३६ मनु-शतरूपा यांना वरदान

दोहा

मूल (दोहा)

सो मैं तुम्ह सन कहउँ सबु सुनु मुनीस मन लाइ।
राम कथा कलि मल हरनि मंगल करनि सुहाइ॥ १४१॥

अनुवाद (हिन्दी)

हे मुनीश्वर भरद्वाज, मी ते सर्व तुम्हांला सांगतो. लक्ष देऊन ऐका. श्रीरामांची कथा ही कलियुगातील पापांचे हरण करणारी, कल्याण करणारी आणि फार सुंदर आहे.॥ १४१॥

मूल (चौपाई)

स्वायंभू मनु अरु सतरूपा।
जिन्ह तें भै नरसृष्टि अनूपा॥
दंपति धरम आचरन नीका।
अजहुँ गाव श्रुति जिन्ह कै लीका॥

अनुवाद (हिन्दी)

स्वायंभुव मनू आणि त्यांची पत्नी शतरूपा, यांच्यापासून मनुष्यांची ही अनुपम सृष्टी निर्माण झाली. या दोघा पति-पत्नींचे धर्म व आचरण हे फार चांगले होते. वेद आजसुद्धा त्यांची प्रशंसा करतात.॥ १॥

मूल (चौपाई)

नृप उत्तानपाद सुत तासू।
ध्रुव हरिभगत भयउ सुत जासू॥
लघु सुत नाम प्रियब्रत ताही।
बेद पुरान प्रसंसहिं जाही॥

अनुवाद (हिन्दी)

राजा उत्तानपाद त्यांचा पुत्र होता. त्यांचाच पुत्र प्रसिद्ध हरिभक्त ध्रुव झाला. त्या मनूच्या धाकटॺा मुलाचे नाव प्रियव्रत होते. त्याची प्रशंसा वेद आणि पुराणे यांनी केली आहे.॥ २॥

मूल (चौपाई)

देवहूति पुनि तासु कुमारी।
जो मुनि कर्दम कै प्रिय नारी॥
आदिदेव प्रभु दीनदयाला।
जठर धरेउ जेहिं कपिल कृपाला॥

अनुवाद (हिन्दी)

तसेच देवहूती ही त्या मनूची कन्या होती. ती कर्दम मुनींची आवडती पत्नी होती. तिने आदिदेव, दीनांवर दया करणारे समर्थ व कृपाळू भगवान कपिल यांना गर्भात धारण केले.॥ ३॥

मूल (चौपाई)

सांख्य सास्त्र जिन्ह प्रगट बखाना।
तत्त्व बिचार निपुन भगवाना॥
तेहिं मनु राज कीन्ह बहु काला।
प्रभु आयसु सब बिधि प्रतिपाला॥

अनुवाद (हिन्दी)

तत्त्वांचा विचार करण्यामध्ये अत्यंत निपुण असलेल्या भगवान कपिल मुनींनी सांख्यशास्त्राचे प्रकट वर्णन केले. स्वायंभुव मनूंनी बराच काळ राज्य केले आणि सर्व प्रकारे भगवंतांच्या आज्ञारूप शास्त्रांच्या मर्यादेचे पालन केले.॥ ४॥

सोरठा

मूल (दोहा)

होइ न बिषय बिराग भवन बसत भा चौथपन।
हृदयँ बहुत दुख लाग जनम गयउ हरिभगति बिनु॥ १४२॥

अनुवाद (हिन्दी)

राजप्रासादात राहाता-राहाता म्हातारपण आले, परंतु विषयांबद्दल वैराग्य होत नव्हते. (असा विचार करून) त्यांच्या मनात अतिशय दुःख झाले की, श्रीहरींच्या भक्तीविना जन्म फुकट गेला.॥ १४२॥

मूल (चौपाई)

बरबस राज सुतहि तब दीन्हा।
नारि समेत गवन बन कीन्हा॥
तीरथ बर नैमिष बिख्याता।
अति पुनीत साधक सिधि दाता॥

अनुवाद (हिन्दी)

तेव्हा मनूंनी आपल्या मुलाला आग्रहाने राज्य दिले आणि स्वतः पत्नीसह वनगमन केले. अत्यंत पवित्र व साधकांना सिद्धी देणाऱ्या तीर्थांमध्ये श्रेष्ठ असलेले नैमिषारण्य प्रसिद्ध आहे.॥ १॥

मूल (चौपाई)

बसहिं तहाँ मुनि सिद्ध समाजा।
तहँ हियँ हरषि चलेउ मनु राजा॥
पंथ जात सोहहिं मतिधीरा।
ग्यान भगति जनु धरें सरीरा॥

अनुवाद (हिन्दी)

तेथे मुनींचे व सिद्धांचे समुदाय राहातात. राजा मनू आनंदित मनाने तेथे गेला. ते धीर बुद्धीचे राजा-राणी वाटेने जाताना असे शोभत होते की, जणू ज्ञान आणि भक्ती शरीर धारण करून निघाले आहेत.॥ २॥

मूल (चौपाई)

पहुँचे जाइ धेनुमति तीरा।
हरषि नहाने निरमल नीरा॥
आए मिलन सिद्ध मुनि ग्यानी।
धरम धुरंधर नृपरिषि जानी॥

अनुवाद (हिन्दी)

(जाता-जाता) ते गोमतीच्या किनारी पोहोचले. त्यांनी आनंदाने निर्मल जळात (पाण्यात) स्नान केले. त्यांना धर्मधुरंधर राजर्षी समजून सिद्ध व ज्ञानी मुनी त्यांना भेटण्यास आले.॥ ३॥

मूल (चौपाई)

जहँ जहँ तीरथ रहे सुहाए।
मुनिन्ह सकल सादर करवाए॥
कृस सरीर मुनिपट परिधाना।
सत समाज नित सुनहिं पुराना॥

अनुवाद (हिन्दी)

जेथे जेथे सुंदर तीर्थे होती ती सर्व तीर्थे मुनींनी मोठॺा आदराने मनूंना घडविली. त्यांचे शरीर दुर्बल झाले होते. ते मुनींच्यासारखी वल्कले धारण करीत आणि संत मंडळीत बसून नित्य पुराणश्रवण करीत होते.॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

द्वादस अच्छर मंत्र पुनि जपहिं सहित अनुराग।
बासुदेव पद पंकरुह दंपति मन अति लाग॥ १४३॥

अनुवाद (हिन्दी)

तसेच द्वादशाक्षरी मंत्र ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय’ याचा अत्यंत भक्तिभावाने जप करीत असत. भगवान वासुदेवांच्या चरणकमली राजा-राणीचे मन खूप रमले होते.॥ १४३॥

मूल (चौपाई)

करहिं अहार साक फल कंदा।
सुमिरहिं ब्रह्म सच्चिदानंदा॥
पुनि हरि हेतु करन तप लागे।
बारि अधार मूल फल त्यागे॥

अनुवाद (हिन्दी)

ते पालेभाज्या, फळे व कंदमुळे यांचा आहार घेत आणि सच्चिदानंद ब्रह्माचे स्मरण करीत असत. नंतर ते श्रीहरींसाठी तप करू लागले आणि मुळे-फळे यांचा त्याग करून फक्त पाण्यावर राहू लागले.॥ १॥

मूल (चौपाई)

उर अभिलाष निरंतर होई।
देखिअ नयन परम प्रभु सोई॥
अगुन अखंड अनंत अनादी।
जेहि चिंतहिं परमारथबादी॥

अनुवाद (हिन्दी)

जे निर्गुण, अखंड, अनादी आहेत आणि ब्रह्मज्ञानी लोक ज्यांचे चिंतन करतात, त्या परम प्रभूंचे आपल्या डोळ्यांनी दर्शन घ्यावे, हीच अभिलाषा त्यांच्या मनात निरंतर होती.॥ २॥

मूल (चौपाई)

नेति नेति जेहि बेद निरूपा।
निजानंद निरुपाधि अनूपा॥
संभु बिरंचि बिष्नु भगवाना।
उपजहिं जासु अंस तें नाना॥

अनुवाद (हिन्दी)

वेद ज्यांचे ‘नेति नेति’ (हेही नाही, तेही नाही) असे म्हणून निरूपण करतात, जे आनंदस्वरूप, उपाधिरहित आणि अनुपम आहेत, आणि ज्यांच्या अंशाने अनेक शिव, ब्रह्मदेव व भगवान विष्णू प्रकट होतात.॥ ३॥

मूल (चौपाई)

ऐसेउ प्रभु सेवक बस अहई।
भगत हेतु लीलातनु गहई॥
जौं यह बचन सत्य श्रुति भाषा।
तौ हमार पूजिहि अभिलाषा॥

अनुवाद (हिन्दी)

असे महान प्रभू हे सुद्धा सेवकाच्या अधीन आहेत व भक्तांसाठी (दिव्य) लीला-विग्रह धारण करतात. हे जर वेदांनी सत्य प्रतिपादन केले असेल, तर आमची अभिलाषा नक्की पूर्ण होईल.’॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

एहि बिधि बीते बरष षट सहस बारि आहार।
संबत सप्त सहस्र पुनि रहे समीर अधार॥ १४४॥

अनुवाद (हिन्दी)

अशाप्रकारे जलाचा आहार घेत सहा हजार वर्षे निघून गेली. नंतर साठ हजार वर्षे ते वायुभक्षण करून राहिले.॥ १४४॥

मूल (चौपाई)

बरष सहस दस त्यागेउ सोऊ।
ठाढे़ रहे एक पद दोऊ॥
बिधि हरि हर तप देखि अपारा।
मनु समीप आए बहु बारा॥

अनुवाद (हिन्दी)

त्यानंतर दहा हजार वर्षे त्यांनी वायूचा आहारही सोडला आणि दोघे एका पायावर उभे राहिले. त्यांचे अपार तप पाहून ब्रह्मदेव, विष्णू व शिव हे अनेक वेळा मनूजवळ आले.॥ १॥

मूल (चौपाई)

मागहु बर बहु भाँति लोभाए।
परम धीर नहिं चलहिं चलाए॥
अस्थिमात्र होइ रहे सरीरा।
तदपि मनाग मनहिं नहिं पीरा॥

अनुवाद (हिन्दी)

त्यांनी त्या दोघांना अनेक प्रकारे प्रलोभन दाखविले आणि वर मागण्यास सांगितले. परंतु ते परम धैर्यवान राजा-राणी आपल्या तपापासून विचलित झाले नाहीत. त्यांचे शरीर हाडांचा सापळाच उरले होते, तरीही त्यांना जराही दुःख नव्हते.॥ २॥

मूल (चौपाई)

प्रभु सर्बग्य दास निज जानी।
गति अनन्य तापस नृप रानी॥
मागु मागु बरु भै नभ बानी।
परम गभीर कृपामृत सानी॥

अनुवाद (हिन्दी)

सर्वज्ञ प्रभूंनी अनन्य गती (आश्रय) असणाऱ्या त्या तपस्वी राजा-राणी यांना ‘निजदास’ असल्याचे ओळखले. तेव्हा परम गंभीर आणि कृपारूपी अमृताने भरलेली आकाशवाणी झाली की, ‘वर मागा.’॥ ३॥

मूल (चौपाई)

मृतक जिआवनि गिरा सुहाई।
श्रवन रंध्र होइ उर जब आई॥
हृष्ट पुष्ट तन भए सुहाए।
मानहुँ अबहिं भवन ते आए॥

अनुवाद (हिन्दी)

प्रेतालाही जिवंत करणारी ती सुंदर वाणी कानांच्या छिद्रांतून जेव्हा हृदयात पोहोचली, तेव्हा राजा-राणी यांची शरीरे इतकी सुंदर व हृष्ट-पुष्ट झाली की, जणू नुकतेच ते घरून आले आहेत.॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

श्रवन सुधा सम बचन सुनि पुलक प्रफुल्लित गात।
बोले मनु करि दंडवत प्रेम न हृदयँ समात॥ १४५॥

अनुवाद (हिन्दी)

कानांमध्ये अमृतासमान वाटणारे ते शब्द ऐकून त्यांचे शरीर पुलकित आणि प्रफुल्लित झाले. त्यांच्या मनात प्रेम सामावत नव्हते. तेव्हा मनूंनी दंडवत घालून म्हटले,॥ १४५॥

मूल (चौपाई)

सुनु सेवक सुरतरु सुरधेनू।
बिधि हरि हर बंदित पद रेनू॥
सेवत सुलभ सकल सुखदायक।
प्रनतपाल सचराचर नायक॥

अनुवाद (हिन्दी)

हे प्रभो, ऐका. तुम्ही सेवकांच्यासाठी कल्पवृक्ष आणि कामधेनू आहात. तुमच्या चरण धुळीला ब्रह्मा, विष्णू व शिव हे सुद्धा वंदन करतात. तुमची सेवा करण्यास सुलभ असून तुम्ही सर्वांना सुख देणारे आहात. तुम्ही शरणागताचे रक्षक आणि चराचराचे स्वामी आहात.॥ १॥

मूल (चौपाई)

जौं अनाथ हित हम पर नेहू।
तौ प्रसन्न होइ यह बर देहू॥
जो सरूप बस सिव मन माहीं।
जेहिं कारन मुनि जतन कराहीं॥

अनुवाद (हिन्दी)

हे अनाथांचे कल्याण करणाऱ्या प्रभो, जर आम्हांवर तुमचे प्रेम असेल, तर प्रसन्न होऊन असा वर द्या की, तुमचे जे स्वरूप शिवांच्या मनात वसते आणि ज्याच्या प्राप्तीसाठी मुनिजन प्रयत्न करीत असतात,॥ २॥

मूल (चौपाई)

जो भुसुंडि मन मानस हंसा।
सगुन अगुन जेहि निगम प्रसंसा॥
देखहिं हम सो रूप भरि लोचन।
कृपा करहु प्रनतारति मोचन॥

अनुवाद (हिन्दी)

जे काकभुशुंडी ऋषींच्या मनरूपी मानस सरोवरात विहार करणारे हंस आहेत. सगुण आणि निर्गुण म्हणून वेद ज्यांची प्रशंसा करतात, हे शरणागताचे दुःख दूर करणारे प्रभू, ते रूप आम्ही डोळे भरून पाहावे, अशी कृपाकरा.॥ ३॥

मूल (चौपाई)

दंपति बचन परम प्रिय लागे।
मृदुल बिनीत प्रेम रस पागे॥
भगत बछल प्रभु कृपानिधाना।
बिस्वबास प्रगटे भगवाना॥

अनुवाद (हिन्दी)

राजा-राणीचे हे कोमल, विनययुक्त, प्रेमरसाने ओथंबलेले वचन भगवंतांना फारच आवडले. त्यामुळे भक्तवत्सल, कृपानिधान, संपूर्ण विश्वाचे निवासस्थान सर्वसमर्थ भगवंत प्रगट झाले.॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

नील सरोरुह नील मनि नील नीरधर स्याम।
लाजहिं तन सोभा निरखि कोटि कोटि सत काम॥ १४६॥

अनुवाद (हिन्दी)

भगवंतांचे नीलकमल, नीलमणी आणि जलयुक्त निळ्या मेघांप्रमाणे (कोमल, प्रकाशमय आणि सरस) श्यामवर्ण (चिन्मय) शरीराचे सौंदर्य पाहून कोटॺवधी कामदेवसुद्धा लज्जित होत.॥ १४६॥

मूल (चौपाई)

सरद मयंक बदन छबि सींवा।
चारु कपोल चिबुक दर ग्रीवा॥
अधर अरुन रद सुंदर नासा।
बिधु कर निकर बिनिंदक हासा॥

अनुवाद (हिन्दी)

त्यांचे मुख शरद ऋतुतील पौर्णिमेच्या चंद्रासारखे सौंदर्याची परिसीमा होते. गाल आणि हनुवटी फार सुंदर होते. गळा शंखासारखा त्रिरेखायुक्त-(चढ-उतार असणारा) होता. लाल ओठ, दात आणि नाक फारच सुंदर होते. त्यांचे हास्य चंद्र-किरणांना लाजविणारे होते.॥ १॥

मूल (चौपाई)

नव अंबुज अंबक छबि नीकी।
चितवनि ललित भावँती जी की॥
भृकुटि मनोज चाप छबि हारी।
तिलक ललाट पटल दुतिकारी॥

अनुवाद (हिन्दी)

नेत्रांचे सौंदर्य ताज्या कमळाप्रमाणे होते. मनोहर दृष्टी अत्यंत सुंदर वाटत होती. कमानदार भुवया कामदेवाच्या धनुष्याची शोभा हरण करणाऱ्या होत्या. ललाटावर प्रकाशमय तिलक होता.॥ २॥

मूल (चौपाई)

कुंडल मकर मुकुट सिर भ्राजा।
कुटिल केस जनु मधुप समाजा॥
उर श्रीबत्स रुचिर बनमाला।
पदिक हार भूषन मनिजाला॥

अनुवाद (हिन्दी)

कानांमध्ये मकराकृती कुंडले आणि शिरावर मुकुट शोभत होता. कुरळे व काळे केस असे दाट होते की, जणू भ्रमरांच्या झुंडी असाव्यात. हृदयावर श्रीवत्स, सुंदर वनमाला, रत्नजडित हार आणि रत्नांची आभूषणे शोभून दिसत होती.॥ ३॥

मूल (चौपाई)

केहरि कंधर चारु जनेऊ।
बाहु बिभूषन सुंदर तेऊ॥
करि कर सरिस सुभग भुजदंडा।
कटि निषंग कर सर कोदंडा॥

अनुवाद (हिन्दी)

सिंहासारखी मान होती, सुंदर यज्ञोपवीत होते. भुजांमध्ये घातलेले दागिनेही सुंदर होते. हत्तीच्या सोंडेप्रमाणे सुंदर बाहू होते. कमरेला भाता आणि हातात धनुष्य-बाण शोभत होते.॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

तड़ित बिनिंदक पीत पट उदर रेख बर तीनि।
नाभि मनोहर लेति जनु जमुन भवँर छबि छीनि॥ १४७॥

अनुवाद (हिन्दी)

सुवर्ण वर्णाचा प्रकाशमय पीतांबर विद्युल्लतेला लाजविणारा होता. उदरावर सुंदर तीन वळ्या होत्या. यमुनेतील भोवऱ्याचे सौंदर्य हिरावून घेणारी नाभी होती.॥ १४७॥

मूल (चौपाई)

पद राजीव बरनि नहिं जाहीं।
मुनि मन मधुप बसहिं जेन्ह माहीं॥
बाम भाग सोभति अनुकूला।
आदिसक्ति छबिनिधि जगमूला॥

अनुवाद (हिन्दी)

मुनींचे मनरूपी भ्रमर जिथे रमतात, त्या भगवंतांच्या चरण-कमलांचे वर्णन करता येणे कठीण होते. भगवंतांच्या डाव्या बाजूस, त्यांना नित्य अनुकूल असणारी,शोभेची खाण अशी, जगाची मूलकारणरूप आदिशक्ती जानकी शोभत होती.॥ १॥

मूल (चौपाई)

जासु अंस उपजहिं गुनखानी।
अगनित लच्छि उमा ब्रह्मानी॥
भृकुटि बिलास जासु जग होई।
राम बाम दिसि सीता सोई॥

अनुवाद (हिन्दी)

जिच्या अंशाने गुणांची खाण असलेल्या अगणित लक्ष्मी, पार्वती आणि ब्रह्माणी (त्रिदेवांच्या शक्ती) उत्पन्न होतात, तसेच जिच्या भुवयांच्या विलासानेच जगताची रचना होते, तीच (भगवंतांची स्वरूपशक्ती) श्रीसीता श्रीरामांच्या वामांगी होती.॥ २॥

मूल (चौपाई)

छबिसमुद्र हरि रूप बिलोकी।
एकटक रहे नयन पट रोकी॥
चितवहिं सादर रूप अनूपा।
तृप्ति न मानहिं मनु सतरूपा॥

अनुवाद (हिन्दी)

सौंदर्याचे सागर असलेल्या श्रीहरींचे रूप पाहून मनू व शतरूपा यांच्या पापण्या स्तब्ध होऊन एकटक पाहात राहिल्या. ते मोठॺा आदराने ते अनुपम सौंदर्य पाहात होते आणि पाहून त्यांचे मन तृप्त होत नव्हते.॥ ३॥

मूल (चौपाई)

हरष बिबस तन दसा भुलानी।
परे दंड इव गहि पद पानी॥
सिर परसे प्रभु निज कर कंजा।
तुरत उठाए करुनापुंजा॥

अनुवाद (हिन्दी)

आनंदाच्या अतिरेकामुळे ती दोघे देहभान विसरून गेली. आपल्या हातांनी भगवंतांचे चरण धरून त्यांनी दंडवत लोटांगण घातले. कृपा-राशी प्रभूंनी आपल्या करकमलांनी त्यांच्या मस्तकाला स्पर्श केला आणि त्यांना त्वरित वर उठविले.॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

बोले कृपानिधान पुनि अति प्रसन्न मोहि जानि।
मागहु बर जोइ भाव मन महादानि अनुमानि॥ १४८॥

अनुवाद (हिन्दी)

नंतर कृपानिधान भगवान म्हणाले, ‘मी मोठा उदार असून अत्यंत प्रसन्न झालो आहे, म्हणून तुमच्या मनाला वाटेल ते मागा.’॥ १४८॥

मूल (चौपाई)

सुनि प्रभु बचन जोरि जुग पानी।
धरि धीरजु बोली मृदु बानी॥
नाथ देखि पद कमल तुम्हारे।
अब पूरे सब काम हमारे॥

अनुवाद (हिन्दी)

प्रभूंचे बोलणे ऐकून राजा दोन्ही हात जोडून धैर्यपूर्वक कोमल वाणीने म्हणाला, ‘हे नाथ! तुमच्या चरण-कमलांच्या दर्शनाने आता आमचे सर्व मनोरथ पूर्ण झाले आहेत.॥ १॥

मूल (चौपाई)

एक लालसा बड़ि उर माहीं।
सुगम अगम कहि जाति सो नाहीं॥
तुम्हहि देत अति सुगम गोसाईं।
अगम लाग मोहि निज कृपनाईं॥

अनुवाद (हिन्दी)

तरीही मनात एक मोठी लालसा आहे. ती पूर्ण होणे सोपीही आहे आणि कठीणही आहे, त्यामुळे बोलून दाखविता येत नाही. हे स्वामी, ती पूर्ण करणे तुम्हांला सहज शक्य आहे, परंतु मला स्वतःच्या दैन्यामुळे ती फार कठीण वाटते.॥ २॥

मूल (चौपाई)

जथा दरिद्र बिबुधतरु पाई।
बहु संपति मागत सकुचाई॥
तासु प्रभाउ जान नहिं सोई।
तथा हृदयँ मम संसय होई॥

अनुवाद (हिन्दी)

ज्याप्रमाणे एखादा दरिद्री कल्पवृक्ष मिळाल्यावरही अधिक द्रव्य मागण्यास संकोच करतो, कारण तो कल्पवृक्षाचा प्रभाव जाणत नाही, त्याप्रमाणेच माझ्या मनात संशय येत आहे.॥ ३॥

मूल (चौपाई)

सो तुम्ह जानहु अंतरजामी।
पुरवहु मोर मनोरथ स्वामी॥
सकुच बिहाइ मागु नृप मोही।
मोरें नहिं अदेय कछु तोही॥

अनुवाद (हिन्दी)

हे स्वामी, तुम्ही अंतर्यामी आहात, म्हणून तुम्ही माझे मनोगत जाणताच. तरी ते पूर्ण करा.’ (भगवंत म्हणाले,) ‘हे राजा, निःसंकोचपणे माझ्याकडे माग. तुला देता येणार नाही, असे काहीही माझ्यापाशी नाही.’॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

दानि सिरोमनि कृपानिधि नाथ कहउँ सतिभाउ।
चाहउँ तुम्हहि समान सुत प्रभु सन कवन दुराउ॥ १४९॥

अनुवाद (हिन्दी)

(राजा म्हणाला,) ‘हे दानशूर शिरोमणी, हे कृपानिधान! हे नाथा, मी मनातले खरेखुरे सांगतो की, मला तुमच्यासारखा पुत्र हवा. आपल्यापासून काय लपवायचे?’॥ १४९॥

मूल (चौपाई)

देखि प्रीति सुनि बचन अमोले।
एवमस्तु करुनानिधि बोले॥
आपु सरिस खोजौं कहँ जाई।
नृप तव तनय होब मैं आई॥

अनुवाद (हिन्दी)

राजाचे प्रेम पाहून आणि त्याचे अमोल बोल ऐकून करुणानिधान भगवान म्हणाले, ‘ठीक आहे. हे राजन, मी स्वतःसारखा दुसरा कुठे जाऊन शोधू? म्हणून मी स्वतःच तुमचा पुत्र होईन.’ं॥ १॥

मूल (चौपाई)

सतरूपहि बिलोकि कर जोरें।
देबि मागु बरु जो रुचि तोरें॥
जो बरु नाथ चतुर नृप मागा।
सोइ कृपाल मोहि अति प्रिय लागा॥

अनुवाद (हिन्दी)

शतरूपेने हात जोडलेले पाहून भगवंत म्हणाले, ‘हे देवी, तुझी जी इच्छा असेल ती मागून घे.’ शतरूपा म्हणाली, ‘हे नाथ, चतुर राजांनी जो वर मागितला आहे, हे कृपाळू, तोच मला अतिशय आवडला.॥ २॥

मूल (चौपाई)

प्रभु परंतु सुठि होति ढिठाई।
जदपि भगत हित तुम्हहि सोहाई॥
तुम्ह ब्रह्मादि जनक जग स्वामी।
ब्रह्म सकल उर अंतरजामी॥

अनुवाद (हिन्दी)

परंतु हे प्रभू, (आमच्याकडून) थोडा अतिरेक होत आहे. तरीही भक्तांचे हित करणारे हे प्रभू, तुम्हांला हे आमचे धार्ष्ट्य बरेच वाटत आहे. तुम्ही ब्रह्मदेव इत्यादींचे पिता, जगाचे स्वामी आणि सर्वांचे मन जाणणारे ब्रह्म आहात.॥ ३॥

मूल (चौपाई)

अस समुझत मन संसय होई।
कहा जो प्रभु प्रवान पुनि सोई॥
जे निज भगत नाथ तव अहहीं।
जो सुख पावहिं जो गति लहहीं॥

अनुवाद (हिन्दी)

असे असल्यामुळे मनात संदेह येतो, तरीही प्रभूंनी जे म्हटले तेच प्रमाण होय. (मी तर असे मागते की,) हे नाथ, तुमचे जे भक्त आहेत, ते जे (अलौकिक) अखंड सुख प्राप्त करतात आणि त्यांना जी परम गती मिळते,॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

सोइ सुख सोइ गति सोइ भगति सोइ निज चरन सनेहु।
सोइ बिबेक सोइ रहनि प्रभु हमहि कृपा करि देहु॥ १५०॥

अनुवाद (हिन्दी)

हे प्रभो, तेच सुख, तीच गती, तीच भक्ती, तुमच्या चरणीचे तेच प्रेम, तेच ज्ञान आणि तीच राहाणी कृपा करून आम्हांला द्या.’॥ १५०॥

मूल (चौपाई)

सुनि मृदु गूढ़ रुचिर बर रचना।
कृपासिंधु बोले मृदु बचना॥
जो कछु रुचि तुम्हरे मन माहीं।
मैं सो दीन्ह सब संसय नाहीं॥

अनुवाद (हिन्दी)

(राणीची) कोमल, गूढ आणि मनोहर अशी उत्कृष्ट वाणी ऐकून कृपासागर भगवान कोमल शब्दांत म्हणाले, ‘तुझ्या मनात जी काही इच्छा आहे, ती सर्व मी पूर्ण केली, यात कोणताही संशय बाळगू नकोस.॥ १॥

मूल (चौपाई)

मातु बिबेक अलौकिक तोरें।
कबहुँ न मिटिहि अनुग्रह मोरें॥
बंदि चरन मनु कहेउ बहोरी।
अवर एक बिनती प्रभु मोरी॥

अनुवाद (हिन्दी)

हे माते, माझ्या कृपेने तुझे अलौकिक ज्ञान कधी नष्ट होणार नाही.’ तेव्हा मनूने भगवंतांच्या चरणांना वंदन करून म्हटले, ‘हे प्रभो, माझी आणखी एक विनंती आहे.॥ २॥

मूल (चौपाई)

सुत बिषइक तव पद रति होऊ।
मोहि बड़ मूढ़ कहै किन कोऊ॥
मनि बिनु फनि जिमि जल बिनु मीना।
मम जीवन तिमि तुम्हहि अधीना॥

अनुवाद (हिन्दी)

जसे पुत्रावर पित्याचे प्रेम असते, तसेच माझे तुमच्या चरणी प्रेम राहो. (याबद्दल) मला कोणीही कितीही मूर्ख समजेना का! ज्याप्रमाणे मण्याविना साप व पाण्याविना मासोळी (राहू शकत नाही) त्याप्रमाणे माझे जीवन तुमच्या विना न राहो.’॥ ३॥

मूल (चौपाई)

अस बरु मागि चरन गहि रहेऊ।
एवमस्तु करुनानिधि कहेऊ॥
अब तुम्ह मम अनुसासन मानी।
बसहु जाइ सुरपति रजधानी॥

अनुवाद (हिन्दी)

असा वर मागून राजाने भगवंतांचे चरण धरले. तेव्हा दयानिधान भगवंत म्हणाले, ‘असेच होवो. आता तुम्ही माझ्या आज्ञेने देवराज इंद्राच्या राजधानीत (अमरावतीत) जाऊन राहा.॥ ४॥

सोरठा

मूल (दोहा)

तहँ करि भोग बिसाल तात गएँ कछु काल पुनि।
होइहहु अवध भुआल तब मैं होब तुम्हार सुत॥ १५१॥

अनुवाद (हिन्दी)

हे राजा, तेथे स्वर्गात पुष्कळसे भोग भोगल्यावर व काही काळ लोटल्यावर तू अयोध्येचा राजा होशील, तेव्हा मी तुझा पुत्र होईन.॥ १५१॥

मूल (चौपाई)

इच्छामय नरबेष सँवारें।
होइहउँ प्रगट निकेत तुम्हारें॥
अंसन्ह सहित देह धरि ताता।
करिहउँ चरित भगत सुखदाता॥

अनुवाद (हिन्दी)

स्वेच्छानिर्मित मनुष्यरूप घेऊन मी तुझ्या घरी प्रकट होईन. हे राजा,मी आपल्या अंशांसह देह धरून भक्तांना सुख देणारी लीला करीन.॥ १॥

मूल (चौपाई)

जे सुनि सादर नर बड़भागी।
भव तरिहहिं ममता मद त्यागी॥
आदिसक्ति जेहिं जग उपजाया।
सोउ अवतरिहि मोरि यह माया॥

अनुवाद (हिन्दी)

मोठे भाग्यशाली मनुष्य आदराने जी चरित्रे ऐकून ममता आणि मद यांचा त्याग करून भवसागर तरून जातील. जग उत्पन्न करणारी आदिशक्ती ही माझी (स्वरूपभूत) मायासुद्धा अवतार घेईल.॥ २॥

मूल (चौपाई)

पुरउब मैं अभिलाष तुम्हारा।
सत्य सत्य पन सत्य हमारा॥
पुनि पुनि अस कहि कृपानिधाना।
अंतरधान भए भगवाना॥

अनुवाद (हिन्दी)

अशा प्रकारे मी तुझी अभिलाषा पूर्ण करीन. हे माझे वचन त्रिवार सत्य आहे’, असे म्हणून कृपानिधान भगवंत अंतर्धान पावले.॥ ३॥

मूल (चौपाई)

दंपति उर धरि भगत कृपाला।
तेहिं आश्रम निवसे कछु काला॥
समय पाइ तनु तजि अनयासा।
जाइ कीन्ह अमरावति बासा॥

अनुवाद (हिन्दी)

ते राजा-राणी भक्तांवर कृपा करणाऱ्या भगवंतांना हृदयात धारण करून काही काळ आश्रमात राहिले. नंतर यथासमय त्यांनी सहजपणे यातनेविना शरीर सोडले आणि इंद्र्राच्या अमरावतीत जाऊन वास केला.॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

यह इतिहास पुनीत अति उमहि कही बृषकेतु।
भरद्वाज सुनु अपर पुनि राम जनम कर हेतु॥ १५२॥

अनुवाद (हिन्दी)

(याज्ञवल्क्य म्हणतात—) ‘हे भरद्वाज, हा अत्यंत पवित्र इतिहास शिवांनी पार्वतीला सांगितला होता. आता श्रीरामांनी अवतार घेण्याचे दुसरे कारण ऐका.॥ १५२॥