१५ मानसचे रूप व महात्म्य

दोहा

मूल (दोहा)

जस मानस जेहि बिधि भयउ जग प्रचार जेहि हेतु।
अब सोइ कहउँ प्रसंग सब सुमिरि उमा बृषकेतु॥ ३५॥

अनुवाद (हिन्दी)

हे रामचरितमानस जसे आहे तसे, ज्याप्रकारे हे बनले आणि ज्या हेतूने जगामध्ये याचा प्रचार झाला, ती सर्व कथा आता मी उमा-महेश्वर यांचे स्मरण करून सांगतो.॥ ३५॥

मूल (चौपाई)

संभु प्रसाद सुमति हियँ हुलसी।
रामचरितमानस कबि तुलसी॥
करइ मनोहर मति अनुहारी।
सुजन सुचित सुनि लेहु सुधारी॥

अनुवाद (हिन्दी)

श्रीशिवांच्या कृपेने तुलसीदासाच्या हृदयात सुंदर बुद्धीचा विकास झाला, त्यामुळे हा तुलसीदास या रामचरितमानसाचा कवी झाला. आपल्या बुद्धीनुसार तो हे मनोहरच बनवीत आहे. तरीही हे सज्जनांनो, शुद्ध चित्ताने ऐकून हे सुधारून घ्या.॥ १॥

मूल (चौपाई)

सुमति भूमि थल हृदय अगाधू।
बेद पुरान उदधि घन साधू॥
बरषहिं राम सुजस बर बारी।
मधुर मनोहर मंगलकारी॥

अनुवाद (हिन्दी)

सुंदर (सात्त्विक) बुद्धी ही भूमी आहे. हृदय हे तिच्यामधील गंभीर (महत्त्वाचे) स्थान आहे. वेद-पुराणे हे समुद्र आहेत आणि साधू-संत मेघ आहेत. ते श्रीरामांच्या सुयशरूपी सुंदर, मधुर, मंगलकारी अशा जलाचा वर्षाव करतात.॥ २॥

मूल (चौपाई)

लीला सगुन जो कहहिं बखानी।
सोइ स्वच्छता करइ मल हानी॥
प्रेम भगति जो बरनि न जाई।
सोइ मधुरता सुसीतलताई॥

अनुवाद (हिन्दी)

सगुण लीलेचे जे विस्ताराने वर्णन केले जाते, तीच राम-सुकीर्तिरूपी जलाची निर्मलता होय. ती मळाचा नाश करते. ज्या प्रेमभक्तीचे वर्णनही करता येत नाही, ती (भक्ती) म्हणजे या जलाची मधुरता आणि सुंदर शीतलता होय.॥ ३॥

मूल (चौपाई)

सो जल सुकृत सालि हित होई।
राम भगत जन जीवन सोई॥
मेधा महि गत सो जल पावन।
सकिलि श्रवन मग चलेउ सुहावन॥
भरेउ सुमानस सुथल थिराना।
सुखद सीत रुचि चारु चिराना॥

अनुवाद (हिन्दी)

ते (राम-कीर्तिरूपी) जल सत्कर्मरूपी भातपिकासाठी हितकारक आहे आणि श्रीरामांच्या भक्तांचे तर जीवनच आहे. ते पवित्र जल बुद्धिरूपी पृथ्वीवर पडले आणि एकत्र होऊन सुंदर कानरूपी मार्गाने प्रवाहित झाले व मानस (हृदय) रूपी श्रेष्ठ स्थानामध्ये भरले जाऊन तेथे स्थिर झाले. स्थिर झाल्यावर काही कालाने सुंदर, रुचिकर, शीतल आणि सुखदायक झाले.॥ ४-५॥

दोहा

मूल (दोहा)

सुठि सुंदर संबाद बर बिरचे बुद्धि बिचारि।
तेइ एहि पावन सुभग सर घाट मनोहर चारि॥ ३६॥

अनुवाद (हिन्दी)

या कथेमध्ये विचारपूर्वक जे चार अत्यंत सुंदर (भुशुंडी-गरुड,शिव-पार्वती, याज्ञवल्क्य-भरद्वाज आणि तुलसीदास संत यांचे ) संवाद रचलेले आहेत, तेच या पवित्र व सुंदर सरोवराचे चार मनोहर घाट आहेत.॥ ३६॥

मूल (चौपाई)

सप्त प्रबंध सुभग सोपाना।
ग्यान नयन निरखत मन माना॥
रघुपति महिमा अगुन अबाधा।
बरनब सोइ बर बारि अगाधा॥

अनुवाद (हिन्दी)

यातील सात कांडे हीच या मानस-सरोवराच्या सात सुंदर पायऱ्या आहेत. ज्ञानरूपी नेत्रांनी त्या पाहताच मन प्रसन्न होऊन जाते. श्रीरघुनाथांच्या (प्राकृतिक गुणांच्या पलीकडील आणि एकरस) अशा महिमेचे जे वर्णन केले जाईल, तेच या सुंदर जलाची अथांग खोली होय.॥ १॥

मूल (चौपाई)

राम सीय जस सलिल सुधासम।
उपमा बीचि बिलास मनोरम॥
पुरइनि सघन चारु चौपाई।
जुगुति मंजु मनि सीप सुहाई॥

अनुवाद (हिन्दी)

श्रीराम आणि सीता यांची कीर्ती ही (या सरोवरातील) अमृतासारखे जल आहे. यामध्ये ज्या उपमा दिलेल्या आहेत, त्याच यातील तरंगांचा मनोहारी विलास होय. यातील सुंदर चौपाया या यामध्ये दाट पसरलेल्या कमलिनी आहेत आणि काव्यातील युक्त्या या सुंदर मोती उत्पन्न करणारे शोभिवंत शिंपले आहेत.॥ २॥

मूल (चौपाई)

छंद सोरठा सुंदर दोहा।
सोइ बहुरंग कमल कुल सोहा॥
अरथ अनूप सुभाव सुभासा।
सोइ पराग मकरंद सुबासा॥

अनुवाद (हिन्दी)

यामध्ये सुंदर छंद, सोरठे व दोहे आहेत, तेच यामधील रंगीबेरंगी कमळांचे सुशोभित समुह आहेत. अनुपम अर्थ, उच्च भाव आणि सुंदर भाषा हेच पराग, मकरंद आणि सुगंध होत.॥ ३॥

मूल (चौपाई)

सुकृत पुंज मंजुल अलि माला।
ग्यान बिराग बिचार मराला॥
धुनि अवरेब कबित गुन जाती।
मीन मनोहर ते बहुभाँती॥

अनुवाद (हिन्दी)

पुण्याचे समूह हे भ्रमरांचे सुंदर थवे होत. ज्ञान, वैराग्य आणि विचार हे हंस होत. कवितेतील ध्वनी, वक्रोक्ती, गुण आणि जाती हेच अनेक प्रकारचे मनोहर मासे आहेत.॥ ४॥

मूल (चौपाई)

अरथ धरम कामादिक चारी।
कहब ग्यान बिग्यान बिचारी॥
नव रस जप तप जोग बिरागा।
ते सब जलचर चारु तड़ागा॥

अनुवाद (हिन्दी)

धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे चार म्हणजे ज्ञानविज्ञानविषयक विचार सांगणे, काव्यातील नवरस, जप, तप, योग आणि वैराग्याचे प्रसंग, हे सर्व यासरोवरातील सुंदर जलचर प्राणी होत.॥ ५॥

मूल (चौपाई)

सुकृती साधु नाम गुन गाना।
ते बिचित्र जलबिहग समाना॥
संतसभा चहुँ दिसि अवँराई।
श्रद्धा रितु बसंत सम गाई॥

अनुवाद (हिन्दी)

पुण्यात्मे साधू आणि रामनाम यांचे गुणगान हेच निरनिराळ्या जल-पक्ष्यांप्रमाणे होत. संतांचा मेळावा हाच या सरोवराच्या सभोवतालची आमराई होय आणि श्रद्धा वसंत-ऋतूप्रमाणे आहे.॥ ६॥

मूल (चौपाई)

भगति निरूपन बिबिध बिधाना।
छमा दया दम लता बिताना॥
सम जम नियम फूल फल ग्याना।
हरि पद रति रस बेद बखाना॥

अनुवाद (हिन्दी)

नाना प्रकारे केलेले भक्तीचे निरूपण आणि क्षमा, दया व इंद्रियनिग्रह हे लता-मंडप होत. मनाचा निग्रह, यम (अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह), नियम (शौच, संतोष, तप, स्वाध्याय आणि ईश्वरप्रणिधान) हीच फुले आहेत, ज्ञान फल आहे आणि श्रीहरीच्या चरणीचे प्रेम हेच या ज्ञानरूपी फलाचा रस होय, असे वेदांनी सांगितले आहे.॥ ७॥

मूल (चौपाई)

औरउ कथा अनेक प्रसंगा।
तेइ सुक पिक बहुबरन बिहंगा॥

अनुवाद (हिन्दी)

या रामचरितमानसामध्ये आणखीही ज्या अनेक कथा आहेत, त्याच यातील पोपट, कोकिळा इत्यादी रंगी-बेरंगी पक्षी होत.॥ ८॥

दोहा

मूल (दोहा)

पुलक बाटिका बाग बन सुख सुबिहंग बिहारु।
माली सुमन सनेह जल सींचत लोचन चारु॥ ३७॥

अनुवाद (हिन्दी)

या कथेच्या श्रवणामुळे जे रोमांच येतात, तेच वाटिका, बागा व वने होत आणि सुख प्राप्त होते, ते म्हणजे सुंदर पक्ष्यांचा विहार होय. निर्मळ मन हाच माळी होय. तो प्रेमरूपी जलाचे सुंदर नेत्रांद्वारे सिंचन करतो.॥ ३७॥

मूल (चौपाई)

जे गावहिं यह चरित सँभारे।
तेइ एहि ताल चतुर रखवारे॥
सदा सुनहिं सादर नर नारी।
तेइ सुरबर मानस अधिकारी॥

अनुवाद (हिन्दी)

जे लोक हे चरित्र लक्षपूर्वक गातात, तेच या तलावाचे चतुर रखवालदार आहेत आणि जे स्त्री-पुरुष याचे आदराने श्रवण करतात, तेच या सुंदर मानसाचे अधिकारी असलेले श्रेष्ठ देव होत.॥ १॥

मूल (चौपाई)

अति खल जे बिषई बग कागा।
एहि सर निकट न जाहिं अभागा॥
संबुक भेक सेवार समाना।
इहाँ न बिषय कथा रस नाना॥

अनुवाद (हिन्दी)

जे अत्यंत दुष्ट व विषयी आहेत, ते दुर्दैवी बगळे व कावळेआहेत. ते या सरोवराजवळ फिरकत नाहीत. कारण या मानस सरोवरासारख्या कथेमध्ये गोगल गायी, बेडूक आणि शेवाळे यांसारख्या विषय-रसाच्या नाना गोष्टी नाहीत.॥ २॥

मूल (चौपाई)

तेहि कारन आवत हियँ हारे।
कामी काक बलाक बिचारे॥
आवत एहिं सर अति कठिनाई।
राम कृपा बिनु आइ न जाई॥

अनुवाद (हिन्दी)

यामुळे बिचारे कावळे आणि बगळेरूपी विषयी लोक येथे येताना मनाने खचून जातात. कारण, या सरोवरापर्यंत येण्यामध्ये अडचणी खूप आहेत. श्रीरामांची कृपा झाल्याविना येथे येतायेत नाही.॥ ३॥

मूल (चौपाई)

कठिन कुसंग कुपंथ कराला।
तिन्ह के बचन बाघ हरि ब्याला॥
गृह कारज नाना जंजाला।
ते अति दुर्गम सैल बिसाला॥

अनुवाद (हिन्दी)

घोर कुसंगतीच भयानक मार्ग आहे. त्या दुष्ट संगतीवाल्या लोकांची वचने हीच वाघ, सिंह आणि साप आहेत. घरचे व्यवहार आणि प्रपंचाचे उपद्व्याप हेच अत्यंत दुर्गम असे मोठ-मोठे डोंगर आहेत.॥ ४॥

मूल (चौपाई)

बन बहु बिषम मोह मद माना।
नदीं कुतर्क भयंकर नाना॥

अनुवाद (हिन्दी)

मोह, मद आणि मान हीच बिकट अरण्ये आहेत आणि नाना प्रकारचे कुतर्क ह्याच भयानक नद्या आहेत.॥ ५॥

दोहा

मूल (दोहा)

जे श्रद्धा संबल रहित नहिं संतन्ह कर साथ।
तिन्ह कहुँ मानस अगम अति जिन्हहि न प्रिय रघुनाथ॥ ३८॥

अनुवाद (हिन्दी)

ज्यांच्याजवळ श्रद्धारूपी वाट-खर्च नाही, ज्यांना संतांची साथ नाही आणि ज्यांना श्रीराम प्रिय नाहीत, त्यांना हे ‘मानस’ प्राप्त होणारे नाही.॥ ३८॥

मूल (चौपाई)

जौं करि कष्ट जाइ पुनि कोई।
जातहिं नीद जुड़ाई होई॥
जड़ता जाड़ बिषम उर लागा।
गएहुँ न मज्जन पाव अभागा॥

अनुवाद (हिन्दी)

जरी कोणी मनुष्य कष्ट सहन करीत तेथपर्यंत पोहोचला, तरी तेथे जाताच त्याला निद्रारूपी हिवताप भरतो, हृदयामध्ये मूर्खतारूपी कडाक्याची थंडी वाजू लागते. त्यामुळे तेथे जाऊनही तो अभागी स्नान करू शकत नाही.॥ १॥

मूल (चौपाई)

करि न जाइ सर मज्जन पाना।
फिरि आवइ समेत अभिमाना॥
जौं बहोरि कोउ पूछन आवा।
सर निंदा करि ताहि बुझावा॥

अनुवाद (हिन्दी)

त्याला त्या सरोवरात स्नान करता येत नाही आणि पाणीही पिता येत नाही. तो आपल्या अभिमानासह परत येतो. नंतर जर कोणी त्याला तेथील परिस्थिती विचारायला आला, तर तो (आपल्या दुर्भाग्याची गोष्ट न सांगता) सरोवराची निंदा करणाऱ्या गोष्टी त्याला सांगू लागतो.॥ २॥

मूल (चौपाई)

सकल बिघ्न ब्यापहिं नहिं तेही।
राम सुकृपाँ बिलोकहिं जेही॥
सोइ सादर सर मज्जनु करई।
महा घोर त्रयताप न जरई॥

अनुवाद (हिन्दी)

ज्याला श्रीराम सुंदर कृपा-दृष्टीने पाहतात, त्यांना ही विघ्ने बाधत नाहीत. तोच आदराने या सरोवरात स्नान करतो आणि महाभयानक (आध्यात्मिक, आधिदैविक, आधिभौतिक) तापांनी होरपळून जात नाही.॥ ३॥

मूल (चौपाई)

ते नर यह सर तजहिं न काऊ।
जिन्ह कें राम चरन भल भाऊ॥
जो नहाइ चह एहिं सर भाई।
सो सतसंग करउ मन लाई॥

अनुवाद (हिन्दी)

ज्यांच्या मनामध्ये श्रीरामांच्या चरणी सुंदर प्रेम आहे, ते हे सरोवर कधी सोडून जात नाहीत. हे बंधो, ज्याला या सरोवरात स्नान करण्याची इच्छा आहे, त्याने मनःपूर्वक सत्संग करायला हवा.॥ ४॥

मूल (चौपाई)

अस मानस मानस चख चाही।
भइ कबि बुद्धि बिमल अवगाही॥
भयउ हृदयँ आनंद उछाहू।
उमगेउ प्रेम प्रमोद प्रबाहू॥

अनुवाद (हिन्दी)

असे (श्रीरामचरित) मानस-सरोवर हृदयाच्या नेत्रांनी पाहून आणि त्यामध्ये बुडी मारून कवीची बुद्धी निर्मळ झाली, हृदयात आनंद व उत्साह भरून आला आणि प्रेम व आनंदाचा प्रवाह वाहू लागला.॥ ५॥

मूल (चौपाई)

चली सुभग कबिता सरिता सो।
राम बिमल जस जल भरिता सो॥
सरजू नाम सुमंगल मूला।
लोक बेद मत मंजुल कूला॥

अनुवाद (हिन्दी)

त्या श्रीरामांच्या निर्मळ कीर्तिरूपी पाण्याने भरलेली कवितारूपी नदी प्रवाहित झाली. या (कवितारूपी) नदीचे नाव शरयू आहे. जी सर्व मंगलांचे मूळ आहे. या नदीला लोक-मत आणि वेद-मत असे दोन सुंदर तट आहेत.॥ ६॥

मूल (चौपाई)

नदी पुनीत सुमानस नंदिनि।
कलिमल तृन तरु मूल निकंदिनि॥

अनुवाद (हिन्दी)

या सुंदर मानस-सरोवराची ही कन्या शरयू नदी मोठी पवित्र आहे आणि कलियुगातील पापरूपी गवताला व वृक्षांना मुळासह उखडून टाकणारी आहे.॥ ७॥

दोहा

मूल (दोहा)

श्रोता त्रिबिध समाज पुर ग्राम नगर दुहुँ कूल।
संतसभा अनुपम अवध सकल सुमंगल मूल॥ ३९॥

अनुवाद (हिन्दी)

तीन प्रकारच्या श्रोत्यांचा समाज हाच या नदीच्या दोन्ही तटांवर वसलेल्या वाडॺा, गावे आणि नगर आहे आणि संतांची सभा हीच सर्व सुंदर मंगलांचे मूळ असलेली अनुपम अयोध्या आहे.॥ ३९॥

मूल (चौपाई)

रामभगति सुरसरितहि जाई।
मिली सुकीरति सरजु सुहाई॥
सानुज राम समर जसु पावन।
मिलेउ महानदु सोन सुहावन॥

अनुवाद (हिन्दी)

सुंदर कीर्तिरूपी शरयू ही रामभक्तिरूपी गंगेला जाऊन मिळाली. धाकटा भाऊ लक्ष्मणासह श्रीरामांनी केलेल्या युद्धाचा पवित्र कीर्तिरूपी सुशोभित महानद शोण हाही तिच्यामध्ये मिळाला.॥ १॥

मूल (चौपाई)

जुग बिच भगति देवधुनि धारा।
सोहति सहित सुबिरति बिचारा॥
त्रिबिध ताप त्रासक तिमुहानी।
राम सरूप सिंधु समुहानी॥

अनुवाद (हिन्दी)

दोन्ही प्रवाहांच्यामध्ये भक्तिरूपी गंगेचा प्रवाह हा ज्ञान व वैराग्य यांच्यासह शोभून दिसत आहे.अशी ही त्रितापांना भयभीत करणारी त्रिमुखी प्रयागरूप नदी श्रीरामस्वरूपरूपी समुद्राकडे जात आहे.॥ २॥

मूल (चौपाई)

मानस मूल मिली सुरसरिही।
सुनत सुजन मन पावन करिही॥
बिच बिच कथा बिचित्र बिभागा।
जनु सरि तीर तीर बन बागा॥

अनुवाद (हिन्दी)

कीर्तिरूपी शरयूचे मूळ (श्रीरामचरित्र) ‘मानस’ आहे आणि ही (रामभक्तिरूपी) गंगेस मिळाली आहे. म्हणून ही श्रवण करणाऱ्या सज्जनांच्या मनास पवित्र करील. मधून-मधून ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या सुंदर कथा आलेल्या आहेत, त्या जणू नदीतटाच्या आजूबाजूची वने व बागा आहेत.॥ ३॥

मूल (चौपाई)

उमा महेस बिबाह बराती।
ते जलचर अगनित बहुभाँती॥
रघुबर जनम अनंद बधाई।
भवँर तरंग मनोहरताई॥

अनुवाद (हिन्दी)

पार्वती व शिव यांच्या विवाहातील वऱ्हाडी हे या नदीतील अनेकप्रकारचे असंख्य जलचर प्राणी आहेत. श्रीरामांच्या जन्माच्यावेळी आनंदाने केलेली अभिनंदने हीच या नदीतील भोवरे आणि तरंग यांची मनोहरता आहे.॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

बालचरित चहु बंधु के बनज बिपुल बहुरंग।
नृप रानी परिजन सुकृत मधुकर बारि बिहंग॥ ४०॥

अनुवाद (हिन्दी)

चारही भावांची जी बालचरित्रे आहेत, तीच यातील रंगीबेरंगी विपुल कमल-पुष्पे आहेत. महाराज दशरथ व त्यांच्या राण्यांची आणि कुटुंबियांची सत्कर्मे हेच भ्रमर व जल-पक्षी आहेत.॥ ४०॥

मूल (चौपाई)

सीय स्वयंबर कथा सुहाई।
सरित सुहावनि सो छबि छाई॥
नदी नाव पटु प्रस्न अनेका।
केवट कुसल उतर सबिबेका॥

अनुवाद (हिन्दी)

सीतेच्या स्वयंवराची जी सुंदर कथा आहे, तीच या नदीची सुंदर पसरलेली शोभा आहे. अनेक सुंदर विचारपूर्ण प्रश्न हेच नदीतील नौका आहेत आणि त्या प्रश्नांची विवेकयुक्त उत्तरे हे चतुर नावाडी होत.॥ १॥

मूल (चौपाई)

सुनि अनुकथन परस्पर होई।
पथिक समाज सोह सरि सोई॥
घोर धार भृगुनाथ रिसानी।
घाट सुबद्ध राम बर बानी॥

अनुवाद (हिन्दी)

ही कथा श्रवण केल्यावर जी परस्पर चर्चा होते, ती म्हणजे या कडेकडेने चाललेल्या यात्रेकरूंचा समाज शोभून दिसत आहे. परशुरामांचा क्रोध या नदीमधील भयानक धार आहे आणि श्रीरामांची श्रेष्ठ वचने हे बांधलेले सुंदर घाट आहेत.॥ २॥

मूल (चौपाई)

सानुज राम बिबाह उछाहू।
सो सुभ उमग सुखद सब काहू॥
कहत सुनत हरषहिं पुलकाहीं।
ते सुकृती मन मुदित नहाहीं॥

अनुवाद (हिन्दी)

भावांच्यासह श्रीरामचंद्रांच्या विवाहाचा उत्साह हाच या कथा-सरितेतील कल्याणकारक पूर आहे. तो सर्वांना सुख देणारा आहे. याचे कथन व श्रवण केल्याने जे हर्षित व पुलकित होतात, तेच पुण्यात्मे होत. तेच प्रसन्न चित्ताने या नदीमध्ये स्नान करतात.॥ ३॥

मूल (चौपाई)

राम तिलक हित मंगल साजा।
परब जोग जनु जुरे समाजा॥
काई कुमति केकई केरी।
परी जासु फल बिपति घनेरी॥

अनुवाद (हिन्दी)

श्रीरामचंद्रांच्या राजतिलकासाठी जी सजावट केली होती, ती जणू पर्वाच्या प्रसंगी या नदीवर जमलेली यात्रेकरूंची गर्दी होय. कैकेयीची कुबुद्धी ही या नदीतील साचलेले शेवाळ होय. त्यामुळे फार मोठे संकट कोसळले.॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

समन अमित उतपात सब भरतचरित जपजाग।
कलि अघ खल अवगुन कथन ते जलमल बग काग॥ ४१॥

अनुवाद (हिन्दी)

सर्व असंख्य उत्पातांना शांत करणारे भरताचे चरित्र हा नदीतटावर केला जाणारा जप-यज्ञ होय. कलियुगातील पापांचे आणि दुष्टांच्या अवगुणांचे जे वर्णन आहे, तेच या नदीच्या जलातील चिखल आणि बगळे-कावळे होत.॥ ४१॥

मूल (चौपाई)

कीरति सरित छहूँ रितु रूरी।
समय सुहावनि पावनि भूरी॥
हिम हिमसैलसुता सिव ब्याहू।
सिसिर सुखद प्रभु जनम उछाहू॥

अनुवाद (हिन्दी)

ही कीर्तिरूपी नदी सहाही ऋतूंमध्ये सुंदर असते. सर्व काळी ही परम शोभिवंत आणि अत्यंत पवित्र असते. यातील शिव-पार्वतीचा विवाह हा हेमंत ऋतू आहे. श्रीरामचंद्रांच्या जन्माचा उत्सव हा सुखदायक शिशिर-ऋतू आहे.॥ १॥

मूल (चौपाई)

बरनब राम बिबाह समाजू।
सो मुद मंगलमय रितुराजू॥
ग्रीषम दुसह राम बनगवनू।
पंथकथा खर आतप पवनू॥

अनुवाद (हिन्दी)

श्रीरामचंद्रांच्या विवाहाप्रसंगी जमलेला समाज हाच आनंदमय व मंगलमय ऋतुराज वसंत आहे. श्रीरामांचे वनगमन हा असह्य ग्रीष्म ऋतू आहे आणि वनमार्गातील कथा हीच कडक ऊन व गरम हवा आहे.॥ २॥

मूल (चौपाई)

बरषा घोर निसाचर रारी।
सुरकुल सालि सुमंगलकारी॥
राम राज सुख बिनय बड़ाई।
बिसद सुखद सोइ सरद सुहाई॥

अनुवाद (हिन्दी)

राक्षसांबरोबर झालेले घोर युद्ध हाच वर्षा ऋतू आहे. तो देवकुलरूपी पिकासाठी सुंदर कल्याण करणारा आहे. श्रीरामांच्या राज्यकाळातील जे सुख, विनम्रता आणि महिमा आहे, तोच निर्मळ सुख देणारा सुशोभित शरद ऋतू होय.॥ ३॥

मूल (चौपाई)

सती सिरोमनि सिय गुन गाथा।
सोइ गुन अमल अनूपम पाथा॥
भरत सुभाउ सुसीतलताई।
सदा एकरस बरनि न जाई॥

अनुवाद (हिन्दी)

पतिव्रता-शिरोमणी सीतेच्या गुणांची जी कथा आहे, तेच या जलाचा निर्मळ व अनुपमेय गुण आहे. भरताचा स्वभाव ही या नदीची सुंदर शीतलता आहे, ती नित्य एकसारखी असते आणि तिचे वर्णन करता येत नाही.॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

अवलोकनि बोलनि मिलनि प्रीति परसपर हास।
भायप भलि चहु बंधु की जल माधुरी सुबास॥ ४२॥

अनुवाद (हिन्दी)

चारी भावांनी परस्परांना पाहणे, बोलणे, भेटणे, एकमेकांवर प्रेम करणे, हसणे आणि त्यांचा सुंदर बंधु-भाव हे या जलाची गोडी आणि सुगंध होत.॥ ४२॥

मूल (चौपाई)

आरति बिनय दीनता मोरी।
लघुता ललित सुबारि न थोरी॥
अदभुत सलिल सुनत गुनकारी।
आस पिआस मनोमल हारी॥

अनुवाद (हिन्दी)

माझा आर्तभाव, विनय आणि दीनता हा या सुंदर व निर्मळ जळाचा काही कमी हलकेपणा नाही! हे जल मोठे विलक्षण आहे. त्याचे (महात्म्य) ऐकल्यानेच त्याचा गुण येतो आणि आशारूपी तहान व मनाची मलिनता ते दूर करते.॥ १॥

मूल (चौपाई)

राम सुप्रेमहि पोषत पानी।
हरत सकल कलि कलुष गलानी॥
भव श्रम सोषक तोषक तोषा।
समन दुरित दुख दारिद दोषा॥

अनुवाद (हिन्दी)

हे जल श्रीरामचंद्र्रांचे सुंदर प्रेम पुष्ट करते, कलियुगातील सर्व पापे आणि त्यापासून होणारी पीडा हरण करते. ते संसाराचे (जन्म-मृत्यू) श्रम शोषून टाकते. संतोषालाही ते संतुष्ट करते आणि पाप, ताप, दारिद्रॺ व दोष यांना नष्ट करते.॥ २॥

मूल (चौपाई)

काम कोह मद मोह नसावन।
बिमल बिबेक बिराग बढ़ावन॥
सादर मज्जन पान किए तें।
मिटहिं पाप परिताप हिए तें॥

अनुवाद (हिन्दी)

हे जल काम, क्रोध, मद आणि मोह यांचा नाश करणारे आणि निर्मल ज्ञान व वैराग्य वृद्धिंगत करणारे आहे. आदराने यामध्ये स्नान केल्याने आणि हे जल प्राशन केल्याने मनातील सर्व पाप-ताप नाहीसे होतात.॥ ३॥

मूल (चौपाई)

जिन्ह एहिं बारि न मानस धोए।
ते कायर कलिकाल बिगोए॥
तृषित निरखि रबि कर भव बारी।
फिरिहहिं मृग जिमि जीव दुखारी॥

अनुवाद (हिन्दी)

ज्यांनी या (रामकीर्तिरूपी) जलाने आपले हृदय धुतले नाही, त्या भित्र्या लोकांना कलिकाळाने ठकविले. ज्याप्रमाणे तहानेने व्याकूळ झालेले हरीण हे सूर्यकिरणे वाळूवर पडल्यामुळे भासणाऱ्या खोटॺा पाण्याला खरे जल समजून पाणी पिण्यासाठी धावत जाते आणि पाणी न मिळाल्यामुळे दुःखी होते, त्याप्रमाणे ते (कलिकाळाद्वारे ठकविलेले) जीवसुद्धा (विषयांच्या मागे भटकून) दुःखी होतील.॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

मति अनुहारि सुबारि गुन गन गनि मन अन्हवाइ।
सुमिरि भवानी संकरहि कह कबि कथा सुहाइ॥ ४३(क)॥

अनुवाद (हिन्दी)

आपल्या बुद्धीनुसार या सुंदर जलाच्या गुणांचा विचार करून, त्याने आपल्या मनास स्नान घालून आणि भवानी-शंकर यांचे स्मरण करून कवी (तुलसीदास) ही सुंदर कथा सांगत आहे.॥ ४३ (क)॥