४६ मासपारायण, सातवा विश्राम

श्रीराम-लक्ष्मणांचे जनकपूर दर्शन

मूल (चौपाई)

चले राम लछिमन मुनि संगा।
गए जहाँ जग पावनि गंगा॥
गाधिसूनु सब कथा सुनाई।
जेहि प्रकार सुरसरि महि आई॥

अनुवाद (हिन्दी)

श्रीराम व लक्ष्मण (विश्वामित्र) मुनींच्या सोबत निघाले. ते जगाला पवित्र करणाऱ्या गंगेजवळ गेले. महाराज गाधीचे पुत्र विश्वामित्र यांनी देवनदी गंगा पृथ्वीवर कशी आली, याची संपूर्ण कथा सांगितली.॥ १॥

मूल (चौपाई)

तब प्रभु रिषिन्ह समेत नहाए।
बिबिध दान महिदेवन्हि पाए॥
हरषि चले मुनि बृंद सहाया।
बेगि बिदेह नगर निअराया॥

अनुवाद (हिन्दी)

प्रभू श्रीरामांनी ऋषींच्यासह (गंगेमध्ये) स्नान केले. ब्राह्मणांना तऱ्हेतऱ्हेची दाने मिळाली. नंतर मुनिवृंदांसह ते आनंदाने निघाले आणि लवकरच जनकपुराजवळ पोहोचले.॥ २॥

मूल (चौपाई)

पुर रम्यता राम जब देखी।
हरषे अनुज समेत बिसेषी॥
बापीं कूप सरित सर नाना।
सलिल सुधासम मनि सोपाना॥

अनुवाद (हिन्दी)

जनकपुरीची शोभा जेव्हा पाहिली, तेव्हा श्रीराम-लक्ष्मण आनंदित झाले. तेथे अनेक आड, विहिरी, नद्या व तलाव होते. त्यांमध्ये अमृतासमान मधुर जल भरले होते आणि त्यांना रत्नांच्या पायऱ्या होत्या.॥ ३॥

मूल (चौपाई)

गुंजत मंजु मत्त रस भृंगा।
कूजत कल बहुबरन बिहंगा॥
बरन बरन बिकसे बनजाता।
त्रिबिध समीर सदा सुखदाता॥

अनुवाद (हिन्दी)

मकरंदाच्या रसाने धुंद होऊन भ्रमर मधुर गुंजारव करीत होते. रंगी-बेरंगी (पुष्कळ) पक्षी मधुर किलबिल करीत होते. नाना रंगांची कमळे उमललेली होती. नेहमी सर्व ऋतूंमध्ये सुख देणारा शीतल, मंद, सुगंधित वारा वाहात होता.॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

सुमन बाटिका बाग बन बिपुल बिहंग निवास।
फूलत फलत सुपल्लवत सोहत पुर चहुँ पास॥ २१२॥

अनुवाद (हिन्दी)

पुष्पवाटिका, बागा आणि वने, यांमध्ये पुष्कळ पक्ष्यांचा निवास होता. फुलणाऱ्या-फळणाऱ्या आणि सुंदर पानांनी भरलेल्या बागा नगराच्या चोहीकडे शोभत होत्या.॥ २१२॥

मूल (चौपाई)

बनइ न बरनत नगर निकाई।
जहाँ जाइ मन तहँइँ लोभाई॥
चारु बजारु बिचित्र अँबारी।
मनिमय बिधि जनु स्वकर सँवारी॥

अनुवाद (हिन्दी)

नगराच्या सौंदर्याचे वर्णन करणे कठीण. जिकडे मन जाई, तिकडे ते रमून जाई. सुंदर बाजार, रत्नजडित गच्च्या, जणू ब्रह्मदेवांनी स्वतःच्या हातांनी बनविल्या होत्या.॥ १॥

मूल (चौपाई)

धनिक बनिक बर धनद समाना।
बैठे सकल बस्तु लै नाना॥
चौहट सुंदर गलीं सुहाई।
संतत रहहिं सुगंध सिंचाई॥

अनुवाद (हिन्दी)

कुबेरासारखे श्रेष्ठ धनवान व्यापारी सर्व प्रकारच्या अनेक वस्तू घेऊन (दुकानांतून) बसलेले असत. सुंदर चौक आणि सुशोभित गल्‍ल्या नित्य सुगंधाचे सडे घातलेल्या होत्या.॥ २॥

मूल (चौपाई)

मंगलमय मंदिर सब केरें।
चित्रित जनु रतिनाथ चितेरें॥
पुर नर नारि सुभग सुचि संता।
धरमसील ग्यानी गुनवंता॥

अनुवाद (हिन्दी)

सर्वांची घरे मंगलमय असून त्यांच्यावर चित्रे रंगविलेली होती. जणू ती कामदेवरूपी चित्रकाराने चितारली होती. नगरातील सर्व स्त्री-पुरुष सुंदर, पवित्र, सरळ स्वभावाचे, धर्मात्मे, ज्ञानी व गुणवान होते.॥ ३॥

मूल (चौपाई)

अति अनूप जहँ जनक निवासू।
बिथकहिं बिबुध बिलोकि बिलासू॥
होत चकित चित कोट बिलोकी।
सकल भुवन सोभा जनु रोकी॥

अनुवाद (हिन्दी)

तेथे जनक राजांचे अत्यंत अनुपमेय सुंदर निवासस्थान असून तेथील ऐश्वर्य पाहून देवसुद्धा थक्क होत. राजमहालाची तटबंदी पाहून चित्त चकित होत होते. (असे वाटे) जणू त्या तटाने सर्व लोकांची शोभा आपल्यात सामावून टाकली होती.॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

धवल धाम मनि पुरट पट सुघटित नाना भाँति।
सिय निवास सुंदर सदन सोभा किमि कहि जाति॥ २१३॥

अनुवाद (हिन्दी)

दैदीप्यमान महालांमध्ये अनेक प्रकारच्या सुंदर पद्धतीने बनविलेल्या रत्नजडित सोन्याच्या जरीचे पडदे लावलेले होते. सीतेच्या राहाण्याच्या सुंदर महालाच्या शोभेचे वर्णन तर काय करावे?॥ २१३॥

मूल (चौपाई)

सुभग द्वार सब कुलिस कपाटा।
भूप भीर नट मागध भाटा॥
बनी बिसाल बाजि गज साला।
हय गय रथ संकुल सब काला॥

अनुवाद (हिन्दी)

राजमहालाचे सर्व दरवाजे सुंदर होते. त्यांना चमकणाऱ्या हिऱ्यांची दारे बसवलेली होती. तेथे मांडलिक राजे, नट, मागध आणि भाट यांची गर्दी झालेली असे. घोडे आणि हत्ती यांच्यांसाठी मोठमोठॺा पागा व हत्तीखाने बनविलेले होते. ते नेहमी घोडे, हत्ती व रथांनी भरलेले असत.॥ १॥

मूल (चौपाई)

सूर सचिव सेनप बहुतेरे।
नृपगृह सरिस सदन सब केरे॥
पुर बाहेर सर सरित समीपा।
उतरे जहँ तहँ बिपुल महीपा॥

अनुवाद (हिन्दी)

पुष्कळ वीर, मंत्री आणि सेनापती होते, त्या सर्वांची घरेसुद्धा राजमहालासारखीच होती. नगराबाहेर असलेल्या तलाव आणि नदीजवळ जिकडे-तिकडे पुष्कळसे राजे लोक उतरले होते.॥ २॥

मूल (चौपाई)

देखि अनूप एक अँवराई।
सब सुपास सब भाँति सुहाई॥
कौसिक कहेउ मोर मनु माना।
इहाँ रहिअ रघुबीर सुजाना॥

अनुवाद (हिन्दी)

तेथील अनुपम सर्व प्रकारे शोभिवंत आमराई पाहून आणि तेथील सर्व सुखसोयी पाहून विश्वामित्र म्हणाले, ‘हे प्रिय रघुवीरा, इथेच रहावे, असे मला वाटते.॥ ३॥

मूल (चौपाई)

भलेहिं नाथ कहि कृपानिकेता।
उतरे तहँ मुनिबृंद समेता॥
बिस्वामित्र महामुनि आए।
समाचार मिथिलापति पाए॥

अनुवाद (हिन्दी)

कृपानिधान श्रीरामचंद्र म्हणाले की, ‘मुनिवर्य! फारच छान.’ असे म्हणून ते मुनींसह तेथेच राहिले. मिथिलापती जनकांना जेव्हा हे वर्तमान समजले की, महामुनी विश्वामित्र आले आहेत,॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

संग सचिव सुचि भूरि भट भूसुर बर गुर ग्याति।
चले मिलन मुनिनायकहि मुदित राउ एहि भाँति॥ २१४॥

अनुवाद (हिन्दी)

तेव्हा पवित्र विचारांचे मंत्री, पुष्कळसे योद्धे, श्रेष्ठ ब्राह्मण, गुरूशतानंद आणि आपल्या जातीचे श्रेष्ठ लोक यांना बरोबर घेतले आणि मोठॺा आनंदाने राजा जनक हे मुनिश्रेष्ठ विश्वामित्रांना भेटण्यास निघाले.॥ २१४॥

मूल (चौपाई)

कीन्ह प्रनामु चरन धरि माथा।
दीन्हि असीस मुदित मुनिनाथा॥
बिप्रबृंद सब सादर बंदे।
जानि भाग्य बड़ राउ अनंदे॥

अनुवाद (हिन्दी)

राजांनी मुनींच्या चरणी मस्तक ठेवून प्रणाम केला. मुनिश्रेष्ठ विश्वामित्रांनी प्रसन्न होऊन आशीर्वाद दिला. नंतर राजाने सर्व ब्राह्मण मंडळींना आदराने प्रणाम केला. हे आपले सद्भाग्य मानून राजा जनकांना आनंद वाटला.॥ १॥

मूल (चौपाई)

कुसल प्रस्न कहि बारहिं बारा।
बिस्वामित्र नृपहि बैठारा॥
तेहि अवसर आए दोउ भाई।
गए रहे देखन फुलवाई॥

अनुवाद (हिन्दी)

वारंवार खुशाली विचारून विश्वामित्रांनी राजांना बसवून घेतले. त्याचवेळी राम-लक्ष्मण हे दोघे फुलबाग पाहून तेथे आले.॥ २॥

मूल (चौपाई)

स्याम गौर मृदु बयस किसोरा।
लोचन सुखद बिस्व चित चोरा॥
उठे सकल जब रघुपति आए।
बिस्वामित्र निकट बैठाए॥

अनुवाद (हिन्दी)

सुकुमार किशोर वयाचे, श्याम व गौर वर्णाचे ते दोघे कुमार नेत्रांना सुख देणारे आणि संपूर्ण विश्वाचे चित्त आकर्षून घेणारे होते. जेव्हा श्रीरघुनाथ आले, तेव्हा सर्वजण त्यांचे रूप व तेज यांनी प्रभावित होऊन उठून उभे राहिले. विश्वामित्रांनी त्यांना आपल्याजवळ बसवून घेतले.॥ ३॥

मूल (चौपाई)

भए सब सुखी देखि दोउ भ्राता।
बारि बिलोचन पुलकित गाता॥
मूरति मधुर मनोहर देखी।
भयउ बिदेहु बिदेहु बिसेषी॥

अनुवाद (हिन्दी)

दोघा भावांना पाहून सर्वांना आनंद झाला. सर्वांच्या डोळ्यांतून प्रेमाश्रू, आनंदाश्रू वाहू लागले. शरीरे रोमांचित झाली. श्रीरामांची मधुर मनोहर मूर्ती पाहून विदेही राजा जनक हेसुद्धा (वेगळ्या अर्थाने) विदेही (देहभानरहित) झाले.॥ ४॥