२८ मासपारायण, तीसरा विश्राम

मूल (चौपाई)

सुनि बोलीं मुसुकाइ भवानी।
उचित कहेहु मुनिबर बिग्यानी॥
तुम्हरें जान कामु अब जारा।
अब लगि संभु रहे सबिकारा॥

अनुवाद (हिन्दी)

ते ऐकून पार्वती थट्टेने हसत म्हणाली, ‘हे ज्ञानी मुनिवरांनो, छान बोललात! शिवांनी कामदेवाला आता जाळून टाकले, म्हणजे आतापर्यंत ते विकारयुक्त (कामी) होते, असे तुम्हाला वाटले ना?॥ १॥

मूल (चौपाई)

हमरें जान सदा सिव जोगी।
अज अनवद्य अकाम अभोगी॥
जौं मैं सिव सेये अस जानी।
प्रीति समेत कर्म मन बानी॥

अनुवाद (हिन्दी)

परंतु मला माहीत आहे की, श्रीशिव हे नेहमी योगी, अजन्मा, अनिंद्य, कामरहित व भोगहीन आहेत आणि मी शिवांना असेच समजून कायावाचामनाने प्रेमपूर्वक त्यांची उपासना केली आहे.॥ २॥

मूल (चौपाई)

तौ हमार पन सुनहु मुनीसा।
करिहहिं सत्य कृपानिधि ईसा॥
तुम्ह जो कहा हर जारेउ मारा।
सोइ अति बड़ अबिबेकु तुम्हारा॥

अनुवाद (हिन्दी)

तेव्हा हे मुनीश्वरांनो, ऐका, ते कृपानिधान भगवान शंकर माझी प्रतिज्ञा खरी करतील. तुम्ही म्हणता की, शिवांनी कामदेवाला भस्म करून टाकले, परंतु तेच तुमचे घोर अज्ञान आहे.॥ ३॥

मूल (चौपाई)

तात अनल कर सहज सुभाऊ।
हिम तेहि निकट जाइ नहिं काऊ॥
गएँ समीप सो अवसि नसाई।
असि मन्मथ महेस की नाई॥

अनुवाद (हिन्दी)

महाराज, अग्नीचा असा स्वभावच आहे की, हिम त्याच्याजवळ जाऊच शकत नाही आणि जर गेलेच तर ते नष्ट होते. महेश आणि मन्मथ यांचा संबंध असाच आहे.’॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

हियँ हरषे मुनि बचन सुनि देखि प्रीति बिस्वास।
चले भवानिहि नाइ सिर गए हिमाचल पास॥ ९०॥

अनुवाद (हिन्दी)

पार्वतीचे हे बोलणे ऐकून व तिचे प्रेम आणि विश्वास पाहून सप्तर्षी मनातून खूष झाले. ते भवानीला वंदन करून निघाले आणि हिमवानाकडे गेले.॥ ९०॥

मूल (चौपाई)

सबु प्रसंगु गिरिपतिहि सुनावा।
मदन दहन सुनि अति दुखु पावा॥
बहुरि कहेउ रति कर बरदाना।
सुनि हिमवंत बहुत सुखु माना॥

अनुवाद (हिन्दी)

त्यांनी पर्वतराज हिमालयाला सर्व वृत्तांत सांगितला. कामदेव भस्म झाल्याचे ऐकून हिमालय दुःखी झाला. नंतर मुनींनी रतीला वरदानाची गोष्ट सांगितली. तेव्हा हिमाचलाला आनंद झाला.॥ १॥

मूल (चौपाई)

हृदयँ बिचारि संभु प्रभुताई।
सादर मुनिबर लिए बोलाई॥
सुदिनु सुनखतु सुघरी सोचाई।
बेगि बेदबिधि लगन धराई॥

अनुवाद (हिन्दी)

हिमाचलाने शिवांचा मोठेपणा जाणून श्रेष्ठ मुनींना आदराने बोलावून घेतले आणि त्यांच्याकडून शुभ दिवस, शुभ नक्षत्र व शुभ घटिका शोधून वेदविधिपूर्वक विवाह शीघ्र निश्चित करून लग्नपत्रिका तयार केली.॥ २॥

मूल (चौपाई)

पत्री सप्तरिषिन्ह सोइ दीन्ही।
गहि पद बिनय हिमाचल कीन्ही॥
जाइ बिधिहि तिन्ह दीन्हि सो पाती।
बाचत प्रीति न हृदयँ समाती॥

अनुवाद (हिन्दी)

नंतर हिमालयाने ती लग्नपत्रिका सप्तऋषींकडे दिली आणि त्यांच्या पाया पडून त्यांना ती ब्रह्मदेवांना देण्याची विनंती केली. त्यांनी जाऊन ती लग्नपत्रिका ब्रह्मदेवांना दिली. ती वाचून त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला.॥ ३॥

मूल (चौपाई)

लगन बाचि अज सबहि सुनाई।
हरषे मुनि सब सुर समुदाई॥
सुमन बृष्टि नभ बाजन बाजे।
मंगल कलस दसहुँ दिसि साजे॥

अनुवाद (हिन्दी)

ब्रह्मदेवांनी ती लग्नपत्रिका सर्वांना वाचून दाखविली. ती ऐकून सर्व मुनी व देव आनंदित झाले. आकाशातून पुष्पवर्षा होऊ लागली, वाद्ये वाजू लागली आणि दश दिशांना मंगल कलश सजविले गेले.॥ ४॥