४५ अहिल्या-उद्धार

मूल (चौपाई)

आश्रम एक दीख मग माहीं।
खग मृग जीव जंतु तहँ नाहीं॥
पूछा मुनिहि सिला प्रभु देखी।
सकल कथा मुनि कहा बिसेषी॥

अनुवाद (हिन्दी)

वाटेत एक आश्रम दिसला. तेथे पशु-पक्षी, इतकेच काय कोणताही प्राणी नव्हता. तेथे एक शिळा पाहून प्रभूंनी विचारले, तेव्हा मुनींनी सविस्तर गोष्ट सांगितली.॥ ६॥

दोहा

मूल (दोहा)

गौतम नारि श्राप बस उपल देह धरि धीर।
चरन कमल रज चाहति कृपा करहु रघुबीर॥ २१०॥

अनुवाद (हिन्दी)

‘गौतम मुनींची पत्नी अहिल्या ही शापामुळे पाषाणाच्या रूपात राहून मोठॺा धैर्याने तुमच्या पदधूळीची कामना करीत आहे. हे रघुवीर, हिच्यावर कृपा करा.’॥ २१०॥

छंद

मूल (दोहा)

परसत पद पावन सोक नसावन प्रगट भई तपपुंज सही।
देखत रघुनायक जन सुखदायक सनमुख होइ कर जोरि रही॥
अति प्रेम अधीरा पुलक सरीरा मुख नहिं आवइ बचन कही।
अतिसय बड़भागी चरनन्हि लागी जुगल नयन जलधार बही॥ १॥

अनुवाद (हिन्दी)

श्रीरामांच्या पवित्र व शोकहारक चरणांचा स्पर्श होताच खरोखरच ती तपोमूर्ती अहल्या प्रकट झाली. भक्तांना सुख देणाऱ्या श्रीरामांना पाहताच ती उठून हातजोडून उभी राहिली. अत्यंत प्रभु-प्रेमामुळे ती अधीर झाली होती. तिचे शरीर पुलकित झाले. मुखातून शब्द फुटत नव्हता. अत्यंत भाग्यशालिनी अहल्येने प्रभूंच्या चरणांना कवटाळले. तिच्या दोन्ही नेत्रांतून (प्रेम व आनंदाच्या अश्रूंच्या) जल-धारा वाहू लागल्या.॥ १॥

मूल (दोहा)

धीरजु मन कीन्हा प्रभु कहुँ चीन्हा रघुपति कृपाँ भगति पाई।
अति निर्मल बानी अस्तुति ठानी ग्यानगम्य जय रघुराई॥
मैं नारि अपावन प्रभु जग पावन रावन रिपु जन सुखदाई।
राजीव बिलोचन भव भय मोचन पाहि पाहि सरनहिं आई॥ २॥

अनुवाद (हिन्दी)

नंतर तिने धीर धरून प्रभूंना ओळखले आणि श्रीरघुनाथांच्या कृपेने भक्ती प्राप्त केली. मग ती अत्यंत निर्मळ वाणीने त्यांची स्तुती करू लागली, ‘हे ज्ञानाने जाणण्याजोगे असणाऱ्या श्रीरघुनाथा, तुमचा विजय असो. मी स्वभावतःच अपवित्र स्त्री आहे. आणि हे प्रभो, तुम्ही जगाला पवित्र करणारे, भक्तांना सुख देणारे आणि रावणाचे शत्रू आहात. हे कमलनयन, हे जन्म-मृत्यूच्या भयापासूनमुक्त करणारे, मी तुम्हांला शरण आलेली आहे. माझे रक्षण करा, रक्षण करा.॥ २॥

मूल (दोहा)

मुनि श्राप जो दीन्हा अति भल कीन्हा परम अनुग्रह मैं माना।
देखेउँ भरि लोचन हरि भवमोचन इहइ लाभ संकर जाना॥
बिनती प्रभु मोरी मैं मति भोरी नाथ न मागउँ बर आना।
पद कमल परागा रस अनुरागा मम मन मधुप करै पाना॥ ३॥

अनुवाद (हिन्दी)

(गौतम) मुनींनी मला शाप दिला, ते चांगलेच झाले. मी त्यामुळे संसारातून मुक्त करणाऱ्या श्रीहरींना (तुम्हांला) डोळे भरून पाहू शकले, हा मी त्यांचा उपकारच मानते. या तुमच्या दर्शनास भगवान शंकर हे सर्वांत मोठा लाभ मानतात. हे प्रभो, मी भोळ्या बुद्धीची आहे. माझी एक विनंती आहे. हे नाथ, मी दुसरा कोणताही वर मागत नाही, माझा मनरूपी भ्रमर आपल्या चरणकमलरजाच्या प्रेमरूपी रसाचे सदा पान करीत राहो, एवढीच माझी इच्छा आहे.॥ ३॥

मूल (दोहा)

जेहिं पद सुरसरिता परम पुनीता प्रगट भई सिव सीस धरी।
सोई पद पंकज जेहि पूजत अज मम सिर धरेउ कृपाल हरी॥
एहि भाँति सिधारी गौतम नारी बार बार हरि चरन परी।
जो अति मन भावा सो बरु पावा गै पतिलोक अनंद भरी॥ ४॥

अनुवाद (हिन्दी)

ज्या चरणांतून परमपवित्र देवनदी गंगा प्रकट झाली, जिला शिवशंकरांनी आपल्या शिरावर धारण केले आणि ज्या चरणकमलांची पूजा ब्रह्मदेव करतात, तेच चरण हे कृपाळू श्रीहरी, तुम्ही माझ्याशिरावर ठेवले.’ अशाप्रकारे ती स्तुती करीत वारंवार भगवंतांच्या चरणांवर लोटांगण घालीत होती. मनाला जो फार आवडत होता, तो वर मिळाल्याने गौतमपत्नी अहिल्या आनंदाने पतिलोकी निघून गेली.॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

अस प्रभु दीनबंधु हरि कारन रहित दयाल।
तुलसिदास सठ तेहि भजु छाड़ि कपट जंजाल॥ २११॥

अनुवाद (हिन्दी)

प्रभू श्रीराम हे असे दीनबंधू आणि अकारण दया करणारे आहेत. तुलसीदास म्हणतात, हे लबाड मना, तू कपट सोडून त्यांचेच भजन कर.॥ २११॥