५३ जनक-प्रतिज्ञेची घोषणा

मूल (चौपाई)

तब बंदीजन जनक बोलाए।
बिरिदावली कहत चलि आए॥
कह नृपु जाइ कहहु पन मोरा।
चले भाट हियँ हरषु न थोरा॥

अनुवाद (हिन्दी)

मग राजा जनकांनी भाटांना बोलाविले. ते वंशाची कीर्ती गात-गात आले.राजांनी सांगितले, ‘माझा पण सर्वांना जाऊन सांगा.’ भाट मोठॺा आनंदाने निघाले.॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

बोले बंदी बचन बर सुनहु सकल महिपाल।
पन बिदेह कर कहहिं हम भुजा उठाइ बिसाल॥ २४९॥

अनुवाद (हिन्दी)

भाटांनी म्हटले, ‘हे पृथ्वीचे पालन करणाऱ्या सर्व राजांनो, ऐका. आम्ही बाहू उभारून जनकांचा महान पण सांगतो.॥ २४९॥

मूल (चौपाई)

नृप भुजबलु बिधु सिवधनु राहू।
गरुअ कठोर बिदित सब काहू॥
रावनु बानु महाभट भारे।
देखि सरासन गवँहिं सिधारे॥

अनुवाद (हिन्दी)

राजांच्या भुजांचे बल हे चंद्र आहे आणि शिवांचे धनुष्य राहू आहे. ते अवजड व कठोर आहे, ही गोष्ट सर्वांना ठाऊक आहे. योद्धे रावण व बाणासुरसुद्धा हे धनुष्य पाहून गप्पपणे निघून गेले. त्याला स्पर्श करण्याची सुद्धा हिम्मत त्यांना झाली नाही.॥ १॥

मूल (चौपाई)

सोइ पुरारि कोदंडु कठोरा।
राज समाज आजु जोइ तोरा॥
त्रिभुवन जय समेत बैदेही।
बिनहिं बिचार बरइ हठि तेही॥

अनुवाद (हिन्दी)

हे भगवान शिवांचे अवजड धनुष्य आज या राजसमाजामध्ये जो कोणी मोडेल, त्याला त्रैलोक्याच्या विजयाबरोबरच जानकी कोणताही विचार न करता मनापासून वरील.॥ २॥

मूल (चौपाई)

सुनि पन सकल भूप अभिलाषे।
भटमानी अतिसय मन माखे॥
परिकर बाँधि उठे अकुलाई।
चले इष्टदेवन्ह सिर नाई॥

अनुवाद (हिन्दी)

हा पण ऐकून सर्व राजांना उत्कंठा लागली. ज्यांना आपल्या शौर्याचा अभिमान होता, ते मनातून अधीर झाले. कमर कसून उतावळेपणे उठले व आपल्या इष्टदेवांना नमस्कार करून निघाले.॥ ३॥

मूल (चौपाई)

तमकि ताकितकि सिवधनु धरहीं।
उठइ न कोटि भाँति बलु करहीं॥
जिन्ह के कछु बिचारु मन माहीं।
चाप समीप महीप न जाहीं॥

अनुवाद (हिन्दी)

त्यांनी मोठॺा तावातावाने शिवधनुष्याकडे बघितले आणि लक्षपूर्वक ते पकडले. असंख्य प्रकारे जोर लावला, परंतु ते उचलले गेले नाही. ज्या राजांना काही विवेक होता, ते धनुष्याकडे फिरकले नाहीत.॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

तमकि धरहिं धनु मूढ़ नृप उठइ न चलहिं लजाइ।
मनहुँ पाइ भट बाहुबलु अधिकु अधिकु गरुआइ॥ २५०॥

अनुवाद (हिन्दी)

ज्या मूर्ख राजांनी तावातावाने धनुष्य धरले, परंतु ते जेव्हा उचलले गेले नाही, तेव्हा ते लाजून परत गेले. जणू वीरांच्या भुजांचे बळ लाभल्यामुळे ते धनुष्य जास्तच अवजड होत होते.॥ २५०॥

मूल (चौपाई)

भूप सहस दस एकहि बारा।
लगे उठावन टरइ न टारा॥
डगइ न संभु सरासनु कैसें।
कामी बचन सती मनु जैसें॥

अनुवाद (हिन्दी)

मग एक हजार राजे एकाच वेळी धनुष्य उचलण्याचा प्रयत्न करू लागले. तरीही ते हलले नाही. ज्याप्रमाणे कामी पुरुषांच्या बोलण्यामुळे सतीचे मन विचलित होत नाही, त्याप्रमाणे शिवांचे ते धनुष्य हलत नव्हते.॥ १॥

मूल (चौपाई)

सब नृप भए जोगु उपहासी।
जैसें बिनु बिराग संन्यासी॥
कीरति बिजय बीरता भारी।
चले चाप कर बरबस हारी॥

अनुवाद (हिन्दी)

ज्याप्रमाणे वैराग्याविना संन्यासी हास्यास्पद ठरतो, त्याप्रमाणे सर्व राजे हास्यास्पद झाले. आपली कीर्ती, विजय, अत्यंत शौर्य—हे सर्व त्या धनुष्याकडून जबरदस्तीने हिरावून घेतले गेल्यामुळे ते पराभूत होऊन निघून गेले.॥ २॥

मूल (चौपाई)

श्रीहत भए हारि हियँ राजा।
बैठे निज निज जाइ समाजा॥
नृपन्ह बिलोकि जनकु अकुलाने।
बोले बचन रोष जनु साने॥

अनुवाद (हिन्दी)

राजेलोक मनातून पराजित झाल्याने निष्प्रभ झाले आणि आपापल्या गोटामध्ये जाऊन बसले. सर्व राजे अयशस्वी ठरल्याचे पाहून राजा जनक व्याकूळ झाले आणि क्रोधाने म्हणाले,॥ ३॥

मूल (चौपाई)

दीप दीप के भूपति नाना।
आए सुनि हम जो पनु ठाना॥
देव दनुज धरि मनुज सरीरा।
बिपुल बीर आए रनधीरा॥

अनुवाद (हिन्दी)

‘जो पण मी ठेवला होता, तो ऐकून द्वीपद्वीपांतरातील अनेक राजे आले. देव व दैत्य हे सुद्धा मनुष्याचे शरीर धारण करून आले. आणखीही पुष्कळसे रणधीर वीर आले.॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

कुअँरि मनोहर बिजय बड़ि कीरति अति कमनीय।
पावनिहार बिरंचि जनु रचेउ न धनु दमनीय॥ २५१॥

अनुवाद (हिन्दी)

परंतु धनुष्य मोडून मनोहर कन्या, मोठा विजय आणि उज्ज्वल कीर्ती प्राप्त करणारा जणू ब्रह्मदेवांनी कोणी निर्माणच केला नाही.॥ २५१॥

मूल (चौपाई)

कहहु काहि यहु लाभु न भावा।
काहुँ न संकर चाप चढ़ावा॥
रहउ चढ़ाउब तोरब भाई।
तिलु भरि भूमि न सके छड़ाई॥

अनुवाद (हिन्दी)

हा लाभ कुणाला आवडला नसता? सांगा. परंतु कोणीही शंकरांचे धनुष्य उचलू शकला नाही. उचलणे आणि मोडणे हे तर दूरच राहिले, कुणी ते तिळभरही जमिनीपासून हलवू शकला नाही.॥ १॥

मूल (चौपाई)

अब जनि कोउ माखै भट मानी।
बीर बिहीन मही मैं जानी॥
तजहु आस निज निज गृह जाहू।
लिखा न बिधि बैदेहि बिबाहू॥

अनुवाद (हिन्दी)

आता कुणी वीरतेचा अभिमान बाळगणाऱ्याने नाराज व्हायचे कारण नाही. मला तर कळून चुकले की, पृथ्वीवर वीरच नाहीत. आता आशा सोडून आपापल्या घरी जा. ब्रह्मदेवांनी सीतेचा विवाह तिच्या नशिबी लिहिलेलाच नाही.॥ २॥

मूल (चौपाई)

सुकृतु जाइ जौं पनु परिहरऊँ।
कुअँरि कुआरि रहउ का करऊँ॥
जौं जनतेउँ बिनु भट भुबि भाई।
तौ पनु करि होतेउँ न हँसाई॥

अनुवाद (हिन्दी)

जर मी पण सोडला, तर पुण्य जाईल. तर आता काय करावे? कन्या कुमारीच राहील.जर मला आधी ठाऊक असते की, पृथ्वी वीरांनी रहित आहे, तर हा पण करून मी हास्यास्पद झालो नसतो.’॥ ३॥