३७ मासपारायण, पाचवा विश्राम

प्रतापभानूची कथा

मूल (चौपाई)

सुनु मुनि कथा पुनीत पुरानी।
जो गिरिजा प्रति संभु बखानी॥
बिस्व बिदित एक कैकय देसू।
सत्यकेतु तहँ बसइ नरेसू॥

अनुवाद (हिन्दी)

हे मुनी, ही पवित्र व प्राचीन कथा ऐका. ही शिवांनी पार्वतीला सांगितली होती. जगात कैकय नावाचा एक प्रसिद्ध देश आहे. तेथे सत्यकेतू नावाचा राजा राज्य करीत होता.॥ १॥

मूल (चौपाई)

धरम धुरंधर नीति निधाना।
तेज प्रताप सील बलवाना॥
तेहि कें भए जुगल सुत बीरा।
सब गुन धाम महा रनधीरा॥

अनुवाद (हिन्दी)

तो धर्मधुरीण, नीतीची खाण, तेजस्वी, प्रतापी, सुशील आणि बलवान होता. त्याचे दोन वीर पुत्र होते. ते सर्व गुणांचे भांडार व मोठे रणधुरंधर होते.॥ २॥

मूल (चौपाई)

राज धनी जो जेठ सुत आही।
नाम प्रतापभानु अस ताही॥
अपर सुतहि अरिमर्दन नामा।
भुजबल अतुल अचल संग्रामा॥

अनुवाद (हिन्दी)

राज्याचा उत्तराधिकारी असणाऱ्या मोठॺा मुलाचे नाव प्रतापभानू होते. दुसऱ्या मुलाचे नाव अरिमर्दन असे होते. त्याच्या बाहूंमध्ये अपार बळ होते आणि युद्धामध्ये तो पर्वताप्रमाणे निश्चळ राहत असे.॥ ३॥

मूल (चौपाई)

भाइहि भाइहि परम समीती।
सकल दोष छल बरजित प्रीती॥
जेठे सुतहि राज नृप दीन्हा।
हरि हित आपु गवन बन कीन्हा॥

अनुवाद (हिन्दी)

दोघा भावांमध्ये परस्परात सर्व प्रकारच्या दोषांपासून व कपटापासून रहित असे खरेखुरे प्रेम होते. राजाने ज्येष्ठ पुत्राला राज्य दिले आणि आपण भगवंतांचे भजन करण्यासाठी तो वनात निघून गेला.॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

जब प्रतापरबि भयउ नृप फिरी दोहाई देस।
प्रजा पाल अति बेदबिधि कतहुँ नहीं अघ लेस॥ १५३॥

अनुवाद (हिन्दी)

जेव्हा प्रतापभानू राजा झाला, तेव्हा देशामध्ये त्याच्या नावाने दवंडी दिली. वेदात सांगितलेल्या नियमांप्रमाणे उत्तम रीतीने तो प्रजेचे पालन करू लागला. त्याच्या राज्यात पापाचा लवलेश उरला नाही.॥ १५३॥

मूल (चौपाई)

नृप हितकारक सचिव सयाना।
नाम धरमरुचि सुक्र समाना॥
सचिव सयान बंधु बलबीरा।
आपु प्रतापपुंज रनधीरा॥

अनुवाद (हिन्दी)

धर्मरुची नावाचा त्याचा मंत्री राजाचे हित करणारा आणि शुक्राचार्यासारखा बुद्धिमान होता. अशाप्रकारचा बुद्धिमान मंत्री व बलवान आणि वीर भावाप्रमाणेच स्वतः राजाही मोठा प्रतापी व रणधीर होता.॥ १॥

मूल (चौपाई)

सेन संग चतुरंग अपारा।
अमित सुभट सब समर जुझारा॥
सेन बिलोकि राउ हरषाना।
अरु बाजे गहगहे निसाना॥

अनुवाद (हिन्दी)

त्याच्याजवळ अपार चतुरंग सेना होती. तिच्यामध्ये असंख्य योद्धे होते. ते सर्व रणांगणामध्ये झुंज देताना प्राणांची बाजी लावणारे होते. आपली सेना पाहून राजा खूष झाला आणि दुंदुभी वाजू लागल्या.॥ २॥

मूल (चौपाई)

बिजय हेतु कटकई बनाई।
सुदिन साधि नृप चलेउ बजाई॥
जहँ तहँ परीं अनेक लराईं।
जीते सकल भूप बरिआईं॥

अनुवाद (हिन्दी)

राजा एका शुभ मुहूर्तावर दिग्विजयासाठी सेना सज्ज करून रणभेरी वाजवत निघाला. जिकडे तिकडे पुष्कळशा लढाया झाल्या. त्यांमध्ये सर्व राजांना त्याने पराक्रमाने जिंकून घेतले.॥ ३॥

मूल (चौपाई)

सप्त दीप भुजबल बस कीन्हे।
लै लै दंड छाड़ि नृप दीन्हे॥
सकल अवनि मंडल तेहि काला।
एक प्रतापभानु महिपाला॥

अनुवाद (हिन्दी)

त्याने आपल्या बाहुबलाने सप्तद्वीप अधीन केले आणि राजांकडून खंडणी घेऊन त्यांना सोडून दिले. प्रतापभानू त्या काळी संपूर्ण पृथ्वीचा एकमात्र चक्रवर्ती राजा होता.॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

स्वबस बिस्व करि बाहुबल निज पुर कीन्ह प्रबेसु।
अरथ धरम कामादि सुख सेवइ समयँ नरेसु॥ १५४॥

अनुवाद (हिन्दी)

संपूर्ण पृथ्वीला आपल्या बाहुबलाने अधीन करून राजाने आपल्या नगरात प्रवेश केला. राजा धर्म, अर्थ आणि काम इत्यादी सुखांचा काळानुसार उपभोग घेत राहिला.॥ १५४॥

मूल (चौपाई)

भूप प्रतापभानु बल पाई।
कामधेनु भै भूमि सुहाई॥
सब दुख बरजित प्रजा सुखारी।
धरमसील सुंदर नर नारी॥

अनुवाद (हिन्दी)

राजा प्रतापभानूच्या पराक्रमामुळे भूमी सुंदर कामधेनू बनली. त्याच्या राज्यात प्रजा सर्व दुःखांनी रहित व सुखी झाली. सर्व स्त्री-पुरुष सुंदर धर्मात्मे होते.॥ १॥

मूल (चौपाई)

सचिव धरमरुचि हरि पद प्रीती।
नृप हित हेतु सिखव नित नीती॥
गुर सुर संत पितर महिदेवा।
करइ सदा नृप सब कै सेवा॥

अनुवाद (हिन्दी)

धर्मरुची मंत्र्याची श्रीहरींच्या चरणी भक्ती होती. तो राजाच्या हितासाठी नेहमी त्याला नीतीचा उपदेश करीत असे. राजा गुरू, देव, संत, पितर व ब्राह्मण या सर्वांची नित्य सेवा करीत असे.॥ २॥

मूल (चौपाई)

भूप धरम जे बेद बखाने।
सकल करइ सादर सुख माने॥
दिन प्रति देइ बिबिध बिधि दाना।
सुनइ सास्त्र बर बेद पुराना॥

अनुवाद (हिन्दी)

वेदांमध्ये राजांची जी कर्तव्ये सांगितली आहेत, त्या सर्वांचे पालन राजा नेहमी आदराने व आनंदाने करीत असे. प्रत्येक दिवशी तो नाना प्रकारची दाने देत असे आणि उत्तम शास्त्रे, वेद व पुराणांचे श्रवण करीत असे.॥ ३॥

मूल (चौपाई)

नाना बापीं कूप तड़ागा।
सुमन बाटिका सुंदर बागा॥
बिप्रभवन सुरभवन सुहाए।
सब तीरथन्ह बिचित्र बनाए॥

अनुवाद (हिन्दी)

त्याने पुष्कळ आड, विहिरी, तलाव, फुलबागा, सुंदर बागा, ब्राह्मणांसाठी घरे आणि देवांसाठी सुंदर मंदिरे सर्व तीर्थ क्षेत्रांमध्ये बनविली.॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

जहँ लगि कहे पुरान श्रुति एक एक सब जाग।
बार सहस्र सहस्र नृप किए सहित अनुराग॥ १५५॥

अनुवाद (हिन्दी)

वेद आणि पुराणांमध्ये जितक्या प्रकारचे यज्ञ सांगितले आहेत, ते सर्व एक-एक करून राजाने मोठॺा श्रद्धेने हजार-हजार वेळा केले.॥ १५५॥

मूल (चौपाई)

हृदयँ न कछु फल अनुसंधाना।
भूप बिबेकी परम सुजाना॥
करइ जे धरम करम मन बानी।
बासुदेव अर्पित नृप ग्यानी॥

अनुवाद (हिन्दी)

राजाच्या मनात कोणत्याही फळाची इच्छा नव्हती. राजा हा मोठा बुद्धिमान आणि ज्ञानी होता. तो ज्ञानी राजा कर्म, मन आणि वाणी यांनी जो काही धर्म करीत होता, तो सर्व भगवान वासुदेवांना अर्पण करीत असे.॥ १॥

मूल (चौपाई)

चढ़ि बर बाजि बार एक राजा।
मृगया कर सब साजि समाजा॥
बिंध्याचल गभीर बन गयऊ।
मृग पुनीत बहु मारत भयऊ॥

अनुवाद (हिन्दी)

एकदा तो राजा एका वेगवान घोडॺावर बसून शिकारीचे साहित्य घेऊन विंध्याचलाच्या दाट जंगलात गेला आणि तेथे त्याने पुष्कळ उत्तम उत्तम हरणे मारली.॥ २॥

मूल (चौपाई)

फिरत बिपिन नृप दीख बराहू।
जनु बन दुरेउ ससिहि ग्रसि राहू॥
बड़ बिधु नहिं समात मुख माहीं।
मनहुँ क्रोध बस उगिलत नाहीं॥

अनुवाद (हिन्दी)

राजाने वनात फिरताना एक डुक्कर पाहिले. (दातांमुळे ते असे दिसत होते की) जणू चंद्राला ग्रासून राहू वनात येऊन लपला आहे. चंद्र मोठा असल्यामुळे त्याच्या तोंडात मावत नव्हता आणि जणू क्रोधाने तो त्याला बाहेर टाकूही शकत नव्हता.॥ ३॥

मूल (चौपाई)

कोल कराल दसन छबि गाई।
तनु बिसाल पीवर अधिकाई॥
घुरुघुरात हय आरौ पाएँ।
चकित बिलोकत कान उठाएँ॥

अनुवाद (हिन्दी)

ही झाली डुक्कराच्या भयानक दातांची गोष्ट. त्याचे शरीरही मोठे व गलेलठ्ठ होते. घोडॺाची चाहूल लागल्यामुळे ते गुरगुरत कान टवकारून सावधपणे पाहात होते.॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

नील महीधर सिखर सम देखि बिसाल बराहु।
चपरि चलेउ हय सुटुकि नृप हाँकि न होइ निबाहु॥ १५६॥

अनुवाद (हिन्दी)

नील पर्वताच्या शिखराप्रमाणे ते प्रचंड डुक्कर पाहून राजा घोडॺाला चाबूक मारून वेगाने निघाला. त्याने (मनात) डुकराला म्हटले की, आता तुझी धडगत नाही.॥ १५६॥

मूल (चौपाई)

आवत देखि अधिक रव बाजी।
चलेउ बराह मरुत गति भाजी॥
तुरत कीन्ह नृप सर संधाना।
महि मिलि गयउ बिलोकत बाना॥

अनुवाद (हिन्दी)

जोराचा आवाज करीत घोडा (आपल्याकडे) येत असल्याचे पाहून डुक्कर वायुवेगाने पळाले. राजाने लागलीच बाण धनुष्याला लावला. बाण पाहताच डुक्कर जमिनीत दडून बसले.॥ १॥

मूल (चौपाई)

तकि तकि तीर महीस चलावा।
करि छल सुअर सरीर बचावा॥
प्रगटत दुरत जाइ मृग भागा।
रिस बस भूप चलेउ सँग लागा॥

अनुवाद (हिन्दी)

राजा नेम धरून बाण मारत होता, परंतु डुक्कर फसवून आपले शरीर वाचवीत होते. तो पशू कधी दिसायचा तर कधी लपत पळून जायचा. राजाही रागाने त्याच्या मागे लागला होता.॥ २॥

मूल (चौपाई)

गयउ दूरि घन गहन बराहू।
जहँ नाहिन गज बाजि निबाहू॥
अति अकेल बन बिपुल कलेसू।
तदपि न मृग मग तजइ नरेसू॥

अनुवाद (हिन्दी)

डुक्कर फार दूरच्या दाट जंगलात शिरले. तेथे हत्ती-घोडॺांचा निभाव लागत नव्हता. राजा अगदी एकटा होता आणि जंगलात त्रास फार होता, परंतु राजाने त्या पशूचा पिच्छा सोडला नाही.॥ ३॥

मूल (चौपाई)

कोल बिलोकि भूप बड़ धीरा।
भागि पैठ गिरिगुहाँ गभीरा॥
अगम देखि नृप अति पछिताई।
फिरेउ महाबन परेउ भुलाई॥

अनुवाद (हिन्दी)

राजा मोठा धैर्यवान् आहे, असे पाहून डुक्कर पळून पर्वतातील एका खोल गुहेत घुसले. त्यात शिरणे कठीण आहे, असे पाहून राजाला निराशेने परत फिरावे लागले. परंतु त्या घोर वनात तो रस्ता चुकला.॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

खेद खिन्न छुद्धित तृषित राजा बाजि समेत।
खोजत ब्याकुल सरित सर जल बिनु भयउ अचेत॥ १५७॥

अनुवाद (हिन्दी)

फार श्रम झाल्यामुळे थकलेला आणि घोडॺासह तहान-भुकेने व्याकूळ झालेला राजा नदी-तलाव शोधत पाण्याविना तळमळू लागला.॥ १५७॥

मूल (चौपाई)

फिरत बिपिन आश्रम एक देखा।
तहँ बस नृपति कपट मुनिबेषा॥
जासु देस नृप लीन्ह छड़ाई।
समर सेन तजि गयउ पराई॥

अनुवाद (हिन्दी)

वनात फिरता-फिरता त्याला एक आश्रम दिसला. तेथे एक कपटी राजा मुनीच्या वेषात राहात होता. त्याचे राज्य प्रतापभानू नावाच्या राजाने हिरावून घेतले होते आणि पराजित झाल्यामुळे तो सैन्य सोडून वनात पळून आला होता.॥ १॥

मूल (चौपाई)

समय प्रतापभानु कर जानी।
आपन अति असमय अनुमानी॥
गयउ न गृह मन बहुत गलानी।
मिला न राजहि नृप अभिमानी॥

अनुवाद (हिन्दी)

प्रतापभानूची वेळ चांगली आहे व आपले दिवस वाईट आहेत, असे पाहून राजाच्या मनास खूप दुःख झाले. त्यामुळे तो घरी गेला नाही आणि अभिमानी असल्यामुळे त्याने प्रतापभानूशी सख्यही केले नाही.॥ २॥

मूल (चौपाई)

रिस उर मारि रंक जिमि राजा।
बिपिन बसइ तापस कें साजा॥
तासु समीप गवन नृप कीन्हा।
यह प्रतापरबि तेहिं तब चीन्हा॥

अनुवाद (हिन्दी)

दरिद्री मनुष्याप्रमाणे मनातील राग दाबून टाकून तो राजा तपस्व्याच्या वेषात वनात राहत होता. राजा प्रतापभानू त्याच्याच जवळ गेला. कपटी राजाने ओळखले की, हा प्रतापभानू आहे.॥ ३॥

मूल (चौपाई)

राउ तृषित नहिं सो पहिचाना।
देखि सुबेष महामुनि जाना॥
उतरि तुरग तें कीन्ह प्रनामा।
परम चतुर न कहेउ निज नामा॥

अनुवाद (हिन्दी)

राजा प्रतापभानू तहानेने व्याकूळ असल्यामुळे त्या कपटॺाला मात्र ओळखू शकला नाही. त्याचा तो सुंदर मुनि-वेष पाहून राजाला तो महामुनी वाटला आणि घोडॺावरून उतरून त्याने त्याला प्रणाम केला. परंतु अतिशय चतुर असल्यामुळे राजाने त्याला आपले नाव मात्र सांगितले नाही.॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

भूपति तृषित बिलोकि तेहिं सरबरु दीन्ह देखाइ।
मज्जन पान समेत हय कीन्ह नृपति हरषाइ॥ १५८॥

अनुवाद (हिन्दी)

राजाला तहानलेला पाहून मुनीने त्याला सरोवर दाखविले. प्रतापभानूने आनंदाने घोडॺासह त्यात स्नान करून पाणी पिऊन घेतले.॥ १५८॥

मूल (चौपाई)

गै श्रम सकल सुखी नृप भयऊ।
निज आश्रम तापस लै गयऊ॥
आसन दीन्ह अस्त रबि जानी।
पुनि तापस बोलेउ मृदु बानी॥

अनुवाद (हिन्दी)

त्याचा थकवा दूर झाला, त्याला बरे वाटले. मग तो तपस्वी त्याला आपल्या आश्रमात घेऊन गेला. सूर्यास्ताची वेळ झाल्याचे पाहून राजाला बसण्यास आसन देऊन तपस्व्याने कोमल शब्दांत त्याला विचारले,॥ १॥

मूल (चौपाई)

को तुम्ह कस बन फिरहु अकेलें।
सुंदर जुबा जीव परहेलें॥
चक्रबर्ति के लच्छन तोरें।
देखत दया लागि अति मोरें॥

अनुवाद (हिन्दी)

‘तुम्ही कोण आहात? सुंदर तरुण असताना जिवाची पर्वा न करता वनात एकटे का फिरत आहात? तुमच्या ठिकाणी चक्रवर्ती राजाची लक्षणे पाहून मला तुमची कीव येते.’॥ २॥

मूल (चौपाई)

नाम प्रतापभानु अवनीसा।
तासु सचिव मैं सुनहु मुनीसा॥
फिरत अहेरें परेउँ भुलाई।
बड़ें भाग देखेउँ पद आई॥

अनुवाद (हिन्दी)

राजा म्हणाला, ‘हे मुनीश्वरा, ऐका. प्रतापभानू नावाचा एक राजा आहे, त्याचा मी मंत्री आहे. शिकारीसाठी फिरताना वाट चुकलो आहे. सुदैवाने येथे आल्यामुळे तुमच्या चरणांचे दर्शन घडले.॥ ३॥

मूल (चौपाई)

हम कहँ दुर्लभ दरस तुम्हारा।
जानत हौं कछु भल होनिहारा॥
कह मुनि तात भयउ अँधिआरा।
जोजन सत्तरि नगरु तुम्हारा॥

अनुवाद (हिन्दी)

मला तुमचे दुर्लभ दर्शन झाल्याने असे वाटते की, आता काही चांगले घडणार आहे.’ मुनी म्हणाला, ‘अरे बाबा, अंधार झालेला आहे. तुझे नगर येथून सत्तर योजने दूर आहे.॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

निसा घोर गंभीर बन पंथ न सुनहु सुजान।
बसहु आजु अस जानि तुम्ह जाएहु होत बिहान॥ १५९(क)॥

अनुवाद (हिन्दी)

हे शहाण्या गृहस्था! माझे ऐक. घोर अंधारी रात्र आहे, जंगलघनदाट आहे, वाट नाही, म्हणून तू आज येथेच थांब. सकाळ झाल्यावर जा.’॥ १५९(क)॥

मूल (दोहा)

तुलसी जसि भवतब्यता तैसी मिलइ सहाइ।
आपुनु आवइ ताहि पहिं ताहि तहाँ लै जाइ॥ १५९(ख)॥

अनुवाद (हिन्दी)

तुलसीदास म्हणतात की, ‘नशिबात जसे घडणार असते, तशीच घटना घडते. एक तर तुम्ही आपणाहून तिच्याजवळ जाता, किंवा ती तुम्हांला तेथे घेऊन जाते.॥१५९ (ख)॥

मूल (चौपाई)

भलेहिं नाथ आयसु धरि सीसा।
बाँधि तुरग तरु बैठ महीसा॥
नृप बहु भाँति प्रसंसेउ ताही।
चरन बंदि निज भाग्य सराही॥

अनुवाद (हिन्दी)

(राजा म्हणाला), ‘हे स्वामी! फार छान.’ असे म्हणून त्याची आज्ञा मानून राजाने घोडॺाला एका झाडाला बांधले आणि तो बसला. राजाने त्या मुनीची खूप प्रशंसा केली आणि त्याच्या चरणी वंदन करून तो आपल्या भाग्याची वाखाणणी करू लागला.॥ १॥

मूल (चौपाई)

पुनि बोलेउ मृदु गिरा सुहाई।
जानि पिता प्रभु करउँ ढिठाई॥
मोहि मुनीस सुत सेवक जानी।
नाथ नाम निज कहहु बखानी॥

अनुवाद (हिन्दी)

नंतर तो गोड वाणीने म्हणाला की, ‘हे प्रभो, मी तुम्हांला पित्याप्रमाणे समजून हे साहस करतो. हे मुनीश्वर, मला आपला पुत्र आणि सेवक समजून आपले नाव, गाव सविस्तर सांगा.’॥ २॥

मूल (चौपाई)

तेहि न जाननृप नृपहि सो जाना।
भूप सुहृद सो कपट सयाना॥
बैरी पुनि छत्री पुनि राजा।
छल बल कीन्ह चहइ निज काजा॥

अनुवाद (हिन्दी)

राजाने त्या कपटी मुनीला ओळखले नाही, परंतु त्याने राजाला ओळखले होते. राजाचे मन सरळ होते आणि तो मुनी कपट करण्यात चतुर होता. एकतर तो वैरी होता, त्यातून क्षत्रिय जातीचा. शिवाय राजा. तो कपटाने आपले काम करू पाहात होता.॥ ३॥

मूल (चौपाई)

समुझि राजसुख दुखित अराती।
अवाँ अनल इव सुलगइ छाती॥
सरल बचन नृप के सुनि काना।
बयर सँभारि हृदयँ हरषाना॥

अनुवाद (हिन्दी)

तो (मुनिवेषधारी) शत्रू आपल्या राज्यसुखाची आठवण करीत दुःखी होता. त्याचे मन कुंभाराच्या आव्याप्रमाणे आतून भाजून निघत होते.राजाचे साधे-भोळे शब्द ऐकून आणि आपले वैर मनात धरून तो आनंदी होत होता.॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

कपट बोरि बानी मृदुल बोलेउ जुगुति समेत।
नाम हमार भिखारि अब निर्धन रहित निकेत॥ १६०॥

अनुवाद (हिन्दी)

तो कपटाने मोठॺा युक्तीने कोमल वाणीने म्हणाला, ‘आता आमचे नाव ‘भिकारी’ आहे, कारण आम्ही निर्धन व घर-दार नसलेले आहोत.’॥ १६०॥

मूल (चौपाई)

कह नृप जे बिग्यान निधाना।
तुम्ह सारिखे गलित अभिमाना॥
सदा रहहिं अपनपौ दुराएँ।
सब बिधि कुसल कुबेष बनाएँ॥

अनुवाद (हिन्दी)

राजा म्हणाला, ‘तुमच्यासारखे जे विज्ञानी व निरभिमानी असतात, ते आपले खरे स्वरूप नेहमी लपवून ठेवतात. कारण दीन वेष धारण करून राहण्यातच सर्व प्रकारचे कल्याण आहे. (प्रकटपणे संतवेष असल्यासमान-सन्मान होण्याची शक्यता असते आणि मानामुळे पतन घडण्याची)॥ १॥

मूल (चौपाई)

तेहि तें कहहिं संत श्रुति टेरें।
परम अकिंचन प्रिय हरि केरें॥
तुम्ह सम अधन भिखारि अगेहा।
होत बिरंचि सिवहि संदेहा॥

अनुवाद (हिन्दी)

यामुळेच संत व वेद उच्च स्वराने म्हणतात की, परम अकिंचन (पूर्णपणे अहंकार, ममता व मानरहित) लोकच भगवंतांना आवडतात. तुमच्यासारखे निर्धन, भिकारी आणि गृहहीन लोक पाहून ब्रह्मदेव व शिव यांनाही संदेह होतो (की हे खरे संत आहेत की भिकारी.)॥ २॥

मूल (चौपाई)

जोसि सोसि तव चरन नमामी।
मो पर कृपा करिअ अब स्वामी॥
सहज प्रीति भूपति कै देखी।
आपु बिषय बिस्वास बिसेषी॥

अनुवाद (हिन्दी)

तुम्ही जे असाल ते असा. मी तुमच्या चरणी नमस्कार करतो. हे स्वामी, आता मजवर कृपा करा.’ आपल्यावरचे राजाचे सरळ प्रेम आणि आपल्याविषयीचा त्याचा विश्वास पाहून,॥ ३॥

मूल (चौपाई)

सब प्रकार राजहि अपनाई।
बोलेउ अधिक सनेह जनाई॥
सुनु सतिभाउ कहउँ महिपाला।
इहाँ बसत बीते बहु काला॥

अनुवाद (हिन्दी)

सर्व प्रकारे राजाला आपल्याला वश करून घेऊन मोठे प्रेम दाखवीत तो (कपटी तपस्वी) म्हणाला, ‘हे राजा, ऐक. मी तुला खरे सांगतो की, मला येथे राहून बराच काळ लोटला.॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

अब लगि मोहि न मिलेउ कोउ मैं न जनावउँ काहु।
लोकमान्यता अनल सम कर तप कानन दाहु॥ १६१(क)॥

अनुवाद (हिन्दी)

आजपर्यंत मला कोणी भेटले नाही आणि मीही कुणाला भेटत नाही. कारण जगात प्रतिष्ठा ही अग्नीप्रमाणे आहे. ती तपरूपी वन भस्म करून टाकते.’॥ १६१(क)॥

सोरठा

मूल (दोहा)

तुलसी देखि सुबेषु भूलहिं मूढ़ न चतुर नर।
सुंदर केकिहि पेखु बचन सुधा सम असन अहि॥ १६१(ख)॥

अनुवाद (हिन्दी)

तुलसीदास म्हणतात की, ‘सुंदर वेष पाहून मूर्खच नव्हे, तर चतुर मनुष्यसुद्धा फसतात. सुंदर मोर बघा ना! त्याचे बोल अमृतासारखे असतात आणि आहार मात्र सापाचा असतो.’॥ १६१(ख)॥

मूल (चौपाई)

तातें गुपुत रहउँ जग माहीं।
हरि तजि किमपि प्रयोजन नाहीं॥
प्रभु जानत सब बिनहिं जनाएँ।
कहहु कवनि सिधि लोक रिझाएँ॥

अनुवाद (हिन्दी)

कपट-स्वामी म्हणाला की, ‘यासाठी मी जगापासून लपून राहातो. श्रीहरींना सोडून कुणाशी काहीही संबंध ठेवीत नाही. प्रभू हे तर न सांगताच सर्व जाणतात. मग सांग. जगाला प्रसन्न केल्याने कसली सिद्धी मिळणार?॥ १॥

मूल (चौपाई)

तुम्ह सुचि सुमति परम प्रिय मोरें।
प्रीति प्रतीति मोहि पर तोरें॥
अब जौं तात दुरावउँ तोही।
दारुन दोष घटइ अति मोही॥

अनुवाद (हिन्दी)

तू पवित्र व सद्बुद्धीचा आहेस, त्यामुळे तू मला फार आवडतोस आणि तुझे प्रेम व विश्वास माझ्यावर आहे. म्हणून बाबा रे! आता जर मी तुझ्यापासून काही लपवून ठेवीन, तर मला भयंकर पाप लागेल.’॥ २॥

मूल (चौपाई)

जिमि जिमि तापसु कथइ उदासा।
तिमि तिमि नृपहि उपज बिस्वासा॥
देखा स्वबस कर्म मन बानी।
तब बोला तापस बगध्यानी॥

अनुवाद (हिन्दी)

तो तपस्वी जसजशा उदासीनतेच्या गोष्टी बोलत होता, तसातसा राजाला जास्त विश्वास वाटू लागला. जेव्हा त्या बगळॺाप्रमाणे ध्यान लावणाऱ्या (कपटी) मुनीने राजाला कायावाचामनाने सर्व प्रकारे आपल्याला वश झाल्याचे पाहिले, तेव्हा तो म्हणाला,॥ ३॥

मूल (चौपाई)

नाम हमार एकतनु भाई।
सुनि नृप बोलेउ पुनि सिरु नाई॥
कहहु नाम कर अरथ बखानी।
मोहि सेवक अति आपन जानी॥

अनुवाद (हिन्दी)

‘हे बंधो, आमचे नाव एकतनू आहे.’ हे ऐकून राजाने मस्तक नम्र करून म्हटले, ‘मला आपला अत्यंत प्रेमी सेवक समजून आपल्या नावाचा अर्थ समजावून सांगा.॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

आदिसृष्टि उपजी जबहिं तब उतपति भै मोरि।
नाम एकतनु हेतुु तेहि देह न धरी बहोरि॥ १६२॥

अनुवाद (हिन्दी)

तो कपटी मुनी म्हणाला, ‘जेव्हा सर्वप्रथम सृष्टी उत्पन्न झाली होती, तेव्हा माझी उत्पत्ती झाली होती. तेव्हापासून मी दुसरा देह धारण केलेला नाही. म्हणून माझे नाव ‘एकतनू’ असे आहे.॥ १६२॥

मूल (चौपाई)

जनि आचरजु करहु मन माहीं।
सुत तप तें दुर्लभ कछु नाहीं॥
तपबल तें जग सृजइ बिधाता।
तपबल बिष्नु भए परित्राता॥

अनुवाद (हिन्दी)

हे पुत्रा, मनात आश्चर्य करू नकोस. तपामुळे काहीही दुर्लभ नाही. तपानेच ब्रह्मदेव जगाची रचना करतात. तपामुळेच विष्णू हे जगाचे पालन करणारे झाले आहेत.॥ १॥

मूल (चौपाई)

तपबल संभु करहिं संघारा।
तप तें अगम न कछु संसारा॥
भयउ नृपहि सुनि अति अनुरागा।
कथा पुरातन कहै सो लागा॥

अनुवाद (हिन्दी)

तपामुळेच रुद्र संहार करतात. जगात अशी कोणतीही गोष्ट नाही की, जी तपामुळे मिळू शकणार नाही.’ हे ऐकून राजाला (त्याच्याविषयी अतिशय) प्रेम वाटू लागले. तेव्हा तो तपस्वी प्राचीन कथा सांगू लागला.॥ २॥

मूल (चौपाई)

करम धरम इतिहास अनेका।
करइ निरूपन बिरति बिबेका॥
उदभव पालन प्रलय कहानी।
कहेसि अमित आचरज बखानी॥

अनुवाद (हिन्दी)

कर्म, धर्म आणि अनेक तऱ्हेचे इतिहास सांगून तो वैराग्याचे आणि ज्ञानाचे निरूपण करू लागला. सृष्टीची उत्पत्ती, पालन आणि संहार यांच्या मोठॺा आश्चर्यकारक कथा त्याने विस्ताराने सांगितल्या.॥ ३॥

मूल (चौपाई)

सुनि महीप तापस बस भयऊ।
आपन नाम कहन तब लयऊ॥
कह तापस नृप जानउँ तोही।
कीन्हेहु कपट लाग भल मोही॥

अनुवाद (हिन्दी)

त्या गोष्टी ऐकून राजा त्या तपस्व्याच्या पूर्णपणे अधीन झाला आणि मग तो त्याला आपले नाव सांगू लागला. तपस्वी म्हणाला, ‘राजा, मी तुला जाणतो. तू कपटाने खोटे नाव सांगितलेस, ते मला आवडले.॥ ४॥

सोरठा

मूल (दोहा)

सुनु महीस असि नीति जहँ तहँ नाम न कहहिं नृप।
मोहि तोहि पर अति प्रीति सोइ चतुरता बिचारि तव॥ १६३॥

अनुवाद (हिन्दी)

हे राजन, ऐक. नीती असे सांगते की, राजे लोक वाटेल तेथे आपले नाव सांगत नाहीत. तुझे हे चातुर्य पाहून मला तुझ्याविषयी फार प्रेम वाटू लागले आहे.॥ १६३॥

मूल (चौपाई)

नाम तुम्हार प्रताप दिनेसा।
सत्यकेतु तव पिता नरेसा॥
गुर प्रसाद सब जानिअ राजा।
कहिअ न आपन जानि अकाजा॥

अनुवाद (हिन्दी)

तुझे नाव प्रतापभानू आहे. महाराज सत्यकेतू हे तुझे वडील होते. हे राजन, गुरूंच्या कृपेमुळे मी सर्व जाणतो, परंतु त्यात आपलाच तोटा समजून मी सांगत नाही.॥ १॥

मूल (चौपाई)

देखि तात तव सहज सुधाई।
प्रीति प्रतीति नीति निपुनाई॥
उपजि परी ममता मन मोरें।
कहउँ कथा निज पूछे तोरें॥

अनुवाद (हिन्दी)

हे राजन, तुझा सहज साधेपणा, प्रेम, विश्वास आणि नीति-निपुणता पाहून माझ्या मनात तुझ्याबद्दल ममता उत्पन्न झाली आहे. म्हणून मी तू न विचारता आपली कहाणी सांगतो.॥ २॥

मूल (चौपाई)

अब प्रसन्न मैं संसय नाहीं।
मागु जो भूप भाव मन माहीं॥
सुनि सुबचन भूपति हरषाना।
गहि पद बिनय कीन्हि बिधि नाना॥

अनुवाद (हिन्दी)

आता मी खूष आहे, यात शंका बाळगू नकोस. ‘हे राजन, मनात जे येईल, ते मागून घे.’ हे मनमोहक बोलणे ऐकून राजाला आनंद झाला आणि मुनीच्या पाया पडून त्याने विनवणी केली.॥ ३॥

मूल (चौपाई)

कृपासिंधु मुनि दरसन तोरें।
चारि पदारथ करतल मोरें॥
प्रभुहि तथापि प्रसन्न बिलोकी।
मागि अगम बर होउँ असोकी॥

अनुवाद (हिन्दी)

‘हे दयासागर मुनी, तुझ्या दर्शनानेच चारी पुरुषार्थ (धर्म, अर्थ, काम, मोक्ष) माझ्या हाती आले. तरीही स्वामींना प्रसन्न पाहून मी असा दुर्लभ वर मागतो की, मी शोकरहित व्हावे.॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

जरा मरन दुख रहित तनु समर जितै जनि कोउ।
एकछत्र रिपुहीन महि राज कलप सत होउ॥ १६४॥

अनुवाद (हिन्दी)

माझे शरीर वृद्धावस्था, मृत्यू आणि दुःखाने रहित होवो. मला युद्धात कुणीही जिंकू नये आणि पृथ्वीवर माझे शंभर कल्प एकछत्री राज्य असावे.’॥ १६४॥

मूल (चौपाई)

कह तापस नृप ऐसेइ होऊ।
कारन एक कठिन सुनु सोऊ॥
कालउ तुअ पद नाइहि सीसा।
एक बिप्रकुल छाड़ि महीसा॥

अनुवाद (हिन्दी)

तपस्वी म्हणाला, ‘हे राजन, ‘तथास्तु.’ परंतु एक गोष्ट कठीण वाटते, तीही ऐक. हे पृथ्वीपती फक्त ब्राह्मण कुलातील लोक सोडून प्रत्यक्ष काळसुद्धा तुझ्या चरणी मस्तक ठेवील.॥ १॥

मूल (चौपाई)

तपबल बिप्र सदा बरिआरा।
तिन्ह के कोप न कोउ रखवारा॥
जौं बिप्रन्ह बस करहु नरेसा।
तौ तुअ बस बिधि बिष्नु महेसा॥

अनुवाद (हिन्दी)

तपामुळे ब्राह्मण नेहमी बलवान असतात. त्यांचा क्रोध झाल्यास रक्षण करणारा कोणीही नाही. हे नरपती, जर तू ब्राह्मणांना वश केलेस, तर ब्रह्मदेव, विष्णू व महेश हे सुद्धा तुझ्या अधीन होतील.॥ २॥

मूल (चौपाई)

चल न ब्रह्मकुल सन बरिआई।
सत्य कहउँ दोउ भुजा उठाई॥
बिप्र श्राप बिनु सुनु महिपाला।
तोर नास नहिं कवनेहुँ काला॥

अनुवाद (हिन्दी)

ब्राह्मणांवर बळजबरी चालत नसते, हे मी दोन्ही हात उभारून सत्य सांगतो. हे राजा, ऐक. ब्राह्मणांच्या शापाशिवाय तुझा नाश कोणत्याही काळी होणार नाही.’॥ ३॥

मूल (चौपाई)

हरषेउ राउ बचन सुनि तासू।
नाथ न होइ मोर अब नासू॥
तव प्रसाद प्रभु कृपानिधाना।
मो कहुँ सर्ब काल कल्याना॥

अनुवाद (हिन्दी)

राजा ते बोलणे ऐकून अतिशय प्रसन्न झाला आणि म्हणाला, ‘हे स्वामी, आता माझा नाश कधीही होणार नाही. हे कृपानिधान प्रभो, तुमच्या कृपेने माझे आता नित्य कल्याण होईल.’॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

एवमस्तु कहि कपटमुनि बोला कुटिल बहोरि।
मिलब हमार भुलाब निज कहहु त हमहि न खोरि॥ १६५॥

अनुवाद (हिन्दी)

‘असेच होईल’, असे म्हणून तो कुटिल मुनी म्हणाला, ‘परंतु मला भेटला होतास आणि वाट चुकला होतास, ही गोष्ट जर कुणालाही सांगितलीस, तर मग (वर सफल न झाल्यास) आमचा दोष नाही.॥ १६५॥

मूल (चौपाई)

तातें मैं तोहि बरजउँ राजा।
कहें कथा तव परम अकाजा॥
छठें श्रवन यह परत कहानी।
नास तुम्हार सत्य मम बानी॥

अनुवाद (हिन्दी)

हे राजा, मी तुला एवढॺासाठी मनाई करतो की, हा प्रसंग कोणालाही सांगितल्यास तुझे मोठे नुकसान होईल. हे माझे सत्य वचन समज.॥ १॥

मूल (चौपाई)

यह प्रगटें अथवा द्विजश्रापा।
नास तोर सुनु भानुप्रतापा॥
आन उपायँ निधन तव नाहीं।
जौं हरि हर कोपहिं मन माहीं॥

अनुवाद (हिन्दी)

हे प्रतापभानू, ऐक. ही गोष्ट जाहीर करण्याने किंवा ब्राह्मणांच्याशापाने तुझा नाश होईल, इतर कोणत्याही कारणाने नाही. अगदी ब्रह्मदेव आणि शंकर हे सुद्धा तुझ्यावर रागावले, तरी तुला मृत्यू येणार नाही.’॥ २॥

मूल (चौपाई)

सत्य नाथ पद गहि नृप भाषा।
द्विज गुर कोप कहहु को राखा॥
राखइ गुर जौं कोप बिधाता।
गुर बिरोध नहिं कोउ जग त्राता॥

अनुवाद (हिन्दी)

राजाने मुनीचे पाय धरून म्हटले, ‘हे स्वामी, खरेच आहे. ब्राह्मण आणि गुरूच्या क्रोधापासून बचाव कोण बरे करणार? सांगा. जरी ब्रह्मदेव रागावले, तरी गुरू वाचवितो, पण गुरू रागावले, तर जगात कोणीही वाचविणारा नाही.॥ ३॥

मूल (चौपाई)

जौं न चलब हम कहे तुम्हारें।
होउ नास नहिं सोच हमारें॥
एकहिं डर डरपत मन मोरा।
प्रभु महिदेव श्राप अति घोरा॥

अनुवाद (हिन्दी)

जर मी तुमच्या म्हणण्याप्रमाणे वागलो नाही, तर खुशाल मला मृत्यू येवो. मला त्याची काळजी नाही. पण माझ्या मनात एकच भीती आहे. ती म्हणजे ब्राह्मणांचा शाप भयंकर असतो.॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

होहिं बिप्र बस कवन बिधि कहहु कृपा करि सोउ।
तुम्ह तजि दीनदयाल निज हितू न देखउँ कोउ॥ १६६॥

अनुवाद (हिन्दी)

ते ब्राह्मण कोणत्या प्रकारे वश होऊ शकतील, तेही कृपा करून मला सांगा. हे दीनदयाळू, तुम्हांला सोडून दुसऱ्या कुणालाही मी आपला हितचिंतक समजत नाही.’॥ १६६॥

मूल (चौपाई)

सुनु नृप बिबिध जतन जग माहीं।
कष्टसाध्य पुनि होहिं कि नाहीं॥
अहइ एक अति सुगम उपाई।
तहाँ परंतु एक कठिनाई॥

अनुवाद (हिन्दी)

(तपस्वी म्हणाला,) ‘हे राजा, जगात अनेक उपाय आहेत, परंतु ते कष्टसाध्य आहेत आणि त्यामुळे ते सिद्ध होतील किंवा न होतील (सांगतायेत नाही.) एक उपाय फार सोपा आहे, परंतु त्यातही एक अडचण आहे.॥ १॥

मूल (चौपाई)

मम आधीन जुगुति नृप सोई।
मोर जाब तव नगर न होई॥
आजु लगें अरु जब तें भयऊँ।
काहू के गृह ग्राम न गयऊँ॥

अनुवाद (हिन्दी)

हे राजा, ती युक्ती माझ्याजवळ आहे. पण तुझ्या नगरात मला जाता येणार नाही. जेव्हापासून मी उत्पन्न झालो, तेव्हापासून आजपर्यंत मी कुणाच्या घरी किंवा गावी गेलो नाही.॥ २॥

मूल (चौपाई)

जौं न जाउँ तव होइ अकाजू।
बना आइ असमंजस आजू॥
सुनि महीस बोलेउ मृदु बानी।
नाथ निगम असि नीति बखानी॥

अनुवाद (हिन्दी)

परंतु जर गेलो नाही तर तुझे काम फिसकटेल. आज मी मोठॺा पेचात सापडलो आहे.’हे ऐकून राजा मृदू स्वरात म्हणाला, ‘हे नाथ, वेदांमध्ये असे सांगितले आहे की,॥ ३॥

मूल (चौपाई)

बड़े सनेह लघुन्ह पर करहीं।
गिरि निज सिरनि सदा तृन धरहीं॥
जलधि अगाध मौलि बह फेनू।
संतत धरनि धरत सिर रेनू॥

अनुवाद (हिन्दी)

मोठी माणसे लहानांच्यावर प्रेम करतातच. पर्वत आपल्या शिरावर नेहमी गवत धारण करतात, खोल समुद्र स्वतःच्या मस्तकावर फेस धारण करतात आणि धरती आपल्या डोक्यावर धूळ धारण करते.’॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

अस कहि गहे नरेस पद स्वामी होहु कृपाल।
मोहि लागि दुख सहिअ प्रभु सज्जन दीनदयाल॥ १६७॥

अनुवाद (हिन्दी)

असे म्हणून राजाने मुनीचे पाय धरले. (आणि म्हटले,) ‘हे स्वामी, कृपा करा. तुम्ही संत आहात. दीनदयाळू आहात. म्हणून हे प्रभो, माझ्यासाठी एवढा त्रास जरूर सोसा.’॥ १६७॥

मूल (चौपाई)

जानि नृपहि आपन आधीना।
बोला तापस कपट प्रबीना॥
सत्य कहउँ भूपति सुनु तोही।
जग नाहिन दुर्लभ कछु मोही॥

अनुवाद (हिन्दी)

राजा आपल्या पूर्ण अधीन झाला आहे, हे पाहून कपटी तपस्वी म्हणाला, ‘हे राजा! ऐक. मी तुला खरे सांगतो. या जगात मला काहीही कठीण नाही.॥ १॥

मूल (चौपाई)

अवसि काज मैं करिहउँ तोरा।
मन तन बचन भगत तैं मोरा॥
जोग जुगुति तप मंत्र प्रभाऊ।
फलइ तबहिं जब करिअ दुराऊ॥

अनुवाद (हिन्दी)

मी तुझे काम नक्की करीन. कारण तू कायावाचामनाने माझा भक्त झाला आहेस. परंतु योग, युक्ती आणि मंत्र यांचा प्रभाव गुप्तपणे केल्यावरच फल देतो.॥ २॥

मूल (चौपाई)

जौं नरेस मैं करौं रसोई।
तुम्ह परुसहु मोहि जान न कोई॥
अन्न सो जोइ जोइ भोजन करई।
सोइ सोइ तव आयसु अनुसरई॥

अनुवाद (हिन्दी)

हे राजा! मी जर स्वयंपाक केला व तुम्ही तो वाढला, पण मी जर कुणालाही ओळखू आलो नाही, तर मग ते अन्न जो जो खाईल, तो तो तुमचा आज्ञाधारक होईल.॥ ३॥

मूल (चौपाई)

पुनि तिन्ह के गृह जेवँइ जोऊ।
तव बस होइ भूप सुनु सोऊ॥
जाइ उपाय रचहु नृप एहू।
संबत भरि संकलप करेहू॥

अनुवाद (हिन्दी)

एवढेच नव्हे, तर त्यांच्या घरीसुद्धा जो कोणी हे भोजन करील, हे राजा, तो सुद्धा तुझ्या अधीन होईल. हे राजा, जाऊन हा उपाय कर आणि वर्षभर भोजन घालण्याचा संकल्प कर.॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

नित नूतन द्विज सहस सत बरेहु सहित परिवार।
मैं तुम्हरे संकलप लगि दिनहिं करबि जेवनार॥ १६८॥

अनुवाद (हिन्दी)

नित्य नव्या एक लाख ब्राह्मणांना कुटुंबासह निमंत्रित कर. मी तुझ्या संकल्पापर्यंत (वर्षभर) रोज स्वयंपाक करीन.॥ १६८॥

मूल (चौपाई)

एहि बिधि भूप कष्ट अति थोरें।
होइहहिं सकल बिप्र बस तोरें॥
करिहहिं बिप्र होम मख सेवा।
तेहिं प्रसंग सहजेहिं बस देवा॥

अनुवाद (हिन्दी)

हे राजा, अशा प्रकारे फार थोडॺा श्रमाने सर्व ब्राह्मण तुला वश होतील. ब्राह्मण हवन, यज्ञ आणि सेवा-पूजा करतील, त्यामुळे देवसुद्धा सहजपणे वश होतील.॥ १॥

मूल (चौपाई)

और एक तोहि कहउँ लखाऊ।
मैं एहि बेष न आउब काऊ॥
तुम्हरे उपरोहित कहुँ राया।
हरि आनब मैं करि निज माया॥

अनुवाद (हिन्दी)

मी आणखी एक ओळख तुला सांगून ठेवतो. मी या रूपात कधीही येणार नाही. हे राजा, मी आपल्या मायेने तुझ्या पुरोहिताला इकडे पळवून आणीन.॥ २॥

मूल (चौपाई)

तपबल तेहि करि आपु समाना।
रखिहउँ इहाँ बरष परवाना॥
मैं धरि तासु बेषु सुनु राजा।
सब बिधि तोर सँवारब काजा॥

अनुवाद (हिन्दी)

तपाच्या शक्तीने त्याला स्वतःसारखा बनवून एक वर्ष येथे ठेवून घेईन आणि हे राजा, मी त्याचे रूप घेऊन सर्व प्रकारे तुझे काम पूर्ण करीन.॥ ३॥

मूल (चौपाई)

गै निसि बहुत सयन अब कीजे।
मोहि तोहि भूप भेंट दिन तीजे॥
मैं तपबल तोहि तुरग समेता।
पहुँचैहउँ सोवतहि निकेता॥

अनुवाद (हिन्दी)

हे राजा, रात्र फार झाली आहे, आता झोप. आजपासून तिसऱ्या दिवशी माझी-तुझी भेट होईल. तपोबलाने मी तुला घोडॺासह झोपेमध्ये असतानाच घरी पोहोचवीन.॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

मैं आउब सोइ बेषु धरि पहिचानेहु तब मोहि।
जब एकांत बोलाइ सब कथा सुनावौं तोहि॥ १६९॥

अनुवाद (हिन्दी)

मी तो पुरोहिताचा वेष घेऊन येईन. जेव्हा एकांतात बोलावून सर्व गोष्टी सांगेन, तेव्हा तू मला ओळखशील.’॥ १६९॥

मूल (चौपाई)

सयन कीन्ह नृप आयसु मानी।
आसन जाइ बैठ छलग्यानी॥
श्रमित भूप निद्रा अति आई।
सो किमि सोव सोच अधिकाई॥

अनुवाद (हिन्दी)

राजा ती आज्ञा मानून झोपी गेला आणि तो कपटी तपस्वी आसनावर जाऊन बसला. राजा थकला होता, त्याला फार गाढ झोप आली. पण तो कपटी कसा झोपणार? त्याला फार काळजी वाटत होती.॥ १॥

मूल (चौपाई)

कालकेतु निसिचर तहँ आवा।
जेहिं सूकर होइ नृपहि भुलावा॥
परम मित्र तापस नृप केरा।
जानइ सो अति कपट घनेरा॥

अनुवाद (हिन्दी)

त्याच वेळी तेथे कालकेतू नावाचा राक्षस आला. त्याने डुक्कराचे रूप घेऊन राजाची दमछाक केली होती. तो तपस्वी बनलेल्या राजाचा खास मित्र होता आणि कपट विद्येत निष्णात होता.॥ २॥

मूल (चौपाई)

तेहि के सत सुत अरु दस भाई।
खल अति अजय देव दुखदाई॥
प्रथमहिं भूप समर सब मारे।
बिप्र संत सुर देखि दुखारे॥

अनुवाद (हिन्दी)

त्याला शंभर मुले आणि दहा भाऊ होते. ते फार दुष्ट व अजिंक्य होते. देवांना दुःख देणारे होते. ब्राह्मण, संत आणि देवांना दुःखी झाल्याचे पाहून प्रतापभानूने त्या सर्वांना पूर्वीच युद्धात मारून टाकले होते.॥ ३॥

मूल (चौपाई)

तेहिं खल पाछिल बयरु सँभारा।
तापस नृप मिलि मंत्र बिचारा॥
जेहिं रिपु छय सोइ रचेन्हि उपाऊ।
भावी बस न जान कछु राऊ॥

अनुवाद (हिन्दी)

त्या दुष्टाने पूर्वीचे वैर लक्षात घेऊन कपटी तपस्वी-राजाला भेटून त्याच्याशी सल्लामसलत केली आणि शत्रूचा नाश ज्याप्रकारे होईल, तो उपाय योजला. भवितव्यतेच्या अधीन झालेला राजा (प्रतापभानू) काहीही समजू शकला नाही.॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

रिपु तेजसी अकेल अपि लघु करि गनिअ न ताहु।
अजहुँ देत दुख रबि ससिहि सिर अवसेषित राहु॥ १७०॥

अनुवाद (हिन्दी)

तेजस्वी शत्रू एकटा असला, तरी त्याला लहान समजू नये. पाहा,ज्याचे फक्त शिर उरले आहे, तो राहू अजूनही सूर्य-चंद्राला छळत असतो.॥ १७०॥

मूल (चौपाई)

तापस नृप निज सखहि निहारी।
हरषि मिलेउ उठि भयउ सुखारी॥
मित्रहि कहि सब कथा सुनाई।
जातुधान बोला सुख पाई॥

अनुवाद (हिन्दी)

तपस्वी-राजा आपल्या मित्राला पाहून प्रसन्न झाला. उठून तो त्याला भेटला. त्याला फार आनंद झाला होता. त्याने आपल्या मित्राला (कालकेतूला) सर्व गोष्टी सांगितल्या, तेव्हा तो राक्षस आनंदित होऊन म्हणाला,॥ १॥

मूल (चौपाई)

अब साधेउँ रिपु सुनहु नरेसा।
जौं तुम्ह कीन्ह मोर उपदेसा॥
परिहरि सोच रहहु तुम्ह सोई।
बिनु औषध बिआधि बिधि खोई॥

अनुवाद (हिन्दी)

‘हे राजा, जेव्हा तू माझ्या म्हणण्याप्रमाणे इतके काम केले आहेस, तर आता मी शत्रूला ताब्यात घेतलेच, असे समज. आता तू काळजी सोडून झोप. विधात्याने औषधाविना रोग बरा केला आहे.॥ २॥

मूल (चौपाई)

कुल समेत रिपु मूल बहाई।
चौथें दिवस मिलब मैं आई॥
तापस नृपहि बहुत परितोषी।
चला महाकपटी अतिरोषी॥

अनुवाद (हिन्दी)

शत्रूला त्याच्या कुळासह मुळापासून उध्वस्त करून आजपासून चौथ्या दिवशी मी येऊन तुला भेटेन.’ (अशा प्रकारे) तपस्वी राजाला मोठा दिलासा देऊन तो महामायावी आणि अत्यंत रागीट राक्षस तेथून निघाला.॥ ३॥

मूल (चौपाई)

भानुप्रतापहि बाजि समेता।
पहुँचाएसि छन माझ निकेता॥
नृपहि नारि पहिं सयन कराई।
हयगृहँ बाँधेसि बाजि बनाई॥

अनुवाद (हिन्दी)

त्याने राजा प्रतापभानूला घोडॺासह एका क्षणात घरी पोहोचविले आणि राजाला राणीजवळ झोपवून घोडॺाला पागेत नीट बांधून ठेवले.॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

राजा के उपरोहितहि हरि लै गयउ बहोरि।
लै राखेसि गिरि खोह महुँ मायाँ करि मति भोरि॥ १७१॥

अनुवाद (हिन्दी)

नंतर तो तेथील राजाच्या पुरोहिताला उचलून घेऊन गेला. आपल्या मायेने त्याच्या बुद्धीत भम्र उत्पन्न करून त्याने त्याला पर्वताच्या गुहेत आणून ठेवले.॥ १७१॥

मूल (चौपाई)

आपु बिरचि उपरोहित रूपा।
परेउ जाइ तेहि सेज अनूपा॥
जागेउ नृप अनभएँ बिहाना।
देखि भवन अति अचरजु माना॥

अनुवाद (हिन्दी)

तो स्वतः पुरोहिताचे रूप घेऊन त्याच्या सुंदर अंथरुणावर जाऊन झोपला. राजा सकाळ होण्यापूर्वीच जागा झाला आणि आपले घर पाहून थक्क झाला.॥ १॥

मूल (चौपाई)

मुनि महिमा मन महुँ अनुमानी।
उठेउ गवँहिं जेहिं जान न रानी॥
कानन गयउ बाजि चढ़ि तेहीं।
पुर नर नारि न जानेउ केहीं॥

अनुवाद (हिन्दी)

मुनीच्या महिम्याचा अंदाज येऊन राणीला कळू नये म्हणून तो हळूच उठला. नंतर त्याच घोडॺावर बसून वनात निघून गेला. नगरातील कोणाही स्त्री-पुरुषाला हे कळले सुद्धा नाही.॥ २॥

मूल (चौपाई)

गएँ जाम जुग भूपति आवा।
घर घर उत्सव बाज बधावा॥
उपरोहितहि देख जब राजा।
चकित बिलोक सुमिरि सोइ काजा॥

अनुवाद (हिन्दी)

दोन प्रहर उलटल्यावर राजा परत आला. घरोघरी उत्सव साजरा होऊ लागला आणि मंगल गाणी गाईली जाऊ लागली. जेव्हा राजाने पुरोहिताला पाहिले, तेव्हा तो आपल्या त्या कार्याची आठवण करीत आश्चर्याने पाहू लागला.॥ ३॥

मूल (चौपाई)

जुग सम नृपहि गए दिन तीनी।
कपटी मुनि पद रह मति लीनी॥
समय जानि उपरोहित आवा।
नृपहि मते सब कहि समुझावा॥

अनुवाद (हिन्दी)

राजाचे तीन दिवस जणू तीन युगांप्रमाणे गेले. त्याची बुद्धी कपटी मुनीच्या चरणी लागून राहिली होती. ठरल्यावेळी पुरोहित (बनलेला राक्षस) आला आणि राजाबरोबर त्याच्या झालेल्या गुप्त मसलतीप्रमाणे त्याने आपले विचार त्याला समजावून सांगितले.॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

नृप हरषेउ पहिचानि गुरु भ्रम बस रहा न चेत।
बरे तुरत सत सहस बर बिप्र कुटुंब समेत॥ १७२॥

अनुवाद (हिन्दी)

(ठरल्याप्रमाणे) गुरूला (त्या रूपात) ओळखल्यामुळे राजा आनंदित झाला. तो भ्रमित झाल्यामुळे सारासार विचार उरला नाही की, हा तपस्वी मुनी आहे की कालकेतू राक्षस. त्याने लागलीच एक लाख उत्तम ब्राह्मणांना कुटुंबासह निमंत्रण दिले.॥ १७२॥

मूल (चौपाई)

उपरोहित जेवनार बनाई।
छरस चारि बिधि जसि श्रुति गाई॥
मायामय तेहिं कीन्हि रसोई।
बिंजन बहु गनि सकइ न कोई॥

अनुवाद (हिन्दी)

कपटी पुरोहिताने वेदांत सांगितल्याप्रमाणे षड्रसपूर्ण (भक्ष्य, भोज्य, लेह्य व चोष्य असे) चार प्रकारचे भोजन बनविले. त्याने मायेने स्वयंपाक तयार केला आणि इतकी तोंडी लावणी बनविली की, त्यांची गणती करता येणार नाही.॥ १॥

मूल (चौपाई)

बिबिध मृगन्ह कर आमिष राँधा।
तेहि महुँ बिप्र माँसु खल साँधा॥
भोजन कहुँ सब बिप्र बोलाए।
पद पखारि सादर बैठाए॥

अनुवाद (हिन्दी)

अनेक प्रकारच्या पशूंचे मांस शिजविले आणि त्या दुष्टाने त्यामध्ये ब्राह्मणांचे मांस मिसळले. सर्व ब्राह्मणांना जेवायला बोलाविले आणि त्यांचे पाय धुऊन त्यांना आदराने आसनावर बसविले.॥ २॥

मूल (चौपाई)

परुसन जबहिं लाग महिपाला।
भै अकासबानी तेहि काला॥
बिप्रबृंद उठि उठि गृह जाहू।
है बड़ि हानि अन्न जनि खाहू॥

अनुवाद (हिन्दी)

राजा वाढू लागला, इतक्यात (कालकेतूने केलेली) आकाशवाणी झाली, ‘हे ब्राह्मणांनो, उठून आपापल्या घरी जा. हे अन्न खाऊ नका. हे खाल्‍ल्यास मोठा अनर्थ होईल.॥ ३॥

मूल (चौपाई)

भयउ रसोईं भूसुर माँसू।
सब द्विज उठे मानि बिस्वासू॥
भूप बिकल मति मोहँ भुलानी।
भावी बस न आव मुख बानी॥

अनुवाद (हिन्दी)

स्वयंपाक घरात ब्राह्मणांचे मांस शिजविले आहे.’ आकाशवाणीवर विश्वास ठेवून सर्व ब्राह्मण उठले. राजा व्याकूळ झाला. त्याची बुद्धी भ्रमामुळे भुलून गेली होती. भवितव्यामुळे त्याच्या तोंडून एक शब्दही निघाला नाही.॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

बोले बिप्र सकोप तब नहिं कछु कीन्ह बिचार।
जाइ निसाचर होहु नृप मूढ़ सहित परिवार॥ १७३॥

अनुवाद (हिन्दी)

तेव्हा ब्राह्मण कोणताही विचार न करता पानावरून उठून रागाने म्हणाले, ‘मूर्ख राजा, तू कुटुंबासह राक्षस हो,॥ १७३॥

मूल (चौपाई)

छत्रबंधु तैं बिप्र बोलाई।
घालै लिए सहित समुदाई॥
ईस्वर राखा धरम हमारा।
जैहसि तैं समेत परिवारा॥

अनुवाद (हिन्दी)

अरे नीच क्षत्रिया, तू परिवारासह ब्राह्मणांना बोलावून त्यांना तू भ्रष्ट करू इच्छित होतास. परमेश्वरानेच आमच्या धर्माचे रक्षण केले. आता तू परिवारासह नष्ट होशील.॥ १॥

मूल (चौपाई)

संबत मध्य नास तव होऊ।
जलदाता न रहिहि कुल कोऊ॥
नृप सुनि श्राप बिकल अति त्रासा।
भै बहोरि बर गिरा अकासा॥

अनुवाद (हिन्दी)

एका वर्षात तुझा नाश होईल. तुझ्या कुळात पाणी देणारेही कोणी उरणार नाही.’ शाप ऐकून राजा भयाने अत्यंत व्याकूळ झाला. नंतर खरी आकाशवाणी झाली.॥ २॥

मूल (चौपाई)

बिप्रहु श्राप बिचारि न दीन्हा।
नहिं अपराध भूप कछु कीन्हा॥
चकित बिप्र सब सुनि नभबानी।
भूप गयउ जहँ भोजन खानी॥

अनुवाद (हिन्दी)

‘हे ब्राह्मणांनो, तुम्ही विचार करून शाप दिला नाही. राजाने कोणताही अपराध केलेला नाही.’ ही आकाशवाणी ऐकून सर्व ब्राह्मण चकित झाले. तेव्हा राजा स्वतः भोजन बनविले होते, त्या ठिकाणी गेला.॥ ३॥

मूल (चौपाई)

तहँ न असन नहिं बिप्र सुआरा।
फिरेउ राउ मन सोच अपारा॥
सब प्रसंग महिसुरन्ह सुनाई।
त्रसित परेउ अवनीं अकुलाई॥

अनुवाद (हिन्दी)

तेथे पाहिले तर स्वयंपाकही नव्हता आणि तो ब्राह्मण स्वयंपाकीही नव्हता. राजा अतिशय उद्विग्न होऊन परत आला. त्याने ब्राह्मणांना सर्व वार्ता सांगितली आणि भयभीत व व्याकूळ होऊन त्याने भूमीवर लोटांगण घातले.॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

भूपति भावी मिटइ नहिं जदपि न दूषन तोर।
किएँ अन्यथा होइ नहिं बिप्रश्राप अति घोर॥ १७४॥

अनुवाद (हिन्दी)

(ब्राह्मण म्हणाले,) ‘हे राजा, जरी तुझा काही दोष नसला, तरी होणारे चुकत नाही. ब्राह्मणांचा शाप हा फार भयानक असतो. तो टाळला तरी टाळता येत नाही.’॥ १७४॥

मूल (चौपाई)

अस कहि सब महिदेव सिधाए।
समाचार पुरलोगन्ह पाए॥
सोचहिं दूषन दैवहि देहीं।
बिरचत हंस काग किय जेहीं॥

अनुवाद (हिन्दी)

असे म्हणून सर्व ब्राह्मण निघून गेले. नगरवासीयांनी जेव्हा हे वर्तमान ऐकले, तेव्हा ते काळजीत पडले आणि विधात्याला दोष देऊ लागले. विधात्याने हंस बनविण्याऐवजी हंसाचा कावळा करून टाकला. (अशा पुण्यात्म्या राजाला देवता बनवावयास हवे होते, तर राक्षस करून टाकले.)॥ १॥

मूल (चौपाई)

उपरोहितहि भवन पहुँचाई।
असुर तापसहि खबरि जनाई॥
तेहिं खल जहँ तहँ पत्र पठाए।
सजि सजि सेन भूप सब धाए॥

अनुवाद (हिन्दी)

(इकडे) पुरोहिताला त्याच्या घरी पोहोचविल्यावर असुर कालकेतूने कपटी तपस्व्याला सर्व वार्ता सांगितली. त्या दुष्टाने जिकडे-तिकडे पत्रे पाठविली. त्यामुळे प्रतापभानू राजाचे सर्व शत्रुराजे सेना सज्ज करून चालून आले.॥ २॥

मूल (चौपाई)

घेरेन्हि नगर निसान बजाई।
बिबिध भाँति नित होइ लराई॥
जूझे सकल सुभट करि करनी।
बंधु समेत परेउ नृप धरनी॥

अनुवाद (हिन्दी)

त्यांनी रणभेरी वाजवून नगराला वेढा घातला. सतत तऱ्हेतऱ्हेने लढाया होऊ लागल्या. प्रतापभानूचे सर्व शूर योद्धे लढत-लढत धारातीर्थी पडले. भावाबरोबर राजाही ठार झाला.॥ ३॥

मूल (चौपाई)

सत्यकेतु कुल कोउ नहिं बाँचा।
बिप्रश्राप किमि होइ असाँचा॥
रिपु जिति सब नृप नगर बसाई।
निज पुर गवने जय जसु पाई॥

अनुवाद (हिन्दी)

सत्यकेतूच्या कुळातील कोणीही वाचले नाही. ब्राह्मणांचा शाप खोटा कसा ठरणार? शत्रूला जिंकल्यावर, नगर पुन्हा वसवून सर्व राजे विजय व कीर्ती मिळवून आपापल्या देशी परतले.॥ ४॥