४१ दशरथांचा पुत्रेष्टि-यज्ञ

मूल (चौपाई)

गिरि कानन जहँ तहँ भरि पूरी।
रहे निज निज अनीक रचि रूरी॥
यह सब रुचिर चरित मैं भाषा।
अब सो सुनहु जो बीचहिं राखा॥

अनुवाद (हिन्दी)

ते वानर पर्वतांमध्ये व जंगलामध्ये जिकडे तिकडे आपल्या चांगल्या सेना बनवून सर्वत्र पसरले. हे सर्व चरित्र मी सांगितले. आता मध्येच सोडून दिलेले चरित्र ऐका.॥ ३॥

मूल (चौपाई)

अवधपुरीं रघुकुलमनि राऊ।
बेद बिदित तेहि दसरथ नाऊँ॥
धरम धुरंधर गुननिधि ग्यानी।
हृदयँ भगति मति सारँगपानी॥

अनुवाद (हिन्दी)

अयोध्यापुरीत रघुकुलशिरोमणि दशरथ नावाचा राजा झाला. त्यांचे नाव वेदांमध्येही प्रसिद्ध आहे. ते धर्मधुरंधर, गुणांचे भांडार आणि ज्ञानी होते. त्यांच्या मनात शार्ङ्गधनुष्य धारण करणाऱ्या भगवंतांची भक्ती होती आणि त्यांची बुद्धीही त्यांच्यामध्येच रमली होती.॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

कौसल्यादि नारि प्रिय सब आचरन पुनीत।
पति अनुकूल प्रेम दृढ़ हरि पद कमल बिनीत॥ १८८॥

अनुवाद (हिन्दी)

त्यांच्या कौसल्या इत्यादी प्रिय राण्या पवित्र आचरणाच्या होत्या. त्या फार नम्र आणि पतीला अनुकूल वागणाऱ्या होत्या. श्रीहरींच्या चरणकमलांमध्ये त्यांचे निःसीम प्रेम होते.॥ १८८॥

मूल (चौपाई)

एक बार भूपति मन माहीं।
भै गलानि मोरें सुत नाहीं॥
गुर गृह गयउ तुरत महिपाला।
चरन लागि करि बिनय बिसाला॥

अनुवाद (हिन्दी)

एकदा राजाच्या मनात अतिशय खेद झाला की, मला पुत्र नाही. राजा त्वरित गुरूंच्याकडे गेला आणि त्यांच्या चरणांना प्रणाम करून त्याने विनवणी केली.॥ १॥

मूल (चौपाई)

निज दुख सुख सब गुरहि सुनायउ।
कहि बसिष्ठ बहु बिधि समुझायउ॥
धरहु धीर होइहिं सुत चारी।
त्रिभुवन बिदित भगत भय हारी॥

अनुवाद (हिन्दी)

राजाने आपले सारे दुःख गुरूंना सांगितले. गुरू वसिष्ठ यांनी त्यांना अनेक प्रकाराने समजावून सांगितले. (आणि म्हटले,) ‘धीर धरा. तुम्हांला चार पुत्र होतील, ते तिन्ही लोकांमध्ये प्रसिद्ध आणि भक्तांचे भय हरण करणारे होतील?’॥ २॥

मूल (चौपाई)

सृंगी रिषिहि बसिष्ठ बोलावा।
पुत्रकाम सुभ जग्य करावा॥
भगति सहित मुनि आहुति दीन्हें।
प्रगटे अगिनि चरू कर लीन्हें॥

अनुवाद (हिन्दी)

वसिष्ठांनी शृंगी ऋषींना बोलावून घेतले आणि त्यांच्याकडून पुत्रकामेष्टी यज्ञ करवून घेतला. मुनींनी भक्तिपूर्वक आहुती दिल्यावर अग्निदेव हातामध्ये पायस घेऊन प्रगट झाले.॥ ३॥

मूल (चौपाई)

जो बसिष्ठ कछु हृदयँ बिचारा।
सकल काजु भा सिद्ध तुम्हारा॥
यह हबि बाँटि देहु नृप जाई।
जथा जोग जेहि भाग बनाई॥

अनुवाद (हिन्दी)

अग्निदेव (दशरथ राजांना) म्हणाले, ‘वसिष्ठांनी मनात जे ठरवले होते, त्यानुसार तुमचे सर्व काम पूर्ण झाले. हे राजा, आता तू जाऊन हा पायस योग्य वाटेल, त्याप्रमाणे भाग करून वाटून दे.’॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

तब अदृस्य भए पावक सकल सभहि समुझाइ।
परमानंद मगन नृप हरष न हृदयँ समाइ॥ १८९॥

अनुवाद (हिन्दी)

नंतर अग्निदेव संपूर्ण सभेला समजावून सांगून अंतर्धान पावले. राजा परमानंदात मग्न झाला. त्याच्या मनात आनंद मावत नव्हता.॥ १८९॥

मूल (चौपाई)

तबहिं रायँ प्रिय नारि बोलाईं।
कौसल्यादि तहाँ चलि आईं॥
अर्ध भाग कौसल्यहि दीन्हा।
उभय भाग आधे कर कीन्हा॥

अनुवाद (हिन्दी)

मग राजाने आपल्या प्रिय पत्नींना बोलावून घेतले. कौसल्या इत्यादी सर्व राण्या तेथे आल्या. राजाने पायसाचा अर्धा भाग कौसल्येला दिला आणि उरलेल्या अर्ध्या भागाचे दोन भाग केले.॥ १॥

मूल (चौपाई)

कैकेई कहँ नृप सो दयऊ।
रह्यो सो उभय भाग पुनि भयऊ॥
कौसल्या कैकेई हाथ धरि।
दीन्ह सुमित्रहि मन प्रसन्न करि॥

अनुवाद (हिन्दी)

त्यांपैकी एक भाग राजाने कैकेयीला दिला. उरलेल्या भागाचे दोन भाग केले आणि राजाने ते कौसल्या आणि कैकेयी यांच्या हातावर ठेवून (त्यांच्या संमतीने), त्यांचे मन प्रसन्न ठेवून सुमित्रेला दिले.॥ २॥

मूल (चौपाई)

एहि बिधि गर्भसहित सब नारी।
भईं हृदयँ हरषित सुख भारी॥
जा दिन तें हरि गर्भहिं आए।
सकल लोक सुख संपति छाए॥

अनुवाद (हिन्दी)

अशाप्रकारे सर्व राण्या गर्भवती झाल्या. त्यांना मनातून खूप आनंद झाला. त्यांना फार सुख वाटले. ज्या दिवशी श्रीहरी (आपल्या लीलेने) गर्भामध्ये आले, त्या दिवसापासून सर्व लोकांमध्ये सुख व संपत्ती पसरली.॥ ३॥

मूल (चौपाई)

मंदिर महँ सब राजहिं रानीं।
सोभा सील तेज की खानीं॥
सुख जुत कछुक काल चलि गयऊ।
जेहिं प्रभु प्रगट सो अवसर भयऊ॥

अनुवाद (हिन्दी)

शोभा, शील व तेज यांची खाण (बनलेल्या) सर्व राण्या राजमहालामध्ये शोभून दिसू लागल्या. अशाप्रकारे काही काळ सुखात गेला. प्रभूंची प्रकट होण्याची वेळ आली.॥ ४॥