३५ विश्वमोहिनीचे स्वयंवर

दोहा

मूल (दोहा)

आनि देखाई नारदहि भूपति राजकुमारि।
कहहु नाथ गुन दोष सब एहि के हृदयँ बिचारि॥ १३०॥

अनुवाद (हिन्दी)

नंतर राजाने राजकुमारीला आणून नारदांना दाखविले. (आणि विचारले) ‘हे नाथ, तुम्ही विचार करून हिचे सर्व गुण-दोष सांगा.’॥ १३०॥

मूल (चौपाई)

देखि रूप मुनि बिरति बिसारी।
बड़ी बार लगि रहे निहारी॥
लच्छन तासु बिलोकि भुलाने।
हृदयँ हरष नहिं प्रगट बखाने॥

अनुवाद (हिन्दी)

तिचे रूप पाहून नारद मुनी वैराग्य विसरून गेले आणि बराच वेळ तिच्याकडे बघतच राहिले. तिची लक्षणे पाहून मुनी स्वतःला विसरून गेले आणि मनात हर्षित झाले. परंतु प्रकटपणे त्यांनी लक्षणे सांगितली नाहीत.॥ १॥

मूल (चौपाई)

जो एहि बरइ अमर सोइ होई।
समरभूमि तेहि जीत न कोई॥
सेवहिं सकल चराचर ताही।
बरइ सीलनिधि कन्या जाही॥

अनुवाद (हिन्दी)

(त्या लक्षणांचा विचार करून ते मनात म्हणाले-) जो हिच्याशी विवाह करील, तो अमर होईल आणि रणभूमीमध्ये त्याला कोणी जिंकू शकणार नाही. ही शीलनिधीची कन्या ज्याला वरील, सर्व चराचर त्याची सेवा करील.॥ २॥

मूल (चौपाई)

लच्छन सब बिचारि उर राखे।
कछुक बनाइ भूप सन भाषे॥
सुता सुलच्छन कहि नृप पाहीं।
नारद चले सोच मन माहीं॥

अनुवाद (हिन्दी)

ती सर्व लक्षणे मुनींनी मनात ठेवली आणि राजाला त्यांनी आपल्या मनाने काही लक्षणे सांगितली. राजाला मुलीची सुलक्षणे सांगून नारद निघून गेले. परंतु त्यांच्या मनात असे आले की,॥ ३॥

मूल (चौपाई)

करौं जाइ सोइ जतन बिचारी।
जेहि प्रकार मोहि बरै कुमारी॥
जप तप कछु न होइ तेहि काला।
हे बिधि मिलइ कवन बिधि बाला॥

अनुवाद (हिन्दी)

आता जाऊन आपण असा उपाय करावा की, ही कन्या मलाच मिळेल. यावेळी जप तप करून काही होणार नाही. हे विधात्या, ही कन्या मला कशी बरे मिळेल?॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

एहि अवसर चाहिअ परम सोभा रूप बिसाल।
जो बिलोकि रीझै कुअँरि तब मेलै जयमाल॥ १३१॥

अनुवाद (हिन्दी)

या वेळी मला खूप लावण्य आणि अत्यंत सुंदर रूप हवे. ते पाहून राजकुमारी माझ्यावर भाळून जाईल आणि वरमाला मला घालील.॥ १३१॥

मूल (चौपाई)

हरि सन मागौं सुंदरताई।
होइहि जात गहरु अति भाई॥
मोरें हित हरि सम नहिं कोऊ।
एहि अवसर सहाय सोइ होऊ॥

अनुवाद (हिन्दी)

(आता असे करावे.) भगवंतांकडे सौंदर्य मागावे. परंतु त्यांच्याकडे जाण्यास फार वेळ होईल. परंतु श्रीहरींच्याशिवाय माझा हितचिंतक कोणी नाही, म्हणून या वेळी तेच मला साह्य करोत म्हणजे झाले.॥ १॥

मूल (चौपाई)

बहुबिधि बिनय कीन्हि तेहि काला।
प्रगटेउ प्रभु कौतुकी कृपाला॥
प्रभु बिलोकि मुनि नयन जुड़ाने।
होइहि काजु हिएँ हरषाने॥

अनुवाद (हिन्दी)

त्यावेळी नारदांनी भगवंतांना पुष्कळ प्रार्थना केली, तेव्हा लीलामय कृपाळू प्रभू तेथे प्रगट झाले. स्वामींना पाहाताच नारदांचे नेत्र प्रफुल्लित झाले आणि ते मनात आनंदित होऊन म्हणाले की, आता काम झालेच.॥ २॥

मूल (चौपाई)

अति आरति कहि कथा सुनाई।
करहु कृपा करि होहु सहाई॥
आपन रूप देहु प्रभु मोही।
आन भाँति नहिं पावौं ओही॥

अनुवाद (हिन्दी)

नारदांनी काकुळतीला येऊन सर्व कथा सांगितली (आणि प्रार्थना केली की,) कृपा करा आणि मला मदत करा. हे प्रभो, तुम्ही मला आपले रूप द्या. याखेरीज दुसऱ्या कशामुळेही मी त्या राजकन्येस मिळवू (प्राप्त करू) शकणार नाही.॥ ३॥

मूल (चौपाई)

जेहि बिधि नाथ होइ हित मोरा।
करहु सो बेगि दास मैं तोरा॥
निज माया बल देखि बिसाला।
हियँ हँसि बोले दीनदयाला॥

अनुवाद (हिन्दी)

हे नाथ, माझे कल्याण होईल, असे लवकर करा. मी तुमचा दास आहे.’ आपल्या मायेचे प्रचंड बळ पाहून दीनदयाळू भगवंत मनात हसत म्हणाले,॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

जेहि बिधि होइहि परम हित नारद सुनहु तुम्हार।
सोइ हम करब न आन कछु बचन न मृषा हमार॥ १३२॥

अनुवाद (हिन्दी)

‘हे नारद, ज्यामुळे तुमचे परम हित होईल, तेच आम्ही करू. दुसरे काही नाही. आमचे वचन असत्य ठरत नसते.॥ १३२॥

मूल (चौपाई)

कुपथ माग रुज ब्याकुल रोगी।
बैद न देइ सुनहु मुनि जोगी॥
एहि बिधि हित तुम्हार मैं ठयऊ।
कहि अस अंतरहित प्रभु भयऊ॥

अनुवाद (हिन्दी)

हे योगी मुनी, ऐका. रोगाने व्याकूळ झालेल्या रोग्याने कुपथ्य मागितले, तरी वैद्य ते देत नाही. तशा प्रकारे मीही तुमचे कल्याण करण्याचा निश्चय केलेला आहे.’ असे म्हणून भगवंत अंतर्धान पावले.॥ १॥

मूल (चौपाई)

माया बिबस भए मुनि मूढ़ा।
समुझी नहिं हरि गिरा निगूढ़ा॥
गवने तुरत तहाँ रिषिराई।
जहाँ स्वयंबर भूमि बनाई॥

अनुवाद (हिन्दी)

(भगवंतांच्या) मायेच्या अधीन झालेले मुनी इतके बुद्धिहीन झाले होते की, ते भगवंतांची रहस्यमय वाणी समजू शकले नाहीत. ऋषिराज नारद स्वयंवरासाठी बनविलेल्या मंडपाकडे गेले.॥ २॥

मूल (चौपाई)

निज निज आसन बैठे राजा।
बहु बनाव करि सहित समाजा॥
मुनि मन हरष रूप अति मोरें।
मोहि तजि आनहि बरिहि न भोरें॥

अनुवाद (हिन्दी)

राजे मोठे नटून-थटून आपल्या परिवारासह आपापल्या आसनावर बसले होते. नारद मुनी मनातून आनंदित होते की, माझे रूप फार सुंदर आहे. राजकन्या मला सोडून दुसऱ्या कुणालाही वरणार नाही.॥ ३॥

मूल (चौपाई)

मुनि हित कारन कृपानिधाना।
दीन्ह कुरूप न जाइ बखाना॥
सो चरित्र लखि काहुँ न पावा।
नारद जानि सबहिं सिर नावा॥

अनुवाद (हिन्दी)

कृपानिधान भगवंतांनी मुनींच्या कल्याणासाठी त्यांना इतके कुरूप बनविले होते की, सांगायची सोय नाही. परंतु भगवंतांची ही लीला कुणाला कळू शकली नाही. त्यांना नारद समजूनच सर्वांनी प्रणाम केला.॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

रहे तहाँ दुइ रुद्र गन ते जानहिं सब भेउ।
बिप्रबेष देखत फिरहिं परम कौतुकी तेउ॥ १३३॥

अनुवाद (हिन्दी)

तेथे शिवांचे दोन गण होते. त्यांना सर्व रहस्य समजले होते. ते ब्राह्मणांचा वेष धारण करून सर्व लीला पाहात फिरत होते. तेही मोठे थट्टेखोर होते.॥ १३३॥

मूल (चौपाई)

जेहिं समाज बैठे मुनि जाई।
हृदयँ रूप अहमिति अधिकाई॥
तहँ बैठे महेस गन दोऊ।
बिप्रबेष गति लखइ न कोऊ॥

अनुवाद (हिन्दी)

नारद आपल्या मनात रूपाचा मोठा अभिमान बाळगून ज्या समुदायात बसले होते, तेथेच ते दोन्ही गणही बसले होते. ब्राह्मणवेषात असल्यामुळे त्यांचे हे कपट कुणाच्याही लक्षात आले नाही.॥ १॥

मूल (चौपाई)

करहिं कूटि नारदहि सुनाई।
नीकि दीन्हि हरि सुंदरताई॥
रीझिहि राजकुअँरि छबि देखी।
इन्हहि बरिहि हरि जानि बिसेषी॥

अनुवाद (हिन्दी)

ते नारदांना ऐकू जाईल, अशा तऱ्हेने नारदांची टर उडवू लागले, ‘‘भगवंतांनी यांना काय सौंदर्य बहाल केले आहे. यांची शोभा पाहून राजकुमारी भाळून जाईल आणि ‘हरी’ (वानर) समजून यांनाच वरेल’॥ २॥

मूल (चौपाई)

मुनिहि मोह मन हाथ पराएँ।
हँसहिं संभु गन अति सचु पाएँ॥
जदपि सुनहिं मुनि अटपटि बानी।
समुझि न परइ बुद्धि भ्रम सानी॥

अनुवाद (हिन्दी)

नारदांना मोह झाला होता, कारण त्यांचे मन मायेच्या अधीन झाले होते. शिवांचे गण ते पाहून मोठॺा आनंदाने हसत होते. त्यांची टवाळी मुनी ऐकत होते, परंतु बुद्धी भ्रमात पडल्यामुळे ती त्यांना समजत नव्हती. (त्या गोष्टी त्यांना स्वतःच्या प्रशंसेच्या वाटत होत्या.)॥ ३॥

मूल (चौपाई)

काहुँ न लखा सो चरित बिसेषा।
सो सरूप नृपकन्याँ देखा॥
मर्कट बदन भयंकर देही।
देखत हृदयँ क्रोध भा तेही॥

अनुवाद (हिन्दी)

ही बाब इतर कुणालाही समजली नाही. फक्त राजकन्येने नारदांचे ते रूप पाहिले. त्यांचे तोंड माकडासारखे होते आणि ते भयंकर शरीर पाहताच राजकन्येला राग आला.॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

सखीं संग लै कुअँरि तब चलि जनु राजमराल।
देखत फिरइ महीप सब कर सरोज जयमाल॥ १३४॥

अनुवाद (हिन्दी)

मग राजकुमारी सख्यांबरोबर जणू राजहंसीसारखी चालत निघाली. ती आपल्या कर-कमलांमध्ये जयमाला घेऊन सर्व राजे लोकांना पाहत फिरू लागली.॥ १३४॥

मूल (चौपाई)

जेहि दिसि बैठे नारद फूली।
सो दिसि तेहिं न बिलोकी भूली॥
पुनि पुनि मुनिउकसहिं अकुलाहीं।
देखि दसा हर गन मुसुकाहीं॥

अनुवाद (हिन्दी)

जिकडे नारद (रूपाच्या घमेंडीमध्ये) फुगून बसले होते, तिकडे तिने चुकूनही बघितले नाही. नारदमुनी वारंवार मान उंचावून बघत होते आणि चरफडत होते. त्यांची ती दशा पाहून शिवगण हसत होते.॥ १॥

मूल (चौपाई)

धरि नृपतनु तहँ गयउ कृपाला।
कुअँरि हरषि मेलेउ जयमाला॥
दुलहिनि लै गे लच्छिनिवासा।
नृपसमाज सब भयउ निरासा॥

अनुवाद (हिन्दी)

कृपाळू भगवंतही राजाचे शरीर धारण करून तेथे जाऊन पोहोचले. राजकुमारीने आनंदित होऊन त्यांच्या गळॺात जयमाला घातली. लक्ष्मीनिवास भगवंत नवरीला घेऊन गेले. सर्व राजे मंडळी निराश झाली.॥ २॥

मूल (चौपाई)

मुनि अति बिकल मोहँ मति नाठी।
मनि गिरि गई छूटि जनु गाँठी॥
तब हर गन बोले मुसुकाई।
निज मुख मुकुर बिलोकहु जाई॥

अनुवाद (हिन्दी)

मोहामुळे नारद मुनींची बुद्धी नष्ट झाली होती. त्यामुळे ते (राजकुमारी गेल्याचे पाहून) खट्टू झाले, जणू गाठीतील रत्न हरवले होते. तेव्हा शिवांचे गण हसून म्हणाले की, ‘जाऊन आरशात आपले तोंड तर बघा.’॥ ३॥

मूल (चौपाई)

अस कहि दोउ भागे भयँ भारी।
बदन दीख मुनि बारि निहारी॥
बेषु बिलोकि क्रोध अति बाढ़ा।
तिन्हहि सराप दीन्ह अति गाढ़ा॥

अनुवाद (हिन्दी)

असे म्हणून ते दोघे घाबरून पळून गेले. मुनींनी पाण्यामध्ये डोकावून आपले तोंड पाहिले. आपले रूप पाहून त्यांना फार राग आला. त्यांनी शिवांच्या त्या गणांना कठोर शाप दिला.॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

होहु निसाचर जाइ तुम्ह कपटी पापी दोउ।
हँसेहु हमहि सो लेहु फल बहुरि हँसेहु मुनि कोउ॥ १३५॥

अनुवाद (हिन्दी)

‘तुम्ही दोघे कपटी आणि पापी राक्षस व्हाल. तुम्ही माझे हसू केले, त्याचे फळ भोगा. यापुढे कोणा मुनीची फजिती कराल?’॥ १३५॥

मूल (चौपाई)

पुनि जल दीख रूप निज पावा।
तदपि हृदयँ संतोष न आवा॥
फरकत अधर कोप मन माहीं।
सपदि चले कमलापति पाहीं॥

अनुवाद (हिन्दी)

मुनींनी पुन्हा पाण्यात पाहिले, तर त्यांना आपले (खरे) रूप प्राप्त झाले. तरीही त्यांचे समाधान झाले नाही. त्यांचे ओठ फडफडत होते, मनात राग भरला होता. त्वरित ते भगवान कमलापतींच्याकडे गेले.॥ १॥

मूल (चौपाई)

देहउँ श्राप कि मरिहउँ जाई।
जगत मोरि उपहास कराई॥
बीचहिं पंथ मिले दनुजारी।
संग रमा सोइ राजकुमारी॥

अनुवाद (हिन्दी)

(मनात विचार चालला होता की,) ‘जाऊन आता शाप तरी द्यावा किंवा प्राण तरी द्यावा. त्यांनी जगात माझे हसू केले.’ त्यांना दैत्यांचे शत्रू भगवान श्रीहरी वाटेतच भेटले. त्यांच्या सोबत लक्ष्मी आणि तीच राजकुमारी होती.॥ २॥

मूल (चौपाई)

बोले मधुर बचन सुरसाईं।
मुनि कहँ चले बिकल की नाईं॥
सुनत बचन उपजा अति क्रोधा।
माया बस न रहा मन बोधा॥

अनुवाद (हिन्दी)

देवांचे स्वामी भगवंतांनी गोड वाणीने विचारले, ‘हे मुनी, व्याकूळ झाल्यासारखे कुठे निघालात?’ हे शब्द ऐकताच नारदांना फार राग आला. मायेच्या अधीन झाल्यामुळे मनाला विवेकाचा विसर पडला.॥ ३॥

मूल (चौपाई)

पर संपदा सकहु नहिं देखी।
तुम्हरें इरिषा कपट बिसेषी॥
मथत सिंधु रुद्रहि बौरायहु।
सुरन्ह प्रेरि बिष पान करायहु॥

अनुवाद (हिन्दी)

(मुनी म्हणाले,) ‘तुम्हांला दुसऱ्याचे बरे झालेले पाहवत नाही. तुमच्यामध्ये ईर्ष्या आणि कपट आहे. समुद्रमंथन करताना तुम्ही शिवांना बावळट बनविले आणि देवांना प्रेरित करून त्यांना विष-प्राशन करायला लावले.॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

असुर सुरा बिष संकरहि आपु रमा मनि चारु।
स्वारथ साधक कुटिल तुम्ह सदा कपट ब्यवहारु॥ १३६॥

अनुवाद (हिन्दी)

असुरांना मदिरा आणि शिवांना विष देऊन तुम्ही स्वतः मात्र लक्ष्मी आणि सुंदर कौस्तुभ मणी घेतलात. तुम्ही धोकेबाज आणि स्वार्थी आहात. नेहमी कपट व्यवहार करता.॥ १३६॥

मूल (चौपाई)

परम स्वतंत्र न सिर पर कोई।
भावइ मनहि करहु तुम्ह सोई॥
भलेहि मंद मंदेहि भल करहू।
बिसमय हरष न हियँ कछु धरहू॥

अनुवाद (हिन्दी)

तुम्ही पूर्ण स्वतंत्र आहात. तुमच्यावर अंकुश ठेवणारा कोणी नाही, म्हणून मनाला येईल तसे करता. चांगल्याला वाईट आणि वाईटाला चांगले करता. मनात हर्ष-विषाद काहीही आणत नाही.॥ १॥

मूल (चौपाई)

डहकि डहकि परिचेहु सब काहू।
अति असंक मन सदा उछाहू॥
करम सुभासुभ तुम्हहि न बाधा।
अब लगि तुम्हहि न काहूँ साधा॥

अनुवाद (हिन्दी)

सर्वांना ठकवून ठकवून सोकावला आहात आणि फार बेफिकीर झाला आहात. म्हणून (ठकविण्याच्या बाबतीत) तुमच्या मनात नेहमी उत्साह असतो. शुभ-अशुभ कर्मांची तुम्हांला बाधा नसते. आजपर्यंत तुम्हांला कुणी सरळ केलेले नाही.॥ २॥

मूल (चौपाई)

भले भवन अब बायन दीन्हा।
पावहुगे फल आपन कीन्हा॥
बंचेहु मोहि जवनि धरि देहा।
सोइ तनु धरहु श्राप मम एहा॥

अनुवाद (हिन्दी)

या वेळी तुम्ही चांगल्या घरी वाण दिले आहे. (माझ्यासारख्या भारी व्यक्तीला डिवचले आहे.) म्हणून स्वतःच्या कर्माचे फळ नक्की मिळेल. जे राजाचे शरीर धारण करून तुम्ही मला ठकविले आहे, तेच शरीर तुम्ही धारण कराल, हा माझा शाप आहे.॥ ३॥

मूल (चौपाई)

कपि आकृति तुम्ह कीन्हि हमारी।
करिहहिं कीस सहाय तुम्हारी॥
मम अपकार कीन्ह तुम्ह भारी।
नारि बिरहँ तुम्ह होब दुखारी॥

अनुवाद (हिन्दी)

तुम्ही माझे रूप माकडासारखे बनविले होते, म्हणून माकडेच तुम्हांला मदत करतील. (मला ज्या स्त्रीची इच्छा होती, तिच्याशी माझा वियोग करून) तुम्ही माझे मोठे अहित केले आहे. म्हणून तुम्हीसुद्धा स्त्रीच्या वियोगाने दुःखी व्हाल.॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

श्राप सीस धरि हरषि हियँ प्रभु बहु बिनती कीन्हि।
निज माया कै प्रबलता करषि कृपानिधि लीन्हि॥ १३७॥

अनुवाद (हिन्दी)

प्रभूंनी तो शाप मोठॺा आनंदाने शिरोधार्य मानून नारदांचे सांत्वन केले आणि कृपानिधान भगवंतांनी आपली प्रबळ माया काढून घेतली.॥ १३७॥

मूल (चौपाई)

जब हरि माया दूरि निवारी।
नहिं तहँ रमा न राजकुमारी॥
तब मुनि अति सभीत हरि चरना।
गहे पाहि प्रनतारति हरना॥

अनुवाद (हिन्दी)

जेव्हा भगवंतांनी आपली माया दूर सारली, तेव्हा तेथे लक्ष्मी राहिली नाहीआणि राजकुमारीही राहिली नाही. तेव्हा मुनींनी अत्यंत घाबरून श्रीहरींचे चरण धरले आणि म्हटले, ‘हे शरणागतांची दुःखे हरण करणारे प्रभो, माझे रक्षण करा.॥ १॥

मूल (चौपाई)

मृषा होउ मम श्राप कृपाला।
मम इच्छा कह दीनदयाला॥
मैं दुर्बचन कहे बहुतेरे।
कह मुनि पाप मिटिहिं किमि मेरे॥

अनुवाद (हिन्दी)

हे कृपाळू, माझा शाप खोटा ठरू दे.’ तेव्हा दीनांवर दया करणारे भगवंत म्हणाले, ‘हे सर्व माझ्या इच्छेने घडले आहे.’ तेव्हा नारद म्हणाले, ‘मी तुम्हांला अत्यंत वाईट वकटे बोललो. माझे पाप कसे नाहीसे होईल?’॥ २॥

मूल (चौपाई)

जपहु जाइ संकर सत नामा।
होइहि हृदयँ तुरत बिश्रामा॥
कोउ नहिं सिव समान प्रिय मोरें।
असि परतीति तजहु जनि भोरें॥

अनुवाद (हिन्दी)

(भगवंतांनी म्हटले,) ‘जाऊन शंकरांच्या शतनाम स्तोत्राचा जप करा, त्यामुळे मनाला शांतता लाभेल. शिवांसारखा दुसरा कोणीही मला प्रिय नाही, याची खात्री बाळगा.॥ ३॥

मूल (चौपाई)

जेहि पर कृपा न करहिं पुरारी।
सो न पाव मुनि भगति हमारी॥
अस उर धरि महि बिचरहु जाई।
अब न तुम्हहि माया निअराई॥

अनुवाद (हिन्दी)

हे मुनी, शिव ज्याच्यावर कृपा करीत नाहीत, त्याला माझी भक्ती प्राप्त होत नाही. मनात असा दृढ विश्वास बाळगून पृथ्वीवर जाऊन भ्रमण करा. आता माझी माया तुमच्याजवळ फिरकणार नाही.’॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

बहुबिधि मुनिहि प्रबोधि प्रभु तब भए अंतरधान।
सत्यलोक नारद चले करत राम गुन गान॥ १३८॥

अनुवाद (हिन्दी)

अशा रीतीने पुष्कळ प्रकारे मुनींना समजावून सांगून प्रभू अंतर्धान पावले आणि नारद श्रीरामचंद्रांचे गुण-गान करीत सत्यलोकी निघाले.॥ १३८॥

मूल (चौपाई)

हर गन मुनिहि जात पथ देखी।
बिगत मोह मन हरष बिसेषी॥
अति सभीत नारद पहिं आए।
गहि पद आरत बचन सुनाए॥

अनुवाद (हिन्दी)

शिवांच्या (त्या दोन्ही) गणांनी मुनींना जेव्हा मोहरहित व प्रसन्न मनाने वाटेने जाताना पाहिले, तेव्हा ते अत्यंत घाबरून नारदांच्याजवळ आले आणि त्यांचे चरण धरून दीनपणे म्हणाले,॥ १॥

मूल (चौपाई)

हर गन हम न बिप्र मुनिराया।
बड़ अपराध कीन्ह फल पाया॥
श्राप अनुग्रह करहु कृपाला।
बोले नारद दीनदयाला॥

अनुवाद (हिन्दी)

‘हे मुनिराज, आम्ही ब्राह्मण नसून शिवांचे गण आहोत. आम्ही मोठा अपराध केला, त्याचे फळ आम्हांला मिळाले. हे कृपाळू, आता शाप दूर करण्याची कृपा करा.’ दीनांच्यावर दया करणारे नारद म्हणाले,॥ २॥

मूल (चौपाई)

निसिचर जाइ होहु तुम्ह दोऊ।
बैभव बिपुल तेज बल होऊ॥
भुजबल बिस्व जितब तुम्ह जहिआ।
धरिहहिं बिष्नु मनुज तनु तहिआ॥

अनुवाद (हिन्दी)

‘तुम्ही दोघेजण राक्षस बना, तुम्हांला महान ऐश्वर्य, तेज आणि बल मिळो. तुम्ही आपल्या बाहुबलाने जेव्हा संपूर्ण जग जिंकून घ्याल, तेव्हा भगवान विष्णू मनुष्य-शरीर धारण करतील.॥ ३॥

मूल (चौपाई)

समर मरन हरि हाथ तुम्हारा।
होइहहु मुकुत न पुनि संसारा॥
चले जुगल मुनि पद सिर नाई।
भए निसाचर कालहि पाई॥

अनुवाद (हिन्दी)

युद्धामध्ये श्रीहरींच्या हातून तुमचा मृत्यू होईल, त्यामुळे तुम्ही मुक्त व्हाल आणि पुन्हा संसारात जन्म घेणार नाही.’ ते दोघे मुनींच्या चरणी नमन करून निघाले आणि पुढे योग्य वेळी राक्षस झाले.॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

एक कलप एहि हेतु प्रभु लीन्ह मनुज अवतार।
सुर रंजन सज्जन सुखद हरि भंजन भुबि भार॥ १३९॥

अनुवाद (हिन्दी)

देवांना प्रसन्न करणाऱ्या, सज्जनांना सुख देणाऱ्या आणि पृथ्वीचा भार हरण करणाऱ्या भगवंतांनी एका कल्पामध्ये त्यासाठीच मनुष्य-अवतार धारण केला होता.॥ १३९॥

मूल (चौपाई)

एहि बिधि जनम करम हरि केरे।
सुंदर सुखद बिचित्र घनेरे॥
कलप कलप प्रति प्रभु अवतरहीं।
चारु चरित नानाबिधि करहीं॥

अनुवाद (हिन्दी)

अशाप्रकारे भगवंतांचे अनेक सुंदर, सुखदायक आणि अलौकिक जन्म आणि कर्मे आहेत. प्रत्येक कल्पामध्ये जेव्हा जेव्हा भगवान अवतार घेतात आणि नाना प्रकारच्या सुंदर लीला करतात,॥ १॥

मूल (चौपाई)

तब तब कथा मुनीसन्ह गाई।
परम पुनीत प्रबंध बनाई॥
बिबिध प्रसंग अनूप बखाने।
करहिं न सुनि आचरजु सयाने॥

अनुवाद (हिन्दी)

तेव्हा तेव्हा मुनीश्वरांनी परम पवित्र काव्यरचना करून त्यांच्या कथेंचे गायन केलेले आहे आणि वेगवेगळॺा अनुपम प्रसंगांचे वर्णन केलेले आहे. ते ऐकल्यावर विचारी लोक आश्चर्य करीत नाहीत.॥ २॥

मूल (चौपाई)

हरि अनंत हरिकथा अनंता।
कहहिं सुनहिं बहुबिधि सब संता॥
रामचंद्र के चरित सुहाए।
कलप कोटि लगि जाहिं न गाए॥

अनुवाद (हिन्दी)

श्रीहरि अनंत आहेत, त्यांच्या कथाही अनंत आहेत. सर्व संत त्या नाना प्रकारे सांगतात व ऐकतात. श्रीरामांचे सुंदर चरित्र कोटॺवधी कल्पांमध्येही गाता येत नाही.॥ ३॥

मूल (चौपाई)

यह प्रसंग मैं कहा भवानी।
हरिमायाँ मोहहिं मुनि ग्यानी॥
प्रभु कौतुकी प्रनत हितकारी।
सेवत सुलभ सकल दुखहारी॥

अनुवाद (हिन्दी)

(शिव म्हणतात) ‘हे पार्वती, मी हा प्रसंग एवढॺासाठी सांगितला की, ज्ञानी मुनीसुद्धा भगवंतांच्या मायेमुळे मोहित होतात. प्रभूंची ही कौतुकमय लीला आहे आणि शरणागताचे हित करणारी आहे. ते प्रभू सेवा करण्यास फार सुलभ आणि सर्व दुःखे हरण करणारे आहेत.॥ ४॥

सोरठा

मूल (दोहा)

सुर नर मुनि कोउ नाहिं जेहि न मोह माया प्रबल।
अस बिचारि मन माहिं भजिअ महामाया पतिहि॥ १४०॥

अनुवाद (हिन्दी)

देव, मनुष्य आणि मुनी यांच्यापैकी असा कोणीही नाही की त्याला भगवंतांची महान प्रबळ माया मोहित करीत नाही, मनात असा विचार करून त्या महामायेचे स्वामी असणाऱ्या श्री भगवंतांचे भजन करायला हवे.॥ १४०॥

मूल (चौपाई)

अपर हेतु सुनु सैलकुमारी।
कहउँ बिचित्र कथा बिस्तारी॥
जेहि कारन अज अगुन अरूपा।
ब्रह्म भयउ कोसलपुर भूपा॥

अनुवाद (हिन्दी)

हे गिरिराजकुमारी, आता भगवंतांच्या अवताराचे दुसरे कारण ऐक. मी त्याची मनोहर कथा विस्ताराने सांगतो. ज्यामुळे जन्मरहित, निर्गुण व रूपरहित (अव्यक्त सच्चिदानंद) ब्रह्म अयोध्यापुरीचे राजे झाले.॥ १॥

मूल (चौपाई)

जो प्रभु बिपिन फिरततुम्ह देखा।
बंधु समेत धरें मुनिबेषा॥
जासु चरित अवलोकि भवानी।
सती सरीर रहिहु बौरानी॥

अनुवाद (हिन्दी)

ज्या प्रभू श्रीरामांना तू बंधू लक्ष्मणासोबत मुनींसारखा वेष धारण करून वनात फिरताना पाहिले होतेस आणि हे भवानी, ज्यांची लीला पाहून सतीच्या शरीरात असताना तूू अशी भ्रमित झाली होतीस की,॥ २॥

मूल (चौपाई)

अजहुँ न छाया मिटति तुम्हारी।
तासु चरित सुनु भ्रम रुज हारी॥
लीला कीन्हि जो तेहिं अवतारा।
सो सब कहिहउँ मति अनुसारा॥

अनुवाद (हिन्दी)

अजूनही तुझ्या त्या भ्रमाचे पटल दूर झालेले नाही. त्या भ्रमरूपी रोगाचे हरण करणारे त्यांचे चरित्र श्रवण कर. त्या अवतारात भगवंतांनी ज्या ज्या लीला केल्या, त्या सर्व मी आपल्या बुद्धीप्रमाणे तुला सांगतो.’॥ ३॥

मूल (चौपाई)

भरद्वाज सुनि संकर बानी।
सकुचि सप्रेम उमा मुसुकानी॥
लगे बहुरि बरनै बृषकेतू।
सो अवतार भयउ जेहि हेतू॥

अनुवाद (हिन्दी)

(याज्ञवल्क्य म्हणाले-) ‘हे भरद्वाज, शंकरांचे वचन ऐकून पार्वती संकोचाने प्रेमपूर्वक हसली. नंतर ज्या कारणाने भगवंतांचा तो अवतार झाला होता, त्याचे वर्णन शिव करू लागले.॥ ४॥