४८ श्रीराम-लक्ष्मांचे जनकपूर दर्शन

दोहा

मूल (दोहा)

जाइ देखि आवहु नगरु सुख निधान दोउ भाइ।
करहु सुफल सब के नयन सुंदर बदन देखाइ॥ २१८॥

अनुवाद (हिन्दी)

सुखनिधान तुम्ही दोन्ही बंधू नगर पाहून या. आपले सुंदर मुख-दर्शन देऊन सर्व नगरवासीयांचे नेत्र धन्य करा.॥ २१८॥

मूल (चौपाई)

मुनि पद कमल बंदि दोउ भ्राता।
चले लोक लोचन सुख दाता॥
बालक बृंद देखि अति सोभा।
लगे संग लोचन मनु लोभा॥

अनुवाद (हिन्दी)

सर्व लोकांच्या नेत्रांना सुखावणारे दोन्ही भाऊ मुनींच्या चरण-कमलांना वंदन करून निघाले. (वाटेत) लहान मुलांच्या झुंडी त्यांचे अनुपम सौंदर्य पाहून त्यांच्या मागून निघाले. त्यांचे नेत्र आणि मन (त्यांना पाहून) मोहून गेले होते.॥ १॥

मूल (चौपाई)

पीत बसन परिकर कटि भाथा।
चारु चाप सर सोहत हाथा॥
तन अनुहरत सुचंदन खोरी।
स्यामल गौर मनोहर जोरी॥

अनुवाद (हिन्दी)

(दोघा भावांनी) पीतांबर परिधान केले होते. कमरेच्या दुपट्टॺाला भाते बांधले होते. हातांमध्ये सुंदर धनुष्य-बाण शोभत होते. (श्याम व गौर वर्णांच्या) शरीरांना शोभेल अशी सुंदर चंदनाची उटी लावली होती. सावळ्या व गोऱ्या रंगाची ती सुंदर जोडी होती.॥ २॥

मूल (चौपाई)

केहरि कंधर बाहु बिसाला।
उर अति रुचिर नागमनि माला॥
सुभग सोन सरसीरुह लोचन।
बदन मयंक तापत्रय मोचन॥

अनुवाद (हिन्दी)

त्यांची सिंहासारखी पुष्ट मान व विशाल बाहू होते. विशाल छातीवर अत्यंत सुंदर मोत्यांच्या माळा होत्या. त्यांचे सुंदर लाल कमळांसारखे नेत्र होते. त्रिविध तापांपासून मुक्त करणारे चंद्रासारखे मुख होते.॥ ३॥

मूल (चौपाई)

कानन्हि कनक फूल छबि देहीं।
चितवत चितहि चोरि जनु लेहीं॥
चितवनि चारु भृकुटि बर बाँकी।
तिलक रेख सोभा जनु चाँकी॥

अनुवाद (हिन्दी)

कानांमध्ये सोन्याची कर्णफुले फार शोभून दिसत होती. आणि पाहता क्षणीच (पाहणाऱ्यांचे) चित्त ते जणू चोरून घेत होती. त्यांची नजर फार मनोहर आणि भुवया सुंदर कमानदार होत्या. त्यांच्या कपाळावरील तिलक इतका सुंदर होता की, जणू त्या शोभेवर उमटवलेली मोहर.॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

रुचिर चौतनीं सुभग सिर मेचक कुंचित केस।
नख सिख सुंदर बंधु दोउ सोभा सकल सुदेस॥ २१९॥

अनुवाद (हिन्दी)

मस्तकावर सुंदर चौकोनी टोप्या होत्या. केस काळे व कुरळे होते.दोन्ही भाऊ नखशिखांत सुंदर होते आणि संपूर्ण शोभा जेथे जशी हवी तशी होती.॥ २१९॥

मूल (चौपाई)

देखन नगरु भूपसुत आए।
समाचार पुरबासिन्ह पाए॥
धाए धाम काम सब त्यागी।
मनहुँ रंक निधि लूटन लागी॥

अनुवाद (हिन्दी)

नगर पाहण्यासाठी दोघे राजकुमार आले आहेत, हे वर्तमान समजताच नगरवासी घरदार व सर्व कामधाम सोडून असे धावले की, जसे दरिद्री लोक खजिना लुटण्यासाठी धावत सुटतात.॥ १॥

मूल (चौपाई)

निरखि सहज सुंदर दोउ भाई।
होहिं सुखी लोचन फल पाई॥
जुबतीं भवन झरोखन्हि लागीं।
निरखहिं राम रूप अनुरागीं॥

अनुवाद (हिन्दी)

स्वभावतःच सुंदर असलेल्या दोन्ही भावांना पाहून नगरवासी लोक नेत्रांचे पारणे फिटल्याचे वाटून सुखावले. तरुण स्त्रिया घराच्या खिडक्यांना डोळे लावून प्रेमाने श्रीरामचंद्रांचे रूप न्याहाळत होत्या.॥ २॥

मूल (चौपाई)

कहहिं परसपर बचन सप्रीती।
सखि इन्ह कोटि काम छबि जीती॥
सुर नर असुर नाग मुनि माहीं।
सोभा असि कहुँ सुनिअति नाहीं॥

अनुवाद (हिन्दी)

त्या आपसात मोठॺा प्रेमाने बोलत होत्या की, ‘हे सखी, यांनी तर कोटॺवधी मदनांचे सौंदर्य लुटून घेतले आहे. देव, मनुष्य, असुर, नाग आणि मुनी यांच्यामध्येही असे सौंदर्य कुणाचे असल्याचे ऐकिवात नाही.॥ ३॥

मूल (चौपाई)

बिष्नु चारि भुज बिधि मुख चारी।
बिकट बेष मुख पंच पुरारी॥
अपर देउ अस कोउ न आही।
यह छबि सखी पटतरिअ जाही॥

अनुवाद (हिन्दी)

भगवान विष्णूंना चार बाहू आहेत, ब्रह्मदेवांना चार मुखे आहेत, शिवांचा भयानक वेष आहे आणि त्यांना पाच मुखे आहेत. हे सखी, किंबहुना या रूपाला उपमा देण्यासाठी कोणताच देव नाही.॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

बय किसोर सुषमा सदन स्याम गौर सुख धाम।
अंग अंग पर वारिअहिं कोटि कोटि सत काम॥ २२०॥

अनुवाद (हिन्दी)

या किशोर अवस्थेमध्ये, हे सौंदर्याचे माहेर असलेले, सावळ्या व गोऱ्या रंगाचे किशोर हे सुखाचे निधान आहेत. यांच्या एकेका अवयवावरून शतकोटी मदनांना ओवाळून टाकावे.॥ २२०॥

मूल (चौपाई)

कहहु सखी अस को तनुधारी।
जो न मोह यह रूप निहारी॥
कोउ सप्रेम बोली मृदु बानी।
जो मैं सुना सो सुनहु सयानी॥

अनुवाद (हिन्दी)

हे सखी, सांग बरे, असा कोणता देहधारी आहे की, जो हे रूप पाहून मोहून जाणार नाही?’ तेव्हा दुसरी एक सखी प्रेमाने व कोमल शब्दांनी म्हणाली, ‘अग शहाणे, मी जे ऐकले आहे ते ऐक.॥ १॥

मूल (चौपाई)

ए दोऊ दसरथ के ढोटा।
बाल मरालन्हि के कल जोटा॥
मुनि कौसिक मख के रखवारे।
जिन्ह रन अजिर निसाचर मारे॥

अनुवाद (हिन्दी)

हे दोन्ही राजकुमार महाराज दशरथांचे पुत्र आहेत. ही बाल राजहंसांची सुंदर जोडी आहे. या दोघांनी विश्वामित्रांच्या यज्ञाचे रक्षण केले आहे. यांनी युद्धक्षेत्रामध्ये राक्षसांना मारले आहे.॥ २॥

मूल (चौपाई)

स्याम गात कल कंज बिलोचन।
जो मारीच सुभुज मदु मोचन॥
कौसल्या सुत सो सुख खानी।
नामु रामु धनु सायक पानी॥

अनुवाद (हिन्दी)

ज्यांचे अंग सावळे असून सुंदर कमलांसारखे नेत्र आहेत, जे मारीच व सुबाहू यांचा मद उतरून टाकणारे आहेत आणि सौंदर्याची खाण आहेत, ज्यांनी हातांमध्ये धनुष्य-बाण धारण केलेले आहेत, ते हे कौसल्येचे पुत्र होत. त्यांचे नाव राम आहे.॥ ३॥

मूल (चौपाई)

गौर किसोर बेषु बर काछें।
कर सर चाप राम के पाछें॥
लछिमनु नामु राम लघु भ्राता।
सुनु सखि तासु सुमित्रा माता॥

अनुवाद (हिन्दी)

ज्यांचा रंग गोरा असून किशोर अवस्था आहे, ज्यांनी सुंदर वेश धारण केला आहे. आणि हाती धनुष्य-बाण घेऊन जे श्रीरामांच्या मागे-मागे चालत आहेत, ते रामांचे धाकटे भाऊ आहेत. त्यांचे नाव लक्ष्मण. हे सखी, त्यांची माता सुमित्रा आहे.॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

बिप्रकाजु करि बंधु दोउ मग मुनिबधू उधारि।
आए देखन चापमख सुनि हरषीं सब नारि॥ २२१॥

अनुवाद (हिन्दी)

हे दोघे बंधू ऋषी विश्वामित्रांचे कार्य पूर्ण करून आणि वाटेमध्ये मुनी गौतमांची पत्नी अहल्या हिचा उद्धार करून येथे धनुष्य-यज्ञ पाहण्यासाठी आलेले आहेत.’ हे ऐकून सर्व स्त्रियांना आनंद झाला.॥ २२१॥

मूल (चौपाई)

देखि राम छबि कोउ एक कहई।
जोगु जानकिहि यह बरु अहई॥
जौं सखि इन्हहि देख नरनाहू।
पन परिहरि हठि करइ बिबाहू॥

अनुवाद (हिन्दी)

श्रीरामांचे रूप पाहून कुणी तरी आपल्या सखीला म्हणाली की, ‘हा जानकीसाठी योग्य आहे. हे सखी, जर राजांनी यांना पाहिले, तर ते आपली (धनुष्ययज्ञाची) प्रतिज्ञा सोडून आग्रहाने यांच्याशीच जानकीचे लग्न लावून टाकतील.’॥ १॥

मूल (चौपाई)

कोउ कह ए भूपति पहिचाने।
मुनि समेत सादर सनमाने॥
सखि परंतु पनु राउ न तजई।
बिधि बस हठि अबिबेकहि भजई॥

अनुवाद (हिन्दी)

कुणी म्हणाली की, ‘राजांनी यांना ओळखले आहे आणि मुनींच्या सोबतच यांचा आदराने सन्मान केलेला आहे. परंतु हे सखी, राजे आपला पण सोडून देणार नाहीत. ते नशिबावर भरवसा ठेवून हट्टाने हा अविवेक करीत आहेत.’ (आपल्या पणावर दृढ राहण्याचा मूर्खपणा सोडणार नाहीत.)॥ २॥

मूल (चौपाई)

कोउ कह जौं भल अहइ बिधाता।
सब कहँ सुनिअ उचित फलदाता॥
तौ जानकिहि मिलिहि बरु एहू।
नाहिन आलि इहाँ संदेहू॥

अनुवाद (हिन्दी)

कोणी म्हणत होती की, ‘जर विधाता न्यायी आहे आणि तो सर्वांना उचित फळ देतो, असे म्हणतात. हे सत्य असेल, तर जानकीला हाच वर लाभेल. हे सखी, यात शंका नाही.॥ ३॥

मूल (चौपाई)

जौं बिधि बस अस बनै सँजोगू।
तौ कृतकृत्य होइ सब लोगू॥
सखि हमरें आरति अति तातें।
कबहुँक ए आवहिं एहि नातें॥

अनुवाद (हिन्दी)

जर दैवयोगाने हे जुळून आले, तर आम्ही सर्व कृतार्थ होऊन जाऊ. हे सखी, या नात्याने (जानकीपती म्हणून) हे कधी येथे येतील, (आणि आम्हांला यांचे दर्शन होईल), म्हणून मला फार आतुरता लागून राहिली आहे.॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

नाहिं त हम कहुँ सुनहु सखि इन्ह कर दरसनु दूरि।
यह संघटु तब होइ जब पुन्य पुराकृत भूरि॥ २२२॥

अनुवाद (हिन्दी)

(हा विवाह झाला नाही तर) हे सखी, आम्हांला यांचे दुर्लभ दर्शन होणार नाही. आपल्या पूर्वजन्मीचे पुण्य थोर असेल तरच हा योग घडून येईल.’॥ २२२॥

मूल (चौपाई)

बोली अपर कहेहु सखि नीका।
एहिं बिआह अति हित सबही का॥
कोउ कह संकर चाप कठोरा।
ए स्यामल मृदु गात किसोरा॥

अनुवाद (हिन्दी)

दुसरी सखी म्हणाली, ‘हे सखी, तू फार छान बोललीस. हा विवाह होण्यात सर्वांचेच मोठे कल्याण आहे.’ कुणी म्हणाली, ‘भगवान शंकरांचे धनुष्य मोठे अवजड आहे आणि हे सावळे राजकुमार सुकुमार बालक आहेत.॥ १॥

मूल (चौपाई)

सबु असमंजस अहइ सयानी।
यह सुनि अपर कहइ मृदु बानी॥
सखि इन्ह कहँ कोउ कोउ अस कहहीं।
बड़ प्रभाउ देखत लघु अहहीं॥

अनुवाद (हिन्दी)

ये शहाणे! येथेच सर्व घोळ आहे.’ हे ऐकून दुसरी सखी कोमलपणे म्हणाली की, ‘हे सखी, यांच्याविषयी काहीजण म्हणतात की, हे जरी दिसायला लहान वाटले, तरी यांचा प्रभाव फार मोठा आहे.॥ २॥

मूल (चौपाई)

परसि जासु पद पंकज धूरी।
तरी अहल्या कृत अघ भूरी॥
सो कि रहिहि बिनु सिवधनु तोरें।
यह प्रतीति परिहरिअ न भोरें॥

अनुवाद (हिन्दी)

ज्यांच्या चरणकमलांच्या धुळीच्या स्पर्शामुळे मोठे पाप घडलेली अहिल्या तरून गेली, ते शिव-धनुष्य तोडल्याविना राहतील काय? हा विश्वास चुकूनही सोडता कामा नये.॥ ३॥

मूल (चौपाई)

जेहिं बिरंचि रचि सीय सँवारी।
तेहिं स्यामल बरु रचेउ बिचारी॥
तासु बचन सुनि सब हरषानीं।
ऐसेइ होउ कहहिं मृदु बानीं॥

अनुवाद (हिन्दी)

ज्या विधात्याने मोठॺा चातुर्याने कौशल्यपूर्वक सीतेला निर्माण केले, त्यानेच विचारपूर्वक हा सावळा वरही निर्माण केला आहे.’ तिचे हे बोल ऐकून सर्वजणींना आनंद झाला आणि कोमल शब्दात त्या म्हणू लागल्या की, ‘असेच घडो.’॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

हियँ हरषहिं बरषहिं सुमन सुमुखि सुलोचनि बृंद।
जाहिं जहाँ जहँ बंधु दोउ तहँ तहँ परमानंद॥ २२३॥

अनुवाद (हिन्दी)

त्या सुंदर, कमलनेत्र स्त्रियांचे समुदाय मनातून आनंदित होऊन फुलांचा वर्षाव करू लागले. दोघे भाऊ जिथे जिथे जात होते, तिथे तिथे मोठा आनंद पसरत होता.॥ २२३॥

मूल (चौपाई)

पुर पूरब दिसि गे दोउ भाई।
जहँ धनुमख हित भूमि बनाई॥
अति बिस्तार चारु गच ढारी।
बिमल बेदिका रुचिर सँवारी॥

अनुवाद (हिन्दी)

दोघे भाऊ नगराच्या पूर्वेेला गेले. तिथे धनुष्य-यज्ञासाठी रंगभूमी बनविली होती. विस्तृत असे बनविलेले पक्के अंगण होते. त्यावर सुंदर व स्वच्छ असा चबुतरा सजविलेला होता.॥ १॥

मूल (चौपाई)

चहुँ दिसि कंचन मंच बिसाला।
रचे जहाँ बैठहिं महिपाला॥
तेहि पाछें समीप चहुँ पासा।
अपर मंच मंडली बिलासा॥

अनुवाद (हिन्दी)

चोहीकडे सोन्याचे मोठमोठे चबुतरे राजांना बसण्यासाठी उभारलेले होते. त्यांच्या मागे जवळच चारी बाजूंना दुसऱ्या सज्जांचा गोलाकार वेढा शोभत होता.॥ २॥

मूल (चौपाई)

कछुक ऊँचि सब भाँति सुहाई।
बैठहिं नगर लोग जहँ जाई॥
तिन्ह के निकट बिसाल सुहाए।
धवल धाम बहुबरन बनाए॥

अनुवाद (हिन्दी)

तो काहीसा उंच होता आणि सर्व तऱ्हेने सुंदर होता. तेथे नगरातील लोक बसणार होते. त्यांच्याजवळच विशाल व सुंदर अशी बसण्याची ठिकाणे अनेक रंगांनी रंगविलेली होती.॥ ३॥

मूल (चौपाई)

जहँ बैठें देखहिं सब नारी।
जथाजोगु निज कुल अनुहारी॥
पुर बालक कहि कहि मृदु बचना।
सादर प्रभुहि देखावहिं रचना॥

अनुवाद (हिन्दी)

तेथे आपल्या कुलाच्या योग्यतेप्रमाणे सर्व स्त्रिया यथायोग्य रीतीने बसून पाहू शकणार होत्या. नगरातील मुले गोड गोड बोलून मोठॺा आदराने प्रभू रामचंद्रांना यज्ञशालेची रचना दाखवीत होती.॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

सब सिसु एहि मिस प्रेमबस परसि मनोहर गात।
तन पुलकहिं अति हरषु हियँ देखि देखि दोउ भ्रात॥ २२४॥

अनुवाद (हिन्दी)

सर्व मुले या निमित्ताने मोठॺा प्रेमाने श्रीरामांच्या अंगाला स्पर्श करून रोमांचित होत होती आणि दोन्ही भावांना पाहून त्यांच्या मनाला मोठा आनंद होत होता.॥ २२४॥

मूल (चौपाई)

सिसु सब राम प्रेमबस जाने।
प्रीति समेत निकेत बखाने॥
निज निज रुचि सब लेहिं बोलाई।
सहित सनेह जाहिं दोउ भाई॥

अनुवाद (हिन्दी)

श्रीरामचंद्रांनी सर्व मुलांचे ते प्रेम पाहून (यज्ञभूमीच्या) स्थानांची मनापासून प्रशंसा केली. (त्यामुळे बालकांचा उत्साह, आनंद आणि प्रेम आणखी वाढले.) ते सर्वजण आपापल्या आवडीप्रमाणे त्यांना बोलवीत होते आणि प्रत्येकाच्या बोलावण्यावर दोघे भाऊ मोठॺा प्रेमाने त्यांच्याकडे जात होते.॥ १॥

मूल (चौपाई)

राम देखावहिं अनुजहि रचना।
कहि मृदु मधुर मनोहर बचना॥
लव निमेष महुँ भुवन निकाया।
रचइ जासु अनुसासन माया॥

अनुवाद (हिन्दी)

कोमल, मधुर व मनोहर शब्दांनी श्रीराम आपला धाकटा भाऊ लक्ष्मण यास यज्ञशालेची रचना दाखवीत होते. ज्यांच्या आज्ञेने माया ही एका निमिषामध्ये ब्रह्मांडांचे समूह निर्माण करते.॥ २॥

मूल (चौपाई)

भगति हेतु सोइ दीनदयाला।
चितवत चकित धनुष मखसाला॥
कौतुक देखि चले गुरु पाहीं।
जानि बिलंबु त्रास मन माहीं॥

अनुवाद (हिन्दी)

ते दीनांवर दया करणारे श्रीराम भक्तीमुळे धनुष्ययज्ञशाला चकित होऊन पाहात होते. अशा प्रकारे कौतुकास्पद रचना पाहून ते गुरूंजवळ परत आले. उशीर झाल्याचे वाटून त्यांच्या मनात काहीशी भीती होती.॥ ३॥

मूल (चौपाई)

जासु त्रास डर कहुँ डर होई।
भजन प्रभाउ देखावत सोई॥
कहि बातें मृदु मधुर सुहाईं।
किए बिदा बालक बरिआईं॥

अनुवाद (हिन्दी)

ज्यांच्या भयामुळे भीतीलाही भय वाटते, तेच प्रभू भजनाचा प्रभाव दाखवीत होते. त्यांनी कोमल, मधुर आणि सुंदर गोष्टी सांगून मुलांना आग्रहाने निरोप दिला.॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

सभय सप्रेम बिनीत अति सकुच सहित दोउ भाइ।
गुर पद पंकज नाइ सिर बैठे आयसु पाइ॥ २२५॥

अनुवाद (हिन्दी)

नंतर भय, प्रेम, विनय आणि मोठॺा संकोचाने दोन्ही भावांनी गुरूंच्या चरण-कमलांवर मस्तक ठेवून, त्यांच्या आज्ञेने ते बसले.॥ २२५॥

मूल (चौपाई)

निसि प्रबेस मुनि आयसु दीन्हा।
सबहीं संध्याबंदनु कीन्हा॥
कहत कथा इतिहास पुरानी।
रुचिर रजनि जुग जाम सिरानी॥

अनुवाद (हिन्दी)

संध्याकाळ होताच मुनींनी आज्ञा केली, तेव्हा सर्वांनी संध्या-वंदन केले. नंतर प्राचीन कथा आणि इतिहास सांगता-सांगता सुंदर रात्रीचे दोन प्रहर निघून गेले.॥ १॥

मूल (चौपाई)

मुनिबर सयन कीन्हि तब जाई।
लगे चरन चापन दोउ भाई॥
जिन्ह के चरन सरोरुह लागी।
करत बिबिध जप जोग बिरागी॥

अनुवाद (हिन्दी)

तेव्हा मुनिवर्य झोपण्यास गेले. दोन्ही भाऊ त्यांचे पाय चेपू लागले. ज्यांच्या चरण-कमलांच्या (दर्शनासाठी व स्पर्शासाठी) वैराग्यशील पुरुषसुद्धा तऱ्हेतऱ्हेचे जप व योगसाधना करतात,॥ २॥

मूल (चौपाई)

तेइ दोउ बंधु प्रेम जनु जीते।
गुर पद कमल पलोटत प्रीते॥
बार बार मुनि अग्या दीन्ही।
रघुबर जाइ सयन तब कीन्ही॥

अनुवाद (हिन्दी)

तेच दोन्ही बंधू जणू प्रेमाने जिंकले गेल्यामुळे प्रेमपूर्वक गुरुजींची चरण-कमले चुरीत होते. मुनींनी जेव्हा वारंवार सांगितले, तेव्हा श्रीरघुनाथ जाऊन झोपले.॥ ३॥

मूल (चौपाई)

चापत चरन लखनु उर लाएँ।
सभय सप्रेम परम सचु पाएँ॥
पुनि पुनि प्रभु कह सोवहु ताता।
पौढ़े धरि उर पद जलजाता॥

अनुवाद (हिन्दी)

श्रीरामांचे चरण हृदयी धरून भय व प्रेमाने परम सुखाचा अनुभव घेत लक्ष्मण श्रीरामांचे चुरू चेपू लागले. प्रभू रामचंद्र वारंवार म्हणत होते की, ‘बाबा रे, आता तू झोप.’ तेव्हा लक्ष्मण त्यांचे चरणकमल हृदयी धरून पहुडला.॥ ४॥