४३ विश्वामित्रांचे राम-लक्ष्मणांना नेणे

दोहा

मूल (दोहा)

ब्यापक अकल अनीह अज निर्गुन नाम न रूप।
भगत हेतु नाना बिधि करत चरित्र अनूप॥ २०५॥

अनुवाद (हिन्दी)

जे व्यापक, अखंड, इच्छारहित, अजन्मा व निर्गुण आहेत, तसेच ज्यांना नाव नाही, रूप नाही, तेच भगवान भक्तांसाठी नाना प्रकारच्या अलौकिक लीला करीत असत॥ २०५॥

मूल (चौपाई)

यह सब चरित कहा मैं गाई।
आगिलि कथा सुनहु मन लाई॥
बिस्वामित्र महामुनि ग्यानी।
बसहिं बिपिन सुभ आश्रम जानी॥

अनुवाद (हिन्दी)

हे सर्व चरित्र मी वर्णन करून सांगितले. आता पुढील कथा लक्ष देऊन ऐका. ज्ञानी महामुनी विश्वामित्र वनामध्ये पवित्र स्थानी आश्रम करून रहात होते.॥ १॥

मूल (चौपाई)

जहँ जप जग्य जोग मुनि करहीं।
अति मारीच सुबाहुहि डरहीं॥
देखत जग्य निसाचर धावहिं।
करहिं उपद्रव मुनि दुख पावहिं॥

अनुवाद (हिन्दी)

तेथे ते जप, यज्ञ आणि योगसाधना करीत असत. परंतु मारीच व सुबाहू राक्षस यांना ते फार घाबरत असत. यज्ञ पाहताच राक्षस धावून येत व उपद्रव करत असत. त्यामुळे मुनींना फार त्रास होई.॥ २॥

मूल (चौपाई)

गाधितनय मन चिंता ब्यापी।
हरि बिनु मरहिं न निसिचर पापी॥
तब मुनिबर मन कीन्ह बिचारा।
प्रभु अवतरेउ हरन महि भारा॥

अनुवाद (हिन्दी)

गाधी-पुत्र विश्वामित्रांच्या मनात काळजी वाटत होती. हे पापी राक्षस भगवंतांशिवाय कुणाकडूनही मारले जाणार नाहीत. तेव्हा श्रेष्ठ मुनींनी मनात विचार केला की, प्रभूंनी पृथ्वीचा भार हरण करण्यासाठी अवतार घेतला आहे.॥ ३॥

मूल (चौपाई)

एहूँ मिस देखौं पद जाई।
करि बिनती आनौं दोउ भाई॥
ग्यान बिराग सकल गुन अयना।
सो प्रभु मैं देखब भरि नयना॥

अनुवाद (हिन्दी)

तेव्हा या निमित्ताने जाऊन मी प्रभूंच्या चरणांचे दर्शन घेईन आणि विनंती करून दोन्ही भावांना येथे घेऊन येईन. अहाहा, जे ज्ञान, वैराग्य आणि सर्व गुणांचे धाम आहेत, त्या प्रभूंना मी डोळेभरून पाहीन.॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

बहुबिधि करत मनोरथ जात लागि नहिं बार।
करि मज्जन सरऊ जल गए भूप दरबार॥ २०६॥

अनुवाद (हिन्दी)

अशा प्रकारचे अनेक मनोरथ करीत त्यांना जाण्यास वेळ लागला नाही. शरयू नदीच्या जलामध्ये स्नान करून ते दशरथ राजांच्या दरबारात पोहोचले.॥ २०६॥

मूल (चौपाई)

मुनि आगमन सुना जब राजा।
मिलन गयउ लै बिप्र समाजा॥
करि दंडवत मुनिहि सनमानी।
निज आसन बैठारेन्हि आनी॥

अनुवाद (हिन्दी)

राजांनी जेव्हा मुनींच्या आगमनाची वार्ता ऐकली, तेव्हा ते ब्राह्मण वृंदाला सोबत घेऊन त्यांना भेटण्यास गेले आणि दंडवत घालून मुनींचा सन्मान करीत त्यांना आणून त्यांनी आसनावर बसविले.॥ १॥

मूल (चौपाई)

चरन पखारि कीन्हि अति पूजा।
मो सम आजु धन्य नहिं दूजा॥
बिबिध भाँति भोजन करवावा।
मुनिबर हृदयँ हरष अति पावा॥

अनुवाद (हिन्दी)

राजांनी त्यांचे चरण प्रक्षालन करून त्यांची चांगल्या प्रकारे पूजा केली आणि म्हटले, ‘माझ्यासारखा धन्य आज दुसरा कोणीही नाही.’ नंतर त्यांना अनेक प्रकारचे भोजन वाढले. त्यामुळे श्रेष्ठ मुनींच्या मनाला खूप संतोष झाला.॥ २॥

मूल (चौपाई)

पुनि चरननि मेले सुत चारी।
राम देखि मुनि देह बिसारी॥
भए मगन देखत मुख सोभा।
जनु चकोर पूरन ससि लोभा॥

अनुवाद (हिन्दी)

नंतर राजांनी चारी पुत्रांना मुनींच्या चरणांवर घातले. श्रीरामचंद्रांना पाहून मुनींचे देहभान हरपले. ते श्रीरामांच्या मुखाची शोभा पाहताच असे गुंग होऊन गेले की, जणू चकोर पूर्ण चंद्रमा पाहून मोहून जातो.॥ ३॥

मूल (चौपाई)

तब मन हरषि बचन कह राऊ।
मुनि अस कृपा न कीन्हिहु काऊ॥
केहि कारन आगमन तुम्हारा।
कहहु सो करत न लावउँ बारा॥

अनुवाद (हिन्दी)

तेव्हा राजांनी आनंदाने म्हटले, ‘हे मुनी, अशाप्रकारे (दर्शन देण्याची) कृपा तुम्ही कधी केली नाही. आज तुमचे कशासाठी शुभागमन झाले आहे? सांगा, ते पूर्ण करण्यास मी वेळ लावणार नाही.’॥ ४॥

मूल (चौपाई)

असुर समूह सतावहिं मोही।
मैं जाचन आयउँ नृप तोही॥
अनुज समेत देहु रघुनाथा।
निसिचर बध मैं होब सनाथा॥

अनुवाद (हिन्दी)

(मुनी म्हणाले,) ‘हे राजा, राक्षसांचे समुदाय मला फार त्रास देतात.यासाठी मी तुमच्याकडे काही मागण्यास आलो आहे. धाकटॺा भावासह श्रीरघुनाथांना माझ्याकडे सोपवा. राक्षस मारले गेल्यावर मी सुरक्षित होईन.॥ ५॥

दोहा

मूल (दोहा)

देहु भूप मन हरषित तजहु मोह अग्यान।
धर्म सुजस प्रभु तुम्ह कौं इन्ह कहँ अति कल्यान॥ २०७॥

अनुवाद (हिन्दी)

हे राजा, प्रसन्न मनाने यांना तुम्ही द्या. मोह व अज्ञान सोडून द्या. हे स्वामी, यामुळे तुम्हांला धर्म व सुकीर्ती प्राप्त होईल आणि यांचेही परम कल्याण होईल.’॥ २०७॥

मूल (चौपाई)

सुनि राजा अति अप्रिय बानी।
हृदय कंप मुख दुति कुमुलानी॥
चौथेंपन पायउँ सुत चारी।
बिप्र बचन नहिं कहेहु बिचारी॥

अनुवाद (हिन्दी)

हे अत्यंत अप्रिय असे बोलणे ऐकून राजांचे मन थरारले. त्यांचा चेहरा उतरला. (ते म्हणाले,) ‘हे मुने! म्हातारपणी मला चार पुत्र मिळाले आहेत. तुम्ही विचार करून बोलला नाहीत.॥ १॥

मूल (चौपाई)

मागहु भूमि धेनु धन कोसा।
सर्बस देउँ आजु सहरोसा॥
देह प्रान तें प्रिय कछु नाहीं।
सोउ मुनि देउँ निमिष एक माहीं॥

अनुवाद (हिन्दी)

हे मुनी, तुम्ही पृथ्वी, गाई, धन, खजिना यांपैकी काहीही मागा. मी मोठॺा आनंदाने आपले सर्वस्व अर्पण करीन. देह आणि प्राण यांच्यापेक्षा काहीही अधिक प्रिय नसते. मी तेही एका क्षणात देईन.॥ २॥

मूल (चौपाई)

सब सुत प्रिय मोहि प्रान कि नाईं।
राम देत नहिं बनइ गोसाईं॥
कहँ निसिचर अति घोर कठोरा।
कहँ सुंदर सुत परम किसोरा॥

अनुवाद (हिन्दी)

सर्व पुत्र मला प्राणांप्रमाणे प्रिय आहेत, त्यातही हे प्रभो, रामाला तर (कोणत्याही परिस्थितीत) देता येत नाही. अत्यंत भयानक राक्षस कुठे व अत्यंत किशोर अवस्थेतील (सुकुमार) माझे सुंदर पुत्र कुठे?’॥ ३॥

मूल (चौपाई)

सुनि नृप गिरा प्रेम रस सानी।
हृदयँ हरष माना मुनि ग्यानी॥
तब बसिष्ठ बहुबिधि समुझावा।
नृप संदेह नास कहँ पावा॥

अनुवाद (हिन्दी)

राजांची ही प्रेमपूर्ण वाणी ऐकून ज्ञानी मुनी विश्वामित्रांना फार आनंद वाटला. जेव्हा वसिष्ठांनी राजांना पुष्कळ प्रकारे समजावले, तेव्हा त्यांच्या मनातील संदेह दूर झाला.॥ ४॥

मूल (चौपाई)

अति आदर दोउ तनय बोलाए।
हृदयँ लाइ बहु भाँति सिखाए॥
मेरे प्रान नाथ सुत दोऊ।
तुम्ह मुनि पिता आन नहिं कोऊ॥

अनुवाद (हिन्दी)

राजा दशरथांनी मोठॺा आदराने दोन्ही पुत्रांना बोलाविले आणि त्यांना हृदयाशी धरून अनेक प्रकारे उपदेश केला. (आणि विश्वामित्रांना म्हटले,) ‘हे नाथ, हे दोन्ही पुत्र माझे प्राण आहेत. हे मुनी, (आता) तुम्हीच यांचे वडील आहात. दुसरे कोणी नाही.’॥ ५॥

दोहा

मूल (दोहा)

सौंपे भूप रिषिहि सुत बहुबिधि देइ असीस।
जननी भवन गए प्रभु चले नाइ पद सीस॥ २०८(क)॥

अनुवाद (हिन्दी)

राजांनी अनेक आशीर्वाद देऊन पुत्रांना ऋषींच्या हवाली केले. मग प्रभू मातेच्या महालात गेले आणि तिच्या पाया पडून निघाले.॥ २०८(क)॥

सोरठा

मूल (दोहा)

पुरुषसिंह दोउ बीर हरषि चले मुनि भय हरन।
कृपासिंधु मतिधीर अखिल बिस्व कारन करन॥ २०८(ख)॥

अनुवाद (हिन्दी)

ते पुरुष-सिंह दोघे भाऊ (राम व लक्ष्मण) मुनींचे भय दूर करण्यासाठी आनंदाने निघाले. ते कृपासागर, धीरबुद्धी आणि संपूर्ण विश्वाच्या कारणाचेही कारण होते.॥ २०८(ख)॥

मूल (चौपाई)

अरुन नयन उर बाहु बिसाला।
नील जलज तनु स्याम तमाला॥
कटि पट पीत कसें बर भाथा।
रुचिर चाप सायक दुहुँ हाथा॥

अनुवाद (हिन्दी)

भगवान रामांचे नेत्र कमळासारखे लालसर होते, विशाल छाती आणि आजानुबाहू होते. नीलकमल आणि तमाल वृक्षासारखे श्यामल शरीर होते, कटीला पीतांबर नेसलेले आणि सुंदर भाते बांधलेले होते. दोन्ही हातांमध्ये सुंदर धनुष्य व बाण होते.॥ १॥

मूल (चौपाई)

स्याम गौर सुंदर दोउ भाई।
बिस्वामित्र महानिधि पाई॥
प्रभु ब्रह्मन्यदेव मैं जाना।
मोहि निति पिता तजेउ भगवाना॥

अनुवाद (हिन्दी)

श्याम व गौर वर्णाचे दोन्ही भाऊ परम सुंदर होते. विश्वामित्रांना (त्यांच्या रूपाने) जणू मोठा निधी मिळाला होता. (ते विचार करू लागले,) प्रभू हे ब्राह्मणांचे भक्त आहेत, हे मला समजले. माझ्यासाठी भगवंतांनी आपल्या पित्यालाही सोडले.॥ २॥

मूल (चौपाई)

चले जात मुनि दीन्हि देखाई।
सुनि ताड़का क्रोध करि धाई॥
एकहिं बान प्रान हरि लीन्हा।
दीन जानि तेहि निज पद दीन्हा॥

अनुवाद (हिन्दी)

वाटेत जाताना मुनींनी ताडका दाखविली. शब्द ऐकताच ती रागाने धावून आली. श्रीरामांनी एकाच बाणात तिला ठार मारले व तिला शरणागत मानून निजपद (आपले दिव्य स्वरूप) दिले.॥ ३॥

मूल (चौपाई)

तब रिषि निज नाथहि जियँ चीन्ही।
बिद्यानिधि कहुँ बिद्या दीन्ही॥
जाते लाग न छुधा पिपासा।
अतुलित बल तनु तेज प्रकासा॥

अनुवाद (हिन्दी)

मग विश्वामित्र ऋषींनी प्रभूंना ते विद्येचे भांडार असल्याचे जाणूनही (लीला पूर्ण करण्यासाठी) अशी विद्या दिली की, ज्यामुळे त्यांना तहान-भूक लागणार नाही आणि त्यांच्या शरीरात अतुल बळ व तेज प्रकाशित होईल.॥ ४॥