२५ कामदेवाचे भस्म होणे

दोहा

मूल (दोहा)

सुरन्ह कही निज बिपति सब सुनि मन कीन्ह बिचार।
संभु बिरोध न कुसल मोहि बिहसि कहेउ अस मार॥ ८३॥

अनुवाद (हिन्दी)

देवांनी आपले संकट कामदेवाला सांगितले. ते ऐकून कामदेवाने विचार केला आणि हसत म्हटले, ‘शिवांशी विरोध करण्यामध्ये माझे काही खरे नाही.॥ ८३॥

मूल (चौपाई)

तदपि करब मैं काजु तुम्हारा।
श्रुति कह परम धरम उपकारा॥
पर हित लागि तजइ जो देही।
संतत संत प्रसंसहिं तेही॥

अनुवाद (हिन्दी)

तरीही तुमचे काम मी करीन, कारण वेद दुसऱ्यावर केलेल्या उपकारास परमधर्म म्हणतात. जो दुसऱ्याच्या हितासाठी आपल्या शरीराचाही त्याग करतो, त्याचीच संत प्रशंसा करतात.’॥ १॥

मूल (चौपाई)

अस कहि चलेउ सबहि सिरु नाई।
सुमन धनुष कर सहित सहाई॥
चलत मार अस हृदयँ बिचारा।
सिव बिरोध ध्रुव मरनु हमारा॥

अनुवाद (हिन्दी)

असे म्हणून आणि सर्वांना नमस्कार करून कामदेव आपले पुष्प-धनुष्य हाती घेऊन वसंतादी सहाय्यकांबरोबर निघाला. जात असताना कामदेवाच्या मनात विचार आला की, शिवांशी विरोध केल्याने माझे मरण नक्की ओढवणार आहे.॥ २॥

मूल (चौपाई)

तब आपन प्रभाउ बिस्तारा।
निज बस कीन्ह सकल संसारा॥
कोपेउ जबहिं बारिचरकेतू।
छन महुँ मिटे सकल श्रुति सेतू॥

अनुवाद (हिन्दी)

तेव्हा त्याने आपला प्रभाव टाकला आणि संपूर्ण जगाला आपल्या अधीन बनविले. ज्यावेळी कामदेव संतापला, तेव्हा एका क्षणात वेदांची सर्व मर्यादा धुळीला मिळाली.॥ ३॥

मूल (चौपाई)

ब्रह्मचर्ज ब्रत संजम नाना।
धीरज धरम ग्यान बिग्याना॥
सदाचार जप जोग बिरागा।
सभय बिबेक कटकु सबु भागा॥

अनुवाद (हिन्दी)

ब्रह्मचर्य, व्रत, नाना प्रकारचे संयम, धैर्य, धर्म, ज्ञान, विज्ञान, सदाचार, जप, योग, वैराग्य इत्यादी विवेकाची संपूर्ण सेना घाबरून पळून गेली.॥ ४॥

छंद

मूल (दोहा)

भागेउ बिबेकु सहाय सहित सो सुभट संजुग महि मुरे।
सदग्रंथ पर्बत कंदरन्हि महुँ जाइ तेहि अवसर दुरे॥
होनिहार का करतार को रखवार जग खरभरु परा।
दुइ माथ केहि रतिनाथ जेहि कहुँ कोपि कर धनु सरु धरा॥

अनुवाद (हिन्दी)

विवेक आपल्या सहाय्यकांच्यासह पळून गेला. त्याचे योद्धे युद्ध-भूमीवरून पाठ फिरवून निघाले. त्यावेळी ते सर्व सद्ग्रंथरूपी पर्वतांच्या कडे-कपाऱ्यात जाऊन लपून बसले. (अर्थात ज्ञान, वैराग्य, संयम, नियम, सदाचार इत्यादी फक्त ग्रंथांमध्ये उरले, त्यांचे आचरण संपले.) संपूर्ण जगात खळबळ माजली. (सर्वजण म्हणू लागले,) हे विधात्या! आता काय होणार? आमचे रक्षण कोण करणार? असा दोन शिरांचा कोण आहे की, ज्याच्यासाठी रतीचा पती कामदेव याने कोप धरून हातामध्ये धनुष्यबाण उचलला आहे?

दोहा

मूल (दोहा)

जे सजीव जग अचर चर नारि पुरुष अस नाम।
ते निज निज मरजाद तजि भए सकल बस काम॥ ८४॥

अनुवाद (हिन्दी)

जगामध्ये जे स्त्री-पुरुषरूप जितके चराचर प्राणी होते, ते सर्व आपापली मर्यादा सोडून कामवश झाले.॥ ८४॥

मूल (चौपाई)

सब के हृदयँ मदन अभिलाषा।
लता निहारि नवहिं तरु साखा॥
नदीं उमगि अंबुधि कहुँ धाईं।
संगम करहिं तलाव तलाईं॥

अनुवाद (हिन्दी)

सर्वांच्या मनात कामाची इच्छा उत्पन्न झाली. लतांना पाहून वृक्षांच्या फांद्या झुकू लागल्या. नद्या चेकाळून समद्राकडे धावू लागल्या आणि तलाव व तळ्या परस्परांशी संगम करू लागल्या.॥ १॥

मूल (चौपाई)

जहँ असि दसा जड़न्ह कै बरनी।
को कहि सकइ सचेतन करनी॥
पसु पच्छी नभ जल थल चारी।
भए कामबस समय बिसारी॥

अनुवाद (हिन्दी)

जर अचेतन (वृक्ष, नदी इत्यादी) पदार्थांची अशी अवस्था झाली तर मग चेतन जीवांबद्दल काय सांगायचे? आकाश, जल आणि पृथ्वीवर संचार करणारे सर्व पशु-पक्षी (आपल्या संयोगाचा) काळ विसरून काम-वश झाले.॥ २॥

मूल (चौपाई)

मदन अंध ब्याकुल सब लोका।
निसि दिनु नहिं अवलोकहिं कोका॥
देव दनुज नर किंनर ब्याला।
प्रेत पिसाच भूत बेताला॥

अनुवाद (हिन्दी)

सर्वजण कामांध होऊन व्याकूळ झाले. चक्रवाक पक्षी व पक्षिणी यांनी रात्र-दिवस पाहिला नाही. देव, दैत्य, मनुष्य, किन्नर, सर्प, प्रेत, पिशाच, भूत, वेताल,॥ ३॥

मूल (चौपाई)

इन्ह कै दसा न कहेउँ बखानी।
सदा काम के चेरे जानी॥
सिद्ध बिरक्त महामुनि जोगी।
तेपि कामबस भए बियोगी॥

अनुवाद (हिन्दी)

हे सर्वजण नेहमीच कामाचे गुलाम असतात. म्हणून मी त्यांच्या अवस्थेचे वर्णन केलेले नाही. सिद्ध, विरक्त, महामुनी आणि महान योगी हे सुद्धा कामवश झाल्यामुळे योगापासून ढळले आणि स्त्रीच्या विरहाने पीडित झाले.॥ ४॥

छंद

मूल (दोहा)

भए कामबस जोगीस तापस पावँरन्हि की को कहै।
देखहिं चराचर नारिमय जे ब्रह्ममय देखत रहे॥
अबला बिलोकहिं पुरुषमय जगु पुरुष सब अबलामयं।
दुइ दंड भरि ब्रह्मांड भीतर कामकृत कौतुक अयं॥

अनुवाद (हिन्दी)

जेव्हा योगीश्वर व तपस्वीसुद्धा कामाला वश झाले, मग बिचाऱ्या मनुष्यांबद्दल काय सांगायचे? ज्या लोकांना संपूर्ण चराचर सृष्टी ब्रह्ममय दिसत होती, त्यांना आता सर्व जग स्त्रीमय दिसू लागले. स्त्रियांना सर्व जग पुरुषमय दिसू लागले, तर पुरुषांना ते स्त्रीमय दिसू लागले. दोन घटिका संपूर्ण ब्रह्मांडात कामदेवाने मांडलेले हे कौतुक दिसून आले.

सोरठा

मूल (दोहा)

धरी न काहूँ धीर सब के मन मनसिज हरे।
जे राखे रघुबीर ते उबरे तेहि काल महुँ॥ ८५॥

अनुवाद (हिन्दी)

कुणालाही मन आवरता येईना. कामदेवाने सर्वांचे मन हरण केले. श्रीरामांनी ज्यांचे रक्षण केले, फक्त तेवढेच भक्त (कामदेवाच्या प्रभावापासून) त्यावेळी वाचले.॥ ८५॥

मूल (चौपाई)

उभय घरी अस कौतुक भयऊ।
जौ लगि कामु संभु पहिं गयऊ॥
सिवहि बिलोकि ससंकेउ मारू।
भयउ जथाथिति सबु संसारू॥

अनुवाद (हिन्दी)

दोन घटिका असा तमाशा झाला, तोपर्यंत कामदेव श्रीशिवांच्या जवळ पोहोचला. त्यांना पाहून कामदेव चपापला, तेव्हा संपूर्ण जग पूर्वीप्रमाणे स्थिर झाले.॥ १॥

मूल (चौपाई)

भए तुरत सब जीव सुखारे।
जिमि मद उतरि गएँ मतवारे॥
रुद्रहि देखि मदन भय माना।
दुराधरष दुर्गम भगवाना॥

अनुवाद (हिन्दी)

ज्याप्रमाणे नशा उतरताच दारुडे लोक शांत होतात, त्याप्रमाणे सर्व जीव शांत झाले. अजिंक्य व अनाकलनीय अशा भगवान रुद्रांना पाहून कामदेव भ्याला.॥ २॥

मूल (चौपाई)

फिरत लाज कछु करिनहिं जाई।
मरनु ठानि मन रचेसि उपाई॥
प्रगटेसि तुरत रुचिर रितुराजा।
कुसुमित नव तरु राजि बिराजा॥

अनुवाद (हिन्दी)

त्याला परत फिरण्याची लाज वाटत होती आणि काही करताही येत नव्हते. शेवटी त्याने मरायचे ठरवून एक उपाय योजला. त्याने लगेच सुंदर ऋतुराज वसंत प्रकट केला. फुललेल्या वृक्षांच्या रांगा शोभून दिसू लागल्या.॥ ३॥

मूल (चौपाई)

बन उपबन बापिका तड़ागा।
परम सुभग सब दिसा बिभागा॥
जहँ तहँ जनु उमगत अनुरागा।
देखि मुएहुँ मन मनसिज जागा॥

अनुवाद (हिन्दी)

वने-उपवने, विहिरी-तलाव आणि सर्व दिशांचे प्रदेश रमणीय दिसू लागले. जिकडे-तिकडे जणू प्रेम उसळू लागले. ते पाहून मेलेल्या मनांमध्येही कामदेव जागा झाला.॥ ४॥

छंद

मूल (दोहा)

जागइ मनोभव मुएहुँ मन बन सुभगता न परै कही।
सीतल सुगंध सुमंद मारुत मदन अनल सखा सही॥
बिकसे सरन्हि बहु कंज गुंजत पुंज मंजुल मधुकरा।
कलहंस पिक सुक सरस रव करि गान नाचहिं अपछरा॥

अनुवाद (हिन्दी)

मेलेल्या मनातही कामदेव जागा झाला, वनाचे सौंदर्य तर सांगण्यापलीकडचे होते. कामरूपी अग्नीचा सच्चा मित्र शीतल-मंद-सुगंधित पवन वाहू लागला. सरोवरात पुष्कळ कमळे उमलली व त्यांवर भ्रमरसमूह मधुर गुंजारव करू लागले. राजहंस, कोकिळा आणि पोपट हे मधुर बोल बोलू लागले आणि अप्सरा गात-गात नाचू लागल्या.

दोहा

मूल (दोहा)

सकल कला करि कोटि बिधि हारेउ सेन समेत।
चली न अचल समाधि सिव कोपेउ हृदयनिकेत॥ ८६॥

अनुवाद (हिन्दी)

कामदेवाने आपल्या सर्व सेनेसह कोटॺवधी कळा दाखवूनही तो हरला. कारण श्रीशिवांची अढळ समाधी भंग पावली नाही. तेव्हा कामदेव संतापला.॥ ८६॥

मूल (चौपाई)

देखि रसाल बिटप बर साखा।
तेहि पर चढे़उ मदनु मन माखा॥
सुमन चाप निज सर संधाने।
अति रिस ताकि श्रवन लगि ताने॥

अनुवाद (हिन्दी)

त्याने आम्रवृक्षाची एक सुंदर फांदी पाहिली आणि मनात चिडलेला मदन तिच्यावर चढला. त्याने पुष्प-धनुष्यावर आपले पाचही बाण चढविले आणि मोठॺा त्वेषाने लक्ष्य पाहून धनुष्य आकर्ण ताणले.॥ १॥

मूल (चौपाई)

छाड़े बिषम बिसिख उर लागे।
छूटि समाधि संभु तब जागे॥
भयउ ईस मन छोभु बिसेषी।
नयन उघारि सकल दिसि देखी॥

अनुवाद (हिन्दी)

आणि कामदेवाने तीक्ष्ण बाण सोडले, ते शिवांच्या हृदयाला लागले. त्यांची समाधी भंगली आणि ते जागे झाले. शिवांचे मन प्रक्षुब्ध झाले. त्यांनी डोळे उघडून इकडे तिकडे पाहिले.॥ २॥

मूल (चौपाई)

सौरभ पल्लव मदनु बिलोका।
भयउ कोपु कंपेउ त्रैलोका॥
तब सिवँ तीसर नयन उघारा।
चितवत कामु भयउ जरि छारा॥

अनुवाद (हिन्दी)

आंब्याच्या पानात दडलेल्या कामदेवाला पाहून त्यांना अतिशय क्रोध आला, त्यामुळे त्रैलोक्याचा थरकाप उडाला. तेव्हा शिवांनी तिसरा नेत्र उघडला आणि त्यांनी पाहताच कामदेव भस्म होऊन गेला.॥ ३॥

मूल (चौपाई)

हाहाकार भयउ जग भारी।
डरपे सुर भए असुर सुखारी॥
समुझि कामसुखु सोचहिं भोगी।
भए अकंटक साधक जोगी॥

अनुवाद (हिन्दी)

जगामध्ये मोठा हाहाकार उडाला. देव घाबरून गेले तर दैत्य आनंदित झाले. भोगी लोक कामसुखाची आठवण करीत काळजीत पडले आणि साधक योगी यांचा मार्ग निष्कंटक झाला॥ ४॥

छंद

मूल (दोहा)

जोगी अकंटक भए पति गति सुनत रति मुरुछित भई।
रोदति बदति बहु भाँति करुना करति संकर पहिं गई॥
अति प्रेम करि बिनती बिबिध बिधि जोरि कर सन्मुख रही।
प्रभु आसुतोष कृपाल सिव अबला निरखि बोले सही॥

अनुवाद (हिन्दी)

योगी लोक निर्भय झाले, परंतु कामदेवाची पत्नी रती ही पतीची दशा ऐकून मूर्च्छित झाली. ती आक्रोश करीत करुणा भाकीत भगवान शिवांच्याजवळ गेली. अत्यंत प्रेमाने अनेक प्रकारे विनंती करीत हात जोडून ती समोर उभी राहिली. त्या अबलेला पाहून आशुतोष कृपाळू शिव सांत्वन करीत बोलले.