३१ शिव-पार्वती-संवाद

दोहा

मूल (दोहा)

जटा मुकुट सुरसरित सिर लोचन नलिन बिसाल।
नीलकंठ लावन्यनिधि सोह बालबिधु भाल॥ १०६॥

अनुवाद (हिन्दी)

त्यांच्या मस्तकावर जटांचा मुकुट आणि गंगा शोभत होती. कमळासारखे विशाल नेत्र होते. त्यांचा कंठ निळा होता आणि ते सौंदर्याचे भांडार होते. त्यांच्या मस्तकावर द्वितीयेचा चंद्र शोभून दिसत होता.॥ १०६॥

मूल (चौपाई)

बैठे सोह कामरिपु कैसें।
धरें सरीरु सांतरसु जैसें॥
पारबती भल अवसरु जानी।
गईं संभु पहिं मातु भवानी॥

अनुवाद (हिन्दी)

कामदेवाचे शत्रू शिव तेथे बसल्यावर असे शोभत होते की, जणू शांतरसच साकार होऊन बसला आहे. योग्य संधी पाहून पार्वतीमाता त्यांच्याजवळ गेली.॥ १॥

मूल (चौपाई)

जानि प्रिया आदरु अति कीन्हा।
बाम भाग आसनु हर दीन्हा॥
बैठीं सिव समीप हरषाई।
पूरुब जन्म कथा चित आई॥

अनुवाद (हिन्दी)

आपल्या प्रिय पत्नीला पाहून शिवांनी तिचा खूप आदर-सत्कार केला आणि आपल्या डाव्या बाजूस तिला आसन दिले. पार्वती प्रसन्न होऊन शिवांच्या शेजारी बसली. तिला पूर्वजन्माची कथा आठवली.॥ २॥

मूल (चौपाई)

पति हियँ हेतु अधिक अनुमानी।
बिहसि उमा बोलीं प्रिय बानी॥
कथा जो सकल लोक हितकारी।
सोइ पूछन चह सैलकुमारी॥

अनुवाद (हिन्दी)

आपल्या स्वामींच्या मनात (आपल्यावर पूर्वीपेक्षा) अधिक प्रेम असल्याचे पाहून पार्वती हसून गोड शब्दांत म्हणाली, (याज्ञवल्क्य सांगतात,) जी कथा सर्व लोकांसाठी हितकारक आहे, तीच पार्वती विचारू इच्छिते.॥ ३॥

मूल (चौपाई)

बिस्वनाथ मम नाथ पुरारी।
त्रिभुवन महिमा बिदित तुम्हारी॥
चर अरु अचर नाग नर देवा।
सकल करहिं पद पंकज सेवा॥

अनुवाद (हिन्दी)

(पार्वती म्हणाली,) ‘हे विश्वनाथा, हे माझे नाथ, हे त्रिपुरारी, तुमचा महिमा त्रैलोक्यात प्रसिद्ध आहे. चर, अचर, नाग, मनुष्य आणि देव, सर्वजण तुमच्या चरणांची सेवा करतात.॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

प्रभु समरथ सर्बग्य सिव सकल कला गुन धाम।
जोग ग्यान बैराग्य निधि प्रनत कलपतरु नाम॥ १०७॥

अनुवाद (हिन्दी)

हे प्रभो! तुम्ही समर्थ, सर्वज्ञ आणि कल्याणस्वरूप आहात. सर्व कला आणि गुणांचे निधान आहात. तसेच योग, ज्ञान आणि वैराग्याचे भांडार आहात. तुमचे नाव हे शरणागतांसाठी कल्पवृक्ष आहे.॥ १०७॥

मूल (चौपाई)

जौं मो पर प्रसन्न सुखरासी।
जानिअ सत्य मोहि निज दासी॥
तौ प्रभु हरहु मोर अग्याना।
कहि रघुनाथ कथा बिधि नाना॥

अनुवाद (हिन्दी)

हे सुखराशी, जर तुम्ही माझ्यावर प्रसन्न असाल आणि मला आपली दासी मानीत असाल, तर हे प्रभो, तुम्ही श्रीरामांच्या नाना प्रकारच्या कथा सांगून माझे अज्ञान दूर करा.॥ १॥

मूल (चौपाई)

जासु भवनु सुरतरु तर होई।
सहि कि दरिद्र जनित दुखु सोई॥
ससिभूषन अस हृदयँ बिचारी।
हरहु नाथ मम मति भ्रम भारी॥

अनुवाद (हिन्दी)

ज्याचे घर कल्पवृक्षाखाली असेल, त्याने दारिद्रॺाचे दुःख का बरे सोसावे? हे शशिभूषण, हे नाथ, असा विचार करून माझ्या बुद्धीचा मोठा भ्रम दूर करा.॥ २॥

मूल (चौपाई)

प्रभु जे मुनि परमारथबादी।
कहहिं राम कहुँ ब्रह्म अनादी॥
सेस सारदा बेद पुराना।
सकल करहिं रघुपति गुन गाना॥

अनुवाद (हिन्दी)

हे प्रभो! जे ब्रह्माचे ज्ञाते आणि वक्ते असलेले मुनी आहेत, ते श्रीरघुनाथांना अनादी ब्रह्म म्हणतात आणि शेष, सरस्वती, वेद आणि पुराणे, हे सर्व श्रीरघुनाथांचे गुणगान करतात.॥ ३॥

मूल (चौपाई)

तुम्ह पुनि राम राम दिन राती।
सादर जपहु अनँग आराती॥
रामु सो अवध नृपति सुत सोई।
की अज अगुन अलखगति कोई॥

अनुवाद (हिन्दी)

आणि हे कामदेवाचे शत्रू, तुम्हीसुद्धा रात्रंदिवस आदराने राम-राम असे जपत असता. हे राम म्हणजेच तेच अयोध्येच्या राजाचे पुत्र आहेत काय? किंवा अजन्मा, निर्गुण आणि अगोचर कोणी दुसरेच राम आहेत?॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

जौं नृप तनय त ब्रह्म किमि नारि बिरहँ मति भोरि।
देखि चरित महिमा सुनत भ्रमति बुद्धि अति मोरि॥ १०८॥

अनुवाद (हिन्दी)

जर ते राजपुत्र असतील तर मग ब्रह्म कसे? (जर ते ब्रह्म असतील तर) स्त्रीच्या विरहामुळे त्यांची बुद्धी भ्रमित कशी झाली? एकीकडे त्यांचे असे चरित्र पाहून आणि दुसरीकडे त्यांचा महिमा ऐकून माझी बुद्धी पार बावचळून गेली आहे.॥ १०८॥

मूल (चौपाई)

जौं अनीह ब्यापक बिभु कोऊ।
कहहु बुझाइ नाथ मोहि सोऊ॥
अग्य जानि रिस उर जनि धरहू।
जेहि बिधि मोह मिटै सोइ करहू॥

अनुवाद (हिन्दी)

जर इच्छारहित, व्यापक, समर्थ ब्रह्म दुसरे कोणी असेल, तर हे नाथ, मला समजावून सांगा. मला अज्ञानी समजून राग धरू नका. ज्यामुळे माझा मोह दूर होईल, असे करा.॥ १॥

मूल (चौपाई)

मैं बन दीखि राम प्रभुताई।
अति भय बिकल न तुम्हहि सुनाई॥
तदपि मलिन मन बोधु न आवा।
सो फलु भली भाँति हम पावा॥

अनुवाद (हिन्दी)

मी (मागील जन्मात) वनामध्ये श्रीरामांची महती पाहिली होती, परंतु फार घाबरून गेल्यामुळे मी ती गोष्ट तुम्हांला सांगितली नव्हती. तरीही माझ्या अज्ञानी मनास काही बोध झाला नाही. त्याचे पुरते फळही मला मिळाले.॥ २॥

मूल (चौपाई)

अजहूँ कछु संसउ मन मोरें।
करहु कृपा बिनवउँ कर जोरें॥
प्रभु तब मोहि बहुभाँति प्रबोधा।
नाथ सो समुझि करहु जनि क्रोधा॥

अनुवाद (हिन्दी)

अजूनही माझ्या मनात काही संशय उरला आहे. तुम्ही कृपा करा. मी हात जोडून विनंती करते. हे प्रभो, त्यावेळी तुम्ही मला पुष्कळ तऱ्हेने समजावले होते. (तरीही माझा संशय दूर झाला नाही.) हे नाथ, असे समजून माझ्यावर राग धरू नका.॥ ३॥

मूल (चौपाई)

तब कर अस बिमोह अब नाहीं।
रामकथा पर रुचि मन माहीं॥
कहहु पुनीत राम गुन गाथा।
भुजगराज भूषन सुरनाथा॥

अनुवाद (हिन्दी)

आता मला पूर्वीसारखा मोह राहिलेला नाही. आता माझ्या मनात रामकथा ऐकण्याची आवड उत्पन्न झाली आहे. शेषनागाचे भूषण धारण करणाऱ्या हे देवांच्या नाथा, तुम्ही श्रीरामांच्या गुणांची पवित्र कथा मला सांगा.॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

बंदउँ पद धरि धरनि सिरु बिनय करउँ कर जोरि।
बरनहु रघुबर बिसद जसु श्रुति सिद्धांत निचोरि॥ १०९॥

अनुवाद (हिन्दी)

मी भूमीवर डोके ठेवून तुमच्या चरणांना वंदन करते आणि हात जोडून विनंती करते. तुम्ही वेद-सिद्धांताचे सार काढून श्रीरघुनाथांच्या निर्मल कीर्तीचे वर्णन करा.॥ १०९॥

मूल (चौपाई)

जदपि जोषिता नहिं अधिकारी।
दासी मन क्रम बचन तुम्हारी॥
गूढ़उ तत्त्व न साधु दुरावहिं।
आरत अधिकारी जहँ पावहिं॥

अनुवाद (हिन्दी)

जरी मी स्त्री असल्यामुळे ते ऐकण्याची अधिकारी नाही, तरी मी काया-वाचामनाने तुमचीच दासी आहे. संतजनांना जेव्हा तळमळ असलेला अधिकारी दिसतो, तेव्हा ते गूढ तत्त्वसुद्धा त्याच्यापासून लपवून ठेवीत नाहीत.॥ १॥

मूल (चौपाई)

अति आरति पूछउँ सुरराया।
रघुपति कथा कहहु करि दाया॥
प्रथम सो कारन कहहु बिचारी।
निर्गुन ब्रह्म सगुन बपु धारी॥

अनुवाद (हिन्दी)

हे देवांच्या स्वामी, मी मोठॺा काकुळतीने विचारते. तेव्हा तुम्ही माझ्यावर दया करून श्रीरघुनाथांची कथा सांगा. निर्गुण ब्रह्म हे सगुण रूप का धारण करते? ते कारण प्रथम सांगा.॥ २॥

मूल (चौपाई)

पुनि प्रभु कहहु राम अवतारा।
बालचरित पुनि कहहु उदारा॥
कहहु जथा जानकी बिबाहीं।
राज तजा सो दूषन काहीं॥

अनुवाद (हिन्दी)

हे प्रभू, नंतर श्रीरामचंद्रांच्या अवताराची कथा सांगा. तसेच त्यांचे उदार बालचरित्र सांगा. त्यानंतर त्यांनी जानकीशी कशाप्रकारे विवाह केला, ती कथा सांगा आणि त्यांना कोणत्या दोषामुळे राज्य सोडावे लागले, ते सांगा.॥ ३॥

मूल (चौपाई)

बन बसि कीन्हे चरित अपारा।
कहहु नाथ जिमि रावन मारा॥
राज बैठि कीन्हीं बहु लीला।
सकल कहहु संकर सुखसीला॥

अनुवाद (हिन्दी)

हे नाथ, त्यानंतर त्यांनी वनवासात राहून कोणते अपार चरित्र केले आणि रावणाला कशाप्रकारे मारले, ते सांगा. हे सुखस्वरूप शंकर, नंतर त्यांनी राज्यावर बसल्यावर ज्या लीला केल्या, त्या सर्व सांगा.॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

बहुरि कहहु करुनायतन कीन्ह जो अचरज राम।
प्रजा सहित रघुबंसमनि किमि गवने निज धाम॥ ११०॥

अनुवाद (हिन्दी)

हे कृपाधाम, श्रीरामचंद्रांनी जे अद्भुत चरित्र केले ते सांगा. ते रघुकुलशिरोमणी प्रजेसह कशाप्रकारे आपल्या परमधामास गेले?॥ ११०॥

मूल (चौपाई)

पुनि प्रभु कहहु सोतत्त्व बखानी।
जेहिं बिग्यान मगन मुनि ग्यानी॥
भगति ग्यान बिग्यान बिरागा।
पुनि सब बरनहु सहित बिभागा॥

अनुवाद (हिन्दी)

हे प्रभो, ज्या अनुभूतीमध्ये ज्ञानी मुनिगण नित्य मग्न राहतात, ते तत्त्व तुम्ही समजावून सांगा. त्यानंतर भक्ती, ज्ञान, विज्ञान आणि वैराग्य यांचे विभागांसह वर्णन करून सांगा.॥ १॥

मूल (चौपाई)

औरउ राम रहस्य अनेका।
कहहु नाथ अति बिमल बिबेका॥
जो प्रभु मैं पूछा नहिं होई।
सोउ दयाल राखहु जनि गोई॥

अनुवाद (हिन्दी)

(याशिवाय) श्रीरामचंद्रांच्या ज्या इतर अनेक रहस्यमय गोष्टी असतील, त्या सांगा. हे नाथ, तुमचे ज्ञान अत्यंत निर्मल आहे. हे प्रभो, हे दयाळू, जी गोष्ट मी विचारली नसेल, तीसुद्धा लपवून न ठेवता सांगा.॥ २॥

मूल (चौपाई)

तुम्ह त्रिभुवन गुर बेद बखाना।
आन जीव पाँवर का जाना॥
प्रस्न उमा कै सहज सुहाई।
छल बिहीन सुनि सिव मन भाई॥

अनुवाद (हिन्दी)

वेदांनी तुम्हांला तिन्ही लोकांचा गुरू म्हटले आहे. इतर पामर जीव हे रहस्य कसे जाणणार!’ पार्वतीचे हे सहज-सुंदर व निष्कपट प्रश्न ऐकून शिवांच्या मनास फार बरे वाटले.॥ ३॥

मूल (चौपाई)

हर हियँ रामचरित सब आए।
प्रेम पुलक लोचन जल छाए॥
श्रीरघुनाथ रूप उर आवा।
परमानंद अमित सुख पावा॥

अनुवाद (हिन्दी)

श्रीमहादेवांच्या मनात सर्व रामचरित्र आले. प्रेमाने त्यांचे शरीर पुलकित झाले आणि नेत्रांमध्ये पाणी आले. श्रीरघुनाथांचे रूप त्यांच्या मनात प्रकट झाले, त्यामुळे प्रत्यक्ष परमानंदस्वरूप शिवांनाही अपार सुख झाले.॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

मगन ध्यान रस दंड जुग पुनि मन बाहेर कीन्ह।
रघुपति चरित महेस तब हरषित बरनै लीन्ह॥ १११॥

अनुवाद (हिन्दी)

शिव दोन घटका ध्यानाच्या आनंद-रसात मग्न झाले, नंतर त्यांनी बळेच मन आवरले आणि ते प्रसन्न चित्ताने श्रीरघुनाथांचे चरित्र वर्णन करू लागले.॥ १११॥

मूल (चौपाई)

झूठेउ सत्य जाहि बिनु जानें।
जिमि भुजंग बिनु रजु पहिचानें॥
जेहि जानें जग जाइ हेराई।
जागें जथा सपन भ्रम जाई॥

अनुवाद (हिन्दी)

‘जे जाणल्याविना खोटेसुद्धा खरे वाटते, जसा दोरीवर सापाचा भ्रम होतो आणि जे जाणल्यावर जगताचा लोप होतो, जसे जागे झाल्यावर स्वप्नाचा भ्रम नाहीसा होतो,॥ १॥

मूल (चौपाई)

बंदउँ बालरूप सोइ रामू।
सब सिधि सुलभ जपत जिसु नामू॥
मंगल भवन अमंगल हारी।
द्रवउ सो दसरथ अजिर बिहारी॥

अनुवाद (हिन्दी)

त्या श्रीरामचंद्रांच्या बालरूपाला मी वंदन करतो. त्यांचे नाव जपल्यामुळे सर्व सिद्धी सहजपणे प्राप्त होतात. मंगलाचे धाम असणारे, अमंगलाचे हरण करणारे आणि दशरथाच्या अंगणामध्ये खेळणारे ते बालरूप असलेले श्रीराम माझ्यावर कृपा करोत.’॥ २॥

मूल (चौपाई)

करि प्रनाम रामहि त्रिपुरारी।
हरषि सुधा सम गिरा उचारी॥
धन्य धन्य गिरिराजकुमारी।
तुम्ह समान नहिं कोउ उपकारी॥

अनुवाद (हिन्दी)

त्रिपुरासुराचा वध करणारे शिव श्रीरामांना प्रणाम करून आनंदाने अमृतमय वाणीने म्हणाले, ‘हे गिरिराजकुमारी! तू धन्य आहेस. खरेच धन्य आहेस. तुझ्यासारखा उपकार करणारा कोणीही नाही.॥ ३॥

मूल (चौपाई)

पूँछेहु रघुपति कथा प्रसंगा।
सकल लोक जग पावनि गंगा॥
तुम्ह रघुबीर चरन अनुरागी।
कीन्हिहु प्रस्न जगत हित लागी॥

अनुवाद (हिन्दी)

तू श्रीरामांची कथा विचारलीस. ती कथा जगाला पावन करणाऱ्या गंगेसमान सर्व लोकांना पावन करणारी आहे. श्रीरामांच्या चरणी तुझे प्रेम आहे. त्यामुळे तू जगाच्या कल्याणासाठीच प्रश्न विचारले आहेस.॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

राम कृपा तें पारबति सपनेहुँ तव मन माहिं।
सोक मोह संदेह भ्रम मम बिचार कछु नाहिं॥ ११२॥

अनुवाद (हिन्दी)

हे पार्वती, श्रीरामांच्या कृपेमुळे तुझ्या मनात स्वप्नातही शोक, मोह, संदेह आणि भ्रम काहीही नाही, असे मला वाटते.॥ ११२॥

मूल (चौपाई)

तदपि असंका कीन्हिहु सोई।
कहत सुनत सब कर हित होई॥
जिन्ह हरिकथा सुनी नहिं काना।
श्रवन रंध्र अहिभवन समाना॥

अनुवाद (हिन्दी)

तरीही तू तीच पूर्वीची शंका उपस्थित केलीस. हा प्रसंग सांगण्याने-ऐकण्याने सर्वांचे कल्याण होईल. ज्यांनी आपल्या कानांनी भगवंतांची कथा ऐकली नाही, त्यांची कानांची भोके सापाच्या बिळाप्रमाणे आहेत.॥ १॥

मूल (चौपाई)

नयनन्हि संत दरस नहिं देखा।
लोचन मोरपंख कर लेखा॥
ते सिर कटु तुंबरि समतूला।
जे न नमत हरि गुर पद मूला॥

अनुवाद (हिन्दी)

ज्यांनी आपल्या डोळ्ॺांनी संतांचे दर्शन घेतले नाही, त्यांचे डोळे मोराच्या पंखांवर दिसणाऱ्या नकली डोळॺांच्या श्रेणीत येतात. जे मस्तक श्रीहरींच्या आणि श्रीगुरूंच्या चरणी झुकत नाही, ते कडू भोपळॺासमान होय.॥ २॥

मूल (चौपाई)

जिन्ह हरिभगति हृदयँ नहिं आनी।
जीवत सव समान तेइ प्रानी॥
जो नहिं करइ राम गुन गाना।
जीह सो दादुर जीह समाना॥

अनुवाद (हिन्दी)

ज्यांच्या हृदयात भगवंतांच्या भक्तीला स्थान नाही, ते प्राणी जिवंत मुडद्याप्रमाणे होत. जी जीभ श्रीरामांच्या गुणांचे गायन करीत नाही, ती बेडकाच्या जिभेप्रमाणे होय.॥ ३॥

मूल (चौपाई)

कुलिस कठोर निठुर सोइ छाती।
सुनि हरिचरित न जो हरषाती॥
गिरिजा सुनहु राम कै लीला।
सुर हित दनुज बिमोहनसीला॥

अनुवाद (हिन्दी)

भगवंतांचे चरित्र ऐकून आनंदित होत नाही, ते हृदय वज्रासारखे कठोर व निष्ठुर होय, हे पार्वती, श्रीरामचंद्रांची लीला ऐक. ती देवांचे कल्याण करणारी आणि विशेषतः दैत्यांना मोहित करणारी आहे.॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

रामकथा सुरधेनु सम सेवत सब सुख दानि।
सतसमाज सुरलोक सब को न सुनै अस जानि॥ ११३॥

अनुवाद (हिन्दी)

कामधेनू ही सेवा केल्यावर सर्व सुखे प्राप्त करून देते, तशी ही रामकथा आहे आणि सत्पुरुषांचा समुदाय हाच सर्व देवांचा लोक होय. असे पाहिल्यावर कोण बरे ही कथा ऐकणार नाही?॥ ११३॥

मूल (चौपाई)

रामकथा सुंदर कर तारी।
संसय बिहग उड़ावनिहारी॥
रामकथा कलि बिटप कुठारी।
सादर सुनु गिरिराजकुमारी॥

अनुवाद (हिन्दी)

संदेहरूपी पक्ष्यांना हुसकून लावणाऱ्या टाळीप्रमाणे श्रीरामांची कथा हातांची सुंदर टाळी आहे. रामकथा ही कलियुगरूपी वृक्षाला तोडणारी कुऱ्हाड आहे. हे गिरिराजकुमारी! तू ही कथा आदराने ऐक.॥ १॥

मूल (चौपाई)

राम नाम गुन चरित सुहाए।
जनम करम अगनित श्रुति गाए॥
जथा अनंत राम भगवाना।
तथा कथा कीरति गुन नाना॥

अनुवाद (हिन्दी)

श्रीरामचंद्रांची सुंदर नामे, गुण, चरित्र, जन्म आणि कर्म हे सर्व अगणित असल्याचे वेदांनी प्रतिपादित केले आहे. ज्याप्रमाणे भगवान श्रीराम हे अनंत आहेत, त्याप्रमाणे त्यांच्या कथा, कीर्ती आणि गुण हे सुद्धा अनंत आहेत.॥ २॥

मूल (चौपाई)

तदपि जथा श्रुत जसिमति मोरी।
कहिहउँ देखि प्रीति अति तोरी॥
उमा प्रस्न तव सहज सुहाई।
सुखद संतसंमत मोहि भाई॥

अनुवाद (हिन्दी)

तरीही तुझे (त्याविषयी) अत्यंत प्रेम पाहून जे काही मी ऐकले आहे आणि जशी माझी बुद्धी आहे, त्यानुसार मी तुला सांगतो. हे पार्वती, तुझा प्रश्न स्वभावतः सुंदर, सुखदायक आणि संतसंमत आहे व मलाही तो फार आवडला.॥ ३॥

मूल (चौपाई)

एक बात नहिं मोहि सोहानी।
जदपि मोह बस कहेहु भवानी॥
तुम्ह जो कहा राम कोउ आना।
जेहि श्रुति गाव धरहिं मुनि ध्याना॥

अनुवाद (हिन्दी)

परंतु हे पार्वती, एक गोष्ट मात्र मला आवडली नाही. जरी ती तू मोहामुळे म्हणालीस. तू असे म्हणालीस की, वेद ज्यांचे गुणगान करतात आणि मुनिजन ज्यांचे ध्यान करतात, ते राम कुणी दुसरे आहेत काय?॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

कहहिं सुनहिं अस अधम नर ग्रसे जे मोह पिसाच।
पाषंडी हरि पद बिमुख जानहिं झूठ न साच॥ ११४॥

अनुवाद (हिन्दी)

जे मोहरूपी पिशाचाने झपाटले आहेत, नास्तिक आहेत, भगवंतांच्या चरणांशी विन्मुख आहेत आणि खरे-खोटे ज्यांना मुळीच माहीत नाही, असे अधम मनुष्यच अशाप्रकारे सांगत-ऐकत असतात.॥ ११४॥

मूल (चौपाई)

अग्य अकोबिद अंध अभागी।
काई बिषय मुकुर मन लागी॥
लंपट कपटी कुटिल बिसेषी।
सपनेहुँ संतसभा नहिं देखी॥

अनुवाद (हिन्दी)

जे अज्ञानी, मूर्ख, आंधळे आणि भाग्यहीन आहेत, ज्यांच्या मनोरूपी आरशावर विषयरूपी मळ साचला आहे, जे व्यभिचारी, कपटी व मोठे दुष्ट आहेत आणि ज्यांनी कधी स्वप्नातही संतांचे दर्शन घेतले नाही;॥ १॥

मूल (चौपाई)

कहहिं ते बेद असंमत बानी।
जिन्ह कें सूझ लाभु नहिं हानी॥
मुकुर मलिन अरु नयन बिहीना।
राम रूप देखहिं किमि दीना॥

अनुवाद (हिन्दी)

ज्यांना आपली लाभ-हानी कळत नाही, तेच लोक असे वेदविरोधी बोलत असतात. ज्यांचा हृदयरूपी आरसा मलिन आहे आणि जे नेत्रहीन आहेत, ते बिचारे श्रीरामांचे रूप कसे पाहणार?॥ २॥

मूल (चौपाई)

जिन्ह कें अगुन न सगुन बिबेका।
जल्पहिं कल्पित बचन अनेका॥
हरिमाया बस जगत भ्रमाहीं।
तिन्हहि कहत कछु अघटित नाहीं॥

अनुवाद (हिन्दी)

ज्यांना निर्गुण-सगुण याचा काहीही विवेक नाही. जे अनेक कपोलकल्पित गोष्टी बडबडत असतात, जे श्रीहरींच्या मायेला वश होऊन जन्म-मृत्यूच्या फेऱ्यात भटकत असतात, त्यांना काहीही बरळणे अशक्य नाही.॥ ३॥

मूल (चौपाई)

बातुल भूत बिबस मतवारे।
ते नहिं बोलहिं बचन बिचारे॥
जिन्ह कृत महामोह मद पाना।
तिन्ह कर कहा करिअ नहिं काना॥

अनुवाद (हिन्दी)

ज्यांना (सन्निपात, उन्माद इत्यादी) वायुरोगाने झपाटले आहे, ज्यांना भुताने पछाडले आहे आणि ज्यांनी नशापाणी केले आहे, असे लोक काही विचार करून बोलत नाहीत. ज्यांनी महामोहरूपी मदिरा ढोसली आहे, त्यांचे काहीही ऐकू नये.॥ ४॥

सोरठा

मूल (दोहा)

अस निज हृदयँ बिचारि तजु संसय भजु राम पद।
सुनु गिरिराज कुमारि भ्रम तम रबि कर बचन मम॥ ११५॥

अनुवाद (हिन्दी)

मनात असा विचार करून संशय सोडून दे आणि श्रीरामचंद्र्रांच्या चरणांची सेवा कर. हे पार्वती, भ्रमरूपी अंधकाराचा नाश करण्यासाठी सूर्याच्या किरणांप्रमाणे असणारे माझे हे बोल ऐक.॥ ११५॥

मूल (चौपाई)

सगुनहि अगुनहि नहिं कछु भेदा।
गावहिं मुनि पुरान बुध बेदा॥
अगुन अरूप अलख अज जोई।
भगत प्रेम बस सगुन सो होई॥

अनुवाद (हिन्दी)

मुनी, पुराणे, पंडित आणि वेद हे सर्व सांगतात की, सगुण आणि निर्गुण यांच्यामध्ये कोणताही भेद नाही. जो निर्गुण, निराकार, अव्यक्त आणि अजन्मा आहे, तोच भक्तांच्या प्रेमाला वश होऊन सगुण बनतो.॥ १॥

मूल (चौपाई)

जो गुन रहित सगुन सोइ कैसें।
जलु हिम उपल बिलग नहिं जैसें॥
जासु नाम भ्रम तिमिर पतंगा।
तेहि किमि कहिअ बिमोह प्रसंगा॥

अनुवाद (हिन्दी)

जो निर्गुण तोच सगुण कसा, हे समजून घे. ज्याप्रमाणे पाणी व पाण्याची गार यांत भेद नाही. भ्रमरूपी अंधकार नष्ट करण्यासाठी ज्यांचे नाव सूर्य आहे, त्यांच्याबाबतीत मोह कसा उद्भवू शकेल?॥ २॥

मूल (चौपाई)

राम सच्चिदानंद दिनेसा।
नहिं तहँ मोह निसा लवलेसा॥
सहज प्रकासरूप भगवाना।
नहिं तहँ पुनि बिग्यान बिहाना॥

अनुवाद (हिन्दी)

श्रीरामचंद्र हे सच्चिदानंदस्वरूप सूर्य आहेत. तेथे मोहरूपी रात्रीचा लवलेशही नाही. ते स्वभावतःच प्रकाशरूप आणि षड्गुणैश्वर्ययुक्त भगवान आहेत, तेथे तर विज्ञानरूपी प्रातःकालही होत नाही. (अज्ञानरूपी रात्र असेल तरच विज्ञानरूपी प्रातःकाल होणार. भगवान तर नित्य ज्ञानस्वरूप आहेत.)॥३॥

मूल (चौपाई)

हरष बिषाद ग्यान अग्याना।
जीव धर्म अहमिति अभिमाना॥
राम ब्रह्म ब्यापक जग जाना।
परमानंद परेस पुराना॥

अनुवाद (हिन्दी)

हर्ष, शोक, ज्ञान, अज्ञान, अहंता आणि अभिमान या सर्व बाबी जीवाचे स्वभाव आहेत. श्रीरामचंद्र हे तर व्यापक ब्रह्म, परमानंदस्वरूप, परात्पर प्रभू आणि पुराणपुरुष आहेत, ही गोष्ट साऱ्या जगाला ठाऊक आहे.॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

पुरुष प्रसिद्ध प्रकास निधि प्रगट परावर नाथ।
रघुकुलमनि मम स्वामि सोइ कहि सिवँ नायउ माथ॥ ११६॥

अनुवाद (हिन्दी)

जे प्रसिद्ध पुराणपुरुष आहेत, जे प्रकाशाचे भांडार आहेत, सर्व रूपांमध्ये जे व्यक्त आहेत, जीव, माया आणि जगत यांचे स्वामी आहेत, तेच रघुकुलमणी श्रीरामचंद्र हे माझे स्वामी आहेत’ असे म्हणून शिवांनी त्यांना नमन केले.॥ ११६॥

मूल (चौपाई)

निज भ्रम नहिं समुझहिं अग्यानी।
प्रभु पर मोह धरहिं जड़ प्रानी॥
जथा गगन घन पटल निहारी।
झाँपेउ भानु कहहिं कुबिचारी॥

अनुवाद (हिन्दी)

‘अज्ञानी माणसांना स्वतःचा भ्रम कळत नाही आणि मग ते मूर्ख, प्रभू श्रीरामचंद्रांच्यावर आपल्या भ्रमाचा आरोप करतात. ज्याप्रमाणे आकाशातील ढगांचे आच्छादन पाहून अज्ञानी लोक म्हणतात की, ढगांनी सूर्याला झाकून टाकले.॥ १॥

मूल (चौपाई)

चितव जो लोचन अंगुलि लाएँ।
प्रगट जुगल ससि तेहि के भाएँ॥
उमा राम बिषइक अस मोहा।
नभ तम धूम धूरि जिमि सोहा॥

अनुवाद (हिन्दी)

जो माणूस डोळॺांत बोट घालून पाहतो, त्याला दोन चंद्र दिसतात. हे पार्वती, श्रीरामचंद्रांच्या बाबतीत अशा प्रकारच्या मोहाची कल्पना करणे म्हणजे आकाशात अंधकार, धूर आणि धूळ पाहणे होय. (आकाश हे निर्मळ व निर्लेप आहे, त्याला कोणी मलिन किंवा स्पर्श करू शकत नाही. त्याप्रमाणे भगवान श्रीरामचंद्र हे नित्य निर्मळ व निर्लेप आहेत.)॥ २॥

मूल (चौपाई)

बिषय करन सुर जीव समेता।
सकल एक तें एक सचेता॥
सब कर परम प्रकासक जोई।
राम अनादि अवधपति सोई॥

अनुवाद (हिन्दी)

विषय, इंद्रिये, इंद्रियांचे देव आणि जीवात्मा—हे सर्व एकमेकांच्या साहाय्यामुळे चेतन असतात. (अर्थात विषयांचे अस्तित्व इंद्रियांमुळे, इंद्रियांचे सामर्थ्य देवांमुळे आणि देवांचा प्रकाश चेतन जीवात्म्यामुळे असतो.) या सर्वांचा जो प्रकाशक आहे तोच अनादी परमात्मा म्हणजे अयोध्यानरेश श्रीरामचंद्र होत.॥ ३॥

मूल (चौपाई)

जगत प्रकास्य प्रकासक रामू।
मायाधीस ग्यान गुन धामू॥
जासु सत्यता तें जड़ माया।
भास सत्य इव मोह सहाया॥

अनुवाद (हिन्दी)

हे जग प्रकाश्य आहे आणि श्रीराम हे प्रकाशक आहेत. ते मायेचे स्वामी आणि ज्ञान आणि गुणांचे निधान आहेत. त्यांच्या सत्तेमुळे जड माया ही मोहाच्या मदतीने सत्य असल्यासारखी भासते.॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

रजत सीप महुँ भास जिमि जथा भानु कर बारि।
जदपि मृषा तिहुँ काल सोइ भ्रम न सकइ कोउ टारि॥ ११७॥

अनुवाद (हिन्दी)

ज्याप्रमाणे शिंपल्यावर चांदीची आणि सूर्याच्या किरणांवर पाण्याची प्रचीती येते. जरी ही प्रचीती तिन्ही काळांत खोटी असली, तरी कुणीही हा भ्रम हटवू शकत नाही.॥ ११७॥

मूल (चौपाई)

एहि बिधि जग हरि आश्रित रहई।
जदपि असत्य देत दुख अहई॥
जौं सपनें सिर काटै कोई।
बिनु जागें न दूरि दुख होई॥

अनुवाद (हिन्दी)

याचप्रमाणे हा संसार भगवंतांच्या आश्रयावर अवलंबून असतो. तो जरी असत्य आहे, तरीही तो दुःख देतोच. ज्याप्रमाणे स्वप्नात कुणी मुंडके कापून टाकले, तर त्याचे दुःख जागे झाल्याशिवाय काही दूर होत नाही.॥ १॥

मूल (चौपाई)

जासु कृपाँ अस भ्रम मिटि जाई।
गिरिजा सोइ कृपाल रघुराई॥
आदि अंत कोउ जासु न पावा।
मति अनुमानि निगम अस गावा॥

अनुवाद (हिन्दी)

हे पार्वती, ज्यांच्या कृपेमुळे अशा प्रकारचा भ्रम नाहीसा होतो, ते कृपाळू श्रीरघुनाथ होत. त्यांचा आदी आणि अंत कुणालाही कळला नाही. वेदांनी आपल्या बुद्धीनुसार अनुमान करून असे वर्णन केले आहे,॥ २॥

मूल (चौपाई)

बिनु पद चलइ सुनइ बिनु काना।
कर बिनु करम करइ बिधि नाना॥
आनन रहित सकल रस भोगी।
बिनु बानी बकता बड़ जोगी॥

अनुवाद (हिन्दी)

ते (ब्रह्म) पायाविना चालते, कानाविना ऐकते, हाताविनाच अनेक प्रकारची कामे करते, मुखाविनाच सर्व रसांचा आस्वाद घेते आणि वाणीविनाच ते उत्कृष्ट वक्ता आहे.॥ ३॥

मूल (चौपाई)

तन बिनु परस नयन बिनु देखा।
ग्रहइ घ्रान बिनु बास असेषा॥
असि सब भाँति अलौकिक करनी।
महिमा जासु जाइ नहिं बरनी॥

अनुवाद (हिन्दी)

ते शरीराविनाच स्पर्शानुभव करते, डोळॺांविना पाहते आणि नाकाविनाच सर्व प्रकारचा गंध घेते. त्या ब्रह्माची सर्व करणी सर्व प्रकारे अशी अलौकिक आहे. त्याचा महिमा सांगता येत नाही.॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

जेहि इमि गावहिं बेद बुध जाहि धरहिं मुनि ध्यान।
सोइ दसरथ सुत भगत हित कोसलपति भगवान॥ ११८॥

अनुवाद (हिन्दी)

वेद आणि पंडित ज्यांचे अशाप्रकारे वर्णन करतात आणि मुनी ज्यांचे ध्यान करतात, तेच दशरथनंदन, भक्त-हितकारी, अयोध्यापती, भगवान श्रीरामचंद्र होत.॥ ११८॥

मूल (चौपाई)

कासीं मरत जंतु अवलोकी।
जासु नाम बल करउँ बिसोकी॥
सोइ प्रभु मोर चराचर स्वामी।
रघुबर सब उर अंतरजामी॥

अनुवाद (हिन्दी)

(हे पार्वती,) ज्यांच्या नामाच्या प्रतापामुळे मी काशीत मृत्यू पावणाऱ्या प्राण्यास पाहून त्याला राममंत्र देऊन मुक्ती देतो. तेच माझे प्रभू रघुश्रेष्ठ श्रीरामचंद्र हे जड-चेतनाचे स्वामी आणि सर्वांतर्यामी आहेत.॥ १॥

मूल (चौपाई)

बिबसहुँ जासु नाम नर कहहीं।
जनम अनेक रचित अघ दहहीं॥
सादर सुमिरन जे नर करहीं।
भव बारिधि गोपद इव तरहीं॥

अनुवाद (हिन्दी)

इच्छा नसतानाही ज्यांचे नाम घेतल्यामुळे अनेक जन्मांमध्ये केलेली पापे जळून जातात, त्यांचे जी माणसे आदराने स्मरण करतात, ते संसाररूपी (दुस्तर) समुद्रास गाईच्या खुरामुळे बनलेल्या खड्डॺाप्रमाणे (सहजपणे) ओलांडून जातात.॥ २॥

मूल (चौपाई)

राम सो परमातमा भवानी।
तहँ भ्रम अति अबिहित तव बानी॥
अस संसय आनत उर माहीं।
ग्यान बिराग सकल गुन जाहीं॥

अनुवाद (हिन्दी)

हे पार्वती, ते परमात्मा म्हणजे श्रीरामचंद्रच होत. त्यांच्या ठिकाणी भ्रमाचा आरोप करणारे बोलणे हे अत्यंत अयोग्य आहे. अशाप्रकारचा संदेह मनात आणल्यामुळे मनुष्याचे ज्ञान, वैराग्य इत्यादी सर्व सद्गुण नाहीसे होतात.’॥ ३॥

मूल (चौपाई)

सुनि सिव के भ्रम भंजन बचना।
मिटि गै सब कुतरक कै रचना॥
भइ रघुपति पद प्रीति प्रतीती।
दारुन असंभावना बीती॥

अनुवाद (हिन्दी)

भगवान शिवांचे हे भ्रम दूर करणारे बोल ऐकून पार्वतीचे सर्व कुतर्क नाहीसे झाले. श्रीरघुनाथांच्या चरणी तिला प्रेम व विश्वास वाटू लागला आणि त्यांच्याविषयीचा तिचा फार मोठा गैरसमज दूर झाला.॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

पुनि पुनि प्रभु पद कमल गहि जोरि पंकरुह पानि।
बोलीं गिरिजा बचन बर मनहुँ प्रेम रस सानि॥ ११९॥

अनुवाद (हिन्दी)

पार्वती वारंवार शिवांच्या चरणकमलांना कवळून व कमलांसारखे कर जोडून जणू प्रेमरसामध्ये ओथंबलेल्या सुंदर वाणीने बोलली.॥ ११९॥

मूल (चौपाई)

ससि कर सम सुनि गिरा तुम्हारी।
मिटा मोह सरदातप भारी॥
तुम्ह कृपाल सबु संसउ हरेऊ।
राम स्वरूप जानि मोहि परेऊ॥

अनुवाद (हिन्दी)

‘तुमची चंद्र-किरणांसमान शीतल वाणी ऐकून माझ्या अज्ञानरूपी शरदऋतूतील कडक उन्हाचा ताप नाहीसा झाला. हे कृपाळू, तुम्ही माझा संपूर्ण संदेह हरण केला. आता श्रीरामांचे वास्तविक स्वरूप मला समजून आले.॥ १॥

मूल (चौपाई)

नाथ कृपाँ अब गयउ बिषादा।
सुखी भयउँ प्रभु चरन प्रसादा॥
अब मोहि आपनि किंकरि जानी।
जदपि सहज जड़ नारि अयानी॥

अनुवाद (हिन्दी)

हे नाथ, तुमच्या कृपेने आता माझा विषाद निघून गेला आणि तुमच्या चरणांच्या कृपेने मी सुखी झाले. मी स्त्री असल्यामुळे स्वभावतः मूर्ख आणि अज्ञानी आहे. तरीही आता तुम्ही मला आपली दासी मानून,॥ २॥

मूल (चौपाई)

प्रथम जो मैं पूछा सोइ कहहू।
जौं मो पर प्रसन्न प्रभु अहहू॥
राम ब्रह्म चिनमय अबिनासी।
सर्ब रहित सब उर पुर बासी॥

अनुवाद (हिन्दी)

हे प्रभो, जर तुम्ही माझ्यावर प्रसन्न असाल, तर जी गोष्ट मी तुम्हांला प्रथम विचारली होती, ती सांगा. (हे सत्य आहे की,) श्रीरामचंद्र ब्रह्म आहेत, चिन्मय (ज्ञानस्वरूप) आहेत, अविनाशी आहेत, सर्वांहून रहित आणि सर्वांच्या हृदयरूपी नगरीमध्ये निवास करणारे आहेत.॥ ३॥

मूल (चौपाई)

नाथ धरेउ नरतनु केहि हेतू।
मोहि समुझाइ कहहु बृषकेतू॥
उमा बचन सुनि परम बिनीता।
रामकथा पर प्रीति पुनीता॥

अनुवाद (हिन्दी)

मग हे नाथ, त्यांनी मनुष्य-शरीर कशासाठी धारण केले? हे धर्म-ध्वज धारण करणाऱ्या प्रभो, हे मला समजावून द्या. पार्वतीचे नम्र बोल ऐकून आणि श्रीरामांच्या कथेविषयी तिचे विशुद्ध प्रेम पाहून॥ ४॥