्या आणि मनोहर वाणीने मंगलगान करू लागल्या. सर्वजण आनंदात असे बुडून गेले होते की, कुणीही त्यांना ओळखू शकले नाही.॥ ४॥

छंद

मूल (दोहा)

को जान केहि आनंद बस सब ब्रह्मु बर परिछन चली।
कल गान मधुर निसान बरषहिं सुमन सुर सोभा भली॥
आनंदकंदु बिलोकि दूलहु सकल हियँ हरषित भई।
अंभोज अंबक अंबु उमगि सुअंग पुलकावलि छई॥

अनुवाद (हिन्दी)

कोण कुणाला ओळखणार? आनंदाने बेभान झालेल्या त्या सर्वजणी नवरदेव बनलेल्या प्रत्यक्ष ब्रह्माला ओवाळण्यासाठी निघाल्या. मनोहर गायन चालले होते. नगारे मधुरपणे वाजत होते, देव फुले उधळत होते, फार छान शोभा होती. आनंदकंद नवरदेवाला पाहून सर्व स्त्रिया मनातून आनंदून गेल्या. कमळासारख्या नेत्रांतून त्यांचे प्रेमाश्रू उचंबळून आले आणि सुंदर अंगांवर रोमांच दाटले.

दोहा

मूल (दोहा)

जो सुखु भा सिय मातु मन देखि राम बर बेषु।
सो न सकहिं कहि कलप सत सहस सारदा सेषु॥ ३१८॥

अनुवाद (हिन्दी)

श्रीरामांचा वर-वेष पाहून सीतेची माता सुनयना अशी हरखून गेली की, हजारो सरस्वती व शेष हे सुद्धा शंभर कल्पांमध्ये त्याचे वर्णन करू शकणार नाहीत॥ ३१८॥

मूल (चौपाई)

नयन नीरु हटि मंगल जानी।
परिछनि करहिं मुदित मन रानी॥
बेद बिहित अरु कुल आचारू।
कीन्ह भली बिधि सब ब्यवहारू॥

अनुवाद (हिन्दी)

ती मंगलवेळ असल्याचे जाणून राण्या डोळ्यांतील पाणी आवरून प्रसन्न मनाने ओवाळू लागल्या. वेदांमध्ये सांगितलेले आणि कुलाचाराप्रमाणे असलेले सर्व व्यवहार राणीने व्यवस्थितपणे पूर्ण केले.॥ १॥

मूल (चौपाई)

पंच सबद धुनि मंगल गाना।
पट पाँवड़े परहिं बिधि नाना॥
करि आरती अरघु तिन्ह दीन्हा।
राम गमनु मंडप तब कीन्हा॥

अनुवाद (हिन्दी)

तंत्री, ताल, झांज, नगारे आणि तुतारी या पाच प्रकारच्या वाद्यांचे स्वर. पंचध्वनी, वेदध्वनी, बंदीध्वनी, जयध्वनी, शंखध्वनी आणि हुलूध्वनी आणि मंगलगान चालू होते. नाना प्रकारच्या वस्त्रांच्या पायघडॺा घातल्या जात होत्या. सुनयना राणीने आरती करून अर्घ्य दिले, मग श्रीरामांनी मंडपात प्रवेश केला.॥ २॥

मूल (चौपाई)

दसरथु सहित समाज बिराजे।
बिभव बिलोकि लोकपति लाजे॥
समयँ समयँ सुर बरषहिं फूला।
सांति पढ़हिं महिसुर अनुकूला॥

अनुवाद (हिन्दी)

राजा दशरथ आपल्या मंडळींसह आले. त्यांचे वैभव पाहून लोकपालही लाजले. देव वारंवार फुले उधळत होते आणि ब्राह्मण समयानुकूल शांतीपाठ करीत होते.॥ ३॥

मूल (चौपाई)

नभ अरु नगर कोलाहल होई।
आपनि पर कछु सुनइ न कोई॥
एहि बिधि रामु मंडपहिं आए।
अरघु देइ आसन बैठाए॥

अनुवाद (हिन्दी)

आकाशात व नगरात कलकलाट चालला होता. स्वतःचे किंवा दुसऱ्याचे बोलणे कुणालाच ऐकू येत नव्हते. अशा प्रकारे श्रीरामचंद्रांनी मंडपामध्ये प्रवेश केला आणि अर्घ्य देऊन त्यांना आसनावर बसविले गेले.॥ ४॥

छंद

मूल (दोहा)

बैठारि आसन आरती करि निरखि बरु सुखु पावहीं।
मनि बसन भूषन भूरि वारहिं नारि मंगल गावहीं॥
ब्रह्मादि सुरबर बिप्र बेष बनाइ कौतुक देखहीं।
अवलोकि रघुकुल कमल रबि छबि सुफल जीवन लेखहीं॥

अनुवाद (हिन्दी)

श्रीरामांना आसनावर बसवून आरती केलेल्या नवरदेवाला पाहून स्त्रियांना खूप आनंद झाला. त्यांनी भरभरून रत्ने, वस्त्रे आणि अलंकार त्यांच्यावरून ओवाळून टाकले. त्या मंगल गीते गाऊ लागल्या. ब्रह्मदेव इत्यादी श्रेष्ठ देव ब्राह्मणाचा वेश धारण करून हे कौतुक पहात होते. रघुकुलरूपी कमळाला प्रफुल्लित करणारे सूर्य श्रीराम यांचे रूप पाहून त्यांना आपले जीवन सफल झाल्याचे वाटत होते.॥

दोहा

मूल (दोहा)

नाऊ बारी भाट नट राम निछावरि पाइ।
मुदित असीसहिं नाइ सिर हरषु न हृदयँ समाइ॥ ३१९॥

अनुवाद (हिन्दी)

न्हावी, द्रोण-पत्रावळींचे विक्रेते, भाट, डोंबारी हे श्रीरामांना आलेली ओवाळणी मिळाल्याने आनंदित होऊन व मस्तक नम्र करून आशीर्वाद देत होते. त्यांच्या मनात आनंद मावत नव्हता.॥ ३१९॥

मूल (चौपाई)

मिले जनकु दसरथु अति प्रीतीं।
करि बैदिक लौकिक सब रीतीं॥
मिलत महा दोउ राज बिराजे।
उपमा खोजि खोजि कबि लाजे॥

अनुवाद (हिन्दी)

वैदिक आणि लौकिक असे सर्व रीति-रिवाज करून राजा जनक व राजा दशरथ मोठॺा प्रेमाने परस्परांना भेटले. दोघा राजांची ती भेट फार शोभून दिसत होती. कविगण त्यांच्यासाठी शोधूनसुद्धा उपमा न मिळाल्याने लाजले.॥ १॥

मूल (चौपाई)

लही न कतहुँ हारि हियँ मानी।
इन्ह सम एइ उपमा उर आनी॥
सामध देखि देव अनुरागे।
सुमन बरषि जसु गावन लागे॥

अनुवाद (हिन्दी)

जेव्हा कोणतीही उपमा मिळेना, तेव्हा मनातून पराजित होऊन त्यांनी मनात हीच उपमा ठरविली की, यांच्यासारखे हेच होत. व्याह्यांची भेट व परस्पर संबंध पाहून देवांना समाधान वाटले आणि त्यांनी फुले उधळून त्यांची वाखाणणी केली.॥ २॥

मूल (चौपाई)

जगु बिरंचि उपजावा जब तें।
देखे सुने ब्याह बहु तब तें॥
सकल भाँति सम साजु समाजू।
सम समधी देखे हम आजू॥

अनुवाद (हिन्दी)

ते म्हणू लागले की, ‘ब्रह्मदेवांनी जग उत्पन्न केले, तेव्हापासून आजवर आम्ही अनेक विवाह पाहिले-ऐकले आहेत, परंतु सर्व प्रकारे समान साहित्य-सामुग्री आणि बरोबरीच्या दृष्टीने असे व्याही आजच पाहिले.’॥ ३॥

मूल (चौपाई)

देव गिरा सुनि सुंदर साँची।
प्रीति अलौकिक दुहु दिसि माची॥
देत पाँवड़े अरघु सुहाए।
सादर जनकु मंडपहिं ल्याए॥

अनुवाद (हिन्दी)

देवांची ती अलौकिक सत्य वाणी ऐकून दोन्हीकडे अलौकिक प्रेमानंद झाला. सुंदर पायघडॺा आणि अर्घ्य देत जनक दशरथांना आदराने मंडपात घेऊन आले.॥ ४॥

छंद

मूल (दोहा)

मंडपु बिलोकि बिचित्र रचनाँ रुचिरताँ मुनि मन हरे।
निज पानि जनक सुजान सब कहुँ आनि सिंघासन धरे॥
कुल इष्ट सरिस बसिष्ट पूजे बिनय करि आसिष लही।
कौसिकहि पूजत परम प्रीति कि रीति तौ न परै कही॥

अनुवाद (हिन्दी)

मंडपाची विलक्षण रचना आणि सजावट पाहून मुनींची मनेसुद्धा मोहित झाली. ज्ञानी जनकांनी स्वतः आपल्या हातांनी आणून सर्वांना सिंहासने मांडली. त्यांनी आपल्या कुलदेवतेसारखी वसिष्ठांची पूजा केली आणि विनंती करून आशीर्वाद प्राप्त केला. विश्वामित्रांची पूजा करते वेळी तर जनकांच्या प्रेमाची रीत सांगण्याच्या पलीकडची होती.॥

दोहा

मूल (दोहा)

बामदेव आदिक रिषय पूजे मुदित महीस।
दिए दिब्य आसन सबहि सब सन लही असीस॥ ३२०॥

अनुवाद (हिन्दी)

राजाने वामदेव इत्यादी ऋषींची प्रसन्न चित्ताने पूजा केली. सर्वांना दिव्य आसने दिली आणि त्यांच्याकडून आशीर्वाद घेतला.॥ ३२०॥

मूल (चौपाई)

बहुरि कीन्हि कोसलपति पूजा।
जानि ईस सम भाउ न दूजा॥
कीन्हि जोरि कर बिनय बड़ाई।
कहि निज भाग्य बिभव बहुताई॥

अनुवाद (हिन्दी)

मग त्यांनी कोशलाधीश राजा दशरथांची पूजा महादेवासमान मानून केली. त्यावेळी कोणतीही इतर भावना नव्हती. त्यानंतर त्यांच्याशी संबंध येत असल्यामुळे आपल्या भाग्याचा व वैभवाचा विस्तार होत असल्याबद्दल प्रशंसा करीत हात जोडून विनंती केली आणि त्यांचा सन्मान केला.॥ १॥

मूल (चौपाई)

पूजे भूपति सकल बराती।
समधी सम सादर सब भाँती॥
आसन उचित दिए सब काहू।
कहौं काह मुख एक उछाहू॥

अनुवाद (हिन्दी)

राजा जनकांनी सर्व वऱ्हाडी मंडळींची व्याही दशरथांप्रमाणेच सर्व प्रकारे आदराने पूजन केले आणि सर्वांना यथायोग्य आसने दिली. मी एका मुखाने त्या उत्सवाचे वर्णन कसे करू?॥ २॥

मूल (चौपाई)

सकल बरात जनक सनमानी।
दान मान बिनती बर बानी॥
बिधि हरि हरु दिसिपति दिनराऊ।
जे जानहिं रघुबीर प्रभाऊ॥

अनुवाद (हिन्दी)

राजा जनकांनी दान, मान-सन्मान, विनय आणि उत्तम वाणीने सर्व वऱ्हाडाचे स्वागत केले. ब्रह्मदेव, विष्णू, शिव, दिक्पाल आणि सूर्य हे श्रीरघुनाथांचा प्रभाव जाणत होते.॥ ३॥

मूल (चौपाई)

कपट बिप्र बर बेष बनाएँ।
कौतुक देखहिं अति सचु पाएँ॥
पूजे जनक देव सम जानें।
दिए सुआसन बिनु पहिचानें॥

अनुवाद (हिन्दी)

ते ब्राह्मणांचा सुंदर वेष घेऊन मोठॺा आनंदाने ती सर्व लीला पहात होते. जनकांनी त्यांना देवासमान मानून त्यांची पूजा केली आणि ओळख पटली नसतानाही त्यांना सुंदर आसने दिली.॥ ४॥

मूल (दोहा)

पहिचान को केहि जान सबहि अपान सुधि भोरी भई।
आनंद कंदु बिलोकि दूलहु उभय दिसि आनँदमई॥
सुर लखे राम सुजान पूजे मानसिक आसन दए।
अवलोकि सीलु सुभाउ प्रभु को बिबुध मन प्रमुदित भए॥

अनुवाद (हिन्दी)

कोण कुणाला ओळखणार? सर्वांची शुद्ध हरपली होती. आनंदकंद नवरदेवाला पाहून दोन्ही पक्षांकडील स्थिती आनंदमय झाली होती. सर्वज्ञ श्रीरामांनी देवांना ओळखले आणि त्यांची मानसिक पूजा करून त्यांना मानसिक आसने दिली. प्रभू श्रीरामांचा शील-स्वभाव पाहून देवगण मनातून हरखून गेले.

दोहा

मूल (दोहा)

रामचंद्र मुख चंद्र छबि लोचन चारु चकोर।
करत पान सादर सकल प्रेमु प्रमोदु न थोर॥ ३२१॥

अनुवाद (हिन्दी)

श्रीरामचंद्राच्या मुखरूपी चंद्राच्या सौंदर्याचे पान सर्वांचे सुंदर नेत्ररूपी चकोर आदराने करीत होते. त्याप्रसंगी प्रेम व आनंद यांची कमतरता नव्हती.॥ ३२१॥

मूल (चौपाई)

समउ बिलोकि बसिष्ठ बोलाए।
सादर सतानंदु सुनि आए॥
बेगि कुअँरि अब आनहु जाई।
चले मुदित मुनि आयसु पाई॥

अनुवाद (हिन्दी)

मुहूर्ताची वेळ जवळ आलेली पाहून वसिष्ठांनी शतानंदांना आदराने बोलाविले. बोलावणे येताच ते आदराने आले. वसिष्ठ म्हणाले, ‘आता जाऊन राजकुमारीला लवकर घेऊन या.’ मुनींची आज्ञा झाल्यावर ते प्रसन्न मनाने निघाले.॥ १॥

मूल (चौपाई)

रानी सुनि उपरोहित बानी।
प्रमुदित सखिन्ह समेत सयानी॥
बिप्र बधू कुलबृद्ध बोलाईं।
करि कुलरीति सुमंगल गाईं॥

अनुवाद (हिन्दी)

बुद्धिमान राणी पुरोहितांचे बोलणे ऐकून सख्यांसह फार आनंदून गेली. ब्राह्मण-स्त्रिया आणि कुळातील वयोवृद्ध स्त्रिया यांना बोलावून राणीने कुलरीतीनुसार सुंदर मंगलगीते गाईली.॥ २॥

मूल (चौपाई)

नारि बेष जे सुर बर बामा।
सकल सुभायँ सुंदरी स्यामा॥
तिन्हहि देखि सुखु पावहिं नारीं।
बिनु पहिचानि प्रानहु ते प्यारीं॥

अनुवाद (हिन्दी)

श्रेष्ठ देवांगंना सुंदर मानवी स्त्रियांचे रूप घेऊन आल्या होत्या. सर्व स्वभावाने सुंदर आणि षोडशीतील तरुणी होत्या. त्यांना पाहून अंतःपुरातील स्त्रियांना आनंद वाटला. ओळख नसतानाही त्या सर्वांना प्राणापेक्षाही अधिक प्रिय वाटू लागल्या.॥ ३॥

मूल (चौपाई)

बार बार सनमानहिं रानी।
उमा रमा सारद सम जानी॥
सीय सँवारि समाजु बनाई।
मुदित मंडपहिं चलीं लवाई॥

अनुवाद (हिन्दी)

त्यांना पार्वती, लक्ष्मी आणि सरस्वतीसारख्या मानून राणीने त्यांचा वारंवार सन्मान केला. अंतःपुरातील स्त्रिया व सख्या यांनी सीतेचा साज-शृंगार केला. सख्या तिला बरोबर घेऊन प्रसन्न चित्ताने मंडपाकडे निघाल्या.॥ ४॥