५१ मासपारायण, आठवा विश्राम

नवाह्नपारायण, दुसरा विश्राम
श्रीराम-लक्ष्मणांचा यज्ञशाळेत प्रवेश

मूल (चौपाई)

सीय स्वयंबरु देखिअ जाई।
ईसु काहि धौं देइ बड़ाई॥
लखन कहा जस भाजनु सोई।
नाथ कृपा तव जापर होई॥

अनुवाद (हिन्दी)

(मुनी म्हणाले,) जाऊन सीतेचे स्वयंवर पाहिले पाहिजे. बघूया, ईश्वर कुणाला सन्मान देणार आहे.’ लक्ष्मण म्हणाला, ‘हे नाथ, ज्यावर तुमची कृपा असेल, तोच सन्मानाला पात्र ठरणार.’॥ १॥

मूल (चौपाई)

हरषे मुनि सब सुनि बर बानी।
दीन्हि असीस सबहिं सुखु मानी॥
पुनि मुनिबृंद समेत कृपाला।
देखन चले धनुषमख साला॥

अनुवाद (हिन्दी)

ही उत्तम वाणी ऐकून सर्व मुनी प्रसन्न झाले. सर्वांनी आनंदाने आशीर्वाद दिला. नंतर मुनि-समुदायासह कृपाळू श्रीरामचंद्र धनुष्ययज्ञ-शाला पाहण्यास गेले.॥ २॥

मूल (चौपाई)

रंगभूमि आए दोउ भाई।
असि सुधि सब पुरबासिन्ह पाई॥
चले सकल गृह काज बिसारी।
बाल जुबान जरठ नर नारी॥

अनुवाद (हिन्दी)

दोघे भाऊ रंगभूमीवर आले आहेत, अशी वार्ता जेव्हा नगरवासीयांना मिळाली, तेव्हा आबालवृद्ध स्त्री-पुरुष, घर आणि काम-धाम विसरून निघाले.॥ ३॥

मूल (चौपाई)

देखी जनक भीर भै भारी।
सुचि सेवक सब लिए हँकारी॥
तुरत सकल लोगन्ह पहिं जाहू।
आसन उचित देहु सब काहू॥

अनुवाद (हिन्दी)

जेव्हा जनकांना दिसले की, मोठी गर्दी झाली आहे, तेव्हा त्यांनी सर्व विश्वासू सेवकांना बोलावून घेतले आणि म्हटले, ‘तुम्ही ताबडतोब सर्व लोकांपाशी जा आणि सर्वांना यथायोग्य आसने द्या.’॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

कहि मृदु बचन बिनीत तिन्ह बैठारे नर नारि।
उत्तम मध्यम नीच लघु निज निज थल अनुहारि॥ २४०॥

अनुवाद (हिन्दी)

त्या सेवकांनी गोड व नम्रपणे बोलून उत्तम, मध्यम, सामान्य अशा सर्व दर्जाच्या स्त्री-पुरुषांना त्या त्या ठिकाणी बसविले.॥ २४०॥

मूल (चौपाई)

राजकुअँर तेहि अवसर आए।
मनहुँ मनोहरता तन छाए॥
गुन सागर नागर बर बीरा।
सुंदर स्यामल गौर सरीरा॥

अनुवाद (हिन्दी)

त्याचवेळी राम-लक्ष्मण हे राजकुमार तेथे आले. प्रत्यक्ष मनोहरताच त्यांच्या शरीरावर पसरली होती. एकाचे शरीर सुंदर, सावळे आणि दुसऱ्याचे गोरे होते. ते गुणांचे सागर, चतुर व उत्तम वीर होते.॥ १॥

मूल (चौपाई)

राज समाज बिराजत रूरे।
उडगन महुँ जनु जुग बिधु पूरे॥
जिन्ह कें रही भावना जैसी।
प्रभु मूरति तिन्ह देखी तैसी॥

अनुवाद (हिन्दी)

ते राजांच्या समाजामध्ये असे शोभून दिसत होते की, जणू तारांगणांच्यामध्ये दोन पूर्ण चंद्र असावेत. ज्यांची जशी भावना होती, त्यांना प्रभूंची मूर्ती तशीच दिसली.॥ २॥

मूल (चौपाई)

देखहिं रूप महा रनधीरा।
मनहुँ बीर रसु धरें सरीरा॥
डरे कुटिल नृप प्रभुहि निहारी।
मनहुँ भयानक मूरति भारी॥

अनुवाद (हिन्दी)

महान रणधीर अशा राजे लोकांना श्रीरामचंद्रांचे रूप असे दिसत होते की, जणू प्रत्यक्ष वीररस शरीर धारण करून आला असावा. ते फार भयंकर असावेत, असे वाटून दुष्ट राजे प्रभूंना पाहून घाबरले.॥ ३॥

मूल (चौपाई)

रहे असुर छल छोनिप बेषा।
तिन्ह प्रभु प्रगट काल सम देखा॥
पुरबासिन्ह देखे दोउ भाई।
नरभूषन लोचन सुखदाई॥

अनुवाद (हिन्दी)

जे राक्षस कपटाने तेथे राजांच्या वेषांत बसले होते, त्यांना प्रभू प्रत्यक्षकाळा-प्रमाणे दिसले. नगरवासीयांना ते दोघे बंधू नररत्ने व नयनाल्हादक वाटले.॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

नारि बिलोकहिं हरषि हियँ निज निज रुचि अनुरूप।
जनु सोहत सिंगार धरि मूरति परम अनूप॥ २४१॥

अनुवाद (हिन्दी)

स्त्रिया मनात आनंदून आपापल्या आवडीप्रमाणे त्यांना पहात होत्या. जणू शृंगार रसच परम अनुपम मूर्ती धारण करून शोभून दिसत होता.॥ २४१॥

मूल (चौपाई)

बिदुषन्ह प्रभु बिराटमय दीसा।
बहु मुख कर पग लोचन सीसा॥
जनक जाति अवलोकहिं कैसें।
सजन सगे प्रिय लागहिं जैसें॥

अनुवाद (हिन्दी)

विद्वानांना ते पुष्कळ मुखे, हात, पाय, नेत्र व शिरे असलेल्या विराट रूपात दिसले. जनकांच्या कुटुंबीयांना प्रभू जणू सख्खे स्वजन व प्रिय वाटत होते.॥ १॥

मूल (चौपाई)

सहित बिदेह बिलोकहिं रानी।
सिसु सम प्रीति न जाति बखानी॥
जोगिन्ह परम तत्त्वमय भासा।
सांत सुद्ध सम सहज प्रकासा॥

अनुवाद (हिन्दी)

जनकांसह सर्व राण्यांना ते आपल्या मुलासारखे वाटत होते. त्यांच्या प्रेमाचे वर्णन करणे कठीण आहे. योग्यांना ते शांत, शुद्ध, सम आणि स्वयंप्रकाशी परम-तत्त्वाच्या रूपात दिसले.॥ २॥

मूल (चौपाई)

हरिभगतन्ह देखे दोउ भ्राता।
इष्टदेव इव सब सुख दाता॥
रामहि चितव भायँ जेहि सीया।
सो सनेहु सुखु नहिं कथनीया॥

अनुवाद (हिन्दी)

जे हरिभक्त होते, त्यांना दोघे बंधू सर्व सुखे देणाऱ्या इष्टदेवासारखे दिसले. सीता ज्या भावनेने श्रीरामचंद्रांना पहात होती, ते प्रेम व सुख तर सांगताच येणार नाही.॥ ३॥

मूल (चौपाई)

उर अनुभवति न कहि सक सोऊ।
कवन प्रकार कहै कबि कोऊ॥
एहि बिधि रहा जाहि जस भाऊ।
तेहिं तस देखेउ कोसलराऊ॥

अनुवाद (हिन्दी)

त्या प्रेम आणि सुखाचा ती मनातल्या मनात अनुभव घेत होती. परंतु ते ती सांगू शकत नव्हती. मग कुणी कवी ते कसे सांगू शकेल? अशा प्रकारे ज्याचा जसा भाव होता, तसेच त्याला कोसलाधीश श्रीराम दिसले.॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

राजत राज समाज महुँ कोसलराज किसोर।
सुंदर स्यामल गौर तन बिस्व बिलोचन चोर॥ २४२॥

अनुवाद (हिन्दी)

सुंदर सावळ्या व गोऱ्या रंगाचे आणि संपूर्ण विश्वाचे नेत्र आकर्षून घेणारे कोसलाधीश कुमार अशा प्रकारे शोभून दिसत होते.॥ २४२॥

मूल (चौपाई)

सहज मनोहर मूरति दोऊ।
कोटि काम उपमा लघु सोऊ॥
सरद चंद निंदक मुख नीके।
नीरज नयन भावते जी के॥

अनुवाद (हिन्दी)

दोन्ही मूर्ती स्वभावतः मन हरण करून घेत होत्या. कोटॺवधी कामदेवांची उपमाही त्यांच्यासाठी थिटी आहे. त्यांचे सुंदर मुख शरद पौर्णिमेच्या चंद्राला हिणवणारे होते. आणि कमलांसारखे नेत्र मनाला भुरळ पाडणारे होते.॥ १॥

मूल (चौपाई)

चितवनि चारु मार मनु हरनी।
भावति हृदय जाति नहिं बरनी॥
कल कपोल श्रुति कुंडल लोला।
चिबुक अधर सुंदर मृदु बोला॥

अनुवाद (हिन्दी)

त्यांची सुंदर नजर कामदेवाच्या मनालाही मोहविणारी होती. ती मनाला मोहित करीत होती, पण अवर्णनीय होती. सुंदर गाल, कानांमध्ये डोलणारी कुंडले. हनुवटी व अधर सुंदर होते आणि वाणी कोमल होती.॥ २॥

मूल (चौपाई)

कुमुदबंधु कर निंदक हाँसा।
भृकुटी बिकट मनोहर नासा॥
भाल बिसाल तिलक झलकाहीं।
कच बिलोकि अलि अवलि लजाहीं॥

अनुवाद (हिन्दी)

त्यांचे हास्य चंद्रकिरणांना तुच्छ ठरविणारे होते. कमानदार भुवया आणि नासिका मनोहर होती. विशाल भाल प्रदेशावर तिलक झळकत होता. काळ्या-कुरळ्या केसांना पाहून भ्रमरांचे थवेसुद्धा लाजत होते.॥ ३॥

मूल (चौपाई)

पीत चौतनीं सिरन्हि सुहाईं।
कुसुम कलीं बिच बीच बनाईं॥
रेखें रुचिर कंबु कल गीवाँ।
जनु त्रिभुवन सुषमा की सीवाँ॥

अनुवाद (हिन्दी)

पिवळ्या चौकोनी टोप्या शिरांवर शोभत होत्या. टोप्यांवर मधून-मधून फुलांच्या कळ्या रंगविलेल्या होत्या. शंखासारख्या सुंदर गळ्ॺावर तीन मनोहर रेषा दिसत होत्या. ज्या जणू तिन्ही लोकांच्या सौंदर्याची मर्यादा दाखवीत होत्या.॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

कुंजर मनि कंठा कलित उरन्हि तुलसिका माल।
बृषभ कंध केहरि ठवनि बल निधि बाहु बिसाल॥ २४३॥

अनुवाद (हिन्दी)

वक्षःस्थलावर गजमुक्तांचे कंठे आणि तुळशीच्या माळा शोभत होत्या. त्यांचे खांदे बैलांसारखे उंच व पुष्ट होते. त्यांची उभे राहाण्याची ऐट सिंहासारखी होती आणि बाहू विशाल व शक्तीचे भांडार होते.॥ २४३॥

मूल (चौपाई)

कटि तूनीर पीत पट बाँधें।
कर सर धनुष बाम बर काँधें॥
पीत जग्य उपबीत सुहाए।
नख सिख मंजु महाछबि छाए॥

अनुवाद (हिन्दी)

कमरेला पीतांबर कसलेला असून त्यावर भाते बांधलेले होते. उजव्या हातात बाण व डाव्या सुंदर खांद्यावर धनुष्य व पिवळे यज्ञोपवीत शोभत होते.नखशिखांत सर्व अवयव सुंदर असून त्यांच्यावर मोठी कांती झळकत होती.॥ १॥

मूल (चौपाई)

देखि लोग सब भए सुखारे।
एकटक लोचन चलत न तारे॥
हरषे जनकु देखि दोउ भाई।
मुनि पद कमल गहे तब जाई॥

अनुवाद (हिन्दी)

त्या दोघांना पाहून सर्वजण सुखावले. सर्वांचे डोळे एकटक त्यांना पाहू लागले. डोळ्यांच्या बाहुल्यासुद्धा स्थिरावून गेल्या. राजा जनक त्या दोघा भावांना पाहून आनंदित झाले. मग त्यांनी मुनींजवळ जाऊन त्यांची चरणकमले धरली.॥ २॥

मूल (चौपाई)

करि बिनती निज कथा सुनाई।
रंग अवनि सब मुनिहि देखाई॥
जहँ जहँ जाहिं कुअँर बर दोऊ।
तहँ तहँ चकित चितव सबु कोऊ॥

अनुवाद (हिन्दी)

त्यांनी धनुष्याच्या पणाविषयीची आपली कथा नम्रपणे सांगितली आणि मुनींना संपूर्ण रंगभूमी दाखविली. मुनींच्याबरोबर दोघे राजकुमार जेथे जेथे जात होते, तेथे तेथे सर्वजण त्यांना आश्चर्यचकित होऊन पहात होते.॥ ३॥

मूल (चौपाई)

निज निज रुख रामहि सबु देखा।
कोउ न जान कछु मरमु बिसेषा॥
भलि रचना मुनि नृप सन कहेऊ।
राजाँ मुदित महासुख लहेऊ॥

अनुवाद (हिन्दी)

सर्वांना वाटे की, श्रीराम आपल्याकडेच पहात आहेत, परंतु त्यामागील रहस्य कोणी जाणू शकले नाही. मुनींनी राजाला सांगितले की, ‘रंगभूमीची निर्मिती फार छान आहे.’ ते ऐकून राजा जनक प्रसन्न झाले आणि त्यांना फार समाधान वाटले.॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

सब मंचन्ह तें मंचु एक सुंदर बिसद बिसाल।
मुनि समेत दोउ बंधु तहँ बैठारे महिपाल॥ २४४॥

अनुवाद (हिन्दी)

सर्व मंचांमध्ये एक मंच अधिक सुंदर, देदीप्यमान व विशाल होता. स्वतः राजांनी मुनींसह दोघा भावांना तेथे बसविले.॥ २४४॥

मूल (चौपाई)

प्रभुहि देखि सब नृप हियँ हारे।
जनु राकेस उदय भएँ तारे॥
असि प्रतीति सब के मन माहीं।
राम चाप तोरब सक नाहीं॥

अनुवाद (हिन्दी)

ज्याप्रमाणे पूर्ण चंद्र उगवताच तारे प्रकाशहीन होतात, त्याप्रमाणे प्रभूंना पाहून जमलेले सर्व राजे मनातून निराश झाले. सर्वांची खात्री पटली की, श्रीरामचंद्रच हे शिवधनुष्य मोडणार, यात शंका नाही.॥ १॥

मूल (चौपाई)

बिनु भंजेहुँ भव धनुषु बिसाला।
मेलिहि सीय राम उर माला॥
अस बिचारि गवनहु घर भाई।
जसु प्रतापु बलु तेजु गवाँई॥

अनुवाद (हिन्दी)

शिवांचे विशाल धनुष्य मोडले नाही, तरी सीता श्रीरामचंद्रांच्याच गळ्ॺात वरमाला घालील. असा विचार करून काही राजे म्हणू लागले की, ‘अरे बाबांनो, असा विचार करा आणि आपली कीर्ती, प्रताप, बल व तेज यांवर पाणी सोडून आपापल्या घरी चला.॥ २॥

मूल (चौपाई)

बिहसे अपर भूप सुनि बानी।
जे अबिबेक अंध अभिमानी॥
तोरेहुँ धनुषु ब्याहु अवगाहा।
बिनु तोरें को कुअँरि बिआहा॥

अनुवाद (हिन्दी)

दुसरे राजे जे अविवेकामुळे अंध झालेले होते आणि घमेंडखोर होते, त्यांनी हे ऐकल्यावर ते खदखदा हसले. ते म्हणाले, ‘धनुष्य मोडले, तरीही विवाह होणे कठीण आहे. आम्ही सहजपणे सीता हातची जाऊ देणार नाही. मग धनुष्य मोडल्याविना राजकुमारीशी लग्न कोण करू शकेल?॥ ३॥

मूल (चौपाई)

एक बार कालउ किन होऊ।
सिय हित समर जितब हम सोऊ॥
यह सुनि अवर महिप मुसुकाने।
धरमसील हरिभगत सयाने॥

अनुवाद (हिन्दी)

प्रत्यक्ष काल जरी असला, तरी सीतेसाठी आम्ही त्यालाही युद्धात जिंकू.’ ही घमेंडीची भाषा ऐकून धर्मात्मे, हरिभक्त आणि शहाणे असे जे दुसरे राजे होते, ते हसले.॥ ४॥

सोरठा

मूल (दोहा)

सीय बिआहबि राम गरब दूरि करि नृपन्ह के।
जीति को सक संग्राम दसरथ के रन बाँकुरे॥ २४५॥

अनुवाद (हिन्दी)

ते म्हणाले, ‘राजांचा गर्व हरण करून श्रीरामचंद्रच सीतेशी विवाह करतील. युद्धाच्या बाबतीत म्हणाल तर, महाराज दशरथांच्या रणवीर पुत्रांना युद्धात कोण जिंकू शकेल?॥ २४५॥

मूल (चौपाई)

ब्यर्थ मरहु जनि गाल बजाई।
मन मोदकन्हि कि भूख बुताई॥
सिख हमारि सुनि परम पुनीता।
जगदंबा जानहु जियँ सीता॥

अनुवाद (हिन्दी)

फुकट बडबड करून मरू नका. मनातल्या मांडॺांनी भूक भागते काय? आमचा निष्कपट सल्ला ऐकून सीतेला आपल्या मनात प्रत्यक्ष जगज्जननी समजा.॥ १॥

मूल (चौपाई)

जगत पिता रघुपतिहि बिचारी।
भरि लोचन छबि लेहु निहारी॥
सुंदर सुखद सकल गुन रासी।
ए दोउ बंधु संभु उर बासी॥

अनुवाद (हिन्दी)

आणि श्रीरघुनाथांना जगत् पिता परमेश्वर मानून डोळे भरून त्यांचे लावण्य पाहून घ्या. अशी संधी वारंवार येत नसते. सुंदर, सुखदायक आणि समस्त गुणांची राशी असलेले हे दोन्ही भाऊ भगवान शिवांच्या हृदयात निवास करणारे आहेत.॥ २॥

मूल (चौपाई)

सुधा समुद्र समीप बिहाई।
मृगजलु निरखि मरहु कत धाई॥
करहु जाइ जा कहुँ जोइ भावा।
हम तौ आजु जनम फलु पावा॥

अनुवाद (हिन्दी)

जवळ आलेल्या भगवद्दर्शनरूप अमृताचा समुद्र सोडून तुम्ही जगज्जननी जानकीला पत्नी म्हणून मिळविण्याचे मृगजल पाहून धावून का मरता? असो. बाबांनो, ज्याला जे योग्य वाटेल तेच करा. आम्ही तर श्रीरामांचे दर्शन घेऊन आज जन्माचे सार्थक करून घेतले आहे.’॥ ३॥

मूल (चौपाई)

अस कहि भले भूप अनुरागे।
रूप अनूप बिलोकन लागे॥
देखहिं सुर नभ चढ़े बिमाना।
बरषहिं सुमन करहिं कल गाना॥

अनुवाद (हिन्दी)

असे म्हणत सज्जन राजे प्रेममग्न होऊन श्रीरामांचे अनुपम रूप पाहू लागले. देवगणसुद्धा आकाशातून विमानात बसून दर्शन घेत होते आणि सुंदर गायन करीत फुले उधळत होते.॥ ४॥