२३ श्रीरामांची शिवांना विनंती

दोहा

मूल (दोहा)

अब बिनती मम सुनहु सिव जौं मो पर निज नेहु।
जाइ बिबाहहु सैलजहि यह मोहि मागें देहु॥ ७६॥

अनुवाद (हिन्दी)

नंतर ते शिवांना म्हणाले, ‘हे शंकरा, जर तुमचे माझ्यावर (खरेच) प्रेम असेल तर आता माझी विनंती ऐका. माझी इच्छा आहे की, तुम्ही जाऊन पार्वतीचे पाणिग्रहण करावे!’॥ ७६॥

मूल (चौपाई)

कह सिव जदपि उचित अस नाहीं।
नाथ बचन पुनि मेटि न जाहीं॥
सिर धरि आयसु करिअ तुम्हारा।
परम धरमु यह नाथ हमारा॥

अनुवाद (हिन्दी)

शिव म्हणाले, ‘जरी हे योग्य नाही, तरी स्वामींचे म्हणणे मला टाळता येणार नाही. हे नाथ! तुमची आज्ञा शिरसामान्य करणे, हाच माझा परम धर्म आहे.॥ १॥

मूल (चौपाई)

मातु पिता गुर प्रभु कै बानी।
बिनहिं बिचार करिअ सुभ जानी॥
तुम्ह सब भाँति परम हितकारी।
अग्या सिर पर नाथ तुम्हारी॥

अनुवाद (हिन्दी)

माता, पिता, गुरू आणि स्वामी यांचे सांगणे काहीही विचार न करता कल्याणकारक समजून मान्य करायला हवे. शिवाय तुम्ही तर माझे परम हितकारी आहात. म्हणून हे नाथ! तुमची आज्ञा मला शिरसावंद्य आहे.॥ २॥

मूल (चौपाई)

प्रभु तोषेउ सुनि संकर बचना।
भक्ति बिबेक धर्म जुत रचना॥
कह प्रभु हर तुम्हार पन रहेऊ।
अब उर राखेहु जो हम कहेऊ॥

अनुवाद (हिन्दी)

शंकरांची भक्ती, ज्ञान व धर्म यांनी युक्त असे बोलणे ऐकून श्रीराम प्रसन्न झाले. प्रभू म्हणाले, ‘हे महारेवा, तुमची प्रतिज्ञा पूर्ण झाली. आता मी जे सांगितले आहे, ते लक्षात ठेवा.’॥ ३॥

मूल (चौपाई)

अंतरधान भए अस भाषी।
संकर सोइ मूरति उर राखी॥
तबहिं सप्तरिषि सिव पहिं आए।
बोले प्रभु अति बचन सुहाए॥

अनुवाद (हिन्दी)

असे म्हणून श्रीराम अंतर्धान पावले. शिवांनी त्यांची ती मूर्ती आपल्या हृदयात धारण करून ठेवली. त्याच वेळी सप्तर्षी शिवजींकडे आले. प्रभू महादेवांनी त्यांना गोड शब्दात सांगितले,॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

पारबती पहिं जाइ तुम्ह प्रेम परिच्छा लेहु।
गिरिहि प्रेरि पठएहु भवन दूरि करेहु संदेहु॥ ७७॥

अनुवाद (हिन्दी)

तुम्ही पार्वतीकडे जाऊन तिच्या प्रेमाची पारख करून घ्या आणि हिमाचलाला सांगून (त्यांना पार्वतीस आणण्यास पाठवा व) पार्वतीला घरी पाठवून द्या आणि त्यांच्या मनातील संशय दूर करा.॥ ७७॥