४९ श्रीसीता व राम यांचे परस्पर दर्शन

दोहा

मूल (दोहा)

उठे लखनु निसि बिगत सुनि अरुनसिखा धुनि कान।
गुर तें पहिलेहिं जगतपति जागे रामु सुजान॥ २२६॥

अनुवाद (हिन्दी)

पहाटे कोंबडॺाचे आरवणे ऐकून लक्ष्मण उठले. जगताचे स्वामी श्रीरामचंद्रही गुरूंच्या पूर्वी उठले.॥ २२६॥

मूल (चौपाई)

सकल सौच करि जाइ नहाए।
नित्य निबाहि मुनिहि सिर नाए॥
समय जानि गुर आयसु पाई।
लेन प्रसून चले दोउ भाई॥

अनुवाद (हिन्दी)

प्रातर्विधी झाल्यावर त्यांनी जाऊन स्नान केले. नंतर (संध्या-अग्निहोत्रादी) नित्यकर्म आटोपल्यावर त्यांनी मुनींच्या चरणी मस्तक ठेवले. पूजेची वेळ झाल्याचे पाहून गुरूंच्या आज्ञेने दोघे बंधू फुले आणण्यासाठी निघाले.॥ १॥

मूल (चौपाई)

भूप बागु बर देखेउ जाई।
जहँ बसंत रितु रही लोभाई॥
लागे बिटप मनोहर नाना।
बरन बरन बर बेलि बिताना॥

अनुवाद (हिन्दी)

त्यांनी जाऊन राजा जनकांची बाग पाहिली. तेथे वसंत-ऋतू लुब्ध होऊन राहिला होता. मनाला मोहित करणारे अनेक वृक्ष तेथे होते. रंगी-बेरंगी सुंदर वेलींचे मंडप पसरलेले होते.॥ २॥

मूल (चौपाई)

नव पल्लव फल सुमन सुहाए।
निज संपति सुर रूख लजाए॥
चातक कोकिल कीर चकोरा।
कूजत बिहग नटत कल मोरा॥

अनुवाद (हिन्दी)

नवपल्लव, फळे आणि फुले यांनी भरलेले सुंदर वृक्ष आपल्या या ऐश्वर्यामुळे कल्पवृक्षालाही लाजवत होते. चातक, कोकिळा, पोपट,चकोर इत्यादी पक्षी मधुर कूजन करीत होते आणि मोर सुंदर नृत्य करीत होते.॥ ३॥

मूल (चौपाई)

मध्य बाग सरु सोह सुहावा।
मनि सोपान बिचित्र बनावा॥
बिमल सलिलु सरसिज बहुरंगा।
जलखग कूजत गुंजत भृंगा॥

अनुवाद (हिन्दी)

बागेच्या मधोमध सुंदर सरोवर शोभत होते. त्याला रत्नजडित पायऱ्या विलक्षण पद्धतीने बनविलेल्या होत्या. त्याचे जल निर्मल होते, त्यामध्ये अनेक रंगांची कमळे फुललेली होती. जलपक्षी कलरव करीत होते आणि भ्रमर गुंजारव करीत होते.॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

बागु तड़ागु बिलोकि प्रभु हरषे बंधु समेत।
परम रम्य आरामु यहु जो रामहि सुख देत॥ २२७॥

अनुवाद (हिन्दी)

बाग व सरोवर पाहून प्रभू श्रीराम व लक्ष्मण दोघे आनंदित झाले. ती बाग खरोखरच अत्यंत रमणीय होती. कारण (जगाला सुख देणाऱ्या) श्रीरामचंद्रांनाही तिने सुख दिले.॥ २२७॥

मूल (चौपाई)

चहुँ दिसि चितइ पूँछि मालीगन।
लगे लेन दल फूल मुदित मन॥
तेहि अवसर सीता तहँ आई।
गिरिजा पूजन जननि पठाई॥

अनुवाद (हिन्दी)

चोहीकडे नजर टाकून व माळॺांना विचारून ते प्रसन्न चित्ताने पाने-फुले तोडू लागले. त्याचवेळी मातेने गिरिजेची पूजा करण्यासाठी सीतेला पाठविले होते. ती तेथे आली.॥ १॥

मूल (चौपाई)

संग सखीं सब सुभग सयानीं।
गावहिं गीत मनोहर बानीं॥
सर समीप गिरिजा गृह सोहा।
बरनि न जाइ देखि मनु मोहा॥

अनुवाद (हिन्दी)

तिच्या सोबत सुंदर व चतुर सख्या होत्या. त्या मधुर वाणीने गीत गात होत्या. सरोवराजवळ गिरिजेचे मंदिर शोभून दिसत होते. त्याच्या सौंदर्याचे वर्णन करणेच कठीण. ते पाहून मन मोहून जात होते.॥ २॥

मूल (चौपाई)

मज्जनु करि सर सखिन्ह समेता।
गई मुदित मन गौरि निकेता॥
पूजा कीन्हि अधिक अनुरागा।
निज अनुरूप सुभग बरु मागा॥

अनुवाद (हिन्दी)

सख्यांसह सरोवरात स्नान करून सीता प्रसन्नतेने गिरिजा-मंदिरात गेली. तिने मोठॺा प्रेमाने पूजा केली आणि आपल्याला योग्य असा सुंदर वर मिळावा, म्हणून प्रार्थना केली.॥ ३॥

मूल (चौपाई)

एक सखी सिय संगु बिहाई।
गई रही देखन फुलवाई॥
तेहिं दोउ बंधु बिलोके जाई।
प्रेम बिबस सीता पहिं आई॥

अनुवाद (हिन्दी)

एक सखी सीतेला तेथे सोडून बाग पाहायला गेली. तिने त्या दोघा भावांना पाहिले व प्रेम-विव्हळ होऊन ती सीते जवळ आली.॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

तासु दसा देखी सखिन्ह पुलक गात जलु नैन।
कहु कारनु निज हरष कर पूछहिं सब मृदु बैन॥ २२८॥

अनुवाद (हिन्दी)

सख्यांनी तिची दशा पाहिली. तिचे शरीर पुलकित झाले होते आणि नेत्र सजल झालेले होते. सर्वजणी कोमल स्वरांनी विचारू लागल्या की, ‘तुझ्या आनंदाचे कारण काय बरे!’॥ २२८॥

मूल (चौपाई)

देखन बागु कुअँर दुइ आए।
बय किसोर सब भाँति सुहाए॥
स्याम गौर किमि कहौं बखानी।
गिरा अनयन नयन बिनु बानी॥

अनुवाद (हिन्दी)

(ती म्हणाली,) ‘दोन राजकुमार बाग पाहण्यास आले आहेत. ते किशोरवयाचे असून फार सुंदर आहेत. ते सावळॺा व गोऱ्या रंगाचे आहेत. मी त्यांचे सौंदर्य कसे वर्णन करू? (कारण) वाणीला नेत्र नाहीत आणि नेत्रांना वाणी नाही.’॥ १॥

मूल (चौपाई)

सुनि हरषीं सब सखीं सयानी।
सिय हियँ अति उतकंठा जानी॥
एक कहइ नृपसुत तेइ आली।
सुने जे मुनि सँग आए काली॥

अनुवाद (हिन्दी)

हे ऐकून आणि सीतेच्या मनातही उत्कंठा दाटलेली पाहून त्या सर्व चतुर सख्याही आनंदून गेल्या. तेव्हा एक सखी म्हणाली, ‘हे सखी, काल विश्वामित्र मुनींच्याबरोबर आले आहेत, असे ऐकले होते, तेच हे राजकुमार असावेत.॥ २॥

मूल (चौपाई)

जिन्ह निज रूप मोहनी डारी।
कीन्हे स्वबस नगर नर नारी॥
बरनत छबि जहँ तहँ सब लोगू।
अवसि देखिअहिं देखन जोगू॥

अनुवाद (हिन्दी)

त्यांनी आपल्या रूपाच्या मोहिनीने नगरातील स्त्री-पुरुषांना वश केले आहे. जिकडे-तिकडे सर्व लोक त्यांच्याच सौंदर्याचे वर्णन करीत आहेत. ते पाहण्या जोगे आहेत. त्यांना जरूर पाहिले पाहिजे.’॥ ३॥

मूल (चौपाई)

तासु बचन अति सियहि सोहाने।
दरस लागि लोचन अकुलाने॥
चली अग्र करि प्रिय सखि सोई।
प्रीति पुरातन लखइ न कोई॥

अनुवाद (हिन्दी)

सखीचे हे बोल सीतेला फार आवडले आणि त्यांच्या दर्शनासाठी तिचे नेत्र आसुसले. त्या प्रिय सखीला पुढे करून सीता निघाली. शाश्वत प्रेम कोणी पाहू शकत नाही.॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

सुमिरि सीय नारद बचन उपजी प्रीति पुनीत।
चकित बिलोकति सकल दिसि जनु सिसु मृगी सभीत॥ २२९॥

अनुवाद (हिन्दी)

नारदांचे वचन आठवून सीतेच्या मनात पवित्र प्रेम उपजले. ती चकित होऊन सगळीकडे पाहू लागली. जणू बावरलेली हरिणी इकडे-तिकडे पहात असावी.॥ २२९॥

मूल (चौपाई)

कंकन किंकिनि नूपुर धुनि सुनि।
कहत लखन सन रामु हृदयँ गुनि॥
मानहुँ मदन दुंदुभी दीन्ही।
मनसा बिस्व बिजय कहँ कीन्ही॥

अनुवाद (हिन्दी)

कंकणे, मेखलांच्या घागऱ्या आणि नूपुरे यांचा ध्वनी कानी येताच श्रीरामचंद्रांच्या मनात विचार येऊन, त्यांनी लक्ष्मणाला म्हटले, (हा ध्वनी असा येत आहे की,) ‘जणू कामदेवाने विश्व जिंकण्याचा संकल्प करून दुंदुभी वाजविल्या आहेत.’॥ १॥

मूल (चौपाई)

अस कहि फिरि चितए तेहि ओरा।
सिय मुख ससि भए नयन चकोरा॥
भए बिलोचन चारु अचंचल।
मनहुँ सकुचि निमि तजे दिगंचल॥

अनुवाद (हिन्दी)

असे म्हणून श्रीरामांनी वळून तिकडे पाहिले. सीतेचा मुख-चंद्र पाहण्यासाठी त्यांचे नेत्र चकोर बनले. त्यांचे सुंदर नेत्र स्थिरावले. (एकटक पाहू लागले.) जणू (जनकांचे पूर्वज) निमी राजाने संकोचाने (निमी हे सर्वांच्या पापण्यावर निवास करतात, असे मानले जाते. त्यांनी आपली कन्या व जावई यांचा मिलन-प्रसंग पाहणे उचित वाटले नाही, म्हणून) पापण्यांचा त्याग केला असावा. (त्यांनी पापण्यांवर राहणे सोडल्यामुळे पापण्या मिटणे थांबले.)॥ २॥

मूल (चौपाई)

देखि सीय सोभा सुखु पावा।
हृदयँ सराहत बचनु न आवा॥
जनु बिरंचि सब निज निपुनाई।
बिरचि बिस्व कहँ प्रगटि देखाई॥

अनुवाद (हिन्दी)

सीतेचे सौंदर्य पाहून श्रीराम फार आनंदित झाले. मनात त्यांनी तिच्या सौंदर्याची प्रशंसा केली. परंतु मुखातून शब्द फुटला नाही. (ते सौंदर्य असे अनुपम होते की,) जणू ब्रह्मदेवांनी आपले संपूर्ण कौशल्य साकार करून (सीतेच्या रूपाने) जगाला प्रकट करून दाखविले होते.॥ ३॥

मूल (चौपाई)

सुंदरता कहुँ सुंदर करई।
छबिगृहँ दीपसिखा जनु बरई॥
सब उपमा कबि रहे जुठारी।
केहिं पटतरौं बिदेहकुमारी॥

अनुवाद (हिन्दी)

सीतेचे सौंदर्य सौंदर्यालाही सुंदर बनविणारे होते. (असे वाटत होते की) जणू सौंदर्याच्या घरामध्ये दीप उजळला आहे. (आजवर सौंदर्य-भवनामध्ये अंधार होता, ते भवन जणू सीतेच्या सौंदर्यरूपी दीपशिखेमुळे उजळून निघाले, पूर्वीपेक्षा फार सुंदर झाले.) कवींनी सर्व उपमा उष्टॺा करून टाकल्या आहेत. तेव्हा मी जनकनंदिनी सीतेला कशाची उपमा देऊ?॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

सिय सोभा हियँ बरनि प्रभु आपनि दसा बिचारि।
बोले सुचि मन अनुज सन बचन समय अनुहारि॥ २३०॥

अनुवाद (हिन्दी)

(अशा प्रकारे) मनात सीतेच्या सौंदर्याची वाखाणणी करीत व आपली झालेली मोहित दशा पाहून प्रभू श्रीरामांनी पवित्र मनाने लक्ष्मणाला समयानुकूल म्हटले,॥ २३०॥

मूल (चौपाई)

तात जनकतनया यह सोई।
धनुषजग्य जेहि कारन होई॥
पूजन गौरि सखीं लै आईं।
करत प्रकासु फिरइ फुलवाईं॥

अनुवाद (हिन्दी)

‘हे बंधू जिच्यासाठी धनुष्ययज्ञ होत आहे, तीच ही जनककन्या आहे. सख्या हिला गौरी-पूजनासाठी घेऊन आल्या आहेत. ही या फुलबागेला उजळून टाकीत वावरत आहे.॥ १॥

मूल (चौपाई)

जासु बिलोकि अलौकिक सोभा।
सहज पुनीत मोर मनु छोभा॥
सो सबु कारन जान बिधाता।
फरकहिं सुभद अंग सुनु भ्राता॥

अनुवाद (हिन्दी)

तिचे अलौकिक सौंदर्य पाहून स्वभावतः पवित्र माझे मन विचलित झाले आहे. त्याचे कारण त्या विधात्यालाच ठाऊक. परंतु हे बंधू, माझी मंगलदायक उजवी अंगे स्फुरण पावू लागली आहेत.॥ २॥

मूल (चौपाई)

रघुबंसिन्ह कर सहज सुभाऊ।
मनु कुपंथ पगु धरइ न काऊ॥
मोहि अतिसय प्रतीति मन केरी।
जेहिं सपनेहुँ परनारि न हेरी॥

अनुवाद (हिन्दी)

रघुवंशी लोकांचा हा सहज स्वभाव आहे की, त्यांचे मन कधी कुमार्गावर पाऊल टाकीत नाही. मला माझ्या मनाची खात्री आहे की, त्याने (जागृतीतच काय) स्वप्नातही पर-स्त्रीवर दृष्टी टाकलेली नाही.॥ ३॥

मूल (चौपाई)

जिन्ह कै लहहिं न रिपु रन पीठी।
नहिं पावहिं परतिय मनु डीठी॥
मंगन लहहिं न जिन्ह कै नाहीं।
ते नरबर थोरे जग माहीं॥

अनुवाद (हिन्दी)

रणामध्ये शत्रूंना ज्यांची पाठ दिसत नाही, पर-स्त्री ज्यांचे मन आणि दृष्टी मोहून टाकू शकत नाही, आणि ज्यांच्याकडून याचकाला कधी नकार मिळत नाही, असे श्रेष्ठ पुरुष जगात फार थोडे आहेत.’॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

करत बतकही अनुज सन मन सिय रूप लोभान।
मुख सरोज मकरंद छबि करइ मधुप इव पान॥ २३१॥

अनुवाद (हिन्दी)

अशा प्रकारे श्रीराम हे लक्ष्मणाशी बोलत होते, परंतु मन सीतेच्या रूपावर भाळले होते व ते सीतेच्या मुखरूपी कमलाचा सौंदर्यरूप मकरंद रस भ्रमराप्रमाणे प्राशन करीत होते.॥ २३१॥

मूल (चौपाई)

चितवति चकित चहूँ दिसि सीता।
कहँ गए नृपकिसोर मनु चिंता॥
जहँ बिलोक मृग सावक नैनी।
जनु तहँ बरिस कमल सित श्रेनी॥

अनुवाद (हिन्दी)

सीता चकित होऊन चोहीकडे पहात होती. तिला हुरहुर लागली होती की, राजकुमार कुठे गेले असावेत? हरिणाक्षी सीतेची दृष्टी जेथे पडत होती, तेथे जणू श्वेत कमळांच्या पंक्ती फुलत होत्या.॥ १॥

मूल (चौपाई)

लता ओट तब सखिन्ह लखाए।
स्यामल गौर किसोर सुहाए॥
देखि रूप लोचन ललचाने।
हरषे जनु निज निधि पहिचाने॥

अनुवाद (हिन्दी)

तेव्हा सख्यांनी सीतेला वेलींच्या आड असलेल्या सुंदर श्याम व गौर कुमारांना दाखविले. त्यांचे रूप पाहून सीतेचे नेत्र आसुसले. ते नेत्र इतके प्रसन्न झाले की, जणू त्यांना आपला हरवलेला खजिनाच सापडला.॥ २॥

मूल (चौपाई)

थके नयन रघुपति छबि देखें।
पलकन्हिहूँ परिहरीं निमेषें॥
अधिक सनेहँ देह भै भोरी।
सरद ससिहि जनु चितव चकोरी॥

अनुवाद (हिन्दी)

श्रीरामांचे रूप पाहून सीतेचे नेत्र थक्क झाले. पापण्या हलणे बंद झाले. आत्यंतिक प्रेमामुळे शरीर विव्हळ झाले. जणू शरद ऋतूतील चंद्राला बेहोष होऊन चकोरी पहात होती.॥ ३॥

मूल (चौपाई)

लोचन मग रामहि उर आनी।
दीन्हे पलक कपाट सयानी॥
जब सिय सखिन्ह प्रेमबस जानी।
कहि न सकहिं कछु मन सकुचानी॥

अनुवाद (हिन्दी)

नेत्रांच्या मार्गाने श्रीरामांना हृदयात आणून जानकीने पापण्यांची दारे बंद करून घेतली. (डोळे मिटून ती ध्यान करू लागली.) सख्यांनी जेव्हा बघितले की, सीता प्रेमात मग्न झाली आहे, तेव्हा त्यांच्या मनात संकोच वाटू लागला. पण त्या काही बोलू शकत नव्हत्या.॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

लताभवन तें प्रगट भे तेहि अवसर दोउ भाइ।
निकसे जनु जुग बिमल बिधु जलद पटल बिलगाइ॥ २३२॥

अनुवाद (हिन्दी)

त्याचवेळी दोघे भाऊ लतामंडपातून बाहेर पडले. जणू दोन निर्मल चंद्र ढगांचा पडदा सारून बाहेर आले होते.॥ २३२॥

मूल (चौपाई)

सोभा सीवँ सुभग दोउ बीरा।
नील पीत जलजाभ सरीरा॥
मोरपंख सिर सोहत नीके।
गुच्छ बीच बिच कुसुम कली के॥

अनुवाद (हिन्दी)

दोघे भाऊ सौंदर्याची परिसीमा होते. त्यांच्या शरीराची कांती निळ्ॺा व पिवळ्ॺा कमळांसारखी होती. शिरावर सुंदर मोरपंख शोभत होते. त्यांच्यामधून फुलांच्या कळ्ॺांचे गुच्छ लावलेले होते.॥ १॥

मूल (चौपाई)

भाल तिलक श्रमबिंदु सुहाए।
श्रवन सुभग भूषन छबि छाए॥
बिकट भृकुटि कच घूघरवारे।
नव सरोज लोचन रतनारे॥

अनुवाद (हिन्दी)

माथ्यावर तिलक व घर्मबिंदू शोभून दिसत होते. कानांतील सुंदर भूषणांची शोभा (गालांवर) झळकत होती. कमानदार भुवया व कुरळे केस होते. लाल नवकमलांप्रमाणे लालसर नेत्र होते.॥ २॥

मूल (चौपाई)

चारु चिबुक नासिका कपोला।
हास बिलास लेत मनु मोला॥
मुखछबि कहि न जाइ मोहि पाहीं।
जो बिलोकि बहु काम लजाहीं॥

अनुवाद (हिन्दी)

हनुवटी, नाक व गाल फार सुंदर होते आणि त्यांच्या स्मित हास्याची शोभा मन मोहून टाकीत होती. त्या मुखाचे सौंदर्य वर्णन करण्यास मी समर्थ नाही. कारण ते पाहून असंख्य कामदेव लज्जित होत होते.॥ ३॥

मूल (चौपाई)

उर मनि माल कंबु कल गीवा।
काम कलभ कर भुज बलसींवा॥
सुमन समेत बाम कर दोना।
सावँर कुअँर सखी सुठि लोना॥

अनुवाद (हिन्दी)

वक्षःस्थळावर रत्नांच्या माळा रुळत होत्या. शंखासारखा सुंदर गळा होता. कामदेवाच्या हत्तीच्या सोंडेप्रमाणे निमुळते होत गेलेले सुकुमार बाहू होते. ते बळाचे परमसीमा होते. ज्यांच्या डाव्या हातात फुलांनी भरलेला द्रोण आहे, हे सखी, तो सावळा कुमार तर फारच सुंदर आहे.’॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

केहरि कटि पट पीत धर सुषमा सील निधान।
देखि भानुकुलभूषनहि बिसरा सखिन्ह अपान॥ २३३॥

अनुवाद (हिन्दी)

सिंहासारखी (बारीक व लवचिक) कटी असणारे, पीतांबर परिधान केलेले, शोभा व शीलाचे भांडार असणारे, सूर्यकुलाचे भूषण, श्रीराम यांना पाहून सख्यासुद्धा भान हरपून गेल्या.॥ २३३॥

मूल (चौपाई)

धरि धीरजु एक आलि सयानी।
सीता सन बोली गहि पानी॥
बहुरि गौरि कर ध्यान करेहू।
भूपकिसोर देखि किन लेहू॥

अनुवाद (हिन्दी)

एक चतुर सखी मोठॺा धीराने सीतेचा हात धरून म्हणाली, ‘गिरिजादेवीचे ध्यान नंतर कर. यावेळी राजकुमाराला का पाहून घेत नाहीस?’॥ १॥

मूल (चौपाई)

सकुचि सीयँ तब नयन उघारे।
सनमुख दोउ रघुसिंघ निहारे॥
नख सिख देखि राम कै सोभा।
सुमिरि पिता पनु मनु अति छोभा॥

अनुवाद (हिन्दी)

तेव्हा सीतेने लाजून नेत्र उघडले आणि रघुकुलातील ते दोन्ही सिंह आपल्यासमोर उभे ठाकल्याचे तिला दिसून आले. श्रीरामांची नख-शिखांत शोभा पाहून आणि नंतर आपल्या पित्याच्या पणाची आठवण येऊन तिचे मन अतिशय हेलावून गेले.॥ २॥

मूल (चौपाई)

परबस सखिन्ह लखी जब सीता।
भयउ गहरु सब कहहिं सभीता॥
पुनि आउब एहि बेरिआँ काली।
अस कहि मन बिहसी एक आली॥

अनुवाद (हिन्दी)

सख्यांनी जेव्हा पाहिले की, सीता प्रेमात बुडाली आहे, तेव्हा त्या बावरून म्हणू लागल्या, ‘फार उशीर झाला. (आता निघाले पाहिजे). उद्या पुन्हा येऊ.’ असे म्हणत एक सखी मनात हसली.॥ ३॥

मूल (चौपाई)

गूढ़ गिरा सुनि सिय सकुचानी।
भयउ बिलंबु मातु भय मानी॥
धरि बड़ि धीर रामु उर आने।
फिरी अपनपउ पितुबस जाने॥

अनुवाद (हिन्दी)

सखीचे हे गूढ बोलणे ऐकून सीता लाजली. उशीर झाला आहे, असे पाहून तिला आईची भीती वाटली. मोठॺा धैर्याने तिने श्रीरामांना आपल्या अंतःकरणात बसवून आणि (त्यांचे ध्यान करीत) आपण आपल्या पित्याच्या अधीन असल्याचे जाणून ती नाईलाजाने परत निघाली.॥ ४॥