५२ सीतेचा यज्ञशाळेत प्रवेश

दोहा

मूल (दोहा)

जानि सुअवसरु सीय तब पठई जनक बोलाइ।
चतुर सखीं सुंदर सकल सादर चलीं लवाइ॥ २४६॥

अनुवाद (हिन्दी)

मग योग्य वेळी राजा जनकांनी सीतेला बोलावणे पाठविले. सर्व चतुर व सुंदर सख्या तिला आदराने घेऊन आल्या.॥ २४६॥

मूल (चौपाई)

सिय सोभा नहिं जाइ बखानी।
जगदंबिका रूप गुन खानी॥
उपमा सकल मोहि लघु लागीं।
प्राकृत नारि अंग अनुरागीं॥

अनुवाद (हिन्दी)

रूप व गुणांची खाण असलेल्या जगज्जननी जानकीच्या सौंदर्याचे वर्णन कोण करू शकेल? तिच्यासाठी मला सर्व उपमा तुच्छ वाटतात. कारण त्या लौकिक स्त्रियांच्या अंगांविषयीच्या आहेत. (त्यांचा सीतेसाठी उपयोग करणे हे जगज्जननीचा अपमान करण्यासारखे आहे.)॥ १॥

मूल (चौपाई)

सिय बरनिअ तेइ उपमा देई।
कुकबि कहाइ अजसु को लेई॥
जौं पटतरिअ तीय सम सीया।
जग असि जुबति कहाँ कमनीया॥

अनुवाद (हिन्दी)

सीतेच्या वर्णनामध्ये त्याच उपमा देऊन कोण कवी कुकवी ठरेल आणि अपकीर्तीचा भागीदार होईल? जर कुणा स्त्रीबरोबर सीतेची तुलना करायची, तर जगात अशी सुंदर स्त्री आहेच कुठे?॥ २॥

मूल (चौपाई)

गिरा मुखर तन अरध भवानी।
रति अति दुखित अतनु पति जानी॥
बिष बारुनी बंधु प्रिय जेही।
कहिअ रमासम किमि बैदेही॥

अनुवाद (हिन्दी)

देवांच्या स्त्रिया आमच्या अपेक्षेपेक्षा अधिक दिव्य व सुंदर आहेत. पण (त्यांच्यातही दोष आहेत.) सरस्वती ही फार बडबडी आहे, पार्वती अर्धांगिनी आहे. अर्धनारीनटेश्वराच्या रूपात तिचे अर्धे अंगच स्त्रीचे आहे, आणि अर्धे पुरुषाचे-शिवांचे आहे. कामदेवाची पत्नी रती ही आपला पती शरीराविना(अनंग) असल्यामुळे दुःखी असते. आणि विष व मद्य समुद्रात उत्पन्न झाल्यामुळे ते जिचे भाऊ आहेत, त्या लक्ष्मीसारखी जानकीला कसे म्हणता येईल?॥ ३॥

मूल (चौपाई)

जौं छबि सुधा पयोनिधि होई।
परम रूपमय कच्छपु सोई॥
सोभा रजु मंदरु सिंगारू।
मथै पानि पंकज निज मारू॥

अनुवाद (हिन्दी)

ज्या लक्ष्मीबद्दल वर सांगितले आहे, ती खाऱ्या समुद्रातून निघाली होती.त्या समुद्राचे मंथन करण्यासाठी भगवंतांनी अत्यंत कठोर पाठीच्या कच्छपाचे रूप घेतले होते. महाविषधारी वासुकी नागाची दोरी बनविली होती. रवीचे काम अत्यंत कठोर अशा मंदराचल पर्वताने केले आणि सर्व देवांनी व दैत्यांनी मंथन केले. ज्या लक्ष्मीला अत्यंत शोभेची खाण आणि अनुपम सुंदरी असे म्हणतात, तिला प्रकट करण्यासाठी ही सर्व असुंदर आणि स्वभावतः कठोर अशीउपकरणे होती. अशा उपकरणांमुळे प्रकट झालेली लक्ष्मी ही जानकीची बरोबरी कशीकरू शकेल? या उलट, लावण्यरूपी अमृत-समुद्र असेल, परम रूपमय कच्छप असेल, सौंदर्याची दोरी असेल, शृंगार रसाचा पर्वत असेल आणि त्या रूप-लावण्याच्या समुद्राचे स्वतः कामदेवाने आपल्या करकमलांनी मंथन केले असेल,॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

एहि बिधि उपजै लच्छि जब सुंदरता सुख मूल।
तदपि सकोच समेत कबि कहहिं सीय समतूल॥ २४७॥

अनुवाद (हिन्दी)

अशा योगायोगाने जरी सौंदर्य व सुखाची खाण असलेली लक्ष्मी उत्पन्न झाली, तरीही कवी मोठॺा संकोचानेच तिला जानकीसारखी म्हणतील.॥ २४७॥
[ज्या सौंदर्याच्या समुद्राचे कामदेव मंथन करील, ते सौंदर्यही प्राकृत, लौकिक सौंदर्यच असणार. कारण कामदेव हा स्वतःसुद्धा त्रिगुणमय प्रकृतीचाच विकार आहे. म्हणून त्या सौंदर्याचे मंथन करून प्रकट झालेली लक्ष्मी सुद्धा वर सांगितलेल्या लक्ष्मीपेक्षा काहीशी अधिक सुंदर व दिव्य असली, तरीही प्राकृतच आहे, म्हणून तिच्याबरोबर जानकीची तुलना करणे हे कवींना संकोचाचेच वाटते. ज्या सौंदर्याने जानकीची दिव्यातिदिव्य परम दिव्य मूर्ती बनली आहे, ते सौंदर्य वर सांगितलेल्या सुंदरतेहून वेगळे अप्राकृत आहे. वस्तुतः लक्ष्मीचे अप्राकृत रूपसुद्धा हेच आहे. ती कामदेवाच्या मंथनामुळे उत्पन्न होऊ शकत नाही. परंतु ते जानकीचे स्वरूपच आहे, म्हणून ते तिच्याहून वेगळे नाही आणि उपमा ही तर भिन्न वस्तूची दिली जाते. याखेरीज जानकी प्रकट झाली, ती स्वतः आपल्या महिम्यामुळे. तिला प्रकट करण्यासाठी इतर कोणत्याही उपकरणाची अपेक्षा नाही. अर्थात शक्ती ही शक्तिमानाशी अभिन्न व अद्वैत असे तत्त्व आहे. म्हणून अनुपमेय आहे, हेच गूढ तात्त्विक तत्त्व भक्तशिरोमणी कवीने या अभूतोपमालंकाराने मोठॺा कौशल्याने व्यक्त केले आहे.]

मूल (चौपाई)

चलीं संग लै सखीं सयानी।
गावत गीत मनोहर बानी॥
सोह नवल तनु सुंदर सारी।
जगत जननि अतुलित छबि भारी॥

अनुवाद (हिन्दी)

चतुर सख्या सीतेला घेऊन मधुर वाणीने गात निघाल्या. सीतेच्या अलौकिक शरीरावर सुंदर साडी शोभून दिसत होती. जगज्जननीचे विलक्षण लावण्य अतुलनीय होते.॥ १॥

मूल (चौपाई)

भूषन सकल सुदेस सुहाए।
अंग अंग रचि सखिन्ह बनाए॥
रंगभूमि जब सिय पगु धारी।
देखि रूप मोहे नर नारी॥

अनुवाद (हिन्दी)

सर्व आभूषणे आपापल्या जागी शोभून दिसत होती. सख्यांनी ती जानकीच्या अवयवांवर काळजीपूर्वक सजवून घातली होती. जेव्हा सीतेने रंगभूमीवर पाय ठेवला, तेव्हा तिचे दिव्य रूप पाहून सर्व स्त्री-पुरुष मोहून गेले.॥ २॥

मूल (चौपाई)

हरषि सुरन्ह दुंदुभीं बजाईं।
बरषि प्रसून अपछरा गाईं॥
पानि सरोज सोह जयमाला।
अवचट चितए सकल भुआला॥

अनुवाद (हिन्दी)

देवांनी आनंदाने दुंदुभी वाजविल्या आणि पुष्पवर्षा करीत अप्सरा नाचू लागल्या. सीतेच्या करकमलांमध्ये जयमाला शोभत होती. तिने सर्व राजांना एकाच दृष्टिक्षेपात पाहून घेतले.॥ ३॥

मूल (चौपाई)

सीय चकित चित रामहि चाहा।
भए मोहबस सब नरनाहा॥
मुनि समीप देखे दोउ भाई।
लगे ललकि लोचन निधि पाई॥

अनुवाद (हिन्दी)

सीता चकित मनाने श्रीरामांना पाहू लागली, तेव्हा सर्व राजे लोक मोहवश झाले. सीतेने मुनींच्याजवळ (बसलेल्या) दोघा भावांना पाहिले आणि तिचे नयन आपला खजिना मिळाल्याचे बघून तेथेच श्रीरामांवर स्थिरावले.॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

गुरजन लाज समाजु बड़ देखि सीय सकुचानि।
लागि बिलोकन सखिन्ह तन रघुबीरहि उर आनि॥ २४८॥

अनुवाद (हिन्दी)

परंतु गुरुजनांच्या लाजेने व फार मोठा जमाव पाहून सीता संकोचली. ती श्रीरामचंद्रांना आपल्या हृदयात आणून सखींच्याकडे पाहू लागली.॥ २४८॥

मूल (चौपाई)

राम रूपु अरु सिय छबि देखें।
नर नारिन्ह परिहरीं निमेषें॥
सोचहिं सकल कहत सकुचाहीं।
बिधि सन बिनय करहिं मन माहीं॥

अनुवाद (हिन्दी)

श्रीरामांचे रूप व सीतेचे लावण्य पाहून स्त्री-पुरुष एकटक तिच्याकडे पाहू लागले. सर्वजण मनात विचार करीत होते, परंतु प्रकटपणे सांगताना त्यांना संकोच वाटत होता. ते मनातल्या मनात विधात्याला विनवत होते-॥ १॥

मूल (चौपाई)

हरु बिधि बेगि जनक जड़ताई।
मति हमारि असि देहि सुहाई॥
बिनु बिचार पनु तजि नरनाहू।
सीय राम कर करै बिबाहू॥

अनुवाद (हिन्दी)

‘हे विधात्या, जनकांचा वेडेपणा ताबडतोब नाहीसा करा आणि विचार न करता आपला पण सोडून देऊन सीतेचा विवाह रामांशी करावा, अशी बुद्धी त्यांना द्या.॥ २॥

मूल (चौपाई)

जगु भल कहिहि भाव सब काहू।
हठ कीन्हें अंतहुँ उर दाहू॥
एहिं लालसाँ मगन सब लोगू।
बरु साँवरो जानकी जोगू॥

अनुवाद (हिन्दी)

जग त्यांना चांगलेच म्हणेल, कारण ही गोष्ट सर्वांनाच पसंत आहे. पणाचा हट्ट धरल्यास शेवटी हृदयाला पश्चात्तापाचे चटके बसतील. जानकीसाठी सावळ्या रंगाचा वरच योग्य आहे, असे सर्वांनाच वाटत होते.॥ ३॥