१३ श्रीरामचरित महिमा

मूल (चौपाई)

मोरि सुधारिहि सो सब भाँती।
जासु कृपा नहिं कृपाँ अघाती॥
राम सुस्वामि कुसेवकु मोसो।
निज दिसि देखि दयानिधि पोसो॥

अनुवाद (हिन्दी)

ते माझे चुकलेले सर्व प्रकारे सुधारून घेतील. त्यांची कृपा ही कृपा करून करून कधी तृप्त होत नाही. श्रीराम हे उत्तम स्वामी आहेत आणि माझ्यासारखा वाईट (मुर्ख) सेवक कोणी नाही. तरीही दयानिधी श्रीरामांनी आपल्या ब्रीदाचा विचार करून माझे पालन केले.॥ २॥

मूल (चौपाई)

लोकहुँ बेद सुसाहिब रीती।
बिनय सुनत पहिचानत प्रीती॥
गनी गरीब ग्राम नर नागर।
पंडित मूढ़ मलीन उजागर॥

अनुवाद (हिन्दी)

या जगामध्ये व वेदामध्ये चांगल्या स्वामीची हीच रीत प्रसिद्ध आहे की, विनंती ऐकताच तो प्रेम ओळखतो. गरीब-श्रीमंत, खेडूत-नागरिक (गावठी माणूस), पंडित-मूर्ख, कुप्रसिद्ध-सुप्रसिद्ध,॥ ३॥

मूल (चौपाई)

सुकबि कुकबि निज मति अनुहारी।
नृपहि सराहत सब नर नारी॥
साधु सुजान सुसील नृपाला।
ईस अंस भव परम कृपाला॥

अनुवाद (हिन्दी)

सुकवी-कुकवी व सर्व स्त्री-पुरुष हे आपापल्या बुद्धीप्रमाणे राजाची स्तुती करतात आणि साधु, बुद्धिमान, सुशील, ईश्वरी अंशाने उत्पन्न कृपालु राजा,॥ ४॥

मूल (चौपाई)

सुनि सनमानहिं सबहि सुबानी।
भनिति भगति नति गति पहिचानी॥
यह प्राकृत महिपाल सुभाऊ।
जान सिरोमनि कोसलराऊ॥

अनुवाद (हिन्दी)

त्या सर्वांचे ऐकून घेऊन आणि त्यांची वाणी, भक्ती, विनय आणि वर्तणूक ओळखून गोड वाणीने त्या सर्वांचा यथायोग्य सन्मान करतो. हा स्वभाव लौकिक राजांचा असतो. कोसलनाथ श्रीराम तर महान ज्ञानी आहेत.॥ ५॥

मूल (चौपाई)

रीझत राम सनेह निसोतें।
को जग मंद मलिनमति मोतें॥

अनुवाद (हिन्दी)

श्रीराम हे खरे तर शुद्ध प्रेमाने प्रसन्न होतात, परंतु या जगात माझ्यापेक्षा मूर्ख आणि मलिन बुद्धीचा दुसरा कोण असणार?॥ ६॥

दोहा

मूल (दोहा)

सठ सेवक की प्रीति रुचि रखिहहिं राम कृपालु।
उपल किए जलजान जेहिं सचिव सुमति कपि भालु॥ २८(क)॥

अनुवाद (हिन्दी)

परंतु कृपाळू श्रीराम माझ्यासारख्या दुष्ट सेवकाचेही प्रेम आणि आवड नक्कीच स्वीकारतील.त्यांनी पाषाणांना तरणारे जहाज (सेतू) आणि वानर-अस्वलांना बुद्धिमान मंत्री बनविले.॥ २८ (क)॥

मूल (दोहा)

हौंहु कहावत सबु कहत राम सहत उपहास।
साहिब सीतानाथ सो सेवक तुलसीदास॥ २८(ख)॥

अनुवाद (हिन्दी)

सर्व लोक मला श्रीरामांचा सेवक म्हणतात आणि मीसुद्धा (लाज न बाळगता) तसे म्हणवून घेतो. कृपाळू श्रीरामही ही निंदा सहन करून घेतात की, सीतानाथांसारख्या स्वामींचा तुलसीदासासारखा (यःकश्चित) सेवक आहे.॥ २८ (ख)॥

मूल (चौपाई)

अति बड़ि मोरि ढिठाई खोरी।
सुनि अघ नरकहुँ नाक सकोरी॥
समुझि सहम मोहि अपडर अपनें।
सो सुधि राम कीन्हि नहिं सपनें॥

अनुवाद (हिन्दी)

हे माझे मोठे धाडस आणि दोष आहे. माझे पाप ऐकून नरकानेही नाक मुरडले. या विचाराने कल्पित भयामुळे मला भीती वाटत आहे, परंतु भगवान श्रीरामांनी स्वप्नातही माझ्या या दोषांकडे लक्ष दिले नाही.॥ १॥

मूल (चौपाई)

सुनि अवलोकि सुचित चख चाही।
भगति मोरि मति स्वामि सराही॥
कहत नसाइ होइ हियँ नीकी।
रीझत राम जानि जन जी की॥

अनुवाद (हिन्दी)

उलट, माझे प्रभू श्रीरामचंद्रांनी ही गोष्ट ऐकून, पाहून आणि आपल्या सुचित्तरूपी चक्षूंनी निरीक्षण करून माझ्या भक्तीचे व बुद्धीचे कौतुक केले. कारण बोलण्यात जरी चूक असली (अर्थात मी स्वतःला भगवंताचा सेवक म्हणत-म्हणवीत असलो) तरी हृदयात चांगुलपणा असला पाहिजे. (मनात मी स्वतःला त्यांचा सेवक बनण्यास योग्य न मानता पापी आणि दीन आहे, असेच मानतो, हा चांगुलपणा.) श्रीरामसुद्धा या आपल्या दासाच्या मनाची स्थिती चांगल्या प्रकारे जाणून प्रसन्न होतात.॥ २॥

मूल (चौपाई)

रहति न प्रभु चितचूक किए की।
करत सुरति सय बार हिए की॥
जेहिं अघ बधेउ ब्याध जिमि बाली।
फिरि सुकंठ सोइ कीन्हि कुचाली॥

अनुवाद (हिन्दी)

प्रभू रामांच्या मनात आपल्या भक्तांची चूक-भूल रहात नाही (ते ती विसरून जातात) आणि त्यांच्या मनाची चांगली भावना शंभर वेळा आठवीत असतात. ज्या पापासाठी त्यांनी व्याधाप्रमाणे वालीला ठार मारले, त्याचप्रमाणे नंतर सुग्रीवसुद्धा वाईट वागला.॥ ३॥

मूल (चौपाई)

सोइ करतूति बिभीषन केरी।
सपनेहुँ सो न राम हियँ हेरी॥
ते भरतहि भेंटत सनमाने।
राजसभाँ रघुबीर बखाने॥

अनुवाद (हिन्दी)

तशीच कृती बिभीषणाचीही होती, परंतु श्रीरामांनी ती स्वप्नातसुद्धा मनात धरली नाही. उलट भरताची भेट झाली, तेव्हा श्रीरघुनाथांनी बिभीषणाचा सन्मान केला आणि राजसभेमध्ये त्याच्या गुणांची वाखाणणी केली.॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

प्रभु तरु तर कपि डार पर ते किए आपु समान।
तुलसी कहूँ न राम से साहिब सीलनिधान॥ २९ (क)॥

अनुवाद (हिन्दी)

प्रभू श्रीराम हे वृक्षाखाली आणि वानर झाडांच्या फांदीवर. (अर्थात कुठे मर्यादापुरुषोत्तम श्रीराम आणि कुठे फांद्यांवर उडॺा मारणारे वानर.) परंतु त्यांनी अशा वानरांना आपल्यासारखे बनविले. तुलसीदास म्हणतात की, श्रीरामांच्यासारखे शीलनिधान स्वामी कुठेही मिळणार नाहीत.॥

मूल (दोहा)

राम निकाईं रावरी है सबही को नीक।
जौं यह साँची है सदा तौ नीको तुलसीक॥ २९(ख)॥

अनुवाद (हिन्दी)

हे प्रभू श्रीराम, तुमच्या चांगुलपणामुळेच सर्वांचे कल्याण आहे. (अर्थात तुमचा कल्याणमय स्वभाव सर्वांचे भले करणारा आहे.) ही गोष्ट खरी असेल, तर तुलसीदासाचे सुद्धा कल्याण होईल.॥

मूल (दोहा)

एहि बिधि निज गुन दोष कहि सबहि बहुरि सिरु नाइ।
बरनउँ रघुबर बिसद जसु सुनि कलि कलुष नसाइ॥ २९(ग)॥

अनुवाद (हिन्दी)

अशाप्रकारे आपले गुण-दोष सांगून आणि सर्वांना नमस्कार करून मी श्रीरघुनाथांच्या निर्मळ कीर्तीचे वर्णन करतो. ते ऐकल्याने कलियुगातील पापे नाहीशी होतात.॥ २९(ग)॥

मूल (चौपाई)

जागबलिक जो कथा सुहाई।
भरद्वाज मुनिबरहि सुनाई॥
कहिहउँ सोइ संबाद बखानी।
सुनहुँ सकल सज्जन सुखु मानी॥

अनुवाद (हिन्दी)

याज्ञवल्क्य मुनींनी जी मधुर कथा मुनिश्रेष्ठ भरद्वाजांना ऐकविली होती, तोच संवाद मी वर्णन करून सांगत आहे. तो सर्व सज्जनांनी सुखाने ऐकावा.॥ १॥

मूल (चौपाई)

संभु कीन्ह यह चरित सुहावा।
बहुरि कृपा करि उमहि सुनावा॥
सोइ सिव कागभुसुंडिहि दीन्हा।
राम भगत अधिकारी चीन्हा॥

अनुवाद (हिन्दी)

प्रथम भगवान शिवांनी हे सुंदर चरित्र रचले आणि नंतर कृपा करून ते पार्वतीला ऐकविले. शंकरांनी काकभुशुंडी हे रामभक्त असल्याचे पाहून व त्यांचा अधिकार ओळखून तेच चरित्र त्यांना दिले.॥ २॥

मूल (चौपाई)

तेहि सन जागबलिक पुनि पावा।
तिन्ह पुनि भरद्वाज प्रति गावा॥
ते श्रोता बकता समसीला।
सवँदरसी जानहिं हरिलीला॥

अनुवाद (हिन्दी)

काकभुशुंडींकडून नंतर ते याज्ञवल्क्यांना मिळाले. त्यानंतर त्यांनी ते भरद्वाज मुनींना ऐकविले. ते दोघे वक्ता आणि श्रोता (याज्ञवल्क्य आणि भरद्वाज) समानशील, समदर्शी आणि हरीची लीला जाणणारे आहेत.॥ ३॥

मूल (चौपाई)

जानहिं तीनि काल निज ग्याना।
करतल गत आमलक समाना॥
औरउ जे हरिभगत सुजाना।
कहहिं सुनहिं समुझहिं बिधि नाना॥

अनुवाद (हिन्दी)

ते दोघे आपल्या ज्ञानाने तिन्ही काळांतील घटना तळहातावर ठेवलेल्या आवळ्याप्रमाणे (प्रत्यक्ष) जाणतात आणि जे भगवंतांच्या लीलेंचे रहस्य जाणणारे हरिभक्त आहेत, ते हे चरित्र नानाप्रकारे सांगतात, ऐकतात व समजून घेतात.॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

मैं पुनि निज गुर सन सुनी कथा सो सूकरखेत।
समुझी नहिं तसि बालपन तब अति रहेउँ अचेत॥ ३०(क)॥

अनुवाद (हिन्दी)

नंतर मी तीच कथा वाराह-क्षेत्रामध्ये आपल्या गुरुजींच्याकडून ऐकली. परंतु त्यावेळी बालपणामुळे मला विशेष समज नव्हती,त्यामुळे ते चरित्र मला चांगल्या प्रकारे समजले नाही.॥ ३०(क)॥

मूल (दोहा)

श्रोता बकता ग्याननिधि कथा राम कै गूढ़।
किमि समुझौं मैं जीव जड़ कलि मल ग्रसित बिमूढ़॥ ३० (ख)॥

अनुवाद (हिन्दी)

श्रीरामांच्या गूढ कथेचा वक्ता व श्रोता हे दोघे ज्ञानाचे भांडार असतात. कलियुगातील पापांनी ग्रासलेला मी महामूर्ख जड जीव ती कशी समजू शकणार बरे?॥ ३० (ख)॥

मूल (चौपाई)

तदपि कही गुर बारहिं बारा।
समुझि परी कछु मति अनुसारा॥
भाषाबद्ध करबि मैं सोई।
मोरें मन प्रबोध जेहिं होई॥

अनुवाद (हिन्दी)

तरीही गुरुजींनी जेव्हा वारंवार ती कथा सांगितली, तेव्हा माझ्या बुद्धीप्रमाणे मला काहीशी समजली. आता तीच मी माझ्या मनाला समाधान मिळण्यासाठी लौकिक भाषेत लिहीत आहे.॥ १॥

मूल (चौपाई)

जस कछु बुधि बिबेक बल मेरें।
तस कहिहउँ हियँ हरि के प्रेरें॥
निज संदेह मोह भ्रम हरनी।
करउँ कथा भव सरिता तरनी॥

अनुवाद (हिन्दी)

माझ्यामध्ये जे काही थोडे बुद्धी व विवेकाचे बळ आहे, त्यानुसार मी हरीच्या प्रेरणेने ही कथा सांगेन. मी स्वतःचा संशय, अज्ञान व भ्रम यांचे हरण करणाऱ्या कथेची रचना करीत आहे. कारण ती संसाररूपी नदी तरून जाण्यासाठी नाव आहे.॥ २॥

मूल (चौपाई)

बुध बिश्राम सकल जन रंजनि।
रामकथा कलि कलुष बिभंजनि॥
रामकथा कलि पंनग भरनी।
पुनि बिबेक पावक कहुँ अरनी॥

अनुवाद (हिन्दी)

रामकथा ही पंडितांना विसावा देणारी, सर्व मनुष्यांना प्रसन्न करणारी आणि कलियुगातील पापांचा नाश करणारी आहे. रामकथा कलियुगरूपी सर्पांसाठी मोर आहे आणि विवेकरूपी अग्नी प्रकट करण्यासाठी अरणी (अग्निमंथन करण्याचे काष्ठ) आहे.॥ ३॥

मूल (चौपाई)

रामकथा कलि कामद गाई।
सुजन सजीवनि मूरि सुहाई॥
सोइ बसुधातल सुधा तरंगिनि।
भय भंजनि भ्रम भेक भुअंगिनि॥

अनुवाद (हिन्दी)

रामकथा ही कलियुगामध्ये सर्व मनोरथ पूर्ण करणारी कामधेनू आहे आणि सज्जन लोकांसाठी संजीवनी आहे. पृथ्वीवर हीच अमृताची नदी आहे. जन्म-मरणरूपी भयाचा नाश करणारी आहे आणि भ्रमरूपी बेडकांना खाऊन टाकणारी सर्पीण आहे.॥ ४॥

मूल (चौपाई)

असुर सेन सम नरक निकंदिनि।
साधु बिबुध कुल हित गिरिनंदिनि॥
संत समाज पयोधि रमा सी।
बिस्व भार भर अचल छमा सी॥

अनुवाद (हिन्दी)

रामकथा ही असुरांच्या सेनेप्रमाणे असणाऱ्या (भयंकर) नरकांचा नाश करणारी आणि साधुरूप देवांच्या कुलाचे हित करणारी पार्वती आहे. संत-समाजरूपी क्षीरसमुद्रासाठी लक्ष्मीसारखी आहे आणि संपूर्ण विश्वाचा भार उचलून धरण्यासाठी अचल पृथ्वीसारखी आहे.॥ ५॥

मूल (चौपाई)

जम गन मुहँ मसि जग जमुना सी।
जीवन मुकुति हेतु जनु कासी॥
रामहि प्रिय पावनि तुलसी सी।
तुलसिदास हित हियँ हुलसी सी॥

अनुवाद (हिन्दी)

रामकथा ही यमदूतांच्या तोंडाला काळोखी फासणाऱ्या या जगातील यमुनेप्रमाणे आहे आणि जीवांना मुक्ती देण्यासाठी जणू काशीच आहे. ही कथा श्रीरामांना पवित्र तुळशीप्रमाणे आवडते आणि तुलसीदासाचे (तुलसीदासांची आई) हुलसी प्रमाणे मनापासून हित करणारी आहे.॥ ६॥

मूल (चौपाई)

सिवप्रिय मेकल सैल सुता सी।
सकल सिद्धि सुख संपति रासी॥
सदगुन सुरगन अंब अदिति सी।
रघुबर भगति प्रेम परमिति सी॥

अनुवाद (हिन्दी)

ही रामकथा शंकरांना नर्मदेप्रमाणे आवडणारी आहे. ही सर्व सिद्धींची आणि सुख-संपत्तीची खाण आहे. ही सद्गुणरूपी देवांना उत्पन्न करून त्यांचे पालन-पोषण करणाऱ्या माता अदितीसारखी आहे. ही जणू श्रीरघुनाथांच्या भक्ती व प्रेमाच्या परम सीमेसारखी आहे.॥ ७॥

दोहा

मूल (दोहा)

रामकथा मंदाकिनी चित्रकूट चित चारु।
तुलसी सुभग सनेह बन सिय रघुबीर बिहारु॥ ३१॥

अनुवाद (हिन्दी)

तुलसीदास म्हणतात की, रामकथा ही मंदाकिनी नदी होय, निर्मळ चित्त चित्रकूट होय आणि सुंदर स्नेह हेच वन होय. त्यामध्ये श्रीसीताराम विहार करतात.॥ ३१॥

मूल (चौपाई)

रामचरित चिंतामनि चारू।
संत सुमति तिय सुभग सिंगारू॥
जग मंगल गुनग्राम राम के।
दानि मुकुति धन धरम धाम के॥

अनुवाद (हिन्दी)

श्रीरामांचे चरित्र हा सुंदर चिंतामणी आहे आणि संतांच्या सुबुद्धिरूपी स्त्रीचा सुंदर शृंगार आहे. श्रीरामांचे गुण-समूह हे जगाचे कल्याण करणारे आणि मुक्ती, धन, धर्म आणि परमधामाची प्राप्ती करून देणारे आहेत.॥ १॥

मूल (चौपाई)

सदगुर ग्यान बिराग जोग के।
बिबुध बैद भव भीम रोग के॥
जननि जनक सिय राम प्रेम के।
बीज सकल ब्रत धरम नेम के॥

अनुवाद (हिन्दी)

(ते गुणसमूह) ज्ञान, वैराग्य आणि योग यांसाठी सद्गुरू आहेतआणि संसाररूपी भयंकर रोगाचा नाश करण्यासाठी देवांचे वैद्य (अश्विनीकुमार) यांच्याप्रमाणे आहेत. ते श्रीसीतारामांविषयी प्रेम उत्पन्न करणारे माता-पिता आहेत आणि व्रते, धर्म आणि नियम यांचे बीज आहेत.॥ २॥

मूल (चौपाई)

समन पाप संताप सोक के।
प्रिय पालक परलोक लोक के॥
सचिव सुभट भूपति बिचार के।
कुंभज लोभ उदधि अपार के॥

अनुवाद (हिन्दी)

पाप, दुःख व शोक यांचा नाश करणारे, तसेच इह-परलोकाचे प्रेमाने पालन करणारे आहेत. विचार (ज्ञान) रूपी राजाचे शूरवीर मंत्री व लोभरूपी अपार समुद्र शोषून टाकणारे अगस्त्य मुनी आहेत.॥ ३॥

मूल (चौपाई)

काम कोह कलिमल करिगन के।
केहरि सावक जन मन बन के॥
अतिथि पूज्य प्रियतम पुरारि के।
कामद घन दारिद दवारि के॥

अनुवाद (हिन्दी)

भक्तांच्या मनरूपी वनामध्ये राहणाऱ्या काम, क्रोध आणि कलियुगातील पापरूपी हत्तींना ठार मारणारे सिंहाचे छावे आहेत आणि भगवान शिवांचे पूज्य व आवडते अतिथी आहेत. तसेच दारिद्रॺरूपी दावानल विझवून टाकण्याची कामना पूर्ण करणारे मेघ आहेत.॥ ४॥

मूल (चौपाई)

मंत्र महामनि बिषय ब्याल के।
मेटत कठिन कुअंक भाल के॥
हरन मोह तम दिनकर कर से।
सेवक सालि पाल जलधर से॥

अनुवाद (हिन्दी)

ते विषयरूपी सापाचे विष उतरविण्यासाठी मंत्र व महामणी आहेत. (माणसाच्या) ललाटावर लिहिलेले व नष्ट होण्यास कठीण असलेले वाईट लेख (वाईट प्रारब्ध) नष्ट करणारे आहेत. अज्ञानरूपी अंधकाराचे हरण करण्याच्या बाबतीत सूर्यकिरणांसमान आणि सेवकरूपी भात-पिकाचे पालन करण्यासाठी मेघाप्रमाणे आहेत.॥ ५॥

मूल (चौपाई)

अभिमत दानि देवतरु बर से।
सेवत सुलभ सुखद हरि हर से॥
सुकबि सरद नभ मन उडगन से।
रामभगत जन जीवन धन से॥

अनुवाद (हिन्दी)

मनोवांछित वस्तू देणाऱ्या श्रेष्ठ कल्पवृक्षाप्रमाणे आहेत आणि सेवा करण्यास हरि-हराप्रमाणे सुलभ व सुख देणारे आहेत. सुकविरूपी शरदऋतूचे मनरूपी आकाश सुशोभित करणाऱ्या तारांगणांप्रमाणे आणि श्रीरामांच्या भक्तांचे तर जीवनधनच आहेत.॥ ६॥

मूल (चौपाई)

सकल सुकृत फल भूरि भोग से।
जग हित निरुपधि साधु लोग से॥
सेवक मन मानस मराल से।
पावन गंग तरंग माल से॥

अनुवाद (हिन्दी)

हे संपूर्ण पुण्याच्या फलाच्या महान भोगांसमान आहेत. जगाचे वास्तविक हित करण्यासाठी साधु-संतांसमान आहेत. सेवकांच्या मनरूपी सरोवरासाठी हंसासमान आणि पवित्र करण्यासाठी गंगेच्या तरंगांसमान आहेत.॥ ७॥

दोहा

मूल (दोहा)

कुपथ कुतरक कुचालि कलि कपट दंभ पाषंड।
दहन राम गुन ग्राम जिमि इंधन अनल प्रचंड॥ ३२(क)॥

अनुवाद (हिन्दी)

श्रीरामांचे गुण-समूह हे कुमार्ग, कुतर्क, दुराचरण आणि कलियुगातील कपट, दंभ आणि पाखंड जाळून टाकण्यासाठी इंधनास नष्ट करून टाकणाऱ्या प्रचंड अग्नीप्रमाणे आहेत.॥ ३२ (क)॥

मूल (दोहा)

रामचरित राकेस कर सरिस सुखद सब काहु।
सज्जन कुमुद चकोर चित हित बिसेषि बड़ लाहु॥ ३२(ख)॥

अनुवाद (हिन्दी)

रामचरित्र हे पौर्णिमेच्या चंद्राच्या किरणांप्रमाणे सर्वांना सुख देणारे आहे, परंतु सज्जनरूपी कुमुदिनी आणि चकोराच्या चित्तासाठी ते विशेष हितकारक आणि फार लाभदायक आहे.॥ ३२(ख)॥

मूल (चौपाई)

कीन्हि प्रस्न जेहि भाँति भवानी।
जेहि बिधि संकर कहा बखानी॥
सो सब हेतु कहब मैं गाई।
कथा प्रबंध बिचित्र बनाई॥

अनुवाद (हिन्दी)

पार्वतीने शंकरांना जे प्रश्न विचारले आणि त्यांनी त्यांची विस्ताराने जी उत्तरे दिली, ती सर्व मी विशेष प्रकारे कथेची रचना करून सांगेन.॥ १॥

मूल (चौपाई)

जेहिं यह कथा सुनी नहिं होई।
जनि आचरजु करै सुनि सोई॥
कथा अलौकिक सुनहिं जे ग्यानी।
नहिं आचरजु करहिं अस जानी॥
रामकथा कै मिति जग नाहीं।
असि प्रतीति तिन्ह के मन माहीं॥
नाना भाँति राम अवतारा।
रामायन सत कोटि अपारा॥

अनुवाद (हिन्दी)

ज्याने पूर्वी ही कथा ऐकली नसेल, त्याने ही ऐकून आश्चर्य करू नये. जे ज्ञानी लोक ही विलक्षण कथा ऐकतात, ते जाणत असूनही आश्चर्य करीत नाहीत. कारण जगामध्ये रामकथेला काही मर्यादा नाही, असा विश्वास त्यांच्या मनात असतो. श्रीरामांचे नाना प्रकारचे अवतार झाले आहेत आणि शंभर कोटी व अपार रामायणे आहेत.॥ २-३॥

मूल (चौपाई)

कलपभेद हरिचरित सुहाए।
भाँति अनेक मुनीसन्ह गाए॥
करिअ न संसय अस उर आनी।
सुनिअ कथा सादर रति मानी॥

अनुवाद (हिन्दी)

मुनीश्वरांनी श्रीहरीची सुंदर चरित्रे कल्प-भेदानुसार अनेक प्रकारे गाईली आहेत, असा विचार करून मनात संशय आणू नका आणि आदरपूर्वक प्रेमाने ही कथा ऐका.॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

राम अनंत अनंत गुन अमित कथा बिस्तार।
सुनि आचरजु न मानिहहिं जिन्ह कें बिमल बिचार॥ ३३॥

अनुवाद (हिन्दी)

श्रीराम अनंत आहेत, त्यांचे गुणसुद्धा अनंत आहेत. त्यांच्या कथांचा विस्तारही अनंत आहे. म्हणून ज्यांचे विचार शुद्ध आहेत, त्यांना ही कथा ऐकून आश्चर्य वाटणार नाही.॥ ३३॥