३९ देवांचा करुण धावा

मासपारायण, सहावा अध्याय

मूल (चौपाई)

बाढ़े खल बहु चोर जुआरा।
जे लंपट परधन परदारा॥
मानहिं मातु पिता नहिं देवा।
साधुन्ह सन करवावहिं सेवा॥

अनुवाद (हिन्दी)

परक्याचे धन व परस्त्रीबद्दल लोभ धरणारे, दुष्ट, चोर आणि जुगारी यांची संख्या खूप वाढली. लोक, माता-पिता आणि देवांना जुमानत नव्हते आणि साधूंकडून सेवा करून घेत होते.॥ १॥

मूल (चौपाई)

जिन्ह के यह आचरन भवानी।
ते जानेहु निसिचर सब प्रानी॥
अतिसय देखि धर्म कै ग्लानी।
परम सभीत धरा अकुलानी॥

अनुवाद (हिन्दी)

(श्रीशिव म्हणतात-) ‘हे भवानी, ज्यांचे असे आचरण असते, त्या प्राण्यांना राक्षसच समज. अशा प्रकारे धर्माविषयी लोकांची अरुची व अनास्था पाहून पृथ्वी अत्यंत भयभीत व व्याकूळ झाली.॥ २॥

मूल (चौपाई)

गिरि सरि सिंधु भार नहिं मोही।
जस मोहि गरुअ एक परद्रोही॥
सकल धर्म देखइ बिपरीता।
कहि न सकइ रावन भय भीता॥

अनुवाद (हिन्दी)

(ती विचार करू लागली की,) पर्वत, नद्या व समुद्र यांचे ओझे मला कधी इतके वाटले नाही, जितके एका परद्रोह्याचे वाटते. पृथ्वीला सर्व धर्म विपरीत झाल्याचे दिसत होते, परंतु रावणाच्या भीतीमुळे ती बोलू शकत नव्हती.॥ ३॥

मूल (चौपाई)

धेनु रूप धरि हृदयँ बिचारी।
गई तहाँ जहँ सुर मुनि झारी॥
निज संताप सुनाएसि रोई।
काहू तें कछु काज न होई॥

अनुवाद (हिन्दी)

(शेवटी) मनात विचार करून व गाईचे रूप घेऊन जेथे देव व मुनी (लपले) होते, तेथे ती गेली. पृथ्वीने रडत-रडत आपले दुःख उघड केले, परंतु कुणाकडूनही काही काम झाले नाही.॥ ४॥

छंद

मूल (दोहा)

सुर मुनि गंधर्बा मिलि करि सर्बा गे बिरंचि के लोका।
सँग गोतनुधारी भूमि बिचारी परम बिकल भय सोका॥
ब्रह्माँ सब जाना मन अनुमाना मोर कछू न बसाई।
जा करि तैं दासी सो अबिनासी हमरेउ तोर सहाई॥

अनुवाद (हिन्दी)

तेव्हा देव, मुनी आणि गंधर्व हे सर्व मिळून ब्रह्मदेवाच्या सत्यलोकी गेले. भय आणि शोकामुळे ती अत्यंत व्याकूळ झालेली बिचारी पृथ्वीसुद्धा गायीच्या रूपात त्यांच्याबरोबर होती. ब्रह्मदेवांनी सारे ओळखले. त्यांनी विचार केला की, यात माझे काही चालणार नाही. (तेव्हा त्यांनी पृथ्वीला म्हटले,) ‘ज्याची तू दासी आहेस, तोच अविनाशी तुम्हां-आम्हांला मदत करणारा आहे.’

सोरठा

मूल (दोहा)

धरनि धरहि मन धीर कह बिरंचि हरिपद सुमिरु।
जानत जन की पीर प्रभु भंजिहि दारुन बिपति॥ १८४॥

अनुवाद (हिन्दी)

ब्रह्मदेव म्हणाले, ‘हे धरणी, मनात धीर धरून श्रीहरींच्या चरणांचे स्मरण कर. प्रभू हे आपल्या सेवकांची यातना जाणतात. ते तुझ्या कठीण संकटाचा नाश करतील.’॥ १८४॥

मूल (चौपाई)

बैठे सुर सब करहिं बिचारा।
कहँ पाइअ प्रभु करिअ पुकारा॥
पुर बैकुंठ जान कह कोई।
कोउ कह पयनिधि बस प्रभु सोई॥

अनुवाद (हिन्दी)

सर्व देव बसून विचार करू लागले की, प्रभूंना शोधायचे कोठे? त्यांच्याजवळ तक्रार कुठे करायची? कोणी म्हणाले की, वैकुंठाला जाऊया, कोणी म्हणत होता की, प्रभू क्षीरसमुद्रात निवास करतात, तेथे जाऊया.॥ १॥

मूल (चौपाई)

जाके हृदयँ भगति जसि प्रीती।
प्रभु तहँ प्रगट सदा तेहिं रीती॥
तेहिं समाज गिरिजा मैं रहेऊँ।
अवसर पाइ बचन एक कहेऊँ॥

अनुवाद (हिन्दी)

ज्याच्या मनात जशी भक्ती आणि प्रीती असते, तेथे प्रभू त्याच रीतीने प्रगट होतात. हे पार्वती, त्या मंडळींमध्ये मीही होतो. संधी पाहून मी म्हणालो,॥ २॥

मूल (चौपाई)

हरि ब्यापक सर्बत्र समाना।
प्रेम तें प्रगट होहिं मैं जाना॥
देस काल दिसि बिदिसिहु माहीं।
कहहु सो कहाँ जहाँ प्रभु नाहीं॥

अनुवाद (हिन्दी)

भगवान सर्व ठिकाणी समानपणे भरलेले असतात. प्रेमामुळे ते प्रकट होतात. देश, काल, दिशा-विदिशा यांमध्ये जिथे भगवान नाही, अशी जागा कुठे आहे? सांगा बरे!॥ ३॥

मूल (चौपाई)

अग जगमय सब रहित बिरागी।
प्रेम तें प्रभु प्रगटइ जिमि आगी॥
मोर बचन सब के मन माना।
साधु साधु करि ब्रह्म बखाना॥

अनुवाद (हिन्दी)

ते चराचरात व्याप्त असूनही सर्वांपासून अलिप्त व विरक्त आहेत. (त्यांना कशातही आसक्ती नाही.) ते प्रेमामुळे प्रकट होतात, जसा अग्नी प्रकट होतो. (अग्नी हा अव्यक्त रूपाने व्याप्त आहे. परंतु जिथे त्याच्यासाठी अरणि मंथन इत्यादी साधन केले जाते, तेथे तो प्रकट होतो. त्याप्रमाणेच सर्वत्र व्याप्त असलेले भगवंतही प्रेमामुळे प्रकट होतात.) माझे बोलणे सर्वांना आवडले. ब्रह्मदेवांनी ‘छान! छान!’ म्हणून माझी प्रशंसा केली.॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

सुनि बिरंचि मन हरष तन पुलकि नयन बह नीर।
अस्तुति करत जोरि कर सावधान मतिधीर॥ १८५॥

अनुवाद (हिन्दी)

माझे म्हणणे ऐकून ब्रह्मदेवांना फार आनंद झाला. त्यांचे शरीर पुलकित झाले आणि नेत्रांतून प्रेमाश्रू वाहू लागले. तेव्हा ते धीरबुद्धीचे ब्रह्मदेव एकाग्र होऊन हात जोडून स्तुती करू लागले.॥ १८५॥

छंद

मूल (दोहा)

जय जय सुरनायक जन सुखदायक प्रनतपाल भगवंता।
गो द्विज हितकारी जय असुरारी सिंधुसुता प्रिय कंता॥
पालन सुर धरनी अद्भुत करनी मरम न जानइ कोई।
जो सहज कृपाला दीनदयाला करउ अनुग्रह सोई॥ १॥

अनुवाद (हिन्दी)

‘हे देवांचे स्वामी, सेवकांना सुख देणारे, शरणागतांचे रक्षण करणारे भगवन्, तुमचा विजय असो, विजय असो. हे गो-ब्राह्मणांचे हित करणारे, असुरांचा विनाश करणारे, लक्ष्मीचे प्रिय स्वामी, तुमचा विजय असो. हे देव आणि पृथ्वीचे पालन करणारे, तुमची लीला अद्भुत आहे. तिचे रहस्य कोणीही जाणू शकत नाही. अशा प्रकारे जे स्वभावतःच कृपाळू व दीनदयाळू आहेत, तेच आम्हांवर कृपा करोत.॥

मूल (दोहा)

जय जय अबिनासी सब घट बासी ब्यापक परमानंदा।
अबिगत गोतीतं चरित पुनीतं मायारहित मुकुंदा॥
जेहि लागि बिरागी अति अनुरागी बिगत मोह मुनिबृंदा।
निसि बासर ध्यावहिं गुनगन गावहिं जयति सच्चिदानंदा॥ २॥

अनुवाद (हिन्दी)

हे अविनाशी, सर्वांच्या हृदयात वसणारे, सर्वव्यापक, परम आनंदस्वरूप, अज्ञेय, इंद्रियातीत, पवित्रचरित्र, मायेने रहित मुकुंद! तुमचा विजय असो, विजय असो. (या लोकीच्या व परलोकीच्या सर्व भोगांपासून) विरक्त आणि मोहातून सर्वथा मुक्त (ज्ञानी) मुनिवृंदसुद्धा अत्यंत प्रेमाने ज्यांचे रात्रंदिवस ध्यान करतात आणि ज्यांच्या गुणांच्या समुच्चयाचे गान करतात, त्या सच्चिदानंदांचा विजय असो.॥ २॥

मूल (दोहा)

जेहिं सृष्टि उपाई त्रिबिध बनाई संग सहाय न दूजा।
सो करउ अघारी चिंत हमारी जानिअ भगति न पूजा॥
जो भव भय भंजन मुनि मन रंजन गंजन बिपति बरूथा।
मन बच क्रम बानी छाड़ि सयानी सरन सकल सुरजूथा॥ ३॥

अनुवाद (हिन्दी)

ज्यांनी दुसऱ्या कुणा मित्राविना किंवा सहाय्यकाविना एकटॺानेच (किंवा स्वतःच आपणाला त्रिगुणरूप-ब्रह्मा, विष्णू, महेश बनवून किंवा कोणत्याही उपादान कारणाविना, अर्थात स्वतःच सृष्टीचे एकमात्र निमित्त व उपादान कारण बनून) तीन प्रकारची सृष्टी उत्पन्न केली, त्या पापनाशक भगवंत यांनी आमची आठवण ठेवावी. आम्ही भक्ती जाणत नाही, पूजाही जाणत नाही. जे जन्म-मृत्यूच्या भयाचे नाश करणारे, मुनींच्या मनाला आनंद देणारे आणि विपत्तींच्या राशींचा नाश करणारे आहेत, त्या भगवंतांना आम्ही सर्व देवांचे समुदाय कायावाचामनाने, मखलाशी करण्याचा स्वभाव सोडून (प्रांजळपणे) शरण आलो आहोत.॥ ३॥

मूल (दोहा)

सारद श्रुति सेषा रिषय असेषा जा कहुँ कोउ नहिं जाना।
जेहि दीन पिआरे बेद पुकारे द्रवउ सो श्रीभगवाना॥
भव बारिधि मंदर सब बिधि सुंदर गुनमंदिर सुखपुंजा।
मुनि सिद्ध सकल सुर परम भयातुर नमत नाथ पद कंजा॥ ४॥

अनुवाद (हिन्दी)

सरस्वती, वेद, शेष आणि सर्व ऋषी, यांपैकी कोणीही ज्यांना जाणत नाही, ज्यांना दीनजन प्रिय आहेत, असे वेद उच्चरवाने सांगतात, तेच भगवान आम्हांवर दया करोत. जे संसाररूपी समुद्राच्या मंथनासाठी मंदराचलरूप आहेत, सर्व प्रकारे सुंदर, गुणांचे धाम आणि सुखांचे राशी आहेत, असे हे नाथ! तुमच्या चरणकमली आम्ही मुनी, सिद्ध आणि सर्व देव भयाने अत्यंत व्याकूळ होऊन नमस्कार करतो.’॥ ४॥