५८ दशरथांकडे दूत पाठवणे

दोहा

मूल (दोहा)

जौं हम निदरहिं बिप्र बदि सत्य सुनहु भृगुनाथ।
तौ अस को जग सुभटु जेहि भय बस नावहिं माथ॥ २८३॥

अनुवाद (हिन्दी)

हे भृगुनाथ, जर आम्ही ब्राह्मण म्हणून (तुमचा) अपमान करीत असू, तर सत्य ऐका. जगात असा कोणता योद्धा आहे, ज्याच्या भयाने आम्ही त्याच्यापुढे मस्तक नमवावे?॥ २८३॥

मूल (चौपाई)

देव दनुज भूपति भट नाना।
समबल अधिक होउ बलवाना॥
जौं रन हमहि पचारै कोऊ।
लरहिं सुखेन कालु किन होऊ॥

अनुवाद (हिन्दी)

देव, दैत्य, राजा किंवा पुष्कळसे योद्धे हे बळाने आमच्या बरोबरीचे असोत किंवा आमच्यापेक्षा जास्त बलवान असोत, जर कुणीही आम्हांला युद्धासाठी ललकारले, तर आम्ही आनंदाने त्याच्याशी लढू. मग तो काळ का असेना?॥ १॥

मूल (चौपाई)

छत्रिय तनु धरि समर सकाना।
कुल कलंकु तेहिं पावँर आना॥
कहउँ सुभाउ न कुलहि प्रसंसी।
कालहु डरहिं न रन रघुबंसी॥

अनुवाद (हिन्दी)

क्षत्रियशरीर धारण करून युद्धाला जो घाबरला, त्या नीच पुरुषाने आपल्या कुळाला कलंक लावला. मी हे स्वाभाविकपणे म्हणतो, कुळाची प्रशंसा म्हणून नव्हे, रघुवंशी युद्धामध्ये मृत्यूलाही घाबरत नाहीत.॥ २॥

मूल (चौपाई)

बिप्रबंस कै असि प्रभुताई।
अभय होइ जो तुम्हहि डेराई॥
सुनि मृदु गूढ़ बचन रघुपति के।
उघरे पटल परसुधर मति के॥

अनुवाद (हिन्दी)

ब्राह्मणवंशाचा असा महिमा आहे की, जो तुम्हांला घाबरतो, तो निर्भय होतो.’ श्रीरघुनाथांचे कोमल व गूढ वचन ऐकून परशुरामांच्या बुद्धीवरील अज्ञानाचा पडदा दूर झाला.॥ ३॥

मूल (चौपाई)

राम रमापति कर धनु लेहू।
खैंचहु मिटै मोर संदेहू॥
देत चापु आपुहिं चलि गयऊ।
परसुराम मन बिसमय भयऊ॥

अनुवाद (हिन्दी)

परशुराम म्हणाले, ‘हे राम, हे लक्ष्मीपतीचे धनुष्य हाती धरा आणि ओढा, म्हणजे माझा संशय दूर होईल.’ परशुराम जेव्हा धनुष्य देऊ लागले, तेव्हा ते आपोआप श्रीरामांच्या हाती गेले. परशुरामांना मनातून आश्चर्य वाटले.॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

जाना राम प्रभाउ तब पुलक प्रफुल्लित गात।
जोरि पानि बोले बचन हृदयँ न प्रेमु अमात॥ २८४॥

अनुवाद (हिन्दी)

त्यांनी श्रीरामांचा प्रभाव जाणला, तेव्हा त्यांचे अंग आनंदाने रोमांचित झाले. ते हात जोडून म्हणाले. त्यांच्या हृदयात प्रेम मावत नव्हते.॥ २८४॥

मूल (चौपाई)

जय रघुबंस बनज बन भानू।
गहन दनुज कुल दहन कृसानू॥
जय सुर बिप्र धेनु हितकारी।
जय मद मोह कोह भ्रम हारी॥

अनुवाद (हिन्दी)

‘हे रघुकुलरूपी कमलवनाच्या सूर्या, हे राक्षस कुलरूपी दाट जंगलाला जाळून टाकणाऱ्या अग्ने, तुमचा विजय असो. हे देव, ब्राह्मण व गाई यांचे हित करणारे,तुमचा विजय असो. हे मद, क्रोध आणि भ्रम यांचे हरण करणारे, तुमचा विजय असो.॥ १॥

मूल (चौपाई)

बिनय सील करुना गुन सागर।
जयति बचन रचना अति नागर॥
सेवक सुखद सुभग सब अंगा।
जय सरीर छबि कोटि अनंगा॥

अनुवाद (हिन्दी)

हे विनय, शील, कृपा इत्यादी गुणांचे समुद्र आणि बोलण्यात अत्यंत चतुर, तुमचा विजय असो. हे सेवकांना सुख देणारे, सर्वांगसुंदर व शरीरामध्ये कोटॺवधी कामदेवांचे लावण्य धारण करणारे, तुमचा विजय असो.॥ २॥

मूल (चौपाई)

करौं काह मुख एक प्रसंसा।
जय महेस मन मानस हंसा॥
अनुचित बहुत कहेउँ अग्याता।
छमहु छमामंदिर दोउ भ्राता॥

अनुवाद (हिन्दी)

मी एका मुखाने तुमची प्रशंसा कशी करू? हे महादेवांच्या मनरूपीमानस-सरोवरातील हंसा, तुमचा विजय असो. मी नकळत तुम्हांला पुष्कळ अनुचित बोललो. हे क्षमेचे मंदिर असलेल्या दोन्ही बंधूंनो, मला क्षमा करा.॥ ३॥

मूल (चौपाई)

कहि जय जय जय रघुकुलकेतू।
भृगुपति गए बनहि तप हेतू॥
अपभयँ कुटिल महीप डेराने।
जहँ तहँ कायर गवँहिं पराने॥

अनुवाद (हिन्दी)

हे रघुकुळाचे प्रतापस्वरूप श्रीरामचंद्र, तुमचा विजय असो, जय असो, जय असो.’ असे म्हणून परशुराम तप करण्यासाठी वनात निघून गेले. परशुरामांनाही पराजित करणाऱ्या श्रीरामांचा द्वेष केल्यामुळे दुष्ट राजे विनाकारण घाबरून जाऊन हळूच इकडे-तिकडे पळून गेले.॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

देवन्ह दीन्हीं दुंदुभीं प्रभु पर बरषहिं फूल।
हरषे पुर नर नारि सब मिटी मोहमय सूल॥ २८५॥

अनुवाद (हिन्दी)

देवांनी नगारे वाजविले व प्रभूंच्यावर फुलांचा वर्षाव करू लागले. जनकपुरीचे सर्व स्त्री-पुरुष आनंदित झाले. त्यांचे अज्ञानामुळे उत्पन्न झालेले दुःख दूर झाले.॥ २८५॥

मूल (चौपाई)

अति गहगहे बाजने बाजे।
सबहिं मनोहर मंगल साजे॥
जूथ जूथ मिलि सुमुखि सुनयनीं।
करहिं गान कल कोकिलबयनीं॥

अनुवाद (हिन्दी)

जोरजोराने वाद्ये वाजू लागली. सर्वांनी मंगल शृंगार केला. सुंदर वदनी, सुंदर नयनी आणि कोकिळेसारखा मधुर आवाज असणाऱ्या स्त्रिया झुंडींनी जमून सुंदर गाणी गाऊ लागल्या.॥ १॥

मूल (चौपाई)

सुखु बिदेह कर बरनि न जाई।
जन्मदरिद्र मनहुँ निधि पाई॥
बिगत त्रास भइ सीय सुखारी।
जनु बिधु उदयँ चकोरकुमारी॥

अनुवाद (हिन्दी)

जनक राजांचा आनंद अवर्णनीय होता. जणू जन्माने गरीब असलेल्याला धनाचा खजिना सापडला. सीतेचे भय विरू लागले. तिला इतका आनंद झाला, जसा चंद्रोदयामुळे चकोरीला होतो.॥ २॥

मूल (चौपाई)

जनक कीन्ह कौसिकहि प्रनामा।
प्रभु प्रसाद धनु भंजेउ रामा॥
मोहि कृतकृत्य कीन्ह दुहुँ भाईं।
अब जो उचित सो कहिअ गोसाईं॥

अनुवाद (हिन्दी)

जनकराजांनी विश्वामित्रांना प्रणाम केला आणि म्हटले, ‘प्रभूंच्या कृपेनेच श्रीरामचंद्रांनी धनुष्य मोडले. दोन्ही भावांनी मला कृतार्थ केले. हे स्वामी, आता योग्य असेल ते सांगा.’॥ ३॥

मूल (चौपाई)

कह मुनि सुनु नरनाथ प्रबीना।
रहा बिबाहु चाप आधीना॥
टूटतहीं धनु भयउ बिबाहू।
सुर नर नाग बिदित सब काहू॥

अनुवाद (हिन्दी)

मुनी म्हणाले, ‘हे चतुर राजा, तसे पाहता विवाह हा धनुर्भंगावर अवलंबून होता. धनुष्य भंग पावताच विवाह झाला. देव, मनुष्य या सर्वांना हे माहीत आहे.॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

तदपि जाइ तुम्ह करहु अब जथा बंस ब्यवहारु।
बूझि बिप्र कुलबृद्ध गुर बेद बिदित आचारु॥ २८६॥

अनुवाद (हिन्दी)

तरीही तुम्ही जाऊन आपल्या कुलाचा जो आचार असेल, तो ब्राह्मणांना, कुलातील वयोवृद्धांना आणि गुरूंना विचारून तसेच वेदात सांगितल्याप्रमाणे जसा असेल, तसा करा.॥ २८६॥

मूल (चौपाई)

दूत अवधपुर पठवहु जाई।
आनहिं नृप दसरथहि बोलाई॥
मुदित राउ कहि भलेहिं कृपाला।
पठए दूत बोलि तेहि काला॥

अनुवाद (हिन्दी)

अयोध्येला दूत पाठवा. राजा दशरथांना बोलावून आणा.’ राजांनी प्रसन्न होऊन म्हटले, ‘हे कृपाळू, फार छान.’ आणि त्याचवेळी दूतांना बोलावून अयोध्येला पाठविले.॥ १॥

मूल (चौपाई)

बहुरि महाजन सकल बोलाए।
आइ सबन्हि सादर सिर नाए॥
हाट बाट मंदिर सुरबासा।
नगरु सँवारहु चारिहुँ पासा॥

अनुवाद (हिन्दी)

नंतर महाराजांनी सर्व श्रेष्ठींना बोलाविले. सर्वांनी येऊन राजाला आदराने अभिवादन केले. राजांनी सांगितले, बाजार, रस्ते, घरे, देवालये आणि नगर यांना चोहीकडून सजवा॥ २॥

मूल (चौपाई)

हरषि चले निज निज गृह आए।
पुनि परिचारक बोलि पठाए॥
रचहु बिचित्र बितान बनाई।
सिर धरि बचन चले सचु पाई॥

अनुवाद (हिन्दी)

श्रेष्ठी प्रसन्न होऊन आपापल्या घरी आले. त्यानंतर राजांनी नोकरांना बोलावून आज्ञा दिली की, सुंदर मंडप सजवून तयार करा.’ ते ऐकून सर्वांनी आज्ञा शिरसावंद्य मानून ते आनंदाने गेले.॥ ३॥

मूल (चौपाई)

पठए बोलि गुनी तिन्ह नाना।
जे बितान बिधि कुसल सुजाना॥
बिधिहि बंदि तिन्ह कीन्ह अरंभा।
बिरचे कनक कदलि के खंभा॥

अनुवाद (हिन्दी)

त्यांनी अनेक कारागिरांना बोलाविले. ते सर्व मंडप बनविण्यात वाकबदार होते. त्यांनी ब्रह्मदेवांना वंदन करून काम सुरू केले आणि प्रथमतः सोन्याच्या केळींचे खांब तयार केले.॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

हरित मनिन्ह के पत्र फल पदुमराग के फूल।
रचना देखि बिचित्र अति मनु बिरंचि कर भूल॥ २८७॥

अनुवाद (हिन्दी)

हिरव्यागार पाचूंची पाने व फळे बनविली. माणकांची फुले बनविली. मंडपाची अत्यंत विलक्षण रचना पाहून ब्रह्मदेवांचे मनही भुलून गेले.॥ २८७॥

मूल (चौपाई)

बेनु हरित मनिमय सब कीन्हे।
सरल सपरब परहिं नहिं चीन्हे॥
कनक कलित अहिबेलि बनाई।
लखि नहिं परइ सपरन सुहाई॥

अनुवाद (हिन्दी)

हिरव्या पाचूंपासून सरळ व गाठीचे वेळू असे बनविले की, ते खरे की पाचूचे हे ओळखू येत नव्हते. सोन्याच्या सुंदर नागवेली बनविल्या. पानांसह त्या इतक्या छान दिसत होत्या की, ओळखता येत नव्हत्या.॥ १॥

मूल (चौपाई)

तेहि के रचि पचि बंध बनाए।
बिच बिच मुकुता दाम सुहाए॥
मानिक मरकत कुलिस पिरोजा।
चीरि कोरि पचि रचे सरोजा॥

अनुवाद (हिन्दी)

त्याच नागवेलींपासून कलाकुसर करून बांधण्यासाठी दोऱ्या केल्या. मधून-मधून मोत्यांच्या सुंदर झालरी लावल्या. माणके, पाचू, हिरे आणि नीलमणी ही रत्ने कापून, कोरून आणि कलाकुसर करून त्यांपासून लाल, हिरवी, शुभ्र आणि निळ्या रंगांची कमळे बनविली गेली.॥ २॥

मूल (चौपाई)

किए भृंग बहुरंग बिहंगा।
गुंजहिं कूजहिं पवन प्रसंगा॥
सुर प्रतिमा खंभन गढ़ि काढ़ीं।
मंगल द्रब्य लिएँ सब ठाढ़ीं॥

अनुवाद (हिन्दी)

भुंगे आणि अनेक रंगांचे पक्षी बनविले. ते हवेमुळे आपोआप गुंजारव व कूजन करीत होते. खांबांवर देवांच्या मूर्ती कोरल्या होत्या. त्या सर्व मूर्ती मंगल द्रव्ये घेऊन उभ्या होत्या.॥ ३॥

मूल (चौपाई)

चौकें भाँति अनेक पुराईं।
सिंधुर मनिमय सहज सुहाईं॥

अनुवाद (हिन्दी)

गजमुक्तांपासून सहज सुंदर अशा अनेक प्रकारच्या रांगोळ्या काढल्या होत्या.॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

सौरभ पल्लव सुभग सुठि किए नीलमनि कोरि।
हेम बौर मरकत घवरि लसत पाटमय डोरि॥ २८८॥

अनुवाद (हिन्दी)

नीलमणी कोरून अत्यंत सुंदर आंब्याची पाने बनविली होती. सोन्यापासून आंब्याचा मोहोर तयार केला होता आणि रेशमाच्या दोरीने बांधून पाचूच्या फळांचे बनविलेले गुच्छ शोभून दिसत होते.॥ २८८॥

मूल (चौपाई)

रचे रुचिर बर बंदनिवारे।
मनहुँ मनोभवँ फंद सँवारे॥
मंगल कलस अनेक बनाए।
ध्वज पताक पट चमर सुहाए॥

अनुवाद (हिन्दी)

अशी सुंदर व उत्तम तोरणे बनविली होती की, जणू कामदेवाने फासे सजवून ठेवले असावेत. अनेक मंगल-कलश, सुंदर ध्वज,पताका, पडदे आणि चवऱ्या बनविल्या होत्या.॥ १॥

मूल (चौपाई)

दीप मनोहर मनिमय नाना।
जाइ न बरनि बिचित्र बिताना॥
जेहिं मंडप दुलहिनि बैदेही।
सो बरनै असि मति कबि केही॥

अनुवाद (हिन्दी)

रत्नांनी बनविलेल्या सुंदर दिव्यांमुळे त्या विलक्षण मंडपाचे वर्णनच करता येणे अशक्य होते. ज्या मंडपामध्ये जानकी नवरी बनून येणार त्याचे वर्णन करू शकण्याची बुद्धी कुणा कवीमध्ये असेल?॥ २॥

मूल (चौपाई)

दूलहु रामु रूप गुन सागर।
सो बितानु तिहुँ लोक उजागर॥
जनक भवन कै सोभा जैसी।
गृह गृह प्रति पुर देखिअ तैसी॥

अनुवाद (हिन्दी)

ज्या मंडपामध्ये रूप व गुणांचे सागर श्रीरामचंद्र वर म्हणून असतील, तो त्रैलोक्यात प्रसिद्धच असायला हवा. जनकांच्या महालाची जशी शोभा होती, तशीच शोभा नगरातील प्रत्येक घरात दिसत होती.॥ ३॥

मूल (चौपाई)

जेहिं तेरहुति तेहि समय निहारी।
तेहि लघु लगहिं भुवन दस चारी॥
जो संपदा नीच गृह सोहा।
सो बिलोकि सुरनायक मोहा॥

अनुवाद (हिन्दी)

त्यावेळी ज्याने मिथिला प्रदेश पाहिला, त्याला चौदा भवनही तुच्छ वाटले. जनकपुरातील दरिद्री लोकांच्या घरातही त्यावेळी जी संपत्ती शोभत होती, ती पाहून इंद्रसुद्धा मोहून जात होता.॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

बसइ नगर जेहिं लच्छि करि कपट नारि बर बेषु।
तेहि पुर कै सोभा कहत सकुचहिं सारद सेषु॥ २८९॥

अनुवाद (हिन्दी)

ज्या नगरीत प्रत्यक्ष लक्ष्मीने मानवी स्त्रीचे सुंदर रूप धारण करून निवास केलेला आहे, त्या नगरीच्या शोभेचे वर्णन करण्यास सरस्वती आणि शेष हे सुद्धा संकोच करतात.॥ २८९॥

मूल (चौपाई)

पहुँचे दूत राम पुर पावन।
हरषे नगर बिलोकि सुहावन॥
भूप द्वार तिन्ह खबरि जनाई।
दसरथ नृप सुनि लिए बोलाई॥

अनुवाद (हिन्दी)

जनकांचे दूत श्रीरामचंद्रांची पवित्र नगरी अयोध्येमध्ये पोहोचले. सुंदर नगर पाहून ते आनंदित झाले. राजद्वारावर जाऊन त्यांनी निरोप पाठविला. राजा दशरथांनी तो ऐकताच दूतांना बोलावून घेतले.॥ १॥

मूल (चौपाई)

करि प्रनामु तिन्ह पाती दीन्ही।
मुदित महीप आपु उठि लीन्ही॥
बारि बिलोचन बाँचत पाती।
पुलक गात आई भरि छाती॥

अनुवाद (हिन्दी)

दूतांनी प्रणाम करून पत्र दिले. प्रसन्न होऊन राजांनी ते स्वतः उठून घेतले. पत्र वाचताना त्यांच्या नेत्रांमध्ये प्रेम व आनंदाचे अश्रू आले. शरीर रोमांचित झाले आणि ऊर भरून आले.॥ २॥

मूल (चौपाई)

रामु लखनु उर कर बर चीठी।
रहि गए कहत न खाटी मीठी॥
पुनि धरि धीर पत्रिका बाँची।
हरषी सभा बात सुनि साँची॥

अनुवाद (हिन्दी)

हृदयामध्ये राम व लक्ष्मण आहेत, हातात सुंदर पत्र आहे. राजा ते हातात घेऊन तसेच राहिले. बरे-वाईट काहीच बोलता येईना, म्हणून स्तब्ध राहिले. नंतर धैर्य धरून त्यांनी पत्र वाचले. संपूर्ण सभा सत्य ऐकून हर्षित झाली.॥ ३॥

मूल (चौपाई)

खेलत रहे तहाँ सुधि पाई।
आए भरतु सहित हित भाई॥
पूछत अति सनेहँ सकुचाई।
तात कहाँ तें पाती आई॥

अनुवाद (हिन्दी)

भरत आपल्या मित्रांसोबत व बंधू शत्रुघ्नासोबत जेथे खेळत होते, तेथे वर्तमान समजताच येऊन पोहोचले. फार प्रेमाने संकोच वाटून त्यांनी विचारले, ‘बाबा! पत्र कुठून आले आहे?॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

कुसल प्रानप्रिय बंधु दोउ अहहिं कहहु केहिं देस।
सुनि सनेह साने बचन बाची बहुरि नरेस॥ २९०॥

अनुवाद (हिन्दी)

आमचे प्राणप्रिय दोन्ही भाऊ खुशाल आहेत ना? ते कोणत्या देशात आहेत?’ ते स्नेहपूर्ण वचन ऐकून राजांनी पुन्हा पत्र वाचले.॥ २९०॥

मूल (चौपाई)

सुनि पाती पुलके दोउ भ्राता।
अधिक सनेहु समात न गाता॥
प्रीति पुनीत भरत कै देखी।
सकल सभाँ सुखु लहेउ बिसेषी॥

अनुवाद (हिन्दी)

पत्रातील मजकूर ऐकून दोघे भाऊ रोमांचित झाले. प्रेम इतके दाटून आले होते की, मनात मावत नव्हते. भरताचे पवित्र प्रेम पाहून संपूर्ण सभा सुखावून गेली.॥ १॥

मूल (चौपाई)

तब नृप दूत निकट बैठारे।
मधुर मनोहर बचन उचारे॥
भैआ कहहु कुसल दोउ बारे।
तुम्ह नीकें निज नयन निहारे॥

अनुवाद (हिन्दी)

मग राजांनी दूतांना जवळ बसवून घेऊन मन मोहून टाकणाऱ्या मधुर शब्दांत विचारले. ‘बंधूंनो, दोघे मुलगे खुशाल आहेत ना? तुम्ही त्यांना आपल्या डोळ्ॺांनी नीट पाहिले आहे ना?॥ २॥

मूल (चौपाई)

स्यामल गौर धरें धनु भाथा।
बय किसोर कौसिक मुनि साथा॥
पहिचानहु तुम्ह कहहु सुभाऊ।
प्रेम बिबस पुनि पुनि कह राऊ॥

अनुवाद (हिन्दी)

सावळ्या व गोऱ्या रंगाचे ते दोघे धनुष्य व भाते धारण करतात, किशोर वयाचे आहेत, विश्वामित्र मुनींच्या सोबत आहेत. तुम्ही त्यांना ओळखत आहात, तर त्यांचा स्वभाव सांगा बरे!’ अशाप्रकारे प्रेमविवश होऊन महाराज दूतांना विचारू लागले.॥ ३॥

मूल (चौपाई)

जा दिन तें मुनि गए लवाई।
तब तें आजु साँचि सुधि पाई॥
कहहु बिदेह कवन बिधि जाने।
सुनि प्रिय बचन दूत मुसुकाने॥

अनुवाद (हिन्दी)

‘अरे बाबांनो, ज्या दिवसापासून मुनी त्यांना घेऊन गेले आहेत, तेव्हापासून आजच आम्हांला त्यांची वार्ता समजत आहे. जनक महाराजांनी त्यांना कसे ओळखले?’ हे प्रेमाचे बोलणे ऐकून दूतांना हसू आले.॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

सुनहु महीपति मुकुट मनि तुम्ह सम धन्य न कोउ।
रामु लखनु जिन्ह के तनय बिस्व बिभूषन दोउ॥ २९१॥

अनुवाद (हिन्दी)

ते म्हणाले, ‘हे राजांचे मुकुटमणी, ऐका. तुमच्यासारखा धन्य कोणीनाही. राम-लक्ष्मणांसारखे पुत्र तुम्हांला आहेत. कारण विश्वाला ललामभूतअसे.॥ २९१॥

मूल (चौपाई)

पूछन जोगु न तनय तुम्हारे।
पुरुषसिंघ तिहु पुर उजिआरे॥
जिन्ह के जस प्रताप कें आगे।
ससि मलीन रबि सीतल लागे॥

अनुवाद (हिन्दी)

आपल्या पुत्रांबद्दल विचारण्याची गरजच नाही. ते पुरुषसिंह तिन्ही लोकांना प्रकाशस्वरूप आहेत. त्यांच्या कीर्तीपुढे चंद्र मलिन आणि प्रतापापुढे सूर्य शीतल वाटतो.॥ १॥

मूल (चौपाई)

तिन्ह कहँ कहिअ नाथ किमि चीन्हे।
देखिअ रबि कि दीप कर लीन्हे॥
सीय स्वयंबर भूप अनेका।
समिटे सुभट एक तें एका॥

अनुवाद (हिन्दी)

हे नाथा, तुम्ही विचारले की, त्यांना राजा जनकांनी कसे ओळखले. हातात दिवा घेऊन सूर्याला पाहावे लागते काय? सीतेच्या स्वयंवरात अनेक राजे आणि एकापेक्षा एक मोठे योद्धे एकत्र जमले होते.॥ २॥

मूल (चौपाई)

संभु सरासनु काहुँ न टारा।
हारे सकल बीर बरिआरा॥
तीनि लोक महँ जे भटमानी।
सभ कै सकति संभु धनु भानी॥

अनुवाद (हिन्दी)

परंतु भगवान शिवांचे धनुष्य कोणीही हलवू शकले नाही. सर्व बलवान हरले. तिन्ही लोकांत जे वीरतेची घमेंड बाळगणारे होते, त्या सर्वांची शक्ती शिव-धनुष्याने मोडीत काढली.॥ ३॥

मूल (चौपाई)

सकइ उठाइ सरासुर मेरू।
सोउ हियँ हारि गयउ करि फेरू॥
जेहिं कौतुक सिवसैलु उठावा।
सोउ तेहि सभाँ पराभउ पावा॥

अनुवाद (हिन्दी)

सुमेरू पर्वत उचलू शकणारा बाणासुरसुद्धा मनातून पराजित होऊन प्रदक्षिणा घालून निघून गेला. ज्याने मजेने कैलास पर्वत उचलला होता, तो रावणसुद्धा सभेमध्ये पराभूत झाला.॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

तहाँ राम रघुबंसमनि सुनिअ महा महिपाल।
भंजेउ चाप प्रयास बिनु जिमि गज पंकज नाल॥ २९२॥

अनुवाद (हिन्दी)

हे महाराज, ऐका. तेथे रघुवंशरत्न श्रीरामचंद्रांनी विनासायास शिव-धनुष्य असे मोडून टाकले की, ज्याप्रमाणे हत्ती कमळाचा देठ तोडून टाकतो.॥ २९२॥

मूल (चौपाई)

सुनि सरोष भृगुनायकु आए।
बहुत भाँति तिन्ह आँखि देखाए॥
देखि राम बलु निज धनु दीन्हा।
करि बहु बिनय गवनु बन कीन्हा॥

अनुवाद (हिन्दी)

धनुष्य मोडल्याचे ऐकताच परशुराम रागारागाने आले आणि त्या दोघांवर ताव काढू लागले. शेवटी त्यांनी श्रीरामांचे सामर्थ्य लक्षात येताच आपले धनुष्य त्यांना दिले व अनेक प्रकारे त्यांना विनवून स्वतः वनात गमन केले.॥ १॥

मूल (चौपाई)

राजन रामु अतुलबल जैसें।
तेज निधान लखनु पुनि तैसें॥
कंपहिं भूप बिलोकत जाकें।
जिमि गज हरि किसोर के ताकें॥

अनुवाद (हिन्दी)

हे राजन, ज्याप्रमाणे श्रीरामचंद्र अतुलनीय बलवान आहेत, तसेच तेजो निधान लक्ष्मणसुद्धा आहेत. ज्याप्रमाणे हत्ती एखाद्या सिंहाच्या छाव्याची नजर पडताच कापू लागतात, त्याप्रमाणे श्रीराम-लक्ष्मण यांनी पाहताच राजेलोक घाबरत होते.॥ २॥

मूल (चौपाई)

देव देखि तव बालक दोऊ।
अब न आँखि तर आवत कोऊ॥
दूत बचन रचना प्रिय लागी।
प्रेम प्रताप बीर रस पागी॥

अनुवाद (हिन्दी)

हे देव, तुमचे दोन्ही मुलगे पाहिल्यावर आता नजरेत दुसरे कोणी भरतच नाहीत.’ प्रेम, प्रताप आणि वीर-रसाने ओंथबलेले दूतांचे वर्णन सर्वांना खूप आवडले.॥ ३॥

मूल (चौपाई)

सभा समेत राउ अनुरागे।
दूतन्ह देन निछावरि लागे॥
कहि अनीति ते मूदहिं काना।
धरमु बिचारि सबहिं सुखु माना॥

अनुवाद (हिन्दी)

ते ऐकून संपूर्ण सभा व राजा दशरथ प्रेमामध्ये बुडून गेले आणि दूतांची प्रशंसा करू लागले. ते पाहून ‘आमची प्रशंसा नीतिविरुद्ध आहे’ असे म्हणत दूत आपले कान बंद करू लागले. त्यांचे धर्मानुकूल आचरण पाहून सर्वांना आनंद वाटला.॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

तब उठि भूप बसिष्ट कहुँ दीन्हि पत्रिका जाइ।
कथा सुनाई गुरहि सब सादर दूत बोलाइ॥ २९३॥

अनुवाद (हिन्दी)

मग राजांनी उठून वसिष्ठांच्याजवळ जाऊन त्यांना पत्र दाखविले आणि आदराने जनकांच्या दूतांना बोलावून त्यांच्याकडून सर्व वृत्तांत गुरूंना सांगितला.॥ २९३॥

मूल (चौपाई)

सुनि बोले गुर अति सुखु पाई।
पुन्य पुरुष कहुँ महि सुख छाई॥
जिमि सरिता सागर महुँ जाहीं।
जद्यपि ताहि कामना नाहीं॥

अनुवाद (हिन्दी)

सर्व वृत्तांत ऐकून अत्यंत आनंदाने गुरू म्हणाले, ‘पुण्यात्म्या पुरुषांकरिता पृथ्वी सुखाने भरलेली आहे. जरी समुद्राला नद्यांची अपेक्षा नसते, तरी नद्या समुद्राला भेटण्यास जातात,॥ १॥

मूल (चौपाई)

तिमि सुख संपति बिनहिं बोलाएँ।
धरमसील पहिं जाहिं सुभाएँ॥
तुम्ह गुर बिप्र धेनु सुर सेबी।
तसि पुनीत कौसल्या देबी॥

अनुवाद (हिन्दी)

त्याचप्रमाणे सुख व संपत्ती न बोलविता स्वाभाविकपणे धर्मात्म्या पुरुषांजवळ जातात. तुम्ही गुरू, ब्राह्मण, गाय आणि देव यांची सेवा करणारे आहात. तशीच कौसल्यादेवीसुद्धा पवित्र आहे.॥ २॥

मूल (चौपाई)

सुकृती तुम्ह समान जग माहीं।
भयउ न है कोउ होनेउ नाहीं॥
तुम्ह ते अधिक पुन्य बड़ काकें।
राजन राम सरिस सुत जाकें॥

अनुवाद (हिन्दी)

तुमच्यासारखे पुण्यात्मे जगात कोणी झाले नाहीत, आजही नाहीत आणि पुढेही होणार नाहीत. हे राजन, ज्याला रामासारखा पुत्र आहे, त्याच्यापेक्षा अधिक पुण्यवान आणखी कोण असणार?॥ ३॥

मूल (चौपाई)

बीर बिनीत धरम ब्रत धारी।
गुन सागर बर बालक चारी॥
तुम्ह कहुँ सर्ब काल कल्याना।
सजहु बरात बजाइ निसाना॥

अनुवाद (हिन्दी)

शिवाय ज्याचे चारी पुत्र वीर, विनम्र, धर्माचे व्रत धारण करणारे आणि गुणांचे समुद्र आहेत. त्या तुमच्यासाठी सर्व काळांमध्ये कल्याणच कल्याण आहे. म्हणून दवंडी पिटून वऱ्हाड सज्ज करा.॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

चलहु बेगि सुनि गुर बचन भलेहिं नाथ सिरु नाइ।
भूपति गवने भवन तब दूतन्ह बासु देवाइ॥ २९४॥

अनुवाद (हिन्दी)

आणि लवकर निघा.’ गुरूंचे असे बोलणे ऐकून, ‘हे स्वामी! फारच छान.’ असे म्हणत मस्तक नमवून आणि दूतांना निवास दाखवून राजा दशरथ महालात आले.॥ २९४॥

मूल (चौपाई)

राजा सबु रनिवास बोलाई।
जनक पत्रिका बाचि सुनाई॥
सुनि संदेसु सकल हरषानीं।
अपर कथा सब भूप बखानीं॥

अनुवाद (हिन्दी)

राजांनी संपूर्ण अंतःपुर बोलावले आणि त्यांना पत्र वाचून दाखविले. वार्ता ऐकून सर्व राण्या आनंदाने फुलून गेल्या. तसेच त्यांनी दूतांच्या तोंडून ज्या गोष्टी ऐकल्या होत्या, त्या सर्व गोष्टीही राण्यांना सांगितल्या.॥ १॥

मूल (चौपाई)

प्रेम प्रफुल्लित राजहिं रानी।
मनहुँ सिखिनि सुनि बारिद बानी॥
मुदित असीस देहिं गुर नारीं।
अति आनंद मगन महतारीं॥

अनुवाद (हिन्दी)

प्रेमाने प्रफुल्लित झालेल्या राण्या अशा शोभून दिसत होत्या की, जशा मेघनाद (घनगर्जना) ऐकून मयूरी प्रफुल्लित होतात. वयोवृद्ध स्त्रिया प्रसन्न होऊन आशीर्वाद देऊ लागल्या. माता तर आनंदात मग्न होऊन गेल्या.॥ २॥

मूल (चौपाई)

लेहिं परस्पर अति प्रिय पाती।
हृदयँ लगाइ जुड़ावहिं छाती॥
राम लखन कै कीरति करनी।
बारहिं बार भूपबर बरनी॥

अनुवाद (हिन्दी)

सर्वजणी ते अत्यंत प्रेमाचे पत्र हृदयाशी धरून स्वतःचे समाधान करून घेऊ लागल्या. राजांमधील श्रेष्ठ दशरथ यांनी श्रीराम-लक्ष्मण यांची कीर्ती व कर्तृत्व यांचे वारंवार वर्णन केले.॥ ३॥

मूल (चौपाई)

मुनि प्रसादु कहि द्वार सिधाए।
रानिन्ह तब महिदेव बोलाए॥
दिए दान आनंद समेता।
चले बिप्रबर आसिष देता॥

अनुवाद (हिन्दी)

‘ही सर्व मुनींची कृपा आहे’, असे म्हणून ते बाहेर आले. मग राण्यांनी ब्राह्मणांना बोलाविले आणि त्यांना आनंदाने दाने दिली. श्रेष्ठ ब्राह्मण आशीर्वाद देत निघून गेले.॥ ४॥

सोरठा

मूल (दोहा)

जाचक लिए हँकारि दीन्हि निछावरि कोटि बिधि।
चिरु जीवहुँ सुत चारि चक्रबर्ति दसरत्थ के॥ २९५॥

अनुवाद (हिन्दी)

मग भिक्षुकांना बोलावून कोटॺवधी प्रकारच्या देणग्या त्यांना दिल्या. ‘चक्रवर्ती महाराज दशरथ यांचे चारी पुत्र चिरंजीव होवोत.’॥ २९५॥

मूल (चौपाई)

कहत चले पहिरें पट नाना।
हरषि हने गहगहे निसाना॥
समाचार सब लोगन्ह पाए।
लागे घर घर होन बधाए॥

अनुवाद (हिन्दी)

असे म्हणत ते अनेक प्रकारची सुंदर वस्त्रे धारण करून निघाले. नगारेवाले आनंदाने मोठॺा जोराने नगारे वाजवू लागले. सर्व लोकांना वार्ता समजली, तेव्हा घरोघरी आनंदोत्सव सुरू झाला.॥ १॥

मूल (चौपाई)

भुवन चारि दस भरा उछाहू।
जनकसुता रघुबीर बिआहू॥
सुनि सुभ कथा लोग अनुरागे।
मग गृह गलीं सँवारन लागे॥

अनुवाद (हिन्दी)

चौदाही लोक उत्साहाने भरून गेले. जानकी व रामचंद्र यांचा विवाह होणार आहे, ही शुभवार्ता ऐकून लोक प्रेममग्न झाले आणि रस्ते, घरे व गल्‍ल्या सजवू लागले.॥ २॥

मूल (चौपाई)

जद्यपि अवध सदैव सुहावनि।
राम पुरी मंगलमय पावनि॥
तदपि प्रीति कै प्रीति सुहाई।
मंगल रचना रची बनाई॥

अनुवाद (हिन्दी)

जरी अयोध्या ही नित्य शोभिवंत आहे, कारण ती श्रीरामांची मंगलमय पवित्र नगरी आहे, तरी प्रेमाची भरती आल्यामुळे तिला सुंदर मंगल अशी नव्याने सजविली गेली.॥ ३॥

मूल (चौपाई)

ध्वज पताक पट चामर चारू।
छावा परम बिचित्र बजारू॥
कनक कलस तोरन मनि जाला।
हरद दूब दधि अच्छत माला॥

अनुवाद (हिन्दी)

ध्वज, पताका, पडदे व सुंदर चवऱ्यांनी सगळा बाजार विलक्षण सजला होता. सोन्याचे कलश, तोरणे, मण्यांच्या झालरी, हळद, दूर्वा, अक्षता आणि माळा॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

मंगलमय निज निज भवन लोगन्ह रचे बनाइ।
बीथीं सींचीं चतुरसम चौकें चारु पुराइ॥ २९६॥

अनुवाद (हिन्दी)

यांनी लोकांनी आपापली घरे सजवून मंगलमय बनविली होती. गल्‍ल्या-गल्‍ल्यांत चंदन, केशर, कस्तुरी, कापूर यांपासून बनविलेल्या पदार्थांचे सडे शिंपले. दारात सुंदर रांगोळ्या काढल्या.॥ २९६॥

मूल (चौपाई)

जहँ तहँ जूथ जूथ मिलि भामिनि।
सजि नवसप्त सकल दुति दामिनि॥
बिधुबदनीं मृग सावक लोचनि।
निज सरूप रति मानु बिमोचनि॥

अनुवाद (हिन्दी)

वीजेप्रमाणे उज्ज्वल कांतीच्या चंद्रमुखी, बालमृगनयनी आणि आपल्या सुंदर रूपाने कामदेवाची पत्नी रती हिचा अभिमान नष्ट करणाऱ्या सुहासिनी स्त्रिया, सर्व प्रकारचे सोळा शृंगार करून जिकडे-तिकडे जमून,॥ १॥

मूल (चौपाई)

गावहिं मंगल मंजुल बानीं।
सुनि कलरव कलकंठि लजानी॥
भूप भवन किमि जाइ बखाना।
बिस्व बिमोहन रचेउ बिताना॥

अनुवाद (हिन्दी)

मनोहर वाणीने गीत गात होत्या. त्यांचे सुंदर स्वर ऐकून कोकिळासुद्धा लाजत होत्या. जेथे विश्वाला मोहित करणारा मंडप बनविला होता, त्या राजमहालाचे वर्णन तर काय करावे?॥ २॥

मूल (चौपाई)

मंगल द्रब्य मनोहर नाना।
राजत बाजत बिपुल निसाना॥
कतहुँ बिरिद बंदी उच्चरहीं।
कतहुँ बेद धुनि भूसुर करहीं॥

अनुवाद (हिन्दी)

अनेक प्रकारचे मनोहर मांगलिक पदार्थ शोभत होते. अनेक नगारे वाजत होते. कोठे भाट स्तुतिपाठ करीत होते तर कोठे ब्राह्मण वेदघोष करीत होते.॥ ३॥

मूल (चौपाई)

गावहिं सुंदरि मंगल गीता।
लै लै नामु रामु अरु सीता॥
बहुत उछाहु भवनु अति थोरा।
मानहुँ उमगि चला चहु ओरा॥

अनुवाद (हिन्दी)

सुंदर स्त्रिया श्रीराम व सीता यांची नावे ओवून-ओवून मंगल गीते गात होत्या. त्यांचा उत्साह फार मोठा होता आणि त्या मानाने महाल फार छोटा होता. त्यामध्ये तो सामावत नसल्यामुळे जणू चोहीकडे ओसंडत होता.॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

सोभा दसरथ भवन कइ को कबि बरनै पार।
जहाँ सकल सुर सीस मनि राम लीन्ह अवतार॥ २९७॥

अनुवाद (हिन्दी)

दशरथांच्या महालाची शोभा कोणता कवी वर्णन करु शकेल? जेथे सर्व देवाधिदेव श्रीरामचंद्रांनी अवतार घेतला होता.॥ २९७॥

मूल (चौपाई)

भूप भरत पुनि लिए बोलाई।
हय गय स्यंदन साजहु जाई॥
चलहु बेगि रघुबीर बराता।
सुनत पुलक पूरे दोउ भ्राता॥

अनुवाद (हिन्दी)

मग राजांनी भरताला बोलावून घेतले आणि म्हटले, ‘जाऊन घोडे, हत्ती व रथ लवकर सज्ज कर. श्रीरामांच्या वऱ्हाडाबरोबर जायचे आहे.’ हे ऐकताच दोन्ही भाऊ, भरत व शत्रुघ्न आंनदाने मोहोरून गेले.॥ १॥

मूल (चौपाई)

भरत सकल साहनी बोलाए।
आयसु दीन्ह मुदित उठि धाए॥
रचि रुचि जीन तुरग तिन्ह साजे।
बरन बरन बर बाजि बिराजे॥

अनुवाद (हिन्दी)

भरताने पागांच्या प्रमुखांना बोलावले आणि त्यांना घोडे सजविण्याची आज्ञा दिली. ते प्रमुखही प्रसन्न होऊन धावत गेले. त्यांनी मनापासून योग्य तऱ्हेने जीन घालून घोडे सजविले. रंगी बेरंगी उत्तम घोडे शोभून दिसत होते.॥ २॥

मूल (चौपाई)

सुभग सकल सुठि चंचल करनी।
अय इव जरत धरत पग धरनी॥
नाना जाति न जाहिं बखाने।
निदरि पवनु जनु चहत उड़ाने॥

अनुवाद (हिन्दी)

सर्व घोडे फारच सुंदर व वेगवान होते. ते जमिनीवर अशा रीतीने पाय टाकीत होते की जणू धगधगत्या लोखंडावर पाय टाकीत आहेत. अनेक जातींचे घोडे होते, त्यांचे वर्णन करता येत नाही. ते वेगवान चालीने जणू हवेला मागे टाकून पळू पहात होते.॥ ३॥

मूल (चौपाई)

तिन्ह सब छयल भए असवारा।
भरत सरिस बय राजकुमारा॥
सब सुंदर सब भूषनधारी।
कर सर चाप तून कटि भारी॥

अनुवाद (हिन्दी)

त्या सर्व घोडॺांवर भरताचे समवयस्क देखणे राजकुमार बसले. ते सर्व सुंदर होते आणि सर्वांनी आभूषणे घातली होती. त्यांच्या हाती बाण व धनुष्य होते. कमरेला भरलेले भाते बांधलेले होते.॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

छरे छबीले छयल सब सूर सुजान नबीन।
जुग पदचर असवार प्रति जे असिकला प्रबीन॥ २९८॥

अनुवाद (हिन्दी)

सर्वजण निवडक देखणे शूरवीर, चतुर व नवयुवक होते. प्रत्येक घोडेस्वाराबरोबर दोन पायदळ शिपाई होते. ते मोठे तलवारबाज होते.॥ २९८॥

मूल (चौपाई)

बाँधें बिरद बीर रन गाढ़े।
निकसि भए पुर बाहेर ठाढ़े॥
फेरहिं चतुर तुरग गति नाना।
हरषहिं सुनि सुनि पनव निसाना॥

अनुवाद (हिन्दी)

शूराचा वेष घातलेले ते सर्व रणधीर वीर नगराबाहेर येऊन उभे राहिले. ते चतुर वीर आपल्या घोडॺांना तऱ्हेतऱ्हेच्या चालींनी फिरवत होते आणि तुताऱ्या व नगाऱ्यांच्या आवाजाने आनंदित होत होते.॥ १॥

मूल (चौपाई)

रथ सारथिन्ह बिचित्र बनाए।
ध्वज पताक मनि भूषन लाए॥
चवँर चारु किंकिनि धुनि करहीं।
भानु जान सोभा अपहरहीं॥

अनुवाद (हिन्दी)

सारथ्यांनी ध्वजा, पताका, रत्ने व आभूषणे लावून रथ फार विलक्षण सजविले होते. त्यांमध्ये सुंदर चवऱ्या लावल्या होत्या. घंटॺा सुंदर किणकिण करीत होत्या. ते रथ इतके सुंदर होते की, सूर्याच्या रथाची शोभा हरण करीत होते.॥ २॥

मूल (चौपाई)

सावँकरन अगनित हय होते।
ते तिन्ह रथन्ह सारथिन्ह जोते॥
सुंदर सकल अलंकृत सोहे।
जिन्हहि बिलोकत मुनि मन मोहे॥

अनुवाद (हिन्दी)

असंख्य दिव्य शामकर्ण घोडे होते. त्यांना सारथ्यांनी रथांना जुंपले. सर्व घोडे दिसायला सुंदर आणि अलंकारांनी सजविलेले शोभून दिसत होते. त्यांना पाहून मुनींचे मनसुद्धा मोहून जात होते.॥ ३॥

मूल (चौपाई)

जे जल चलहिं थलहि की नाईं।
टाप न बूड़ बेग अधिकाईं॥
अस्त्र सस्त्र सबु साजु बनाई।
रथी सारथिन्ह लिए बोलाई॥

अनुवाद (हिन्दी)

ते घोडे पाण्यावरही जमिनीप्रमाणेच चालत होते. अत्यंत वेगामुळे त्यांची टाप पाण्यात बुडत नव्हती. अस्त्र-शस्त्र आणि सर्व साजशृंगार सजवून सारथ्यांनी रथींना बोलावले.॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

चढ़ि चढ़ि रथ बाहेर नगर लागी जुरन बरात।
होत सगुन सुंदर सबहि जो जेहि कारज जात॥ २९९॥

अनुवाद (हिन्दी)

रथांवर चढून वऱ्हाड नगराबाहेर येऊ लागले. कामासाठी जात असलेल्या सर्वांनाच शुभशकुन होत होते.॥ २९९॥

मूल (चौपाई)

कलित करिबरन्हि परीं अँबारी।
कहि न जाहिं जेहि भाँति सँवारीं॥
चले मत्त गज घंट बिराजी।
मनहुँ सुभग सावन घन राजी॥

अनुवाद (हिन्दी)

श्रेष्ठ हत्तींच्यावर सुंदर अंबाऱ्या होत्या. त्या अशाप्रकारे सजविल्या होत्या की काही सांगता येत नाही. मस्त हत्ती घंटॺांनी सुशोभित होऊन चालत होते, जणू श्रावणातील सुंदर घन-समूह गर्जना करीत जात असावेत.॥ १॥

मूल (चौपाई)

बाहन अपर अनेक बिधाना।
सिबिका सुभग सुखासन जाना॥
तिन्ह चढ़ि चले बिप्रबर बृंदा।
जनु तनु धरें सकल श्रुति छंदा॥

अनुवाद (हिन्दी)

सुंदर पालख्या, सुखासनी शिबिका आणि रथ इत्यादी इतरही अनेक प्रकारची वाहने होती. त्यांवर विद्वान ब्राह्मणांचे समूह आरूढ होऊन निघाले. जणू ते सर्व वेदांचे छंदरूप शरीर धारण करून निघाले होते..॥ २॥

मूल (चौपाई)

मागध सूत बंदि गुनगायक।
चले जान चढ़ि जो जेहि लायक॥
बेसर ऊँट बृषभ बहु जाती।
चले बस्तु भरि अगनित भाँती॥

अनुवाद (हिन्दी)

मागध, सूत, भाट आणि गुण-गान करणारे हे सर्वजण आपापल्या योग्यतेप्रमाणे वाहनांमध्ये बसले. अनेक जातींची खेचरे, उंट व बैल हे असंख्य प्रकारच्या वस्तू वाहून नेत होते.॥ ३॥

मूल (चौपाई)

कोटिन्ह काँवरि चले कहारा।
बिबिध बस्तु को बरनै पारा॥
चले सकल सेवक समुदाई।
निज निज साजु समाजु बनाई॥

अनुवाद (हिन्दी)

कोटॺवधी हमाल सामानाच्या कावडी उचलून निघाले होते. त्यांमध्ये इतक्या प्रकारच्या इतक्या वस्तू होत्या की, त्यांचे वर्णन कुणाला करता येईल? सर्व सेवकांचे जत्थे आपापले गट करून निघाले.॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

सब कें उर निर्भर हरषु पूरित पुलक सरीर।
कबहिं देखिबे नयन भरि रामु लखनु दोउ बीर॥ ३००॥

अनुवाद (हिन्दी)

सर्वांच्या मनात अपार हर्ष होता आणि शरीर पुलकित होते. सर्वांना एकच लालसा होती की, आपण राम-लक्ष्मणांना केव्हा डोळे भरून पाहू शकू?॥ ३००॥

मूल (चौपाई)

गरजहिं गज घंटा धुनि घोरा।
रथ रव बाजि हिंस चहु ओरा॥
निदरि घनहि घुर्म्मरहिं निसाना।
निज पराइ कछु सुनिअ न काना॥

अनुवाद (हिन्दी)

हत्ती चीत्कार करीत होते, त्यांच्या घंटिकांचा तुंबळ ध्वनी होत होता. चोहीकडे रथांची घडघडाट आणि घोडॺांच्या खिंकाळण्याचा आवाज येत होता. नगारे इतके मोठॺाने वाजत होते की, मेघ गर्जनाही तुच्छ वाटत होत्या. कुणालाही आपले किंवा दुसऱ्याचे बोलणे ऐकू येत नव्हते.॥ १॥

मूल (चौपाई)

महा भीर भूपति के द्वारें।
रज होइ जाइ पषान पबारें॥
चढ़ी अटारिन्ह देखहिं नारीं।
लिएँ आरती मंगल थारीं॥

अनुवाद (हिन्दी)

राजा दशरथांच्या द्वारावर एवढीन मोठी गर्दी झाली होती की, तेथे दगड फेकला तर तोही चिरडून माती झाला असता. गच्च्यांवर चढलेल्या स्त्रिया मंगल-तबकांमध्ये आरत्या घेऊन पहात होत्या.॥ २॥

मूल (चौपाई)

गावहिं गीत मनोहर नाना।
अति आनंदु न जाइ बखाना॥
तब सुमंत्र दुइ स्यंदन साजी।
जोते रबि हय निंदक बाजी॥

अनुवाद (हिन्दी)

आणि नाना प्रकारची मनोहर गीते गात होत्या. त्यांच्या आनंदाचे वर्णन करणे शक्य नाही. सुमंताने दोन रथ सजवून त्याला सूर्याच्या घोडॺांवरही मात करणारे घोडे जुंपले.॥ ३॥

मूल (चौपाई)

दोउ रथ रुचिर भूप पहिं आने।
नहिं सारद पहिं जाहिं बखाने॥
राज समाजु एक रथ साजा।
दूसर तेज पुंज अति भ्राजा॥

अनुवाद (हिन्दी)

दोन्ही सुंदर रथ सुमंताने राजा दशरथांच्याजवळ आणले. त्या रथांच्या सौंदर्याचे वर्णन सरस्वतीदेवीही करू शकली नसती. एका रथावर राजेशाही सामान सजविले होते आणि दुसरा रथ तेजःपुंज व सुंदर दिसत होता.॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

तेहिं रथ रुचिर बसिष्ठ कहुँ हरषि चढ़ाइ नरेसु।
आपु चढ़ेउ स्यंदन सुमिरि हर गुर गौरि गनेसु॥ ३०१॥

अनुवाद (हिन्दी)

त्या सुंदर रथावर राजांनी वसिष्ठांना आनंदाने बसवून नंतर शिव, गुरू, गौरी आणि गजाननाचे स्मरण करून महाराज स्वतः दुसऱ्या रथात बसले.॥ ३०१॥

मूल (चौपाई)

सहित बसिष्ठ सोह नृप कैसें।
सुर गुर संग पुरंदर जैसें॥
करि कुल रीति बेद बिधि राऊ।
देखि सबहि सब भाँति बनाऊ॥

अनुवाद (हिन्दी)

देवगुरू बृहस्पतीबरोबर इंद्र शोभावा, तसे वसिष्ठांबरोबर महाराज शोभत होते. वेद-विधीप्रमाणे आणि कुलाचाराप्रमाणे सर्व कृत्ये करून व सर्वांना सर्व प्रकारे सज्ज झालेले पाहिल्यावर,॥ १॥

मूल (चौपाई)

सुमिरि रामु गुर आयसु पाई।
चले महीपति संख बजाई॥
हरषे बिबुध बिलोकि बराता।
बरषहिं सुमन सुमंगल दाता॥

अनुवाद (हिन्दी)

श्रीरामांचे स्मरण करून आणि गुरूंची आज्ञा झाल्यावर पृथ्वीपती राजा दशरथांनी शंख फुंकून प्रस्थान केले. वऱ्हाड पाहून देव आनंदून गेले व मंगलदायी फुलांचा वर्षाव करू लागले.॥ २॥

मूल (चौपाई)

भयउ कोलाहल हय गय गाजे।
ब्योम बरात बाजने बाजे॥
सुर नर नारि सुमंगल गाईं।
सरस राग बाजहिं सहनाईं॥

अनुवाद (हिन्दी)

प्रचंड आवाज दुमदुमून राहिला. घोडे खिंकाळू लागले. हत्ती चीत्कार करू लागले. आकाशात व वरातीत मंगलवाद्ये वाजू लागली. अप्सरा व स्त्रिया मंगल गाणी गाऊ लागल्या आणि सुंदर रागदारीत सनया वाजू लागल्या.॥ ३॥

मूल (चौपाई)

घंट घंटि धुनि बरनि न जाहीं।
सरव करहिं पाइक फहराहीं॥
करहिं बिदूषक कौतुक नाना।
हास कुसल कल गान सुजाना॥

अनुवाद (हिन्दी)

घंटांच्या आवाजाचे तर वर्णन करणेही कठीण होते. पायी चालणारे सेवक किंवा पट्टेबाज कसरती करीत होते आणि आकाशात उंच उडॺा मारीत होते. हशा पिकविण्यात वाकबगार आणि सुंदर गाणी गाण्यात चतुर विदूषक हे तऱ्हेतऱ्हेच्या गमजा करून दाखवीत होते.॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

तुरग नचावहिं कुअँर बर अकनि मृदंग निसान।
नागर नट चितवहिं चकित डगहिं न ताल बँधान॥ ३०२॥

अनुवाद (हिन्दी)

सुंदर राजकुमार मृदंग आणि नगाऱ्यांच्या तालावर घोडॺांना असे नाचवीत होते की, त्यांचा ताल जराही चुकत नव्हता. चतुर नटसुद्धा ते पाहून चकित होत होते.॥ ३०२॥

मूल (चौपाई)

बनइ न बरनत बनी बराता।
होहिं सगुन सुंदर सुभदाता॥
चारा चाषु बाम दिसि लेई।
मनहुँ सकल मंगल कहि देई॥

अनुवाद (हिन्दी)

वऱ्हाडाचे वर्णन करायचे म्हटले तरी कठीण आहे. सुंदर शुभदायक शकुन होत होते. चास पक्षी चारा शोधण्यास डावीकडे जात होते. जणू सर्व मंगलदायक असल्याची सूचना देत होते.॥ १॥

मूल (चौपाई)

दाहिन काग सुखेत सुहावा।
नकुल दरसु सब काहूँ पावा॥
सानुकूल बह त्रिबिध बयारी।
सघट सबाल आव बर नारी॥

अनुवाद (हिन्दी)

उजवीकडे कावळा शेतामध्ये शोभून दिसत होता. सर्वांना मुंगूसही दिसले. शीतल, मंद, सुगंधित वारे मागून पुढे वाहात होते. सुवासिनीस्त्रिया डोक्यावर भरलेले घडे आणि कडेवर मूल घेऊन येत होत्या.॥ २॥

मूल (चौपाई)

लोवा फिरि फिरि दरसु देखावा।
सुरभी सनमुख सिसुहि पिआवा॥
मृगमाला फिरि दाहिनि आई।
मंगल गन जनु दीन्हि देखाई॥

अनुवाद (हिन्दी)

कोल्हे वारंवार तोंड दाखवीत होते. समोर गाई उभ्या राहून वासरांना पाजत होत्या. हरणांचे कळप डावीकडे वळून उजवीकडे येत. अशा रितीने सर्व मांगल्यांचे समूह दिसून आले.॥ ३॥

मूल (चौपाई)

छेमकरी कह छेम बिसेषी।
स्यामा बाम सुतरु पर देखी॥
सनमुख आयउ दधि अरु मीना।
कर पुस्तक दुइ बिप्र प्रबीना॥

अनुवाद (हिन्दी)

पांढऱ्या शिराची घार विशेष क्षेम दर्शवीत होती. कोकिळा डाव्या बाजूच्या सुंदर वृक्षावर दिसून आली. समोरून दही, मासे आणि दोन विद्वान ब्राह्मण हाती ग्रंथ घेऊन आले.॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

मंगलमय कल्यानमय अभिमत फल दातार।
जनु सब साचे होन हित भए सगुन एक बार॥ ३०३॥

अनुवाद (हिन्दी)

सर्व मंगलमय, कल्याणमय आणि मनोवांच्छित फळे देणारे शकुन जणू खरोखरच मंगल होणार, हे सुचवण्यासाठी एकत्र आले होते.॥ ३०३॥

मूल (चौपाई)

मंगल सगुन सुगम सब ताकें।
सगुन ब्रह्म सुंदर सुत जाकें॥
राम सरिस बरु दुलहिनि सीता।
समधी दसरथु जनकु पुनीता॥

अनुवाद (हिन्दी)

प्रत्यक्ष सगुण ब्रह्म ज्याचे पुत्र, त्याला सर्व मंगलकारी शकुन सुलभ असणारच. श्रीरामचंद्रांसारखा वर आणि सीतेसारखी वधू आहे, तसेच दशरथ व जनक यांच्यासारखे पवित्र व्याही आहेत,॥ १॥

मूल (चौपाई)

सुनि अस ब्याहु सगुन सब नाचे।
अब कीन्हे बिरंचि हम साँचे॥
एहि बिधि कीन्ह बरात पयाना।
हय गय गाजहिं हने निसाना॥

अनुवाद (हिन्दी)

असा विवाह आहे, हे ऐकून जणू सर्व शकुन नाचू लागले आणि म्हणू लागले-‘आता ब्रह्मदेवांनी आम्हांला सार्थ करून दाखविले.’ अशाप्रकारे वऱ्हाडाने प्रस्थान केले. घोडे, हत्ती गर्जू लागले आणि नगाऱ्यांवर प्रहार होऊ लागले.॥ २॥

मूल (चौपाई)

आवत जानि भानुकुल केतू।
सरितन्हि जनक बँधाए सेतू॥
बीच बीच बर बास बनाए।
सुरपुर सरिस संपदा छाए॥

अनुवाद (हिन्दी)

सूर्यवंशाची कीर्ति-पताका असलेले दशरथ येत आहेत हे समजल्यावर जनकांनी नद्यांवर पुल बांधले. वाटेमध्ये त्यांना राहाण्याची चांगली सोय केली. तेथे देवलोकीची संपदा भरली होती.॥ ३॥

मूल (चौपाई)

असन सयन बर बसन सुहाए।
पावहिं सब निज निज मन भाए॥
नित नूतन सुख लखि अनुकूले।
सकल बरातिन्ह मंदिर भूले॥

अनुवाद (हिन्दी)

आणि तेथे वऱ्हाडी मंडळींना आपापल्या आवडीचे उत्तम भोजन, बिछाने आणि वस्त्रे मिळत होती. मनाप्रमाणे नित्य नवीन सुखे पाहून सर्व वऱ्हाडी मंडळींना आपापल्या घरांचा विसर पडला.॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

आवत जानि बरात बर सुनि गहगहे निसान।
सजि गज रथ पदचर तुरग लेन चले अगवान॥ ३०४॥

अनुवाद (हिन्दी)

मोठॺा जोरजोराने वाजणाऱ्या नगाऱ्यांचा आवाज ऐकून आणि श्रेष्ठ वऱ्हाडी येत आहेत हे कळल्यावर त्यांचे स्वागत करण्यासाठी हत्ती, रथ, पायदळ आणि घोडे सजवून त्यांना आणण्यासाठी निघाले.॥ ३०४॥