४४ विश्वामित्रांच्या यज्ञाचे रक्षण

दोहा

मूल (दोहा)

आयुध सर्ब समर्पि कै प्रभु निज आश्रम आनि।
कंद मूल फल भोजन दीन्ह भगति हित जानि॥ २०९॥

अनुवाद (हिन्दी)

सर्व शस्त्रास्त्रे प्रभूंना देऊन मुनी त्यांना आश्रमात घेऊन आले आणि त्यांना आपले हितकर्ते मानून भक्तिपूर्वक कंदमुळे आणि फळांचा आहार दिला.॥ २०९॥

मूल (चौपाई)

प्रात कहा मुनि सन रघुराई।
निर्भय जग्य करहु तुम्ह जाई॥
होम करन लागे मुनि झारी।
आपु रहे मख कीं रखवारी॥

अनुवाद (हिन्दी)

प्रातःकाळी श्रीरघुनाथांनी मुनींना म्हटले, ‘तुम्ही निर्भयपणाने यज्ञ करा.’ हे ऐकून सर्व मुनी हवन करू लागले. श्रीराम स्वतः यज्ञाचे रक्षण करण्यास उभे राहिले.॥ १॥

मूल (चौपाई)

सुनि मारीच निसाचर क्रोही।
लै सहाय धावा मुनिद्रोही॥
बिनु फर बान राम तेहि मारा।
सत जोजन गा सागर पारा॥

अनुवाद (हिन्दी)

ही वार्ता समजताच मुनींचा शत्रू असलेला मारीच राक्षस चिडून आपल्या सोबत्यांना घेऊन धावून आला. श्रीरामांनी फाळ नसलेला बाण त्याला मारला, त्यासरशी तो शंभर योजने विस्तार असलेल्या समुद्रापलीकडे जाऊन पडला.॥ २॥

मूल (चौपाई)

पावक सर सुबाहु पुनि मारा।
अनुज निसाचर कटकु सँघारा॥
मारि असुर द्विज निर्भयकारी।
अस्तुति करहिं देव मुनि झारी॥

अनुवाद (हिन्दी)

नंतर त्यांनी सुबाहूला अग्निबाण मारला. इकडे लक्ष्मणाने राक्षसांच्या सेनेचा संहार केला. अशा रीतीने श्रीरामांनी राक्षसांना मारून ब्राह्मणांना निर्भय केले. तेव्हा सर्व देव आणि मुनी त्यांची स्तुती करू लागले.॥ ३॥

मूल (चौपाई)

तहँ पुनि कछुक दिवस रघुराया।
रहे कीन्हि बिप्रन्ह पर दाया॥
भगति हेतु बहु कथा पुराना।
कहे बिप्र जद्यपि प्रभु जाना॥

अनुवाद (हिन्दी)

श्रीरघुनाथांनी तेथे काही दिवस आणखी राहून ब्राह्मणांवर कृपा केली. त्यांनी मोठॺा भक्ति-भावाने श्रीरामांना पुराणातील बऱ्याच कथा सांगितल्या. वास्तविक त्या सर्व श्रीरामांना माहित होत्या.॥ ४॥

मूल (चौपाई)

तब मुनि सादर कहा बुझाई।
चरित एक प्रभु देखिअ जाई॥
धनुषजग्य सुनि रघुकुल नाथा।
हरषि चले मुनिबर के साथा॥

अनुवाद (हिन्दी)

नंतर मुनींनी आदराने श्रीरामांना समजावून सांगितले की, ‘हे प्रभो, माझ्याबरोबर येऊन एक कौतुक बघा.’ रघुकुलाचे स्वामी श्रीरामचंद्र धनुष्ययज्ञाची वार्ता ऐकून मुनिश्रेष्ठ विश्वामित्रांबरोबर आनंदाने निघाले.॥ ५॥