५६ जयमाळा घालणे

दोहा

मूल (दोहा)

बंदी मागध सूतगन बिरुद बदहिं मतिधीर।
करहिं निछावरि लोग सब हय गय धन मनि चीर॥ २६२॥

अनुवाद (हिन्दी)

धीर बुद्धीचे लोक, भाट, मागध आणि सूतजन हे श्रीरामांच्या बिरुदावलीचे वर्णन करू लागले. सर्वजण घोडे, हत्ती, धन, रत्ने आणि वस्त्रे श्रीरामांवरून ओवाळून टाकू लागले.॥ २६२॥

मूल (चौपाई)

झाँझि मृदंग संख सहनाई।
भेरि ढोल दुंदुभी सुहाई॥
बाजहिं बहु बाजने सुहाए।
जहँ तहँ जुबतिन्ह मंगल गाए॥

अनुवाद (हिन्दी)

झांज, मृदंग, शंख, सनई, भेरी, ढोल आणि मोहक नगारे इत्यादी सुंदर वाद्ये मधुर वादन करू लागली. जिकडे-तिकडे तरुणी मंगल गीते गाऊ लागल्या.॥ १॥

मूल (चौपाई)

सखिन्ह सहित हरषी अति रानी।
सूखत धान परा जनु पानी॥
जनक लहेउ सुखु सोचु बिहाई।
पैरत थकें थाह जनु पाई॥

अनुवाद (हिन्दी)

राणी सख्यांसह अत्यंत आनंदित झाली, जणू सुकत चाललेल्या भात पिकावर पाऊस पडल्यामुळे त्याला जीवदान मिळाले. जनक राजांची चिंता जाऊन त्यांना आनंद झाला. जणू पोहून-पोहून थकून गेलेल्या माणसाला आधार मिळाला.॥ २॥

मूल (चौपाई)

श्रीहत भए भूप धनु टूटे।
जैसें दिवस दीप छबि छूटे॥
सीय सुखहि बरनिअ केहि भाँती।
जनु चातकी पाइ जलु स्वाती॥

अनुवाद (हिन्दी)

ज्याप्रमाणे दिवसा दिव्याची शोभा रहात नाही, त्याप्रमाणे धनुष्यभंग झाल्यामुळे जमलेले राजेलोक निस्तेज झाले. सीतेच्या सुखाला पारावार नव्हता. जणू चातक पक्षिणीला स्वातीचे जल पिण्यास लाभले.॥ ३॥

मूल (चौपाई)

रामहि लखनु बिलोकत कैसें।
ससिहि चकोर किसोरकु जैसें॥
सतानंद तब आयसु दीन्हा।
सीताँ गमनु राम पहिं कीन्हा॥

अनुवाद (हिन्दी)

ज्याप्रमाणे चकोराचे पिल्लू चंद्राला चकित होऊन पहात रहाते, त्याप्रमाणे लक्ष्मण श्रीरामांना पहात होता. तेव्हा शतानंदांच्या आज्ञेने सीता श्रीरामांच्याजवळ गेली.॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

संग सखीं सुंदर चतुर गावहिं मंगलचार।
गवनी बाल मराल गति सुषमा अंग अपार॥ २६३॥

अनुवाद (हिन्दी)

तिच्या बरोबर सुंदर व चतुर सख्या मंगल गीते गात निघाल्या आणि सीता बालहंसीच्या चालीने निघाली. तिची सर्वांगे अपार कांतीने उजळली होती.॥ २६३॥

मूल (चौपाई)

सखिन्ह मध्य सिय सोहति कैसें।
छबिगन मध्य महाछबि जैसें॥
कर सरोज जयमाल सुहाई।
बिस्व बिजय सोभा जेहिं छाई॥

अनुवाद (हिन्दी)

सख्यांमध्ये सीता अशी शोभून दिसत होती की, जणू पुष्कळशा लावण्यवतींच्या मध्ये महालावण्यवती असावी. तिच्या करकमलांमध्ये सुंदर जयमाला होती. तिच्यामध्ये विश्वविजयी शोभा सामावली होती.॥ १॥

मूल (चौपाई)

तन सकोचु मन परम उछाहू।
गूढ़ प्रेमु लखि परइ न काहू॥
जाइ समीप राम छबि देखी।
रहि जनु कुअँरि चित्र अवरेखी॥

अनुवाद (हिन्दी)

सीतेचे शरीर लाजेने चूर होते, परंतु मनामध्ये परम उत्साह भरलेला होता. तिचे ते गुप्त प्रेम कुणाला कळून आले नाही. जवळ गेल्यावर श्रीरामांचे लावण्य पाहून राजकुमारी सीता चित्रासारखी तटस्थ झाली.॥ २॥

मूल (चौपाई)

चतुर सखीं लखि कहा बुझाई।
पहिरावहु जयमाल सुहाई॥
सुनत जुगल कर माल उठाई।
प्रेम बिबस पहिराइ न जाई॥

अनुवाद (हिन्दी)

चतुर सखीने तिची ही दशा पाहून समजाविले की, ‘अग, ही सुंदर जयमाला त्यांना घाल ना.’ हे ऐकून सीतेने दोन्ही हातांनी माला उचलली, परंतु प्रेमविवश झाल्यामुळे तिला ती घालता येईना.॥ ३॥

मूल (चौपाई)

सोहत जनु जुग जलज सनाला।
ससिहि सभीत देत जयमाला॥
गावहिं छबि अवलोकि सहेली।
सियँ जयमाल राम उर मेली॥

अनुवाद (हिन्दी)

जणू देठांसह दोन कर-कमळे चंद्राला पहाताना बावरून जयमाला अर्पण करीत आहेत. ते रूप पाहून सख्या गाणी गाऊ लागल्या. तेव्हा सीतेने श्रीरामांच्या गळ्ॺात जयमाला घातली.॥ ४॥

सोरठा

मूल (दोहा)

रघुबर उर जयमाल देखि देव बरिसहिं सुमन।
सकुचे सकल भुआल जनु बिलोकि रबि कुमुदगन॥ २६४॥

अनुवाद (हिन्दी)

श्रीरघुनाथांच्या छातीवर जयमाला रुळताना पाहून देव पुष्प-वर्षा करू लागले. इतर सर्व राजे असे निस्तेज झाले की, जणू सूर्य पहाताच (रात्रविकासी) कुमुदांचा समूह सुकून जातो.॥ २६४॥

मूल (चौपाई)

पुर अरु ब्योम बाजने बाजे।
खल भए मलिन साधु सब राजे॥
सुर किंनर नर नाग मुनीसा।
जय जय जय कहि देहिं असीसा॥

अनुवाद (हिन्दी)

नगरामध्ये आणि आकाशामध्ये वाद्ये वाजू लागली. दुष्ट लोक उदास झाले आणि सर्व सज्जन लोक प्रसन्न झाले. देवता, किन्नर, मनुष्य, नाग आणि मुनीश्वर जयजयकार करीत आशीर्वाद देऊ लागले.॥ १॥

मूल (चौपाई)

नाचहिं गावहिं बिबुध बधूटीं।
बार बार कुसुमांजलि छूटीं॥
जहँ तहँ बिप्र बेदधुनि करहीं।
बंदी बिरिदावलि उच्चरहीं॥

अनुवाद (हिन्दी)

देवांगना नाचू-गाऊ लागल्या. त्यांच्या हातून वारंवार फुले उधळली जात होती. जिकडे-तिकडे ब्राह्मण वेदघोष करीत होते आणि भाट लोक कुलकीर्ती वर्णन करीत होते.॥ २॥

मूल (चौपाई)

महि पाताल नाक जसु ब्यापा।
राम बरी सिय भंजेउ चापा॥
करहिं आरती पुर नर नारी।
देहिं निछावरि बित्त बिसारी॥

अनुवाद (हिन्दी)

पृथ्वी, पाताळ आणि स्वर्ग या तिन्ही लोकांमध्ये कीर्ती पसरली की श्रीरामचंद्रांनी धनुष्य मोडले आणि सीतेला वरले. नगरातील स्त्री-पुरुष आरती ओवाळू लागले आणि आपली ऐपत विसरून ओवाळणी देऊ लागले.॥ ३॥

मूल (चौपाई)

सोहति सीय राम कै जोरी।
छबि सिंगारु मनहुँ एक ठोरी॥
सखीं कहहिं प्रभुपद गहु सीता।
करति न चरन परस अति भीता॥

अनुवाद (हिन्दी)

श्रीसीता-रामांची जोडी अशी शोभून दिसत होती की जणू सुंदरता आणि शृंगाररस यांचे मीलन झाले आहे. सख्या म्हणत होत्या, ‘सीते, स्वामींच्या चरणांचा स्पर्श कर.’ परंतु सीता फार घाबरून गेल्याने त्यांच्या चरणांना स्पर्श करत नव्हती.॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

गौतम तिय गति सुरति करि नहिं परसति पग पानि।
मन बिहसे रघुबंसमनि प्रीति अलौकिक जानि॥ २६५॥

अनुवाद (हिन्दी)

गौतममुनींची पत्नी अहिल्या हिच्या अवस्थेची आठवण झाल्यामुळे सीता श्रीरामांच्या चरणांना स्पर्श करीत नव्हती. सीतेचे अलौकिक प्रेम पाहून रघुकुलरत्न श्रीराम मनातून हसले.॥ २६५॥

मूल (चौपाई)

तब सिय देखि भूप अभिलाषे।
कूर कपूत मूढ़ मन माखे॥
उठि उठि पहिरि सनाह अभागे।
जहँ तहँ गाल बजावन लागे॥

अनुवाद (हिन्दी)

त्यावेळी सीतेला पाहून काही राजांना हाव सुटली. ते दुष्ट, कुपुत्र आणि मूर्ख राजे मनातून फार संतापले. ते हतभागी उठून चिलखते घालून वाटेल ती बडबड करू लागले.॥ १॥

मूल (चौपाई)

लेहु छड़ाइ सीय कह कोऊ।
धरि बाँधहु नृप बालक दोऊ॥
तोरें धनुषु चाड़ नहिं सरई।
जीवत हमहि कुअँरि को बरई॥

अनुवाद (हिन्दी)

कोणी म्हणू लागला की ‘सीतेला हिसकावून घ्या आणि दोन्हीराजकुमारांना पकडून कैद करा. धनुष्य मोडल्याने काही इच्छा पूर्ण होणार नाही. आम्ही जिवंत असताना राजकुमारीशी विवाह कोण करू शकेल?॥ २॥

मूल (चौपाई)

जौं बिदेहु कछु करै सहाई।
जीतहु समर सहित दोउ भाई॥
साधु भूप बोले सुनि बानी।
राजसमाजहि लाज लजानी॥

अनुवाद (हिन्दी)

जर जनक राजाने त्यांना मदत केली, तर युद्धात दोन्ही भावांसह त्यालाही जिंकू. हे बोलणे ऐकून सज्जन राजे म्हणाले, ‘या निर्लज्ज राजांना पाहून लाजेलाही लाज वाटली असावी.॥ ३॥

मूल (चौपाई)

बलु प्रतापु बीरता बड़ाई।
नाक पिनाकहि संग सिधाई॥
सोइ सूरता कि अब कहुँ पाई।
असि बुधि तौ बिधि मुहँ मसि लाई॥

अनुवाद (हिन्दी)

अरे, तुमचे बल, प्रताप, शौर्य, मोठेपण आणि स्वर्ग (प्रतिष्ठा) तर धनुष्याबरोबरच गेली. आता ही वीरता कुठून आली? अशी दुष्ट बुद्धी आहे, म्हणून तर विधात्याने तुमच्या तोंडाला काळे फासले.॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

देखहु रामहि नयन भरि तजि इरिषा मदु कोहु।
लखन रोषु पावकु प्रबल जानि सलभ जनि होहु॥ २६६॥

अनुवाद (हिन्दी)

ईर्ष्या, घमेंड व राग सोडून आणि डोळे उघडून जरा श्रीरामांकडे पहा. लक्ष्मणाचा रागही प्रचंड आग आहे, हे ओळखून त्यात पतंग बनून मरू नका.॥ २६६॥

मूल (चौपाई)

बैनतेय बलि जिमि चह कागू।
जिमि ससु चहै नाग अरि भागू॥
जिमि चह कुसल अकारन कोही।
सब संपदा चहै सिवद्रोही॥

अनुवाद (हिन्दी)

ज्याप्रमाणे गरुडाचा भाग कावळ्ॺाने घेण्याची इच्छा करावी, सिंहाचा भाग मिळविण्याची इच्छा सशाने करावी. विनाकारण क्रोध करणाऱ्याने आपल्या कल्याणाची इच्छा धरावी. शिवांशी विरोध करणाऱ्याने सर्व प्रकारच्या संपत्तीची आस धरावी.॥ १॥

मूल (चौपाई)

लोभी लोलुप कल कीरति चहई।
अकलंकता कि कामी लहई॥
हरि पद बिमुख परम गति चाहा।
तस तुम्हार लालचु नरनाहा॥

अनुवाद (हिन्दी)

लोभी माणसाने कीर्तीची आशा करावी, कामी माणसाने निष्कलंकतेची आशा धरावी, तर ती त्यांना मिळेल काय? आणि ज्याप्रमाणे श्रीहरींच्या चरणांशी विन्मुख झालेल्याने परमगतीची कामना धरावी, त्याप्रमाणे हे राजांनो, सीतेसाठी तुम्हांला सुटलेली हाव व्यर्थ आहे.॥ २॥

मूल (चौपाई)

कोलाहलु सुनि सीय सकानी।
सखीं लवाइ गईं जहँ रानी॥
रामु सुभायँ चले गुरु पाहीं।
सिय सनेहु बरनत मन माहीं॥

अनुवाद (हिन्दी)

हा गोंधळ ऐकून सीता साशंक झाली. तेव्हा सख्या तिला राणी सुनयनेजवळ घेऊन गेल्या. श्रीरामचंद्र मनामध्ये सीतेच्या प्रेमाची वाखाणणी करीत नेहमीच्या चालीने गुरूंच्याजवळ गेले.॥ ३॥

मूल (चौपाई)

रानिन्ह सहित सोचबस सीया।
अब धौं बिधिहि काह करनीया॥
भूप बचन सुनि इत उत तकहीं।
लखनु राम डर बोलि न सकहीं॥

अनुवाद (हिन्दी)

राण्यां आणि सीताही दुष्ट राजांचे दुष्ट बोलणे ऐकून काळजीत पडली की आता विधाता काय करणार आहे, कोण जाणे! राजांची बोलणी ऐकून लक्ष्मणाने इकडे-तिकडे पाहिले, परंतु श्रीरामांच्या दडपणामुळे तो गप्प राहिला.॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

अरुन नयन भृकुटी कुटिल चितवत नृपन्ह सकोप।
मनहुँ मत्त गजगन निरखि सिंघकिसोरहि चोप॥ २६७॥

अनुवाद (हिन्दी)

त्याचे डोळे लालबुंद झाले, भुवया चढल्या आणि तो क्रोधाने त्या दुष्ट राजांच्याकडे पाहू लागला. मतवाले हत्तींचे झुंड पाहून सिंहाच्या छाव्याला चेव येतो तसा.॥ २६७॥

मूल (चौपाई)

खरभरु देखि बिकल पुर नारीं।
सब मिलि देहिं महीपन्ह गारीं॥
तेहिं अवसर सुनि सिवधनु भंगा।
आयउ भृगुकुल कमल पतंगा॥

अनुवाद (हिन्दी)

गडबड-गोंधळ झालेला पाहून जनकपुरातील स्त्रिया व्याकूळ झाल्या आणि सर्वजणी मिळून दुष्ट राजांना शिव्या देऊ लागल्या. त्याचवेळी धनुष्य मोडल्याचे ऐकून भृगुकुलरूपी कमलाचे सूर्य परशुराम तेथे आले.॥ १॥

मूल (चौपाई)

देखि महीप सकल सकुचाने।
बाज झपट जनु लवा लुकाने॥
गौरि सरीर भूति भल भ्राजा।
भाल बिसाल त्रिपुंड बिराजा॥

अनुवाद (हिन्दी)

त्यांना पाहून बाज ससाण्याने झेप घेतल्यावर जसे लावा पक्षी अंग चोरून घेतात, तसे सर्व राजे भेदरून गेले. परशुरामांच्या गोऱ्या शरीरावर भस्माचे त्रिपुंड्र शोभून दिसत होते. आणि विशाल भालावरचा त्रिपुंड्र तर उठून दिसत होता.॥ २॥

मूल (चौपाई)

सीस जटा ससिबदनु सुहावा।
रिसबस कछुक अरुन होइ आवा॥
भृकुटी कुटिल नयन रिस राते।
सहजहुँ चितवत मनहुँ रिसाते॥

अनुवाद (हिन्दी)

शिरावर जटा होत्या. सुंदर मुख क्रोधाने काहीसे लाल झाले होते. भुवया चढल्या होत्या, डोळे रागाने लाल झाले होते. ते सहजपणे पहात होते तरी असे वाटत होते की, जणू क्रोधाने पहात आहेत.॥ ३॥

मूल (चौपाई)

बृषभ कंध उर बाहु बिसाला।
चारु जनेउ माल मृगछाला॥
कटि मुनिबसन तून दुइ बाँधें।
धनु सर कर कुठारु कल काँधें॥

अनुवाद (हिन्दी)

बैलाप्रमाणे उंच व पुष्ट खांदे, छाती व भुजा विशाल होत्या. त्यांनी सुंदर यज्ञोपवीत धारण केलेले होते रुद्राक्ष माळ घातलेली आणि मृगजिन घेतलेले होते. कंबरेला वल्कल आणि दोन भाते बांधलेले होते. हातात धनुष्यबाण आणि खांद्यावर कुऱ्हाड घेतली होती.॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

सांत बेषु करनी कठिन बरनि न जाइ सरूप।
धरि मुनितनु जनु बीर रसु आयउ जहँ सब भूप॥ २६८॥

अनुवाद (हिन्दी)

वेष शांत, परंतु कृती मात्र उग्र. त्या सर्व राजांच्या सभेत वीर-रसच जणू शरीर धारण करून प्रकट झाला होता.॥ २६८॥

मूल (चौपाई)

देखत भृगुपति बेषु कराला।
उठे सकल भय बिकल भुआला॥
पितु समेत कहि कहिनिज नामा।
लगे करन सब दंड प्रनामा॥

अनुवाद (हिन्दी)

परशुरामांचे ते उग्र रूप पाहून सर्व राजे भयाने व्याकूळ होऊन उठून उभे राहिले आणि आपल्या पित्याचे नाव घेत आपली ओळख देऊन दंडवत करू लागले.॥ १॥

मूल (चौपाई)

जेहि सुभायँ चितवहिंहितु जानी।
सो जानइ जनु आइ खुटानी॥
जनक बहोरि आइ सिरु नावा।
सीय बोलाइ प्रनामु करावा॥

अनुवाद (हिन्दी)

त्यांनी आपुलकीने सहजपणे कोणाकडे पहिले तरी त्याला वाटे की आता आपला काळ आला. नंतर जनक राजांनी येऊन मस्तक ठेवले आणि जानकीला बोलावून प्रणाम करायला लावला.॥ २॥

मूल (चौपाई)

आसिष दीन्हि सखीं हरषानीं।
निज समाज लै गईं सयानीं॥
बिस्वामित्रु मिले पुनि आई।
पद सरोज मेले दोउ भाई॥

अनुवाद (हिन्दी)

परशुरामांनी सीतेला आशीर्वाद दिला. सख्यांना आनंद झाला आणि (आता तेथे आणखी थांबणे योग्य न समजून) त्या चतुर सख्या सीतेला घेऊन आपल्या मंडळींमध्ये गेल्या. नंतर विश्वामित्र येऊन भेटले व त्यांनी दोन्ही भावांना परशुरामांच्या चरणी घातले.॥ ३॥

मूल (चौपाई)

रामु लखनु दसरथ के ढोटा।
दीन्हि असीस देखि भल जोटा॥
रामहि चितइ रहे थकि लोचन।
रूप अपार मार मद मोचन॥

अनुवाद (हिन्दी)

विश्वामित्र म्हणाले, ‘हे राम व लक्ष्मण राजा दशरथांचे पुत्र आहेत.’ त्यांची सुंदर जोडी पाहून परशुरामांनी आशीर्वाद दिला. कामदेवाचाही अहंकार उतरविणारे श्रीरामांचे अपार लावण्य पाहून त्यांचे नेत्र थक्क झाले.॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

बहुरि बिलोकि बिदेह सन कहहु काह अति भीर।
पूँछत जानि अजान जिमि ब्यापेउ कोपु सरीर॥ २६९॥

अनुवाद (हिन्दी)

नंतर सर्व पाहून व जाणूनही काहीच माहीत नसल्यासारखे त्यांनी विचारले, ‘सांगा, ही मोठी गर्दी कसली जमली आहे?’ हे विचारताना ते संतापले होते.॥ २६९॥

मूल (चौपाई)

समाचार कहि जनक सुनाए।
जेहि कारन महीप सब आए॥
सुनत बचन फिरि अनत निहारे।
देखे चापखंड महि डारे॥

अनुवाद (हिन्दी)

राजा जनकांनी सर्व राजेलोक कशासाठी आले होते, तो वृत्तांत सांगितला. जनकांचे बोलणे ऐकून परशुरामांनी वळून दुसरीकडे पाहिले, तर धनुष्याचे तुकडे जमिनीवर पडलेले दिसले.॥ १॥

मूल (चौपाई)

अति रिस बोले बचन कठोरा।
कहु जड़ जनक धनुष कै तोरा॥
बेगि देखाउ मूढ़ न त आजू।
उलटउँ महि जहँ लहि तव राजू॥

अनुवाद (हिन्दी)

अत्यंत क्रोधाने व कठोर शब्दात ते म्हणाले, ‘अरे, मूर्ख जनका, धनुष्य कोणी मोडले ते सांग. मला तो तत्काळ दाखव, नाही तर मूर्खा, जितके तुझे राज्य आहे, तितकी पृथ्वी मी उलथून टाकीन.’॥ २॥

मूल (चौपाई)

अति डरु उतरु देत नृपु नाहीं।
कुटिल भूप हरषे मन माहीं॥
सुर मुनि नाग नगर नर नारी।
सोचहिं सकल त्रास उर भारी॥

अनुवाद (हिन्दी)

राजा घाबरला, त्यामुळे उत्तर देऊ शकला नाही. ते पाहून दुष्ट राजे मनातून खूष झाले. देव, नाग, मुनी, आणि नगरातील स्त्री-पुरुष काळजीत पडले. सर्वांच्या मनात भयंकर भीती होती.॥ ३॥

मूल (चौपाई)

मन पछिताति सीय महतारी।
बिधि अब सँवरी बात बिगारी॥
भृगुपति कर सुभाउ सुनि सीता।
अरध निमेष कलप सम बीता॥

अनुवाद (हिन्दी)

सीतेची आई मनात पश्चात्ताप करू लागली की, ‘अरेरे, विधात्याने सगळे जुळून आलेले बिघडवून टाकले.’ सीता परशुरामांचा स्वभाव ऐकून सीतेला अर्धा क्षणही कल्पासारखा वाटू लागला.॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

सभय बिलोके लोग सब जानि जानकी भीरु।
हृदयँ न हरषु बिषादु कछु बोले श्रीरघुबीरु॥ २७०॥

अनुवाद (हिन्दी)

तेव्हा श्रीरामचंद्रांनी सर्व लोकांना भयभीत झालेले पाहून व सीतेला घाबरलेली बघून म्हटले. त्यावेळी त्यांच्या मनात हर्ष नव्हता की विषाद नव्हता.॥ २७०॥