३४ नारदाचा अभिमान

दोहा

मूल (दोहा)

संभु दीन्ह उपदेस हित नहिं नारदहि सोहान।
भरद्वाज कौतुक सुनहु हरि इच्छा बलवान॥ १२७॥

अनुवाद (हिन्दी)

श्रीशिवांनी हा त्यांच्या भल्याचा उपदेश केला, परंतु नारदांना तो पटला नाही. हे भरद्वाज, आता गंमत ऐका. श्रीहरींची इच्छा मोठी बलवान आहे.॥ १२७॥

मूल (चौपाई)

राम कीन्ह चाहहिं सोइ होई।
करै अन्यथा अस नहिं कोई॥
संभु बचन मुनि मन नहिं भाए।
तब बिरंचि के लोक सिधाए॥

अनुवाद (हिन्दी)

श्रीरामचंद्रांना जे करायचे असते, तेच होते. त्याविरुद्ध करू शकेल, असाकोणीही नाही. शिवांचे बोलणे नारदांना रुचले नाही, तेव्हा ते तेथून ब्रह्मलोकी गेले.॥ १॥

मूल (चौपाई)

एक बार करतल बर बीना।
गावत हरि गुन गान प्रबीना॥
छीरसिंधु गवने मुनिनाथा।
जहँ बस श्रीनिवास श्रुतिमाथा॥

अनुवाद (हिन्दी)

एकदा गानविद्येत कुशल असलेले मुनिनाथ नारद हाती सुंदर वीणा घेऊन हरिगुण गात-गात क्षीरसागरात गेले. तेथे मूर्तिमंत वेदांततत्त्व असलेले लक्ष्मीनिवास भगवान नारायण राहातात.॥ २॥

मूल (चौपाई)

हरषि मिले उठि रमानिकेता।
बैठे आसन रिषिहि समेता॥
बोले बिहसि चराचर राया।
बहुते दिनन कीन्हि मुनि दाया॥

अनुवाद (हिन्दी)

भगवान लक्ष्मीकांत उभे राहून नारदांना आनंदाने भेटले आणि ते ऋषी नारदांसोबत आसनावर बसले. चराचराचे स्वामी भगवान हसून म्हणाले-‘हे मुनी, आज बऱ्याच दिवसांनी (येण्याची) दया केली.’॥ ३॥

मूल (चौपाई)

काम चरित नारद सब भाषे।
जद्यपि प्रथम बरजि सिवँ राखे॥
अति प्रचंड रघुपति कै माया।
जेहि न मोह अस को जग जाया॥

अनुवाद (हिन्दी)

जरी श्रीशिवांनी नारदांना पूर्वीच ‘हे सांगू नका,’ अशी सूचना केली होती, तरीही त्यांनी कामदेवाची सर्व करणी भगवंतांना सांगितली. श्रीरघुनाथांची माया मोठी प्रबळ असते. ती मोहित करू शकणार नाही, असा या जगात कोण जन्मला आहे?॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

रूख बदन करि बचन मृदु बोले श्रीभगवान।
तुम्हरे सुमिरन तें मिटहिं मोह मार मद मान॥ १२८॥

अनुवाद (हिन्दी)

भगवान तटस्थपणे वरवर कोमल स्वरात म्हणाले की, ‘हे मुनिराज, तुमचे स्मरण केल्यानेही इतरांचे मोह, काम, मद व अभिमान हे नाहीसे होतात. (मग तुमच्याबद्दल काय बोलायचे?)॥

मूल (चौपाई)

सुनु मुनि मोह होइ मन ताकें।
ग्यान बिराग हृदय नहिं जाकें॥
ब्रह्मचरज ब्रत रत मतिधीरा।
तुम्हहि कि करइ मनोभव पीरा॥

अनुवाद (हिन्दी)

हे मुनी, ज्याच्या हृदयात ज्ञान-वैराग्य नसते, त्याच्या मनात मोह येतो. तुम्ही तर ब्रह्मचर्यव्रता-मध्ये तत्पर आणि मोठॺा धीरबुद्धीचे आहात. तुम्हांला कामदेव कधी त्रास देऊ शकेल काय?’॥ १॥

मूल (चौपाई)

नारद कहेउ सहित अभिमाना।
कृपा तुम्हारि सकल भगवाना॥
करुनानिधि मन दीख बिचारी।
उर अंकुरेउ गरब तरु भारी॥

अनुवाद (हिन्दी)

नारदांनी मोठॺा अभिमानाने म्हटले की, ‘भगवन! ही सर्व तुमची कृपा आहे.’ करुणानिधान भगवंतांनी मनात विचार करून पाहिले की, यांच्या मनात प्रचंड गर्वाच्या वृक्षाचा अंकुर उत्पन्न झाला आहे.॥ २॥

मूल (चौपाई)

बेगि सो मैं डारिहउँ उखारी।
पन हमार सेवक हितकारी॥
मुनि कर हित मम कौतुक होई।
अवसि उपाय करबि मैं सोई॥

अनुवाद (हिन्दी)

सेवकांचे हित करणे हे माझे ब्रीद आहे. तेव्हा मी तो अंकुर ताबडतोब उपटून टाकतो. मुनींचे कल्याण आणि माझा गंमतीचा खेळ होईल, असा उपाय आपण अवश्य करावा.॥ ३॥

मूल (चौपाई)

तब नारद हरि पद सिर नाई।
चले हृदयँ अहमिति अधिकाई॥
श्रीपति निज माया तब प्रेरी।
सुनहु कठिन करनी तेहि केरी॥

अनुवाद (हिन्दी)

तेव्हा नारद भगवंतांच्या चरणी मस्तक ठेवून निघाले. त्यांच्या मनात अभिमान अधिकच वाढला होता. तेव्हा लक्ष्मीपती भगवंतांनी आपल्या मायेला प्रेरित केले. तिची करणी किती दुस्तर असते ते पाहा.॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

बिरचेउ मग महुँ नगर तेहिं सत जोजन बिस्तार।
श्रीनिवासपुर तें अधिक रचना बिबिध प्रकार॥ १२९॥

अनुवाद (हिन्दी)

तिने (हरिमायेने) वाटेत शंभर योजनांचे (चारशे कोसाचे) नगर रचले. त्या नगरातील विविध रचना विष्णूंच्या वैकुंठापेक्षाही अधिक सुंदर होत्या.॥ १२९॥

मूल (चौपाई)

बसहिं नगर सुंदर नर नारी।
जनु बहु मनसिज रति तनुधारी॥
तेहिं पुर बसइ सीलनिधि राजा।
अगनित हय गय सेन समाजा॥

अनुवाद (हिन्दी)

त्या नगरीत इतके सुंदर स्त्री-पुरुष रहात होते की, जणू कामदेव व रती हेच मानवदेह धारण केलेले असावेत. त्या नगरीत शीलनिधी नावाचा राजा रहात होता. त्याच्याकडे असंख्य घोडे, हत्ती व सैन्याची दले होती.॥ १॥

मूल (चौपाई)

सत सुरेस सम बिभव बिलासा।
रूप तेज बल नीति निवासा॥
बिस्वमोहनी तासु कुमारी।
श्री बिमोह जिसु रूपु निहारी॥

अनुवाद (हिन्दी)

त्याचे वैभव आणि विलास शंभर इंद्रांसमान होते. तो स्वतः रूप, तेज, बल आणि नीतीचे घर होता. त्याला विश्वमोहिनी नावाची एक रूपवती कन्या होती, तिचे रूप पाहून लक्ष्मीनेसुद्धा मोहित व्हावे.॥ २॥

मूल (चौपाई)

सोइ हरिमाया सब गुन खानी।
सोभा तासु कि जाइ बखानी॥
करइ स्वयंबर सो नृपबाला।
आए तहँ अगनित महिपाला॥

अनुवाद (हिन्दी)

ती सर्व गुणांची खाण भगवंतांची मायाच होती. तिच्या शोभेचे वर्णन कसे करता येईल? ती राजकुमारी स्वयंवर करू इच्छित होती. त्यासाठी तेथे अगणित राजे आले होते.॥ ३॥

मूल (चौपाई)

मुनि कौतुकी नगर तेहिं गयऊ।
पुरबासिन्ह सब पूछत भयऊ॥
सुनि सब चरित भूपगृहँ आए।
करि पूजा नृप मुनि बैठाए॥

अनुवाद (हिन्दी)

नारद मुनी कुतूहलाने त्या नगरीत गेले आणि नगरवासींयाच्याकडे त्यांनी विचारपूस केली. सर्व वार्ता ऐकल्यावर ते राजाच्या महालात आले. राजाने त्यांची पूजा करून त्यांना आसनावर बसविले.॥ ४॥