४२ श्रीभगवंतांची बाल-लीला

दोहा

मूल (दोहा)

जोग लगन ग्रह बार तिथि सकल भए अनुकूल।
चर अरु अचर हर्षजुत राम जनम सुखमूल॥ १९०॥

अनुवाद (हिन्दी)

योग, लग्न, ग्रह, वार आणि तिथी सर्वच अनुकूल बनले. सर्व चराचर आनंदाने भरून गेले. कारण श्रीरामांचा जन्म सुखाचे मूळ आहे.॥ १९०॥

मूल (चौपाई)

नौमी तिथि मधु मास पुनीता।
सकल पच्छ अभिजित हरिप्रीता॥
मध्य दिवस अति सीत न घामा।
पावन काल लोक बिश्रामा॥

अनुवाद (हिन्दी)

चैत्राचा पवित्र महिना होता, नवमी तिथी होती. शुक्लपक्ष आणि भगवंताचा प्रिय अभिजित मुहूर्त होता. दुपारची वेळ होती. फार थंडी नव्हती आणि फार ऊनही नव्हते. ती पवित्र वेळ सर्व लोकांना शांतता देणारी होती.॥ १॥

मूल (चौपाई)

सीतल मंद सुरभि बह बाऊ।
हरषित सुर संतन मन चाऊ॥
बन कुसुमित गिरिगन मनिआरा।
स्रवहिं सकल सरिताऽमृतधारा॥

अनुवाद (हिन्दी)

शीतल, मंद आणि सुगंधित वारा वाहात होता. देव आनंदित होते आणि संतांच्या मनामध्ये मोठा उत्साह भरला होता. वने फुललेली होती. पर्वतांचे समुदाय रत्नांनी चमचमत होते. सर्व नद्यांतून अमृताच्या धारा वाहात होत्या.॥ २॥

मूल (चौपाई)

सो अवसर बिरंचि जब जाना।
चले सकल सुर साजि बिमाना॥
गगन बिमल संकुल सुर जूथा।
गावहिं गुन गंधर्ब बरूथा॥

अनुवाद (हिन्दी)

जेव्हा ब्रह्मदेवांनी ती (भगवंतांच्या प्रकट होण्याची) वेळ जाणली, तेव्हा (त्यांच्यासह) सर्व देव विमाने सजवून निघाले. आकाश देवांच्या समुदायाने भरून गेले. गंधर्वांचे समूह गुणगान करू लागले॥ ३॥

मूल (चौपाई)

बरषहिं सुमन सुअंजुलि साजी।
गहगहि गगन दुंदुभी बाजी॥
अस्तुति करहिं नाग मुनि देवा।
बहुबिधि लावहिं निज निज सेवा॥

अनुवाद (हिन्दी)

आणि ओंजळीमध्ये सुंदर फुले भरून पुष्पांचा वर्षाव करू लागले. आकाशात नगारे दुमदुमू लागले. नाग, मुनी आणि देव स्तुती करू लागले आणि अनेक प्रकारे आपापल्या सेवा अर्पण करू लागले.॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

सुर समूह बिनती करि पहुँचे निज निज धाम।
जगनिवास प्रभु प्रगटे अखिल लोक बिश्राम॥ १९१॥

अनुवाद (हिन्दी)

सर्व लोकांना शांतता देणारे, जगदाधार प्रभू प्रगट झाले. देवांचे समुदाय प्रार्थना करून आपापल्या लोकांमध्ये गेले.॥ १९१॥

छंद

मूल (दोहा)

भए प्रगट कृपाला दीनदयाला कौसल्या हितकारी।
हरषित महतारी मुनि मन हारी अद्भुत रूप बिचारी॥
लोचन अभिरामा तनु घनस्यामा निज आयुध भुज चारी।
भूषन बनमाला नयन बिसाला सोभासिंधु खरारी॥ १॥

अनुवाद (हिन्दी)

दीनांच्यावर दया करणारे, कौसल्येचे हितकारी कृपाळू प्रभू प्रकट झाले. मुनींचे मन हरण करणारे, त्यांचे अद्भुत रूप पाहून माता आनंदून गेली. नेत्रांना सुख देणारे मेघांसारखे त्यांचे सावळे शरीर होते. चारी हातांमध्ये आपली वैशिष्टॺपूर्ण आयुधे होती. विशाल नेत्र होते. अशा प्रकारे सौंदर्याचे सागर भगवान श्रीराम प्रकट झाले.॥ १॥

मूल (दोहा)

कह दुइ कर जोरी अस्तुति तोरी केहि बिधि करौं अनंता।
माया गुन ग्यानातीत अमाना बेद पुरान भनंता॥
करुना सुख सागर सब गुन आगर जेहि गावहिं श्रुति संता।
सो मम हित लागी जन अनुरागी भयउ प्रगट श्रीकंता॥ २॥

अनुवाद (हिन्दी)

दोन्ही हात जोडून माता कौसल्या म्हणू लागली, ‘हे अनंता, मी तुमची स्तुती कशी करू? वेद आणि पुराणे म्हणतात की माया, गुण आणि ज्ञान यांच्या पलीकडील आणि परिमाणरहित तुम्ही आहात. श्रुती आणि संतजन ज्यांचे दया आणि सुखाचे सागर, सर्व गुणांचे धाम म्हणून गायन करतात, तेच भक्तांवर प्रेम करणारे लक्ष्मीपती भगवान माझ्या कल्याणासाठी प्रकट झाले आहेत.॥ २॥

मूल (दोहा)

ब्रह्मांड निकाया निर्मित माया रोम रोम प्रति बेद कहै।
मम उर सो बासी यह उपहासी सुनत धीर मति थिर न रहै॥
उपजा जब ग्याना प्रभु मुसुकाना चरित बहुत बिधि कीन्ह चहै।
कहि कथा सुहाई मातु बुझाई जेहि प्रकार सुत प्रेम लहै॥ ३॥

अनुवाद (हिन्दी)

वेद म्हणतात की, तुमच्या प्रत्येक रोमामध्ये मायेने रचलेले ब्रह्मांडाचे समूह भरलेले आहेत. तुम्ही माझ्या उदरात राहिलात, ही हसण्यावारी नेण्याजोगी गोष्ट ऐकून विवेकी पुरुषांची बुद्धीसुद्धा अचंबित होते. जेव्हा मातेला ज्ञान झाले, तेव्हा भगवंतांनी स्मित हास्य केले. त्यांना बऱ्याचलीला करावयाच्या होत्या. म्हणून त्यांनी (पूर्व जन्मीच्या) सुंदर कथा सांगून मातेला समजावले. ज्यामुळे तिला आपल्याविषयी पुत्रप्रेम वाटावे.॥ ३॥

मूल (दोहा)

माता पुनि बोली सो मति डोली तजहु तात यह रूपा।
कीजै सिसुलीला अति प्रियसीला यह सुख परम अनूपा॥
सुनि बचन सुजाना रोदन ठाना होइ बालक सुरभूपा।
यह चरित जे गावहिं हरिपद पावहिं ते न परहिं भवकूपा॥ ४॥

अनुवाद (हिन्दी)

त्याबरोबर मातेची ती (ज्ञान) बुद्धी बदलली. ती म्हणाली, ‘हे रूप सोडून आईला आवडणारी बाललीला कर? (माझ्यासाठी) ते सुख परम अनुपमेय ठरेल.’ मातेचे हे वचन ऐकताच देवाधिदेव ज्ञानस्वरूप भगवंतांनी बालरूप धारण करून रुदन सुरू केले. (तुलसीदास म्हणतात,) जे या चरित्राचे गायन करतात, त्यांना श्रीहरींचे परमपद लाभते आणि मग ते संसाररूपी अंधकूपात पडत नाहीत.॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

बिप्र धेनु सुर संत हित लीन्ह मनुज अवतार।
निज इच्छा निर्मित तनु माया गुन गो पार॥ १९२॥

अनुवाद (हिन्दी)

भगवंतांनी ब्राह्मण, गाई, देव आणि संत यांच्यासाठी मनुष्याचा अवतार घेतला. ते (अज्ञानमय, मलिन) माया आणि तिचे गुण(सत्त्व, रज, तम) आणि (बाह्य व आंतरिक) इंद्रियांच्या पलीकडील आहेत. त्यांचे (दिव्य) शरीर हे स्वेच्छेनेच बनले आहे. (कोणत्याहीकर्मबंधनामुळे परवश होऊन त्रिगुणात्मक भौतिक पदार्थांनी बनलेले नाही.)॥ १९२॥

मूल (चौपाई)

सुनि सिसु रुदन परम प्रिय बानी।
संभ्रम चलि आईं सब रानी॥
हरषित जहँ तहँ धाईं दासी।
आनँद मगन सकल पुरबासी॥

अनुवाद (हिन्दी)

मुलाच्या रडण्याचा आनंददायी आवाज ऐकून सर्व राण्यांनी उतावीळ होऊन धाव घेतली. दासी आनंदाने इकडे-तिकडे धावू लागल्या. सर्व पुरवासी आनंदात बुडून गेले.॥ १॥

मूल (चौपाई)

दसरथ पुत्रजन्म सुनि काना।
मानहुँ ब्रह्मानंद समाना॥
परम प्रेम मन पुलक सरीरा।
चाहत उठन करत मति धीरा॥

अनुवाद (हिन्दी)

राजा दशरथ पुत्र-जन्माची वार्ता ऐकून जणू ब्रह्मानंदात बुडाले. मनात अत्यंत प्रेम उचंबळून आले, शरीर पुलकित झाले. (आनंदाने अधीर झालेल्या) बुद्धीला मोठॺा धैर्याने स्थिर करून (प्रेमाने विव्हळ झालेले शरीर सावरत) ते उठण्याचा प्रयत्न करू लागले.॥ २॥

मूल (चौपाई)

जाकर नाम सुनत सुभ होई।
मोरें गृह आवा प्रभु सोई॥
परमानंद पूरि मन राजा।
कहा बोलाइ बजावहु बाजा॥

अनुवाद (हिन्दी)

ज्यांचे नाव फक्त श्रवण केल्याने कल्याण होते, तेच प्रभू माझ्या घरी आले आहेत, (असा विचार करून) राजाचे मन परमानंदाने भरून आले. त्यांनी वादकांना बोलावून म्हटले, ‘नगारे वाजवा. नगारे वाजवा.’॥ ३॥

मूल (चौपाई)

गुर बसिष्ठ कहँ गयउ हँकारा।
आए द्विजन सहित नृपद्वारा॥
अनुपम बालक देखेन्हि जाई।
रूप रासि गुन कहि न सिराई॥

अनुवाद (हिन्दी)

गुरू वसिष्ठांच्याकडे बोलावणे गेले. ते ब्राह्मणांना बरोबर घेऊन राजवाडॺात आले. त्यांनी जाऊन त्या अलौकिक बालकाला पाहिले. ते रूपाची खाण होते आणि त्याचे गुण सांगून संपणारे नव्हते.॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

नंदीमुख सराध करि जातकरम सब कीन्ह।
हाटक धेनु बसन मनि नृप बिप्रन्ह कहँ दीन्ह॥ १९३॥

अनुवाद (हिन्दी)

नंतर राजांनी नांदीमुख श्राद्ध करून जातकर्म-संस्कार इत्यादी सर्व केले आणि ब्राह्मणांना सुवर्ण, गाई, वस्त्रे आणि रत्नांचे दान केले.॥ १९३॥

मूल (चौपाई)

ध्वज पताक तोरन पुर छावा।
कहि न जाइ जेहि भाँति बनावा॥
सुमनबृष्टि अकास तें होई।
ब्रह्मानंद मगन सब लोई॥

अनुवाद (हिन्दी)

ध्वज, पताका आणि तोरणांनी नगर सजून गेले. ज्याप्रकारे ते सजविले होते, त्याचे वर्णन करणे अशक्य. आकाशातून फुलांचा वर्षाव होत होता, सर्व लोक ब्रह्मानंदात मग्न झाले होते.॥ १॥

मूल (चौपाई)

बृंद बृंद मिलि चलीं लोगाईं।
सहज सिंगार किएँ उठि धाईं॥
कनक कलस मंगल भरि थारा।
गावत पैठहिं भूप दुआरा॥

अनुवाद (हिन्दी)

स्त्रियांचे समूहच्या समूह निघाले. त्या स्वाभाविक शृंगार करूनच धावल्या. सोन्याचा कलश घेऊन आणि तबकांमध्ये मांगलिक द्रव्ये घेऊन त्यांनी गात-गात राजमहालात प्रवेश केला.॥ २॥

मूल (चौपाई)

करि आरति नेवछावरि करहीं।
बार बार सिसु चरनन्हि परहीं॥
मागध सूत बंदिगन गायक।
पावन गुन गावहिं रघुनायक॥

अनुवाद (हिन्दी)

त्यांनी आरती ओवाळून ओवाळण्या दिल्या आणि त्या वारंवार मुलाच्या पाया पडू लागल्या. मागध, सूत, बंदीजन आणि गवई रघुकुल स्वामींचे पवित्र गुणांचे गायन करू लागले.॥ ३॥

मूल (चौपाई)

सर्बस दान दीन्ह सब काहू।
जेहिं पावा राखा नहिं ताहू॥
मृगमद चंदन कुंकुम कीचा।
मची सकल बीथिन्ह बिच बीचा॥

अनुवाद (हिन्दी)

अयोध्येत सर्वजणांनी सर्वस्वाचे दान केले. ज्यांना ते मिळाले, त्यांनीही ते (आपल्याजवळ) ठेवले नाही. (लुटून टाकले.) (नगरातील) सर्व गल्‍ल्यांमध्ये कस्तुरी, चंदन आणि केशर यांचा जणू सडा पडला होता.॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

गृह गृह बाज बधाव सुभ प्रगटे सुषमा कंद।
हरषवंत सब जहँ तहँ नगर नारि नर बृंद॥ १९४॥

अनुवाद (हिन्दी)

घरोघरी मंगल वाद्ये गुंजू लागली. शोभेचा कंद असलेले भगवानप्रकट झाले होते. नगरातील स्त्री-पुरुषांच्या झुंडी सर्वत्र आनंदमग्न होत होत्या.॥ १९४॥

मूल (चौपाई)

कैकयसुता सुमित्रा दोऊ।
सुंदर सुत जनमत भैं ओऊ॥
वह सुख संपति समय समाजा।
कहि न सकइ सारद अहिराजा॥

अनुवाद (हिन्दी)

कैकेयी आणि सुमित्रा या दोघींनीही सुंदर मुलांना जन्म दिला. त्या प्रसंगीच्या सुख, संपत्ती, शुभवेळ आणि समाज यांचे वर्णन सरस्वती आणि सर्पराज शेषही करू शकणार नाहीत.॥ १॥

मूल (चौपाई)

अवधपुरी सोहइ एहि भाँती।
प्रभुहि मिलन आई जनु राती॥
देखि भानु जनु मन सकुचानी।
तदपि बनी संध्या अनुमानी॥

अनुवाद (हिन्दी)

अयोध्यापुरी अशी सुशोभित झाली होती की, रात्र ही जणू प्रभूंना भेटण्यासाठी आली होती आणि सूर्याला पाहून मनातून संकोच पावत होती, तरी पण मनात विचार करीत ती जणू संध्याकाळ बनून गेली होती.॥ २॥

मूल (चौपाई)

अगर धूप बहु जनु अँधिआरी।
उड़इ अबीर मनहुँ अरुनारी॥
मंदिर मनि समूह जनु तारा।
नृप गृह कलस सो इंदु उदारा॥

अनुवाद (हिन्दी)

अगुरु-धूपाचा इतका धूर पसरला की, जणू तो संध्याकाळचा अंधार वाटला आणि जो गुलाल उधळला जात होता तो तिचा लालिमा आहे. महालांवर जडविलेले रत्नांचे समूह जणू तारागण आहेत. राजमहालाचा जो (चमकणारा) कळस होता, तो जणू तेजस्वी चंद्रमा आहे.॥ ३॥

मूल (चौपाई)

भवन बेदधुनि अति मृदु बानी।
जनु खग मुखर समयँ जनु सानी॥
कौतुक देखि पतंग भुलाना।
एक मास तेइँ जात न जाना॥

अनुवाद (हिन्दी)

राजभवनात अत्यंत कोमल वाणीने जो वेदध्वनी होत होता, तो जणू पक्ष्यांचा समयोचित किलबिलाट होता. हे कौतुक पाहून सूर्यसुद्धा आपली गती विसरून गेला. एक महिना केव्हा गेला, हे सूर्याला कळलेच नाही. (अर्थात त्याचा एक महिना तेथेच गेला.)॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

मास दिवस कर दिवस भा मरम न जानइ कोइ।
रथ समेत रबि थाकेउ निसा कवन बिधि होइ॥ १९५॥

अनुवाद (हिन्दी)

एक महिन्याचा दीर्घ दिवस झाला. याचे रहस्य कुणालाच समजले नाही. सूर्य आपल्या रथासह तेथेच थांबला. मग रात्र कशी होणार?॥ १९५॥

मूल (चौपाई)

यह रहस्य काहूँ नहिं जाना।
दिनमनि चले करत गुनगाना॥
देखि महोत्सव सुर मुनि नागा।
चले भवन बरनत निज भागा॥

अनुवाद (हिन्दी)

हे रहस्य कुणालाच कळले नाही. सूर्यदेव (भगवान श्रीरामांचे) गुणगान करीत गेला. हा महोत्सव पाहून देव, मुनी आणि नाग आपल्या भाग्याची प्रशंसा करीत आपापल्या घरी गेले.॥ १॥

मूल (चौपाई)

औरउ एक कहउँ निज चोरी।
सुनु गिरिजा अति दृढ़ मति तोरी॥
काकभुसुंडि संग हम दोऊ।
मनुजरूप जानइ नहिं कोऊ॥

अनुवाद (हिन्दी)

हे पार्वती, तुझी बुद्धी (श्रीरामांच्या चरणी) पूर्ण रमलेली आहे. म्हणून मी आणखी एक गुपित तुला सांगतो ते ऐक. काकभुशुंडी आणि मी दोघेजण बरोबर होतो, परंतु आम्ही मनुष्यरूपात असल्यामुळे आम्हांस कोणी ओळखू शकले नाही.॥ २॥

मूल (चौपाई)

परमानंद प्रेम सुख फूले।
बीथिन्ह फिरहिं मगन मन भूले॥
यह सुभ चरित जान पै सोई।
कृपा राम कै जापर होई॥

अनुवाद (हिन्दी)

परम आनंद आणि प्रेम-सुखाने प्रफुल्लित झालेले आम्ही आनंदमग्न मनाने नगरीच्या गल्‍ल्यांमधून स्वतःला विसरून फिरत होतो. परंतु हे शुभचरित्र श्रीरामांची ज्याच्यावर कृपा असेल, तोच जाणू शकेल.॥ ३॥

मूल (चौपाई)

तेहि अवसर जो जेहि बिधि आवा।
दीन्ह भूप जो जेहि मन भावा॥
गज रथ तुरग हेम गो हीरा।
दीन्हे नृप नानाबिधि चीरा॥

अनुवाद (हिन्दी)

त्यावेळी जो जसा आला आणि ज्याला मनाला जे आवडले, ते राजांनी त्याला दिले. हत्ती, रथ, घोडे, सुवर्ण, गाई, हिरे आणि तऱ्हेतऱ्हेची वस्त्रे राजांनी वाटली.॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

मन संतोषे सबन्हि के जहँ तहँ देहिं असीस।
सकल तनय चिर जीवहुँ तुलसिदास के ईस॥ १९६॥

अनुवाद (हिन्दी)

राजांनी सर्वांना संतुष्ट केले. (त्यामुळे) सर्व लोक सर्वत्र आशीर्वाद देत होते की, तुलसीदासाचे स्वामी असलेले सर्व पुत्र चिरंजीव होवोत.॥ १९६॥

मूल (चौपाई)

कछुक दिवस बीते एहि भाँती।
जात न जानिअ दिन अरु राती॥
नामकरन कर अवसरु जानी।
भूप बोलि पठए मुनि ग्यानी॥

अनुवाद (हिन्दी)

अशाप्रकारे काही दिवस निघून गेले. दिवस-रात्र कसे जात होते, हेच कळत नव्हते. तेव्हा नामकरण-संस्काराची वेळ झाल्याचे पाहून राजांनी ज्ञानी मुनी वसिष्ठांना बोलावणे पाठविले.॥ १॥

मूल (चौपाई)

करि पूजा भूपति अस भाषा।
धरिअ नाम जो मुनि गुनि राखा॥
इन्ह के नाम अनेक अनूपा।
मैं नृप कहब स्वमति अनुरूपा॥

अनुवाद (हिन्दी)

मुनींची पूजा केल्यावर राजांनी सांगितले की, ‘हे मुनी, तुमच्या मनात जो विचार असेल, त्याप्रमाणे नावे ठेवा.’ (मुनी म्हणाले,) ‘हे राजा,यांची अनेक अनुपम नावे आहेत, तरीही मी आपल्या विचाराप्रमाणे सांगतो.॥ २॥

मूल (चौपाई)

जो आनंद सिंधु सुखरासी।
सीकर तें त्रैलोक सुपासी॥
सो सुखधाम राम अस नामा।
अखिल लोक दायक बिश्रामा॥

अनुवाद (हिन्दी)

हा जो आनंदाचा सागर व सुखाचे भांडार आहे, ज्याच्या (आनंद सिंधूच्या) एका कणाने तिन्ही लोक सुखी होतात, त्या (तुमच्या सर्वांत मोठॺा पुत्राचे) नाव ‘राम’ आहे, तो सुखाचे माहेर आणि संपूर्ण लोकांना शांती देणारा आहे.॥ ३॥

मूल (चौपाई)

बिस्व भरन पोषन कर जोई।
ताकर नाम भरत अस होई॥
जाके सुमिरन तें रिपु नासा।
नाम सत्रुहन बेद प्रकासा॥

अनुवाद (हिन्दी)

जो जगाचे भरण-पोषण करतो, त्या (तुमच्या दुसऱ्या) पुत्राचे नाव ‘भरत’ असेल. ज्याच्या स्मरणानेच शत्रूचा नाश होतो, त्याचे वेदांमध्ये प्रसिद्ध असलेले ‘शत्रुघ्न’ नाव आहे.’॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

लच्छन धाम राम प्रिय सकल जगत आधार।
गुरु बसिष्ट तेहि राखा लछिमन नाम उदार॥ १९७॥

अनुवाद (हिन्दी)

जो शुभ लक्षणांचे धाम आहे, श्रीरामांचा आवडता आहे आणि जगाचा आधार आहे, त्याचे गुरू वसिष्ठांनी ‘लक्ष्मण’ असे सुंदर नाव ठेवले.॥ १९७॥

मूल (चौपाई)

धरे नाम गुर हृदयँ बिचारी।
बेद तत्व नृप तव सुत चारी॥
मुनि धन जन सरबस सिव प्राना।
बाल केलि रस तेहिं सुख माना॥

अनुवाद (हिन्दी)

गुरूंनी विचारपूर्वक ही नावे ठेवली (आणि म्हटले) ‘हे राजा, तुमचे चारी पुत्र हे वेदाचे तत्त्वस्वरूप (प्रत्यक्ष परात्पर भगवान) आहेत. जे मुनिजनांचे धन, भक्तांचे सर्वस्व आणि श्रीशंकरांचे प्राण आहेत, ते (या प्रसंगी तुम्हा लोकांच्या प्रेमापोटी) बाललीलेमध्ये सुख मानत आहेत.’॥ १॥

मूल (चौपाई)

बारेहि ते निज हित पति जानी।
लछिमन राम चरन रति मानी॥
भरत सत्रुहन दूनउ भाई।
प्रभु सेवक जसि प्रीति बड़ाई॥

अनुवाद (हिन्दी)

लहानपणापासूनच श्रीरामांना आपले परम कल्याण करणारे स्वामी मानून लक्ष्मणाने त्यांच्या चरणी प्रेम केले. भरत व शत्रुघ्न या दोघाभावांमध्ये स्वामी-सेवकाच्या ज्या प्रेमाची प्रशंसा होते, तशी प्रीती होती.॥ २॥

मूल (चौपाई)

स्याम गौर सुंदर दोउ जोरी।
निरखहिं छबि जननीं तृन तोरी॥
चारिउ सील रूप गुन धामा।
तदपि अधिक सुखसागर रामा॥

अनुवाद (हिन्दी)

श्याम व गौर देहाच्या दोन्ही सुंदर जोडॺांचे लावण्य पाहून माता (त्यांना दृष्ट लागू नये म्हणून) मीठमोहऱ्या ओवाळून टाकत. तसे पाहाता चारीही पुत्र शील, रूप आणि गुणांचे निधान होते, तरीही सुख-सागर श्रीराम हे सर्वांत श्रेष्ठ होते.॥ ३॥

मूल (चौपाई)

हृदयँ अनुग्रह इंदु प्रकासा।
सूचत किरन मनोहर हासा॥
कबहुँ उछंग कबहुँ बर पलना।
मातु दुलारइ कहि प्रिय ललना॥

अनुवाद (हिन्दी)

त्यांच्या हृदयात कृपारूपी चंद्र प्रकाशित होता. मनाला मोहून टाकणारे त्यांचे हास्य त्या कृपारूपी चंद्राच्या किरणांचे द्योतक होते. कधी मांडीवर (घेऊन) तर कधी सुंदर पाळण्यात (घालून) माता ‘माझ्या लाडक्या’ म्हणून त्यांना झोकादेत होती.॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

ब्यापक ब्रह्म निरंजन निर्गुन बिगत बिनोद।
सो अज प्रेम भगति बस कौसल्या कें गोद॥ १९८॥

अनुवाद (हिन्दी)

जे सर्वव्यापक, निरंजन (मायारहित), निर्गुण, विनोदरहित आणि अजन्मा ब्रह्म आहे, तेच प्रेम आणि भक्तीला वश होऊन कौसल्येच्या मांडीवर खेळत होते.॥ १९८॥

मूल (चौपाई)

काम कोटि छबि स्याम सरीरा।
नील कंज बारिद गंभीरा॥
अरुन चरन पंकज नख जोती।
कमल दलन्हि बैठे जनु मोती॥

अनुवाद (हिन्दी)

त्यांच्या नील कमल किंवा पूर्ण (जल भरलेल्या) मेघासमान श्यामल शरीरामध्ये कोटॺवधी कामदेवांची शोभा आहे. लाल-लाल चरणकमलांच्या नखांची शुभ्र कांती लाल कमलांच्या पानांवर स्थिरावलेले जणू मोती वाटत होते.॥ १॥

मूल (चौपाई)

रेख कुलिस ध्वज अंकुस सोहे।
नूपुर धुनि सुनि मुनि मन मोहे॥
कटि किंकिनी उदर त्रय रेखा।
नाभि गभीर जान जेहिं देखा॥

अनुवाद (हिन्दी)

(चरणतळांवर) वज्र, ध्वजा आणि अंकुश यांची चिन्हे शोभत होती. पैंजणांचा ध्वनी ऐकून मुनींचेही मन मोहित होत होते. कमरेला करदोडा आणि उदरावर तीन वळ्या होत्या. नाभीची गंभीरता ज्यांनी पाहिली आहे, तेच ती जाणत.॥ २॥

मूल (चौपाई)

भुज बिसाल भूषन जुत भूरी।
हियँ हरि नख अति सोभा रूरी॥
उर मनिहार पदिक की सोभा।
बिप्र चरन देखत मन लोभा॥

अनुवाद (हिन्दी)

अनेक आभूषणांनी सुशोभित झालेल्या भुजा होत्या. हृदयावर रुळणाऱ्या वाघनखांची छटा तर आगळीच होती. छातीवर रत्नजडित हारांची शोभा विलसत असे आणि (भृगूंचे) चरणचिन्ह पाहून मन लोभून जाई.॥ ३॥

मूल (चौपाई)

कंबु कंठ अति चिबुक सुहाई।
आनन अमित मदन छबि छाई॥
दुइ दुइ दसन अधर अरुनारे।
नासा तिलक को बरनै पारे॥

अनुवाद (हिन्दी)

कंठ शंखाप्रमाणे (चढ-उताराचा तीन रेखांनी शोभित) होता. हनुवटी सुरेख होती. मुखावर असंख्य कामदेवांचे सौंदर्य पसरलेले होते. दोन-दोन सुंदर कोवळे दात आणि लाल चुटूक ओठ होते. नाक व भालप्रदेशावरील तिलकाच्या (सौंदर्याचे) तर वर्णन कोण करू शकेल?॥ ४॥

मूल (चौपाई)

सुंदर श्रवन सुचारु कपोला।
अति प्रिय मधुर तोतरे बोला॥
चिक्कन कच कुंचित गभुआरे।
बहु प्रकार रचि मातु सँवारे॥

अनुवाद (हिन्दी)

त्यांचे कान व गाल फारच सुंदर होते. बोबडे बोल तर मनाला मोहवीत. जन्मापासूनच असलेले कुरळे काळेभोर केस आई वारंवार विंचरीत असे.॥ ५॥

मूल (चौपाई)

पीत झगुलिआ तनु पहिराई।
जानु पानि बिचरनि मोहि भाई॥
रूपसकहिं नहिं कहि श्रुति सेषा।
सो जानइ सपनेहुँ जेहिं देखा॥

अनुवाद (हिन्दी)

अंगात पिवळे झबले घातले होते. त्यांचे रांगणे मला फारच आवडत होते. त्यांच्या रूपाचे वर्णन वेद आणि शेषसुद्धा करू शकणार नाहीत. ज्याने ते कधी स्वप्नात का होईना पाहिले असेल, तोच ते जाणू शकेल.॥ ६॥

दोहा

मूल (दोहा)

सुख संदोह मोहपर ग्यान गिरा गोतीत।
दंपति परम प्रेम बस कर सिसुचरित पुनीत॥ १९९॥

अनुवाद (हिन्दी)

जे सुखाची खाण आहेत, मोहापलीकडचे आहेत. ज्ञान, वाणी आणि इंद्रियातीत आहेत, ते भगवान दशरथ-कौसल्या यांच्या अत्यंत प्रेमाच्या अधीन होऊन पावन बालक्रीडा करीत आहेत.॥ १९९॥

मूल (चौपाई)

एहि बिधि राम जगत पितु माता।
कोसलपुर बासिन्ह सुखदाता॥
जिन्ह रघुनाथ चरन रति मानी।
तिन्ह की यह गति प्रगट भवानी॥

अनुवाद (हिन्दी)

अशा रीतीने सर्व जगाचे माता-पिता असणारे श्रीराम अयोध्यावासींना आनंद देत. ज्यांनी श्रीरामांच्या चरणांवर प्रेम केले असेल, त्यांनाच हे भवानी! हा आनंद प्रत्यक्ष अनुभवायला मिळतो.॥ १॥

मूल (चौपाई)

रघुपति बिमुख जतन कर कोरी।
कवन सकइ भव बंधन छोरी॥
जीव चराचर बस कै राखे।
सो माया प्रभु सों भय भाखे॥

अनुवाद (हिन्दी)

श्रीरघुनाथांशी विन्मुख होऊन मनुष्य कोटॺवधी उपाय करो, परंतु त्याला संसार-बंधनातून कोण मुक्त करू शकेल? जिने संपूर्ण चराचर जीवांना आपल्या मुठीत ठेवले आहे, ती मायासुद्धा प्रभूंना भीत असते.॥ २॥

मूल (चौपाई)

भृकुटि बिलास नचावइ ताही।
अस प्रभु छाड़ि भजिअ कहु काही॥
मन क्रम बचन छाड़ि चतुराई।
भजत कृपा करिहहिं रघुराई॥

अनुवाद (हिन्दी)

भगवंत त्या मायेला भृकुटीच्या इशाऱ्यावर नाचवत असतात. अशा प्रभूंना सोडून इतर कुणाचे भजन करावे, सांगा बरे? निष्कपट भावाने कायावाचामनाने भजताच श्रीरघुनाथ कृपा करतील.॥ ३॥

मूल (चौपाई)

एहि बिधि सिसुबिनोदप्रभु कीन्हा।
सकल नगरबासिन्ह सुख दीन्हा॥
लै उछंग कबहुँक हलरावै।
कबहुँ पालने घालि झुलावै॥

अनुवाद (हिन्दी)

अशा प्रकारे प्रभू श्रीरामचंद्रांनी बालक्रीडा केली आणि सर्व नगरवासियांना आनंद दिला. कौसल्या माता कधी त्यांना मांडीवर घेऊन हालवीत-डोलवीत असे आणि कधी पाळण्यात झोपवून झोके देत असे,॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

प्रेम मगन कौसल्या निसि दिन जात न जान।
सुत सनेह बस माता बालचरित कर गान॥ २००॥

अनुवाद (हिन्दी)

कौसल्या माता प्रेमात अशी बडून जाई की, दिवस-रात्र केव्हा आली व गेली, याचे तिला भान रहात नसे. पुत्राच्या स्नेहामुळे माता त्यांच्या बाल-चरित्राचे गायन करी.॥ २००॥

मूल (चौपाई)

एक बार जननीं अन्हवाए।
करि सिंगार पलनाँ पौढ़ाए॥
निज कुल इष्टदेव भगवाना।
पूजा हेतु कीन्ह अस्नाना॥

अनुवाद (हिन्दी)

एकदा मातेने श्रीरामचंद्रांना न्हाऊ घातले आणि शृंगार करून पाळण्यात झोपविले. नंतर कुलदेवतेच्या पूजेसाठी स्नान केले.॥ १॥

मूल (चौपाई)

करि पूजा नैबेद्य चढ़ावा।
आपु गई जहँ पाक बनावा॥
बहुरि मातु तहवाँ चलि आई।
भोजन करत देख सुत जाई॥

अनुवाद (हिन्दी)

पूजा करून नैवेद्य दाखविला आणि जिथे स्वयंपाक केला होता, तिथे ती गेली. पुन्हा आई (पूजेच्या ठिकाणी) परत आली, तर आपला मुलगा (कुलदेवाला दाखविलेला नैवेद्य) खात असलेला तिला दिसला.॥ २॥

मूल (चौपाई)

गै जननी सिसु पहिं भयभीता।
देखा बाल तहाँ पुनि सूता॥
बहुरि आइ देखा सुत सोई।
हृदयँ कंप मन धीर न होई॥

अनुवाद (हिन्दी)

आई (पाळण्यात झोपवला असताना इथे कुणी आणून बसविला, या गोष्टीने घाबरून) मुलाजवळ गेली. पाहते तर तेथे तो झोपलेला दिसला. मग देवघरात परत येऊन पाहिले, तर आपला मुलगा तेथे जेवत होता. तिला कापरे भरले आणि तिचे अवसान गळून गेले.॥ ३॥

मूल (चौपाई)

इहाँ उहाँ दुइ बालक देखा।
मतिभ्रम मोर कि आन बिसेषा॥
देखि राम जननी अकुलानी।
प्रभु हँसि दीन्ह मधुर मुसुकानी॥

अनुवाद (हिन्दी)

(ती विचार करू लागली की,) इथे आणि तिथे मी दोन मुले पाहिली. हा माझ्या मनाचा भ्रम आहे की काही विशेष कारण आहे. प्रभू श्रीरामचंद्रानी मातेला घाबरून गेल्याचे पाहून मधुर हास्य केले.॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

देखरावा मातहि निज अद्भुत रूप अखंड।
रोम रोम प्रति लागे कोटि कोटि ब्रह्मांड॥ २०१॥

अनुवाद (हिन्दी)

मग भगवंतांनी मातेला आपले अखंड अद्भुत रूप दाखविले. त्याच्या एकेका रोमामध्ये कोटॺवधी ब्रह्मांडे सामावली होती.॥ २०१॥

मूल (चौपाई)

अगनित रबि ससि सिव चतुरानन।
बहु गिरि सरित सिंधु महि कानन॥
काल कर्म गुन ग्यान सुभाऊ।
सोउ देखा जो सुना न काऊ॥

अनुवाद (हिन्दी)

अगणित सूर्य, चंद्र, शिव, ब्रह्मदेव, पुष्कळसे पर्वत, नद्या, समुद्र, पृथ्वी, वने, काल, कर्म, गुण, ज्ञान आणि स्वभाव दिसले. शिवाय कधीही पाहिले किंवा ऐकलेसुद्धा नव्हते, असे पदार्थही तिने तेथे पाहिले.॥ १॥

मूल (चौपाई)

देखी माया सब बिधि गाढ़ी।
अति सभीत जोरें कर ठाढ़ी॥
देखा जीव नचावइ जाही।
देखी भगति जो छोरइ ताही॥

अनुवाद (हिन्दी)

सर्व तऱ्हेने बलवान असलेली माया पाहिली. ती (भगवंतांच्यासमोर) अत्यंत घाबरून हात जोडून उभी होती. माया नाचवीत असलेल्या जिवाला पाहिले आणि मग त्या जिवाला (मायेपासून) सोडविणाऱ्या अशा भक्तीलाही पाहिले.॥ २॥

मूल (चौपाई)

तन पुलकित मुख बचनन आवा।
नयन मूदि चरननि सिरु नावा॥
बिसमयवंत देखि महतारी।
भए बहुरि सिसुरूप खरारी॥

अनुवाद (हिन्दी)

मातेचे शरीर पुलकित झाले. तोंडातून शब्द फुटत नव्हता. तेव्हा डोळे मिटून श्रीरामचंद्र्रांच्या चरणी तिने मस्तक ठेवले. मातेला आश्चर्य वाटल्याचे पाहून श्रीरामांनी पुन्हा बालरूप घेतले.॥ ३॥

मूल (चौपाई)

अस्तुति करि न जाइ भय माना।
जगत पिता मैं सुत करि जाना॥
हरि जननी बहु बिधि समुझाई।
यह जनि कतहुँ कहसि सुनु माई॥

अनुवाद (हिन्दी)

मातेला स्तुतीसुद्धा करता येईना. ती घाबरली की, जगत्पिता परमात्म्याला मी पुत्र समजले. श्रीहरींनी मातेला पुष्कळ प्रकारे समजावून सांगितले की, ‘हे माते, ऐक. ही गोष्ट कुणालाही सांगू नकोस.’॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

बार बार कौसल्या बिनय करइ कर जोरि।
अब जनि कबहूँ ब्यापै प्रभु मोहि माया तोरि॥ २०२॥

अनुवाद (हिन्दी)

कौसल्या वारंवार हात जोडून प्रार्थना करीत होती की, ‘हे प्रभो, मला कधीही तुमच्या मायेने व्यापू नये.’॥ २०२॥

मूल (चौपाई)

बालचरित हरि बहुबिधि कीन्हा।
अति अनंद दासन्ह कहँ दीन्हा॥
कछुक काल बीतें सब भाई।
बड़े भए परिजन सुखदाई॥

अनुवाद (हिन्दी)

भगवंतांनी पुष्कळ प्रकारच्या बाललीला केल्या आणि आपल्या सेवकांना अत्यंत आनंद दिला. काही काळ लोटल्यावर चारीही भाऊ मोठे होऊन कुटुंबियांना सुख देऊ लागले.॥ १॥

मूल (चौपाई)

चूड़ाकरन कीन्ह गुरु जाई।
बिप्रन्ह पुनि दछिना बहु पाई॥
परम मनोहर चरित अपारा।
करत फिरत चारिउ सुकुमारा॥

अनुवाद (हिन्दी)

मग गुरुजींनी चूडाकर्म संस्कार केला. ब्राह्मणांना खूप दक्षिणा मिळाली. चारी सुंदर राजकुमार फार मनोहर अपार लीला करीत फिरत असत.॥ २॥

मूल (चौपाई)

मन क्रम बचन अगोचर जोई।
दसरथ अजिर बिचर प्रभु सोई॥
भोजन करत बोल जब राजा।
नहिं आवत तजि बाल समाजा॥

अनुवाद (हिन्दी)

जे मन, वचन व कर्म यांना अगोचर आहेत, तेच प्रभू दशरथ राजांच्या अंगणात फिरत होते. राजे जेव्हा त्यांना भोजनास बोलवत, तेव्हा ते आपल्या बाल सोबत्यांना सोडून येत नसत.॥ ३॥

मूल (चौपाई)

कौसल्या जब बोलन जाई।
ठुमुकु ठुमुकु प्रभु चलहिं पराई॥
निगम नेति सिव अंत न पावा।
ताहि धरै जननी हठि धावा॥

अनुवाद (हिन्दी)

कौसल्या माता जेव्हा बोलवायला जाई, तेव्हा प्रभू ठुमकत ठुमकत पळून जात. वेद ज्यांचे ‘नेति’ (हे नाही) म्हणून वर्णन करतात आणि श्रीशिवांनाही ज्यांचा थांग लागला नाही, त्यांना बळेच पकडण्यासाठी ती धावत असे.॥ ४॥

मूल (चौपाई)

धूसर धूरि भरें तनु आए।
भूपति बिहसि गोद बैठाए॥

अनुवाद (हिन्दी)

अंगाला धूळ लागलेल्या स्थितीत आलेल्या त्यांना राजा हसत हसत आपल्या मांडीवर बसवत असे.॥ ५॥

दोहा

मूल (दोहा)

भोजन करत चपल चित इत उत अवसरु पाइ।
भाजि चले किलकत मुख दधि ओदन लपटाइ॥ २०३॥

अनुवाद (हिन्दी)

(पकडून आणल्यावर) श्रीराम भोजन करू लागत, परंतु चित्त चंचल असे. संधी मिळताच तोंडाला दही-भात लागलेला असतानाच किलकारी मारत ते इकडे-तिकडे पळून जात.॥ २०३॥

मूल (चौपाई)

बालचरित अति सरल सुहाए।
सारद सेष संभु श्रुति गाए॥
जिन्ह कर मनइन्ह सन नहिं राता।
ते जन बंचित किए बिधाता॥

अनुवाद (हिन्दी)

श्रीरामचंद्रांच्या फार भोळ्या आणि मनमोहक बाललीलेंचे सरस्वती, शेष, शिव व वेद यांनी गायन केले आहे. या लीलेंमध्ये ज्यांचे मन लागले नाही, त्यांना विधात्याने अभागी बनविले.॥ १॥

मूल (चौपाई)

भए कुमार जबहिं सब भ्राता।
दीन्ह जनेऊ गुरु पितु माता॥
गुरगृहँ गए पढ़न रघुराई।
अलप काल बिद्या सब आई॥

अनुवाद (हिन्दी)

सर्व भाऊ कुमारावस्थेस येताच, गुरू, पिता व माता, यांनी त्यांचा यज्ञोपवीत संस्कार केला. श्रीरघुनाथ (भावांसह) गुरुगृही विद्या शिकण्यास गेले आणि थोडॺाच काळात त्यांना सर्व विद्या प्राप्त झाल्या.॥ २॥

मूल (चौपाई)

जाकी सहज स्वास श्रुति चारी।
सो हरि पढ़ यह कौतुक भारी॥
बिद्या बिनय निपुन गुन सीला।
खेलहिं खेल सकल नृप लीला॥

अनुवाद (हिन्दी)

चारही वेद ज्यांचा स्वाभाविक श्वास आहेत, ते भगवान विद्या शिकतात ही मोठी आश्चर्याची गोष्ट. चारी भाऊ विद्या, विनय, गुण व शील यांमध्ये मोठे निपुण होते आणि ते सर्वजण राजांचे खेळ खेळत.॥ ३॥

मूल (चौपाई)

करतल बान धनुष अति सोहा।
देखत रूप चराचर मोहा॥
जिन्ह बीथिन्ह बिहरहिं सब भाई।
थकित होहिं सब लोग लुगाई॥

अनुवाद (हिन्दी)

त्यांच्या हाती बाण व धनुष्य शोभत असत. त्यांचे रूप पाहताच चराचर मोहून जात असे. ते सर्व भाऊ ज्या ज्या ठिकाणी खेळायला जात, तेथील सर्व स्त्री-पुरुष त्यांना पाहून प्रेमाने देहभान विसरत किंवा स्तब्ध होऊन त्यांना पाहात रहात असे.॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

कोसलपुर बासी नर नारि बृद्ध अरु बाल।
प्रानहु ते प्रिय लागत सब कहुँ राम कृपाल॥ २०४॥

अनुवाद (हिन्दी)

कोसलपुरातील रहिवासी स्त्री-पुरुष, आबाल-वृद्ध सर्वांना कृपाळू रामचंद्र प्राणांहूनही प्रिय वाटत.॥ २०४॥

मूल (चौपाई)

बंधु सखा सँग लेहिं बोलाई।
बन मृगया नित खेलहिं जाई॥
पावन मृग मारहिं जियँ जानी।
दिन प्रति नृपहि देखावहिं आनी॥

अनुवाद (हिन्दी)

श्रीराम भावांना व इष्ट मित्रांना बोलावून बरोबर घेत आणि नित्य वनात शिकारीस जात. मनाला पवित्र वाटत, त्या मृगांना मारून आणून रोज राजा दशरथांना दाखवीत असत.॥ १॥

मूल (चौपाई)

जे मृग राम बान के मारे।
ते तनु तजि सुरलोक सिधारे॥
अनुज सखा सँग भोजन करहीं।
मातु पिता अग्या अनुसरहीं॥

अनुवाद (हिन्दी)

जे मृग श्रीरामांच्या बाणाने मारले जात, ते देह सोडून देवलोकी जात. श्रीराम आपले धाकटे भाऊ व मित्रांसह भोजन करीत आणि माता-पित्यांच्या आज्ञेचे पालन करीत असत.॥ २॥

मूल (चौपाई)

जेहि बिधिसुखीहोहिं पुर लोगा।
करहिं कृपानिधि सोइ संजोगा॥
बेद पुरान सुनहिं मन लाई।
आपु कहहिं अनुजन्ह समुझाई॥

अनुवाद (हिन्दी)

नगरीतील लोकांना आनंद व्हावा, असेच योगायोग कृपानिधान श्रीराम जुळवून आणत असत. ते लक्षपूर्वक वेद-पुराणे ऐकत आणि मग स्वतः धाकटॺा भावांना समजावून देत.॥ ३॥

मूल (चौपाई)

प्रातकाल उठि कै रघुनाथा।
मातु पिता गुरु नावहिं माथा॥
आयसु मागि करहिं पुर काजा।
देखि चरित हरषइ मन राजा॥

अनुवाद (हिन्दी)

श्रीरघुनाथ प्रातःकाळी उठून माता-पिता आणि गुरू यांच्या पाया पडत आणि त्यांची आज्ञा घेऊन नगरातील कामे करीत असत. त्यांचे चरित्र पाहून महाराज दशरथ मनात खूप आनंदित होत असत.॥ ४॥